बुरहानपूर आणि महेश्वर

Primary tabs

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
2 Nov 2019 - 9:42 pm

भारतातल्या सगळ्या राज्यांमधलं मध्य प्रदेश हे माझं आवडतं राज्य आहे. मला जुने महाल, गढ्या, राजवाडे, किल्ले, मंदिरं, छत्र्या, मशिदी, थडगी आणि स्मारकं पहायला आवडतात. मध्य प्रदेशात हे सगळं मुबलक आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं हे राज्य आताशा नुकतंच प्रसिद्धीच्या झोतात येत असल्यामुळं इथे गर्दी कमी असते, शिवाय महाराष्ट्राला लागून असल्यामुळे ते पोहोचायलाही सोयीचे आहे. इंदोर, धर, मांडू, भोपाळ, भीमबेटका, भोजेश्वर, सांची, ओरछा, खजुराहो, पन्ना, उज्जैन, ग्वालियर, चंदेरी - मध्य प्रदेशातली ही अनेक ठिकाणं मी पालथी घातली असली तरी कान्हा, पेंच, बांधवगडसारखी अभयारण्ये आणि पचमढी, शिवपुरी, भेडागाठ अशी काही प्रेक्षणीय स्थळे अजून बाकी आहेतच. मी तर म्हणेन, नुसता मध्य प्रदेश जरी नीट पहायचा म्हटला तरी सहज तीन महिने लागतील.

मध्य प्रदेशातलं असंच एक अपरिचित पण सुंदर ठिकाण आहे बुरहानपूर. मला खात्री आहे, हे नाव, महाराष्ट्रातल्या काय, मध्य प्रदेशातल्याही अनेकांनी ऐकले नसेल. पण आज जरी हे शहर विस्मृतीत गेले असले तरी इतिहासात ह्या शहराला मोठे महत्व होतं. सम्राट जहॉंगीरनं आपला मुलगा खुर्रमला शाहजहान ही पदवी देऊन इथला सुबेदार म्हणून नियुक्त केलं आणि शाहजहानची राणी मुमताज इथल्याच ‘शाही किल्ल्या’त १७ जून १६३१ रोजी आपल्या चौदाव्या मुलाला जन्म देताना मरण पावली. खरंतर ताजमहल सुद्धा इथेच बनवला जाणार होता, पण इथल्या मातीत वाळवी आहे या एकाच कारणास्तव (https://www.patrika.com/khandwa-news/why-taj-mahal-was-not-built-in-burh...) तो आग्र्याला हलवला गेला.

महेश्वरविषयी मराठी माणसाला सांगायला नको. मल्हारराव होळकरांच्या सून आणि खंडेराव होळकरांच्या पत्नी, आणि त्यांच्यापश्चात आपले राज्य मोठ्या हिमतीने, नेटाने, प्रामाणिकपणे, न्यायाने, उत्तमरीत्या चालवणा-या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि त्यांचे राज्य महेश्वर याचा परिचय प्रत्येक मराठी माणसाला असतोच.

तर अशा ह्या बुरहानपूर आणि महेश्वरची २०१७ सालच्या ३० मे ते ०३ जून या कालावधीत आम्ही सहल केली. हे प्रवासवर्णन त्या सहलीला शब्दबद्ध करायचा एक प्रयत्न आहे.

दिवस पहिला - ३० मे

मध्य प्रदेशातली ही दोन्ही ठिकाणं काही तासांच्या अंतरावर असल्यानं ती आम्ही स्वत:च्या गाडीनं फिरणार होतो. जर गाडीनं कुठे लांब जायचं असेल तर पहाटे लवकर निघण्याचा नियम मी कटाक्षानं पाळतो. पुण्यातून बाहेर पडणारा कुठलाही रस्ता घ्या, जर उशीर झाला तर तुम्ही अडकलाच म्हणून समजा. त्यामुळे आम्ही लवकर निघालो. औरंगाबाद रस्त्यावर (हलक्या वाहनांना) पथकर माफ केल्यापासून ह्या रस्त्याची कुठला गंभीर अपघात होणार नाही इतपतच जेमतेम निगा राखली जाते, तेव्हा नगरपर्यंत आमचा वेग साधारणच होता. नगरला पोचल्यावर माझ्याकडून एक मोठी चूक झाली. मी नगर बाह्यवळण रस्ता पकडला. ह्या रस्त्याला रस्ता म्हणण्यापेक्षा एकत्र नांदत असलेल्या खड्ड्यांचा समूह म्हणणे योग्य ठरेल. यातले काही खड्डे एवढे मोठे होते की त्यांच्यात चक्क वृक्षारोपण करता आले असते. ह्या एका चुकीने आमचा एक तास खाल्ला आणि औरंगाबादला पोचेपर्यंत अकरा वाजले. नंतरचा रस्ता दुपदरी आहे, त्यामुळे बुरहानपूरला पोचेपर्यंत तीन वाजून गेले. आम्ही हॉटेलवर गेलो, जेवलो आणि थोडी विश्रांती घेतली. नंतर निघालो ‘शाही किला’ पहायला.

‘शाही किला’ बुरहानपूर शहराच्या अगदी मध्यभागी आहे. ताप्ती नदीच्या किना-यावर असलेला हा किल्ला जवळपास सात मजली उंच आहे. पण ते जुनं सौंदर्य आज ना ऊरलं आहे ताप्ती नदीकडे ना शाही किल्ल्याकडे. या सुंदर किल्ल्याचे आज काही अवशेषच शिल्लक आहेत. असं म्हणतात की किल्ल्याचं सौंदर्य पाहून मुघल बादशहा शाहजहान या किल्ल्याच्या प्रेमात पडला. आपल्या या प्रिय किल्ल्याचा त्यानं तो सत्तेवर असताना बराच विस्तारही केला.

प्रवेशशुल्क घेऊन आम्ही आत गेलो. शाही किल्याचे मुख्य आकर्षण आहे ‘शाही हमाम’. इतिहास असं सांगतो की शाहजहाननं आपली राणी मुमताज हिच्या आंघोळीसाठी खास हा हमाम बनवून घेतला. हमामची अंतर्गत रचना देखणी आहे आणि रंगकाम चित्तवेधक. हा बनवणा-यानं इथे पाण्याबरोबरच प्रकाशही खेळता राहील याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं आहे. मध्यभागी असलेल्या त्या छोट्या टाकीकडे बघून वाटतं, कदाचित इथेच बसून मुमताझनं ते अत्तरं, गुलाबाच्या पाकळ्या टाकलेलं कडकडीत पाणी आपल्या अंगावर घेतलं असेल!

हमाम पाहून झाल्यावर आम्ही किल्ल्याचा नदीच्या बाजूचा भाग पहायला गेलो. मुख्य दरवाज्यातून आपण प्रवेश करतो तो जमिनीला समतल असलेला भाग आणि ताप्ती नदीवर असलेला अनेक मजल्यांचा भाग हे दोन भाग अशा काही खुबीने जोडले आहेत की पहिला संपतो कधी आणि दुसरा सुरू होतो कधी ते कळतच नाही. थोडे पुढे आलो की ताप्ती नदी समोर येते. भारतातल्या बहुतेक नद्यांप्रमाणे ही नदीही आज प्रदूषित झालेली आहे. पण एके काळी जेव्हा या नदीचे पाणी निर्मळ असेल आणि हा किल्ला ऐन बहरात असेल तेव्हा ते दृश्य किती सुंदर असेल हा विचार मनात आला की अंगावर शहारा आल्याशिवाय रहात नाही.

ताप्ती नदीवरून येणारा गार वारा खात आम्ही बराच वेळ बसलो. शेवटी अंधार पडल्यावर निघालो. हॉटेलवर आलो आणि जेवलो. दिवसभराचा शिणवटा आता बोलू लागला होता. खोल्यांमधे शिरलो, AC सुरू केला आणि गादीवर आडवे झालो. उद्या? बुरहानपूर दर्शन.

दिवस दुसरा - ३१ मे

आमचा आजचा पहिला थांबा होता ‘राजा की छत्री’. मुघल बादशहा औरंगजेब यानं आपला विश्वासू सरदार ‘राजा जयसिंग’ याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ ही छत्री बांधली. ही छत्री एका ओसाड, निर्जन जागी आहे - तिच्याकडे जाणारा रस्ताही चिंचोळा आणि खराब आहे. पण याची दुसरी बाजू अशी की ही छत्री अगदी निसर्गरम्य परिसरात वसलेली आहे. आजूबाजूला बरीच झाडी आहेत, केळीची बाग आहे.

३२ खांबांची ही छत्री जवळपास १० फूट उंचीच्या जोत्यावर उभी आहे. छत्र्यांमधे खांब सोडले तर मूर्ती वगेरे असे काही नसते, ह्या छत्रीचेही असेच आहे. पण त्याचमुळे कदाचित ही बनवणा-यांनी आपले सारे लक्ष तिच्या खांबांवर केंद्रित केले असावे. खांबांवरचे कोरीवकाम लक्षवेधक आहे, दोन खांबांना जोडणा-या महिरपही देखण्या आहेत.

सकाळचे कोवळे ऊन पडले होते, वातावरणात थंडावा होता आणि छत्री पहायला फक्त आम्हीच होतो. आपल्या सहलीचे पैसे वसूल झाले असे वाटायला लावणारे काही क्षण सहलीत येतात, हा असाच एक क्षण होता.

छत्री पाहून झाल्यावर आम्ही निघालो ‘काला ताज’ अर्थात शाह नवाझच्या थडग्याकडे. ताजमहालची छोटी प्रतिकृती भासत असल्यामुळे आणि काळ्या दगडात बनवल्यामुळे या थडग्याला ‘काला ताज’असं म्हटलं जातं. (ही ऐकीव माहिती आहे - हा ‘काला ताज’ आपल्याला अस्सल ताजसारखा दिसत नसेल तर प्रस्तुत लेखकाला दोष देऊ नये.) ख-या ताजमहालाप्रमाणे हा ताजमहालही आहे एका नदीच्या किनारी. ‘राजा की छत्री’कडे जाणा-या रस्त्याला वाईट म्हटले तर ‘काला ताज’कडे जाणा-या नदीपात्रातल्या रस्त्याला महाभयानक म्हणायला हवे. गाडी दहाच्या वेगाने चालवून (आणि तरीही ती दहा ठिकाणी घासून) आम्ही कसेबसे थडग्याजवळ पोहोचलो. आजूबाजूची वस्ती अतिशय गलिच्छ आणि बकाल होती. आम्ही आत शिरलो तर ४/५ रिकामटेकडे तरूण बिड्या ओढत बसले होते आणि ७/८ पोरे शिवाशिवी खेळत होती. असे असले तरी सीमाभिंतीच्या आतला परिसर नीटनेटके ठेवण्याचा कर्मचारीवृंदाने प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसत होता. आतलं आवार स्वच्छ होतं आणि त्यासमोरची बाग नीटनेटकी.चार मिनारी, मध्यभागी असलेला मुख्य घुमट आणि आजूबाजूला छोटे घुमट अशी सर्वसाधारण मुस्लिम वास्तूसारखीच या थडग्याचीही रचना आहे.


गर्भगृहात दोन थडगी दिसतात - मोठे थडगे अर्थातच शाह नवाझचे आहे - दुसरे लहान थडगे कुणाचे असावे?‘काला ताज’ पाहून झाल्यावर आम्ही मोर्चा वळवला ‘खरबुजा महल’कडे. शाहजहाननं बांधलेली, त्याचा मुलगा ‘शाह शुजा’ची पत्नी ‘बिल्किस बेगम’ची ही कबर आहे. तिच्या विशिष्ट आकारामुळं तिला नाव मिळालं, ‘खरबुजा महल’. ही कबर आहे बुरहानपूर शहरात आणि तिच्यापर्यंत पोहोचण्याचा, सध्या वापरात असलेली एक मुस्लिम दफनभुमी हाच एकमेव रस्ता आहे. दोन ठिकाणांना भेटी देऊन घरातल्या इतरांचा उत्साह मावळला होता, तेव्हा आम्ही आणि आमच्या आईसाहेब असे आम्ही दोघेच हा महाल पहायला गेलो. दोन्ही बाजूला कबरी असलेल्या एका चिंचोळ्या वाटेने चालत जाऊन आम्ही ‘खरबुजा महल’जवळ पोचलो.


बुरहानपुरच्या प्रमुख आकर्षणांमधे या कबरीत असलेल्या भित्तिलेपचित्रांचा (Frescoes) समावेश होतो. याचे कारण म्हणजे ही भित्तिलेपचित्रे अजूनही सुस्थितीत आहेत आणि त्यांचे रंग अजूनही उठावदार. फुले, फुलदाण्या, वेली, तारे, कमानी ही मुस्लिम चित्रकलेत पुन्हा पुन्हा येणारी रूपचिन्हं (Motifs) वापरून या कबरीत चित्रकाम केलेलं आहे. आणि आकारांमधे जितकी विविधता दिसते तेवढीच आहे या चित्रांमधे दिसणा-या रंगांमधेही. आज अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बनलेले आपले रंग ५ वर्षांत ओळखेनासे होतात, मग फक्त माती, फुले, पाने, बिया, प्राण्यांची विष्ठा वापरून बनलेले हे रंग ४०० वर्षे कसे बरे टिकले असावेत?
खरबुजा महालात सुमारे १०/१५ मिनिटे घालवून आम्ही परतलो. पुढचं ठिकाण होतं ‘जामी मस्जिद’. पण इथे चौकशी केल्यावर आत्ता मशीद बंद असल्याचं कळलं. आता ती खरोखरच बंद होती की आम्ही आत यावं अशी त्या लोकांची इच्छा नव्हती ते काही कळलं नाही. पण काय करणार? आम्ही हॉटेलवर परतलो आणि जेवण करून झोपलो.

संध्याकाळी सहाला परत मशिदीत पोचतो तर पुन्हा तेच उत्तर. आता मात्र आमच्या मातोश्रींचा पारा चढला. ‘दुपारी तेच, आत्ता तेच, काय चाललंय काय तुमचं?’ ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली आणि आम्ही आत शिरलो. जामी मशिद सुंदर आहे, पण तिला भेट देणारे लांबून लांबून येतात ते तिच्या आत असलेली एक खास वस्तू पाहण्यासाठी. तो म्हणजे तिच्यात असलेला संस्कृत भाषेतील शिलालेख. असं म्हणतात की संस्कृत भाषेतील शिलालेख असलेली ही भारत काय, जगातली एकमेव मशीद असावी.

जिथं मुसलमान शासकांचं राज्य होतं अशा भारतातल्या जवळपास प्रत्येक शहरात जामी मशीद आढळते. असं असलं तरीही भारतातल्या प्रत्येक जामी मशीदीचं रुप वेगळं आहे. ती जिथे बनली तिथले शासक, लोक आणि बनवणारे वास्तुविशारद यांनी तिच्यावर आपला प्रभाव पाडला आहे. बुरहानपूरची जामी मशिदही अशीच आहे - इतर जामी मशिदींपेक्षा वेगळी, आपला एक वेगळा स्वभाव, रुपडं असणारी.
जामी मशिद पाहून आम्ही बाहेर पडलो. रमजानचा महिना चालू होता आणि आम्ही होतो तो भाग होता मुस्लिमबहुल. तेव्हा आजच्या रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी सामिष खावे असे ठरले. आम्ही तिथल्या प्रसिद्ध ‘रेहमानिया’ हॉटेलातून काही पदार्थ घेतले, जवळच्याच एका आईस्क्रीमवाल्याकडून फालुदा घेतला आणि हॉटेलवर पोचलो.

उद्या? बुरहानपूरमधली राहिलेली ठिकाणे पाहून महेश्वरकडे प्रयाण.

प्रतिक्रिया

तुम्ही जी 'राजा की छत्री' पहिलीत ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध लढलेला, महाराजांना आग्र्यास पाठवणारा प्रसिद्ध सरदार मिर्झाराजा जयसिंग याची समाधी. तो आमेरचा राजा (पुढे त्याचा नातू सवाई जयसिंग याने आजचे जयपूर शहर वसवले). तो मोठा तालेवार सरदार होता, आणि त्याच्या मदतीशिवाय औरंगझेबास सिंहासन मिळाले नसते. जयसिंग महाराज आग्ऱ्यात असतानाच वारला आणि त्याच्या वंशजांनी ती समाधी बनवली आहे, औरंगझेबकालीन असली तरी त्याने बनवलेली नव्हे.

शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात मोगल राज्य नव्हते त्या वेळी बऱ्हाणपूर मोगल सीमेवरचे मोठे शहर होते, दक्षिणेचा नाका म्हणता येईल. सुरतमधून येणारा महत्वाचा रस्ता तिथून जात असे. त्यामुळे इथे जहांगीर, शाहजहान हे स्वतः राहून गेले आहेत.

औरंगझेबाच्या काळात मोगल सीमा अजून खाली दक्षिणेत गेल्याने औरंगाबाद जास्त महत्वाचे बनले. निजामाची राजधानी १७६३ पर्यंत औरंगाबादेत होती, ती पुढे हैदराबादेस गेली. मराठा आणि ब्रिटिश काळात ही सगळी जुनी मोगली शहरे (नगर, औरंगाबाद, विजापूर, बऱ्हाणपूर) मागे पडली आणि जुने वैभव कधीच परतले नाही.

एक_वात्रट's picture

2 Nov 2019 - 10:23 pm | एक_वात्रट

मनो, आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. आत्ताच या छत्रीजवळ लावलेला पुरातत्त्व खात्याचा अधिकृत फलक (महाजालावर शोधून) वाचला, खरंच त्यात ही छत्री औरंगजेबाने बांधली असा उल्लेख नाही. महाजालावर कुठेतरी वाचून मी हे लिहिले असावे.

गुल्लू दादा's picture

3 Nov 2019 - 1:10 am | गुल्लू दादा

पुढील भागाच्या प्रतीक्षेत... मी जळगाव जामोदला असताना बुऱ्हाणपूरला नेहमी खरेदीसाठी जात असे..परत जाणे झाले की तुम्ही सुचवलेले ठिकाणे नक्की पाहीन...धन्यवाद.

मला जुने महाल, गढ्या, राजवाडे, किल्ले, मंदिरं, छत्र्या, मशिदी, थडगी आणि स्मारकं पहायला आवडतात. मध्य प्रदेशात हे सगळं मुबलक आहे.

... हे वाचून ही लेखमाला वाचण्याची उत्सुकता वाढली आहे एवढेच सध्या लिहीतो. (माझीही अगदी हीच आवड असून अनेक वर्षांपासून मी या विषयावर अनेक तैलचित्रे रंगवलेली आहेत, पैकी एका तैलचित्राची जन्मकथा हा लेखही मिपावर लिहीला होता) वाचून मग सविस्तर प्रतिसाद देईन. अनेक आभार.
महेश्वर हेही माझे खास आवडीचे ठिकाण.

अशा अनोख्या जागेच्या सहली आवडतात. तिथे आयोजित यात्रा कंपन्या सहली नेत नाहीत ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. खरे इतिहास, इमारत, चित्रं शिल्पकलांचे हौशी जातात. बुरहानपुर दाखवल्याबद्दल आभार. खुप छान जागा आहेत.

भुसावळ आणि खांडवा दरम्यान हे स्टेशन आहे. ओंकारेश्वरला जाताना इकडे थांबायचा विचार केला होता. पण रेल्वे पहाटे पाचला जात असल्याने सोडून दिला.
पुढचा भाग लगेच लिहा.

जेम्स वांड's picture

3 Nov 2019 - 7:41 am | जेम्स वांड

तुमच्या धाग्यात अजून जास्त फोटोजची पखरण असती तर मजा आली असती एकंदरीतच. धाग्यात फोटो कसे सुंदररित्या समाविष्ट कारावेत ह्यासंबंधी टर्मिनेटर ह्यांचा सल्ला घेतल्यास नक्की फायदाच होईल असे वाटते.

चौकटराजा's picture

3 Nov 2019 - 9:50 am | चौकटराजा

बुर्हानपूर ची नोद घेतलेली आहे . भीमबेटकाशी कोर्टशीप चालू आहे. महेश्वरचे देवालय भारत देशाच्या पातळीवरचे एक सर्वोत्तम पैकी एक आहे व ते पाहिलेले आहे. मान्डू त काय सान्गावे ?

जॉनविक्क's picture

3 Nov 2019 - 3:18 pm | जॉनविक्क

अन धागा.

वेगळ्या जागेची ओळख आवडतेय, फोटो सुरेख आहेत, खास करून खरबुजा महल कबरीत असलेल्या भित्तिलेपचित्रांचे.

पुढला भाग लवकर टाका.

चित्रगुप्त's picture

3 Nov 2019 - 11:38 pm | चित्रगुप्त

बर्‍हाणपूरजवळ खूनी भंडारा आणि अशीरगडचा किल्ला याही जागा अवश्य भेट देण्यासारख्या आहेत. अर्थात हे दोन्ही मी ४५ वर्षांपूर्वी बघितलेले आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती ठाऊक नाही.

गुल्लू दादा's picture

4 Nov 2019 - 12:06 am | गुल्लू दादा

मागच्या वर्षीच जाऊन आलोय अशिरगडला. पाहण्यासारखा आहे...थोडा भीतीदायक वाटला..मजा आली बघायला.

कंजूस's picture

4 Nov 2019 - 5:28 am | कंजूस

Epic channel वर बुरहानपूर, अशिरगड,सिंधुदूर्ग, जंजिरा, कलिंजर,असे अनेक किल्ले एकांत Ekaant कार्यक्रमात दाखवलेले आहेत. काही विशेष इमारती संरचना Sanrachana यामध्ये आहेत.

Play store App -
EPIC ON ( IN10 Media private Ltd.)

अनिंद्य's picture

4 Nov 2019 - 12:02 pm | अनिंद्य

अरे वा, मध्यप्रदेशचा अनवट दौरा ! भटकंती आवडली. खरबुजा महलची भित्तीचित्रे विशेषच आवडली, आमेर किल्ल्याच्या प्रमुख द्वारासारखी आहेत.

आणि हो, तुम्ही लेखात वापरलेले मराठी शब्द चपखल वाटले -
भित्तिलेपचित्र = Frescoes
रूपचिन्हं = Motifs

मुक्त विहारि's picture

27 Nov 2019 - 3:27 pm | मुक्त विहारि

धन्यवाद