भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४
.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
३० सप्टेंबर २०१८
अलेक्झांड्रिया टूर चा ड्रायव्हर आम्हाला खान-अल-खलिलीच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून गेला आणि आम्ही ट्रीपमधील 'शॉपिंग' या माझ्या लाडक्या कामाला सुरवात केली. खान-अल-खलिली हा इजिप्ती सूक अर्थात बाजार. स्थानिक आणि पर्यटक दोन्हींनी कायम भरलेला असतो. छोट्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून कपडे, झुंबरं, काचसामान, दागिने आणि सुविनीअर्स यांची असंख्य दुकाने. भाव करता येत असेल आणि घासाघीस करायचा कंटाळा नसेल तर इथे खरेदीला फार मजा येते. संध्याकाळी फेरफटका मारल्यास असंख्य लखलखते, रंगीत दिवे तुम्हाला अरेबियन नाईट्स मध्ये घेऊन जातात. इजिप्ती कॉटन हा पण एक फार प्रचलित प्रकार. पण कापडातील जाणकार असाल तरच त्या वाटेने जायचे, कारण इजिप्ती कॉटनच्या नावाखाली चीन वरून बनवून आणलेले स्वस्त कापड गळ्यात मारले जाईल. जो प्रकार कापडाचा तोच दागिन्यांच्या पेटीचा. अगदी मोत्यांच्या शिंपल्यांच्या आतील भागापासून ते साधे शिंपले वापरून आणि अगदी स्वस्त प्लास्टिक वापरून सुद्धा यातील कलाकुसर केली जाते. त्यामुळे किंमत सुद्धा तशीच बदलते. मसाल्यांचे पदार्थ, अत्तरं, स्त्री पुरुषांचे अरेबिक कपडे, हुक्का आदी आकर्षकरित्या रचून ठेवलेले असतात. तुमची नजर आणि पर्यायाने तुम्हीही त्याकडे ओढले जाणार हे नक्की.
दागिन्यांच्या पेट्या
वरील फोटो जालावरुन साभार
खान-अल-खलिलीच्या या गल्ली बोळात नवखा माणूस नक्कीच हरवेल. योगायोगाने आम्हाला फिरतांना भारतीय एम्बसी मधील एक कर्मचारी इथे भेटला. तो सुद्धा काही दिवसांसाठी मायदेशी यायला निघालेला. त्यामुळे बायकोने दिलेली सामानाची यादी खरेदी करत होता. तुम्ही कुठून, कधी आलात, कधी जाणार वगैरे फार आपुलकीने बोलला. जणू त्याची भारत सफर तिथूनच सुरु झाली असावी. त्याने त्याच्या खरेदीचा नेहमीचा अड्डा सांगितला. जातांना म्हणाला काही जरी लागलं तरी एम्बसी मध्ये यायचं. आपलीच माणसं आहेत तिथे.
तो आमचा निरोप घेऊन निघाला आणि आम्ही त्याने सांगितलेल्या दुकानात जायला निघालो. दोन गल्ल्या पलीकडे जाऊन माळावर आत ते दुकान होतं पण किंमत खरंच वाजवी. मित्राने आणायला सांगितलेले पिरॅमिड, मला आवडलेल्या दागिन्यांच्या पेट्या, काचेचा सुंदर दिवा, कॉफी मग, इत्यादी इत्यादी अशी; 'सामान जास्त वजनदार होणार नाही' या बोलीवर खरेदी पण केली. जेवढं घ्यावं तेवढं कमीच वाटतं अशा वेळी.
तो दुकानदार सुद्धा बोलका. त्याच्या व्यवसायासाठी बोलकं असावंच लागत.
आम्हाला म्हणाला, "पूर्वी इतके भारतीय पर्यटक इकडे येत नव्हते. युरोपियन जास्त असायचे. त्यामुळे मला फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश वगैरे येतात बऱ्यापैकी बोलता. पर्यटकांना त्यांच्या भाषेत थोडं बोललं कि छान वाटतं म्हणून. आता भारतीय पर्यटक पण यायला लागलेत. मला थोडं तुमच्या भाषेतील गोष्टी शिकवणार का?"
मी अगदी आनंदाने हो म्हणाले. तो वही पेन घेऊन आला.
१ ते १० आकडे एका बाजूला लिहिले; त्याच्या खाली हॅलो, वेलकम, ओन्ली, थँक यू, बाय हे शब्द लिहिले आणि म्हणाला याला हिंदी मध्ये काय म्हणतात ते इंग्लिश मध्ये लिही.
सगळं लिहून दिल्यावर त्याने आमच्या समोरच उजळणी केली.
आम्ही त्याच्या कडून देवनागरी मध्ये आकडे गिरवून घेतले.
४ आणि ६, २ आणि ५ मध्ये जाम गल्लत होत होती त्याची पण शेवटी जमलंच.
आम्हाला निरोप देतांना शुक्रन ऐवजी शुक्रिया म्हणाला, see you again ऐवजी फिर मिलेंगे म्हणाला.
छान वाटलं.
इजिप्त मधील एक फार वेगळा पण प्रचलित असा खाद्यपदार्थ म्हणजे हमाम माहशी, मसालेभात भरलेलं कबुतर (स्टफ्ड पिजन). आणि सर्वांत छान कबुतर मिळण्याचं ठिकाण खान-अल-खलिलीच्या अगदी जवळ. अशावेळी आम्ही तिथे जाणार नाही असं होणे नाही. मॅप वर दिशा पाहत आम्ही एकदाचे तिथे येऊन पोहोचलो. छोटंसं दुकान, समोर २ टेबलं मांडलेली. त्यावर सगळे स्थानिक लोक बसून जेवणाचा आनंद घेत होते. पार्सल घेणाऱ्यांची गर्दी अर्थातच जास्त होती. आम्ही पण रांगेत उभं राहून पार्सल घेतलं. पुन्हा मॅप लावून चालत हॉटेल वर पोहोचलो. रूम मध्ये एका बाजूला पार्सल ठेवलं आणि नवीन पदार्थ चाखायचा प्रयत्न फसला तर प्लॅन B म्हणून घरून आणलेले आणि फक्त २ शिल्लक राहिलेले बेसन लाडू आणि चिवडा पण काढून ठेवला. पार्सल उघडलं कबुतर आणि भाताचा वास छान येत होता. चव पण छान होती. थोडी चिकनच्या जवळ जाणारी पण तरीही वेगळी. आणि इंजेक्शन घेऊन कोंबड्याना गुबगुबीत केलं जातं ती गोष्ट इथे नव्हती त्यामुळे तेव्हढंच थोडक्यात मांस आणि भात. चिवडा-लाडवाकडे चक्क दुर्लक्ष करून हमाम माहशीवर ताव मारला.
हमाम माहशी
जेवण झाल्यावर सामानाची शेवटची बांधाबांध केली. दुपारी ३ वाजता आमचं परतीचं विमान होतं त्यामुळे ११ वाजता चेक आऊट करून निघणार होतो. उद्या थोडं उशिराच उठू असं ठरवलं.
१ ऑक्टोबर २०१८
इजिप्त प्रवासातील शेवटचा दिवस. 'छुट्टीया खतम, स्कुल शुरु' वाली फीलिंग. आवरून, सामान गोळा करून खाली रिसेप्शनला आलो. हॉटेल मालकाच्या बायको आणि आईने नाश्ता-चहा आणून दिला. त्यानंतर चेक आऊटची प्रक्रिया पूर्ण केली. उबर मागवली आणि ठरल्या प्रमाणे ११ ला विमानतळाकडे निघालो.
जातांना कैरो मधील पाहायच्या राहिलेल्या गोष्टींची यादी बनवत होतो. कॉप्टिक कैरो, इस्लामिक कैरो, अझर उद्यान, मेट्रोचा प्रवास....पण काही तरी राहून गेल्याशिवाय शहर आपल्याला परत बोलावणार कसं? कदाचित पुढल्या एखाद्या सहलीत कैरोला विमान बदलून जाऊ शकत असू तर या गोष्टी पूर्ण करण्यासाठी १ दिवसाचा ट्रांझिट घेऊ. किंवा कदाचित कामानिमित्त चक्कर मारता आली तर पाहू शकू किंवा अगदीच काही नाही तर सहजच एक चक्कर मारून जाऊ असे नानाविध प्लॅन बनवत आम्ही विमानतळावर येऊन पोहोचलो.
वेळे आधी विमानतळावर पोहोचायला मला आवडतं. सगळीकडे मस्त फिरून, २ वेळा ड्युटी फ्री मध्ये जाऊन पिशव्या भरून घेतल्यावर थोडा पोटोबा केला. कितीही विमानप्रवास केला तरी विमाने पाहायला आम्हाला फार आवडतं. त्यामुळे रन वे जवळील काचेच्या खिडकीशेजारी बसून वेगवेगळी विमाने न्याहाळली. विमान फलाटाला लागल्याची घोषणा होईपर्यंत किंडल वर शेरलॉक होम्सचं अ स्टडी इन स्कार्लेट निम्मं वाचून झालं होतं. विमान आलं आणि आम्ही आत जाऊन बसलो. तिकीट बुक करतांना एअरबस A ३८० असलेलं आमचं जम्बो जेट, कमी प्रवासी असल्याने बोईंग ७३७ ला बदलविण्यात आले होते. पटकन खिडकीची जागा मी पकडली. (हो आमच्यात आजही खिडकीच्या जागेसाठी पळापळी करावी लागते. आणि मी नेहमी त्याला गप्पांमध्ये गुंतवून खिडकी मिळवते 😉 😜 )
विमान आकाशात झेपावल्यावर थोड्याच वेळात सुवेझ कालव्याचा सुंदर नजारा दिसला आणि काही मिनिटांतच ढगांमुळे दिसेनासा पण झाला. सुवेझ दर्शनाने इजिप्त ट्रीप सफळ संपूर्ण झाली.
।। समाप्त ।।
ता. क.
१. ही प्रवासमाला लिहिण्यासाठी मला नॅशनल जिओग्राफी, विकिपीडिया, युनेस्को वगैरे open information websites ची मदत तर झालीच पण इतिहासाबद्दल जाणून घ्यायला Amazon Prime वरील The Story of Egypt या डॉक्युमेंटरीचा फायदा झाला. यातील सूत्रसंचालिकेची सांगण्याची पद्धत मला फार आवडली. त्यामुळे ज्यांना इतिहासाबद्दल खोलवर जाणून घ्यायचे असेल त्यांनी हि जरूर बघावी.
२. त्याच बरोबर मीना प्रभू यांच्या 'इजिप्तायन' या पुस्तकाचा वाटा या इजिप्त ट्रीप मध्ये सुरवाती पासून होताच. लिखाणातही त्यांची मदत झाली. त्याच बरोबर क्रॉसवर्ड मधील अनेक पुस्तके ज्यांची नावं न पाहता फक्त इजिप्त दिसल्याने बसून वाचली त्यांचाही वाटा यात आहेच.
३. प्रवासवर्णनाच्या सुरवातीला सांगितल्या प्रमाणे संजय उर्फ टर्मिनेटर याने सुद्धा व्हिसाची माहिती, इजिप्त मधील लोकांचे नंबर वगैरे देऊन तर मदत केलीच, पण एका धावत्या पुणे भेटी मध्ये त्याचं इजिप्त मधील सिमकार्ड सुद्धा देऊन गेला.
वरील सर्वांचे मनापासून आभार, माझ्या शाळेपासून असलेल्या या स्वप्न सहलीला साकारतांना मदत केल्याबद्दल.
आणि अखेरीस, या लेखमालेतील शेवटचे भाग फार वेळाने प्रकाशित होत गेले कारण ऐन दिवाळीत झालेली पुत्ररत्न प्राप्ती. तो झोपल्यावर मिळणाऱ्या वेळेत शेवटचे काही भाग लिहिले गेले आणि वाचकांनी ते तग धरून वाचले याबद्दल वाचकांचेही अनेक अनेक आभार.
_/\_
.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}
.container-p {
text-align: center;
}
प्रतिक्रिया
17 Dec 2019 - 3:18 pm | श्वेता२४
टर्मिनेटर यांची इजिप्तची लेखमाला खूप आवडली होती. पण तुमचीदेखील तितकीच आवडली व नावीन्यपूर्ण वाटली. कारण तुमची लेखनशैली, काही ठिकाणे व अर्थातच आलेले अनुभव यांमध्ये वेगळेपण होते. तुमच्या दोघांच्याही सविस्तर लिखाणामुळे व अप्रतिम फोटोंमुळे माझी इजिप्तवारी झाली असल्याने हा देश बकेटलिस्टमधून काढला गेलेला आहे. माझे लाखो रुपये वाचवल्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. ;)
17 Dec 2019 - 3:19 pm | श्वेता२४
पुत्रप्राप्तीबद्दल अभिनंदन.
17 Dec 2019 - 3:28 pm | कोमल
खुप आभार.
हा हा हा.
पण इजिप्त जाऊन अनुभवावा असा देश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बकेटलिस्टात अॅडवावा. ;) :)
17 Dec 2019 - 7:16 pm | मुक्त विहारि
प्रवासवर्णन आवडले...
18 Dec 2019 - 10:31 am | कोमल
धन्स मुविकाका
17 Dec 2019 - 9:21 pm | जालिम लोशन
हा भाग पटकन ऊरकला?
18 Dec 2019 - 10:35 am | कोमल
हो, फार काही नव्हते लिहिण्यासारखे.
खरं तर खान अल खलिली या बाजाराचा स्वतः चा एक इतिहास आहे, पण मी स्वतः इस्लामिक कैरो पाहू न शकल्याने त्याबद्दल लिहिता आले नाही.
परत जर कधी जाणे झाले तर यालाच पुरवणी जोडून लिहीन कदाचित
प्रतिसादाबद्दल आभार
18 Dec 2019 - 9:26 am | अमित लिगम
एक नावीन्यपूर्ण ओळख
18 Dec 2019 - 10:35 am | कोमल
धन्यवाद अमित
18 Dec 2019 - 11:11 am | अनिंद्य
भाग प्रकाशित होताच वाचले अशा ह्या दोन्ही इजिप्तायनाच्या मालिका - टर्मिनेटर यांची लेखमाला आणि मग तुमची. शैली जुदा असली तरी रोचकपणात सरस आणि तांत्रिक सफाई विशेष. ब्रावो.
......जातांना कैरो मधील पाहायच्या राहिलेल्या गोष्टींची यादी बनवत होतो. .....
शहर सोडतांना 'Will You Come Back ?' If yes, what for? असे स्वतःला विचारण्याची सवय मलासुद्धा आहे. म्हणून हे खूप रिलेट झाले :-)
जग फिरणाऱ्या घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाबद्दल अभिनंदन !
पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.
अनिंद्य
18 Dec 2019 - 3:33 pm | कोमल
धन्यवाद अनिंद्य,
हा हा. धन्स. हो त्यालाही फिरणं आवडतं आहे. दोन महिन्यात दोन छोट्या सहली केल्या त्याने. :D
18 Dec 2019 - 11:33 am | संजय पाटिल
सुरेख झाली आहे लेखमालिका...
आणि हो पुत्र प्राप्ति साठी अभिनंदन!!!
18 Dec 2019 - 3:34 pm | कोमल
धन्यवाद संजय पाटिल!
18 Dec 2019 - 3:51 pm | जॉनविक्क
बहुत खूब! पुरवणी वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
18 Dec 2019 - 5:43 pm | कोमल
धन्यवाद जॉनराव!
इंन्शाल्ला :)
18 Dec 2019 - 8:27 pm | प्रसाद_१९८२
सर्व प्रवास मलिका वाचली.
अतिशय सुंदर लेखमाला झालेय तुमची.
--
लिहित राहा !
19 Dec 2019 - 11:35 am | कोमल
धन्यवाद _/\_
19 Dec 2019 - 8:22 am | प्रचेतस
इजिप्तबद्दल मूळातच प्रचंड आकर्षण त्यात तुझी ही मालिका. जितके वाचू तितके कमीच. खूप सुरेख झाली ही मालिका.
19 Dec 2019 - 11:43 am | कोमल
धन्स वल्ल्या. तू ये आता लवकर जाऊन आणि अजून डिटेल मध्ये लिही.
आणि येतांना माझ्यासाठी एखादा मासा किंवा भरलेलं कबुतर घेऊन ये ;)
&@128540;
19 Dec 2019 - 12:22 pm | प्रचेतस
पुढच्या वर्षासाठी ध्येय ठेवतो अता इजिप्तचे :)
19 Dec 2019 - 11:47 am | सुधीर कांदळकर
या भागात स्थलवर्णन जवळजवळ नाही. खरेदी रसिकांसाठी मेजवानीच दिसते आहे. पण जैन बांधवांना मुळीच आवडणार नाही हा भाग. हमाम माहशी हे नाव एखाद्या अभिनेत्याच्या नावासारखे आहे.
पुत्रप्राप्तीबद्दल अभिनंदन. इजिप्ती शिव्या आपण शिकलां असल्यास त्याला शिकवा. (ह.घ्या)
छान लेखमालेबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
22 Dec 2019 - 1:03 pm | कोमल
प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल अनेक आभार.
:)
20 Dec 2019 - 1:34 am | मिसळ
तुमची लेखन्शैली आवडली. इजिप्त पाहण्याच्या लिस्ट मध्ये आहे,पाहू कधी योग येतोय.
22 Dec 2019 - 1:03 pm | कोमल
धन्यवाद मिसळ!
20 Dec 2019 - 4:53 pm | किल्लेदार
ममी सिरीज चे चित्रपट बघितल्यामुळे इजिप्तबद्दल एक भीतीयुक्त कुतूहल होते. टर्मिनेटर आणि तुमच्या लेखांमुळे आता त्या भावना निवळल्या.
मस्त लेखनमाला ...
22 Dec 2019 - 1:07 pm | कोमल
हो, अशी अगम्य, गूढ भावना पिरॅमिड बघतांना मनात येत रहाते.
आणि तुम्ही म्हणालात तसं हॉलिवूडच्या चित्रपटांचा यात मोठा वाटा आहे. :)