"कहोना" व्हायरस चा प्रादुर्भाव - "कोण" संस्थेचा इशारा

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
1 Feb 2020 - 8:55 am
गाभा: 

"कोण" ह्या जागतिक आरोग्य संस्थेने जगभर "कहोना" ह्या व्हायरसचा प्रभाव वाढत आहे असा इशारा दिला आहे.
पुढील दोन आठवडे ह्या व्हायरसचा प्रभाव वाढत जाणार असून विशेषतः तरुण वर्गाला ह्या व्हायरसची लागण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ज्या कोणाला लागण होईल त्याला प्रेमज्वर येऊन तो दिवसागणिक वाढत जाईल आणि पुढील दोनेक आठवड्यात ज्वर उच्चतम पातळीला पोहोचेल. ह्या ज्वराचे मुख्य लक्षण म्हणजे प्रेम, मैत्री असे शब्द वारंवार बोलण्यात येतील आणि गिफ्ट्स, फुले (विशेषतः लाल गुलाब), पुष्पगुच्छ, ग्रीटिंग कार्ड्स, हॉटेल मधील खादाडी (म्हणजे मराठीत डिनर डेट ) ह्यांची ज्वरपीडित लोकांमध्ये देवाणघेवाण होऊन मोठी उलाढाल होईल त्यामुळे मार्केट मोगॅम्बो खुश होईल.

गावातल्या जत्रेतील हावशे, गवशे, नवशे यांच्या सारखे ह्या जागतिक, आधुनिक, व्हायरल जत्रेत देखील सालाबाद प्रमाणे सामील होणारे परंतु आत्तापर्यंत काहीच फलनिष्पत्ती न झालेले प्रयत्नवादी, आणखी एक नवी मासोळी गळाला लावायचा प्रयत्न करणारे गळेपडू आणि त्याबरोबरीने नवथर, नवशिके हौशे सामील होतील तर मासोळी ज्यांच्या गळाला अगोदरच लागून गवसलेली आहे असे गवशे आणखी पुढचा टप्पा हाती गवसतो का ह्याची चाचपणी घेतील. ह्या जत्रेतील जुने जाणते अनुभवी नवशे मंडळी आपापल्या प्रेमदेवतेवर प्रेमाचा वर्षाव करून नवसाची पूर्तता करतील. एकंदरीत हा "कहोना" व्हायरस पुढील दोन आठवडे समाजात मोठी उलाढाल घडवेल.

ह्या "कहोना" व्हायरस ला प्रतिबंध करण्यासाठी अँटी-व्हायरस संस्कृतीरक्षक ग्रुप्स सक्रिय होतील अशी अपेक्षा "कोण" संस्थेने व्यक्त केली आहे. परंतु व्हायरस चा प्रादुर्भाव असा आहे कि अँटी-व्हायरसने विरोध केला तरी पीडित लोकं लपून छपून का होईना "कहोना" ला बळी पडतील अशी आशंका देखील व्यक्त केली आहे. ज्या प्रमाणे काळ्या ढगाला चमकदार चंदेरी किनार असते किंवा रोग्यावर उपचार करता करता वैद्य मालदार होतो त्याप्रमाणे "कहोना" मुळे बाधित लोकांमधील पन्नास टक्के लोकांवर प्रेम भावनेसह भेटवस्तूंचा वर्षाव होऊन आनंदी आनंद होईल.

अशा रीतीने पुढील दोनेक आठवड्यात कहोना (प्यार है) ह्या व्हायरस मुळे मोठी धमाल उडेल.

- इति बाबा व्हेलान्टीनंद

प्रतिक्रिया

सर्वात गंभीर बाब अशी समोर आली आहे की कहोना या व्हायरसचे अनेक वर्जन्स आहेत. कहो, क्या कहू, कुछ भी कहो, करो, करलो, ले लो बाबा, इतना मत करो, बस करो, बसभी करो, करो ना, ना करो ना, ना करो, करो आदी व्हर्जन्स मुळे आपल्याला नक्की कोणता आजार झाला आहे हेच रोग्याला समजत नाही.

गामा पैलवान's picture

5 Feb 2020 - 1:43 am | गामा पैलवान

अरे, हा कुठला व्हायरस बियरस नाही, तर प्रेमपोळा नावाचा सण आहे. बैलपोळा असतो तसाच हा प्रेमपोळा. बैलपोळ्यास बैलाला सजवतात, गोडधोड खाऊ घालतात, तसंच प्रेमपोळ्याच्या दिवशी प्रेमबैलास गोडगोड वचने दिली जातात. त्याबदल्यात त्याचा खिसा कापून घेतला जातो. बैल व प्रेमबैल दोघांनाही पुढे वर्षभर मरमर ओझं वाहायचं असतं. त्याबद्दल केलेले एकदिवशीय लाड म्हणजे हे पोळे आहेत.

-गा.पै.

आनन्दा's picture

5 Feb 2020 - 6:08 pm | आनन्दा

"कहो ना" पेक्षा "करो ना" जास्त रोमँटिक आहे..