गंदीकोटा आणि बेलम गुहा - २ (अंतिम भाग)

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
15 Oct 2019 - 9:15 pm

दिवस ३

आजचा दिवस तसा आरामाचा होता. बेलम गुहा पाहणे आणि घरची गाडी पकडणे ही दोनच कामे आज करायची होती. उठलो आणि सुर्योदय पहाण्यासाठी धावतपळत घळीकडे निघालो. पण सुर्योदय आमच्या नशिबात नव्हता. ढगांमुळे सुर्यमहाराजांचे दर्शन झाले ते चार बोटे वर आल्यावरच. एका जोडप्यानं रात्र इथेच दगडांवर काढलेली दिसत होती. कल्पना छान होती. पुढच्या वेळी कदाचित?

गंदीकोटा, सकाळच्या प्रहरी:

दहा फोन केल्यावर, तब्बल एक तास उशिराने आमचे चालकसाहेब आपली सुमो गाडी घेऊन प्रकट होते झाले. पण ठीक आहे, तसाही आम्हाला आज वेळच काढायचा होता, नाही का?

गंदीकोटा ते बालमगुहा हे अंतर साठ किलोमीटरचे आहे. सकाळचे कोवळे ऊन पडले होते, रस्ते उत्तम होते आणि दोन्ही बाजूला दिसणारी मोहरीची झाडे पाहून ‘डीडीएलजे’ मधल्या त्या गाण्याची आठवण येत होती. दीडेक तासात आम्ही बेलम गुहांजवळ पोचलो. मला वाटत होतं त्यापेक्षा या गुहा ब-याच जास्त लोकप्रिय असाव्यात. डिसेंबरचा महिना, त्यात रविवार - लोकांची नुसती झुंबड उडाली होती. सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे गर्दीत ५-६ शाळेच्या सहलीही होत्या. (सहलींमधे मी जर सगळ्यात जास्त कशाला घाबरत असेल तर तो ह्या शालेय सहलींना.) आम्ही आत शिरलो, सुदैवाने सुरुवातीचा काही भाग सोडला तर आत गर्दी नव्हती.

गंदीकोटाप्रमाणेच बेलम गुहांचाही निर्माणकर्ता आहे पाणी. पावसाचे पाणी जमिनीत मुरले, त्या पाण्यात जमिनीखालचा चुनखडीचा खडक विरघळला आणि ह्या गुहा तयार झाल्या. गुहांची लांबी ३.५ किमी असली तरी सामान्य पर्यटकासाठी त्यांचा १.५ किमी एवढाच भाग खुला आहे. कुठेकुठे एकाच वेळी तीन मोठी वाहने जातील एवढ्या प्रचंड आकाराच्या असलेल्या ह्या गुहा कुठेकुठे एकच माणूस जाईल इतक्या अरूंद होतात. खडकांवरच्या रंगीबेरंगी रेषा, पाण्यातील क्षार साचून बनलेले लवणस्तंभ, दगडांचे चित्रविचित्र आकार हे सगळेच थक्क करणारे आहे.

बेलम गुहा:

अर्थात् भारतातल्या बहुतांश नैसर्गिक चमत्कारावर बसतो तसा ह्या चमत्कारावरही धार्मिक शिक्का मारायचा प्रयत्न धर्मांध लोकांनी केला आहेच. त्यामुळे आत एक ‘शिवलिंग’ आहे आणि जमिनीच्या पोटात गुडुप होणारी पाताळगंगाही.

आम्ही चालत बरेच पुढे गेलो. बाजीराव रस्त्याने गणपती बघत चाललो असताना गल्लीत एखादे सुंदर मंडळ दिसावे तशा मुख्य गुहेतून चालताना या गुहेला जोडलेल्या काही छोट्या गुहा सामो-या येत राहतात. आम्ही अशाच एका गुहेत गेलो. या छोट्या गुहांत प्रकाशाची सोय नव्हती, तेव्हा आमच्या भ्रमणध्वनीसंचातील विजे-या सुरू करून आम्ही आत शिरलो. बरेच आत गेल्यावर गंमत म्हणून आम्ही विजे-या बंद केल्या. आपण ठार आंधळे झालो आहोत असे वाटायला लावणारा काळामिट्ट काळोख आणि जणू जग नष्ट झाले आहे, ह्या पृथ्वीतलावरचे आपण शेवटचे मानव आहोत असे वाटायला लावणारी भयाण शांतता. एकाचवेळी अतिशय सुंदर आणि प्रचंड भीतीदायक असा हा अनुभव, आमरण लक्षात राहील असा.

आम्ही २/३ तास आत असू. बाहेर पडलो आणि निघालो ताडपत्रीकडे. आमची परतीची रेल्वे आम्हाला इथूनच पकडायची होती. तिथल्या एका छोट्या हॉटेलात एक अस्सल आंध्र थाळी हाणली आणि निघालो शहरातली दोन मंदिरे पहायला. ही मंदिरं अगदी जगप्रसिद्ध नसली तरी सुंदर आहेत ही माहिती आम्ही आधी काढली होती, शिवाय आमच्यापुढे संध्याकाळी ६:३८ पर्यंतचा वेळ कसा काढायचा हा प्रश्न होताच.

अस्सल आंध्र थाळी:

पहिले मंदिर होते बुग्गा रामलिंगेश्वर स्वामी मंदिर. मंदिर स्वच्छ, शांत आणि कसलीही बजबजपुरी नसलेले आहे. मंदिर मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रसिद्ध नसले तरी आहे मात्र देखणे. आतली मूर्तिकला, कलाकुसर उच्च दर्जाची आहे. मंदिराच्या दरवाज्यावरील बांधकाम (गोपूर?) पडलेले आहे. (की बांधलेच गेले नाही?)

बुग्गा रामलिंगेश्वर स्वामी मंदिर, मुख्य प्रवेशद्वारः


बुग्गा रामलिंगेश्वर स्वामी मंदिर, परिसरः

बराच वेळ टंगळमंगळ करून आम्ही दुस-या मंदिराकडे निघालो.

दुसरे मंदिर होते चिंतलवेंकटरमना स्वामी मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराभोवती असलेली तटबंदी आणि मंदिरासमोर असलेला हंपीच्या विठ्ठल मंदिरासारखा रथ. अर्थात् सुंदर मुर्तीकला आणि कोरीवकाम इथेही होतेच. इथे गर्दीही जास्त होती.

मंदिरासमोर बरीच मोठी हिरवळ आहे. इथे बसून काही ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत बसले होते, काही मुले खेळत होती. रविवारचा दिवस असल्यामुळं लोक अगदी निवांत होते. दर्शन घेऊन आम्हीही इथे विसावलो. काहीही न करता निवांत बसून राहणे यातही एक मजा आहे, दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेली ही मजा आम्ही थोडा वेळ अनुभवली.
चिंतलवेंकटरमना स्वामी मंदिर:

हळूहळू सूर्य अस्ताला जाऊ लागला आणि मंदिर अधिकच सुंदर दिसू लागले. साडेपाच, पावणेसहाला आम्ही निघालो. वाटेत कुठेतरी चहा मारला. आमच्या प्रेमळ सुमोचालकांचा निरोप घेतला आणि स्टेशनात शिरलो. गाडी कमीतकमी अर्धा तास उशिरा धावत असणार यावर मी पैज मारायला तयार होतो, पण गुरू, शनी आणि प्लुटो त्यादिवशी सरळ रेषेत आले असावेत - आमची गाडी चक्क वेळेवर धावत होती.

ताडिपत्री रेल्वे स्टेशन:

त्यानंतर? स्लीपर क्लासमधे होणारी ती अर्धवट झोप, पुणे स्थानकाच्या बाहेर रेल्वेचे ते १०/१५ मिनिटे ताटकळणे, रेल्वेतून उतरल्यावर येणारी ती उद्विग्नता आणि घरापर्यंतचा तो जीवावर येणारा प्रवास - सारे काही नेहमीचेच.

प्रतिक्रिया

ढब्ब्या's picture

15 Oct 2019 - 10:16 pm | ढब्ब्या

हा ही भाग छान

एक वेगळेच निवांत स्थळदर्शन वर्णन आवडले.

प्रचेतस's picture

16 Oct 2019 - 8:40 am | प्रचेतस

जबरदस्त आहे हे. गंदीकोटा कॅन्यन, बेलम गुहा, मंदिरे, किल्ले सगळंच अचाट आहे.

लोनली प्लॅनेट's picture

16 Oct 2019 - 10:27 am | लोनली प्लॅनेट

खूपच छान.. एका नवीन ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
इथे जायलाच हवे
बाकी दाक्षिणेकडची मंदिरे मला फार आवडतात,एकदम स्वच्छ असतात

संजय पाटिल's picture

16 Oct 2019 - 10:54 am | संजय पाटिल

खरच अशी ठिकाणे भारतात आहेत?
नक्कीच जाणार बघायला......
धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल!!

जालिम लोशन's picture

16 Oct 2019 - 11:11 am | जालिम लोशन

सुरेख

नि३सोलपुरकर's picture

16 Oct 2019 - 11:24 am | नि३सोलपुरकर

जबरदस्त ... एक ट्रीप तो जरुर बनता है .

@ एक_वात्रट : साहेब खुप खुप धन्यवाद _/\_.

वात्रटराव दंडवत तुम्हाला .. धन्य आहात आपण आणि हुडकून काढलेली जागा .. महत्वाचं म्हणजे , सुंदर छायाचित्रे पेश केलेली आहेत आपण आणि त्यानुसार लेखन .. एखादा जर कुणी हा लेख वाचून गेला तिथे तर हि छायाचित्रे मार्गदर्शक ठरतील आणि जागाही सुंदर वाटेल .. तशीही मला , छायाचित्रे पाहून हि हुडकून काढलेली जागा रम्य आणि त्याहून जास्त गूढ वाटली .. खेचून घेणारी वाटली .. कदाचित ती तुमच्या छायाचित्रांची कमाल असू शकते .. असो .. धन्यवाद त्रिवार धन्यवाद ..

श्वेता२४'s picture

16 Oct 2019 - 5:00 pm | श्वेता२४

प्रवासवर्णन ही नेमके व फोटोही लाजवाब. माझ्या बकेटलिस्टमध्ये आता ही दोन ठिकाणे टाकली. धन्यवाद .

अरिंजय's picture

17 Oct 2019 - 2:43 am | अरिंजय

बेलम गुहांबद्दल ऐकुन आहे. जाण्याचा योग नाही आला. गंदीकोटा बद्दल मात्र पहिल्यांदाच ऐकलं. योग येईल तेंव्हा नक्की भेट देणार.

टर्मीनेटर's picture

17 Oct 2019 - 8:36 am | टर्मीनेटर

सुंदर वर्णन आणि फोटो. ह्या दोन्ही ठिकाणी जाण्याची अनिवार इछा निर्माण झाली आहे त्याबद्दल वाचून!

सुमो's picture

17 Oct 2019 - 1:16 pm | सुमो

असेच म्हणतो. टर्मीनेटर यांच्या DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. २ या धाग्याचा उपयोग करुन स्लाइडशो मोबाईल वरुन करता आला.
धन्यवाद टर्मीनेटर.
पु ले शु एक_वात्रट

पाटीलभाऊ's picture

17 Oct 2019 - 2:28 pm | पाटीलभाऊ

फार सुंदर फोटो आणि वर्णन...!
एका मित्राकडून ऐकले होते या ठिकाणाबद्दल...जायला हवे एकदा..

सुधीर कांदळकर's picture

17 Oct 2019 - 7:17 pm | सुधीर कांदळकर

दोन्ही भाग आजच वाचले. धान्य गोदाम, जामी मशीद, सुंदरच दिसताहेत. गंदीकोटाच्या घळीच्या उंचीचा अंदाज पहिल्या प्रचि मध्ये मात्र येत नाही. काही प्रचिनंतरच्या प्रचि मध्ये मात्र ती भव्यता जाणवते. एका अनवट ठिकाणाची माहिती सुंदर प्रचि सोबत छान दिलीत. धन्यवाद.

यशोधरा's picture

17 Oct 2019 - 9:36 pm | यशोधरा

दोनही भाग वाचले आणि आवडले. अनवट जागा दिसते.
फोटोही सुरेख आहेत!

अजून लिहा.

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Oct 2019 - 12:27 am | माम्लेदारचा पन्खा

स्वखर्चाने तुम्ही फिरलात पण आम्ही मोफत यात्रा करून आलो ...तुमच्याबरोबर......मजा आ गया !

गंदीकोटाचं गंदीपटाक होऊ नये हीच कळकळ !

जेम्स वांड's picture

18 Oct 2019 - 7:56 am | जेम्स वांड

खल्लास जागा आहेत, ती गुंफा तर एक नंबरी उत्तम आहे, इथे तर जायलाच हवे राव. बाकी ती आंध्र थाळी पाहून कैक आठवणी जाग्या झाल्या, अंबाडी उर्फ गोंगुराचा वापर, उत्तम सांबर मोकळा फडफडीत भात, चवदार सामिष निरामिष प्रकार वगैरे रायलसीमा रुचिलू जिभेवर रुंजी घालून गेले.

मुक्त विहारि's picture

28 Nov 2019 - 1:37 am | मुक्त विहारि

आवडले.