भाग 7 - लढा पावनखिंडीतला - पुढारीत अप्रकाशित लेख

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
26 Dec 2019 - 12:25 am
गाभा: 

पन्हाळगडावर चार महिने तळ ठोकूनही अपयशी आणि चार तासात अवघड जागेतील गडावर प्रवेश मिळवणारा दोघेही लष्करी अधिकारी. पण साहस, समयसूचकता, चातुर्य आदि गुणातील तफावत विपरीत परिणाम घडवते...
भाग 7
महाराज विशाळगडाकडे निघाले खरे परंतु तिथे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन रंगोजी मोरे या विशाळगडावरील गडकऱ्याशी संपर्ककरून त्याला विश्वासात घेऊन गडाचे दरवाजे उघडायसाठी खटपट करायला हवी होती. गडावर सहजासहजी जाण्याला आडकाठी करायला सिद्दीने कोकणातील त्यांच्या बाजूने लढणाऱ्या काही सरदारांच्या सैन्याच्या तुकड्या प्रभानवल्लीच्या रस्त्याने आणून तैनात केल्या असल्याची माहिती महाराजांना होती. पण सैन्यबल किती, कुठे तळ देऊन बसले आहे? त्यांना चकवून गडावर जायची शक्यता नसेल तर कुठे चकमक करायला भाग पाडायचे? वगैरे आडाखे त्यांनी मनात बांधले.

महाराज कासारी नदीचे पात्र जिथे चिंचोळे होते तिथून पैलतीर पार करायला बुट्टीडोलीचा वापर तरंगती नाव असा करून भर पात्रात उतरले. त्यांच्या साहसी कृत्यापासून प्रेरणा घेत अन्य संरक्षकदल पोहत तर काही बुट्टीडोल्यातून सामानासकट गजापुरच्या पैलतीरावर गेले.

गजापुरचे पठार पारकरून महाराजांच्या टेहळणी पथकाने पहाणी केली. गडासमोरील मोक्याच्या जागी तंबू पाहून सिद्दीकडून लढणाऱ्या मराठा सरदार सुर्वे आणि दळवीच्या तळ ठोकून बसलेले सैन्य किमान दोनशे असावे असा कयास बांधला. महाराजांनी प्रसंगावधान राखून मार्ग काढला. सुर्वे-दळवीच्या सैन्याला अंगावर घेऊन विशाळगडाच्या मुख्य दरवाज्यापाशी जायला फार वेळ घालवायला लागेल त्यापेक्षा खाली उतरलेल्या ढगांचा आडोसा, गर्द झाडीतून, दरीत उतरून एकदम विशाळगडाच्या पायथ्यापाशी एकत्र येऊन ह्ल्लाबोल केला तर गडावरील टेहेळण्या करणाऱ्यांना पायथ्याखाली हातघाईची चाहूल लागेल. सुर्वेच्या सैन्याला आपण अचानक गडाच्या पायथ्यापाशी पाहून त्यांची धावपळ उडेल. हत्यारांची तयारीकरून दरीत उतरूनवर चढून यायला वेळ लागेल. अशा बेसावध गोंधळलेल्या सैन्याला वाटेत मारायला सोईचे जाईल. शिवाय कर्णे, शिंगानी पुकारा करून गडाचा दरवाजा पटकन उघडायला शक्यता निर्माण होईल.

गडकरी रंगोजी मोरेचे गडावरील चौक्यावरून गस्त घालणारे विशाळगडावरील तटबंदीवरून दिसणाऱ्या पावसातील विहंगम आसमंतात सगळे शांत आहे खबर देत होते.
महाराजांनी आपल्या संरक्षक तुकडीला सोडून बाकी सैन्याला आदेश दिले की आता खोरनिंको नदीच्या खोऱ्यातील समोरची खाईत उतरायचे. गर्द हिरव्या झाडीतून सर्वांनी खाली उतरून नदी पार करायची. आपल्या कंपनीतील एका स्क्वाडने गडाच्या एका टोकावरच्या (सध्याच्या काळातील हनुमान मंदिराच्या बाजूच्या) दरवाजाला ठोठावून उघडायला प्रयत्न करायचा. उघडला तर ठीक नाहीतर झाडीतून लपत तटाच्या लगत राहून आमच्या येण्याची वाट पहायची. बाकीच्यांनी वेगवेगळ्या वाटांनी तटालगत चढत गडाच्या मुख्य दरवाज्यापाशीच्या भागात लपून राहायचे. नंतर आपण एकदम दरवाज्याकडे पळत सुटायचे. तेंव्हा सुर्वे-दळवीच्या सैन्याला वाटेत अडवून मारकाट करायची.
विशाळगडासमोर सिद्दीच्या सैनिकांचा मोर्चा पाहून महाराजांचे सैनिक खोर्निनको घळीतून खाली उतरून विशाळगडावरील गडकऱ्याला दरवाजा उघडायला लावायचा प्रयत्न करत राहिले. पण पावसाची झोड आणि नेमके कोण मदत मागत आहे याचा संभ्रम वाटून गडकऱ्यांकडून कोणी काही कारवाई केली नाही.

वारुळातून एकदम मुंग्या चवताळून बाहेर पडाव्यात असे महाराजांचे मावळे हर हर महादेव अशी रणगर्जना करत विशाळगडाच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य दरवाज्याशी जायला भिडले.
इतका वेळ बेसावध असलेले सरदार सुर्वे आणि सरदार दळवी पावसातील झडणाऱ्या पाण्याकडे पहात टिवल्या बावल्या करत होते. ते दरीच्या पलिकडून एकाएकी काय गळाठा आहे ते पाहायला धावले.

दोन समोरासमोरच्या डोंगरमाथ्यामधील दरीची कल्पना यावरून यावी.
सरदार सुर्वेला आपल्याला का इथे तैनात केले आहे याची पक्की जाणीव होती. त्याने सावध होत आपल्या सैनिकांना ओरडून म्हटले, ‘कदाचित शिवाजी सैनिकासह विशाळगडावर लपायला जायची शक्यता आहे. वर चढणाऱ्यांवर बाण फेकून टिपून मारा. मी आणि दळवी आमच्या खास दस्त्यासह खालून वर चढत जाऊन रस्ता आडवतो. कुठल्याही परिस्थिती वरच्या गडकऱ्याने त्यांच्यासाठी दरवाजा उघडता कामा नये’.
नव्या पुलाने जोडलेल्या दरीचे दृष्य – पूल नसताना सुर्वे-दळवीच्या सैनिकांना कसे दरीत उतरून पुन्हावर चढून यावे लागले.

सुर्वे आपल्या सैनिकांसह पोचला तेंव्हा त्याची गाठ नेमकी महाराजांच्या खास पथकाच्या समोर पडली. “अरे हा तर शृंगारपुरचा सूर्याजी सुरवे! त्याच्या बरोबर तो दळवी ... मारा रे या हरामखोरांना”, आपलीच माणसे आपल्याशी लढायला तलवारी घेऊन येतात तेंव्हा दया दाखवून उपयोग नसतो.

महाराजांचे ते भडकलेले रुप पाहून आपले मरण समोर उभे आहे हे ओळखून वेळीच सावध होत सुर्व्याने दळवीला इशारा केला. आणि ते दोघे परत पावली छावणीकडे परतले.
महाराज तातडीने मुख्य दरवाज्याच्या पायऱ्या चढत जात होते. हलकाऱ्यांच्या आरोळ्या व माजलेला गहजब वरून पाहून गडकरी रंगाने मुख्य दरवाज्याचे छोटे दार उघडून कोण आहे याची खात्री करायला आज्ञा केली. दरवाज्याबाहेर खुद्द महाराज आहेत असे कळल्यावर मुख्य दरवाजा पूर्ण उघडला गेला. महाराज आत आले.
‘गडकऱ्यांना बोलवा. सगळ्या तोफांना तयार करा. दारूच्या गोळ्यांचा बंदोबस्त करा. चूड पेटवून आग तयार ठेवा’. महाराजांच्या आज्ञा सुटल्या.
त्या प्रमाणे गडकरी तातडीने कामाला लागले. पावसात भिजत असलेल्या तोफांना कोरड्या कापडाने पुसायला सुरवात झाली. दारूगोळे पडशातून आणून तोफेच्या मोठ्या तोंडाकडून भरून ठासून द्यायला लाकडी ठासण्या आणल्या गेल्या. पावसाची सर थांबली तशी तोफची वात तोफेच्या भोकात घालून दारु भरायला ठासणीने ठोके द्यायला तोफची कामाला लागले.
आधीच भिजलेल्या तोफा, सरदलेले दारूचे गोळे, इरल्याच्या आडोशात बत्ती द्यायला पावसाचे शिंतोडे न पडायची दक्षता घेऊन देखील बत्तीची वात आग पकडत नव्हती. महाराज बेचैन होत ती तयारी पहात होते.
तोफांचे बार व्हायला लागणारी दिरंगाई पाहून महाराजांनी आज्ञा केली, ‘शेण्या पेटवा. गडाच्या टोकाकडे जाऊन तिथे पांढरा धूर करत रहा. निदान इशारा मिळत राहील’.... रंगा मोरेने ताबडतोब शेण्या, तेलाचे बोळे व चकमकीचे दगड देऊन पिटाळले.
गडावरच्या तोफांच्या वातींनी आग पकडलेली पाहून तोफची व आसपासचे मावळे पळून जाऊन कानात बोळे घालून पार लांब जाऊन उभे राहिले. आता केंव्हा ही धडाका होईल. पण काही ना काही कारणाने तोफा धडाडेनात. तेवढ्यात एका तोफेतून घडाम असा प्रचंड आवाज करत विशाळगडाचा आसमंत दणाणला. ती तोफ थंड होई पर्यंत दुसरीच्या वातीने पेट घेतला तिचा आवाज आधीच्या आवाजानंतर जास्त वेळ आसमंतात दुमदुमत राहिला. पुर्ण गजापुरचे खोरे प्रतिध्वनींच्या आवाजाच्या दणक्याने दचकून सैरभैर झाले. तोफां अधून मधून वाजतच राहिल्या. तिकडे आसुसलेल्या कानांवर त्या आदळल्या.

बाजी प्रभू देशपांडेंच्या आत्मसमर्पणाचे काल्पनिक चित्र

उरलेसुरले बाजींचे सैनिक शस्त्रे टाकून खिंडीच्या बाहेर सिद्दीच्या समोर आले. सिवा तिथे नव्हता. तोफांचे आवाज विशाळगडावरून आलेले सिद्दी मसूदने पण ऐकले होते. याचा अर्थ त्याला समजून गेला की सुर्वे- दळवींना लोळवून सिवा गडावर पोचला...
आपल्या घोडदळाला आज्ञा देत तो स्वतः विशाळगडाकडे कूच करून पोहोचला. खाली मान घातलेले दोन्ही सरदार म्हणाले, ‘आम्हा काही माहित नाही की सिवा पन्हाळ्हून पळाला ते. इथे एकदम २-३ शे मावळे समोरच्या दरीतून चढून वर आले आणि एकदम तटाच्या दरवाज्याला भिडले. आम्ही दोघांनी त्यांना कसेबसे पाठलाग करून मारायला शर्थ केली. माझी आणि सिवाची समोरासमोर तलवारीने खटाखटी झाली’. पण मी घाबरून तिथून पळालो हे वगळून तो पुढे म्हणाला, ‘मी सिवाला वर चढून जाताना पाहिले. मघाशी त्यांनी तोफेचे बार काढून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला’.
‘मुर्खांनो, तो तुम्हाला घाबरवायला नव्हे त्या कासारी खिंडीत लपलेल्या त्याच्या सैन्याला आम्ही गडावर पोचल्याची ती खूण होती…’ सिद्दीचे डोके भडकले होते.
‘पण तुमच्या तावडीतून तो सुटला कसा’? सुर्व्याने चकीत होऊन विचारले. ‘ते असू दे’... आपल्या बरोबरच्या सैन्याला विशाळगडाला गराडा घालायला आदेश देऊन तो खालच्या मानेने पन्हाळगडाकडे परतला...
महाराज इंग्रजांची दगाबाजी आणि सुर्वे-दळवीच्या हरामखोरीची आठवण ठेऊन होते. पुढच्या काही महिन्यात राजापूरची इंग्रजांची वखार जाळून राख झाली. हेनरी रेव्हिग्टनचा आगाऊपणा त्यांना भोवला. सुर्वे- दळवींची पळापळ होऊन परागंदा व्हायला लागले... अशी ही पावनखिंडीच्या लढ्याची सांगता... वाटाड्यांच्या मदतीची आणि फसगतीची...
============================================================

सध्याच्या विशाळगडाचे रूप...

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

26 Dec 2019 - 12:50 am | श्रीरंग_जोशी

भौगोलिक संशोधनाची जोड मिळाल्याने सदर ऐतिहासिक वर्णन अतिशय परिणामकारक वाटत आहे.

जॉनविक्क's picture

26 Dec 2019 - 3:05 am | जॉनविक्क

इतिहासात भुगोल दडला आहे. भूगोलात इतिहास....

मुक्त विहारि's picture

26 Dec 2019 - 4:52 am | मुक्त विहारि

अर्थात, इतिहासातून आपण काहीच शिकत नाही.

हिंदूच हिंदूंचा घात करतात.

जॉनविक्क's picture

26 Dec 2019 - 6:16 am | जॉनविक्क

यापुढे काही शिकावे म्हणून की शिकणार नाही हे समजावे म्हणून ?(समजून काय करणार जर शिकणारच नसू तर ?) तसेही सर्व धर्मीय एकमेकांचा घात करत असतात तो मानवी स्वभावच आहे, इंग्रजच काय ते तुलनेत दूरदृष्टीचे म्हणता येतील

अवांतर:- PROBLEं CAA मधे नाही NRC मधील काही गोष्टी ज्या सामान्यांना स्पष्ट होण्यासाठी जर अपुरे प्रयत्न आहेत त्यामध्ये आहे उठसुठ धर्मावर जाऊन काय फायदा. असेल ज्ञान तर त्या अनुषंगाने इतरांचा गोंधळ दूर करणे दूरच राहीले उथळ माथापट्टीच फार प्यारी काही लोकांना... यातून गांभीर्य बिघडते हे नक्की आणी समाजमनही

शशिकांत ओक's picture

26 Dec 2019 - 10:57 am | शशिकांत ओक

मध्यंतरी आपल्याशी बोलणे झाल्यावर या भागाच्या सादरीकरणाला गती मिळाली.
त्याआधी विशाळगडावरील धाग्यातील वाचकांच्या प्रतिक्रियेतून त्या गडाच्या बाबत जागरुकता निर्माण झाली. हे ही नसे थोडके...
प्रतिसाद आजकालच्या घटनांच्या बाबतीतील संदर्भात असूद्यात, त्यात डावपेचात्मक विश्लेषण केले तर आवडेल.
इतिहासातून शिकायचे असेल तर हे कि त्याच त्याच चुका करून ही आपण शहाणपण शिकत नसतो.

ही सोय आहे हे माहित असूनही आधी कधी वापरली नाही. आता वापरात आणली हेही नसे थोडके! असो

बबन ताम्बे's picture

27 Dec 2019 - 3:36 pm | बबन ताम्बे

आपण केलेल्या कष्टपूर्वक संशोधनाची जोड मिळाल्यामुळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा रहातो.
यावर टी व्ही मालिका छान होऊ शकेल असे वाटते. (भारत एक खोज टाइप).
आपले आभार!

शशिकांत ओक's picture

4 Jan 2020 - 11:51 am | शशिकांत ओक

मात्र ते करायला लागणारा खर्च, वेळ आणि त्यातून निर्माण करणार्‍यांना अपेक्षित अर्थप्राप्ती हे कळीचे मुद्दे ठरतात. आम्ही मिलिटरी कमांडरच्या परिषदेत याबाबत विचार करून सिनेमा, किंवा सिरीयल्स करताना पैसे खर्च करणार्‍यांच्या अटी व नखरे, यातून नस्ते मनस्ताप होतात हे इतरत्र दिसून येते म्हणून त्या वाटेने न जावे असे ठरले आहे.

दुर्गविहारी's picture

27 Dec 2019 - 6:59 pm | दुर्गविहारी

हा ही भाग अतिशय उत्कृष्ट आणि अभ्यासपुर्ण झाला आहे. सिंहगडाचा लढा असो किंवा ही पन्हाळा-विशाळगडाची मोहीम असो याच्या छोट्या पुस्तिका बनवून पन्हाळा, पावनखिंड, चिशाळगडापाशी विकायला ठेवायला हव्यात, निदान थोड्या लोकापर्यंत तरी हे अभ्यासपुर्ण लिखाण पोहचेल. शिवाय शाळाना या लेखमालेच्या पॉवर पॉईंट्च्या स्लाईड दिल्या तर मुलांच्या डोळ्यासमोर हे युध्द उभारायला मदत होइल.
बाकी धाग्यासंदर्भात एकच गोष्ट लिहू इच्छीतो कि हा समरप्रसंग जुलै म्हणजे आषाढ महिन्यात झाला आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे, कारण या काळात पुर्ण विशाळगड ढगांच्या दुलईत लपेटलेला असतो. जिथे एस.टी,चा थांबा आहे, तिथूनही गड दिसत नाही. याचा अर्थ सुर्वे- दळवी यांच्या सैन्यापासून लपून निदान काही मावळे गडाच्या माथ्यापर्यंत यशस्वीरित्या जाउ शकले असतील. पुढे कदाचित गडावरून तोफांचा मारा अचानक आलेले शिवाजी महाराजांचे सैन्य या दुतर्फा झालेल्या हल्ल्याने सुर्वे-दळवी यांचे सैन्य गोंधळले असावे. याचाच फायदा घेउन शिवाजी महाराज सहज विशाळगडावर पोहचले असावेत.

शशिकांत ओक's picture

27 Dec 2019 - 10:01 pm | शशिकांत ओक

कदाचित गडावरून तोफांचा मारा अचानक आलेले शिवाजी महाराजांचे सैन्य या दुतर्फा झालेल्या हल्ल्याने सुर्वे-दळवी यांचे सैन्य गोंधळले असावे.

गडावरील सुरक्षा पहाता खालील भागातील चाललेल्या हातघाईत प्रत्यक्ष महाराज सैन्यासह आहेत असे समजायची शक्यता कमी आहे. शिवाय तोफांना तयार करायला लागणारा वेळ आणि पावसाळ्यात सरदलेले दारूगोळे कितपत प्रभाव पाडू शकतात प्रश्न आहे.
तरीही आपण केलेल्या विश्लेषणाने हुरूप आला.

दुर्गविहारी's picture

3 Jan 2020 - 6:17 pm | दुर्गविहारी

या लेखमालेत चर्चा झाल्याप्रमाणे जेव्हा महाराजांनी पन्हाळगडावरुन सुटकेची योजना केली तेव्हा आधी या वाटेवरुन आणि विशाळगड परिसरात गुप्तहेरामार्फत किमान दोनवेळा पहाणी केली असण्याची शक्यता आहे. कारण तोपर्यंत अगदी तोरणा गड ताब्यात घेणे असो, कृष्णाजी बांदल यांच्याबरोबर रोहिड्यावरची लढाई असो, फत्तेखानाबरोबर पुरंदरच्या उतारावर झालेले युध्द असो किंवा लष्करीदृष्ट्या जगातील सर्वोत्तम लढायापैकी एक असलेले "प्रतापगडाचे युध्द" असो, या सर्व मोहीमात सर्वात महत्वाची भिस्त कशावर असेल तर गुप्तहेरानी आणलेल्या बातम्यांमधे. कारण एक चुक आणि सर्व खेळ खल्लास अशी या सर्व ठिकाणी परिस्थिती होती. यासाठी पुढे महाराजांनी दोन हेराना देहदंड दिल्याची घटना बाबासाहेब पुरंदरेंकडून एकण्यात आली होती , कारण त्या हेरानी चुकीच्या बातम्या आणल्या होत्या.
याचा सरळ अर्थ असा, कि पुर्ण जिवावरची जोखीम असणार्‍या या लढाईत महाराज मार्गाचा, त्यातील वेळ लागण्याचा , संभाव्य धोक्याचा आणि पर्यायी मार्गाचा अभ्यास केल्याशिवाय निर्णायक मोहीम आखणार नाहीत. जेव्हा हेर विशाळगड परिसरात पहाणी करण्यासाठी आलेले असताना, त्याना विशाळगडाला दळवी, सुर्वे यानी वेढा दिला आहे, याची बातमी काढली असणार. शिवाय कदाचीत हे हेर ओळख पटवून विशाळगडार जाउन गडकर्‍याला भेटून, निदान फक्त किल्लेदाराला या मोहीमेची कल्पना देउन आले असतील. ( अर्थात हि फक्त माझ्या मते असलेली शक्यता ) कारण अगदीच गरज पडली तर गडावरुन कुमक मागवता यावी, शिवाय शत्रुसैन्याचा वेढा असताना, महाराज गडावर पोहचले कि ओळख पटवण्यात फार वेळ न घालवता, पटकन गडात प्रवेश मिळावा ( लक्षात घ्या, इथे क्षणा-क्षणाला महत्व आहे) यासाठी विशाळगडाच्या फक्त किल्लेदाराला हेरानी कल्पना दिली असावी असा माझा अंदाज. हि माहिती असल्यानेच बहुधा पावनखिंड परिसरात महाराजाना सैन्याच्या दोन तुकड्या कराव्या लागल्या, जास्त सैन्य बाजीप्रभुंसोबत ठेवता आले नाही, कारण पुढे विशाळगडाच्या पायथ्याशी लढाई करायची आहे, याची महाराजांना माहिती होती.

गडावरील सुरक्षा पहाता खालील भागातील चाललेल्या हातघाईत प्रत्यक्ष महाराज सैन्यासह आहेत असे समजायची शक्यता कमी आहे.

आदिलशाहीचा मुख्य शत्रु शिवाजी महाराज असताना आणि त्यांच्याच एका गडाला वेढा घातलेला असताना शिवाय जवळच असलेल्या पन्हाळ्यावर शिवाजी महाराज कैदेत असताना, आलेले सैन्य शिवाजी महाराजांचेच असणार, हि साधी गोष्ट होती. दुसरे कोणी , अगदी नेतोजी पालकरसुध्दा विशाळगडावर येण्याच्या परिस्थितीत नव्हते.

शिवाय तोफांना तयार करायला लागणारा वेळ आणि पावसाळ्यात सरदलेले दारूगोळे कितपत प्रभाव पाडू शकतात प्रश्न आहे.

जर मी लिहीलेली हेरांची विशाळगडाच्या गडकर्‍याशी झालेल्या भेटीची शक्यता खरी धरली तर कदाचित विशाळगडावरची शिंबदी सावध असणार आणि समोर शत्रुसैन्य असताना तोफा आणि दारुगोळे ओले असतील, इतका हलगर्जीपणा कोणी करेल असे वाटत नाही. याबाबत रामचंद्रपंत आमात्य यानी लिहीलेले "आज्ञापत्र" वाचण्यासारखे आहे, ज्यात गडावर कोणती काळजी घेतली जात असे, ते सविस्तर लिहीले आहे.

सिद्दीचे सैनिक फुद्दू आणि बावळट होते?
एकांनी ग्रुपवर म्हटले की आपल्या लिखाणावरून सिद्दीकडून लढणारे सैनिक डरपोक ( त्यांनी वापरलेला शब्द) होते असा ग्रह होतो. त्यामुळे मग अशांशी चार हात करणाऱ्या महाराजांच्या शौर्याला थोडा कमीपणा येतो...
त्यांच्या या वक्तव्यावर आपले काय मत पडते हे समजून घ्यायला आवडेल...
मग मी माझे म्हणणे मांडेन...

अत्यंत चुक ! प्रतिपक्ष पराक्रमी नव्हता असे म्हणून आपण महाराजांच्या युध्दकौशक्यावर प्रश्नचिन्ह लावतो आहे, हे संबधितानी ध्यानात घ्यावे.
आपला पहिलवान केव्हा श्रेष्ट ? तर त्याने कोणाला हरवले आहे, यावर ठरते.
सिध्दी जोहर नुसताच पराक्रमी नव्हता तर डोकेबाज होता. त्याने पन्हाळगडाला वेढा घालताना परिसरातील पाउस ध्यानात घेतला आणि झापांची व्यवस्था करुन पावसात वेढा ढील्ला पडणार नाही, असे बघितले. राजापुरच्या ईंन्ग्राजाना बोलावून लांब पल्ल्यांच्या तोफांचा मारा पन्हाळगडवर केला, वेढ्याच्या वेळी पन्हाळ्याशेजारी पावनगड उभारलेला नव्ह्ता, त्याचा फायदा घेउन सिध्दी जोहरने ती टेकडी ताब्यात घेउन पन्हाळ्यावर त्यामार्गे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, शिवाय विशाळगडावर मोर्चे बसवून तिकडून महाराजांना मदत होणार नाही याची व्यवस्था केली.
जी व्यक्ती ईतका व्यवस्थित युध्द्दाचा व्युह आखते, ती बिनडोक कशी असेल ? युध्द हे शस्त्राने कमी आणि मेंदुने जास्त जिंकले जाते. तेव्हा सिध्दीकडून लढणारे सैनिक डरपोक होते यात तथ्य नाही. जर ते डरपोक असतील तर एन आषाढाच्या पावसात रात्री सर्वस्वी अनोळखी प्रदेशात शिवाजी महाराजांसारख्या प्रबळ शत्रुच्या मागावर निघालेच नसते. या परिसरात एन पावसाळ्यात गेल्यास किती दुर्गम परिस्थिती असेल ते कळते.

शशिकांत ओक's picture

8 Jan 2020 - 1:48 pm | शशिकांत ओक

जी व्यक्ती ईतका व्यवस्थित युध्द्दाचा व्युह आखते, ती बिनडोक कशी असेल ? युध्द हे शस्त्राने कमी आणि मेंदुने जास्त जिंकले जाते. तेव्हा सिध्दीकडून लढणारे सैनिक डरपोक होते यात तथ्य नाही. जर ते डरपोक असतील तर एन आषाढाच्या पावसात रात्री सर्वस्वी अनोळखी प्रदेशात शिवाजी महाराजांसारख्या प्रबळ शत्रुच्या मागावर निघालेच नसते.

समर्पक उत्तर....

सिद्दी काय किंवा अन्य महाराजांचे शत्रू हे कसलेले योद्धा होते. म्हणूनच त्यांची राज्ये शेकडो वर्षे टिकली व बहरली. पण त्यांच्या सैन्याच्या चाली पठडीतील होत असत. भरपूर सैन्य नेताना आणताना त्यांना अत्यंत कष्ट पडत. गती मंद असे. त्या मानाने महाराजांच्या मोहिमा कमी सैन्याच्या पण वेगवान आणि कल्पक असत. त्यामुळे यानंतर काय खेळी केली जाईल याचा अंदाज बांधणे अवघड होते. त्यामुळेच पेडगावचा शहाणा ठरलेला बहदुरखान, आग्र्यात औरंगजेब काय, अफजल खान काय, शाहिस्तेखान काय यांना महाराजांच्या सेनेकडून तडाखे बसत राहिले. महाराजां नंतर बाजीरावांनी असेच कल्पक युद्धतंत्र अमलात आणले म्हणून त्यांच्या यशाची टक्केवारी फारच उच्च राहिली.

उंबरखिंडीतून जाऊन शिवाजीला धक्का तंत्राने गाठायचा बेत, अफजलखानाचा वाटेतील मंदिरांना त्रास देऊन शिवाजी मैदानी भागात सैन्यानिशी उतरेल, दाऊदखानाने वणीच्या नंतर उतारावर पुन्हा गाठून केलेल्या झडपा, रामशेजला दमदमा बांधणी वगैर कल्पकता शत्रूंनी दाखवली. पण त्यावर मात करायची चाल दरवेळी खेळली गेली म्हणून त्यांच्या चाली फिक्या पडलेल्या दिसतात
.
पत्यांच्या ब्रिज खेळात अनेक टेबलवर तीच पाने मिळतील अशी योजना करून एकाच वेळी वेगवेगळ्या जोड्यांनी बोल्या करून ठरवलेली बोली खरीकरून जिंकायच्या स्पर्धा असतात. त्यात अदभूत चाली रचून ते डाव पुर्ण केले जातात. त्यावेळी प्रतिस्पर्धी तितकेच कसलेले असतात. ते फुट्टू नसूनही डाव जिंकले जातात. तसेच काहीसे असावे.