कोण्या एकेकाळी अन्न,वस्त्र, निवारा अशा मानवाच्या मुलभुत गरजा मानल्या जायच्या. मात्र आता कालौघात त्यात अनेक गोष्टी मुलभुत गरजा म्हणून भर घालता येतील. त्यात सध्या ईंटरनेट्,मोबाइल आणि वाहन या गोष्टी नक्की येतील. सायकलपासून ते एस.यु.व्ही, लक्झरी कारपर्यन्त अनेक वाहने मि.पा.करांनकडे असतील. पोटापाण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी जाताना, खरेदी करण्यासाठी जाण्यासाठी ते नुसतेच भटकण्यापर्यंत वाहन आवश्यक झाले आहे. मात्र रस्त्यावर गाड्यांची गर्दी वाढल्याने बर्याच जणांना छोट्या मोठ्या अपघातांना तोंड द्यावे लागते. अपघात हि बहुतेकदा गंभीर बाब असते, किरकोळ जखमी होण्यापासून ते मृत्युमुखी पडण्यापर्यंत दुखदायी असते. अर्थात काहीवेळा असे अपघात होतात कि त्यात व्यक्ती फारशी जखमी होत नाही, उलट एखादा विनोदी प्रसंग निर्माण होतो. या धग्यात असेच काही प्रसंग लिहीणार आहे. अर्थात हे सगळे माझ्याबाबत झालेले नाहीत. काही मिपाकर आणि नॉन मिपाकर यांचा मिळून वाहन विषयक चर्चेचा व्हॉटस अॅप समुह आहे , त्यामधे आज असे अपघात हा विषय चर्चेला आला. सहाजिकच असे किस्से एकत्र वाचायला मिळावेत अशी मिपाकरांची इच्छा होती, म्हणून हा धागा प्रंपच. प्रतिसादात असेच किस्से यावेत आणि मनोरंजनाबरोबरच काय काळजी घ्यावी हे ईतरांना समजावे यासाठी या धाग्याचा उपयोग होईल.
मिपाकर ट्रेडमार्क यांच्या किस्स्यापासून सुरवात करुया.
पूर्वी हिरो होंडाला हँडल आणि इग्निशन लॉक वेगळं असायचं. दोन वेळा मी हँडल लॉक न उघडता सरळ इग्निशन लावून गाडी चालू केली (अर्थात चुकून) आणि मस्त रस्त्यावर आपटलो. एकदा तर भर रस्त्यात मध्ये जाऊन पडलो.
पुण्याच्या एका गल्लीतून फक्त 20च्या स्पीडने जाताना रस्ता दिसता दिसता समोर एकदम आकाश दिसलं. काय झालं कसा पडलो काही कळलं नाही. माझ्या आधी आणि नंतर मिळून 8-10 जण आपटले होते. नंतर समजलं की पहिल्या पावसात तिथे एक झाड होतं (बहुतेक उंबर) त्याचा चीक पडून प्रचंड घसरडं होतं म्हणे. मला ज्याने उभं केलं तो पण मला बाजूला करून नंतर आपटला.
मिपाकर मोदक यांचे किस्से:-
मी असा एकदा सिंहगड रोडवर ट्रॅफिक मध्ये 10-15 च्या स्पीडला पडलो होतो. फुल्ल ट्रॅफिक मध्ये समोरचा एक बायकर आडवा झाला, मी लगेच स्पीड कमी केला... तरीपण ब्रेक मारल्यामुळे असेल पण चटईवर बसलेल्या अल्लाउद्दीन सारखा मी अलगद तरंगत स्लो मोशन मध्ये रस्त्यावर आलो...
रिमझिम पाऊस + रस्त्यावर सांडलेले ऑईल =डेडली कॉम्बिनेशन.
एकदा हाफीसातून घरी येत होतो, रात्रीचे 10 वाजले असावेत, 40 च्या दरम्यान स्पीड होता. एका मोठ्या कचराकुंडी जवळून त्याच स्पीड मध्ये जात होतो - रोजचा रोड, त्यामुळे फार सरप्राईज अपेक्षित नव्हते. अचानक कचरा उसकणाऱ्या एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याला हूल दिली आणि घाबरून ते कुत्रे रस्त्यावर आले... रस्त्यावर म्हणजे थेट माझ्या गाडी समोर. मला का ही ही करायला वेळ मिळाला नाही, गाडी सरळ कुत्र्याच्या अंगावर घातली आणि मी रस्त्यावर पालथा पडून सरळ घसरत गेलो.. गाडी तिसरीकडे घसरत गेली. सुदैवाने हेल्मेट, ग्लोव्हज आणि साधे जॅकेट असल्याने फार लागले नाही. पँट फाटून गुडघे सोलले आणि जॅकेट फाटले. मी रस्त्यावर बसूनच आजूबाजूचा अंदाज घेतला तर ज्या कुत्र्याला धडकलो होतो ते रस्त्यावर गडबडा लोळून विव्हळत होते.. डोक्यात संतापाची तिडीक गेली आणि "
..आता हे कुत्तरडं मरुदे" अशी इच्छा केली. कसलं काय.. त्याच क्षणी ते कुत्रं उठलं आणि धूम पळून गेलं.
लोकं धावले, मला उठायला मदत केली. फक्त गुडघे सोलल्यामुळे फार त्रास न होता गप घरी आलो..
आपण भारतीय लोक एकंदरीत नियम पाळण्याबाबत थोडे गलनाथ असतो किंवा 'काय होतय?' या विचाराने वागतो, पण जिथे वहातुकीचे नियम कडकपणे पाळले जातात, त्या देशातून आलेले लोक किती शिस्तबध्दपणे वागतात याचा एका मित्राने सांगितलेला किस्सा...
जर्मनीहून क्लायंट आला, मुंबईत उतरला आणि त्याला घ्यायला इनोव्हा पाठवली होती ती गाडी त्याच्यासमोर आली. हा बसल्यावर लक्षात आले की सीटबेल्ट चे बकल सीट कव्हर मध्ये गुडूप झाले आहे. तो क्लायंट शांतपणे उतरला आणि ड्रायव्हरला म्हणाला की "बकल काढ, सीटबेल्ट लावायचा आहे." त्या ड्रायव्हरने लै झटापटी करून शेवटी कव्हर उसवले आणि बकल बाहेर काढले.
मिपाकर पकचिकपक राजाबाबु यांचा किस्सा :-
पुण्यातील नळस्टॉपकडून म्हात्रेपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव मंदिर चौकात घर होते, तो रस्ता इमारतीला लागूनच होता व रस्ता पूर्ण व व्यवस्थित दिसायचा) विरुद्ध बाजूला एक फळाची हातगाडी उभी होती. ती फळांनी पूर्ण भरलेली होती. अचानक नळस्टॉपकडून एक रिक्षा जोरात आली व त्या गाडीला पूर्ण वेगात धडकली. गाडी आडवी झाली व निम्म्याहून अधिक फळे इतस्ततः रस्त्यावर विखुरली. ( रस्त्यावरील काहींना ती सुवर्णसंधी वाटली हा भाग अलाहिदा! )
रिक्षेतून रिक्षाचालक बाहेर पडला. हातगाडीवाल्याला तो प्रकार झाला आहे हे खरे वाटेपर्यंत जे काही चार, पाच क्षण गेले त्यानंतर त्याने बाहेर पडलेल्या रिक्षाचालकाला लाथा मारायला सुरुवात केली. तो इतका बेभानपणे लाथा मारत होता की फळांचे काहीही झाले तरी आता त्याला काळजी नसावी असे वाटत होते. पण हा प्रकार मुळीच हास्योत्पादक नव्हता. आम्हाला वाईट वाटत होते. खरा प्रकार नंतर घडला.
रिक्षाचालक जरी बाहेर पडलेला असला तरीही रिक्षा तशीच पुढे निघाली. आम्ही पाहत होतो. मी मित्राला दाखवलेही, की रिक्षा तशीच निघाली आहे. तो व मी उत्सुकतेने बघू लागलो.
ती रिक्षा अक्षरशः ७५ मीटर अंतर सरळ गेली व नंतर अचानक तिने रस्ता क्रॉस केला. त्यावेळी त्या रस्त्यावर फारशी गर्दी नसायची, त्यामुळे रिक्षा सरळ जाताना कुणालाच धडकली नाही. मात्र, रस्ता क्रॉस केल्यावर ती समोरून येणाऱ्या एका तीनचाकी टेंपोवर समोरासमोर आदळली व आडवी झाली. टेंपोवाला भयानक क्रोधिष्ट नजरेने टेंपोतून बाहेर येऊन रिक्षाचालकाला शोधू लागला. त्याने अक्षरशः रिक्षाचालकाला आडव्या झालेल्या रिक्षेच्या खालीही शोधले. बराच वेळ शोधल्यानंतरही रिक्षाचालक दिसेना त्यामुळे त्याने आपल्या टेंपोच्या संभाव्य नुकसानाकडे पाहिले व निघायला लागला. तेवढ्यात काही अंतरावर काहीतरी भांडण, मारामारी, शिविगाळ चाललेली पाहून तो तिथपर्यंत गेला, टेंपो क्षणार्धासाठी थांबवून आढावा घेऊन निघाला. त्याच्यासमोरच रिक्षेवाला मार खात होता, पण तो प्रकार काहीतरी भिन्न असावा असे वाटून तो निघून गेला.
अशा प्रकारचा अपघात मी त्याआधी किंवा त्यानंतर पाहिलेला नाही. ( टी. व्हीवर मध्ये 'विचित्र अपघात' या सदरात काही अपघात तसे जरूर पाहिले, पण प्रत्यक्षात नाही. )
फळेही गेली, रिक्षावालाची कणिकही तिंबली अन टेंपोलाही पोचा पडला.
श्री. अमोल मेंढे यांनी लिहीलेला किस्सा.
एकदा मुंबईच्या एका मित्राला नागपूर रेल्वेस्टेशन ला सोडून घरी चाललो होतो. रात्री 12.30 ते 1 चा सुमार असावा. एका ठिकाणी मला उजवीकडे वळायचं होतं म्हणून रोड क्लियर व्हायची वाट बघत थांबलो होतो. तेवढ्यात एक पांढऱ्या कपड्यातील बुलेट धारी सांड सुसाट वेगाने आला आणि अचानक मी दिसलो म्हणून करकचून ब्रेक मारले पण शेवटी मला धडकलाच. मी गाडीसकट पडलो आणि माझा पाय गाडीच्या खाली अडकला. पाय अडकल्यामुळे मला उठता येईना. हा पठ्ठ्या शांतपणे बुलेट वर बसून माझ्याकडे पाहत होता. पण मला किंवा माझ्या गाडीला उचलत नव्हता. माझ्या गोx कपाळात गेल्या. आणि मी सणकून शिवी दिली. "दिखता नही क्या मादxxत?" आणि कसाबसा गाडीखालून पाय काढून उभा झालो. डोक्यात हेल्मेट असल्यामुळे डोक्याला मार तर नव्हताच. थोडंफार खरचटलं होतं. माझी शिवी ऐकून पांढऱ्या कपड्यातील सांड आपला तोल सावरत गाडीवरून खाली उतरला. माझी कॉलर पकडून "गाली देता है मादxxत?" म्हणत एक जोरदार बुक्की माझ्या पोटात हाणली. पोटात कळ आणि नाकात दारूचा भपकारा एक साथच उठला. मी किंचाळलो "भाई एक मिनिट रुक, मारना मत." "साले तू जनता नही मेरेको!" इति. पांढऱ्या कपड्यातील सांड.
रात्रीच्या वेळेचा फायदा उचलायचा मी ठरवलं. डोक्यातील हेल्मेट काढलं, हनुवटीवर येतो तो भाग हातात पकडला आणि पूर्ण ताकदीनिशी पांढऱ्या कपड्यातील सांडाच्या थोबाडात हाणला. त्याला सांभाळायची संधी न देता दणादण देत सुटलो. माझ्यापेक्षा दुपटीचा सांड आता पळायला लागला. मी फक्त त्याच्या मागे धावण्याचं नाटक केलं आणि तो दिसेनासा होताच गाडीला किक मारून सुसाट पळून गेलो. नशीब त्याने माझा गाडी नंबर बघितला नाही किंवा नशेत असल्यामुळे त्याच्या लक्षात राहिला नसावा. नाहीतर.....
मिपाकर श्री. नितीन पालकर लिहीतात.
नाशिकच्या कलाकार कै. गीता माळी यांचं अपघाती निधन झाल्याचं फेसबुक आणि इतर माध्यमातुन वाचलं. बऱ्याच जणांच्या फेसबुक मित्र यादित त्या होत्या. अमेरिकेहुन कार्यक्रम करुन येउन नाशिकजवळ अपघात होणं हे दुर्दैवी आहे.
एकंदरीत सगळ्या बातम्या आणि त्या अपघाताचे फोटो पहाताना त्यांची कार ही लक्झरी सेगमेंट मधली आहे हे स्पष्ट दिसतंय.
अशा कार्सना हल्ली दोन चार सहा अशा एअरबॅग्ज असतात मॉडेलनुसार ज्या गाडी धडकल्यावर उघडतात आणि आतील माणसं सुरक्षित रहातात जीवीत हानी न होता.
मग या केस मधे असं का दिसत नाही एअर बॅग्ज उघडल्याचं किंवा त्यानं जीव का वाचला नाही?
याचं कारण म्हणजे गाडी चालवणारा आणि त्याशेजारी बसणाऱ्या माणसाचा कंटाळा असु शकतं.
हल्लीच्या नवीन कार्स मधे एअर बॅग्ज जरी असल्या तरी त्या जोपर्यंत सीटबेल्ट लावले जात नाहीत तोपर्यत कार्यरत होत नाहीत अशी योजना असते. गाडी धडकताना जर सीटबेल्टचे हुक त्या स्लॉट मधे नसतील तर एअर बॅग्ज उघडत नाहीत.
अनेकदा गाडीची डिलिव्हरी घेताना हे सांगितलं जातं पण आपण सीटबेल्ट न लावल्यानं काय होतं ?अशा बेफिकिरीनं वागुन असे दुर्दैवी प्रसंग ओढावुन घेतो.
दुसरं असं की जरी एअर बॅग आणि सीटबेल्ट याचा संबंध नसणारी गाडी असेल तरी गाडी धडकल्यावर तुम्ही इकडे तिकडे फेकले जाण्याची शक्यता सीटबेल्ट लावलेला असताना जवळपास नगण्य होते आणि प्राणहानी टळु शकते.
सीटबेल्ट लावणं हे लाजिरवाणं काम नाहीए. तुम्हाला चार किमी जायचंय की चारशे याचा विचार न करता गाडीत बसल्याक्षणी सीटबेल्ट लावुन मगच गाडी सुरु करण्याची सवय लावा. पोलिस दंड करतो म्हणुन नको तर आपल्याच जीवाची काळजी म्हणुन करा.
टु व्हिलर चालवताना हेल्मेट आणि फोर व्हिलर मधे सीटबेल्ट या प्राणांतिक इजेपासुन वाचवु शकतात ९० ते ९५% केसेसमधे.
अर्थात हे लावलं म्हणजे वाचेलच असं नाही पण छत्री पाउस थांबवु शकत नाही पण काही प्रमाणात आपल्याला पावसापासुन वाचवु शकते तसाच हा प्रकार आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे या नवीक गाड्यांचा वेग. पॉवरफुल इंजीनमुळे वेग भरपुर घेता येतो पण आपले रस्ते आणि ट्रॅफिक त्या लायकीचं नाहीए. गाडी कॅंट्रोल होत नाही बऱ्याचदा. मशीन आहे ते शेवटी त्याच्याशी खेळ नको.
तेंव्हा आज,आत्तापासून मनाशी खुणगाठ बांधा ... सीटबेल्ट आणि हेल्मेट आणि योग्य वेग या शिवाय वाहन चालवायचं नाही.अगदी गाडीतल्या प्रत्येकानं हे पाळायचं फक्त ड्रायव्हरनं नाही.
सर्वांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा...!!
प्रतिक्रिया
16 Nov 2019 - 3:45 pm | पाषाणभेद
मी पयला.
मी हेल्मेट घालून चाललो होतो. समोरून विरुद्ध दिशेने एक जण आला अन त्याने मला समोरून दुचाकी ठोकली.
मी हॅन्डलवरुन डोक्यावर पडलो. मी हळूच अन होही हळूच होता.
मला जास्त काही लागले नाही.
पण तो पळून गेला.
हेल्मेट होते त्यामुळे जास्त काही झाले नाही. तशीही माझी गाडी हळूच होती.
16 Nov 2019 - 4:03 pm | तुषार काळभोर
सगळ्यांनी काळजी घ्या.
अपघातामध्ये खूप वेदना होतात, प्रचंड खर्च होतो, तात्पुरतं किंवा कायमचं शारीरिक आणि आर्थिक नुकसान होतं, स्वतःला आणि कुटुंबाला खूप त्रास होतो, कदाचित तो आयुष्यभरासाठी सहन करावा लागतो.
गाडी चालवताना शिस्त पाळण्याची, हळू चालवण्याची, नियम पाळण्याची , सिग्नलला थांबण्याची, हेल्मेट वापरण्याची, कशाचीही लाज बाळगू नका.
16 Nov 2019 - 4:40 pm | सतिश पाटील
उलट्या दिशेने येणारा एक होंडा सिव्हिकवाला माझ्या बजाज डिस्कव्हरला ३०-३५ च्या स्पीडने अगदी समोर समोर धडकला होता, मी दीडफूट तरी उडालो होतो पण हॅण्डल ना सोडल्याने तसाच सीटवर आदळलो, गाडीही तशीच उभी जागच्या जागी.
त्या सिव्हिकचे बॉनेट चेपले, बम्परचे २ तुकडे होऊन ते खाली पडले होते, आणि माझ्या डिस्कवरचे अर्धे मडगार्ड तुटले होते. अर्थात डोक्यावर हेल्मेट होते माझ्या.
16 Nov 2019 - 6:14 pm | यशोधरा
मागून भरधाव येणारी सुमो पुढे जायला बघत असताना माझ्या ऍक्टिव्हाला धडकून गेली, ऍक्टिव्हा आणि मी फरफटत गेलो. सकाळची वेळ असल्याने खूप रहदारी नव्हती, हे नशीब. हेल्मेटमुळे डोक्याला मार बसण्यापासून वाचले. भरपूर खरचटण्यावर निभावले.
दुसऱ्या वेळी एक अतिशय भरधाव मोटारसायकलवरून येणारी व्यक्ती धडकून पळून गेली. मी पडले आणि ऍक्टिव्हा माझ्या पायांवर पडली. एक कार जोरात ब्रेक मारून मागे उभी राहिली,अगदी चेहऱ्यापाशी तिचे चाक बघितलेले आठवते. बघे होते पण मदत करायला कोणी नाही. इतक्यात तिथून एक गाडीवरून मॅडम जात होत्या, त्या थांबल्या व त्यांनी गाडी बाजूस घेण्यास व उठायला वगैरे मदत केली. ह्याही वेळी हेल्मेट होते. भरपूर मुका मार लागण्यावर व शरीर काळे निळे होण्यावर निभावले.
16 Nov 2019 - 6:48 pm | सुबोध खरे
रामायण धारावाहिक चालू असतानाची गोष्ट. रविवार सकाळी सडे नऊची वेळ. राम मारुती रस्ता अक्षरशः निर्मनुष्य होता.
ठाण्यात माझा चुलत भाऊ आपल्या एम ५० वर मला पाच पाखाडीवरून ठाणे स्टेशनला सोडायला आला होता.
त्या रस्त्यावर एक सायकल वाला उलट्या बाजूने येत होता.
एकमेकांना टाळण्यासाठी दोघे इकडे तिकडं करत चाळीस फूट रस्त्यावर एकमेकांच्या टायर वर टायर आपटले.
पडलं कुणीच नाही आणि लागलं कुणालाच नाही.
पण मला हसू आवरेना आणि मी हसत हसत चुलत भावाला म्हणालो "अगदी ठरवून सुद्धा" चाळीस पन्नास फूट रुंद निर्मनुष्य रस्त्यावर सायकलवाल्याच्या टायर वर आपटणं कुणाला जमलं नसतं
16 Nov 2019 - 8:15 pm | सस्नेह
उत्तम धागा .
सीटबेल्ट आणि हेल्मेट बद्दल १०० टक्के सहमत !
रेल्वे क्रॉसिंग ला किंवा नदीपुलावर ओव्हरटेक करण्याचा मुळीच प्रयत्न करु नये.
ट्रॅक्टर आणि त्यच्या ट्रॉल्यांपासून किमान तीन फूट दुरून जाण्याची खबरदारी घ्या.
कुत्रे अचानक आडवे आले तर आयत्यावेळी गाडी कधीच वळवू नका, कुत्रा वाचेल आणि तुमचे प्राण धोक्यात येतील.
16 Nov 2019 - 8:21 pm | Rajesh188
सायकल खूप चालवली होती.
सर्व प्रकारचे रस्ते पालथे घातले होते.
आणि स्वयंचलित दोन चाकी वाहन चालवण्याचा 15 ते 20 km वाहन चालवण्याचा अनुभव गाठीशी होता .
त्यात घरी नवीन स्कूटर आली .
आणि मी ती नवीन स्कूटर नामक विमान(आमच्या दृष्टीने ते विमाना च ) घेवून शेजारच्या शहरात गेलो आणि परत येताना.
आम्हला वेगाने वेड लावले होते स्पीड मध्ये गाडी चालवणे म्हणजे गाडी चालवायला येते ह्या वर शिक्का मोर्तब असा आमचा समज.
खेडेगाव चा कच्चा रस्ता वर चाललो होतो
मध्य भगी खडी वर आलेली आणि बाजूला मातीची सपाट patti.
आम्ही त्या 2 फुटाच्या सपाट मातीच्या रस्त्याने सुसाट चाललो होतो .
बाजूला खोल नाला .
आणि आमची गाडी घसरली काय झाले कसे झाले काही समजल नाही आता नाल्यात पडणार ह्याची पूर्ण खात्री पटलेली .
आम्ही काहीच केले नाही(काही करण्या एवढे जाणकार पण नव्हतो)
पण स्वतःच गाडी नी स्वतचं सावरलं आणि सुरक्षित स्थिती मध्ये आणले.
पडलो नाही पण भितीनी गाळण उडाली होती.
गाडी नी स्वतः च स्वतःला सावरलं ही आमची अंध श्रद्धा समजा.
आम्ही तर काहीच प्रयत्न केले नव्हते
16 Nov 2019 - 10:46 pm | ट्रम्प
माझी मुलगी एक्टिवा गाड़ी चालवायला शिकल्या नंतर एकदा वडिलांना घेवून दुकानात जात असताना काही तरी कारणामुळे गाड़ी स्लिप झाली व दोघेही रस्त्यावर पडले पण दुखापत झाली नव्हती .
गाडी सरळ करताना बॅलन्स व्हावी म्हणून वडिल गाडीच्या सीटला दोन्ही हाताने पकडून उभे होते , पण त्याच वेळी मुलीच्या हाताने चुकुन एक्सीलेटर पिळला गेला मग काय एक्टिवा गाडी 40 / 50 फुट ड्रायव्हर शिवाय धावत होती आणि वडील सीटला पकडून गाडिबरोबर धावत होते .
शेवटी त्या दोघांची स्पर्धा रस्त्याच्या शेजारी असलेल्या ऐका खड्यात संपली .
हा विषय आठवला की आमच्या घरात हास्याचे फवारे उडतात .
17 Nov 2019 - 12:48 am | जॉनविक्क
मी बंगळुरात एका सिग्नलपाशी माझ्याच नादात चालत होतो, समोरून एक पैलवान passion वरून डबलसीट आला ज्याच्या हॉर्नकडेही माझे सपशेल दुर्लक्ष झाले व तो मला चुकवता चुकवता माझ्या उजव्या हाताला धडकला, माझ्या हाताच्या धक्यामुळे त्याचे हँडल लगेच फिरून त्याच्या चालत्या गाडीचा तोल सावरता न आल्याने तो पुढे जात वेडी वाकडी वळणे घेत साथीदारासोबतच रस्त्यावर धाडकन कोसळला. इतरांना नक्की कोणाची चूक हे समजण शक्यच न्हवते, तो पडणार याचा अंदाज रिफ्लेक्स मोडमध्येच येऊन मी लगेच मला अतिशय जोरात धक्का बसल्याचे नाटक करत तिथेच रस्त्यावर आडवा झालो. रिकामटेकडे लोक आमच्या भोवताली जमले व आम्हाला उठवून कोणाला काही लागले नाही याची खातरजमा करून काळजी घ्या वगैरे व्यवस्थित रहा वगैरे सुनावून आपापल्या कामात गुंतून गेले.
साऊथमधे माझ्याबाबत घडलेली ही सत्य घटना आहे, उगाकोणी लुनावाले ब्रम्हेची आठवण करू नये.
17 Nov 2019 - 9:19 am | जेम्स वांड
आमच्या दाद्यानं कुठूनतर हट्ट करून एक सायकल मिळवली होती. मला म्हणाला तू माझी लहानपणीची टोबो सायकल चालव, म्हणलं हाड. कारण तोवर जेन्ट्स सायकल कात्री मारून चालवायला शिकलो होतो, एकदम डोक्यात काय आलं कोणास ठाऊक पावण्यांची सायकल उचलून सुटलो दादा मागं, पार सीट वर बसून, कोटातून बाहेर पडायला लागलो तशी सायकल च्यायला सुटली की मोकाट ब्रेकचे गट्टू घासलेले होते आता आली का पंचाईत. त्यातच रस्त्यात आला एक खड्डा अन आमचं सेंटर फ्रेश आणि जेन्ट्स सायकलीचा दांडा ह्यांचं सुरेख संगम होऊन आमच्या तोंडून सुरेल संगीत सुरू झाले. पुढं एक म्हातारी चालली होती पाक लुगड्याचा काष्टा वगैरे मारून घातली की सायकल म्हातारीच्या दोन तंगड्यात पाक नेली म्हातारी 8 10 फूट पुढल्या टायरवरच बसवून मग मात्र म्हातारीचा पट्टा ऐकून रडूच कोसळले होते.
18 Nov 2019 - 9:31 am | पाषाणभेद
आरारारा, मुडदा बशिवला तुझा त्या म्हातारीनं!!!
20 Nov 2019 - 10:14 am | नीळा
पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी साईड कार असलेली एक्टिव्हा घेतली... होती. वयाच्या बत्तीसाव्या वर्षी तोपर्यंत कुठलेही वाहन चालवले नव्हते संध्याकाळी गाडीची डिलिव्हरी घरीच मिळाली..सोसायटीच्या रस्त्यावरती थोडी-थोडी चालवायची सुरुवातीला प्रॅक्टीस केलीणि दुसरे दिवशी गाडी घेऊन थेट कामावर गेलो मस्त कम्फर्टेबली चालवत होतो मजा पण येत होता. संध्याकाळी घरी परत येताना मुलुंड स्टेशन ला जावे लागले. संध्याकाळची वेळ आणी स्टेशन चा रस्ता, बाजारातला त्यातच ट्रॅफिक जाम होते रिक्षावाले कट मारत होते मी प्रचंड कनफ्युज झालो आणि साईड कारचे चाक रिक्षाच्या दरवाजातून आत जाऊन आत अडकून बसले.... हा गोंधळ ..मी गाडी सोडवायचा प्रयत्न करतोय..मागुन लोक बोंबलतायत .आता हसायला येते तेव्हा हवा टाइट झाली होती
20 Nov 2019 - 3:07 pm | विनिता००२
हसून हसून पोट दुखलं...सारखं डोळ्यापुढे ते दृश्य येतंय.
25 Nov 2019 - 4:50 pm | खिलजि
सुंदर धागा काढलाय तुम्ही,, मज्जा आणलीत .. इथे भरपूर वाव है पण भरपूर टंकावेसुध्दा लागेल.. इथे आठवणी पेस्तवनार एवढं नक्की .. पक्का वादा , खिलजीचा.. आणि मी माझी वचने सहसा मोडत नाही दुविसाहेब ..