हंगामा है क्यों बरपा... बार टेंडिंगचे रंजक जग - श्वेता चक्रदेव

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

हंगामा है क्यों बरपा...बारटेंडींगचं रंजक जग

"म्हणजे दारू?" माझी आई जोरात चित्कारली. ती इतक्या जोरात ओरडली की, बहुधा फोनमधून दहा हजार मैलांवर ऐकू येऊन माझ्या बाजूला बसलेली बाई दचकली. आपली भारतातून जाताना सरळसोट असलेली, चांगली शिकलेली, नोकरी करणारी मुलगी आईला जेव्हा 'मी बार टेंडिंग म्हणजे मद्य असलेली वेगवेगळी पेये कशी बनवायची हे शिकून आले आहे' असे, एवढेच नव्हे तर बारमध्ये, पार्ट्यांमध्ये उभी राहून ते मद्य लोकांना वाटते असे सांगते, तेव्हा अर्थात हे उद्गार ऐकू आल्यास नवल ते काय? बरोबरच आहे म्हणा, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पापभीरू, मध्यमवर्गीय घरात दारू हा विषय अगदी आताआतापर्यंत पूर्ण वर्ज्य किंवा निषिद्धच होता. दारू पिणे तर फार दूरची गोष्ट, दारूबद्दल बोलणेदेखील बहुतांशी फक्त पुरुषांच्यात आणि तेदेखील कुजबुजत व्हायचे. 'दारू पिणारी माणसे' ही माझ्या लहानपणी कोणत्या गुन्हेगारापेक्षा वेगळी नव्हती. 'संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू' हे दूरदर्शनवर ऐकायचो, तर "ऐकले का, परवा त्या जोश्यांचा पंकज त्या गुत्त्याबाहेर दिसला" ही मोठी खळबळजनक खबर असे. तो काळ, ती माणसे वेगळीच होती आणि दारू ही खूपच वाईट आणि निंदनीय गोष्ट होती. मी एक प्रशिक्षित बार-टेंडर आहे, अर्थात वेगवेगळी मद्ये, त्यांचे गुणधर्म आणि त्यापासून बनवता येणारी पेये यांचे शिक्षण मी घेतले आहे, एक छंद म्हणून. आज जरा या बार-टेंडिंग क्षेत्राचा आढावा घेऊ या, थोड्या इतिहासासकट.

दारू हे भारतीय संस्कृतीला नवे नाव नाही. वेदकाळात मद्य, मदिरा अनेक वेगवेगळ्या रितीरिवाजांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असे. मद्य पिणे हा अनेक संस्कृतींमध्ये समाज शिष्टाचाराचा एक भाग मानला जाई. जगातील सगळ्यात पहिले मद्य कुठे बनवले गेले हा तसा गुंतागुंतीचा विषय असला, तरी ख्रिस्तपूर्व ७००० वर्षांपूर्वी चीनमध्ये मद्यसदृश पेय बनवले गेल्याचा पुरावा आढळतो. ख्रिस्तपूर्व २७०० वर्षांपूर्वी, बॅबेलिओन संस्कृतीत 'वाइनच्या देवतेची' उपासना केली आहे. भारतीय संस्कृतीत सुमारे ख्रिस्तपूर्व ३०००-२००० वर्षांपूर्वीपासून भातापासून तयार केलेली 'सुरा' आणि तिचे प्राशन केले जाणे याचा दाखला आढळतो. दक्षिण अमेरिकेतील अन्ड्स (Andes) प्रांतात मका, द्राक्षे आणि सफरचंद यांपासून तयार केलेले 'चिचा' या मद्यसदृश पेयाचा उल्लेख आढळतो. अठराव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत मद्याचा उपयोग मजेसाठी, आनंदासाठी किंवा इंग्लिशमध्ये recreational वापर पाश्चिमात्य देशात राजरोसपणे केला जाऊ लागला. पौर्वात्य देशात या पेयाला काहीशी काळी किनारदेखील याच काळात आली. मदिरापान हे राजेरजवाड्यांच्या काळात सुखासीनतेचे, भोगवादाचे लक्षण मानले जाऊ लागले आणि पौर्वात्य संस्कृतीतील सामान्य माणूस यापासून पार लांब गेला.

काळाचे चक्र मोठे अजब असते. विज्ञानाची प्रगती आणि मागच्या काही वर्षातील तंत्रज्ञानाची अफाट प्रगती हे काळाचे चक्र जोरात फिरवत गेली आणि स्वप्नवत वाटावे इतक्या लक्षणीय वेगाने सगळे जग जवळ येऊ लागले. कोणे एके काळी सात समुद्र पार करणे हा धर्मद्रोह मानला जाई, त्याच संस्कृतीतील लोक आता सात समुद्र २४ तासांत पार करून जाऊ लागले. आणि या वेगवान बदलाबरोबर पाश्चात्त्य आणि पौर्वात्य समाजदेखील एकमेकांत मिसळू लागले. मद्याला आणि मद्यपानाला असलेली काळी, करडी किनार हलकेच विरळ होऊ लागली. गावोगावी फक्त 'अबक वाइन्स', किंवा 'अबक देशी दारूचा गुत्ता' इतकाच मद्याचा आवाका न राहता परदेशातले, जगभरातले वेगवेगळे मद्य आता भारतात उपलब्ध होऊ लागले होते. बघता बघता मध्यमवर्गीय घरात ३१ डिसेंबरपुरते का होईना, मद्य स्थान मिळवू शकले होते.

साधारण एक दशकापूर्वी भारतातून, महाराष्ट्रातल्या एका छोट्या निमशहरी भागातून थेट परदेशात आल्यावर, इथे मुबलक मिळणारे आणि आस्वाद घेतले जाणारे मद्य हा 'कल्चरल शॉक' किंवा सांस्कृतिक धक्क्याचा एक भाग ठरला. रोजच्या जीवनात सामान्य माणसांच्या आयुष्याचा मद्य हा एक अगदी नॉर्मल आणि दैनंदिन भाग असतो. अनेक घरांत रात्रीच्या जेवणात एक ग्लास वाइन पिणे हे दुर्मीळ नाही. अनेक मोठ्या बिझनेस मीटिंग्जमध्ये, कॉन्फरन्समध्ये मद्य दिले जाणे हा आयुष्याचा एक भाग आहे. इथे कोणी तुमच्यावर दारू पिण्यासाठी जबरदस्ती करत नाही की मुबलक उपलब्ध आहे म्हणून जिथे तिथे दारू पिऊन पडलेली माणसे दिसत नाहीत. भौगोलिक स्थान आणि हवामान या सगळ्याचादेखील मद्याला या सभ्य मानले जाण्यात तितकाच भाग आहे. प्रचंड थंडी पडणाऱ्या अनेक ठिकाणी मद्य शरीरात ऊब तयार करायला मदत करते.

कामाचा आठवडा शुक्रवारी संपला की, दोन-चार घटका मित्रमंडळींबरोबर बसून मद्याचा आस्वाद घेणे ही प्रचलित गोष्ट आहे. मी औषधशास्त्राची विद्यार्थिनी आहे. आणि अभ्यास करताना करताना हे माहीत झाले होते की, मद्य हे एक नशा असलेली स्थिती तात्पुरती निर्माण करणारे द्रव्य आहे. गमतीचा भाग म्हणजे, मद्य हे पेय व्यसन लावण्यास कारणीभूत असल्याचे पुरावे अनेक संस्कृतीत फार पुरातन काळापासून आढळतात. मग इतकी सामाजिक, वैज्ञानिक, भावनिक बंधने असूनही असे काय आहे या मद्यात की जगातले लाखो, करोडो लोक या पेयाकडे आकर्षिले जातात. मद्य माणसाला अनेकदा थोडे मोकळे व्हायला मदत करते. कधी कारणाने तर कधी अकारण आपण सगळेच मुखवटे घालून वावरत असतो. मद्य हे मुखवटे दूर करायला मदत करते.

कोरोनारीटा नावचे भन्नाट ड्रिंक
image1

माझ्यासारख्या मराठी घरातून आलेल्या मुलीसाठी, दारू हा शब्द खरे तर मोठे वादळ घेऊन आला. परदेशात आल्यावर आपली अनेक झापडे उघडतात. आपल्याला जे आणि जसे वाटत असते ते आणि तसेच बरोबर असते हा आपला एक खूप मोठा भ्रम दूर होतो. पहिल्यांदा मद्य प्यायले, तेव्हा हे असे काय लोक कडवट पितात असे वाटले. नंतर काही दिवसांनी वाइन प्यायली आणि हळूहळू कळायला लागले की फार मोठा अभ्यास आहे या सगळ्या पेयांचा. कोणते मद्य, कुठे तयार केले गेले आहे, कोणते घटक वापरून, कोणत्या वातावरणात तयार केले आहे., कशा प्रकारे साठवले आहे, किती काळ साठवले आहे या सगळ्यामुळे त्या मद्याची चव आणि किंमत ठरत असते. बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या मद्यांची आणि त्यांपासून तयार केलेल्या पेयांची ओळख होत होती, परंतु तरीही त्यातले हवे तेवढे ज्ञान होतेच असे नाही. एक दिवस असे लक्षात आले की, काही माहीत नसताना कुतूहल म्हणून हे पिण्यात फार अर्थ नाही. यातले शास्त्र काय आहे ते तर कळायला हवे. आणि या ठिकाणी सुरू झाला एक अभिनव प्रवास - बार टेंडिंग स्कूल अर्थात अशी शाळा जिथे वेगवेगळ्या मद्यांचा आणि त्यांपासून तयार केलेल्या पेयांचा अभ्यास केला जातो आणि ती तयार करायला शिकवली जातात. जसा जसा या शाळेच अभ्यास चालू झाला, तसे तसे वाईट आहे, वाईट आहे या बिल्ल्याखाली एक आख्खे विश्वच आपल्याला माहीत नव्हते, हे कळले.

इथे एक लक्षात घ्यायला हवे की, पाश्चात्त्य देशात या सगळ्याकडे बघण्याचा एक संपूर्ण वेगळा दृष्टीकोन आहे. मद्य आणि मद्यपान या दोन गोष्टींना सामाजिक किंवा धार्मिक बट्टा नाही. बार टेंडिंग शाळेत मद्य, मद्याचे प्रकार यांचे रीतसर शिक्षण दिले जाते. प्रत्येक मद्यापासून कोणकोणते पेय बनवता येऊ शकते याचा शास्त्रोक्त अभ्यास करून घेतला जातो. एवढेच नव्हे, तर याची परीक्षाही घेतली जाते. नुसते मद्य आणि सरबत एकत्र करून समोर ग्लासात ठेवणे याला बार टेंडिंग म्हणत नाहीत. तर कोणत्या मद्याबरोबर कोणते पेय जास्त चांगले चवीला लागू शकेल आणि किती प्रमाणात याची जाण ठेवून बार टेंडरला त्याचे पेय तयार करायचे असतात. इतकेच नव्हे, तर एकाद्या व्यक्तीने आणखी मद्यप्राशन करू नये असे दिसत असल्यास त्याला तसे जाणवून देणे ही प्रत्येक बार टेंडरची नैतिक जबाबदारी असते. मुळात एक लक्षात घयायला हवे की, कोणतेही व्यसन हे वाईटच. आणि अति केल्यास कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागू शकते, जे धोकादायक असते. या दोन गोष्टी एकदा नीट लक्षात घेतल्या की अनेक कोडी आणि प्रश्न सुटत जातात. संशोधकांनी मद्याचे कमी प्रमाणात घेतल्यास फायदे आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास खूप तोटे फार पूर्वीच नोंदवून ठेवले आहेत. आता या क्षेत्राला 'मिक्सॉलॉजी' (mixology) असेही म्हटले जाऊ लागले आहे.

बार टेंडिंग हा एक हुद्दा आहे. परदेशात कॉलेजमध्ये जाणारी अनेक मुले-मुली बार टेंडिंगची नोकरी करून आपल्या शिक्षणाचा, चरितार्थाचा खर्च भागवतात. या कामाच्या वेळा ठरावीक नसतात आणि काम तसे कष्टाचे असते. अनेकदा लहान मुलांच्या आया, ज्यांच्या मुलांना सांभाळायला दिवसभर कोणी नसल्याने त्या नोकरी करू शकत नाहीत, परंतु संध्याकाळी घरची मंडळी परत आल्यावर ४-५ तास बार टेंडिंग करून पैसे मिळवत असतात. या सगळ्यात मद्यपानाला जी काळी, लांच्छनास्पद किनार नाही याचा फायदा होतो. एखादी ओली बाळंतीणसुद्धा बार टेंडरची नोकरी करून आपले पैसे कमवू शकते आणि याबद्दल कोणी तिच्याकडे बोटे दाखवत नाही, कारण हे तिचे काम असते.

अनेकदा इथली काही प्रचलित पेयांची नावे असतात, जी तुम्हाला शिकावी लागतात आणि माहीत नसतील तर तुमचे हसे होऊ शकते. वेगवेगळे रंग, फळे, फळांचे रस, मद्य, कुठे मेक्सिकोची मार्गारीटा तर कुठे जपानची साके, तर रशियाची वोडका ह्या पेयांमधून तिथला माणसे कळत जातात. मॅनहॅटन, लाँग आयलँड अशी जागेच्या नावावरून पडलेली पेय असोत की, फक्त जगातल्या काही ठिकाणी बनणारी बकार्डी असो, हे सगळे जण एक-एक गोष्ट सांगत असतात. आपले कान उघडे असायला हवेत फक्त. आपण आपल्या घरात मोदकाची उकड योग्य वाफवली आहे का हे सांगणाऱ्या आज्या पाहिलेल्या असतात किंवा कुणी ताटभर मोठ्या पातळ पुरणपोळ्या लागणारी मावशी, त्यांचे हे अनेक वर्षाच्या अनुभवातून आलेले जाणतेपणी असते, अगदी तसेच केवळ एखाद्या मद्याची बाटली उघडून त्यातली हवा हुंगून वाइन किती जुनी किंवा किती मुरलेली आहे, त्यात कोणते अरोमा किंवा गंध येत आहेत, चव लागेल हे अगदी डोळे झाकून सांगू शकतात.

परदेशात जेव्हा केवळ हौस म्हणून बार टेंडिंग शिकायला सुरुवात केली, तेव्हा माझे मलाच माहीत नव्हते की कोणत्या प्रकारचे अनुभव मला येतील. कोर्स चालू असताना फारच मजा येते, कारण तुम्ही वर्गात असता इतर विद्यार्थ्यांबरोबर. तुमच्यातले कोणी डॉक्टर असते, तर कोणी बेरोजगार, पण त्या वर्गात तुम्ही सगळे सारखे असता. नंतर प्रात्यक्षिक करण्याच्या काळात फार मजेशीर अनुभव येतात. अनेकदा या बार टेंडिंग स्कूलमध्ये येणारी मुले त्यांच्या प्रत्येकाची संस्कृती, आयुष्य आपल्याबरोबर घेऊन येतात. शिकताना अनुभवांची देवाणघेवाण होते, तेव्हा अनेकदा हास्यास्पद आणि संस्मरणीय गोष्टी घडतात. एकदा वारंगतल्या एक रशियन मुलीने वर्गातल्या सगळ्यात टग्या दोन मुलांशी स्पर्धा लावली. हे दोघे गाडी तीन पेग पिऊन थंड झाले, तर ही बया संपूर्ण बाटली वोडका पिऊन, नंतर २ मैल पळून आली होती.

माझे बार टेंडिंग शिक्षण मला फक्त मद्याचेच नव्हे, तर जीवनातलेही काही महत्त्वाचे धडे शिकवून गेले.

फ्रेश फ्रूट्स आणि ज्यूस यांचा बेस असलेलं हे पंच

image2

मी अस्सल भारतीय असल्याने माझा पिंडच मद्याला नवे ठेवण्याचा होता. मुळात भारतीय माणूस मद्य या नावालाच घाबरतो, कारण या नावाबरोबर येणारी भीती, अज्ञान आणि अनेक गैरसमजदेखील. त्यातून नाहीच घाबरला तर पुरुषाची मक्तेदारी असलेले हे नाव. चार पुरुष एकत्र आले की, बायकांनी फक्त भजी किंवा दाणे त्यांना नेऊन द्यायचे आणि त्यांनी गच्चीत किंवा घरात बसून मद्य प्यायचे किंवा बाहेर गेलो तरी मद्य म्हणजे बरेचदा पुरुषच पिणार हे अध्याहृतच असते. मला वाइन किंवा आणखी कोणते मद्य प्यायला आवडते हे ठामपणे म्हणू शकणाऱ्या भारतीय स्त्रिया विरळ. अर्थात ही परिस्थिती बदलते आहे. आजमितीला भारतातदेखील अनेक मुली हे शिक्षण घेत आहेत. भारतात बारमध्ये काम करणे हे खरे तर तुमचे सामाजिक किंवा नैतिक अध:पतन झाल्याचे(च) लक्षण असल्याने, बार टेंडिंगकडे एक व्यायवसाय म्हणून बघणे फारच दुर्मीळ.

खरी मजा येते, जेव्हा भारतीय स्त्री बार टेंडिंग करताना इतर भारतीय लोकांनी बघितले की, आधी खरे तर त्यांना धक्काच बसतो. अनेकदा मग लोक चौकशी करायला येतात. जेव्हा त्यांना कळते की हा एक छंद म्हणून मी जोपासते आहे, आणि पोटापाण्यासाठी माझा वेगळे काम मी करते, मला मुलगादेखील आहे, तेव्हा त्यांना त्या पुढे काय बोलावे हे कळतच नाही. ऐसा क्यों? असे जेव्हा ते मला विचारतात, त्यावर 'क्यों नही?'चे उत्तर त्यांच्याकडेही नसते. भारतीय बायका अनेकदा बारमध्ये किंवा पार्टीमध्ये नजरेला नजर देऊन बोलायचेच टाळतात, जणू मला त्यांचे खूप मोठे गुपितच कळलेय. एकदा एक ज्येष्ठ काका अगदी काळजीने, "बेटाजी, आपको जॉब लगवा देता हूँ, पर असाच घरकी लडकी हो, ऐसा ना किजीये आप" असे म्हणाले, तेव्हा मात्र दूर देशी या ओळख ना पाळख असलेल्या माणसाला माझी काळजी वाटतेय हे पाहून खूप भरून आले होते.

बारमधले असंख्य किस्से असतात. तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे लोक with their different walks of life बारमध्ये भेटतात. एक भारतीय स्त्री म्हणून माझा या गोष्टींकडे बघण्याचा आणि या जगभरातल्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कधी विनोदी प्रसंग तयार करतो, तर कधी फार रम्य नाती जोडतो.

बार हा तरुण मुली-मुले भेटायची जागा आहे. अमेरिकेत किंवा पाश्चात्त्य देशात आई-वडील मुला-मुलींसाठी स्थळं बघत नसल्याने आपली कुंडली जुळवण्यासाठी या तरुणांना बरीच ‘फाइट’ मारावी लागते. मला या सिस्टिमची कल्पना होती, पण ती मला बार टेंडिंगमुळे फर्स्ट हँड बघायला मिळाली.

एकदा एक डॉक्टर मुलगा बारमध्ये येऊन बसला आणि एक ड्रिंक घेऊन आजूबाजूला बघू लागला. एक मुलगी त्याच्या बाजूला येऊन बसली आणि त्याच्याशी बोलू लागली. हा गडी खुलला. तो तिच्यासाठी ड्रिंकवर ड्रिंक विकत घेऊ लागला. हे असे तीन-चार तास चालले होते. आता बहुधा यांची जोडी जमणार असे वाटत असतानाच, एक माणूस आला आणि या मुलीच्या कमरेत हात घालून निघून गेला. ही मुलगीसुद्धा "हाय हजबंड" म्हणून त्या माणसाच्या गळ्यात पडली आणि निघाली.

हा डॉक्टर मुलगा तिला म्हणाला की, "काय तू? का बोलत बसलीस माझ्याशी?" तर ती म्हणे, "मी काय जबरदस्ती केली होती का? तू देत गेलास दारू मी, पीत गेले. That’s not my problem." बिचारा डॉक्टर हताश होऊन बसून राहिला. एका पुरुषाला असे सपशेल येडा बनवलेले बघून मला खरे तर फारच भारी वाटले होते.

मॅड सॅम असाच एक बंदा. साठीचा सॅम सोमवार ते शुक्रवार बारमध्ये यायचा. कधीही लग्न न झालेला सॅम मागची ३५ वर्षे एकटा राहतो आहे. शेजारी जो बसेल त्याला फुकट दारू पाजायचा. आजपर्यंत किती जणांनी त्याच्या या सवयीचा फायदा करून घेतला असेल ते देवालाच माहीत. रात्री बार बंद होताना, नि:श्वास टाकून हळू पावले टाकत जाणारा सॅम अस्वस्थ करून जायचा.

मला सॅमने सांगून ठेवलेय, "कधी लागोपाठ दोन दिवस आलो नाही बारमध्ये, तर माझी चौकशी करायला या."

कधी हताश होऊन बारमध्ये येणारी माणसे, कधी आनंद साजरा करायला, तर कधी रिकामे घर खायला उठते आणि एकटेपणा घाबरवून टाकतो म्हणून स्वत: पैसा खर्च करून लोकांना दारू पाजणारी, केवळ गप्पा मारता याव्या म्हणून आनंदी, ‘पार्टी अ‍ॅनिमल’ आहोत अशी खोटा प्रतिमा तयार करणारी, तर कधी आजूबाजूला चाललेल्या या गदारोळात सगळीकडे कौतुकाने बघत, आनंद मानून घेणारी माणसे बारला नवी नाहीत.

बार टेंडिंग करताना आपल्या विचारांच्या कक्षेबाहेर असलेले लोक आणि त्यांचे अनुभव भेटतात, कळतात. आपल्याला अनेकदा माहीतच नसते की आपल्या डबक्याबाहेरचे जग कसे आहे, तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत, तिथल्या लोकांच्या आकांक्षा, ध्येय काय आहेत. ही माणसे त्यांच्या त्यांच्या विश्वाचा छोटासा तुकडा आपल्यासमोर घेऊन येतात. अनेकदा हे काम करत असताना, तुमच्यासमोर असलेली माणसे अत्यंत नाजूक मन:स्थितीतदेखील असतात. अशा वेळी आपली डोके क्षणात ठेवून, त्यांना सावरणे गरजेचे असते. बार-टेंडिंग हे एक अनोखे जग आहे. चातुर्मास्यात कांदा-लसूण न खाणाऱ्या घरातल्या मी, केवळ एक छंद म्हणून बार टेंडिंग किंवा मद्याची पेये बनवणे हे शिक्षण ज्या दिवशी घ्यायचे ठरवले, त्याच क्षणी खरे तर नव्या अनुभवांचे एक नवे चक्र चालू झाले होते. माझ्या सपशेल दोन भिन्न संस्कृतींना, दोन विश्वांना जोडणाऱ्या, एकत्र घेऊन जाणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या या छंदाने मला नवी माणसे दिली, नवे ज्ञान दिले, माझ्या मनाची कवाडे आणखी मोकळी केली. चूक-बरोबरच्या चक्रात अडकलेल्या माझ्या एकांगी मनाला आणि विचारांना 'हे असे पण असू शकतेच' अशी नवी दिशा दिली, आणि त्यासाठी मी या क्षेत्राची आणि छंदाची कायम ऋणी राहीन.

- श्वेता चक्रदेव

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

26 Oct 2019 - 3:39 am | सोत्रि

बारटेंडींगचं विश्व खरंच रंगीबेरंगी असतं. ‘फ्लेअर बारटेंडींग’ तर आयसिंग ॲान द केक!

मस्त लेख, तुमचं विशेष अभिनंदन!!

- (मिक्साॅलाॅजीची नशा अनुभवलेला, साकिया) सोकाजी

तुषार काळभोर's picture

26 Oct 2019 - 3:53 pm | तुषार काळभोर

बार टेंडिंगच्या लेखाला पहिला प्रतिसाद मिपाचे आद्य कॉकटेल गुरु सोकाजींकडून!!
चेरी ऑन द आयसिंग ऑन द केक!!

- ('व्हर्जिन' मोहितो पलीकडे मजल न मारलेला) पैलवान

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 5:02 pm | यशोधरा

भन्नाट लेख आहे!

जातीवंत भटका's picture

27 Oct 2019 - 12:05 am | जातीवंत भटका

भन्नाट कॉकटेलच आहे हा लेख :)

चाणक्य's picture

27 Oct 2019 - 1:47 am | चाणक्य

मला पण हे शिकायला आवडेल. बार टेंडींग किंवा व्हिस्की टेस्टींग. भारतात आहे का कुठे सोय शिकायची ?

कंजूस's picture

27 Oct 2019 - 4:38 am | कंजूस

पण लेख कुणाचा आहे?

यशोधरा's picture

27 Oct 2019 - 5:30 am | यशोधरा

हंगामा है क्यों बरपा... बार टेंडिंगचे रंजक जग - श्वेता चक्रदेव

जेम्स वांड's picture

27 Oct 2019 - 8:12 am | जेम्स वांड

दारू पिणे शिकायची गोष्ट आहे , आपल्याकडे फ्रस्ट्रेशन काढायला मद्यपान केले जाते ते चूक वाटते, पण एकंदरीत हे शास्त्रच मजेदार आहे

(कट्टर सात्विक ओल्ड मोंक गोत्री) वांडो

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 6:13 pm | सोत्रि

श्वेताजी,

गेल्या दीड वर्षांपासून सर्व मादक द्रव्यांपासून आणि पदार्थांपासून दूर आहे. त्यामुळे कोकटेल लाउन्जचे काय होणार हा प्रश्न भेडसावत होता. तुमच्या दमदार आगमनाने सर्व चिंता आता दूर झाल्यात. मिपावरच कोकटेलच बॅटन तुमच्या हातात देऊन मी आता आनंदाने स्वेच्छानिवृत्ती घेतो आहे!

:)

- (नाटक्याजीन्चा एकलव्य, साकिया) सोकाजी

गेल्या दीड वर्षांपासून सर्व मादक द्रव्यांपासून आणि पदार्थांपासून दूर आहे.

सोत्रीशेठ, हे वाचून मनात पुष्कळ विचार आले. मर्यादित प्रमाणात पण खास षोक, आवड म्हणून मद्य घेणे हा एका एन्जॉयेबल लाइफस्टाइलचा भाग आहे आणि त्यात काहीही त्याज्य नाही, ते मर्यादेत ठेवणं सहज शक्य आहे, असं समजून त्यासाठी एक उत्तम आदर्श उदाहरण म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं, किमान माझ्याकडून. इतरांचं माहीत नाही.

आता तुम्ही मादक पदार्थांपासून अमुक वर्षे दूर, बॅटन अन्य कोणा हाती देणे वगैरे भाषा वापरल्यावर एकूणच जरा डळमळीत वाटू लागलं. नेमकं काय घडलं की या सर्वांपासून "मुक्त" होणं योग्य वाटू लागलं? ऑफ ऑल पीपल, सोत्रीना?

हे व्यसन हळूहळू माणसाचा घास घेतं हे गृहीतक योग्य म्हणावं का?

आमच्यासारख्या अनेक लोकांसाठी हे जाणणं महत्वाचं आहे.

धन्यवाद.

सोत्रि's picture

31 Oct 2019 - 3:37 am | सोत्रि

ह्या लेखावर अवांतर होईल, व्यनि करतो आहे!

- (एकेकाळचा साकिया) सोकाजी

साबु's picture

4 Nov 2019 - 1:34 pm | साबु

आमच्यासारख्या अनेक लोकांसाठी हे जाणणं महत्वाचं आहे. सगळ्याना सान्गा..प्लीज.

नाटक्या's picture

26 Nov 2019 - 12:34 am | नाटक्या

(नाटक्याजीन्चा एकलव्य, साकिया)

धन्यवाद सोकाजी राव, लेख वाचल्यावर हेच मनात आले होते… श्वेताजींना मनापासुन शुभेच्छ्या

- नाटक्या.

मी स्वतः Guzzler असल्याने लेख खूप आवडला!!!
.

सुधीर कांदळकर's picture

29 Oct 2019 - 11:15 am | सुधीर कांदळकर

अशा जरा हटके विषयावरले तेही छान लिहिलेले वाचायला मिळाले. औषधशस्त्राच्या विद्यार्थिनीने ७२ रोगावरचा एक इलाज असलेल्या द्रव्याबद्दल लिहावे हे योग्यच आहे.

गंमत बाजूला ठेवतो. मराठी भाषिक समाजात दारूबद्दलचे अपसमज आहेत खरे. पण आपल्याकडचे बहुतेक मद्यप्राशनकर्ते हे अपसमज खरेही करून दाखवात. म्हणून तर एकच प्यालासारखी नाटके लिहिली गेली. एकदा पर्यटनाहून सरळ केस कापायला गेलो होतो. तेव्हा बॅगेतले पैसे काढतांना दिसलेल्या बाटल्या पाहून पिकनिकहून येतांना दारू परत आणल्याबद्दल केशकर्तन गृह मालकाने (डोकेबिके बिघडले वाटते याचे या अर्थाने) आश्चर्य व्यक्त केले होते.

सुंदरच लेख, धन्यवाद. अनेक आठवणी जाग्या झाल्या. काही पुढे देतो.

एका चांदण्या रात्री पर्यटनस्थळी आम्ही भोजनोत्तर गप्पा हाणत बसलो असतांना मी वाईनची बाटली उघडली असता एकाने मला काला अंग्रेज म्हटले. वर इंग्रज लोक जेवणानंतर गप्पा हाणतांना रेड वाईन पीत अशी माहिती त्याने दिली. वाईनबरोबर वेगवेगळ्या (कुबट) स्वादाचे चीज खातात असेही त्याने सांगितले. आपल्याकडचे प्रोसेस्ड चीज खातांना साबण खातो आहे असे वाटते असे तिसर्‍याने सांगितले होते.

चौकस२१२'s picture

30 Oct 2019 - 5:56 am | चौकस२१२

आवडला लेख , वेगळे पैलू दाखवणारा ,, "जोशी घेतात बरका !" असे ऐकले कि हमखास डोळ्यासमोर हे जोशी रोज पिऊन पडत असतील , संसाराची जबाबदारी पण वाहवत नसतील आणि बायकोला मारहाण वैगरे असेच चित्र बरेचदा आपलय समाजात का केले जाते,, मला तरी वाटत याला कारण पुरुषप्रधान संस्कृती आणि पिणे आणि टोकाला जाणे यामुळे हे होत असावे , माफक , छंद म्हणून घयावे हे उत्तम, अर्थात हे हि खरे कि त्यापासून पूर्ण दूर राहणे ही अवघगड असते लेखात अजून वेगवेगळ्या पेय बद्दल पण वाचायला अजून मजा आली असती

सुबोध खरे's picture

30 Oct 2019 - 8:47 pm | सुबोध खरे

मद्य पिणे हा आनंदाचा भाग असू शकतो पण तो आनंदाचा अविभाज्य भाग जेंव्हा होऊ लागतो तेंव्हा काही तर गडबड आहे असे समजावे.

कुठे हो सुंदर देखावा दिसला कि इथे दारू नाही मग काही मजा नाही असे समजणारे महाभाग बरेच दिसतात.

गणपती जातात केंव्हा आणि आम्ही बसतो केंव्हा
किंवा
श्रावण संपतो केंव्हा याची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारे लोक फार दिसू लागले आहेत.

असेच लोक बऱ्याच वेळेस दारू जास्त चढली कि अचकट विचकट बोलणे, बायकांकडे लघळपणे पाहत राहणे असे प्रकार करतात.

यामुळे मद्यपान हे जास्त बदनाम झाले आहे.

वीणा३'s picture

30 Oct 2019 - 9:59 pm | वीणा३

मस्त लेख. वेगळ्या पुरुष प्रधान क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांचं प्रचंड कौतुक वाटतं. 
"भारतीय बायका अनेकदा बारमध्ये किंवा पार्टीमध्ये नजरेला नजर देऊन बोलायचेच टाळतात, जणू मला त्यांचे खूप मोठे गुपितच कळलेय.  "

भारतात अजूनही एखादी बाई स्वतः दारू पिताना दिसली कि सरळ तिच्या केरेक्टरवर शंका घेणारे लोक आहेत, तुम्ही तर बार टेंडर च काम करताय हा त्यांच्यासाठी दणदणीत धक्का असणार आहे ;) 

भारतीय बायका अनेकदा बारमध्ये किंवा पार्टीमध्ये नजरेला नजर देऊन बोलायचेच टाळतात, जणू मला त्यांचे खूप मोठे गुपितच कळलेय

ऐकावे ते नवलच..!

मद्य आणि भारतीय स्त्री हा एक वेगळा विषय होऊ शकतो लिखाणासाठी.....
तुमचा लेख आवडला. एका वेगळ्या विषयाची चांगली माहिती मिळाली. लेखात लिहल्याप्रमाणे जर भारतीय स्त्री एखाद्या बार मधे दिसली तर अजूनही आपल्याकडे अग्ग बाई ती पण घेती...... असे उदगार काढले जातात. त्यात हे चविला उत्तम लागणारे कोकटेलची चव घेण तर लांबच. केवळ एक विरंगूळा म्हणुन अथवा थोडावेळासाठी का होईना आपण हायस होतो या साठी मद्य घेण काहीच गैर नाही मग ते पुरूष असो की बाई.
पण प्रमाणाबाहेर दारु पिऊन हंगामा करणे खरच आवडत नाही.
पिण्यासाठी बसणे त्यासाठी बनवलेले नियम याला कारणीभुत असतात असे मी म्हणेल. एखाद्याला चढ्ली की त्याची मजा बघणे यासाठी उगाच मैत्रीच्या नावाखाली जबरद्स्तीने त्याला दारु पाजणे त्याच्यात आता पिण्याची क्षमता उरलेली नसताना देखिल. मग या मुळे जे घडते त्याच्या मूळे दारु अथवा मद्य वाईट होते आणि बायको आणि नवर्‍याची दारू पार्टी यावरून वेगळेच रसायन घरात तयार होते.

रमता जोगी's picture

3 Nov 2019 - 3:02 pm | रमता जोगी

मस्त आणि वेगळाच लेख. असं हटके क्षेत्र निवडल्याबद्दल लेखिकेचं अभिनंदन.

लेखाचं मुद्रितशोधन झालं नाहीये कां? काही चुका राहून गेलेल्या दिसतायत.

तुम्हांला काही चुका आढळून आल्या असतील तर साहित्य संपादक आयडीला व्यनी कराल का कृपया?

"ला पिलादे साकीया...पैमाना पैमाने के बाद..."

कॉकटेल्स हा आवडता प्रकार असल्याने, एकाचवेळी दोन्ही हातात दोन, चार, सहा बाटल्या पकडून अंदाजपंचे त्यातला द्रव ओतणाऱ्यांपासून ते सर्व घटक पदार्थ काटेकोरपणे मोजून-मापून कॉकटेल शेकरमध्ये घेऊन तो लयबद्धरित्या हलवून ड्रिंक सर्व्ह करणाऱ्या, जगलिंग, आगीचे खेळ करून दाखवणाऱ्या अशा सर्वच प्रकारच्या बारटेंडर्स विषयी कुतूहलमिश्रित आदर असल्याने शैलीदार बारटेंडर्सना कॉम्प्लीमेंट देण्याचे सौजन्यही पाळतो.
तुमच्या लेखात ह्या विषयाचे अनेक कंगोरे छान स्पष्ट करून दाखवलेत त्यासाठी अनेक धन्यवाद.
"चियर्स..."

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 4:33 pm | श्वेता२४

सर्वच माहिती नवीन आहे. लेखिकेच्या या आगळ्यावेगळ्या निवडीबद्दल अभिनंदनच करायला पाहिजे.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 11:27 pm | मुक्त विहारि

जमल्यास विविध प्रकारच्या काॅकटेलची माहिती दिलीत तर उत्तमच. ..

गामा पैलवान's picture

24 Nov 2019 - 8:29 pm | गामा पैलवान

श्वेता चक्रदेव,

लेख आवडला. तुमचा छंदास सर्जक व क्रियाशील परिमाण लाभो.

दारू प्यायली की मुखवटा गळून पडतो हे माझ्या बाबतीत खोटं आहे. :-) एकतर मी पीत नाही. त्यातूनही सटीसामाशी प्यायलीच तर एकदम गप्प होतो. बायको मात्र पिते. भरपूर नाही, पण विविध प्रकारच्या मद्याची बऱ्यापैकी व्यवस्थित माहिती करवून घेतली आहे.

बारमध्ये जोडी जमवण्यावरून एक किस्सा आठवला. आमचा योजितविवाह ( म्हणजे अरेंज म्यारेज) आहे. बायकोला नवलाईने हापिसातल्या गोऱ्या मैत्रिणीने विचारलं की कसं जमतं देशी बायकांना असा आयुष्यभराचा निर्णय दोन तीन तासांत घेणं. तुम्ही काय करता? बारमध्ये जोडीदार बघता का? यावर बायको खोखो हसंत म्हणाली की नेमक्या याच ठिकाणी मी आयुष्याचा जोडीदार आजिबात शोधणार नाही! Bar is a place where I would rather NOT look for a lifemate! I will be too drunk for such a big decision! :-)

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

26 Nov 2019 - 6:18 am | जॉनविक्क

लेख सुपरहिट का ठरू नये ? पण नेमकं काय हे माझ्या बुद्धीला झेपले नाही म्हणून पास

चौथा कोनाडा's picture

4 May 2020 - 1:32 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर रसाळ लेख !
बार टेंडिंगचे किस्से भारी आहेत !

कधीही लग्न न झालेला सॅम मागची ३५ वर्षे एकटा राहतो आहे. शेजारी जो बसेल त्याला फुकट दारू पाजायचा. आजपर्यंत किती जणांनी त्याच्या या सवयीचा फायदा करून घेतला असेल ते देवालाच माहीत. रात्री बार बंद होताना, नि:श्वास टाकून हळू पावले टाकत जाणारा सॅम अस्वस्थ करून जायचा.

दुर्दैवी !

आपल्या विचारांच्या कक्षेबाहेर असलेले लोक आणि त्यांचे अनुभव भेटतात, कळतात. आपल्याला अनेकदा माहीतच नसते की आपल्या डबक्याबाहेरचे जग कसे आहे, तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत, तिथल्या लोकांच्या आकांक्षा, ध्येय काय आहेत. ही माणसे त्यांच्या त्यांच्या विश्वाचा छोटासा तुकडा आपल्यासमोर घेऊन येतात. अनेकदा हे काम करत असताना, तुमच्यासमोर असलेली माणसे अत्यंत नाजूक मन:स्थितीतदेखील असतात. अशा वेळी आपली डोके क्षणात ठेवून, त्यांना सावरणे गरजेचे असते. बार-टेंडिंग हे एक अनोखे जग आहे.

व्वा, सही लिहिलंय !

(ऐन लॉक डाऊनच्या दिवसात असा लेख वाचायचा योग यावा हा एक वेगळ्याच प्रकारचा योग आहे)