( १ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
18 Oct 2019 - 4:09 pm

मागच्या आठवड्यात खजुराहो, झाशी, ओरछा अर्थात चांदेला आणि बुंदेला प्रांतात भटकंती झाली.

गाभा

भारतातील परदेशी पर्यटकांची जी आवडती ठिकाणं आहेत त्यात ताजमहाल, गोवा, पॉन्डीचेरी, हरद्वार,वाराणसी,कूर्ग,खजुराहो, अजिंठा,वेरुळ, केरळ आणि राजस्थान राज्ये येतात. मागच्या आठवड्यात यांपैकी खजुराहो पाहण्याचं जमलं कारण तिथे सकाळी सहाला पोहोचणारी इंदौर-खजुराहो गाडी (19663) एक जुलैला (२०१९)सुरू झाली. तसा खजुराहो विमातळ आहेच (५ किमीवर) , दिल्लीची एक गाडी स्टेशनला (८किमी)अगोदरपासून आहे.

फक्त खजुराहो न करता त्याला जोडून काय पाहता येईल याचा शोध घेतला. कलिंजर किल्ला, चित्रकूट, अलाहाबाद,वाराणसी, जबलपूर आहे. पण झाशीकडे जाण्याचं ठरवलं. म्हणजे चांदेला आणि बुंदेला राजवंशीय इमारती, महाल, किल्ले, देवळे. जाताना उज्जैन,इंदौर,विदिशा - सांची करता येणार होतं. उज्जैनला बारा तास थांबण्याचं ठरलं. म्हणजे तसे पर्याय भरपूर निघतात रेल्वेने.
_____________________________

संपूर्ण सहल माहिती एकटाकी लेखात न लिहिता इच्छुक पर्यटकांना उपयुक्त असे जावे कसे, काय पाहाल, हॉटेल्स, खानावळी या प्रकारे वर्गवारी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. शोधायला/अद्ययावत करायला सोपे जाईल.

१)थोडक्यात प्रवास आराखडा -
१.१) पुणे - इंदौर गाडीने (22943) उज्जैन.
१.२) इंदौर - खजुराहो गाडीने (19663)
खजुराहो.(दोन रात्री दोन दिवस.)
१.३) खजुराहो - उदेपूर ट्रेनने ( 19665) दतिया ;
दतिया (तीन तास); दतिया ते झाशी बस.
झाशी (दोन रात्री दोन दिवस)..
१.४) झाशी ते मुंबई पंजाब मेलने (12138) परत.
क्रमांक तीनची गाडी आग्रा,जयपूरलाही जाते. ते पर्यायही आहेत.

२) उज्जैन -
२.१) महांकाळेश्वर दर्शन
फारच वेळ लागला. आता २५०रुपयांची वेगळी रांगही सुरू केली आहे. धार्मिक ठिकाण. रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमिटरवर आहे.
२.२) द्वारकाधीश गोपाल मंदीर
मुख्य बाजारात लपलेले मोठे मंदिर. अब्दालीने सोमनाथमधून नेलेली चांदीची दारे महादजी शिंदे यांनी गझनी स्वारीत सोडवून परत आणली ती इथे लावली आहेत. भरपूर ओवऱ्या आहेत. पाचू, माणिक आहेत. मंदिरासमोरच्या छत्री चौकात माधवरावांचा पुतळा दिसतो.
फोटो १
द्वारकाधीश मंदिर , उज्जैन.

२.३) अर्धा आणि पूर्ण दिवसांची उज्जैन सहल असते त्यात क्षिप्रा नदीकाठची बरीच स्थळे दाखवतात. गेलो नाही; मागच्या सहलीत पाहिली होती.
२.४) राहाणे आणि खाणे
ज्योतिर्लिंग स्थान असल्याने स्टेशनजवळ आणि महांकाळेश्वरच्या आसपास खूप सोयी आहेत. नवीन भक्त निवास स्वस्त नाही पण स्वच्छ. बहुतेक शाकाहारी खानावळी.
२.५) कुठून कसे
मुंबई /पुणे- उज्जैन .ट्रेन
उज्जैन - खजुराहो.ट्रेन 19663 चार दिवस.
२.६) इतर माहिती
जुने शहर. धार्मिक जागा. वेधशाळा खास नाही.
३) खजुराहो -
३.१) खजुराहो ठिकाणे
चांदेला वंश राजांनी दहाव्या आणि अकराव्या शतकांत बांधलेली मंदिरे. बरीचशी सुस्थितीत. आठ ते पंचवीस फुट उंच चौथऱ्यावर. बाह्य भागात दोन तीन पट्ट्यांत देवादिकांच्या, मिथुनांच्या,नायिका, विद्याधरांच्या मूर्ती. पंधरा एक मंदिरे खजुराहो गावात विखुरलेली आहेत. अंतराप्रमाणे तीन भाग ठरवले आहेत.
अ) पश्चिम मंदिर समुह : हा भाग आणि शिवसागर तलाव मध्यवर्ती समजण्यात येतो. इथे आठ मंदिरे आहेत, रोज सकाळी साडेसहा ते सहा पाहता येतात. तिकिट रु चाळीस. याच तिकिटात म्युझिअम ( शुक्रवारी बंद.)पाहता येते पण ते विशेष नाही.
अ१) लक्ष्मी मंदिर
अ२) वराह मंदिर
अ३)लक्ष्मण मंदिर
अ४) कांदेरिया महादेव
अ५) जगदंबि
अ६) विश्वनाथ
अ७) नंदी मंडप
अ८)प्रतापेश्वर

मतंगेश्वर मंदिर या समुहाच्या कुंपणाच्या भिंतीबाहेर ठेवले आहे आणि अगदी लक्ष्मणाच्या जवळ आहे. इथे पुजा होते, बाकी समुहात कुठेही नाही.
फोटो २
मतंगेश्वर मंदिर, खजुराहो.

फोटो ३
लक्ष्मण मंदिर, खजुराहो.

फोटो ४
वराह, खजुराहो.

वराह, खजुराहो.

ब) जैन मंदिर समुह : वरील समुहापासून पाच किमी दूर जुन्या खजुराहो गावात ब्रम्हा, वामना, जवारी या तीन मुख्य हिंदू मंदिरांसह अनेक जैन मंदिरे एका वेगळ्या आवारात आहेत - आदिनाथ, पार्श्वनाथ, आणि शांतिनाथ.
फोटो ५
शिल्पपट, पार्श्वनाथ जैन मंदिर, खजुराहो.

क) दक्षिण मंदिरे : जैन मंदिरांपासून आणखी तीन किमि वर दुल्हादेव आणि चतुर्भुजा ही दोन.
ड) चौसठ योगिनी मंदिर : तलावा मागे. तांत्रिक लोकांचे. एकेकाळी चौसठ कोनाड्यात चौसष्ट उपदेवता मुख्य कालीभोवती होत्या.
ई) राणेह फॉल्स : वीस किमि दूर आहे. ओटो रिक्षाचे रिटन भाडे ५०० रुपये अधिक तिकिट - १-३ व्यक्ती ३७५रु, १-५ व्यक्ती ४७५ रु. हे जास्ती वाटल्याने गेलो नाही.

३.२) कुठून कसे
रेल्वे स्टेशनपासून बस स्टँडचे १००रु, मुख्य पश्चिम मंदिर समुह १५० रु ओटो रिक्षावाले घेतात. आठ किमि. वाटेतच एरपॉर्ट आहे. रस्ता रुंद आणि झाडांच्या सावलीचा आहे. एरपॉर्ट मागेच दुल्हादेव, चतुर्भुजा मंदिर आहे पण वेगळे यावे लागते.

हायर रिक्षा साईट सीइंग - सर्व मंदिरे, पाच तास, ६०० रु. परंतू मुख्य पश्चिम मंदिर समुह निवांतपणे आम्ही स्वत:च पाहिला पहिल्यादिवशी. जवळच होता.
दुसरे दिवशी पूर्व मंदिरे, जैन मंदिरे आणि दक्षिणेकडची दोन मिळून आठ किमिटरांतील विखुरलेली मंदिरे अडीच तासांत ओटो रिक्षाने पाहिली. २००रु. इकडे ऊन फार लागतं, छत्री/टोपी हवी.

खजुराहो ते दतिया इंटरसिटी ट्रेन (19665). डिस्टन्स रिस्ट्रिक्शनमुळे झाशी तिकिट मिळत नाही. दतियाचे मिळते.

३.३) इतर माहिती
मंदिरांत तोचतोचपणा आहे. कंदारिया (५%), लक्ष्मण(३%), पार्श्वनाथ, दुल्हादेव(१%) या मंदिरांत मिथुन शिल्पे आहेत. बारा पंधरा फुट उंचीवर आहेत. निम्मी शिल्पे व्याल (सिंह,हत्ती,घोडा याचे मिश्रण) नावाच्या काल्पनिक प्राण्याची आहेत. विष्णू, ब्रम्हा, नंदी, अश्वमुख,लक्ष्मी, गणपती, नायिका इतर ४५%.
पंचवीस फुटी चौथऱ्यांवर मंदिरे असल्याने पर्यटक लक्ष्मण आणि कंदारिया पाहून कटतात.
फोटो ६
शिल्पपट ,लक्ष्मण मंदिर, खजुराहो.

फोटो ७
शिलालेख, लक्ष्मण मंदिर, खजुराहो.

३.४) राहाणे आणि खाणे
पर्यटक अजून यायचे होते, हॉटेल्स रिकामी होती.
शिवसागर तलावाजवळ कृष्णा कॉटेज रु ५००रु उत्तम रुमस.
तलावासमोर हॉटेल Heritage Siddhi lakeside हे Oyo वर आहे. काही रुमस तलावाच्या समोर व्ह्यु आहेत. "कार्ड के उपर 2200,लिखा है ये फारिनर के लिये।अपना इंडिअन टुरिस्टों के 800 -1000।" - मालक.
बाजुचे हॉटेल Hotel Gautama हे GoStayम्हणजे तिथे बुक करायचे आहे. चार रुमस लेक व्ह्यु . एसी १५००, नानएसी १२००. ही घेतली. याचे लाऊंजही एसी, मस्त. नुकतेच नवीन केलय.
हा भाग शाकाहारींसाठी आहे हे कळलं. बाजुलाच बद्री (अगरवाल), गगन, अन्नपुर्णा तीन शाकाहारी खानावळी. बद्रीमध्ये गर्दी असते, सर्विस छान. पण तिखट फार.
चहा नाश्त्यासाठी तलावाच्या कडेलाच 'वेस्टन क्यान्टिन' टपरी. टापटीप. पोहे,चिज सँडविच, ब्रेडबटर,कॉफी.
मालक बोलका. खजुराहोमध्ये बंगालचे पर्यटक (बाबु) ग्रुप फार दिसतात. याबद्दल विचारलं.
"ये बंगाली लोग किधर रहते, खाते?"
"ये जो जैन मंदिरों का रोड है वहाँ के होटल नॉनवेज वाले। मच्छी मिलती है वहाँ ।"
३.५) Sound and Light Show ,Khajuraho
फोटो ८
साउंड अँड लाइट शो ?

At Western group of Temples
English : 06:30 to 07:25 pm
Hindi. : 07:40 to 08:35 pm.

३.६) गाइड?
फोटो ९
गाइड फी,खजुराहो

४) दतिया -
४.१) एक सात मजली महाल आहे गावात. बीर सिंग महल. हा बुंदेला प्रांत. थोडी चित्रे आहेत. तिकिट आहे.
४.२) कुठून कसे
दतियाचं तिकिट घ्यावं लागतं उदेपूर गाडीचं. ट्रेन दोनला पोहोचते. चार तास मिळतात. स्टेशनपासून ५ किमि.(ओटो १००रु) महल पाहून झाशी नॉनस्टॉप बसने झाशीला (३०रु/-सीट) गेलो.

५) झाशी जवळची भटकंती-

५.१) दतियाहून(२८किमि) झाशी येण्यास सहा वाजले होते आणि लवकर हॉटेल दोन दिवसांसाठी चेकइन करायचे होते.
दुसरा संपूर्ण दिवस ओरछा (१८ किमि) भटकंतीसाठी ठेवला होता.
५.२) राहाणे आणि खाणे, झाशी
इलाईट चौकात सोय होते. पाचसहा पर्याय आहेत. हॉटेल सनराइजमध्ये दोन दिवसांसाठी एसी रुम (२०००/-)घेतली. शहर भागामुळे रेट चढे असतात. बाजुलाच विधाता रेस्टॉरंट, श्रीराम भोजनालय, वंदना स्विट्स आहेत. हॉटेलने २४ तासाचे चेकाउट दिले होते पण गाडी दुपारी असल्याने अर्धा दिवसच झाशीसाठी उरला.

५.३) कुठून कसे, ओरछा.
झाशी बस स्टँडवरून शेअर ओटोने(२०/-, गर्दी करतात. म्हणून सात सिटांचे पैसे दिले.) एका पुलाचे काम चालू असल्याने बसेस तिकडे जाणाऱ्या बसेस बंद होत्या.
प्रथम राजामहलपाशी तिकिट घेणे (१०रु/-) हेच तिकिट सर्व ठिकाणी दाखवावे लागते. जपून ठेवणे.
आपल्याला रिक्षावाले रामराजा चौकात सोडतात. हा मध्यवर्ती भाग आहे. डावीकडे (पूर्व) महालाचा खंदक ,पूल. उजवीकडे (पश्चिम) रामराजा मंदिर आणि लक्ष्मी नारायण. पुढे दक्षिणेकडे चतुर्भुजा आणि अगदी शेवटी राजे लोकांच्या छत्र्या/समाधी बेटवा नदीकाठी आहेत.
५.३.१) जहांगिर महल
५.३.२) राय प्रविण महल
५.३.३) राजा महल
५.३.४) शीश महल
हे चार एका ठिकाणी आहेत. सात मजली इमारती, दूरवरचे दृष्य दिसेल.
राजा महल खास आहे. यामध्ये खालच्या दालनांमध्ये भित्तीचित्रे आहेत. एक दोन विशेष दालने सावधगिरीसाठी बंद ठेवली आहेत. रखवालदारास विनंती करून पाहा. मागच्या वेळेस पाहिली होती. अगदी वरच्या मजल्यावरच्या पश्चिमेकडच्या तीन खिडक्यांतून समोरच्या चतुर्भुजा मंदिरातील मूर्ती पाहता येते.
शीश महलात हेरिटेज हॉटेल चालवतात. सध्या नुतनीकरण चालू आहे. बघायला मिळत नाही.
महालाला तळघर आहे त्यात शेकडो सैनिक राहण्याची व्यवस्था आहे पण तिकडे खाली जाऊ देत नाहीत. पायखाने, हमाम पाहता येतात.
५.३.५) रामराजा मंदिर (रांग असते, गेला नाहीत तरी चालेल.) एक प्रकारचा मोठा मठच आहे. ओरछा भागाचा कारभार हा राम राजा चालवतो ही आख्यायिका स्थानिक लोकांकडून ऐका. साडे बाराला बंद.
५.३.६) फुलबाग गार्डन इथे बाजुलाच आहे. कारंज्यात पाणी सोडलेले नसल्याने मजा नाही.
५.३.७) लक्ष्मी नारायण मंदिर (१ किमि). थोडे उंचावर आहे. रामराजाच्या मागे रस्ता आहे त्याने दीड किमिवर. खूप मोठे आहे. लक्ष्मीचे वाहन घुबड याचा त्रिकोणी आकार या इमारतीस आहे. उडत जाणाऱ्या घुबडाचा आकार, तोंड, चोच वगैरे. फार थोडेच पर्यटक इथे येतात. बाहेरून आणि आतून भरपूर भित्तीचित्रे सुस्थितीत आहेत. शिवाय उंचावरून ओरछा दिसते.
फोटो १०
घुबडाच्या आकारातले लक्ष्मी नारायण मंदिर, ओरछा.

शिल्पे नेहमीच पाहतो, चित्रे ओरछा आणि रानी महल झाशी येथे पाहिली.
एक झलक -

ओरछा येथील लक्ष्मी नारायण मंदिरातील भित्तिचित्रे.
(( size 15 MB, 00:01:04))

५.३.८) चतुर्भुजा मंदिर रामराजा मंदिराला चिकटूनच आहे. हे सुद्धा एक उंच इमारतीप्रमाणे आहे. वरच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी अरुंद जिने आहेत. एक गम्मत.
५.३.९) छत्र्या
दक्षिणेकडे टिकमगड'कडे जाणाऱ्या रस्त्याने दीड किमिवर तीन छत्र्या उर्फ समाध्या बेटवा नदीकाठी आहेत. थोडे भयाण, एकांतवाली जागा पण बेटवा नदी पाहता येईल. इथे ती फार खोल नाही. छत्र्यांच्या शिखरांवर मोठे पक्षी बसलेले असतात संध्याकाळी. ही गिधाडे आहेत.
हे सर्व पाहायला एक दिवस जातो आणि पायऱ्या चढून उतरून पाय दुखायला लागले आहेत हे लक्षात येईल.
५.३.१०) राहाणे आणि खाणे, ओरछा
इथे मला राहण्याची हॉटेलं गावठाण वाटली. झाशीत राहिलो ते बरं झालं. आणि ट्रेनही तिकडूनच पकडायची होती. रामराजा चौकात महालाच्या पुलाअगोदर रूफ टॉप रेस्टॉरंट आहे. उत्तम. याच्याकडे टॉयलेटही चांगले आहे. याचा उपयोग झाला कारण दिवसभर फिरायचे होते. छोले भटुरे, लस्सी छान. स्लो सर्विस कारण तो हीटरवर बनवतो. नंतर लाईट गेल्यावर चहासुद्धा मिळाला नाही.
रामराजा मंदिरापाशी पेढे २००रु किलो. छान.
५.४) तिसरा अर्धा दिवस - झाशी शहरांत भटकंती.
पंजाब मेल साडे बाराला होती त्यामुळे सकाळचा वेळ झाशी फिरणार होतो.
५.४.१) रानी लक्ष्मीबाई पार्क
इलाइट चौकापासून जवळ आहे. सुंदर मोठी बाग, सात आठ कारंजे,स्वच्छ. गुलाब वाटिकाही आहे. पक्षी, खारी खूप.
५.४.२) म्युझिअम
बागेच्या पूर्वेला समोरच आहे. साडे दहाला उघडते. वगळावे लागले.
५.४.३) महाराष्ट्रीयन गणेश मंदिर
बागेच्याच्या तिनशे मिटर पुढे आणि झाशी किल्ल्याच्या मागच्या बाजुच्या बाजार रस्त्यावर हे मंदिर आहे. मराठी लोक वस्ती आहे. हे राहिलं.
५.४.४) रानी महल
राणीचं रहिवासस्थान जपलं आहे. खालच्या मजल्यावर शिल्पे ठेवून म्युझिअम केलय. वरच्या मजल्यावरील दालनांत भित्तीचित्रे आहेत. सुरेख.साडे नऊला उघडतो. तिकिट २५रु/-
रानी महल (१), झाशी.

रानी महल (२), झाशी.

साडे अकराला झाशी स्टेशनवर पोहोचलो. इथे तीन नावाजलेली क्यान्टिन्स होती पण आता दोन जेमतेम उघडी, एक चालू होते. खास नाही. आइआरसिटिसी दुसऱ्यांना ठेका देते पण ते चालवत नाहीत. रेल्वेमधले जेवण महाग करत आहेत पण खास नाही.
एकूण ही सहल ऐतिहासिक अभ्यासक आणि कलारसिकांसाठी आहे. परंतू सर्व ठिकाणचे चढ उतार पाहता विचार करावा.

गाडी नंबर 19663 , इंदौर ते खजुराहो आणि गाडी नंबर 19665 खजुराहो ते उदेपूर या दोन्ही गाड्यांत चहा, नाश्ता, जेवण वगैरे विकणारे अजिबात फिरकत नाहीत. आपले खाण्याचे समोसे, पोहे वगैरे पार्सल अगोदरच घेऊन ठेवा.

प्रतिक्रिया

भित्तीचित्रे सुरेख! बैजवार लेख, फोटो, व्हिडिओ येउद्यात.

जालिम लोशन's picture

18 Oct 2019 - 6:40 pm | जालिम लोशन

?

चौकटराजा's picture

18 Oct 2019 - 7:26 pm | चौकटराजा

मी ओर्छा व हम्पी च्या प्रेमात आहे ! याना व भीमबेटका यान्च्याशी प्रियाराधन चालू आहे !

प्रचेतस's picture

18 Oct 2019 - 8:11 pm | प्रचेतस

हंपी निव्वळ अद्भूत.
तिथली मंदिरे, तिथले राजवाडे, तिथल्या मूर्ती यासम तिथले भलेथोरले प्रस्तरखंडही.

सुमो's picture

19 Oct 2019 - 5:21 am | सुमो

<iframe width="260" height="443" src="https://www.youtube.com/embed/0eXzo79Nchg" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

असा कोड वापरुन बघितला.

सुमो's picture

19 Oct 2019 - 5:22 am | सुमो

तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहेच.

कंजूस's picture

20 Oct 2019 - 3:16 pm | कंजूस

@सुम@, धन्यवाद. बदल केला.
लेख लिहिला आहे आताच.

जालिम लोशन's picture

20 Oct 2019 - 4:32 pm | जालिम लोशन

सुरेख

आला का लेख? वाचते सावकाशीने.

सुधीर कांदळकर's picture

22 Oct 2019 - 6:28 am | सुधीर कांदळकर

जगभरात खजुराहो एवढे लोकप्रिय आहे ते का ते थोडेफार कळले. सूक्ष्म कलाकुसर छान टिपली आहे. हे जास्त सुंदर की ते असा प्रश्न पडतो. सारेच अतिसुंदर, शब्दातीत. महाकवी टागोर म्हणाले होते की इथे पाषाणांची भाषा शब्दांना मागे टाकते. ते किती खरे आहे ते कळते. आता या वर्षींची सहल नक्की इथेच.

आपण बहुतेक ठिकाणची प्रेक्षणीय स्थळांची यादी दिली आहे. त्यामुळे सहलीचे आयोजन सोपे झाले आहे. बहुतेक ठिकाणचे हॉटेलभाडे, प्रवेश शुल्क वगैरे दिले आहे. त्यामुळे अंदाजपत्रक बनवणे पण सोयीचे झाले आहे.

सुंदर प्रचि, छान लेख आणि सोबत पर्यटन, स्थानिक प्रवास आणि आर्थिक अंदाजपत्रक असा बहुपेडी धमाका दिलेला आहे. अनेक अनेक धन्यवाद.

कंजूस's picture

22 Oct 2019 - 9:01 am | कंजूस

धन्यवाद सुधीरराव.
दिवाळीची सुटी शाळेला सुरू झाली की पर्यटक येतात. हॉटेल्स अगोदरच बुक करतात. या सुटी अगोदरच आम्ही जातो आणि तिथे रुमस जागेवरच बुक करतो. रेल्वे आरक्षणाशिवाय कोणतेही आरक्षण करत नाही. समजा तीन दिवस अगोदर आरक्षण रद्द केले तर १२०/१८०रु/- प्रती प्यासेंजर एवढेच नुकसान होते.
रेल्वे रिटाईरिंग रुमस - उज्जैन आणि झाशीला बुक झालेल्या होत्या, नसत्या तर काय कशा आहेत पाहून आलो असतो. केवळ तुलना म्हणून.
पण सर्वच पर्यटक बुकिंग शिवाय जात नाहीत, सुटीतच जातात. त्यांना सोयीचं पडावे म्हणून आजुबाजुच्या दोनचार हॉटेल्सची चौकशी करून,पाहून नोंद केली. हॉटेल्सचे कार्ड फोटो इथे देणे योग्य नसावे. व्य संदेशात देईन.

उज्जैन, खजुराहो आणि झाशी येथील नकाशे आणि माहिती लोनली प्लानिट पुस्तकातली सोबत नेली होती. त्याचा फार उपयोग होतो. गाईड करावा लागत नाही. (बाकी ते गाईड लोक कंटाळवाणे जोक्सही करतात.)
त्या पुस्तकाच्या २०००सालच्या अगोदरच्या आवृर्तीत डिटेल माहिती आहे. फोर्टातल्या पुस्तकवाल्यांकडे पुस्तक ८०-१००रुत मिळेल. कॉपीराइटेड असल्याने लेखात देऊ शकत नाही.

(( सुटीच्या अगोदरचे/नंतरचे आणि सुटीतले सिजनचे हॉटेलांचे रेटस फार वेगळे असतात. १००० चे ४००० करतात.))

आणखी बरेच फोटो आहेत पण ते दिल्यास धागा लवकर लोड होणार नाही.

सुमो's picture

22 Oct 2019 - 10:53 am | सुमो

माहितीपूर्ण लेख. व्हिडिओ आणि फोटोही मस्त.

आणखी बरेच फोटो आहेत पण ते दिल्यास धागा लवकर लोड होणार नाही.

गूगल फोटोज मधे स्वतंत्र फोल्डर करुन त्याची लिंक द्या इथं.
म्हणजे बघता येतील.

चौकटराजा's picture

22 Oct 2019 - 8:18 pm | चौकटराजा

खजुराहो पासून ८२ किमी वर उत्तर प्रदेश मधील बान्दा जिल्यात कालिन्जर नावाचा एक प्रेक्षणीय किल्ला आहे . खजुराहो वरून इथे जायला व यायला बस सेवा आहे की नाही माहीत नाही पण माझ्या बकेट लिस्ट मधे तो व अजयगढ दोन्ही आहेत !

मध्य प्रदेशात आहे खजुराहो. त्या बस स्टँडलाच सकाळी गेलो होतो. बाहेरच्या दोन चहा टपरींवर स्थानिक चारजण होते चा पीत. बाकी कोणी नव्हतं.
एवढंच नाही तर उज्जैनमध्ये महाकांळेश्वरला जायलाही सिटी बस नाहीत.
स्थानिक राज्य परिवहन बंद पडून बरीच वर्षं झाली.
----------
प्रयागराज (अलाहाबाद), चित्रकुट, कलिंजर,वाराणसी,, सारनाथ एका ट्रिपमध्ये करा.

चौकटराजा's picture

22 Oct 2019 - 8:59 pm | चौकटराजा

हे कमी पाहिले जाणारे पण देखणे असे जे काही असते तिथे परिवहनाच्या बसेस जात नाहीत. आता हम्पीत तो प्रश्न सुटलेला आहे , पूर्वी वान्धेच होते.

अनिंद्य's picture

22 Oct 2019 - 9:22 pm | अनिंद्य

मध्यप्रदेश ४-५ तुकड्यातच योग्य.
फोटो उत्तम. आता तुमच्या विस्तृत लेखाची वाट पहातो आहे.

प्रचेतस's picture

23 Oct 2019 - 8:16 am | प्रचेतस

मस्त वृत्तांत.
खजुराहोचा यज्ञवराह जबरदस्त आहे. मंदिरे तर खूपच भारी.
तुमच्याबरोबर एकदा हिंडून अशी सफर करावयाची आहे.

श्वेता२४'s picture

23 Oct 2019 - 9:42 am | श्वेता२४

वाचनखूण साठविली आहे.