कूर्ग डायरीज ३

अभिरुप's picture
अभिरुप in भटकंती
8 Jan 2020 - 8:12 pm

कूर्ग डायरीज ३

प्रस्थान

आम्ही ज्या मोसमात फिरायला जात होतो हा मोसम खूप गर्दीचा असणार होता कारण नवीन वर्ष येऊ घातले होते. या गर्दीचा वैचार करून आमची सहल आम्हाला पार पाडायची होती. त्यामुळे निश्चितच एक प्रकारचं दडपण मनावर होतं . पण मुलींच्या आणि आमच्या सुट्ट्या याच काळात असल्याने परिस्थितीचा स्वीकार करणे क्रमप्राप्त होते.

बेंगळुरू ते मदीक्केरी हे अंतर सुमारे २७५ ते ३०० किमी आहे. त्यामुळे प्रवासाचे ६ तास लागणार हे नक्की होते. आमचे मुंबईहून फ्लाईट २७ डिसेम्बर ला सकाळी ७ चे होते आणि बेंगळुरूहुन आमचे फ्लाईट ३१ डिसेम्बर ला संध्याकाळी सव्वासहाचे होते त्यामुळे ३१तारखेला आम्हाला मदीक्केरीहून लवकर निघणे गरजेचे होते. आणि ते खूप थकवणारे झाले असते म्हणून आम्ही प्लॅन मध्ये थोडा बदल केला. ३१ तारखेला मदिक्केरीहून निघण्याऐवजी ३० तारखेला निघण्याचे ठरले पण बेंगळुरूला न जात मदीक्केरीहून फक्त पावणे तीन ते तीन तासांवर असलेल्या श्रीरंगपट्टणाला जायचे ठरले.

आमचा मदिक्केरी मधील मुक्काम जिथे होता त्या प्रशांती रेसॉर्टचाच एक भाग असलेल्या श्रीरंगपट्टण येथील "योग धामा रिट्रीट " या ठिकाणास ३० तारखेच्या रात्री मुक्काम करण्याचे आम्ही ठरवले जेणेकरून आमचा वेळही वाचेल आणि दगदगही होणार नाही. हि सोय करून दिल्याबद्दल आम्ही प्रशांतीच्या हरीशजींचे आभार मानले.

हि माझी व्यक्तिशः कर्नाटकची दुसरी खेप. जवळपास १७ वर्षांपूर्वी कर्नाटकला जाणे झाले होते. त्यानंतर कर्नाटकचा कधी संबंध आला नाही. त्यामुळे मीही थोडा साशंकच होतो. बाकी माझे कुटुंब मात्र खुशीत गाजरं खात होते. मुलींचा आनंद तर काय वर्णनावा ! त्या भलत्याच खुष होत्या. त्यांचा हा पहिला विमान प्रवास असणार होता. त्यामुळे त्यांची खरेदीही जोरदार केली गेली होती.

मला मात्र आनंद या गोष्टीचा होता की माझी आई तिचा पहिलावहिला विमान प्रवास करणार होती. अर्थात हि गोष्ट जमवून आणण्याचे श्रेय माझ्या अर्धांगिनीलाच जाते. कारण ती नसती तर आम्ही ही सहल कदाचित प्लॅन नसती केली.

आमची फ्लाईट सकाळी ७ वाजता होती. घरातून सकाळी ५ वाजताच निघालो. वेळेवर टॅक्सीही मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. एअरपोर्टवरच नाश्ता केला आणि विमानात बसण्यासाठी पळालो. विस्ताराची फ्लाईट आणि कर्मचारी यांनी आमचे स्वागत केले आणि आम्ही आमच्या प्रवासासाठी आसनस्थ झालो.

विमान प्रवासाची पण एक गम्मतच असते. आकाशात उंच उडण्याची मज्जाच काही और. बंगळुरूला धुक्याचे सावट असल्याने विमानाचे उड्डाण थोडे उशिराच झाले आणि बंगळुरूला पोहोचायला थोडा म्हणजे एक तास उशीर झाला. आमचा ड्रायव्हर प्रकाश आमचीच वाट पाहत होता.

सुदैवाने थोडीशी गुलाबी थंडी पडली होती आणि धुके तर होतेच. विमानात पण थोडे खाणे झाले होते त्यामुळे भूक अशी नव्हती. साधारण ११ वाजले होते आणि आणि आम्ही मदिक्केरीला जायला तयार झालो. भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या राजधानीतील स्वागत तर छान झाले होते. पण आम्हाला आतुरता होती कूर्गच्या निसर्गरम्य वातावरणाची.

सहलीच्या पहिल्या दिवसाच्या छान सुरुवातीनंतर आम्ही सर्व ताजेतवानेच होतो. विमानात थोड्या डुलक्या सगळ्यांनीच काढल्या होत्या त्यामुळे थकवा असा नव्हताच. त्यात बेंगळुरूची आल्हाददायी सकाळ, त्यामुळे आम्ही सर्व फ्रेशच होतो.आमचा ड्राइवर प्रकाश हा सुद्धा खूप प्रोफेशनल वाटत होता. त्याच्याशी थोड्या गप्पा झाल्यानंतर कळले कि तो खरेतर मैसूर जवळच्या एका गावातून होता. हसतमुख वाटणारा प्रकाश खरेतर त्याच्या वयाच्या पंधरा वर्षांपासून या व्यवसायात होता. त्याची आम्हाला या सहलीमध्ये कशी खूप मदत झाली हे सविस्तर पुढे सांगेनच.

बेंगळुरू सोडल्यानंतर हायवे वरील एका छानश्या हॉटेलात दाक्षिणात्य पद्धतीचे छान जेवण केले. पुढे रामनगर, चन्नापट्टणम करीत मध्ये कुठेतरी चहा-कॉफीचा आस्वाद घेत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. प्रवास मोठा होता त्यामुळे थोडाफार त्रास होईल हे आम्ही गृहीत धरले होतेच. पण उतना तो चलताही है . मला खरे तर टेन्शन होते माझ्या आईचे कारण सत्तरी जवळ असताना ती हा प्रवास करीत होती. पण तिचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. मधून मधून मला ती टेन्शन न घेण्यास सांगत होती.

मजल दरमजल करीत एकदाचे मदिक्केरीला पोचलो. मदिक्केरी सिटीपासून आमचे रिसॉर्ट चार किमीवर होते.

प्रशांती रिसॉर्ट मदिक्केरीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. याचे मालक मूळ मराठीच. त्यांचा महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला मुलगा आदर्श याची आमची भेट झाली. त्यांची भाषा मराठीच पण काहीसा कानडी लहेजा असलेली. अर्थात आदर्शला कन्नड पण येत होती. रिसॉर्टमध्ये चेक इन केल्यानंतर फ्रेश होऊन जेवण मागवलं. जेवण थोडं घरगुती पद्धतीचे दिसत होते. ऑपशन्स पण मर्यादितच . पण चव छान होती. जेवणांनंतर निद्रादेवीला अधीन होण्याची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी काय मज्जा करायची याच्या योजना आखत झोपी गेलो.

Prashanti Resort

प्रतिक्रिया

व्वा! लेकी खुश दिसताहेत.
लहान मुलं बरोबर असली की ट्रिप मज्जेदारच होते.

अभिरुप's picture

9 Jan 2020 - 8:19 am | अभिरुप

मुलं बरोबर असली तर खरंच खुप मजेदार होते सहल. प्रतिसादबद्द्ल धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2020 - 9:20 pm | चौथा कोनाडा

वाह, मस्तच ! ओघवतं वर्णन !
छान आहे लेखनशैली !
तुमच्या बरोबरच आहे असं वाटलं !
शेवटचा दिलखुष फोटो झकास आहे !

अभिरुप's picture

9 Jan 2020 - 8:21 am | अभिरुप

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

अभिरुप's picture

9 Jan 2020 - 8:23 am | अभिरुप

आपल्या प्रतिसादांनी मिळालेली उर्जाच पुन्हा लेखन करण्यास प्रोत्साहित करते.

गणेशा's picture

9 Jan 2020 - 12:42 pm | गणेशा

मस्त सुरुवात...

लिहीत रहा.. वाचत aahe..

अभिरुप's picture

10 Jan 2020 - 12:29 pm | अभिरुप

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मकरंद घोडके's picture

9 Jan 2020 - 12:50 pm | मकरंद घोडके

खूप एन्जॉय करत आहेत त्या असे दिसते .. लिहीत राहा वाचतोय

अभिरुप's picture

10 Jan 2020 - 12:28 pm | अभिरुप

खूप मज्जा केली त्यांनी.

मुक्त विहारि's picture

10 Jan 2020 - 7:19 pm | मुक्त विहारि

पुढचा भाग लवकर टाका.