हम जो चलने लगे, चलने लगे हैं ये रास्ते! (चिपळूण - कोळथरे - चिपळूण सायकल फेरी )

मालविका's picture
मालविका in भटकंती
5 Jan 2020 - 7:44 am

तर हि कथा आहे एका कुटुंबाची त्यातल्या मुख्य माणसाला अर्थात कर्त्या पुरुषाला सायकल चालवण्याचं भरपूर वेड आहे. त्याचं हे वेड बघून त्याचा मुलगा देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सॉरी पॅडल वर पॅडल मारून ते वेड सार्थ ठरवतोय. सायकल चालवणं तब्येतीसाठी कसं चांगलं आहे हे पटवून या माणसाने त्याच्या बायकोला देखील नादी लावलं आहे. आता जमेल तेव्हा हे तिघे जण सायकलवरून चकरा मारत असतात. तर हि अशी वेडी ‘’The Cycling Family’’ म्हणजेच आम्ही तिघे… मी, नवरा श्रीनिवास नि मुलगा ईशान (वय वर्ष ८ पूर्ण). मागे एकदा माझ्या माहेरी ३५ किमी ची राईड ईशान ला घेऊन केली होती http://shrigokhale.in/cycling-together/ जाताना ३५ किमी आणि दुसऱ्या आठवड्यात परत येताना ३५ किमी . दोन्ही राइड्स ईशान ने खूपच छान झेपवल्या होत्या. आता परत यावेळी त्याला मोठ्या राईड ला न्यायचा का असा विचार चालू होता. जवळपासची ठिकाणं झाली होती. मग जरा लांबच ठिकाण आम्ही निवडलं. ते म्हणजे दापोली तालुक्यातील कोळथरे हे माझ्या बहिणीचं गाव.

मागच्या दिवाळीत मी आणि श्रीनिवास सायकलने चिपळूण- खेड- दापोली- कोळथरे – गुहागर – वेळणेश्वर – चिपळूण असा दौरा करून आलो होतो http://shrigokhale.in/%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%82-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0.... चिपळूणहून खेड- दापोली मार्गे कोळथरे ८० किमी होतं . पण तेच धोपावे- दाभोळ फेरी बोट मार्गे ७० किमी होत. म्हणून मग आम्ही हाच रूट फायनल केला. आता प्रश्न होता सुट्ट्यांचा…. श्रीनिवास ला Winter Break ची ८-10 दिवस सुट्टी असते. पण ईशान ची मराठी शाळा असल्याने त्याला फक्त १ च दिवस सुट्टी होती त्यामुळे २/३ दिवस शाळेला बुट्टी मारायची ठरवली. मग ३० डिसेम्बर ला जायचं, ३१ तारखेला राहायचं, विश्रांती घ्यायची आणि १ तारखेला निघायचं ठरवलं. त्याप्रमाणे ताईला कल्पना दिली आणि मग तयारीला सुरवात केली. माझी प्रॅक्टिस शून्य म्हणावी अशी होती. १०/१५ किमी सायकल चालवणे जमून जायचे. पण आता एका दिवसात ७० किमी करायचे होते. ईशानने पण बरेच दिवसात मोठी राईड केली नव्हती त्यामुळे त्याला देखील प्रॅक्टिस ची गरज होती. मग रोज सकाळी उठून मी आणि ईशान जवळपासच्या रस्त्यांवर सायकल चालवायला जायला लागलो. रोजचे कमीत कमी १२/१५ किमी करायचो नि परत यायचो. यंदा डिसेम्बर संपत आला तरी थंडीचे नाव नव्हते त्यामुळे सकाळी उठणं फारसं त्रासदायक नव्हतं. रोज सकाळी साधारण ७ किंवा ७. ३० ला निघायचो. कोकणातल्या रस्त्यांवर फक्त चढ उतारच असतात. क्वचितच सपाटी मिळते . त्यामुळे आम्ही जो रोजचा सर्व करायचो तेव्हढ्या किमी मध्ये सुद्धा बारीक सारीक आणि तीव्र! असे चढ उताराचे सगळे प्रकार असायचे. सकाळी उठताना ईशान कंटाळे पण target ची आठवण करून दिली कि उत्साहात येई. साधारण ३ आठवडे आम्ही रोज सकाळी सराव केला आणि मग जाण्यासाठी सज्ज झालो. त्याआधी सायकल Takle Cycles दुकानात दाखवून फिट करून घेतल्या .

३० तारखेची सकाळ उजाडली. सकाळी ५ ला उठलो. एकीकडे अंडी उकडत टाकली. दुसरीकडे माझ्यासाठी ऑम्लेट बनवून घेतलं. ते झाल्यावर चहा बनवला. हे सगळं होईपर्यंत बाकी तयारी केली. थोड्या वेळाने ईशानला उठवलं. श्रीनिवास आणि ईशान दोघांनी उकडलेली अंडी खाल्ली आणि उरलेली बरोबर घेतली. केळी घेऊन ठेवलीच होती. Electrol पावडर, Gluco Vita Bolt च्या गोळ्या अशी सगळी जय्यत तयारी होती. ४ बाटल्या पाणी भरून घेतलं. बाकी लागल्यास वाटेत बाहेरून घेऊ असा विचार केला. सगळी तयारी होऊन आम्ही बरोबर ६ ला चिपळूण हुन निघालो. सुरवातीला चांगलाच अंधार होता. पण स्ट्रीट लाईट्स असल्याने तशी चिंता नव्हती शिवाय सायकलला टॉर्च लावलेली होतीच. हळूहळू चिपळूण क्रॉस करून आजूबाजूची छोटी गावं पण पाठी टाकली आणि मग विरळ वस्ती, अंधार आणि तुरळक वाहनं लागायला लागली. हळू हळू दिसायला लागलं , पण दाट धुकं होतं.

शिरळ गाव पाठी टाकलं आणि गणेश खिंडीच्या चढला सुरवात झाली पण, हळूहळू चढत जाणारा असल्याने सायकलींच्या दृष्टीने चांगला :). सकाळची फ्रेश सुरवात असल्याने आम्हाला देखील चढ असला तरी दमायला झालं नव्हतं. मध्येच एक पाण्याचा छोटा ब्रेक घेऊन सायकल चालवत होतो. सायकलींगच्या बाबतीत ईशान कायमच मला पाठी टाकत आलाय पण तो कधी श्रीनिवासशी स्पर्धा करायला जात नाही. मला मात्र तो सहज हरवतो त्यामुळे थोडं पाठी राहायचं नि मग बेल वाजवत माझ्या पुढे निघून जायचं हे त्याच आवडत काम आहे. चढ म्हटले कि मी मनानेच आधी दमते. त्यामुळे हे दोघे पूर्ण खिंडीचा चढ चढून माझी वाट बघत एका शेड मध्ये थांबले होते. ‘’स्लो बट स्टेडी’’ यानुसार मी सायकल चालवत त्यांच्यापाशी पोहोचले. मग जरा नीट बसून पाणी पिऊन झाल्यावर परत पॅडल मारायला सुरवात केली. आता साधारण ३ किमी चा उतार होता. सायकली सुसाट सोडल्या. उतारावर अर्थात मी पुढे. ईशान सुसाटत येतो पण त्याला कंट्रोल करावं लागत त्यामुळे श्रीनिवासला ईशानच्या बरोबरीने त्याला सांभाळत यावं लागतं. उतार संपल्यावर तांबी चा पूल लागला इथे मगरी दिसतात कधीकधी पण, आम्ही गेलो तेव्हा पूर्ण धुकं पाण्यावर पसरलं होतं. तिथेच पुलावर फोटो काढला नि परत सुरवात केली.

आता रामपूरच्या घाटीचा चढ लागला हा देखील जवळपास 4 किमीचा चढ आहे. दुर्दैव म्हणजे इथे चढानंतर उतार नाही… परत एकदा ईशान श्रीनिवास पुढे नि मी कासवाच्या गतीनं मागे असे सुरु झालो. आता रस्त्याला जरा वाहनांची गर्दी सुरु झाली. लोकं कौतुकाने ईशान कडे बघत होती. आता पूर्ण घाटी चढून रामपूर गावात जाऊन दोघे माझी वाट बघत थांबले. मी देखील त्यांच्या पाठोपाठ जाऊन थांबले. मध्ये मध्ये ग्लुको विटा बोल्ट च्या गोळ्या तोंडात टाकत होतो. यापुढे मार्गताम्हाने गाव लागते. तिथून पुढे वेळणेश्वर फाटा लागतो. तिथे आम्ही जरा थांबलो. बरोबरची अंडी, केळी खाऊन घेतली. Electrol च पाणी बनवून घेतलं. आताशी कुठे २० किमी अंतर कापून झालं… अजून ५० किमी बाकी होत. पोरग जरासुद्धा थकलं नव्हतं. उलट उत्साहात होत. तिथून निघालो नि १० किमी वर शृंगारतळीपर्यंत आलो. इथून पुढे उजवीकडे वळून धोपावे जेटीकडे रस्ता जातो . तळीवरून २० किमी वर जेटी होती. इथे चढ एके चढ सुरवात झाली. साधारण ४ किमी चढाला १ किमी उतार या प्रमाणात चढ होते. आताशा ऊन देखील डोक्यावर यायला लागल्याने थोड जास्त थकायला होत होत. आश्चर्य म्हणजे चढाच्या वेळी रस्ता गुळगुळीत आणि थोडा जरी उतार आला तरी त्यात खड्डे. ज्यामुळे उताराच्या स्पीड ने पुढचा चढ चढवायचे बेत रस्त्यावरच्या धुळीत मिसळत. “अगं थोडेसेच चढ आहेत!” हे श्रीनिवासचं वाक्य निरर्थक वाटे. रस्ता माहितीचा असला तरी हे छोटे छोटे चढ असे त्रासदायक होतील वाटलं नव्हतं. जेव्हा हा प्लॅन केला तेव्हा गणेश खिंड, रामपूरची घाटी आणि दाभोळचा चढ एवढ़ेच मोजले होते. छोटे-मोठे चढ हे असणार असं गृहीत धरलं होत. पण हे छोटे छोटे करत फक्त चढच लागत होते. उताराचं नाव नव्हतं. Enron / RGPPL च्या प्रकल्पा नंतर मोठा उतार आहे हे माहित होतं, केवळ तो उतार उतरायचा आनंद मिळणार म्हणून हे सगळे चढ चढवायचे कष्ट मी उपसत होते. शेवटी एकदाचं Enron / RGPPL चं गेट आलं आणि उताराला सुरवात झाली. हा उतार एकदम तीव्र स्वरूपाचा आहे आणि रस्ता देखील एकदम चांगला. त्यामुळे सायकलने जाताना मजा आली. इथे ठरवल्यासारखे मी पुढे नि हे दोघे मागे. उतार उतरल्यावर परत एक तीव्र चढ आहे. इथे मात्र अगदी लो गिअर वर पण सायकल नेता येईना . ईशान सुद्धा दमला होता. मग आम्ही दोघांनी हातात सायकल धरून चढ चढवला. परत आता जेटी पर्यंत शेवटचा उतार. श्रीनिवासने पुढे जाऊन तिकिटे काढली होती. ईशानला पुढे ठेवून मी पाठी होते. सायकल आणि सायकलस्वार लहान मुलगा बघितल्यावर २-३ जण उत्सुकतेने पुढे आले. कुठून आलात? कुठे जाणार? प्रश्नाची सरबत्ती झाली . बर्याचश्या प्रश्नांना ईशानने उत्तरे दिली. सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं. काहींनी पाठ थोपटली. ईशानला त्यामुळे उत्साह आला. माझ्या स्लो जाणण्याचे आमची ११ ची फेरी चुकली होती. त्यामुळे ११.३० च्या फेरीपर्यंत सक्तीची विश्रांती झाली तिथे.

धोपावे- दाभोळ फेरीबोटीच अंतर खुपच कमी आहे १५ मिनिटात इकडून तिकडे गेलो. आता दाभोळ चा चढ चढायचा होता. याआधी अनेकदा या रस्त्यावरून गेल्याने कल्पना होती. ईशान ला कल्पना दिली कि साधारण ३-४ किमीचा चढ असेल. अगदी सुरवातीलाच तीव्र चढ असल्याने सायकल हातात घेऊन चालायला सुरवात केली. या चढाने पूर्ण दमछाक केली. काही केल्या मेला चढ संपेना. कधी एकदा टॉप करतो नि उतार लागतो असं झालेलं. मध्ये मध्ये मी माझ्या सोयीने थांबत पाणी पीत चढत होते. येताना काय माझ्याच्याने हे झेपणार नाही असं म्हणून मी येताना एस टी ने येणार असं डिक्लीअर करून टाकलं. श्रीनिवास नि ईशान दोघेही चिडवायला लागले. पण आता पाय दुखत होते. अवघे १० किमी उरले होते. शेवटी एकदाचा कोळथरे चा फाटा आला. थोडासा सपाट रस्ता झालयावर पंचनदी गावाचा मोठा उतार लागला. हुश्श झालं. या उतारावरून मी मुद्दाम पाठी होते . ईशान ज्या स्पीड ने सायकल उतरवत होता ते पाहून माझ्यातली काळजीवाहू आई जागी झाली . क्षणभर भीती वाटली. मी याहीपेक्षा जास्त स्पीड ने सायकल चालवते. पण आज तिथे ईशान ला बघून धडधडलं! ईशान च्या पाठी श्रीनिवास होता. पण तरीही न राहवून मी श्रीनिवासलाच ४ सूचना केल्या. त्याला हळू जायला सांग, ब्रेक लावायला सांग, इत्यादी. श्रीनिवास वैतागला नि मला पुढे जायला सांगितलं आणि मग पाठून दोघे आरामात आले. यथावकाश तेही अंतर पार करून आम्ही एकदाचे घरी पोचलो.

घरी पोचल्यावर मला एकदम सुटल्यासारखे झाले. हुश्श करून बसलो . ईशानला पण काहीतरी साध्य केल्याचे समाधान मिळाले. सगळे जण कौतुक करत त्यामुळे त्याला एकदम मजा वाटत होती. ताईने तर शब्दशः त्याच्यासमोर हात जोडले.

भाच्याचा वाढदिवस असल्याने मस्त बासुंदीचा बेत होता. त्यामुळे जेवणावर आडवा हात मारला. थोडी वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळी समुद्रावर. सुदैवाने इथे गर्दी नसते, मोठा लांब रुंद स्वच्छ किनारा सकाळी एवढी रपेट करूनही ईशान दमला नव्हता आणि भाच्याबरोबर पाण्यात डुंबकत होता.

रात्री भाच्याचे मित्र मैत्रिणी येऊ छोटसं घरगुती सेलिब्रेशन करून दिवस संपला. थोड्याफार गप्पा मारून आम्ही मस्त रात्री १० ला झोपलो..

नवीन वर्ष ….

१ तारखेला सकाळी ५ .३० ला उठून तयार झालो. सकाळी परत थोड्याश्या चहा बरोबर गप्पा झाल्या . आणि ७ वाजता कोळथरे हुन सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो . पंचनदी फाट्यावर कोळथरे ला मागे टाकून थोडा सपाट रस्ता लागला आणि मग काल लागलेला उतार आज चढाच्या रूपात समोर आला. सुरवातीला बराचसा चढ चढल्यावर एक तीव्र वळणावर मात्र थकून सायकल हातात धरून ते वळण पार केलं. परत सायकल वर चढून सावकाश का होईना पण चढ चढत होते. परवासारखे श्रीनिवास नि ईशान पुढे होते नि मी मागाहून. परवा येताना ४ किमी चढला १किमी उतार असं असणार गणित आज ४किमी उताराला १ किमी चढ असं अपेक्षित होत . पण हे सगळं मानसिक असतं, प्रत्यक्षात असं काहीच नसतं. लहानपणी गोष्टीत ऐकलेल्या जादू प्रत्यक्षात घडतात आणि ते रस्ते परत ४ किमी चढाला १ किमी उतार याच प्रमाणात समोर येतात असा अनुभव आला. चढ चढताना दमछाक होत होती. तरीही सकाळची वेळ होती. आजूबाजूला लोक स्वेटर घालून फिरत होते नि आमच्या मात्र घामाच्या धारा लागल्या होत्या.

शेवटी एकदा पूर्ण चढ चढून झाल्यावर एकदाचा दाभोळ जेटी ला जाणारा मोठा उत्तर लागला. सुसाट स्पीड ने तो उतार उतरून जेटी वर आलो तो नुकतीच फेरी बोट गेली होती. अर्धा तास आमचा मग तिथेच गेला. मग जरा सेल्फी वगैरे झाले. स्टेट्स अपडेट केलं.

फेरी बोटीने पलीकडे धोपावे ला लागलो. काल उतरलेला उतार चढ होऊन वाट बघत होता. आधीसारखाच एक शार्प टर्न हात सायकल घेऊन मी नि ईशान ने चढवला आणि मग पॅडल मारत निघालो. Enron/ RGPPL च्या गेट पाशी चढ संपला. इथे माझ्या मैत्रिणीचं हॉटेल आहे ‘’पूर्णब्रह्म’’. ती माझी मैत्रीण आणि तिचा नवरा श्रीनिवासचा मित्र त्यामुळे फॉर्मॅलिटी नसते. स्टेटस ला टाकेलला फोटो बघून तिने अंदाज केला होता की आम्ही कदाचित भेट देऊ. त्याप्रमाणे आम्ही नाश्त्याला तिथेच थांबलो. मस्त मिसळपाव नि ईशान चा आवडता शिरा असा भरपेट नाश्ता झाल्यावर परत एकदा सायकल चालवायला सुरवात केली.

उताराचा मस्त आनंद घेत आणि थोडाफार चढ चढत शृंगारतळी पर्यंत आलो. आता इथून चिपळूण पर्यंत राज्य महामार्ग होता. रुंद रस्ता आणि छोटे मोठे चढ उतार. आताशा ११ वाजून गेले होते. चिपळूणला पोहोचायला किमान २ वाजतील असं दिसत होतं. पॅडल मारण चालू होतं. मार्गताम्हाने येईपर्यंत बऱ्यापैकी थकायला झालं होत. आज ईशान पण मध्ये मध्ये थकल्यासारखा वाटत होता. पण आपण आईच्या पुढे जातोय यातही त्याला आनंद होता. शिवाय येणारे जाणारे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. काही मोठ्याने कमेंट करत होते. एका बुलेट वाल्याने त्यांच्या पाठून जाऊन थोडा वेळ शूटिंग करून दोघांचे फोटो काढून घेतले . एके ठिकाणी पाणी प्यायला थांबलो असता एकाने अगदी छोटीशी मुलाखत घेतली. ईशान हा कौतुकाचा विषय झाल्याने तो खुश होता. रामपूर ची काल चढलेली घाटी आता उतरायची होती. तिथे फक्त उतार होता. त्या आशेवर कितीतरी वेळ रस्ता कापत होतो. वरच्या लेखाच्या नावाप्रमाणे “हम जो चलने लगे चलने लगे हे ये रास्ते ” या गाण्याप्रमाणे रस्ता देखील आमच्याबरोबरीने जात होता आणि शेवट रामपूर गाव आलं आणि उताराला सुरवात झाली. उतार भन्नाट वेगाने उतरल्यावर परत एकदा तांबीचा पूल क्रॉस केला आणि गणेश खिंडीचा चढ सुरु झाला. ईशानला encourage करण्यासाठी वेळोवेळी अंतराची कल्पना देत होतो. गणेश खिंडीचा चढ देखील हळूहळू चढत जाणारा असल्याने (gradual) थांबत थांबत परंतु सायकलवरूनच सगळा चढ चढून गेलो आणि मग परत सुसाट वेगाने खिंड उतरलो. शिरळ गाव आलं तसा खडबडीत रस्ता सुरु झाला. भूक लागली होती. ईशानच्या या सगळ्या Ride बद्दल त्याला Pizza treat द्यायची ठरवलं आणि त्यामुळे सायकली डॉमिनोज पिझ्झा कडे वळल्या. ८ वर्षांच्या ईशानने Non Gear Cycle वर ७०- ७० किमीचं अंतर कापलं हीच आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सगळेच त्यामुळे खुश होतो. भरपेट पिझ्झा खाल्ला आणि ईशानचा आवडता चोको लावा केक पण.

अशा तर्हेने आमची आणि ईशान ची महत्वाची राईड कम्प्लिट झाली . ईशान एकदम फुल ऑफ एनर्जी होता. तिकडे गेल्यावर काय किंवा इकडे आल्यावर काय त्याला खेळायचा उत्साह तसाच होता. ईशान साठी एक अचिव्हमेंट होती. जाऊन येऊन जवळपास १४० किमी चा प्रवास झाला आमचा.

आधीची प्रॅक्टिस चांगलीच कमी आली. ईशान चा रोजचा व्यायाम देखील यात कमी आला . श्रीनिवास आणि ईशान रोज व्यायाम करतात ज्यात ईशान रोज ५० सूर्यनमस्कार घालतो ज्यामुळे त्याचा स्टॅमिना वाढायला मदत झाली.

या सगळया राईड मध्ये श्रीनिवास ची सुद्धा कमाल झाली. जरी तो रेग्युलर सायकल चालवणारा, व्यायाम करणार असला तरीही, तो आणि त्याचा मित्र स्टॅचू ऑफ युनिटी, गुजरात ते मुंबई अशी 500 किमीची ride करून आले होते. २९ तारखेला श्रीनिवास मुंबईहून चिपळूण ला आला आणि ३० ला आम्ही परत नवीन राईड सुरु केली. तेव्हा त्याच देखील खूपच कौतुक.

नियमित व्यायाम हा किती महत्वाचा हे परत एकदा पटलं.

हि राईड तर ठरवल्याप्रमाणे झाली. आता अजूनही अनेक ठिकाणं बोलावत आहेत. कुठे कसं जायचं याचे अनेक प्लॅन बनतायत.

बघूच आमची सायकल आम्हाला पुढे कुठे नेते ते…….

(फोटो अपलोड करता येत नसल्याने फोटोसाठी कृपया ब्लॉग लिंक बघावी )
http://shrigokhale.in/chiplun-kolthare-chiplun/

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

6 Jan 2020 - 11:04 am | सुधीर कांदळकर

अशा दीर्घ पल्ल्याच्या कठीण भटकंतीत मनात उमटणारा आशानिराशेचा खेळ छान रंगवला आहे.


परवा येताना ४ किमी चढला १किमी उतार असं असणार गणित आज ४किमी उताराला १ किमी चढ असं अपेक्षित होत . पण हे सगळं मानसिक असतं, प्रत्यक्षात असं काहीच नसतं. लहानपणी गोष्टीत ऐकलेल्या जादू प्रत्यक्षात घडतात आणि ते रस्ते परत ४ किमी चढाला १ किमी उतार याच प्रमाणात समोर येतात असा अनुभव आला.

हे मस्त. आवडले.


८ वर्षांच्या ईशानने Non Gear Cycle वर ७०- ७० किमीचं अंतर कापलं हीच आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आम्ही सगळेच त्यामुळे खुश होतो.

छान.

नातेवाईकांनी केलेला, मैत्रिणीने केलेला पाहुणचार, इतर गप्पागोष्टी अशा खाजगी अनुभवांची जोड छान दिली आहे.

पुढच्या खेपेला आपल्यातली 'आई' घरी ठेवून जाअसा अनाहूत सल्ला माझ्याकडून.

लेख आवडला, धन्यवाद. पुढील सायकलस्वारीस आणि लेखनास शुभेच्छा.

Nitin Palkar's picture

6 Jan 2020 - 12:01 pm | Nitin Palkar

सुंदर लेख. सुरेख शब्दांकन. तुम्हा तिघांचेही कौतुक. खासकरून ईशानचे. पुढील सायकल स्वारीस शुभेच्छा.

विअर्ड विक्स's picture

8 Jan 2020 - 10:33 am | विअर्ड विक्स

Lekh aavdla. Chiplun la barech divasat yene nahi zale. Mamache gaav mazya... Tumchya lekh pahun mazya cycle chi dhul zatku mhanatoy baghuya yog kadhi yetoy

शा वि कु's picture

8 Jan 2020 - 5:08 pm | शा वि कु

मस्तच ! भारी वाटलं वाचून.