भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४
.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
३० सप्टेंबर २०१८
पहिल्या दिवशी ठरल्या प्रमाणे महमूदने आमच्यासाठी अलेक्झांड्रिया दाखवून आणेल अशी गाडी बुक केली होती. त्याप्रमाणे सकाळी ७:३० वाजता आम्ही नाश्ता उरकून तयार बसलो. थोड्यावेळाने चालक महंमद गाडी घेऊन आला आणि आम्ही कैरो मधून उत्तर दिशेला प्रस्थान केलं. कैरो पासून पुढे उत्तरेला नील नदीचा सुपीक प्रदेश जो नाईल डेल्टा म्हणून ओळखला जातो तो सुरु होतो. त्यामुळे चहूबाजूंनी हिरवीगार शेती आणि झाडे आपली सोबत करतात, मात्र या सगळ्याला कारण असलेली नील कुठेही दिसत नाही. बऱ्याच दिवसांनी आजूबाजूला दिसणारा हिरवा रंग डोळ्यांना सुखकर होता. कैरो-अलेक्झांड्रिया हायवे मस्त मोठा होता. त्यामुळे ट्रॅफिक वगैरे फारशी जाणवली नाही आणि ३ तासांत आम्ही शहराच्या हद्दीतून प्रवेश करते झालो.
अलेक्झांड्रिया हे गाव अलेक्सझांडरने ख्रिस्त पूर्व ३०० मध्ये एक बंदर बांधून उभारले. विचार असा कि ग्रीस मार्गे इजिप्त मध्ये पाय रोवावे आणि व्यवसाय आणि पर्यायाने सत्ता मिळवावी. त्यानंतर अंदाजे ख्रिस्त पूर्व ३० च्या दशकात क्लिओपात्रा हि शेवटची टॉलेमी फेरो होती. तिला हरवून इजिप्त मध्ये रोमन सत्ता स्थापन केली गेली आणि रोमनांनी इजिप्तची राजधानी अलेक्झांड्रियाला हलवली. आजचा पहिला टप्पा होता पॉम्पेचा स्तंभ. अंदाजे ३०० व्या शतकात बांधला गेलेला हा स्तंभ रोमन इजिप्त मधील टिकून राहिलेला एकमेव स्तंभ आहे. याची उंची अंदाजे २८ मीटर आहे आणि तळाचा व्यास ३ फूट आहे. रोमन कलाकारी ल्यायलेला हा स्तंभ समोर असलेल्या स्फिंक्समुळे इजिप्तशी धागा जोडून ठेवतो. या आवारात बाकी विशेष काही नाही. त्यामुळे थोडे फोटो काढून १५-२० मिनिटांत तेथून निघालो.
पॉम्पेचा स्तंभ.
समोरचे २ स्फिंक्स
अवांतर: मागील एका भागात जॉनविक्क यांनी हायजीन बद्दल विचारलं होतं. बाकी पर्यटन स्थळांवर अनुभव चांगला आला होता. पण पॉम्पेच्या स्तंभाच्या आवारात असलेले प्रसाधनगृह वापरावं लागलं तेव्हा नाक आणि जीव दोन्ही मुठीत आलेले इतका गलिच्छ कारभार होता.
आता जायचे होते कॅटकॉम्ब्स ऑफ कोम अल शकाफा पाहायला. हे कॅटकॉम्ब्स अर्थात भूमिगत थडगे दुसऱ्या शतकापासून ते चवथ्या शतकापर्यंत वापरले गेले होते. कोम अल शकाफा याचा अर्थ मातीच्या भांड्याचे तुकडे. इथे ज्यांना दफन केले जाई त्यांचे नातेवाईक येथे भेट देण्यास येताना वाईन आणि अन्न हे मातीच्या भांड्यामधून आणत. त्या भांड्याचे तुकडे येथे पसरलेले असत त्यामुळे याला नाव मिळालं 'कोम अल शकाफा'. जमिनी खाली ३ मजले याचं बांधकाम असून सर्वांत खालील मजला सध्या पाण्याखाली आहे. येथे ३ मस्तबा सापडल्या असून बाकी शवपेट्या या भिंतींमधून पुरून ठेवलेल्या आढळल्या. फक्त माणसाच्याच नव्हे तर कुत्रा, घोडा वगैरे जनावरांचे शव इथे सापडले होते. ही जागा जगासमोर आली ती एका गाढवामुळे. चरत चरत एक गाढव या भागात पोहोचलं आणि भुसभूशीत झालेल्या इथल्या जमिनीवरून थेट आत पडलं आणि या भूमिगत शवागाराचा शोध लागला.येथील भिंतीवर इजिप्त, रोमन आणि ग्रीक या तिन्ही कलाकारीचा संगम आढळून येतो.
सापडलेल्या शवपेट्या
त्या अशा येथे पुरून ठेवलेल्या आढळल्या
एक मस्तबा. इजिप्ती देव होरस आणि अनुबिस हे रोमनांच्या हातून घडवल्यावर विनोदी दिसत आहेत.
येथेही हॅथोर बाबत तेच झालेले. खाली द्राक्षे आणि वेलींची नक्षी
अजुन एक मस्तबा. येथेही द्राक्षे आणि वेलींची नक्षी
पुढचा टप्पा होता कैतबेचा किल्ला (Citadel of Qaitbay). अलेक्झांड्रिया मधील महत्त्वाची वास्तू. १४७७ च्या सुमारास अल अश्रफ कैतबे या मामलक सुलतानाने हा किल्ला बांधायला सुरवात केली. याच ठिकाणी पूर्वी अलेक्झांड्रियाचा प्रसिद्ध दीपस्तंभ होता. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या दीपस्तंभाच्या जागी कैतबे याने हा किल्ला बांधला आणि संपूर्ण भूमध्य समुद्रात हाभेदण्यास कठीण असा किल्ला म्हणून ओळखला गेला. पुढे आलेल्या कित्येक सुलतान आणि राजांनी हा किल्ला जपला, वेळप्रसंगी दुरुस्त केला. शेवटी १९५२ मध्ये इजिप्तच्या नेव्हीने या किल्ल्याला संग्रहालयाच रूप दिलं आणि तेव्हापासून ते आजतागायत हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतोय. सफेद दगडांत या किल्ल्याचे बांधकाम झालं असून आतील खोल्या, पॅसेज वगैरे घुमटाकार आहेत. किल्याचे तीनही मजले पर्यटकांसाठी खुले असून, तिसऱ्या मजल्यावरील खिडक्यांमधून समुद्राचे आणि किनारपट्टीचे सुंदर दृश्य दिसते. तळमजल्यावर मागच्या बाजूला बोटींवर सामान, तोफा चढवता येतील असा उतार असून किल्ल्याच्या मागील बाजूला तोफा चढवून नेता येतील अशाप्रकारचा चढ आहे. तो चढून गेलं कि खुला समुद्र आपली वाट पाहत असतो. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा वारा आणि समुद्राची जणू जुगलबंदी सुरु होती. फेसाळलेला समुद्र आणि खारा वारा अंगावर झेलत बराच वेळ आम्ही तिथे बसून होतो.
प्रवेशद्वारा जवळील बोटी
किल्ल्याची एक बाजू
प्रवेशद्वार
किल्यावरून समुद्रात लक्ष ठेवण्याची खिडकी
किल्याच्या मागे फेसाळलेला समुद्र
भुकेची जाणीव झाली आणि निघावं लागलं, पण दोन मुख्य समुद्राचं दर्शन या इजिप्त ट्रीप मध्ये झाल्याने मस्त वाटत होतं, पहिला तांबडा समुद्र आणि आता हा भूमध्य समुद्र. किल्याच्या आवाराच्या बाहेर आल्यावर महंमदला म्हणालो जेवायला घेऊन चल बाबा. अलेक्झांड्रिया मधील मासे फार प्रसिद्ध तेव्हा अशाच एका रेस्टॉरंट मध्ये तो आम्हाला घेऊन गेला. आतापर्यंत महंमदच्या बाबत तयार झालेल्या चांगल्या मतांना इथून सुरुंग लागू लागले.
१९०० सालापासून अलेक्झांड्रियाला खाऊ घालणारे अथेनिअस हे रेस्टॉरंट समुद्राचं दर्शन घडवत जेऊ घालते. आम्ही खिडकी जवळची जागा निवडली.
सोबत महंमद पण आला आणि म्हणाला, "इथे तुम्ही ऑर्डर नाही देऊ शकत. इथे फक्त २-३ प्रकारचं उत्तम जेवण मिळत. तुम्हाला फिश खायचं आहे कि चिकन?"
"आम्ही का ऑर्डर नाही देऊ शकत? मेनूकार्ड असले ना त्यांचं? आणि इंग्लिश नाही येत त्यांना?" मी विचारलं.
"नाही. इंग्लिश नाही येत आणि मेनू कार्ड वगैरे काही नाहीये. फिश किंवा चिकन ते सांगा मी त्यांना सांगतो." इति महंमद.
आम्हाला थोडं आश्चर्य वाटलं पण म्हणालो ठीक आहे असेल एखाद्या ठिकाणी अशी पद्धत.
आम्ही दोन्हीचा दर विचारला.
महंमद म्हणाला, "रेट २५ प्रत्येकी." म्हटलं २५ पौंड फिशचे आणि २५ चिकन चे म्हणजे उत्तम आहे कि.
आम्ही म्हणालो "दोन्ही द्यायला सांग."
महंमद वेटर सोबत अरेबिक मध्ये काही बोलत होता. तोवर आम्ही आजूबाजूला नजर फिरवली. एक मोठासा युरोपियन पर्यटकांचा ग्रुप पण जेवत होता. त्यांनी कसं बरं जेवण मागवले असेल?
माझ्या मनात हा विचार आला तोवर नवऱ्याने महंमदला विचारलं, "२५ पौंड ना प्रत्येकी?"
"पौंड? नाही नाही डॉलर." महंमद म्हणाला.
आम्ही चकित झालो. या आधी कधी जेवायच्या ठिकाणी डॉलर मध्ये बिल भरलं नव्हतं. मी मनात '५० गुणिले ७०' करू लागले.
नवरा म्हणाला, "नाही हे जास्त आहेत. आपण दुसरीकडे जेवायला जाऊया. ऑर्डर रद्द करायला सांग."
महंमद बरं म्हणाला आणि थोडं वेटर सोबत बोलल्या सारखं करून परत येऊन म्हणाला, "ते तुम्हाला 'कॉम्प्लिमेंटरी' चिप्स पण देतील. थांबायचं का मग?"
नवऱ्याने ठाम नकार सांगितला आणि आम्ही उठून चालू लागलो.
दरवाजा जवळ पोहोचायच्या आधी एका टेबलवर मला एक मेनूकार्ड दिसलं. मी चटकन उचलून वाचू लागले आणि शेजारी उभ्या असलेल्या वेटरला म्हणाले, "तू इंग्लिश बोलू शकतोस?"
"हो मॅडम. नक्कीच बोलू शकतो" अस्खलित इंग्लिशमध्ये त्याने उत्तर दिलं.
मी आणि नवरा थांबलो. "हे मेनूकार्ड आहे ना? आम्ही यातून जेवण मागवू शकतो का?"
"अर्थात मागवू शकता" तो म्हणाला.
मी त्याच्याशी बोलत आहे हे पाहून दरवाजा पर्यंत गेलेला महंमद मागे आला आणि "चला चला उशीर होईल" म्हणत घाई करू लागला.
"हे आहे मेनू कार्ड आणि इथे आम्ही जेवण मागवू शकतो. आम्ही इथेच जेवण करणार आहोत." आम्ही म्हणालो आणि आधीच्या खिडकी जवळील जागेवर जाऊन बसलो.
त्यांचा मॅनेजर आणि महंमद अरेबिक मध्ये काही तरी बोलत होते. अंदाजाने सांगायचं तर महंमद मॅनेजर कडे फुकट जेवण मागत होता कारण तो आम्हाला तिथे घेऊन आला. पण हे या रेस्टॉरंट च्या नियमांत बसत नसल्याने मॅनेजर नकार देत होता. आम्ही जेवण काय मागवायचं ते ठरवलं, वेटरला ऑर्डर दिली. तोवर मॅनेजरने स्वतःला पुढील कामात गुंतवले होते. महंमद म्हणाला, "तुम्ही जेऊन घ्या मी बाहेर थांबलोय." काही वेळाने मागवलेला मासा, सीझर सलाद आणि फ्रेश मँगो पल्प आलं. अप्रतिम चव. सगळ्याच पदार्थांची. मँगो पल्प तर परत मागवलं इतकं छान होतं. रेस्टॉरंट १९०० सालापासून आजवर सुस्थितीत असल्याचं कारण सापडलं. जेवण संपवून अवघे १८० पौंड म्हणजे ११ डॉलर एवढं बिल चुकतं करून आम्ही बाहेर पडलो.
खिडकीतून दिसणारा किल्ला, समुद्र आणि रस्ता
हेच ते मेनू कार्ड
अत्यंत चविष्ट जेवण
महंमद गाडी घेऊन आला, आणि आम्ही पुढच्या ठिकाणी जायला निघालो. अलेक्झांड्रियाला मी येण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे इथली भव्य लायब्ररी. सुरवातीला ग्रीक राज्यकर्त्यांनी इथे हे ग्रंथालय बांधून जगातील सर्व ज्ञान एकवटायचा प्रयत्न केला. इथल्या बंदरात येणाऱ्या प्रत्येक बोटीला त्यांच्या देशातील, भाषेतील पुस्तकाची एक प्रत इथे कर म्हणून द्यावी लागे. अशाप्रकारे दर वेळी ग्रंथालयाचा पसारा वाढत जाई. असे मानले जात असे कि जगातील प्रत्येक लिखित गोष्टीची किमान एक प्रत या ग्रंथालयात निश्चित सापडेल. पुस्तक, ग्रंथ यांच्या सोबत पपायरस वर काढलेले असंख्य नकाशे, दस्तावेज, कागदपत्रे सुद्धा येथे होती. ग्रीक, टॉलेमीक विद्वान आणि विद्यार्थी यांचा सतत इथे राबता असू लागला. असंख्य नवीन शोध इथे लावले गेले. टॉलेमीवर रोमनांनी आक्रमण केले असता, रोमन योद्धा ज्युलिअस सीझर याच्याकडून त्याच्या स्वतःच्या बोटींना लावलेली आग शहरभर पसरली आणि त्यात हे महान ग्रंथालय सुद्धा सापडले. असंख्य पुस्तके, हस्तलिखिते यात भस्मसात झाली आणि ग्रंथालयाचा अंत झाला. पुढे १९७४ मध्ये इथे लायब्ररीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मांडला गेला. तत्कालीन राष्ट्रपती हुस्नी मुबारक यांनी स्वतः लक्ष घालत नवीन लायब्ररी २००२ पर्यंत उभारली.
७ मजल्यांवर विविध भाषा आणि विषय यांच्यामध्ये पुस्तके विभागली आहेत. जिकडे पाहावं तिकडे पुस्तके शोधण्यासाठी असंख्य संगणक ठेवले आहेत. प्रवेशद्वाराच्या मजल्यावर जुन्या छपाई पद्धती आणि यंत्र ठेवले आहेत. यामजल्याच्या वर चार आणि खाली दोन मजले आहेत. भरपूर प्रकाश आत यावा अशा पद्धतीचे वेगळेच छत बनवले आहे. सर्व अद्ययावत सोयींनी परिपूर्ण अशी हि लायब्ररी, यातील उच्चशिक्षित कर्मचारीवर्ग यामुळे विद्यार्थ्यांना इथे अभ्यास करायला सोपे जाते. त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुद्धा लायब्ररीच्या आवाराचा वापर होतो. आम्ही तिथे होतो तेव्हा टेक फेस्ट २०१८ सुरु होते. जगभरातून लोक बनवलेल्या विविध टेकी उपकरणांना घेऊन इथे आले होते. त्यात सध्या प्रचलित असलेल्या VR अर्थात व्हर्चुअल रिऍलिटी उपकरणे, ड्रोन आणि रोबोट यांचे स्टॉल गर्दी खेचत होते. लायब्ररी मध्ये तासभर घालवून आम्ही या फेस्ट मध्येही अर्धा तास चक्कर मारली. शेवटी पायांनी कुरकुर करायला सुरु केल्यावर निघालो ते थेट कैरोच्या दिशेने.
लायब्ररीमधील प्रचि. सुरवातीचे फोटो छपाईचे यंत्र आणि त्यानंतर त्याची माहिती अशा क्रमाने
येतांना महंमदने गाडी प्रचंड वेगाने हाकायला सुरवात केली आणि गाडीच्या काचा पूर्ण उघड्या ठेवल्या. हायवे मोठा असल्याने वेगाचा फार प्रश्न नव्हता पण गाडीत भसाभसा वारा शिरत होता त्याने त्रास होऊ लागला. त्याला सांगितलं कि बाबा AC सुरु कर तर त्याचं उत्तर होतं, 'AC broke.' आम्हाला वाटलं असंच म्हणत असेल कारण जातांना तर सगळं ठीक होतं. त्याला, 'तरीपण सुरु कर सांगितलं.' काचा बंद केल्या आणि गाडीचं धुरांडं धूर बाहेर टाकायच्या ऐवजी आतच सोडत होतं. त्याला त्याबद्दल विचारलं तर म्हणे मी आधीच सांगितलं होतं. शेवटी तो भसाभसा वारा परवडला पण काचा उघड अशी विनवणी केली. शेवटी संध्याकाळी ७ पर्यंत कैरोमध्ये पोहोचलो. हॉटेलच्या अलीकडेच खान-अल-खलिली या मार्केटच्या प्रवेशद्वारापाशी सोड असं त्याला सांगितलं. ट्रिपचे पैसे चुकते करून निघालो तोवर त्याचा प्रश्न आला, "मला टीप?". ठामपणे नकार दिला. आणि क्षणात तो वाऱ्याच्या वेगाने तेथून निघून गेला.
क्रमश:
.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}
.container-p {
text-align: center;
}
प्रतिक्रिया
13 Dec 2019 - 4:23 pm | श्वेता२४
वाचतेय.
13 Dec 2019 - 6:54 pm | कोमल
धन्यवाद श्वेता :)
13 Dec 2019 - 4:39 pm | जॉनविक्क
आता त्याच त्या पध्द्तीचे फोटो येतील, नावीन्य नसेल अन दर वेळी धागा उघडला की सुखद धक्का बसतो आणी आधाशासारखा वाचून काढतो.
मस्त!
13 Dec 2019 - 4:43 pm | जॉनविक्क
वल्ल्यालापण घेऊन या, पण एक कट्टा ठरवाच
13 Dec 2019 - 6:55 pm | कोमल
धन्यवाद. नक्की करू कट्टा :)
13 Dec 2019 - 4:50 pm | पद्मावति
हा ही भाग सुंदर जमलाय.
13 Dec 2019 - 6:55 pm | कोमल
आभारी आहे पद्मावती :)
13 Dec 2019 - 5:38 pm | मुक्त विहारि
आवडलं.
13 Dec 2019 - 6:56 pm | कोमल
धन्स मुविकाका
:)
14 Dec 2019 - 9:16 am | प्रचेतस
हाही भाग मस्त.
16 Dec 2019 - 2:02 pm | कोमल
धन्स वल्ली _/\_
15 Dec 2019 - 11:44 am | सुधीर कांदळकर
या सफरीवरचा पहिला लबाड माणूस तुम्हांला भेटला. हाही भाग छान, आवडला. धन्यवाद.
15 Dec 2019 - 7:19 pm | जॉनविक्क
फक्त त्यांचा निरोप घ्यायची वेळ येणे आवश्यक असते, मग रंग दिसायला सुरुवात होते :)
16 Dec 2019 - 2:01 pm | कोमल
100% वगैरे नाही. आणि प्रत्येक ठिकाणी हे असे लोक असतातच. कधी ते आपल्याला भेटतात, कधी नाही.
पण तिथे सगळे असेच लोक असतात हे जनरलायझेशन नाही पटलं.
रच्याक यावरून Fluffy अर्थात गब्रिएल इग्लेशिअस या कॉमेडियनचे 2 कार्यक्रम आठवले. एक भारतात झालेला आणि दुसरा सौदी मध्ये.
भारतातल्या कार्यक्रमाच्या आधी त्याला अमेरिकेतील त्याचे आप्त विचारात होते की, 'तिकडच्या लोकांना कळेल का इंग्लिश? तुझे विनोद कळतील का?' त्यावर त्याचं उत्तर होतं,'भारतीयांना अमेरिकेचं कल्चर अमेरिकन पेक्षा चांगलं माहीत आहे.'
सौदी च्या कार्यक्रमात त्याला स्वतःला शंका होती, 'तिथल्या लोकांना इंग्लिश तर कळेल पण हसणं जमतं का त्यांना?'
फार मस्त असतं त्याचं कंटेंट.
16 Dec 2019 - 9:19 pm | जॉनविक्क
अन्यथा इजिप्त म्हटल्यावर तिथले भामटे हमखास भेटीस येतात
16 Dec 2019 - 1:41 pm | कोमल
हो ना. पहिला आणि शेवटचा.
असेही अनुभव शिकवून जातात आपल्याला :)
16 Dec 2019 - 2:26 pm | टर्मीनेटर
मस्त चालू आहे लेख मालिका !
बाय द वे, हा तोच मोहम्मद होता का जो मला भेटला होता? फोटो वरून ओळखता तेईल तुला. जर ही तीच व्यक्ती असेल तर तुला आलेला त्याचा अनुभव माझ्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे!
16 Dec 2019 - 3:18 pm | कोमल
तुझ्या भाग 4 चा गणेशा झालाय. एकही फोटो दिसत नाहीये.
त्यामुळे कळेना हा तोच का ते.
एकदा चेकव बरं
16 Dec 2019 - 5:10 pm | टर्मीनेटर
अरे देवा ! photos.google ने परत झटका दिलाय... सगळ्या फोटोंची url अपडेट केली आहेत त्यांनी, आता परत सगळे भाग मला अपडेट करावे लागतील 😡
तो पर्यंत इथेच त्याचा फोटो चिकटवतो बघून सांग हाच होता का!
16 Dec 2019 - 5:28 pm | कोमल
नाही, तो हा नव्हे. :)
तो चेहऱ्यावरून पण खडूस दिसत होता :))
16 Dec 2019 - 6:31 pm | पियुशा
सगळे भाग अधश्यासारखे वाचून काढले हुस्श !! भारी चालुये लेखमाला :)
18 Dec 2019 - 10:37 am | कोमल
धन्स पिवशे :)
पुढला भाग शेवटचा.