कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - २

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
10 Mar 2020 - 8:21 pm

कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - २

गाभा :-
कर्नाटक राज्यातील समुद्र आणि सह्याद्री मधली पर्यटन स्थळे बरीच आहेत आणि विखुरलेली आहेत. ती सर्व एकाच सहलीत करणे अशक्य म्हणून दोन भागांत करायचं ठरवलं होतं. समुद्र किनाऱ्याने कोकण रेल्वे जाते आणि काही स्टेशन्सला एक्सप्रेस गाड्या थांबतात. किनाऱ्यावरच्या काही शहरांतून सह्याद्री पर्वत चढून जाणारे मुख्य रस्ते आहेत आणि त्या मार्गांवर पर्यटनासाठी जागा ( बहुतेक देवळेच ) आहेत. नेचर रिझॉट्सही आहेत. एका मार्गाने वर गेलो तर दुसऱ्या मार्गावरची पाहता येत नाहीत. त्यामुळे थोडा सैल आराखडा बनवला. अगोदरच्या कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - १ या लेखात उत्तर कर्नाटकातली गोकर्ण, शिरसी, बनवासी आली आहेत.
१) जाण्याचे रेल्वे तिकिट बुकिंग 'उडुपी' चे (12619 मत्स्यगंधा एक्सप्रेस)
२) येण्याचे रेल्वे तिकिट बुकिंग 'कडुर' ते दादर. (11022, शरावती एक्सप्रेस).
२-७ मार्च २०२०.मध्ये तीन दिवस हॉटेल मुक्काम पण बुकिंग नाही. यावर निघालो.
ठिकाणे :- उडुपी स्टेशन - श्रृङ्गेरी(१) - चिकमगळुरु(२) - कडुर स्टेशन परत.प्रवासाची सुरुवात वेळेत होऊन उडपीला सहाला उतरलो. स्टेशनबाहेर प्रीपेड taxi, खाजगी बसेस, ओटो होत्याच. बसने तीन किमिवरच्या मोठ्या बस स्टँडला(खाजगी) पोहोचल्यावर तिथून फक्त अर्धा किमि अंतरावरचा श्री कृष्ण मट् ( मठ) गाठला. वाटेत मोठी झाकपाक दुकाने आहेत. अजून उघडायची होती. शहर जागे होत होते. स्वच्छ. मठ म्हणजे देऊळ आणि तेही कृष्णाचे म्हणजे दिवसांत पंधरा वीस वेळा उघडणार बंद होणार हे अपेक्षितच. बाहेर आवारात दोन रथ उभे.
फोटो १
रथ - उडुपी श्री कृष्ण मट्
मटा'त आतमध्ये दर्शनासाठी एक दोनफुटी चौकटीत चार इंचाच्या नऊ खिडक्या. त्यातून तो शाम जेवढा दिसेल तेवढा पाहिला. संपलं. ( सकाळी ५ ते रात्री ९ या वेळात अधूनमधून दर्शन करता येते. मठाच्या मोठ्या आवारातच असलेली चंद्रमौलिश्वर आणि अनंतेश्वर ही हजार वर्षांपूर्वीची देवळे मात्र सावकाश पाहता येतात. काही फारिनर तिथे राहिलेले दिसले. ते बहुतेक संस्कृत कॉलेजात शिकत असावेत. उडपीमध्ये मालपे आणि कौप समुद्रकिनारे पाच दहा किमिवर आहेत. पण तिकडची मजा घ्यायची तर एक दिवस राहून संध्याकाळी जावे लागणार .(हॉटेल्स आणि रेस्टारंटस खूप) तसा अमचा समुद्र पाहण्याचा उत्साह चिमुटभरच. वेळेत श्रृङ्गेरी गाठणे गरजेचे.
परत बस स्टँडला आलो. एकूण तीन बाजुबाजूला आहेत. मोठा खाजगी बसेसचा, एक सिटी बसेसचा खाजगी आणि एक छोटा कर्नाटक एसटी उर्फ KSRTCचा त्यालाच रेड् बस स्टँड म्हणतात हे कळलं. आता श्रृङ्गेरी जाण्यासाठी आगुंबे मार्गे शिमोगा ( आता शिवमोगा नाव) बस असतात त्याने जायचे आणि आगुंबेला बस बदलायची. किंवा उडुपी - कारकला बसने जाऊन तिथे बस बदलायची. दोन पर्याय - आगुंबे पाहता येईल किंवा कारकला - मूडबिद्री - वेणूर ही तीन जैन बसदी ( = मंदिरे ) पाहण्यासाठी कारकला येथे मुक्काम करणे. यासाठी एक दिवस वाढवावा लागेल. हे एक 'उरकणे' पर्यटन असल्याने आगुंबे मार्गे रेड् बसने ( हिरव्याही बऱ्याच असतात !)निघालो. जाताजाता आगुंबे काय आहे हे ओझरते कळेल. पाच किमिवरच्या मणिपाल या प्रसिद्ध मेडिकल कॉलेजच्या गावानंतर बस हळूहळू सह्याद्रीचा घाट चढू लागली. इकडे हे एक बरं आहे सह्याद्रीचा पश्चिम उतार अगदी समुद्राला जवळ आहे. दाट झाडी वाढू लागली ( सोमेश्वरा गावापासून संरक्षित अभयारण्य सुरू होते)आणि दीड तासाने ५४ किमि पार करून आगुंबेत (550 मिटरस उंची) पोहोचलो. दुतर्फा खाजगी प्रापर्टीज आणि कुंपण. कुठेही आत शिरलं असं करता येणार नाही. साप पाळणाऱ्या/संशोधन करणाऱ्या विटाकरचे इथे नागराज /किंग कोब्रा केंद्र आहे. वाटेत काही नेचर रिझॉट दिसले त्यात राहून भटकता येईल. (खाजगी हॉटेल्स नाहीत.) बस बदलण्यासाठी उतरलो. मोठी फुलपाखरे स्टँडलाही उडताना दिसत होती. लवकरच बसने २४ किमिवरच्या श्रृङ्गेरीला (630 मि उंची) चाळीस मिनिटांत पोहोचलो.
श्रृङ्गेरी बस स्टँडजवळच एक हॉटेल दिसले त्यात रुम घेऊन जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. आराम करून आदि शंङ्कराचार्यांचे शारदापीठ पाहायला निघालो. तिनशे मिटर्सवर आहे. प्रवेशाच्या गोपुराजवळच दोन मोठे भक्तनिवास आहेत. सर्व भाविक इकडेच राहतात. मोठ्या आवारात शारदांबा मंदिर ( २-४ बंद), विद्याशंकर मंदिर (१२-४ बंद) आणि तुंग नदीच्या पुलावरून पलिकडे जाण्याचा पुल (१२-४ बंद) आहे. नदीतल्या मोठ्या काळ्या माशांना खायला घालणे हा उद्योग पुलावरून छान दिसतो. विद्याशंकर मंदिरात (तेराव्या शतकातले) जे बारा खांब आहेत त्यावर बारा राशींची छोटी शिल्पे हे विशेष. मकर रास म्हणजे पाश्चिमात्त्य ज्योतिष पद्धतीतला मेंढाच आहे. (फोटोला बंदी आहे.)बाहेरच्या भिंतीवरची शिल्पे पावसाने झिजलेली आहेत. नदीपलिकडच्या विस्तृत रम्य आवारात बऱ्याच इमारती आहेत त्यापैकी शेवटचे गुरुनिवास हे चारमजली उंच बिन खांबांचे छत असलेले सभागृह अप्रतिम. या परिसरात येण्यासाठी कारसाठी दुसरा रस्ता आहे. एक झुलता पूलसुद्धा आहे. एकूण छान. गोपुरासमोरच्या मोठ्या रुंद रस्त्यावर हॉटेल्स आणि रेस्टारंटस, बाजार आहे. फोटो २
पूल - तुंगा नदी, श्रृङ्गेरी शारदापीठ

Video sringeri 24 mb

Video = 'Sringeri 40 mb'
Link =
https://youtu.be/B3TUBTOpWxE
फोटो ३
गोपुर - श्रृङ्गेरी शारदापीठ

दुसरे दिवशी चिकमगळूरु'ला सकाळीच निघालो. हे शहर धार्मिक तसेच आणखी एका विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे भारतातील पहिली कॉफी लागवड इथे झाली. श्रृङ्गेरी सोडून रस्त्याने जाऊ लागल्यावर लगेच दोन्ही बाजूस कॉफीच्या बागा /वने दिसू लागतात. केंद्रीय कॉफी बोर्डाची एक संशोधन संस्था आणि शाळा दहा किमिवर आहे. कॉफीची दोन तीन प्रकारची झाडे/झुडपे आहेत. काही बागांत पांढऱ्या शुभ्र फुलांनी झाडे बहरलेली आणि मंद सुवास पसरलेला. हा बहर म्हणे पाचसात दिवस टिकतो आणि त्यावर फळे धरायला सात ते नऊ महिने जावे लागतात. मग तोडणी. तरीच बागांत कुठे कुणी दिसत नव्हते. कडेने काही सहा फुटी झाडांवर कॉफीची हिरवी, लाल फळे दिसली. इथली कॉफी झाडे उंच झाडांच्या ( सिल्वर ओक, निलगिरी )सावलीत वाढवतात. सहाशे ते बाराशे मिटरस उंचीवर. किती उंचीवर, सावलीत किंवा उघडी कॉफी वाढते यावर कॉफीचा स्वाद बदलतो आणि भाव मिळतो. (बसमधून फोटो काढता आले नाहीत.) दाट सावलीतून प्रवास सुरू असतो आणि सर्व ठिकाणी कुंपण आहे. फक्त ओढ्यात मोकळे. ओढे आता मार्च महिन्यातही वाहत होते! उघड्या उजाड चहामळ्यांपेक्षा कॉफी बागा बघायला सुंदर वाटतात. श्रृङ्गेरी ते चिकमगळूरु प्रवास ८८ किमीचा अडीच तासात संपतो आणि आपण सहाशे मिटरस उंचीवरून हजार मिटर्सवर येतो. बस स्टँडच्या बाहेरच्या रस्त्यावर सर्व थरांतली हॉटेल्स ( go stays type, रुम आहे का विचारायचं आणि राहायचं) तसेच शाकाहारी/मासाहारी रेस्टारंट्सही बरीच दिसली. मग एका जवळच्याच हॉटेलात (मंजुनाथ) रुम घेतली. पटकन जेवण केले. आजचा अर्धा दिवस बाबाबुदनगिरी टुअर मिळाल्यास पाहणे आणि उद्याचा पूर्ण दिवस हळेबिडु - बेलूर आणि कॉफी म्युझियम पाहणे असा प्लान होता. हॉटेलवाल्याने सांगितले - " बाबाबुदनगिरी , माणिक्यधारा जीपने १९०० रु. झरी फॉल्स पाहिजे असल्यास २३०० रु. ते प्राइवेट प्रापर्टीत आहे. शेअरिंग स्वस्त पडेल." दोघांना परवडणारे नव्हते, बघतो म्हणालो आणि एसटी स्टँडच्या चौकशीवाल्यास डायरीत लिहून आणलेली ठिकाणे दाखवून बसेस आहेत का विचारलं.
"या ठिकाणी बस नाहीत पण खाजगी बस बुदनगिरीला (B B HILLS )दिवसाला चार जातात, तिकडे बाहेर उभ्या असतात. "
म्हणजे अमच्या हॉटेलच्या दारातच! पण हॉटेलवाल्याने हे सांगितलेच नाही!
" बेलवडी'ला ही 'जावागल' बस जाते."
लगेच त्या बसने निघालो.
तर तासाभरात पावणेतिनाला बेलवडी(३० किमी) स्टॉपला पावलो. तिथेच सरकारी पाटी दिसली वीरनारायण टेंपल आणि थोड्याच अंतरावरचे जुने देऊळ. चौऱ्यांशी खांबांवर सभामंडपाचे छत पेललेले भक्कम देऊळ. एक महिला पोलिस पहारेकरी ड्युटीवर होती. बेलवडी गाव छोटेसे, प्रत्येक घरात गाईम्हशीचा गोठा. एकूण छान सुरुवात.
फोटो ४
वीरनारायण मंदीर - बेलवडी

गूगल म्यापमध्ये हळेबीडु अगदी जवळच दिसत होते. शहाळं पितानाच विक्रेत्याला विचारले. "बस येईल पाच मिनिटांत, पुढच्या चौकात उतरा आणि ओटो/बस बदला." आणि तसेच झाले. अर्ध्या तासात हळेबीडात आलो. ( दोन किमिटरवर हळेबिडु फाटा/क्रॉस आणि तिथून सात किमि)
प्लान बदलला गेला होता. साडेतीन झालेले. विचार केला हळेबीड पटापट उरकले तर बेलूरसुद्धा होईल. भराभर फोटो काढत सुटलो. हे होयसाळेश्वर देऊळ अर्ध्या तासात उरकणे हा घोर अपमान होता.
फोटो ५
होयसाळेश्वर - हळेबीड पाटी

फोटो ६
होयसाळेश्वर - हळेबीड शिल्पे

फोटो ७
होयसाळेश्वर - हळेबीड शिल्प.

फोटो ८
होयसाळेश्वर शिल्पे- हळेबीड

पुढच्या दोरासमुद्र (/द्वारसमुद्र) तलावाकडे न जाता तिनशे मिटर्स अंतरावरच्या जैन बसदीकडे ( जैनांचे देऊळ) गेलो. इथे फारशी शिल्पे नाहीत पण अतिमहत्त्वाचे शिलालेख पाचसहा आहेत. आतमध्ये दहाफुटी अखंड मूर्ती. इकडे कुणी फिरकत नाही.
फोटो ९
बसदी पाटी, हळेबिडु.

फोटो १०
बसदी लेख, हळेबिडु.

परत हळेबीड होयसाळेश्वर समोरच्या बस स्टँडवरून बेलूर बस लगेच मिळाली. सोळा किमि अंतर आहे. उतरल्यावर तडक बेलूरचे चन्नकेशवा मंदिर गाठले. सवापाच झालेले. ही मंदिरे सूर्योदय ते सुर्यास्त उघडी असतात. चपला काढतानाच कळलं साडेसातपर्यंत बघता येईल. हुश्श. मग निवांतपणे पाहिले. दोन्ही होयसाळ राजांनीच बांधली. जेव्हा बाहेर पडलो तेव्हा शहाळं घेतलं. साठीची विक्रेती बाई होती. तिने सपासप शहाळं सोलून दिलं. पुढेही स्त्रियाच विकत होत्या. मग स्टॉपवरून हसन ते चिकमगळुरु बसने (१२ किमि) परत निघालो. या बस सतत धावतात. हळेबिडु आणि बेलूरचा समावेश हसन जिल्ह्यात असला तरी चिकमगळूरुकडून अधिक जवळ आहे.
फोटो ११
बेलूर पाटी

फोटो १२
होयसाळेश्वर चिन्ह - बेलूर

फोटो १३
गरुड - बेलूर

फोटो १४
बेलूर शिल्प.

फोटो १५
त्रिविक्रम - बेलूर
आजचा अर्धा दिवस वसूल झाला. आता उद्या फक्त पर्वतावर. सकाळीच आठ वाजता तयार होऊन नाश्ता करून B B HILLS जाणाऱ्या बसमध्ये बसलो. साडेआठला सुटणार म्हणता नऊला सुटली कारण प्रवासी नव्हते. दोन युवक बसलेले त्यांना हिंदी येत होते.
" और पाच दिनों बाद बाबा का उरुस है तब बस के उपर दस लोग बैठते हैं! बसे टैम पर चलती हैं।"
तर बस निघाली आणि पाच किमिनंतर तारिकेरी रस्ता सोडून वर घाटात चढू लागली. अरुंद पण पक्का चांगला रस्ता आणि पुन्हा कॉफी मळे सुरू झाले. होम स्टे हॉटेल्स अधुनमधून दिसत होती. २४ किमिवर अथिरुंडी गावापाशी धबधबा रस्त्याकडेच दिसतो ( अथिरुंडी गावाजवळचा धबधबा Honnamanna Halla waterfalls
या युट्युबवरच्या विडिओमध्ये
https://youtu.be/1OSiSVFdkoc
( By : Steps Together)
6:00 to 7:15 इथे दिसेल.
मार्च महिन्यातही यापेक्षा थोडे कमी पाणी वाहात होते. )आणि बरेच लोक भिजत होते. यासाठी हायर्ड जीप/कारने यावे लागेल. बसमधूनच पाहावा लागला. मार्च महिना असुनही पाणी जोरात पडत होते. इथूनच मुलायनगिरी शिखराकडे जाणारा रस्ता फुटतो. मग अथिरुंडी गाव व नंतर सहा किमीवर बाबाबुदनगिरी माथा. हे तीस किमि पार करून आपण १६५० मिटर्स उंचीवर येतो. इथे बाबाची समाधी आहे. बाबा बुदन नावाचा अवलिया १४५० च्या आसपास अरब देशात गेलेला. तिथे आफ्रिकेतील इथिओपियातील कॉफी मिळत असे. ते लोक पक्के हुशार. कॉफी बिया कुटून किंवा भाजूनच
देत म्हणजे उगवणार नाहीत. बाबाने सात अस्सल बिया तिकडून दाढीत लपवून चिकमगळुरास आणून पेरल्या आणि इथे कॉफी आली. या गोष्टीला मान्यता मिळाली आहे. हा बाबा दत्ताचा अवतार आहे असेही लोक समजत. इथे एका गुहेत तो राहायचा त्यात त्याची समाधी आणि पादुका आहेत. हिंदु, मुसलमान आणि कॉफी मळेवाले दर्शनास येतात. इथून पायी तीन किमिवर एक धबधबा/झरा आहे. माणिक्यधारा.गाडीचा सात किमिचा रस्ताही आहे. तिथे जाऊन आलो. माथ्यापासून फक्त शंभर फुट खाली असूनही एवढे पाणी कुठून कसे काय येते हे आश्चर्य वाटते.
फोटो १६
माणिक्यधारा - बाबाबुदनगिरी शिखर
इथूनच समोरचे मुलयनगिरी शिखर समोर दिसते. आलेली बसच परत साडेबाराला निघणार होती ती एकला सुटली. त्याने परत येऊन जेवण करून रुमवर आराम केला. एकूण सह्याद्रीच्या या भागाची ओळख झाली. चार वाजता पुन्हा बाहेर पडलो आणि उरलेले ठिकाण म्हणजे 'कॉफी म्युझिअम' पाहायचे ठरवले. चौकशी करता "M G ROAD ला जा' हेच प्रत्येक जण सांगत होते. हा रस्ता पलिकडे जवळच होता. रस्ताभर दळलेल्या कॉफीचा सुगंध पसरलेला कारण कॉफी विकणाऱ्यांचीच बरीच दुकाने होती. तिथे प्रत्येक जण " इकडे कुठे कॉफी म्युझिअम नाहीच" हे ठणकावत होता, किंवा 'पांडुरंग कॉफी' दुकानात विचारा सांगायचे. गूगल म्यापने आरटीओ ओफीस, जिल्हा परिषद जवळ दाखवले. ते दाखवूनही नाही म्हणाले. मग जवळच्याच पांडुरंगाला शरण गेलो. मालकच होता.
"कॉफी म्यझिअम?"
" तुम्हाला म्यझिअम कशाला हवे? त्यापेक्षा इथेच दोन किमिवर हिरेमगळूरुत ( = थोरली मुलगी) दोन देवळे आहेत तिथे जा. आजचा दिवस फार चांगला आहे, गुरुवार एकादशी. तिकडेच जा."
" बरं, संध्याकाळी जातो पण म्युझिअम आहे का?"
"आहे ना, हे पाहा" म्हणत त्याने एका मोठ्या गठ्ठ्यातून एक कागद ओढला. खरडकागद समजलो पण तो नकाशा होता! त्यावर मार्क करून हातात दिला.
पांडुरंग पावलाच.
मग लगबगीने ओटो करून तिथे पाच किमिवरच्या म्युझिअमला (१२०रु) पोहोचलो. ( नेटवरच्या माहितीनुसार दहा ते सात वेळ दिली होती. ) गेटवरच वाचमनने 'क्लोझ्ड' खूण केली. सहा वाजलेले. मग ओटोने परत न येता बसनेच (१२रु)परत आलो. वैकुंठ गाठता आले नाही तरी दारापर्यंत गेलो हे सुद्धा विशेष. आजचा दिवसही छान गेला. उद्या फक्त आवरून चेकाऊट करून बसने कडुर स्टेशन (४० किमि) गाठणे आणि पावणेदहाची ट्रेन पकडणे एवढेच काम बाकी राहिले. शुक्रवार शेवटचा दिवस. गाडी एक तास उशिरा आहे ही सुवार्ता सकाळीच कळली होती. सातच्या शिमुगा बसने तासाभरात कडूर आले. आता या रस्त्याला फक्त सुपारी (=अरिका )आणि नारळाच्या बागा होत्या. कॉफी नाही. त्याला डोंगर उतार लागतो. छान रस्ता. बस स्टँडवरच्या क्यांन्टिनात नाश्ता केला. आतापर्यंत खाल्लेल्या मेदुवडा इडलीत इथेच सर्वात छान मिळाली. स्टँड आणि स्टेशन समोरासमोरच होते. अकरा वाजता गाडी आली आणि परतीचा प्रवास सुरू झाला तरी चिकमगळुरु (= धाकटी मुलगी), श्रृङ्गेरी आणि उडुपीचे विचार येत होते. कडुर -दावणगेरे -चिकजाऊर -हवेरी - हुबळी-धारवाड पर्यंतचा लोहमार्ग दुहेरी झाला आहे. धारवाड -अलनावर लोंडा - बेळगाव एकेरीच आहे. गाडीला उशीर झाल्याने इथे संध्याकाळ झाली. वळणेवळणे घेत हळूहळू जाताना बाहेर खूप मोर पाहता आले. हुबळी - धारवाडमध्ये स्टेशनातच धारवाड-पेढे खरेदी केले. ते खात ट्रिपची आठवण काढण्यासाठी.
फोटो १७
पर्यटक नकाशा - चिकमगळुरु शहर

फोटो १८
पर्यटकांसाठी माहिती - चिकमगळुरु शहर

फोटो १९
पर्यटकांसाठी माहिती - कोस्टल नकाशा

-------------
माहिती देण्यात काही अधिक उणे झाल्यास लिहा. सूचनांचे स्वागत.

प्रतिक्रिया

कोप्पळ, हंपी जवळ कनकगिरी दिसले. पुढच्या भागात तिथे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजींचे देहावसान झाले.

AKSHAY NAIK's picture

10 Mar 2020 - 11:03 pm | AKSHAY NAIK

छान लिहिलंय.

सनईचौघडा's picture

11 Mar 2020 - 1:41 pm | सनईचौघडा

मस्त सफर

तुषार काळभोर's picture

11 Mar 2020 - 5:02 pm | तुषार काळभोर

सगळी मंदीरं अन शिल्पं अप्रतिम आहेत.
पहिल्या फोटोतल्यासारखा रथ तिरुपती (डोंगराच्या पायथ्याचं गाव) मध्ये पाहिला होता.

प्रचेतस's picture

12 Mar 2020 - 8:45 am | प्रचेतस

व्वा...!!!
थोडक्यात पण सुंदर लिहिलंय. सगळ्या स्थळांची व्यवस्थित ओळख करुन दिलीत.
हळेबीडू आणि बेलुर केव्हाचे जायचे आहे.

फोटो ६
होयसाळेश्वर - हळेबीड शिल्पे - कार्तिकेय आणि गणेश

फोटो ७
होयसाळेश्वर - हळेबीड शिल्प. - अर्जुन मत्स्यभेद करताना (द्रौपदीस्वयंवर प्रसंग)

फोटो ८
होयसाळेश्वर शिल्पे- हळेबीड - विषकन्या शिवाय पायातील खडावा लक्षवेधी आहेत.

कंजूस's picture

12 Mar 2020 - 10:08 am | कंजूस

धन्यवाद प्रचेतस.
प्लान चुकला माझा. ५ मार्च पुर्ण दिवस हळेबीड - बेळूर यासाठी ठेवलेला होता. पण ते ४ तारखेला अर्ध्या दिवसात उरकावं लागलं. मग ५ ला पर्वतावर. खरा कार्यक्रम कर्नाटक सह्याद्री पाहणे आणि ट्रेकिंग च्या जागा तपासणे होता.

// इथल्या सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग अवघड वाटतंय कारण पश्चिम उतार हा खूप पसरलेला आहे आणि खाजगी बागायतदारांनी अनेक एकर/हेक्टर वन ताब्यात घेऊन कुंपण घातलं आहे. त्यातून जाता येणार नाही. जे अधुनमधून 'होम स्टे' दिसतात त्यात मालक लोक त्यांच्याच प्रापर्टीत ट्रेक करवतात. पण ते महाग पडेल व मर्यादित असेल. उदा० झरी फॉल्स.
केमन्नगुंडी हा बाबाबुदन सह्य पर्वतातला बाजूचा भाग आहे. तिथे उत्तरेकडून तारिकेरी/लिंगनहळ्ळीकडून बस रस्ता आहे, दक्षिणेकडून कार'चा आहे.

याउलट महाराष्ट्रात सह्याद्रीत उतार/चढ तीव्र असून कसेही कुठेही दहा किमि ट्रेक करता येतो. अडकाठी नाही.

एकूण दोन भागात केलेल्या पर्यटनातून कर्नाटक सह्याद्री पाहण्याची हौस फिटली.//

------------------------

स्वत:च्या वाहनाने फिरल्यास खूप काही पाहता येईल व तसे नकाशे दिले आहेत. तसा एक लेख २०१३ मध्ये 'लयभारी' आईडीचा मिपावर आहेच.

--------------
हळेबीडचे बरेच फोटो काढले आहेत. त्याचा कलादालन मध्ये समावेश करण्याचा विचार आहे. दोन फोटो wikimedia Commons मध्ये काल चढवले.

------------
अठरा पुराणांपैकी स्कंद पुराण सर्वात मोठे आहे त्याची ११०० पानांची संक्षिप्त (!)पिडिएफ हिंदी आवृत्ती फ्री उपलब्ध आहे.
यामध्ये काशीखंडात शिवाची माहिती आहे.
शिव पुराण, विष्णुपुराण,गरुड, वामन आहेच. त्यामधल्या कथा वाचून हळेबीड शिल्पांबद्दल कळू शकेल. तरीही काही शिल्पांत हा अमुक देव नक्की कोणत्या दैत्याचा वध करत आहेत हे थोडे संदिग्ध राहाते.
हळेबिडचे गाईडसुद्धा काही नेहमीची शिल्पे दाखवून वर्णन करून उरकतात. एवढ्या सर्व कथा सांगणार कधी.
---------
हळेबिडला - होयसाळेश्वर मंदिर पाहणारे बरेच पर्यटक मोबाइलचा विडिओ चालू करून प्रदक्षिणा घालून जाताना दिसले.
----------------
हळेबीड, बेलूर दोन्ही मंदिरास प्रवेश शुल्क ठेवलेले नाही.

माहिती, शिल्पांचे फोटो सुंदर आहेत.

कर्नाटकातील ऐतिहासिक महत्वाची स्थळे चांगली राखलेली दिसतात. कर्नाटक आणि एकूणच दक्षिणेतली धार्मिक स्थाने स्वच्छता-टापटीप याबाबत उजवी आहेत.

चौकटराजा's picture

16 Mar 2020 - 6:34 am | चौकटराजा

मी श्रीनगर ते विवेकानंद खडक कन्याकुमारी व जेसलमेर ते पुरी असा भारत पाहिलेला आहे . एकूण दाक्षिणात्य माणूस स्वच्छतेबाबत उत्तरेपेक्षा जास्त जागरुक असतो . कर्नाटक हे माझे सर्वात लाडके पर्यटन राज्य आहे ! किनारा , जंगल ,मुसलीम, हिंदू वास्तुविद्या , धार्मिक स्थळे ,दगड धोंडे साहित्यिक ,चित्रकार गायक सर्वानी समृद्ध ! उणे जर काही असेल तर माझ्या मते कर्नाटकची स्त्री "सुंदर" म्हणणे कठीण आहे ! असलीच तर ती शिल्पात मात्र आहे !

वाचनखूण साठवली आहे.

सुधीर कांदळकर's picture

13 Mar 2020 - 4:26 pm | सुधीर कांदळकर

उरकणे म्हणून बरेच काही पाहिलेत आणि त्याबद्दल छानसे लिहिलेत देखील.

झुलता पूल सुंदर. मंदिरातले तसेच हळबीडु इथले कोरीवकाम अप्रतिम. अनेक, अनेक धन्यवाद.

अभिरुप's picture

18 Mar 2020 - 12:57 pm | अभिरुप

अतिशय सुंदर प्रवासमाला. खुप शिकावयास मिळत आहे आपल्यासारख्यांच्या लेखनातून.

छान माहिती दिलीत . कारवार , गोकर्ण, दांडेली , हंपी, बदामी मोटारसायकल वरून केले आहे, आता कूर्ग बघायचे आहे, पण बंगळूरु ऐवजी
बेळगावी कडून कसे जाता येईल ? याची काही माहिती आहे का?

नकाशा पाठवतो . पण स्कुटर वाहन/रेल्व//बस आणि परत बेळगावी किंवा कुठे? फक्त कोडगू ( कुर्ग ) मधले माडिकेरी, बयलाकुप्पे(तिबेटी वसाहत) तलेकावेरी(कावेरी उगम), भागमण्डला, सिद्दापूर(कॉफी बागा), दुबारे (हत्तींना पाहणे) पाहायचे आहे?
तिथले कोदवू लोक बघायला मिळतात का माहिती नाही.

चिकमगळुरु पाहिल्यावर आता मला माडिकेरी तसेच असावे असं वटतंय. थंड हवा, डोंगर आणि कॉफीचे मळे.