शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग २

Primary tabs

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in भटकंती
9 Feb 2020 - 7:09 pm

दिवस ०२/०२/२०२० शेगाव दर्शन आणि माहूर कडे प्रस्थान

२ तारखेची ती पहाट खूपच रम्य वाटत होती.वडील तर पहाटे सहा वाजता सर्व आवरून दर्शनासाठी जाण्यास तयार झाले होते. सकाळी लवकर गेल्यास दर्शन लवकर होईल व गर्दी नसेल असा त्यांचा कयास होता. शेवटी मी माझी लहान मुलगी आणि पत्नी आम्ही देखील सगळे लवकर उठून ७ वाजेपर्यंत तयार झालो, तोपर्यंत माझे वडील व आई यांचा आनंद विहार चा एक फेरफटका मारून झाला होता. सकाळी साधारण सव्वासात च्या दरम्यान आम्ही सगळे रूम मधून बाहेर पडलो.
खाली येवून पाहतो तर नजारा काही औरच होता, आपण कोणत्या युरोपीय देशात तर नाहीत ना असे सारखे वाटू लागले. आनंद विहार परिसरातील स्वच्छता आणि शांतता पाहून मन अगदी प्रफुल्लीत झाले. कदाचीत येथील सुंदरतेचे वर्णन करण्यासाठी एक वेगळाच लेख लिहावा लागेल असे वाटले. थोडक्यात काय तर शब्दात मांडता येणार नाही असा तो अनुभव होता. असो, तर आम्ही सर्व कुटुंब आनंद विहार परिसरात असलेल्या एका चहा च्या मशीन समोर येऊन थांबलो, चहा पिला व दिवसाची सुरवात करण्यासाठी सज्ज झालो.
आनंद विहार परिसरातून अनेक बसेस ये जा करताना दिसत होत्या. तेव्हा कळले की येथून मंदिरात जाण्यासाठी निशुल्क बस सेवा उपलब्ध आहे. तेव्हा मंदिर परिसरात गाडी घेवून जाण्यापेक्षा बसनेच जाण्याचा निर्णय केला, तसेही मंदिर परिसरात पार्किंग ची कोणतीही सोय नाही उगाच रस्त्यात कोठेतरी गाडी लावण्यापेक्षा हे बरे.
सकाळी ८ च्या सुमारास बसने आम्हाला मंदिराजवळ आणून सोडले. बस मधून उतरून मंदिरापर्यंत चालत जाताना वाटेत अनेक नाश्त्याची दुकाने व हातगाडे माझासारख्या खव्वया चे लक्ष वेधून घेत होती. वाफाळलेले फोडणीचे पोहे, रस्सेदार मिसळ व प्रसिद्ध शेगाव कचोरी खाण्याचा मोह मला झाला तसा प्रस्ताव मी आमच्या कुटुंबासमोर मांडला, मात्र majority wins या उक्तीप्रमाणे त्यांनी तो धुडकावून लावला. पहिले दर्शन मग पोटोबा या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
आम्ही सगळे ८.१५ वाजता मंदिरा मध्ये प्रवेश केला आणि काय आश्चर्य आमचे दर्शन फक्त ५ मिनिटात झाले. मग काय वडिलांनी पुन्हा एकदा दर्शन घेण्याचे ठरविले, आम्ही देखील पुन्हा एकदा दर्शन घेवून बाहेर पडलो. माझ्या आई वडिलांची गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा, पारायण करणे, पोथी वाचणे हा त्यांचा नित्यक्रम त्यामुळे कितीवेळा दर्शन घेतले तरी पुन्हा दर्शन घेण्याचा त्यांचा मोह काही सुटत नव्हता. अर्थात महाराजांचे रूप एकाच दर्शनात डोळ्यात साठवणे तसे अवघडच. माझ्या आई वडिलांची साधारण चार पाच दर्शने झाली होती. साधारण ९ च्या दरम्यान मंदिरातील प्रसादालयात प्रसाद घेण्यासाठी आम्ही सर्वजन लाईन मध्ये लागलो. प्रसाद घेवून अगदी तृप्त झालो. आणी मंदिराबाहेर पडण्याचा निर्णयाप्रत आलो. मात्र वडिलांचा पाय काही निघवत नव्हता निघण्यापूर्वी एक दर्शन घेतो असे म्हणून ते पुन्हा एकदा दर्शन करण्यासाठी गेले. पोट भरले पण मन नाही भरले अशी काही अवस्था माझ्या वडिलांची झाली होती. थोड्या वेळात आम्ही सर्वजन मंदिराबाहेर पडलो. देवस्थान समितीची शिस्त, स्वच्छता, उत्तम व्यवस्थापन,सेवा देणारे सेवेकरी आणि अत्यंत नम्रपणे माऊली म्हणून प्रत्येक भक्तांना संबोधणारे संस्थान चे सेवेकरी व कर्मचारी वर्ग यासर्वांमुळे मी भारावून गेलो होतो. व्यवस्थापनाचे अत्यंत सुंदर उदाहरण म्हणून या संस्थानकडे पहावे लागेल. सकाळचे ११ वाजत आले होते. आम्ही पुन्हा आनंद विहार कडे जाणाऱ्या बस मध्ये बसलो आणि थोड्याच वेळात आनंद विहार मध्ये पोहचलो. रूम मध्ये जाऊन सामानाची बांधाबांध केली आणी पार्किंग मध्ये लावलेल्या गाडीकडे मोर्चा वळविला. शेगाव पासून लातूर चे अंतर जवळपास ४०० किमी, एकाच दिवसात एवढा प्रवास तेही दुपारचे १२ वाजत असताना करणे तितके व्यवहार्य वाटले नाही. त्यामुळे शेगाव पासून साधारण २०० किमी वरील माहूर येथे मुक्काम करून तेथून लातूर गाठणे मनाशी पक्के केले. शेगाव ते माहूर २००किमी आणि माहूर ते लातूर २५० किमी असे अंतर असल्यामुळे एकूण ४५० किमी मध्ये लातूर ला जाण्याचे नियोजन केले. मग काय सोबत चे समान गाडीत भरले आणी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत गाडीचा पहिला gear टाकला आणी माहूरच्या रस्त्याकडे प्रस्थान ठेवले.

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Feb 2020 - 8:19 pm | प्रचेतस

छान लिहिताय. वाचत आहे.
मध्यंतरी मेळघाटच्या जंगलात जाताना शेगावला गेलो होतो त्याची आठवण आली.

AKSHAY NAIK's picture

9 Feb 2020 - 8:29 pm | AKSHAY NAIK

खूप आभार !

श्वेता२४'s picture

9 Feb 2020 - 8:43 pm | श्वेता२४

पु. भा. प्र

AKSHAY NAIK's picture

11 Feb 2020 - 1:20 pm | AKSHAY NAIK

धन्यवाद !

कंजूस's picture

10 Feb 2020 - 5:04 am | कंजूस

छान.
फोटो?

खुप आभार सर, फोटो टाकण्याचा प्रयत्न केला होता पण तो कसा टाकावा हे काही अजून उमगले नाही. पुढील लेखात नक्की प्रयत्न करेन.

रीडर's picture

11 Feb 2020 - 1:25 am | रीडर

फोटो टाका

श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन जवळ येत आहेच... समयोचित लेख आवडलाच.
फोटो जमल्यास जरूर टाका.

प्रतिक्रिये बद्दल खूप आभार.

कंजूस's picture

11 Feb 2020 - 5:59 am | कंजूस

फोटो टाकणे सोपा मार्ग -
१) ब्लॉगवर फोटो टाकून प्रकाशित करा.
२) मग ब्लॉग उघडून एकेका फोटोला क्लिक करून अड्रेस बारमध्ये /प्रॉपर्टिजमधून लिंक कॉपी करा.
३)या टेम्प्लेटमध्ये लिंक टाकून ते पूर्ण कॉपी करून इथे पेस्ट करा.

फोटो १
मथळा
<img src="लिंक" width ="80%" /><br /><br />
फोटो २
मथळा
<img src="लिंक" width ="80%" /><br /><br />
....
....

४)वरती डोळ्याच्या चित्रावर क्लिक करून फोटो दिसतोय ते तपासल्यावर प्रकाशित करा.