भाइं (Indian Inglish)

Primary tabs

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
1 Jan 2020 - 5:44 am
गाभा: 

पश्चिमेकडे शकुनी, गांधारीच्या कंदाहार पासून ते पूर्वेकडे चित्रांगदेच्या माणिपूरच्या पल्याड असलेल्या ब्रह्मदेशापर्यंत आणि उत्तरेत तिबेट, हिमालया पासून ते दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या तत्कालीन खंडप्राय भारत देशावर बाहेरून आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी एतदद्देशीय लोकांच्या मदतीने तब्बल दीडशे वर्षे राज्य केले.

असंख्य प्रचलित भाषा आणि अगणित बोली भाषा असलेल्या भारतात ब्रिटिशांनी सगळ्यांची मोट एकत्र बांधून त्यांना सोईस्कर अशा आवश्यक त्या सुधारणा, बदल करीत राज्यशकट कसा हाकला असेल कोण जाणे. ब्रिटिश स्थानिक भाषा शिकले असतील काय? आणि समजा शिकले तर त्याच भागामध्ये / प्रांतामध्ये राहिले असतील की फक्त दुभाषांवर अवलंबून राहून राज्य कारभार केला असेल? एक मात्र खरे, ब्रिटिशांनी तत्कालीन शिक्षण पद्धती मोडीत काढून मॅकले प्रणित शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला आणि राज्य कारभारसाठी लागणारे शिक्षित व इंग्रजी बोलणारे स्थानिक मनुष्यबळ तयार करायला सुरुवात केली. शारीरिक कष्टातून सुटलेल्या आणि ज्यांना दैनंदिन जीवनकलह नव्हता अशा अभिजन वर्गाने ह्या संधीचा फायदा उठवला आणि भारतामध्ये "ब्राऊन साहिब" हा नवीन वर्ग उदयास आला.

आणि भारतीय उपखंडातील लोकांनी आपापल्या मातृभाषेतील ढंगाला अनुसरून इंग्रजी बोलणे सुरू केले. उत्तर भारतीय व्हॉट इज युअर गुड नेम? अशी प्राठेवाली हिंग्लिश किंवा हाताची दोन बोटे इंग्रजी V प्रमाणे उंचावून बी फॉर बीक्टरी अशी राशोगुल्ला बिंग्लिश अथवा येस्स साSSर्र अशी इडली-डोसा टिंग्लीश बोलायला सुरुवात केली. त्यात शुद्ध तुपातल्या तर्रखडकरी वरण-भात मिंग्लिशची भर पडली. हळूहळू ब्रिटिश इंग्रजी पासून फारकत घेत भारतीय उपखंडात बोलणाऱ्या "भारतीय इंग्रजी" चा उदय झाला. अर्थात काही हुच्चभ्रू अभिजन हे तुपातील (किंवा बटर, मार्गारींन, लार्ड मधली म्हणू हवे तर) ब्रिटिश इंग्रजी बोलत परंतु इतरेतर भारतीयांनी ब्रिटिशांच्या इंग्रजीवर त्यांच्या मातृभाषेचे संस्कार केले. इतके की, जणू बदला घेण्यासाठीच भारतीयांनी "मेस अप विथ इंग्लिश" चालू केले. यातील काही शब्दांना तर साहेबाच्या भाषेने अधिकृत मान्यता देखील दिली याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे "prepone". आणि सध्याच्या डॉलरच्या प्रभावाने लवकरच पेट्रोल हे गॅस वर जाण्याची शक्यता आहे. ब्रिटिशांच्या English चा भारतीयांच्या Inglish पर्यंतचा असा हा प्रवास मोठा मजेशीर आहे.

आता काही मजेदार उदाहरणे बघू. वर उल्लेख केलेले "गुड नेम" हे तर सरळ सरळ हिंदीतल्या शुभ नाम चे शब्दशः भाषांतर आहे तर "आईज हॅव कम" हे मराठीचे. एखाद्या ब्रिटिश गृहस्थाला तात्काळ उत्तराच्या अपेक्षेने प्लिज रिव्हर्ट बॅक इमेजीएटली लिहिले तर ते मला फिजीकली अशक्य असल्याचे उत्तर येईल. :) असाच घोळ पास आऊटचा आहे (passed out from so and so college). बाहेर जर आय पास्ड आऊट म्हणालात तर कदाचित मेडिकल इमर्जन्सी साठी धावाधाव व्हायची.

Do ची तऱ्हा आणखी निराळी. Do ने सुरू होणारी वाक्ये प्रश्नार्थक न राहता आज्ञार्थक झाली. "Do one thing" "Do the needful" अशी आणि प्लिज वगैरे भारतीयांच्या सौजन्याच्या व्याख्येत बसत नसल्याने आणि मोघम बोलण्याच्या प्रवृत्तीमुळे one thing किंवा needful, बस्स एव्हढेच. एखादा सौजन्याच्या पुतळा असेल तर kindly do the needful पण needful म्हणजे काय ते सांगणे नोहे.

एखाद्या वाक्यात "only" चा वापर only भारतीयच करू जाणे ! Like that only म्हटले की झाले, समोरच्याने ओळखून घ्यायचे म्हणजे काय ते ! आणि also च्या जागी only चा वापर ही तर आपली खासियत. आय एम फ्रॉम इचलकरंजी ओन्ली. :)
भारतीयांच्या शंकेखोर मनाला प्रश्न कधी पडत नाहीत येतो तो doubt च. त्यामुळे समोरच्याला स्वतःबद्दलच doubt येणार.

आज सकाळी ला आपण "today morning" म्हणणार "this morning" नाही आणि काल रात्री ला "yesterday night" म्हणणार "last night" नाही. स्वतःची ओळख करून देताना एकतर myself आणि वर Mr. किंवा Mrs. काय असेल ते so and so.

Uncle, auntie ह्या इंग्रजी शब्दांना नात्याचा बाहेर काढले ते भारतीयांनीच. मित्राचे पालक, शेजारचे, आजूबाजूचे, कोणीही वयस्कर अंकल, आंटी झाले. बट बी केअरफुल, सगळ्यांनाच अंकल, आंटी म्हणू नका बरका.

स्टेशनच्या बाहेर जायचा राजमार्ग म्हणजे जिथे तिकीट तपासनीस उभा राहून तिकिटे तपासत असतो तो. तुम्ही तिकीट दाखवून स्टेशनच्या बाहेर (आउट) आला म्हणजे गावात (in town) आला पण नाही आउट ऑफ स्टेशन म्हणजे गावाच्या बाहेर म्हणे, हे कसे काय बुवा?
भारतीयांनी घातलेले आणखी मोठे घोळ म्हणजे हॉटेल, टॉयलेट वगैरे वगैरे. हॉटेल आणि रेस्तराँ मधला फरक भारतीयांनी मिटवून टाकला आणि त्याच्याही पुढे जाऊन हॉटेलिंग ह्या शब्दाला नवीन संदर्भ दिला. हॉटेलिंगचा मूळ अर्थ बघता भारतीय अर्थ समजल्यावर ब्रिटिश माणसाला चक्कर येईल. तीच गोष्ट टॉयलेट आणि कमोडची. आता हे मान्य की रेस्ट रूम म्हटल्यावर आतमध्ये मस्त पलंगावर झोप काढायची सोय असेल असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे किंवा वॉश रूम न म्हणता वाईप रूम म्हणायला पाहिजे म्हणजे रेस्ट न घेता रेस्ट रूम, वॉश न करता वॉश रूम तर मग आम्ही टॉयलेट मध्ये शॉवर घेतला तर तुमची काय हरकत आहे? उभारलेल्या विनोदी वाचळवीरांचे ( म्हणजे मराठीत स्टँड अप कॉमेडियन) या संदर्भातील बाष्कळ विनोद प्रसिद्ध आहेत.

आता भारतीय स्लॅन्गचा ब्रिटिश इंग्रजीमध्ये समावेश होणे फक्त बाकी आहे. उद्या एखादा ब्रिटीश अरे यार किंवा ओये, अबे करत बोलायला लागला तर आश्चर्य वाटायला नको. तुमच्याकडे देखील असा भाइं शब्द खजिना असेल तर शेअर करा, वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

दुकानावरच्या आणि आतल्या पाट्यांबद्दल तर काय बोलायलाच नको. हे पहा

img

ह्या पाट्या आणि त्यावरील सुद्दलेकन हा खरं तर स्वतंत्र लिहायचाच विषय आहे.

पाट्या रंगवणाऱ्या पेंटर वर्गाची शुद्धलेखनाची कार्यशाळा घेण्याची नितांत गरज आहे.

इथे मला एका व्यवसायाची संधी दिसते आहे. ह्या पेंटर मंडळींसाठी सर्व प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेत एक ऍप डेव्हलप करून दिले तर त्यात आधी मजकूर लिहून त्या नुसार बघून ही मंडळी पाट्या रंगवू शकतील, काय बोलता?

भारी नेमक्या नोंदी आहेत.

"शॉपी" (Shoppee) हेही एक भारतीय प्रकरण आहे बहुधा.

मराठी_माणूस's picture

2 Jan 2020 - 1:12 pm | मराठी_माणूस

ब्रिटीशांचे एतद्देशीय भाषेत बोलणे हे ही हास्यास्पदच.

राजाभाउ's picture

2 Jan 2020 - 1:16 pm | राजाभाउ

एक नंबर.

हॉटेलिंगचा मूळ अर्थ बघता भारतीय अर्थ समजल्यावर ब्रिटिश माणसाला चक्कर येईल. तीच गोष्ट टॉयलेट आणि कमोडची

हॉटेलिंग चा मुळ अर्थ खरच माहीत नव्हता हं. बर झाल बघितल ते, नायतर कुठतर कायतर बोलुन बसलो असतो आणि उगाच बल्ल्या झाला असता.
पण कमोड चा मुळ अर्थ जरी वेगळा असला तरी आपण ज्या अर्थी तो वापरतो त्याच अर्थाने सगळी कडे वापरतात ना. का काही वेगळे म्हणायचय तुम्हाला?

लेख मात्र खुसखुशीत झाला आहे.

कुमार१'s picture

3 Jan 2020 - 8:32 am | कुमार१

Anyway ला गरज नसताना s लावून Anyways असे चुकीचे रूप तरुणांनी रूढ केले आहे.

कुमार सर, anyways तुमची टिप्पणी अगदी बरोबर आहे. :)

भुजंग पाटील's picture

3 Jan 2020 - 10:21 am | भुजंग पाटील

(वेटेज) weightage हा शब्द भारत आणि सिंगापूर मध्ये प्रचलीत आहे, पण इतरत्र नाही.
केंब्रिज डिक्शनरीने अलिकडेच हा शब्द नव्याने टाकला, पण भारतीय ईंग्लिश शब्द म्हणून.

पॉइझन, व्हेनम आणि टॉक्सीन ह्या सगळ्यांना मराठित विष (हिंदीत जहर) हा एकच शब्द आहे बहुदा.
भारतात स्नेक व्हेनम च्या ऐवजी स्नेक पॉइझनच म्हणताना दिसतात.

आवडाबाई's picture

3 Jan 2020 - 11:55 am | आवडाबाई

two wheeler - scooter/moped/bike साठी (generally) ride शब्द असतो
आणि car/truck/bus साठी driving
पण आपण दोन्हीकडे सर्रास driving वापरतो

चामुंडराय's picture

8 Jan 2020 - 5:37 am | चामुंडराय

टू व्हीलरला हॅन्डल असते तर कारला स्टिअरिंग. मी मात्र स्टिअरिंगला देखील हॅन्डल म्हणताना ऐकलेय.

प्रश्नार्थक वाक्यात are you?, did you? अशी are आणि did वगैरे उलटून आगोदर घेण्याची रचना न पाळता अनेक भारतीय मूळ भारतीय वाक्यरचनेप्रमाणे सरळ वाक्य उच्चारून फक्त उच्चारात प्रश्नार्थक टोन आणतात.

म्हणजे "You are going for lunch?" (प्रश्नार्थक आवाजात) "You will do this ?"

"You will do this na?" , "डोन्ट फरगेट हां.." हाही एक खास भारतीय प्रकार.

बबन ताम्बे's picture

3 Jan 2020 - 12:44 pm | बबन ताम्बे

१) डोन्ट पुट इट उल्टा.
२) देअर इज कच्च्या रोड अहेड.

गवि's picture

3 Jan 2020 - 1:17 pm | गवि

अगदी अगदी..

आनन्दा's picture

3 Jan 2020 - 2:46 pm | आनन्दा

लेख नसतंच आहे. पण हे अपरिहार्य आहे..
गरज नसताना कोणतीही भाषा शिकायला गेले, विशेषतः टी बोलीभाषा म्हणून प्रचलित झाली की हे सगळे अत्याचार तिला सहन करायला लागतात..

जाताजाता
बंबैया हिंदी म्हणून एक वेगळी भाषा जगात अस्तित्वात आहे, त्यावरती पण थोडे लिहा अशी विनंती

लेख "नसतंच" आहे हे काही नीटसं कळलं नाही.

मुंबईचा आणि माझा जास्त काही संबंध आला नाही (फक्त एक यायचा जायचा थांबा) त्यामुळे बम्बईय्या हिंदी बद्दल फक्त ऐकून आहे.
मात्र मुंबईकरांचे तो बोल्ला, ती बोल्ली किंवा गाणं बोल असं काही ऐकलं कि सुरवातीला आश्चर्य वाटायचं.

शेखर's picture

3 Jan 2020 - 3:07 pm | शेखर

ब्रिटीशांनी सुद्धा खुप भारतीय गावांच्या नावाची वाट लावली. त्यांचा साहित्यात सुद्धा अश्या प्रकारचे लेखन झाले आहे का ते शोधले पाहिजे.

खरंय आणि दुर्दैवाचा भाग असा कि स्वातंत्रोत्तर काळात बऱ्याच कालावधी पर्यंत आपण ती नावे दुरुस्त न करता तशीच ठेवली (याचा आणि गेल्या साठ वर्षांचा काही एक संबंध नाही, त्यावरून उगा वादंग नको !) आणि अजूनही ती सगळी नावे दुरुस्त केली आहेत कि नाही काही कल्पना नाही.

रच्याकने काहींनी तर आपली नावेच बदलली, जस्ट टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स !!

आवडाबाई's picture

3 Jan 2020 - 11:11 pm | आवडाबाई

taken for granted घेणे !

पैलवान's picture

4 Jan 2020 - 10:45 am | पैलवान

एक वर्ष एम्फासिस मध्ये इंटरनॅशनल टेक व्हॉईस सपोर्ट केला होता, तेव्हा तीन महिने लॅन्ग्वेज, अ‍ॅसेण्ट, कल्चर ट्रेनिंग दिलं होतं.
त्यात आमच्या तोंडी बसलेला 'इंडियननेस' काढण्यावर खूप भर होता.
उदा.
(गवि यांच्या उदाहरणाप्रमाणे) - 'यु आर गोइंग फॉर लंच?' (प्रश्नार्थक आवाजात) ऐवजी ' आर यु गोइंग फॉर लंच?'
लाखा-कोटीऐवजी थाउजंड-मिलियन वापरणे.
एखाद्याच्या बोलण्यात 'माय वाईफ्स सन' किंवा 'माय मॉम्स हजबंड' असं आलं तर त्याचा अर्थ समजवून घेणं.
'प्लीज' आणि 'थँकयू' चा सढळ हाताने वापर करणे. कॅन अन विल ऐवजी जास्त नम्रता दाखवणारे कुड आणि वुड वापरणे.
('क्लिक ऑन द सेटिंग्ज आयकॉन.' किंवा 'कॅन यु क्लिक ऑन द सेटिंग्ज आयकॉन?' ऐवजी 'कुड/वुड यु प्लीज क्लिक ऑन द सेटिंग्ज आयकॉन?' आणि तसं केल्यावर थँक्स्/थँक यु).
दॅट्स व्हेरि नाईस ऑफ यू, असे प्रशंसात्मक बोलणे.
कितीही वरच्या पदावरील अधिकारी/व्यवस्थापक/संचालक असला तरी, सर्/मॅडम न वापरणे. नावाचा वापर करून संबोधणे. मि. लास्ट नेम चालेल. पण महिला असेल तर शक्यतो मिसेस्/मिस (आपल्याला कन्फर्म माहिती असण्याची शक्यता कमी असल्याने) लास्टनेम न वापरता नावच वापरणे.
ईमेल लिहिताना पुर्ण मोठ्या लिपीचा अर्थ 'ओरडून सांगणे' असा होतो.
'मे आय' आणि 'कॅन आय' यातील फरक. (हा इन्ग्लिश-विन्ग्लिश पिच्चर मध्ये पण दाखवलाय).

सर टोबी's picture

4 Jan 2020 - 3:14 pm | सर टोबी
  • आकडे किंवा तत्सम माहितीची वर्गवारी दोनपेक्षा जास्त गोष्टींवर करायची झाली तरीही त्याला बैफरकेशन म्हणणे
  • यूज किंवा युजेस असे सोपे शब्द असतानादेखील युसेजेस हा शब्द वापरणे
  • अशीच गत फंक्शन या शब्दाऐवजी फंक्शनयालिटी हा लांबलचक आणि तोंड वेंगाडायला लागणार शब्द वापरणे
  • वन ऑफ द समथिंग मध्ये 'समथिंगचे' अनेक वचन वापरण्याऐवजी एक वचन वापरणे
  • जे या मुळाक्षराचा उच्चार जहाजातला 'जे' असा करणे (हे मागील पिढीचे, ज्यांनी इंग्लिशचे मराठीतून शिक्षण घेतले, त्यांच्या बाबतीत होत असावे)
  • नीट वाक्य रचना सुचली नाही तर 'लाईक' हा शब्द वापरणे आणि मुळातच नीट बोलता येत नसल्यामुळे दर दोन-तीन शब्दानंतर 'लाईक' म्हणणे
बबन ताम्बे's picture

18 Jan 2020 - 8:18 pm | बबन ताम्बे

लाईक आणि ऍक्चुली हे शब्द आमच्या ऑफिसमधील एक जण बोलताना इंग्लिश वाक्याच्या मध्ये मध्ये खूप वापरतो. कधी कधी बोलण्याच्या ओघात ऍक्चुली वाक्याच्या शेवटी पण घालतो.

मदनबाण's picture

4 Jan 2020 - 6:21 pm | मदनबाण

हल्ली "बेसिकली" हा शब्द उच्चारल्या शिवाय संभाषण सुरु करणे कठीण जात असावे असे माझे निरिक्षण आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyar

वगिश's picture

5 Jan 2020 - 12:40 pm | वगिश

Actually मी बर्‍याचदा basically वापरत नाही. Actually you know माझ इंग्लिश स्टार्ट पासूनच चांगल आहे.

Rajesh188's picture

5 Jan 2020 - 12:06 pm | Rajesh188

Remove printout

गामा पैलवान's picture

5 Jan 2020 - 10:23 pm | गामा पैलवान

चामुंडराय,

अगदी समर्पक निरीक्षणं आहेत तुमची.

मला खटकणारा सर्वात अश्लाघ्य प्रकार म्हणजे विधानाचं प्रश्नांकन ( = क्वेश्चन टॅग ) करतांना न, ना नी वगैरे शब्द वापरणे. उदा. : The taxi is coming, na?

याचा योग्य वापर The taxi is coming, isn't it? असा आहे. पण भारतीय इंग्लिशमध्ये न, ना, नी, नो वगैरे बाराखडी चिकटवली जाते.

आ.न.,
-गा.पै.

तुर्रमखान's picture

19 Jan 2020 - 12:10 am | तुर्रमखान

किंवा, 'राईट?' असं जोडून देतात. टॅक्सी इज कमींग, राईट.

पहाटवारा's picture

6 Jan 2020 - 1:38 am | पहाटवारा

सौदिन्डीयन भारतियांचे अजुन खास इन्ग्रजी प्रकार असतात..तेलुगु असेल तर, coming for lunch ra ..तेच तमिळ वाला म्हणेल..coming for lunch da ?

यावरुन पीडां-काकांचा जुना लेख आठ्वला..भारतिय ब्रिटीश पद्धतिचं इन्ग्रजीच्या डीकिचे अमेरिकेत गेल्यावर काय होते..:)

असेच अजुन एक .. I belong to Mumbai !!

महासंग्राम's picture

18 Jan 2020 - 3:27 pm | महासंग्राम

लिंक असल्यास डकवा

महासंग्राम's picture

18 Jan 2020 - 3:30 pm | महासंग्राम

परवा एका ग्रुपमध्ये अमेरिकन इंग्रजी हेच खरं इंग्रजी आहे म्हणून

http://www.bbc.com/culture/story/20180207-how-americans-preserved-britis...

बापू मामा's picture

18 Jan 2020 - 5:01 pm | बापू मामा

मिसळपाव हा शब्द तरी "मराठी" वाटतोय.

माझ्या अल्प माहिती प्रमाणे पाव हा शब्द पोर्तुगीज आहे.
जाणकार "पाव"ले तर नक्की काय ते कळेल.

सुनील's picture

23 Jan 2020 - 9:58 am | सुनील

मूळ लॅटिन शब्द Panem. त्यावरून पोर्तुगिज भाषेत पाव.

अवांतर - इंग्रजी Companion ह्या शब्दाची फोड, ज्यांनी एकत्रितपणे (पाव) भाकतुकडा मोडला असे, अर्थात मित्र अशी होते.

बॉलिवूड कॉलिंग या अतीव सुंदर चित्रपटातल्या (दिग्दर्शक: नागेश कुक्कनूर) .. ओम पुरी उर्फ फिल्म डायरेक्टर "सुब्रा" याची इंग्रजी भाषा हा एक अभ्यसनीय नमुना म्हणून पहावा या धाग्यासंदर्भात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2020 - 3:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

चामुंडराय's picture

19 Jan 2020 - 11:33 pm | चामुंडराय

धन्यवाद.

-चामुंडराय

लेख आवडला. आपल्या देशात अनेकजण type आणि kind मधे घोळ घालताना दिसतात. वर कुमार सरांनी Anyways बद्दल लिहिलंय तसे एकवचन-अनेकवचनाचे नियम खुंटीला टांगून type ऐवजी सर्व ठिकाणी बेधडक types असा उच्चार करण्याची fashion हल्ली बोकाळली आहे :-)

विजुभाऊ's picture

22 Jan 2020 - 11:01 am | विजुभाऊ

उत्तर भारतीयांच्या ड आणि र च्या गोंधळामुळे इंग्रजी स्पेलिंग ही एक महा कर्मकठीण होऊन बसलेली आहे.
पाचगणीला अंजुमन शाळेत गेलो होतो तेथे हेडमास्तरांच्या ऑफिस वर BURA Sir असे लिहीलेले पाहिल्यवर फीट यायची बाकी होती
बुरा सर असा उच्चार करताना ते असे का लिहिलेय हे कळत नव्हते. नंतर समजले की ते बडा सर असे होते.
तीच गत गावांच्या नावाची घोरपडी चे स्पेलिंग त्यात कुठेही र हे अक्षर नसताना GHORAPURI असे का केले आहे कोण जाणे.
प्रतापगड चे स्पेलिंग हे लोक PRAAPGARH असे करतात.
दक्षीणेतील ळ चे स्पेलिंग तर फारच भन्नाट करतात.
हिंदी भाषिकांचे उच्चर हे पण विनोदी असतात
पदुकोण चा उच्चार पादुकोन करतात
तसेच नरवणे चा उच्चर सरसकट नरावणे असा करतात.
आठवले चे अठावले

चौकस२१२'s picture

27 Jan 2020 - 1:06 pm | चौकस२१२

भारतीय इंग्रजी बद्दल नाही पण सिंग्लिश ( सिंगापोर चे इंग्लिश बद्दल थोडे ) सिंगापोर हे खऱ्याअर्थाने जागतिक शहर असले तरी तिथे मलाया तील ब्रिटिश राजवटी मुळे आणि उत्तम शिकलेल्या त्यांच्या राज्यकर्ण्यांच्या भाषेमुळे असा एक गोड ( गैर) समज आहे कि तिथे सर्वांना छान इंग्रजी येते ... प्रत्यक्षात तसे नाहीये...खास करून चिनी भाषेतील व्याकरणामुळे म्हणा किंवा वाक्याच्या मांडणी मूळे म्हणा काही गोष्टी फार उद्धट वाटतात ... मुळात हेतू तो नसावा पण तसा वाटतो खरं उदा: I DO NOT HAVE असे ना म्हणता जलदगतीने समोरचाच माणूस जेव्हा म्हणतो DON;T HAVE , किंवा कॅन आणि कान्ट यातील फरक समजायला वेळ लागतो ( येवढ्य वेळेला तिथे जाऊन सुद्धा) असो .. भा=रतिया इंग्रजीत जसे ना ( गुड ना ) तसे सिंगापुरात ला "गुड ला "

चौकस२१२'s picture

27 Jan 2020 - 1:22 pm | चौकस२१२

हिंदी भाषेचा अभ्यास असणाऱ्यांना एक प्रश्न
बरेचदा हिंदी भाषिक जेव्हा स्कुटर किंवा स्कूल या इंग्रजी सभादांचा उच्चार करिताना ते "इ स्कुटर " "इस्कूल " असा उच्चार करतात असे का वाटते?
तामिळ किंवा अन्य दाक्षिण्य भाषेचा अभ्यास असलेल्यांना एक प्रश्न
बरेचदा अगदी ( विनोद सांगताना सुद्धा) काही दाक्षिण्यात भाषिक वाक्याचा शेवटी एक "सम्च असा काहीसा आवाज का काढतात जणू काही म्हणत आहेत कि "तुम्हाला समजल का मी काय म्हणतो ते?
आत मराठी भाषिकांना हा प्रश्न आपण बरेचदा ५ या इंग्रजी आकड्याचा फाईव्ह असा पसरट उच्चार का करितो?

चामुंडराय's picture

28 Jan 2020 - 7:39 am | चामुंडराय

सगळ्यात गमतीशीर म्हणजे :
आय डोन्ट नो नथिंग
किंवा
कूड यु प्लिज ब्रिन्ग मी टू द बस स्टॉप / मॉल ईटीसी...

आणखी एक :

हाऊ आर यू ?
या प्रश्नाला
"आय एम गुड" हे उत्तर

माझ्या एका सहकाऱ्याने जेव्हा मला विचारलं "आर यू टी?" आणि याचा अर्थ "मला चहा हवा आहे का?" असा आहे तेव्हा मी चक्कर येऊन खाली पडायच्या बेतात होतो. :)))