ये हरीयाली और ये रास्ता

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
11 Oct 2019 - 8:35 am
गाभा: 

प्रास्ताविक

सध्या जो वृक्षतोडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्या निमित्ताने मित्रांबरोबर जे बोलणं होत असतं त्यातुन जे विचार मनात घोळत आहेत ते मला मांडावेसे वाटतात. वृक्षसंवर्धन हे किती आवश्यक आहे वगैरे सर्व सर्वानांच माहीत आहे मान्य आहे त्यावर फार काही बोलण्याची गरजच नाही. तर सर्वप्रथम मी स्वतः माझ्या स्वतःच्या घरी व अल्पप्रमाणात माझ्या दोन तीन समविचारी मित्रांबरोबर बाहेर इतरत्र थोडीफार झाडे लावली जगवली आहेत व आम्ही सध्याही ते जमेल तसे जमेल तितक्या प्रमाणात करतच असतो. मात्र हे अर्थातच फारच मर्यादीत आहे याची मला जाणीव आहे. माझा या क्षेत्रातला अनुभवही आणि ज्ञान हे ही मर्यादीत च आहे. आणी आमचे काही प्रयत्नही पुर्णपणे फसले ही आहेत, अगदी मागच्याच पावसाळ्यात काही ठिकाणी आमच्या मुर्ख चुकांमुळे केलेली मेहनत वाया गेली तर असे काही छोटे छोटे अनुभव आणि चिल्लर कामाचा अनुभव गाठीशी आहे इतकचं. पण वृक्षसंवर्धना विषयी काही विचार आहेत जे मला तरी वाटतं या दिशेने प्रवास झाला तर कदाचित अधिक यश येइल असे मला तरी वाटते. एकंदरीत समाजात फारसा काही उत्साह झाडांच्या जोपासने बाबतीत दिसत नाही त्यावर उपायाच्या दृष्टीने थोडे संस्थात्मक म्हणजे छोट्या छोट्या कम्युनिटीज मार्फत वा जमेल तिथे जमेल तितक्या मोठ्या प्रमाणात काही काम अशा रीतीने शक्य आहे असे वाटते. म्हणजे आपण जे एकेकटे वा छोटे छोटे गट म्हणून झाडांसाठी जे काही करतो ते ही तितकेच आवर्जुन करणे अगत्याचे आहेच. कारण विकासाच्या गरजा एकीकडे आणि पर्यावरणाच्या गरजा हा ताण कायमच राहणार तर सोल्युशन च्या दिशेने मुद्दे असे सुचतात की. संस्थात्मक पातळीवर अगदी लहान ते मोठी असो असे करता येइल.

१-वृक्षसंवर्धनाची प्रेरणा स्वार्थ केंद्रीत असावी. जवळचा विचार अधिक, व्यावहारीक अधिक व उदात्तता कमी करावी.

वृक्षसंवर्धन हे किती व्यक्तीगत स्वार्थाचे आहे याचा अधिक प्रचार केला हे दाखवुन दिले सिद्ध केले तर लोक अधिकाधिक यासाठी प्रेरीत होतील असे वाटते. म्हणजे तुम्ही झाडे पुढील पिढीसाठी नका लावु, वसुंधरेसाठी मानवजाती वगैरेसाठी ही नका लावु पण तुमची आयुष्याची पुढची दोन वर्षे तुमच्या परीसरातील भुजल पातळी उंचावली वा किमान न खालावता स्थिरावली तुमच्या रोजच्या प्रवासाच्या मार्गावर किमान काही प्रदुषण कमी होउन तुम्ही पुढची दोन वर्ष कमी विषारी वायु चे सेवन केले तर तुमचे आरोग्य वाचेल. तुम्ही अधिक जगाल तुमच्या डोळ्यांना हिरवाई सुखावेल आत्ता आणि इथेच. तुमचा या निमित्ताने व्यायाम होइल या झाड लावण्या वाढवण्याच्या प्रोसेस मध्ये तुमचा पेशन्स वाढेल जो इतरत्र उपयोगी ठरेल वगैरे वगैरे (अनेक मुद्दे दाखवता येतील याची लिस्ट बनवता येइल हायलाइट करता येइल ) यासाठी तरी तुम्ही वृक्षसंवर्धन करणे कसे अगत्याचे आहे असा व या रीतीने या दिशेने या कामाचा प्रचार झाला पाहीजे. जर वृक्षसंवर्धन याची देही याची काळा उपभोगायला मिळाले हे जाणवले तर ते करण्याचा उत्साह नक्कीच वाढेल लोक अधिक प्रेरीत होतील असे वाटते. म्हणजे दोन वर्षापुढील जे काय फायदे होतील त्याची चर्चाच नको त्याचा विचारही नकोच तो सर्वानांच माहीत आहे. दोन वर्षाच्या आतील प्रत्यक्ष फायदे अधोरेखीत कसे करता येतील हे बघितले पाहीजे म्हणजे थोडक्यात अधिकाधिक स्वार्थी व उथळ दृष्टीकोण बाळगला पाहीजे भव्य उदात्तता दिर्घकालीन दृष्टीकोण इ. जाणीवपुर्वक टाळावीत .याने अधिक लोक अधिक झाडे लावतील व जगवतील. मला झाड माझ्या स्वतःसाठी लावणं किती आनंदाच फायद्याच महत्वाच आज आणि आत्ता आहे हे पटवावे.

२-वृक्षारोपणा च्या मुळावर घाव आणि वृक्षसंवर्धनाला खतपाणी घालणे.

वृक्षारोपणाला मिळालेले सामाजिक महत्व प्रेम त्यातला सोपेपणा यामुळे मोठी हानी झालेली आहे असे मला वाटते. आपण सर्व जाणतो वृक्षारोपणा चा कार्यक्रम हा फोटो काढण्यास, दिवस साजरा करण्यास, उपयुक्त आहेच. मात्र या रोपणवादी मानसिकतेन संवर्धनवादाचे मोठेच नुकसान झालेले आहे. रोपण ही फक्त पहीली पायरी आहे व आपण त्याच्या पुढे जातच नाही हे आता कुणाला जाणवतही नाहीच. तर आपण माध्यमांचा वापर करुन असे करता येइल की रोपणाला हळु हळु दुय्यम स्थानावर टाकायचे. जसे संवर्धनवादी ग्रुप जाहीरात देऊ शकेल " वृक्षारोपण तुमचे फोटो तुमचा संवर्धन आमचे " फक्त एक नंबर द्यावा आणि संपर्क साधा म्हणावे. मग अर्थातच या कार्यक्रम झालेल्या ठिकाणच्या अनाथ झाडांची संवर्धन करायची जबाबदारी घ्यावी. अशा सततच्या कृतीने लोकांमध्ये रोपणाच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची लज्जा निर्माण होण्यास मदत होइल व संवर्धनाकडे लक्ष वेधले जाईल. दुसरं आपल्या संस्थेचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम रात्री च्या वेळेतच करण्याचे नियम करावेत तिथे अर्थातच फोटो मोबाईल सर्वच नसावेत. गुप्तदानाच्या धर्तीवर गुप्तवृक्षारोपण कार्यक्रमाचा संकल्पनेचा प्रसार जोमाने करावा. आणि याच्या अगदी उलट वृक्षवर्धापनदिन धडाक्यात फोटो सेल्फी न्युज सर्व मसाला वापरुन साजरे करावेत. त्याने वृक्षारोपण ही अत्यंत दुय्यम सोपी ( इथे केवळ संवर्धनाच्या तुलनेने म्हणतोय इतकेच कृपया गैरसमज करु नये ) प्रसिद्धी करण्यालायक बाब नाही उलट असे करणे अत्यंत हास्यास्पद आहे अशी जनभावना निर्माण करावी व खरे महत्व वृक्षवर्धापनदिनाचे च आहे हे ठसवावे. त्यात वर्धापनदिनी वक्त्यांनी झाड वाढवतांनाचे आपले अनुभव अडचणी शेअर कराव्यात याने पुढील वृक्षवर्धापनाला बळ मिळून ते प्राथमिक स्थानावर येइल. थोडक्यात वृक्षारोपण मानसिकतेवच्या मुळावर घाव घालावा आणी वृक्षसंवर्धनाच्या मानसिकतेला खतपाणी द्यावे.

३- टॉप टेन, सुपर थर्टी ,फायनेस्ट फिक्टी च्या या परीसर अनुकुल वृक्ष याद्या विकसीत कराव्यात.

प्रत्येक भौगोलिक परीसरानुसार तिथे वाढण्यास अनुकुल, कमी संसाधने लागणारी, त्या त्या भुभागाची गरज असलेल्या झाडांच्या याद्या तयार करता येतील. यात अर्थातच या क्षेत्रातले तज्ञ मदत करु शकतील. म्हणजे एकाच एक प्रकाराची झाडे न येता आवश्यक ती जैव विविधतेच्या दृष्टीने , परीसर इ. विचार करुन ते लिस्ट देऊ शकतील. मग आपल्या परीसरातील या प्रायॉरीटी लिस्ट ची प्रसिद्धी सर्क्युलेशन आपापल्या भागात करता येइल. की जेणेकरुन ज्याला काहीच माहीत नाही व ज्याला इच्च्छा झाली तर समोर एक लिस्ट तात्काळ उपलब्ध असावी की मग तो त्यातुन निवडही करु शकेल व त्यातुन एक टारगेटेड विकास होण्यास मदत होइल. कारण अनेकांना कुठले झाड लावणे आपल्या परीसराची सर्वात जास गरज आहे अनुकुल आहे हेच माहीत नसते. यातुन तीच तीच वा अनावश्यक वा परीसर प्रतिकुल झाडे रोपण कार्यक्रमांत लावली जात असतात. तज्ञांची तयार यादी समोर असेल तर फार मोठा बदल घडेल. यादी प्रसिद्धीचे काम संस्थेने करावे यात व्हॉट्सॅप फेसबुक चा वापर करता येइल याला सदाशिवपेठ सुपर सिक्स इ. परीसराभिमान जोडुन किंवा "आमच्या अमुकपुरात तुम्हास एकाहुन एक गुलमोहर दिसतील " असा परीसरास्मितेचा ही कुशल वापर करुन घेता येइल . यादीच्या आतील झाडे लावणे किती महत्वाचे व अगत्याचे आहे याचा प्रचार करावा त्या मागची कारणमीमांसा सुलभ मुद्यात द्यावी.

४- ट्री बँक ट्री लायब्ररी.

आपल्या परीसरात एक एक छोट्या ट्री बँक तयार करता येइल. ज्यात अर्थातच आपल्या परीसरातील जी वरीलप्रमाणे बनवलेली लिस्ट आहे त्याची रोपे तयार करुन ठेवता येतील. जेणेकरुन ज्या कोणाला इच्छा झाली व त्याच्या कडे लिस्टही आहे व तो ट्री बँकेतुन रोपं ही नेऊ शकतो व लाऊ शकतो. म्हणजे त्याला ही अधिक प्रेरणा मिळेल की जे झाड आपण लावतोय त्याची निवड अधिकाधिक फलदायी आहे. ट्री लायब्ररी देवाण घेवाण तत्वावर चालवता येइल आपल्या कुंड्या देउन दुसर्‍या आणणे एकाला एक रीप्लेस करत विविधतेचा आनंद घेता येइल. महत्वाचे म्हणजे याने जी प्राथमिक पातळीवरची लगट झाडांशी होणे आवश्यक आहे त्यास चालना मिळेल.
अर्थात जी आपण झाडे वाढवली आहेत ती सोडवत नाहीत पण त्यातील काही जास्तीची वा बदलण्याची उर्मी असेल तर ती तशी असे होऊ शकते. म्हणजे आपला मर्यादीत जागेचा व संचाचा स्वॅपींग ने आनंद वाढु शकतो.

५-लवचिक पालकत्व

अनेक लोकांना इच्छा असुनही एकेका झाडाची संगोपनाची सलग व अखंड जबाबदारी घेता येणे शक्य नसते. तेव्हा अशा वेळेस ग्रुप वा संस्था जबाबदारी वाटुन घेऊ शकते. म्हणजे एखाद्याला इच्छा झाली व तो पुढील महीनाभर मोकळा आहे तर त्याला आपल्या ग्रुप मधील संस्थेतील त्याच्या घराजवळील झाडे वाटुन दिली जाऊ शकतात तीही निश्चीत तेवढ्याच कालावधी पुरती. मग त्यानंतर ती जबाबदारी दुसर्‍या इच्छुकाकडे. म्हणजे एकावरच आयुष्यभराचा भार टाकण्याची गरज नसल्याने जे थोडा थोडा काळ तुकड्यात तुकड्यात योगदान देऊ शकतात त्यांचे ही श्रम उपलब्ध होऊन हातभार लागतो. या लवचिक पालकत्वाचा भार सहज उचलला जाऊ शकतो. कोणी काही कामानिमित्ताने बाहेर गावी राहत असेल तेव्हा तिथे त्याला ही संधी मिळु शकते. कोणी गावाबाहेर जात असेल तर त्याचे अपुर्ण काम दुसरा उपलब्ध पालक पुर्ण करु शकतो. यासाठी मात्र त्या त्या ग्रुपला व संस्थेला अजुन एक सर्वात महत्वाचे काम करता येइल ते म्हणजे

६- आधार कार्ड, लागवडीचा विदा, कोडींग आणी ट्रॅकींग

वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत हा भाग मला सर्वात महत्वाचा वाटतो. म्हणजे असे की नुसती रोपणवादी मानसिकता बदलायची असेल तर आपण लावलेल्या प्रत्येक झाडाला एक युनिक कोड देता येइल त्याचा आधार क्रमांक समजा. यासाठी मोठ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. छोटा गट ही आपल्या एक्सेल ,मार्कर, जीपीएस इ. साधनांचा वापर करुन लावलेले प्रत्येक झाड त्याच्या नाव जाती त्याचे कुळ त्याचा पालक त्याचे अचुक स्थान जन्मतारखे सह नोंद करु शकतो त्याला कोडींग त्याला आधार क्रमांक देऊन करुन विदा बनवु सांभाळु शकतो. कोडींग ने निश्चीत विदा तयार होइल हा मुळ विदा फार उपयुक्त ठरेल.

या नंतर त्याचे ट्रॅकींग करणे फार महत्वाचे आहे. म्हणजे उदा. लावलेल्यापैकी किती झाडे जगली किती जळाली वा नष्ट झाली ? त्याची नेमकी कारणे काय होती ? कुठल्या झाडांना जगवण्यात अडचणी आल्या व कशा रीतीने त्या सोडवता येतील ? हे व असे अनेक संबंधित पैलु गट ट्रॅक करु शकेल त्यामुळे पुढील संवर्धनाची वाटचाल अधिक सोपी होइल. वरील जे पालकत्व सोपवणे आहे ते असा विदा उपलब्ध असल्यावरच करता येइल. जुना विदा उपलब्ध असल्याने व त्याचा अनुभव हा पुढील वाटचालीला फार मार्गदर्शक ठरेल. त्याने जी लिस्ट मधील झाडे कमी लावली गेली आहेत ती वाढवण्या वर व जास्त लावण्यात आलेली आहेत ती टाळण्यावरही भर देता येइल. व उद्दीष्ट साधणं अधिकाधिक अचुक होत जाईल. भविष्यात कुठला प्रकल्प तिथे आला तर वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित झाला तर तेथील संस्थेकडे पुर्ण विदा तयार असेल त्यातुन संबंधित निर्णयप्रक्रियेला मदत होइल. एकूण संवर्धनापुर्वी व नंतर भुजलपातळीतल बदल , प्रदुषणातील बदल अगोदर व नंतर असा मोजुन दाखवता येइल. त्यातुन झालेला तात्कालिक लाभ पुराव्यासहीत अधोरेखीत करता येइल प्रसारीत करता येइल.
यासाठी लावलेल्या झाडांचा विदा बनवणं व त्यांच्या वाढीचा ट्रॅक ठेवण अत्यावश्यक आहे.

७- ग्रीन लोकेशन ग्रीन स्पॉट आयडेंटीफिकेशन.

अनेकदा चुकीच्या जागी झाडे लावली जातात ती नंतर तोडावी लागतात. स्थानिक टाउन प्लॅनींग खात्याच्या मदतीने, जाणकारांच्या मदतीने भविष्यातील विकासाचा अदमास घेऊन, सभोवतालची सद्यस्थिती लक्षात घेऊन अशा जागा असे ग्रीन स्पॉट शोधण्याचा त्यांना मार्क करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. हे अशासाठी की एकदा लावलेले झाड शक्यतो तोडण्याची वेळ तात्काळ तरी येऊ नये दिर्घकाळ ते तिथे राहु शकेल वाढु शकेल व विकासाची गंगा त्याच्या आसपास खेळु शकेल वा त्याला टाळु शकेल असे बघावे. जागा निवडीत चुक झाल्याने बरेच परीश्रम वाया जाऊ शकतात. ज्या कोणाला झाडे लावायची असतील त्यांना या आदर्श ग्रीन स्पॉट चा ग्रीन लेन चा पर्याय देता येतील. याचा ही विदा उपलब्ध असला तर भविष्यातील अनेक कटुता टाळल्या जाऊ शकतात.

८- हरीत संस्कार हरीत संस्कृती प्रसार

लहान मुलांवर क्रिएटीव्ह पद्धतीने हरीत संस्कार करता येतील. उदा. जर शाळेच्याच परीसरात जागा उपलब्ध असल्यास तिथे वा जवळपास जमेल तिथे एक एक तुकडीचे एक झाड लावावे. म्हणजे पहीली ते दहावी फ चे एक झाड. मग तुकडीतली सर्व मुले मुली त्याची जोपासना करुन त्याला वाढवतील. विचार करा ते जेव्हा शाळा सोडुन जातील तेव्हा त्यांच्या आठवणींचा एक गोफ त्यांनी लावलेल्या झाडाभोवती विणला जाईल. त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी त्या झाडाला लगडलेल्या असतील. यातुन त्यांच्यावर एक खोलवर असा हरीत संस्कार होइल ज्यातुन ते भविष्यात ही प्रेरीत होतील. म्हणजे हा एक असे अनेक उपक्रम शोधता येतील किंवा उदा, अपत्य झाल्यावर त्याच्या बरोबरीने त्याच दिवशी किंवा त्याच्या पहील्या वाढदिवशी एक झाड लावण्याचा प्रसार करता येइल त्याने आपल्या मुलाबरोबर अजुन एक मुल दोघांची होत असलेली वाढ हे हिरवी भावनिक गुंतवळ निर्माण करेल. ज्याने तो मुलगा पुढे प्रेरीत होइल.

वृक्षसंवर्धनप्रसारासाठी आपण वृक्षवर्धापना दिना निमित्ताने त्या त्या झाडाखाली झाडाजवळ छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करता येइल. तिथे त्याच्या सानिध्यात एकत्रित भेटणे, काव्य चर्चा वाचन करणे, पुस्तकातल्या ग्रीन पोएट्रीचे ग्रीन पॅराग्राफ्चे वाचन करणे असे काही करता येइल. ( हेसेच्या सिद्धार्थ मधील नदी चा उतारा, ज्ञानेश्वरीतला त्यांचा लोकेशन सिलेक्शन चा उतारा , अफ्रिकन ट्री पोएम्स , महानोरांच्या कविता वगैरे इ.इ. ) आर्ट ऑफ लिव्हींग च्या एका कोर्समध्ये एक झाडाला मिठी मारण्याचा विधी असतो तसे काही ( चिपको आंदोलन आठवले ) तसे काही अजुन बरेच विचार करता येइल. तर असे उपक्रम करुन हरीत संस्कृती जाणीवपुर्वक विकसीत करता येइल.

९- ग्रीन पॉइंटस रेटींग ग्रीन इन्सेटीव्ह्ज

कुठल्याही पर्यावरणावर काम करणार्‍या संस्थेला जर किंवा ग्रुप इ, ला एक ग्रीन रेटींग जर देता आले तर ते उपयुक्त ठरेल. म्हणजे समजा एखाद्या संस्धेने अमुक एक इतकी झाडे लावुन जगवली व अमुक इतकी वर्ष जर ती असे असे काम केले तर त्या प्रमाणे संस्धेला रेटींग मिळावे. म्हणजे जेव्हा एखाद्या विकास प्रकल्पा विरोधात जेव्ह अशी संस्धा उभी ठाकेल भविष्यात तेव्हा त्यांची बाजु अधिक मजबुत ठरेल म्हणजे बाकीच्यांनी आक्षेप घेऊच नये वा त्यांची पात्रताच नाही असे म्हणायचे नाही तो हक्क सर्वाचा आहेच. पण याने काय होइल ज्या संस्धांचे ग्रीन रेटींग जास्त त्यांना बाजु मांडण्यात प्राधान्यक्रम तरी किमान मीळावा, शिवाय संस्धांना तुही यत्ता कंची ? या प्रश्नाला ही चांगले उत्तर देता येइल . व त्या त्या परीसरात काम केलेल्या संस्धेला त्या त्या परीसरातल्या विकासप्रकल्पा संदर्भात अधिक उत्तम व लायक भुमिका घेता येइल. तसेच ग्रीन इन्सेटीव्ह्ज म्हणजे जर एखाद्या ग्रुप चे ग्रीन वर्क जास्त आहे तर त्याला त्याचा लाभ दुसर्‍या एखाद्या अ-आर्थिक स्वरुपात देता येइल का याचा विचार करता येइल.

१०-ग्रीन रीस्पॉन्स

"We are a generation of settlers, and without the steel helmet and gun barrel, we shall not be able to plant a tree or build a house." moshe
विकासक्रम अटळ आहे ( माझ्या मना बन दगड बन दगड हा रस्ता अटळ आहे ) त्याला रोखु शकत नाही रोखणे चुकीचेच आहे. अनेक बाबी आहेत एक तरफ हरीयाली है एक तरफ रास्ता ( हे मी माझ्यापुरत dilemma मानतो ) तो प्रश्न कॉम्प्लेक्स आहे. पण आपण त्या ऐवजी भविष्यातील प्रत्येक योग्य न्याय्य लायक आवश्यक विकास प्रकल्पाला विरोध करण्या ऐवजी त्याला ग्रीन रीस्पॉन्स देता येइल. म्हणजे सर्वात विधायक एकमेव पर्याय आपल्या हातात हाच आहे की जर एखाद्या लायक विकास प्रकल्पात जर १०० झाडे कापली जाणे आवश्यक असेल तर आपण त्याच्या बदल्यात २०० झाडे लावु. याला धार्मिक जोड ही देता येइल. की आपल्या एका पापाच्या बदल्यात आपण दोन झाडे लावुन प्रायश्चित घेउ. हरीत संघटनांनी आपला हरीत सात्विक संताप प्रकल्प विरोधाच्या पहील्या दिवसापासुन एकीकडे पर्यायी झाडे लावत लावत दुसरीकडे विरोध करता येइल. याने त्यांच्या बाजुला नैतिक बळ येइल त्यांच्या आक्षेपांना जनतेचा पाठींबा मिळेल.
व्यक्तिगत पातळीवरही हाच पर्याय आहे. आपापल्या मर्यादीत वर्तुळात मर्यादीत प्रभावात आपण सर्व सर्व चुकीच्य पर्यावरण नाशाला एका छोट्या हिरव्या रोपट्याने ग्रीन रीस्पॉन्स देउ शकतो.
अजुन आपण काय करु शकतो ? मित्रांनो आपले विचार जाणुन घ्यायला आवडेल. शेवटी एक आवडती कविता देण्याचा मोह आवरत नाही.

TREES

I think that I shall never see
A poem lovely as a tree.

A tree whose hungry mouth is prest
Against the earth's sweet flowing breast;

A tree that looks at God all day,
And lifts her leafy arms to pray;

A tree that may in Summer wear
A nest of robins in her hair;

Upon whose bosom snow has lain;
Who intimately lives with rain.

Poems are made by fools like me,
But only God can make a tree.

Alfred Joyce Kilmer

प्रतिक्रिया

आवडला लेख. देशी वृक्ष लावणेही गरजेचे.

आनन्दा's picture

11 Oct 2019 - 2:05 pm | आनन्दा

लेख आवडला.. विशेषतः वृक्षवर्धापनदिनाची कल्पना खूपच आवडली.

लेख आवडला, सर्व पॉईंट मस्तच.

जसे आपण वृक्ष ट्री हा मुद्दा लिहिला आहे , तसाच, काही झाडांचे बी , बियाने, रोपे, आपण जेथे निसर्गात जावु तेथे लावले किंवा लावायला दिले पाहिजे.

मला असे वाटते..

वनखाते किंवा शहरात , कुठे तरी असे झाडांचे, कुठल्या बी ने कुठले झाड येते आणि त्याचे निसर्गाशी नाते काय ? हे ज्ञान मिळवुन जिथे जाईल तेथे किंवा तेथील पारंपारिक लोकांना या वृक्षांचे महत्व सांगुन त्यांना ती रोपे किंवा बी आपण लावायला देवु शकतो..

हा माझ्यासाठी सोप्पा पर्याय आहे, कारण महिन्यात २ ट्रेक होतात, आणि त्यामुळे लोक , तेथील जनता , यांच्याशी संपर्क येतोच. म्हनुन हा मुद्दा सुचवला

----

या व्यतिरिक्त माझ्या गावाकडे जी जिरायती जमिन पडिक आहे, तेथे झाडे मी लावु शकतो हे मला माझ्या मागच्या धाग्यावरील रिप्लाय वरुन कळाले आहे, लवकरच तो उपक्रम हाती घेतो गावाला गेल्यावर .. बघु ..

कुमार१'s picture

11 Oct 2019 - 5:25 pm | कुमार१

छान आहे. आवडली.

तेथूनच वृक्षसंवर्धन खरे लवकर सुरू होऊ शकते. याबाबत भूतानचा आदर्श किमान भारतीयांनी नक्कीच घ्यावा.

तेथूनच वृक्षसंवर्धन खरे लवकर सुरू होऊ शकते. याबाबत भूतानचा आदर्श किमान भारतीयांनी नक्कीच घ्यावा.

सरजॉन

म्हणजे भुतानने नक्की काय उपक्रम राबवलेला आहे ? कृपया विस्तारपुर्वक सांगितले तर बरे
जाणून घ्यायला आवडेल ?

कृपया प्रश्नचिन्हाकडे दुर्लक्ष करावे
भुतान चा प्रयोग जाणुन घ्यायला आवडेल.

उदा. एखादी (सार्वजनिक अशी) रिकामी जागा दिसली की तिथे झाड लावले गेलेच असे समजा. बरे नुसते झाड लावून थांबणार नाहीत कोणी त्या भोवती अतिशय सुंदर कुंपण तयार करेल तर कोणी तेच कुंपण अजून सुशोभित करेल(झाडाची देखभाल तर अर्थातच केली जाईल) आणी एकूणच परिसर देखणा व नेत्रसुखद बनवतील. स्वेच्छेने आणी स्वयंस्फूर्तीने. भूतान जगातील बहुदा सर्वात आनंददायी देश आणी लोकही तसेच.

अनन्त्_यात्री's picture

12 Oct 2019 - 9:42 pm | अनन्त्_यात्री

TREES ची पुनर्भेट झाली. त्याबद्दल आभार!

चौकटराजा's picture

13 Oct 2019 - 8:03 pm | चौकटराजा

आपण भारत देशातील लाकडाचा वापर व इतर देशातील लाकडाचा वापर लक्षात घेतला तर भारत देशात उद्योग, फर्निचर व घरबांधणी साठी बेछूट वृक्षतोड होते हे कोणी ही मान्य करणार नाही .भारत देशात चोरटेपणाने जंगल संपत्तीचा नाश केला जात असेल देखील पण त्याचे प्रमाण कमी आहे .एखादा रस्ता काढायचा म्हटले की वृक्षतोड , डोंगर फोड ही होणारच . लगेच उद्योग जगताचे व सरकारचे साटोलोटे आहे असा आरडाओरडा केला जात असतो तो चूक आहे. सरकार त्याच्या परीने जंगलसंपत्ती वाढवीत असल्याचे माझे तरी निरीक्षण आहे. उदा पुणे येथून सोमाटणे फाटा जवळ आल्यावर चे डोंगर पहा . यांनी ते १९६५ साली पहिले असतील त्यांना हे जाणवेल की सरकारी वनविभाग झोपलेला नाही.

आपण प्राणवायू वाढावा म्हणून काही झाडे वाढवीत नाही. देवाला फुले मिळावीत, सावली , थंडावा मिळावा , फळे मिळावीत ई पासून वेळ मस्त जातो झाडे वाढविताना ई अनेक कारणे समोर येतात. आपल्याकडे शहरात कोर्पोरेशन भरपूर झाडे लावत आहेत. खेडेगावात असे प्रयत्न तेथील ग्रामपंचायती करतात का ? किंवा तालुक्याच्या ठिकाणी हेतू पुर्वक झाडे लावून वाढविली जातात का ?

चौकटराजा's picture

13 Oct 2019 - 8:43 pm | चौकटराजा

मी आताच मासला म्हणून दौन्ड या गावाची निवड करून २०१९ ची गूगल वरची इमेजरी पाहिली. या गावात रत्यावरील झाडे या बाबतीत प्रचण्ड अनास्था असल्याचे आढळून येईल.