उपोद् घात
मार्च मध्ये सहकुटुंब एकता मूर्ती (Statue of Unity) ला भेट दिली, तेव्हाच “सायकल वरून इथं यायला लै धमाल येईल” असं डोक्यात आलेलं. फक्त, तेव्हा फुफाटा असल्यानं हा प्लॅन हिवाळ्यात करायचा असं ठरवलेलं. बघता बघता उन्हाळा सरला. पावसाळा पण गेला. आणि हिवाळा येऊन ठेपला.
नेहमीप्रमाणे प्लॅन ठरवला तेव्हा खूप लोक इंट्रेस्टेड होते. सुट्ट्या बघून 25-29 डिसेम्बर अशा तारखा ठरल्या. सुरुवातीला मी, शिन्या (यांचे पती), मोदक, निनाद आणि जोजो असे सगळे इच्छुक होते. पण सगळ्या प्लॅन्स प्रमाणे गळती लागली. मोदक ला ट्रम्प तात्यांचं बोलावणं आलं. निनाद ला येड्डियुरप्पा ने बोलावलं. जोजो चं पण कॅन्सल झालं. मी आणि शिन्या असे दोघेच राहिलो. “आता काहीही झालं तरी आपण जायचंच तिच्यायला!” असं आम्ही दोघांनी पक्कं ठरवून टाकलं.
शिन्या त्याची सायकल कार मध्ये टाकून माझ्या घरी येणार, आणि आम्ही दोघे सायकल ने पुढं जायचं असा प्रायमरी प्लॅन ठरला. हातात केवळ 5 दिवस आणि वन-वे अंतर 400 किमी. त्यामुळे जाताना सायकल ने जायचं आणि येताना सायकली बस मध्ये टाकून बस ने यायचं; असं ठरलं. “बस मधून सायकली आरामात नेता येतात” असं वट्टात बऱ्याच लोकांनी सांगितलेलं. पण “तिथं पोचायला शनिवार होईल,आणि तुफान गर्दी मिळेल. त्यापेक्षा जाताना बस ने जाऊ, आणि येताना सायकली हाणू” असं शिन्याचं मत पडलं. आणि मला ते झक्कत ऐकावं लागलं!
“जातानाच्या बस चं बुकिंग मी बघतो, आणि रहायची सोय तू बघ” असं मी शिन्याला सांगून टाकलं. कारण बस बुकिंग एकदाच करायचं होतं. शिन्या काहीही खळखळ न करता त्याला तयार झाला, याचं मला सुखद आश्चर्य वाटलं. “२५ ला टेन्ट सिटी मध्ये बुकिंग करतो, त्यात SoU चं तिकीट पण समाविष्ट आहे” इति शिन्या. त्यामुळे तो ऑप्शन फायनल झाला. आणि २८ च्या रात्री निनाद ला फेअरवेल द्यायचं म्हणून २८ दुपारीच डहाणू हुन ट्रेन ने यायचं असं नक्की केलं. तोपर्यंत डिसेंबर ची १६ तारीख उजाडलेली.
दुसऱ्या दिवशी शिन्या चा फोन.
“बॅड न्यूज!” हा पण कॅन्सल होतो का काय?
“टेन्ट सिटी चं बुकिंग फुल आहे.” हां, ठीक आहे…
“दुसरीकडे राहू. मी एंट्री टिकिट्स बुक करतो” अस्मादिक.
“आणि बस बुकिंग विसरू नकोस.” शिन्या.
मी SoU चं तिकीट ऑनलाईन बुक केलं, २६ तारखेच्या सकाळचं… त्याच दिवशी संध्याकाळी बस चं तिकीट बुक करायला गेलो. “सायकल बस में नहीं जायेगा!” इति बुकिंग क्लार्क. कारकुंडा कुठला! दुसऱ्या बस कंपनीत गेलो, तर तिथेही तीच रड… बोंबला! आता काय?
शिन्याला फोन केला. चर्चेअंती, 24 च्या रात्री किंवा २५ पहाटे ट्रेन ने डहाणू ला जायचं, आणि २ दिवसात ३०० किमी सायकल हाणून SoU ला पोचायचं;आणि तसंच करून शनिवारी डहाणू हुन ट्रेन ने परतायचं असं ठरवलं. ऑनलाइन बुक केलेलं SoU चं तिकीट पण कॅन्सल केलं.
2 दिवसात 300 किमी (आणि हे दोनदा) या गोष्टीचं थोडं टेन्शन आलेलं… काय करावं याचा विचार करत होतो. 21 तारखेच्या प्रॅक्टिस राईड ला निनाद म्हणाला, "तुम्ही लोक मेमू ने का जात नाही?" हा ऑप्शन डोक्यातच आला नव्हता! मग मेमू ची माहिती काढायला सुरुवात केली. जाणं 4 दिवसांवर आलं तरी आमचा प्लॅन फायनल नाही!
विरार-भरुच मेमू पहाटे 4 ला सुटते, आणि ती दुपारी 11 ला भरुच ला पोचते ही महत्वाची माहिती मिळाली. मग त्याच ट्रेन ने जायचं ठरलं. 25 ला भरुच ते राजपिपला किंवा गरुडेश्वर असं 70-80किमी रायडिंग, आणि दुसऱ्या दिवशी एकता मूर्ती ला भेट. बस ने गेलो असतो, तरी साधारण हाच हिशोब झाला असता. उगाच तिकीट कॅन्सल केलं!
विरार ला पहाटे 4 च्या आधी पोचायचं तर आदल्या रात्रीच जावं लागणार होतं. कारण विरारला पहाटे पोचायला कुठलीही गाडी नव्हती. "रात्री जाऊन विरार स्टेशनलाच राहू" असं शिन्या म्हणाला. रात्रभर मच्छरांना रक्तदान करायच्या कल्पनेनंच माझ्या अंगावर काटा आला. पण शिन्याचा एक मित्र विरारला राहातो, त्याच्या घरी मुक्कामाची सोय होईल याची त्याने खात्री दिली.
शेवटी बोरिवलीहून सुटणारी दहा वाजता सुटणारी विरार ट्रेन पकडायची, शिन्याच्या मित्राकडे मुक्काम करायचा आणि पहाटे तीन वाजता त्याच्याकडून निघून विरार भरूच मेमू पकडायची असा प्लॅन फायनल झाला
दिवस 0
चोवीस तारखेला शिन्या चिपळूण हून माझ्या घरी यायला निघाला. वाटेतच त्यानं मला फोन करून बातमी दिली की त्याच्या सायकलचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानं त्याला त्याची सायकल पार्ल्याला दाखवायला न्यावी लागणार. इ बाईक चे चोचले! त्यानं त्याची कार ठाण्याला पार्क केली, आणि सायकलला रिक्षात टाकून पार्ल्याला घेऊन गेला. नेहमीप्रमाणे आमची थोडी खरेदी बाकी होतीच… सायकल ग्लव्ह्ज, ट्यूब्ज वगैरे गोष्टी विकत घेऊन मी ऑफिस मधून निघालो आणि घरी पोचून शिन्याची वाट बघत बसलो.
शिन्या आल्यावर एकदा सामानाची तपासणी केली. मी सर्पंचांची पु-क फेम सॅडल बॅग उसनी घेऊन त्यात सामान भरलेलं. शिन्यानं दोन स्लीपिंग बॅग्ज सोबत घेतलेल्या. "रहायचं बुकिंग कुठेच झालेलं नाहीये" हे शुभवर्तमान त्यानं दिलं. तरीच लेकाने आधी खळखळ केली नव्हती! आमचा प्लॅन डायनॅमिक असल्यानं ते ही योग्यच होतं म्हणायचं! एकदा पुन्हा, फायनल म्हणावी अशी, सगळी तपासणी केली; आणि 24 च्या रात्री आठ च्या सुमारास आम्ही निघालो.
घराजवळ एका उडप्याकडे दाल खिचडी खाताना लक्षात आलं की मी (बायकोनं दहा वेळा आठवण करून पण; किंवा त्यामुळेच) मी टूथब्रश विसरलेलो. मग एका दुकानात माझ्यासाठी टूथब्रश आणि शिन्यासाठी वस्तरा घेऊन बोरिवली स्टेशन ला पोचलो.
माझे काही मित्र मागे डहाणू हुन सायकली ट्रेन मध्ये टाकून घेऊन आलेले, त्यांनी सांगितलेलं की चेकर ने पकडलं तर 250 रुपड्या दंड भरायचा. नाहीतर अशाच न्यायच्या सायकली. म्हणून आम्ही गपचूप आमची तिकिटं काढून पुलावर आमच्या ट्रेन ची वाट बघत उभे होतो. तेव्हा एका रेल्वे हमालानं आम्हाला हेरलं, आणि वट्टात प्रत्येकी 190 रुपये सायकलीच्या भाड्याची पावती बनवली.
एकदाची 10 वाजताची बोरिवली-विरार लोकल लागली. आम्ही सायकली उतरवून प्लॅटफॉर्म ला पोचलो. तिथं झुंबड उडालेली! ट्रेन आली तेव्हा लगेज डब्यासमोर उभं असून सुद्धा आम्हाला काही चढायला मिळालं नाही. सगळे भाडखाऊ पॅसेंजर्स गर्दी करून लगेज मध्ये घुसले, आणि आम्ही हताशपणे गच्च भरलेल्या डब्याकडे बघत उभे!
11:15 ची पुढची बोरिवली विरार होती, तिची वाट बघत निमूट प्लॅटफॉर्म वर बसून राहिलो. मध्येच, समोरून जाणाऱ्या गाडीचा लगेज डबा थोडासा रिकामा दिसला, की "पुढची ट्रेन पकडूया" अशी भुणभुण शिन्या करायचा. त्याला शांत करत सव्वा अकराच्या ट्रेन ची वाट बघत बसलो.
शेवटी एकदाची ती ट्रेन आली. सुदैवाने गर्दी बरीच कमी झालेली. त्यामुळे आम्ही आरामात सायकली चढवल्या. आमच्या मागोमाग चढणाऱ्या एका प्याशींजर ला "बाजूके डिब्बे में जाव ना… वो खालीच हय" असं शिन्या ने सुचवल्यावर तो आमच्याकडे बघून फक्त हसला, आणि त्यानं फुटबोर्डावर कोंडाळं करून बसलेल्यांमध्ये शिरकाव करून घेतला.
गाडी सुटली, रुमाल हलले; आणि कोंडाळंकरांनी चपट्या काढल्या. पाण्याच्या बाटल्यांमध्ये दारवा मिक्स करून त्यांचा कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे दोघांची बाचाबाची झाली. तिकडं दुर्लक्ष करत आणि सायकलींची काळजी घेत आणि करत आम्ही एकदाचे बारा वाजता विरार ला पोचलो.
विरार स्टेशन ला शिन्या चा मित्र बाईक वर आम्हाला घ्यायला आलेला. त्याच्या मागोमाग सायकल चालवत त्याच्या बिल्डिंग पाशी पोचलो. "सायकली लावा पार्किंग मध्ये" तो म्हणाला. मी चमकून शिन्या कडे बघितलं फक्त. "सायकली घरात ठेवणार!" शिन्या ने डिक्लेअर करून टाकलं! "अरे पण…" ते मित्रबुवा काही बोलेपर्यंत मी सायकल लिफ्ट मध्ये टाकून चौथ्या मजल्यावर पोचलो सुद्धा. तो पण मागोमाग आला. "सायकली घरात कशाला? माझं स्वतः चं पार्किंग आहे… लोक 15 लाखांच्या गाड्या लावतात तिथं!" अशी त्याची कटकट सुरू होती. मी तिथं दुर्लक्ष केलं. शिन्या नं त्याच्याशी माझी ओळख पण करून दिली न्हवती!
मग शिन्या वर आला. आमची ओळख वगैरे करून दिली. साडे बारा वाजून गेलेले. त्यामुळे मी शिन्या आणि त्याच्या मित्राला गप्पा मारत ठेऊन निजलो.
दिवस १
जेमतेम 2 तास झोपलो असेन, तर गजर झाला. पटापट आवरून आम्ही दोघे निघालो. "काल आलेलो त्याच रस्त्यानं जा" ही सूचना कुठल्यातरी वळणावर चुकली आणि एक भलताच रस्ता समोर आला. आमच्या सुदैवानं तिथं एक बाईकस्वार उभा होता. त्यानं स्टेशन चा रस्ता सांगितला, आणि आम्ही साडे तीन ला स्टेशन वर पोचलो.
तिकिटं काढली. गाडी ला अवकाश होता. मी शिन्या ला सायकलीं सोबत उभं करून लगेज ची चौकशी करायला गेलो. दोन महत्वाच्या बाबी कळल्या: मेमु ला सामान डबा नसतो, आणि एवढ्या सकाळी लगेज तिकीट मिळणार नाही. नंतर जर चेकर ने अडवलं तर त्याला सांगून चार्ज भरायचा.
यथावकाश ट्रेन आली. एका कोपऱ्यात सायकली उभ्या करून आम्ही पण जरा स्थिर स्थावर झालो. गर्दी नव्हती (चक्क). त्यामुळे शिन्या सायकली राखत असताना मी तासभर झोप काढली.
मग मी शिन्या ला रिलिव्ह केलं आणि राखणीला उभा राहिलो. अचानक ट्रेन ला गर्दी झाली. अगदी मुंबईच्या लोकल ट्रेन सारखी. त्या गर्दीपासून सायकलींचं रक्षण आणि आणि गर्दीचं शंका निरसन असं दुहेरी काम चालू होतं. "किधरसे आये?" "किधर जायेंगे?" "सायकल कितने की है?" असे प्रश्न मी तटवत होतो. गर्दी काही कमी होत नव्हती. "सचिन आयेगा तो ट्रेन खाली हो जायेगी" एकजण म्हणाला. कोण सचिन? तो कुठं, कधी आणि का येणार? काही कळेना. शेवटी, सचिन हे एक स्टेशन आहे ही अमूल्य माहिती मिळाली, आणि माझा जीव भांड्यात पडला.
यथावकाश सचिन आणि सुरत गेलं. गर्दी ओसरली. मी पण शिन्या च्या शेजारी जाऊन बसलो. दुपारी कुठं जेवायचं, या गहन प्रश्नावर आमची चर्चा सुरू झाली.
अंकलेश्वर ओलांडलं आणि आम्ही ट्रेन मध्येच थोडं स्ट्रेचिंग केलं. भरुच ला उतरलो, आणि माझी सॅडल बॅग ताठ रहात नाहीये, टायर ला घासतेय असं लक्षात आलं. सुदैवानं शिन्या कडे एक एक्सट्रा बॅक पॅक होती. मग थोडं सामान तिच्यात भरून सायकली हाणायला लागलो.
जेमतेम 4 किमी झालेले, आणि समोर CCD बघून शिन्या ला भूक लागली. मग आम्ही भरपेट नाश्ता केला. "आता कुठंही थांबायचं नाही" असं एकमेकांना बजावून आम्ही पेडल मारायला सुरुवात केली.
वडोदरा-केवडिया (जिथं एकता मूर्ती आहे) रस्ता फारच चांगला होता. पण भरुच पासून रस्ता अगदी बेक्कार! तरीही ताडगोळे खात आणि उसाचा रस पीत आम्ही आगेकूच करत राहिलो.
रस पिता पिता दुसऱ्या दिवशीची तिकिटं बुक केली. रात्रीचा मुक्काम कुठं करायचा हा एक प्रश्न होता. "स्लीपिंग बॅग्ज आहेत. गरुडेश्वर मंदिरात झोपू. नर्मदेच्या पाण्यात डुंबत आंघोळ करू" असा शिन्या चा प्लॅन. "दिवसभर सायकल चालवल्या नंतर मला व्यवस्थित शॉवर हवा. आणि झोपायला चांगला पलंग सुद्धा." असं म्हणून मी त्याचा बेत हाणून पाडला.
वाटेत शिन्या ने त्याच्या व्लॉग साठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो करता करता आम्ही राजपिपला ला पोचलो. एक बरं हॉटेल दिसलं. पण तिथं खोली मिळाली नाही. थोडं पुढे आणखी एक हॉटेल दिसलं. तिथं खोली होती पण तो सायकली खोलीत ठेऊ द्यायला तयार नव्हता. शिन्या नं त्याची निगोसीएशन स्किल्स वापरून हॉटेल वाल्याला पटवलं, आणि आम्ही सायकली खोलीत नेऊन तिथं मुक्काम केला.
दिवस 1: 72 किमी
दोघांच्याही आंघोळी आटपे पर्यंत 7 वाजलेले. दुसऱ्या दिवशी लौकर (लवकर) उठायचं, 7 ला निघायचं, 8 पर्यंत एकता मूर्ती ला पोचायचं, 9 ला तिथून निघायचं, गरुडेश्वर ला दत्त मंदिरात जायचं, 11 पर्यंत हॉटेल ला परत यायचं आणि नाश्ता करून अंकलेश्वर साठी प्रस्थान ठेवायचं असा प्लॅन ठरला. लौकर उठायचं असेल तर लौकर झोपलं पाहिजे; असं म्हणून आम्ही लगेच जेवायला गेलो. जेवणा नंतर पान जमवून 9 ला आडवे झालो. आदल्या रात्रीची अपुरी झोप, आणि दिवसभराचं सायकलिंग; यामुळे पडल्या पडल्या डाराडूर!
दिवस 2
ठरल्या प्रमाणे लौकर उठून तयार झालो. मस्त धुकं पडलेलं… छान गार हवा. त्यामुळे सायकलिंग ला धम्माल! अप्रतिम सुंदर रस्ते, आणि सगळीकडे व्यवस्थित साईनबोर्डस. त्यामुळे कुणालाही विचारायची गरज न पडता आम्ही तासाभरात एकता मूर्ती ला पोचलो सुद्धा!
सायकली पार्क कुठं करायच्या हा एक प्रश्नच होता. त्यातून, एकता मूर्ती च्या फाटकाजवळ असलेल्या सुरक्षा रक्षकांनी "इथं सायकली लावायच्या नाहीत" असं दरडावून सांगितलं. तेवढ्यात आम्हाला एकता मूर्ती चं प्रशासकीय कार्यालय दिसलं. गम्मत म्हणजे, ते मुख्य कॅम्पस च्या बाहेर आहे! शिन्या ने तिकडच्या सुरक्षा रक्षकला मस्का मारून सायकली तिथं पार्क करायची अनुमती मिळवली. त्यांच्या सोबत एक सेल्फी काढून आम्ही सरदार पटेलांना अभिवादन करायला सटकलो.
ती मूर्ती आणि तिथल्या बाकीच्या सोयीसुविधा एकूणच जागतिक दर्जाच्या आहेत. खरोखर "लै भारी!" ते सगळं बघताना आणि फोटो काढताना "तासाभरात निघायचं" हा प्लॅन केव्हाच फ्लॉप झाला!
दीडेक तास तिथं घालवल्यावर भुकेची जाणीव झाली. तिथल्या फूड कोर्ट मध्ये विशेष ऑप्शन्स नाहीयेत. शेवटी सबवे मध्ये न्याहारी केली. तसंही शिन्या सारख्या खेडुताला सबवे वगैरे परत कधी मिळणार? तस्मात भरपेट न्याहारी करून, पुन्हा एकदा मूर्ती डोळ्यात भरून घेऊन आम्ही निघालो.
पुन्हा एकदा भरपूर फोटो काढले, विशेषतः मूर्ती च्या पार्श्वभूमीवर सायकलीसकट फोटो काढायचे, हे ठरवून ठेवलेलंच; तसे फोटो काढून घेतले.
ही ट्रिप करण्यासाठी आपल्या सायकल सायकल समूहाने सतत उक्ती आणि कृती ने भरपूर प्रेरणा दिलेली. त्यामुळे समूहासाठी एक व्हिडीओ संदेश रेकॉर्ड केला आणि आम्ही गरुडेश्वर कडे निघालो.
गरुडेश्वर च्या दत्त मंदिरात जायचं असं शिन्याच्या मनात होतं. त्यामुळं तिथं जाऊन दर्शन घेतलं. एव्हाना दुपारचे 12 वाजत आलेले. आणि आमचा प्लॅन संध्याकाळ पर्यंत अंकलेश्वर गाठायचा होता. त्यामुळं थोडी त्वरा केली. पटापट पेडल मारत एक च्या सुमारास हॉटेलात आलो. जेवायला बसलो.
जेवताना शिन्या च्या लक्षात आलं, की आम्ही ऐटीत जो व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड केलेला, त्यात आमचा आवाज रेकॉर्ड झालाच नव्हता! ओम फस्स! आता वाटेत अजून एक व्हिडीओ रेकॉर्ड करू असं ठरवलं. जेऊन आणि सामान घेऊन 2 च्या सुमारास अंकलेश्वर कडे कूच केलं.
आदल्या दिवशी आलो तोच रस्ता होता. चार तासात 72 किमी कापायचे होते. वेळ पुरेसा होता, फक्त रस्ता भिकार होता आणि हॉटेल शोधायचं मुख्य काम बाकी होतं. वाटेत एका ठिकाणी एक केळ्याचं शेत दिसलं. आनंदरावांसाठी त्याचा एक फोटो घेतला आणि रमतगमत राष्ट्रीय महामार्ग गाठला. मोकळा आणि सपाट रस्ता असल्यानं चलच्चित्र संदेश बनवून पाठवून दिला.
इथं हायवेला दर अर्ध्या किमी ला हॉटेलं असल्यानं मुक्कामाची काही अडचण येणार नाही असं वाटत होतं. पण खोलीत सायकली ठेऊ देणाऱ्या हॉटेलाचा शोध हा ईश्वराच्या शोधइतकाच अवघड ठरला! सगळीकडून नकार पदरात पडणाऱ्या जुन्या काळच्या वधुपित्यांप्रमाणे आम्ही दोघे हॉटेलं शोधून दमलो. "बहुतेक आज स्लीपिंग बॅग्ज मध्ये झोपावं लागेल" असं वाटत असतानाच एका स्थळाने होकार दिला! आम्ही सायकली खोलीत नेल्या आणि सुटकेचा निःश्वास टाकला!
दिवस 2: 120 किमी
आंघोळी उरकून फ्रेश झालो. दमायला झालेलं, तरी बऱ्यापैकी फ्रेश होतो. आणि डहाणू पर्यंत बऱ्यापैकी सपाट आणि चांगला रस्ता असल्यानं दोन दिवसात हलवा मारता येइल असा आत्मविश्वास आलेला. निनाद चं फेअरवेल पण कॅन्सल झालेलं… आणि मला हाव सुटली! "ऑल द वे मुंबई ला सायकल मारत जायचं का?" मी विचारलं. "आयाम गेम!" शिन्या म्हणाला. मग हा नवा प्लॅन नक्की करून टाकला.
जास्त अंतर जायचं असल्यानं आदल्या दिवसा प्रमाणेच लौकर जेवण आणि लौकर झोप असं ठरवून खायला बाहेर पडलो. जवळच एक चांगला पिझ्झेरिया मिळाला. मालकाशी गप्पा छाटत पिझ्झे आणि लसूण पाव उडवले. त्याच्याकडे ऑरेगानो चीजी डिप नावाचा एक अफलातून प्रकार खाल्ला आणि हॉटेल वर परतलो. तेवढ्यात सीए केडी चा फोन आला. तो काही कामा निमित्त अंकलेश्वर ला येत होता, दुसऱ्या दिवशी पहाटे पोचणार म्हणाला. मग त्याला भेटायचं ठरवलं आणि निजलो.
दिवस 3
लौकर उठून तयारी केली. पण बाहेर मिट्ट काळोख होता. त्यामुळे थोडा वेळ बघितली आणि शेवटी पावणे सात ला बाहेर पडलो. सीए च्या हॉटेल ला गेलो. तो बिचारा पहाटे पोचलेला; आणि त्याला दिवसभर ट्रेनिंग घ्यायचं होतं. तरी झोपमोड करून आम्हाला भेटायला तो खाली आला. नाक्यावर चहा घेतला, त्याच्या सोबत फोटो काढले; आणि साडे सात ला प्रस्थान ठेवलं!
आज सुमारे 160 किमी सायकल मारत वापी गाठायचं असं ठरवलेलं. त्यामुळे आम्ही सकाळी नेट लावून आणि कमीतकमी थांबे घेत निघालो. दहा च्या सुमारास नाश्त्याला थांबायचं असं ठरवलेलं. त्याप्रमाणे एक काठियावाडी हॉटेल बघून मी थांबलो; पण "इथं नको, पुढे २ किमी वर मॅकडोनाल्ड आहे" असं शिन्या म्हणल्यानं आम्ही पुढं निघालो; आणि रोनाल्डबाबाच्या उपाहारगृहात नाश्ता केला.
साडे बाराच्या सुमारास मला प्रचंड थकल्यासारखं झालेलं. ऊन पुष्कळ होतं. शिन्या प्रोत्साहन देत होता, पण मला पेडल मारणं अशक्य झालेलं. एव्हाना आमचे 80 किमी झालेले. म्हणजे निम्मं अंतर आम्ही कापलेलं. "एखाद्या झाडाच्या सावलीत थांबून आराम करू" असा विचार केला. पण रस्त्याला एकही झाड दिसेना. शेवटी एक हॉटेल दिसलं, तिथं जेवायला थांबलो.
"व्हिटॅमिन सी कमी पडतंय" इति डॉक्टर शिन्या. तरी आम्ही नियमितपणे इलेक्ट्रॉलाईट्स घेत होतो. मग जेवताना एक फँटा घेतलं. वाटेत लिंबू सरबत मिळालं तर घ्यायचं ठरवलं. विशेष भूक नसतानाही थोडं जेवलो आणि पुढं निघालो.
आता रस्त्याच्या कडेला अचानक शहाळी वाले दिसायला लागलेले. पण आम्ही नुकतंच जेवलो असल्यानं ते काही घेतलं नाही. थोड्या वेळानं घेऊ असं म्हणून पुढं निघालो. एक चांगला बस स्टॉप दिसला तिथं जरा सावलीत थांबलो, तर थकव्यानं मला डुलकी लागली.
शिन्या ने दहा मिनिटात मला जागं केलं.
"झोपू दे की लेका अर्धा तास!"
"नको. आपल्याला दिवसा उजेडी पोचायचं आहे."
त्याचं पण बरोबर होतं. त्यामुळे उठलो आणि निघालो. आता दोघांनाही ऊन आणि थकवा जाणवू लागलेला. त्यामुळे रस्त्यातले उड्डाणपूल टाळत, आम्ही त्यांच्या खालून जायला सुरुवात केली. ही स्ट्रॅटेजी लाभदायक ठरली. अशाच एका पुलाखालून जात असताना रस्ता संपला आणि नॅरो गेज चे रूळ लागले!
रूळ ओलांडायला जागा होती म्हणून बरं. अन्यथा फर्लांगभर मागे जावं लागलं असतं. रुळांवर फोटो काढून आम्ही पुढं निघालो.
आता ऊन उतरणीला लागलेलं. शहाळी वाले काही पुन्हा दिसले नाहीत. उसाचा रस मात्र मिळाला!
वापी तासभरावर राहिलेलं. त्यामुळे आम्ही नेट वरून एक बरं हॉटेल शोधलं आणि तिथं फोन केला. अहो आश्चर्यम! पहिल्या फटक्यातच तो सायकली खोलीत नेऊन जायला तयार झाला. मग आम्ही पण भरभर पेडल मारत मुक्कामी पोचलो!
दिवस 3: 158 किमी
खोलीत सायकली नेऊन जरा स्थिरस्थावर होतोय तेवढ्यात पुन्हा बेलबॉय आला.
“सर, कुछ चाहिये?”
“नहीं, कुछ नहीं.”
“बियर? व्हिस्की?”
तिच्यायला! मला काही नको होतं. शिन्या ला पण. त्यामुळे त्याचे आभार मानून त्याला घालवून दिलं.
रात्री जेवायला सिझलर्स मागवलेले. छान चव होती.आणि क्वांटिटी पण भरपूर. आम्ही दोघे काही ते संपवू शकलो नाही.
तीन दिवसांत आम्हाला नीरा मिळाली नव्हती. गुजरातेत मिळत नसावी बहुदा. “उद्या महाराष्ट्रात जागोजागी मिळेल… तासा तासाला ढोसू” असा विचार करून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.
दिवस 4
सकाळी लौकर उठलो. उजाडलेलं नव्हतंच. त्यामुळे थोड्या वेळानं निघायचं ठरवलं. आदल्या दिवसाच्या अनुभवा वरून ग्लुकोज-सी चं मिक्स्चर करून घेतलं. सात च्या सुमारास निघालो.
गुजरात-महाराष्ट्र सीमेवर “महाराष्ट्रात स्वागत आहे” असा फलक वगैरे असेल अशी माझी अपेक्षा होती. तिथं फोटो काढायचे असं ठरवलेलं. पण “अपेक्षा हे सर्व दुःखांचं मूळ आहे” याचा अनुभव घेतला आणि अपेक्षाभंगाचं दुःख पचवून पुढं निघालो.
सीमा ओलांडल्याबरोबर रस्त्यांमधला फरक नको तिथं जाणवायला लागला. आलिया भोगासी… असं म्हणत आम्ही चारोटी पर्यंत आलो. एका ठिकाणी नाश्ता केला. दरिद्री चव! कर्तव्यभावनेनं चार घास घशा खाली ढकलून पुढं निघालो.
आता सह्याद्रीची उंची जाणवायला लागलेली. छान तीव्र चढ होते. जोडीला ऊन. त्यामुळे थकवा जाणवत होता. आणि एकही नीरा वाला दिसत नव्हता! नीरा ची तहान ग्लुकोज-सी वर भागवत आम्ही पुढं निघालो. वाटेत एका ठिकाणी फूड मॉल दिसला. आणि त्यात मॅकडोनाल्ड! “इथे जेऊन घेऊ” असं शिन्या ने जाहीर केलं. बिचाऱ्याला त्याच्या खेडेगावात हे मिळत नाही!
पोटभरी करून पुढं निघालो. येताना विरार टोल नाक्यावर 2व्हीलर लेन नव्हती. तिथं अडकून बसलो. उन्हामुळे आधीच चिडचिड झालेली. “इथं 2व्हीलर लेन का नाही?” अशी ट्रॅफिक पोलीस कडे चौकशी केली असता "हा नॅशनल हायवे आहे आणि इथं बाईक/सायकल अलौड नाहीत" असं उत्तर मिळालं. "तुम्ही लोक सायकल वगैरे चालवता, आम्हाला कौतुक वाटतं म्हणून आम्ही अडवत नाही" हे आणखी!
आता घराची ओढ आणि सहल संपल्याची हुरहूर अशा विरोधी भावना जाणवत होत्या. त्या नादात भरभर पेडलिंग सुरु होतं. वाटेत एका ठिकाणी नीरा दिसली. नीरापान केलं. आणि किचाट ट्रॅफिक मधून काढत वर्सोव्याला फौंटन हॉटेल ला पोचलो. इथून हमारे रास्ते जुदा हो गये! शिन्या ठाण्याला आणि मी दहिसर ला निघालो. निघण्यापूर्वी प्रथेनुसार सेल्फी काढून घेतले.
शेवटचे 8 किमी संपूर्ण सहलीतले सर्वात जास्त कंटाळवाणे होते! एकतर एकट्यानं चालवायचं होतं; आणि त्यात बेशिस्त ट्रॅफिक! कसेबसे ते पूर्ण केले आणि सुखरूप घरी पोचलो!
घरी पोचल्याचं सुहृदांना कळवलं. थोड्याच वेळात शिन्या पोचल्याचं त्यानं कळवलं. आणि एका सुरेख सहलीची यशस्वी यशस्वी सांगता झाली!
उपसंहार
तिसर्या दिवशीचा एक किस्सा, शिन्या च्या शब्दातः
सुरत अजून 20-25 किमी असेल. मयुरेश एव्हाना पुढे गेला होता आणि मी त्याला गाठण्यासाठी मान खाली घालून 29-30 किमी च्या स्पीडने पेडलिंग करत होतो तेवढ्यात कुणाचा तरी जोरदार horn ऐकू आला.
मी सायकल बाजूला घेतली पण पण स्पीड काही कमी केला नाही.
पुन्हा एकदा हॉर्न ऐकायला आला आणि पाठून येणारी गाडी बहुदा मारुती डिझायर होती. त्या गाडीमध्ये चार माणसं... पुढे दोन पुरूष आणि पाठीमागे दोन स्त्रिया आणि मला "थांबा! थांबा!" असं म्हणाले.
आता रस्त्यावर सायकल चालवणारा माणूस बघून काही लोक उत्सुकतेने विचारतात हा अनुभव गाठीशी असल्यामुळे मी आपला स्पीड कमी केला तरीही तो माणूस "थांबा! थांबा!" असंच म्हणत होता. शेवटी झक मारत थांबलो. थांबल्यावर त्या माणसाने मला विचारलं,
"सूरत यहा से कितनी दूर है और रास्ता नहीं है ना?"
खरं सांगायचं तर रस्त्याच्या बाजूचे पडलेले दगड उचलून त्याच्या गाडीवर आणि त्याच्या डोक्यात मारावे की काय असा विचार आला होता पण तैलबुद्धी जागृत झाली....
मी लगेच उत्तर दिलं,
" सुरत तो पिछे रह गया.... अब आप सीधे जाकर right side से exit से U टर्न लेना और 10 किमी जाके पहला left लिजिये 5 किमी के बाद आप सुरत मे पहुँच जायेंगेl"
आता तो माणूस खरंच गेला असेल की नाही माहिती नाही पण मला लोकांची गंमत वाटते हातात स्मार्टफोन असूनही,
अक्षर ओळखता येत असूनही, रस्त्यात बाकीची ही माणसं, दुकानं असूनही एका सायकलवाल्याची मोशन कट करून त्याला हे असले प्रश्न विचारणं म्हणजे जबरदस्तच... आणि कहर म्हणजे गाडी MH passing ची होती....
या सहलीचा शिन्या ने बनवलेला व्हिडिओ:
प्रतिक्रिया
28 Jan 2020 - 3:17 pm | प्रशांत
फोटो आणि वर्णन मस्तच..
भन्नाट .. सायकल दौरा.
मोठ्या सायकल दौर्यासाठी शुभेच्छा..!
28 Jan 2020 - 3:27 pm | मार्गी
तु फा न!!! आणि जबरदस्त!!!!! कडक!
28 Jan 2020 - 7:09 pm | सुधीर कांदळकर
सफर भन्नाटच. शब्दांकन पण छान जमले आहे. अतिसंथ जालसेवेमुळे व्हीडीओ सोडा, चित्रेही दिसत नाहीत. पण लेख छानच जमला. आवडला. धन्यवाद.
28 Jan 2020 - 7:50 pm | कंजूस
मला बरेच प्रश्न पडलेत त्यातला एक - हॉटेल रुममध्ये सायकल ठेवू न देण्याचं कारण काय असेल? दोन- हे भन्नाट दौरे ठरवतो कोण? कुणी सायकलवाला नक्कीच नसेल.
------
काय धाडसी दौरा केलाय! असे शब्दांकन अजूनपर्यंत मिपावर केलं नाही कुणी.
2 Feb 2020 - 11:45 am | mayu4u
सायकल चे टायर किंवा हँडल लागून रुम ला नुकसान होईल ही भीती असावी.
आमच्या सारखे वेडे लोक्स!
3 Feb 2020 - 7:15 am | कंजूस
हँडल , पायडल फोल्ड करता आलं असतं तर वरून एक पिशवी शिवता येईल.
3 Feb 2020 - 11:45 am | mayu4u
सायकल कॅरी करायच्या बॅग्ज मिळतात... चाकं काढून आणि हँडल सरळ करुन सायकल त्यात भरता येते. पण केवळ रात्रीच्या मुक्कामा साठी एवढे कुटाणे कशाला करावे?
28 Jan 2020 - 8:28 pm | मुक्त विहारि
आवडलं.
भारतात सायकल चालवणे, हे खूपच धाडसी काम आहे.
29 Jan 2020 - 7:11 am | Nitin Palkar
सुंदर वर्णन! व्हिडीओज दिसतायत, स्थिर चित्रे दिसत नाहीत, कदाचित भ्रमणध्वनी/आंतरजालाचा काही इशू असेल. संगणकावर बघेन. रोज कापलेले अंतर दिले आहे तिथे 'आज पूर्ण केलेले अंतर असे नमूद करावयास हवे होते.... असो.
एकंदरीत लेख तुमच्या सायकलस्वारीप्रमाणेच धमाल जमलेला आहे. पुढील सायकल स्वारीस आणि लेखनास शुभेच्छा.
29 Jan 2020 - 7:46 am | चामुंडराय
भारी !!
मस्त सायकल सहल. आणि तुम्ही केव्हढाले अंतर कापले.
मी तासभर पॅडल मारले तरी सायकल अर्धा इंच देखील हलत नाही :)
29 Jan 2020 - 10:12 am | डॉ श्रीहास
तुम्ही दोघही ठार वेडे आहात.... असं काहीसं करायला वेडच असावं लागतं...आता लवरकच नवं काहीतरी करा आणि हो वेडेपणा जपून ठेवा
- कधीकाळचा वेडा श्री
2 Feb 2020 - 8:36 pm | Nitin Palkar
डॉक,
तुमचा प्रतिसाद आवडला...
29 Jan 2020 - 11:24 am | king_of_net
झकास!!
1 Feb 2020 - 11:59 pm | मित्रहो
एकदम भन्नाट सहल. विचार सुद्धा करु शकत नाही
2 Feb 2020 - 11:46 am | mayu4u
_/\_
3 Feb 2020 - 1:32 pm | अजय खोडके
फारच सुन्दर ! पुढील सायकल स्वारीस आणि लेखनास शुभेच्छा! धन्यवाद.
3 Feb 2020 - 5:28 pm | देशपांडेमामा
जबर्या झाली ट्रिप आणि दोन धिंगाणा लोकं एकत्र म्हणजे धमाल येणारच ! लिव्हलंय पण मस्त !
श्रीगो ला काढलेले चिमटे सव्याज परत मिळणार हे नक्की ;-)
देश
8 Feb 2020 - 2:48 pm | भीडस्त
एकच नंबर ट्रिप आणि वृत्तांत...
सायकल ट्रेन मध्ये काय हॉटेलच्या रूममध्ये काय.. काबिल - ए तारीफ passion...
एवढं झाडाचं हाल - वंदन आहे तुम्हाला. पारलौकिक आहात झालं
9 Feb 2020 - 12:10 am | भीडस्त
एकच नंबर ट्रिप आणि वृत्तांत...
सायकल ट्रेन मध्ये काय हॉटेलच्या रूममध्ये काय.. काबिल - ए तारीफ passion...
एवढं झाडाचं हाल - वंदन आहे तुम्हाला. पारलौकिक आहात झालं
12 Feb 2020 - 1:52 pm | श्वेता२४
हे असं काही करायचं म्हणजे........ खरंच वेड आहे हे. अत्यंत ओघवतं वर्णन असल्यामुळे कधी शेवटाला आले ते कळलं नाही. मस्तच
13 Feb 2020 - 8:03 am | जेम्स वांड
एकात्मता शिल्प जबरी आहे, खूप आवडले, सायकलिंग किंवा व्यायाम प्रकारावर बोलायची औकात नाही आमची (आमच्या व्यायाम बियर ग्लास टेबलावरून उचलत तोंडाला लावण्यात संपतो हे हे हे हॅ हॅ हॅ हॅ हॅ)
एकात्मता शिल्पाबद्दल अजून थोडे लिहिले असते तर अजून मजा आली असती, हा उगाच आमचा एक आगाऊ सल्ला हो.
17 Feb 2020 - 2:24 pm | माझीही शॅम्पेन
लेख आणि सायकल जोडी भयंकर आवडली आहे , अरे सरदार सरोवर धरण , एक राजवाडा , कुठलस भारी मंदिर आहे ते पाहिलास कि नाही
पुढील प्रवाश्यांना माहिती होईल म्हणून थोडी जाहिरात करून घेतो
https://www.misalpav.com/node/43851
18 Feb 2020 - 5:59 pm | चौथा कोनाडा
हेच का ते मंदिर ?
https://www.misalpav.com/comment/1027989#comment-1027989
माझीही शॅम्पेन, तुमचा हा धागा भारी आहे, मी खुप मित्रांना फॉरवर्ड केलाय !
21 Mar 2020 - 2:50 pm | मोदक
जर्शी मस्तए बे... कुठून केलीस..?
:D
25 Mar 2020 - 10:47 am | mayu4u
एका लोकल कारागिरा कडून बनवून घेतली.
प्रतिसाद संपादित