चांगल्या झोपेसाठी वेटेड ब्लँकेट - उत्पादन समीक्षा (प्रॉडक्ट रिव्ह्यू )

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
25 Jan 2020 - 9:14 am
गाभा: 

आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी उत्पादने (प्रॉडक्टस्) वापरतो परंतु सगळी उत्पादने सगळेच वापरतात असे नाही म्हणजे जी उत्पादने तुम्ही सध्या वापरत नाही परंतु वापरायची इच्छा आहे अशा लोकांनां ती उत्पादने वापरणाऱ्या लोकांच्या अनुभवाचा फायदा व्हावा ह्या हेतूने ह्या धाग्याचे प्रयोजन. तुम्ही तुम्हाला हव्या त्या उत्पादनाबद्दल येथे लिहा किंवा त्या उत्पादनाची इतरांनी केलेली समीक्षा वाचा आणि तुमच्या शंकांचे समाधान करून, अधिक माहिती मिळवून ठरवा ते उत्पादन विकत घ्याचे कि नाही ते.

सध्याच्या आधुनिक जगात समाजातील मोठ्या वर्गाला झोपे संबंधीच्या समस्येने, निद्रानाशाच्या तक्रारीने ग्रासले आहे. त्याची कारणे विविध आहेत आणि बहुधा ह्या तक्रारींचे मूळ आधुनिक जीवनशैली मध्ये आहे. परंतु आजच्या धाग्याचा विषय तो नाही. निद्रानाशावर उपाय शोधण्या साठी अंजात्खनन करताना वेटेड ब्लँकेट नावाच्या प्रॉडक्टची ओळख झाली. काय आहे हे वेटेड म्हणजेच वजनदार ब्लँकेट? ते आधी बघूया.

ब्लँकेट मध्ये आकाराने छोट्या गोळ्या, चकत्या (डिस्क्स) किंवा मण्यांसदृश वजनदार वस्तू (ऑब्जेक्टस) भरतात. ह्या वस्तू सहसा पॉलीप्रोपेलिन किंवा काचेच्या असतात आणि ब्लँकेट मध्ये सगळीकडे सारख्याप्रमाणात भरून शिवलेल्या असतात. त्यामुळे ह्या वस्तू ब्लँकेट मध्ये एकाच ठिकाणी गोळा होत नाहीत आणि ब्लँकेटचे वजन सर्वत्र सारख्या प्रमाणात विभागले जाऊन झोपताना अंगावर घेतल्यावर सर्व अंगावर सगळीकडे सारखा परंतु हळुवार दाब पडतो. ह्या ब्लँकेटचे बाह्यावरण हे खादीचे व तलम कापडाचे असते जेणेकरून त्याचा स्पर्श सुखद होईल. ब्लँकेटचे वजन ५ ते १५ किलो असते. तुम्ही तुमच्या वजनाच्या साधारणतः १०% वजनाचे ब्लँकेट घ्यायचे असते. आणि त्याच बरोबर प्रत्येकासाठी वेगवेगळे घ्यावे म्हणजे ते झोपलेल्याच्या सर्वांगाला स्पर्श करून सगळीकडे समान आणि सुखद दाब देऊन जास्त परिणामकारक ठरते.

ज्या लोकांची झोप खूपच सावध असते व त्यामुळे ज्यांना रात्री वारंवार जाग येते त्यांना ह्या वजनदार ब्लँकेटचा खूप फायदा होतो. सर्वांगावरील हळुवार व सुखद दाबाने cortisol हे तणाव निर्माण करणारे मुख्य संप्रेरक कमी होऊन serotonin हे आनंद आणि स्वास्थ्यपूर्ण अनुभूती देणारे संप्रेरक तयार होते त्यामुळे सुरक्षतेची भावना निर्माण होऊन शांत आणि आरामदायी झोप येते व सकाळी झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटते.

निद्रानाश, लवकर झोप न येणे, अपुरी झोप येणे, मधेच जाग येऊन परत झोप न येणे, चिंता, अनावश्यक काळजी, नैराश्य इत्यादी विकारांवर वजनदार ब्लँकेट मुळे मात करता येते आणि सर्वसाधारणपणे चांगला फायदा होतो.

हे वजनदार ब्लँकेट कोणी वापरले आहे का? याचा खरंच फायदा होतो का? भारतासारख्या उष्ण देशात ह्या ब्लँकेट मुळे जास्तच गरम होईल का? ब्लँकेटची किंमत बरीच जास्त असल्याने विकत घ्यायच्या आधी हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

कृपया ह्या ब्लँकेटचा रिव्ह्यू लिहावा जेणे करून सर्वांनां फायदा होईल.

प्रतिक्रिया

जाम महाग आहे हो.. ३०००-४०००? ते ब्लँकेट घेतले तर त्या पैश्याच्या काळजीनेच बायकोला झोप लागणार नाही. म्हणजे मग परत पैसे फुकट गेले म्हणून बोंब मारायला मोकळी!
पुर्वी आमच्या घरी गोधड्या असत एकावर एक साड्या लावुन शिवलेल्या. काय झोप लागायचि म्हणुन सांगू..
ते पण वेटेड ब्लँकेटच होते एक प्रकारचे.

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2020 - 8:58 pm | चौथा कोनाडा

आम्ही जन्मापासून सोलापुरी चादर वापरतो. थंडीत पातळ किंवा माध्यम ब्लॅंकेट वापरतो, इतर वेळी सोलापुरीत मोगॅम्बो खुश !

.. आणि त्याच बरोबर प्रत्येकासाठी वेगवेगळे घ्यावे म्हणजे ते झोपलेल्याच्या सर्वांगाला स्पर्श करून सगळीकडे समान आणि सुखद दाब देऊन जास्त परिणामकारक ठरते.
बाबो, आम्हीतर कुणाचंही वापरतो. नो प्रॉब्लेम ! झोप ?... नो ईश्श्यू.

सर्वांगावरील हळुवार व सुखद दाबाने cortisol हे तणाव निर्माण करणारे मुख्य संप्रेरक कमी होऊन serotonin हे आनंद आणि स्वास्थ्यपूर्ण अनुभूती देणारे संप्रेरक तयार होते त्यामुळे सुरक्षतेची भावना निर्माण होऊन शांत आणि आरामदायी झोप येते व सकाळी झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटते.

वाह, क्या बात हैं !

निद्रानाश, लवकर झोप न येणे, अपुरी झोप येणे, मधेच जाग येऊन परत झोप न येणे, चिंता, अनावश्यक काळजी, नैराश्य इत्यादी विकारांवर वजनदार ब्लँकेट मुळे मात करता येते आणि सर्वसाधारणपणे चांगला फायदा होतो.
एक नंबर !

( जपानी गादीचे दिवस आठवले .... जपानी गादी गळ्यात मारणार्‍या सख्ख्या मित्राला कायमचे हाकलून लावले ते ही आठवले)

जपानी गादी सारखी वजनदार ब्लॅन्केटची पॉन्झी स्कीम काढता येईल.
INR ५०,००० ला एक वजनदार ब्लॅंकेट त्याच्या खोळीसकट वर एक उशी आणि तिचा अभ्रा मोफत देता येईल.
काय बोलता?

अशाने धंदा बुडेल प्रथम विक्रीनंतर. मग कसं व्हायचं?

म्हणून कापराप्रमाणे किंवा डांबरगोळीप्रमाणे हवेत हळूहळू उडून जाणाऱ्या मटेरियलच्या गोळ्या भरता आल्यास उत्तम. दर एका वर्षाने गाडीची निघून गेलेली "हीलींग पॉवर" किंवा "डीटॉक्स स्ट्रेंग्थ" पुन्हा भरून देत राहता येईल. नाममात्र शुल्क रु १०००० प्रति रिचार्ज. (अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाद्वारे)

कसें?

चौथा कोनाडा's picture

28 Jan 2020 - 5:52 pm | चौथा कोनाडा

भारी आयडिया, गवि !
आपली कन्झ्यूमेबलची गिरणी सुरु राहिल !

दिवस असे येणार आहेत की प्रॉडक्ट्स स्वस्त स्वस्त होत नगण्य किंमतीत बनतील आणि कन्झ्युमेबल्स हाच व्यवसायाचा श्वास बनेल.

म्हणजे इलेक्ट्रिक कार फुकट देतो, पण चार्जिंग आमच्याच वीजपुरवठ्याद्वारे करणे बंधनकारक. त्याकरिता विजेसोबत एक एनक्रिप्ट केलेला सिग्नल ऍडिशनल वेव्हरुपात मिसळलेला असेल आणि तो असला तरच कार चार्ज होईल.

चामुंडराय's picture

29 Jan 2020 - 8:30 am | चामुंडराय

अगदी खरं आहे गगनविहारी सर...
प्रिंटर स्वस्त मिळाला म्हणून घेतला आणि इंक कार्ट्रिज स्म्प्ले म्हणून नवीन घ्यायला गेलो तेव्हा कळले त्याची किंमत प्रिंटर एव्हढीच आहे, म्हंजे इंक प्लॅटिनम पेक्षा महाग, आता बोला.
तसा मी हुशारच बरं का, विचार केला कार्ट्रिज घ्यायच्या ऐवजी नवीन प्रिंटरच घेतो तेव्हा दुकानदाराने सांगितले, साहेब ओरिजिनल प्रिंटर बरोबर येणारे कार्ट्रिजेस अर्धेच भरलेले असतात.
मग काय, अडला ग्राहक रिफील चे पाय धरी.

गवि's picture

29 Jan 2020 - 10:43 am | गवि

अगदी अगदी

पूर्वी प्रत्येक मोबाईल हँडसेट कंपनीने आपापलं चार्जिंग पोर्ट (कनेक्टर) पूर्ण वेगळ्या डिझाईनचं बनवण्यामागे ठराविक चार्जरच खरेदी करावा लागावा असा हेतू असणार. आता स्टँडर्ड शेप आला मात्र.

मोबाईलची बॅटरी पूर्वीप्रमाणे सहज झाकण उघडून वेगळी काढता न येणे यामागेही सुरक्षितता यापेक्षा असाच काही व्यावसायिक हेतू असावा का? (सर्व्हिस सेंटरला जाऊन मूळ कंपनीचीच बॅटरी घ्यावी लागणे, किंवा दोन बॅटरीज बाळगून सेपरेट रिचार्ज करून किंवा फक्त बॅटरी थेट अन्य कंपनीची खरेदी करून तोच हँडसेट लोक अनेक वर्षे वापरतील हे टाळण्यासाठी).

आणखी एक ऑब्झरवेशन. हँडसेट कोणताही असो. त्याची बॅटरी फार लवकर कामातून जाऊ लागली आहे सर्वत्र, आणि अशा वेळी बहुतांश लोक सरळ नवीन हँडसेटच घेतात. हँडसेट हा FMCG झाला आहे. आणि डेटा वगैरे कन्झ्युमेबल्स हा वेगळाच विषय.

सुहासवन's picture

27 Jan 2020 - 6:38 am | सुहासवन

जसे लहान बाळाला मालिश करून आंघोळ घालून बांधून ठेवून झोपवित असत अगदी त्याचाच हा नवा अवतार आहे....

रुपी's picture

27 Jan 2020 - 10:20 am | रुपी

ओळख आवडली.

याबद्दल ऐकून आहे. पण आत्ता पर्यंत तरी autism असलेल्यांंसाठी डॉक्टरांनी वापरायला सांगितले या संदर्भातच.

सौन्दर्य's picture

28 Jan 2020 - 11:49 pm | सौन्दर्य

रोज सकाळी उठल्या उठल्या हे १० किलोच्या पांघरुणाची घडी घालायची म्हणजे रोजच शिवधनुष्य उचलल्यासारखे भासेल. झोपेचे माहीत नाही स्नायू पिळदार नक्कीच होतील.

(हलकेच घ्यावे)

वापरून पाहायला हवे. धन्यवाद या माहितीबद्दल.

ट्रेन मधून रात्री प्रवास करताना मला शक्यतो झोप येत नाही. माझया मते झोप येण्यासाठी तुम्ही दिवस भर कार्यरत व झोपताना आनंदी असणे आवश्यक आहे . आली की घे शिंगावर असे झोपेच्य बाबतीत केले तर मस्त झोप लागते. मी पूर्वी अनुभवलेला एखादा सुखद प्रसंग पुन्हा आठवून पहातो अशावेळी तो प्रसंग पुरा व्हायच्या आत आपण आपसूक झोपेच्या अधीन होतो असा अनुभव आहे. सध्या रात्री तीन वेळा तरी उठावे लागते तरीही ही सुखद आठवणीची थेरपी मला पुन्हा मस्त झोप देत असते .

चौकस२१२'s picture

30 Jan 2020 - 6:57 am | चौकस२१२

मला भावलेले आणि "पैसे वसूल" असे उपकरण म्हणजे
१) भाताचा इलेक्ट्रिक कुकर आता यात अजून प्रकार आहेत ते म्हणजे स्लो कुकर ( सिरॅमिक चे आतील भांडे असेल तर उत्तम, यात मंद आचेवर पदार्थ शिजवता येतात ४ तास / ८ तास असे .. आधी परतून घेता येतात खास करून मांसाहारी लाल मास ) तसेस आता मल्टि कुकर पण मिळतात , पॅनासॉनिक , tefal ( फ्रेंच ) किंवा फिलिप्स चे उत्तम
२) भावतील पण अजून न वापरलेली / घेतलेली उपकरणे :
भारतीय चूल किंवा ग्रीक इटालियन पद्धतीचा गोलाकार मातीचा ओव्हन त्यात लाकडाचे सरपण ( गॅस वर चालणारे मिळतात पण त्यात ती मजा नाही
- घरी आईस क्रीम बवण्याचे ( इलेकट्रीक परंतु पूर्ण पणे शीतकपाटात मावणारे .. काही यंत्रे अशी मिळतात कि भांडे आधी २४ तास फ्रीझर मध्ये ठेवून मग बाहेर वापरायचे पण त्यात मजा नाही )
- कॉफी बियांपासून कॉफ बनवणारी यंत्रे घ्याल त्या प्रमाणे मिळतात परंतु साध्या तयार ( इंस्टंटन्ट ) कॉफी चे रूपांतर कॅफे पद्धतीच्या रवाळ कॉफी मध्ये करणारे यंत्र शोधत आहे कोणास माहिती असल्यास काल्ववे ( parkolatar नाही )
३) स्वतः बांधून वापरयाची उपकरणे:
तंदूर ,
४) वापरलेली परंतु पडून / फार उपयोग ना करता आलेली उपकरणे
- पॅनासॉनिक पाव बनवणारे यंत्र

चौकटराजा's picture

1 Feb 2020 - 7:23 pm | चौकटराजा

जवळ जवळ १८ वर्षे झाली माझ्याकडे एक १४ इंची रुंद व सहा इंची खोल ( त्यापैकी खाचे अडीच ईंच ग्रील साठी ) पण पॅन आहे !मी कुठेलेही युटेंसिल विकत घेण्यात चिकित्सा करतो . हे उपकरण माझया सारख्या शाकाहारी माणसाला अति उपयुक्त ठरले आहे .एकदाही दुरुस्ती नाही . कशमीर मध्ये साबुदाण्याची खिचडी नैनीताल मध्ये पुलाव , नग्गर मध्ये उपमा ,काही ठिकाणी बटाटा परोठा असले प्रकार तर केले आहेतच .पण दिल्ली हॉटेल मध्ये गरम पाणी उशीरा येणे असल्याने सर्व आंघोळी या पॅन मध्ये पाणी तापवून झाल्या आहेत .याचा सर्वात मस्त उपयोग आमच्या घरात आहे. यात पाणी घालायचे गरम करायाचे त्यात एक स्टेनलेस ष्टीलची चाळनी उपडी टाकायची,दर तीन सेकंदाला एक गरम अशी तांदळाची पापडी विनासायास ! याचा उपयोग्य कढई स्वरूपात पुर्या तळण्यासाठी ,थालीपीठ लावण्यासाठी ही होतो ! याला वरून कठीण काचेचे झाकण आहे !

उगा काहितरीच's picture

1 Feb 2020 - 10:47 pm | उगा काहितरीच

फोटो / लिंक मिळू शकेल का ?

अजय खोडके's picture

31 Jan 2020 - 3:04 pm | अजय खोडके

चागली माहीती