सकाळी उठून समुद्रावर फिरायला गेलो. तिकडे तुरळक लोक जॉगिंगला आलेले. बरेचसे लोक कुत्र्यांना फिरवायला घेऊन आलेले. कुत्र्यांना फिरवणारे सर्रास सगळीकडे दिसतात. एकूणच युरोपात कुत्री, मांजर पाळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यांची कुत्री पण शिस्तीची असतात. उगाच कुणाच्या अंगावर धावून जात नाहीत आणि उगाच भुंकत हि नाहीत. कितीतरी कुत्री मोकळीच निवांत चाललेली. मागून त्यांचे मालक येत होते. नेहमीचे लोकं आणि त्यांची कुत्रीही गप्पा मारताना दिसत होते. रस्त्यावर कुठेही कुत्र्याची घाण दिसत नाही. जबर दंड असतो त्यासाठी. आपल्याकडे सकाळी कुत्र्यांचे मालक रस्त्यावर कुठेही कुत्री घेऊन फिरत असतात आणि ती कुत्री घाण करताना निवांत पाहत असतात. किळसवाणा प्रकार आहे हा. उच्चशिक्षित लोकांनाही त्याबद्दल काही वाटत नाही, हे अनाकलनीय आहे.
समुद्रात पोहायला आलेले लोक होते. एक रशियन जोडपं सूर्यनमस्कार घालत होतं. इथं दोन महिन्यांपासून राहते आहे म्हणाली ती बाई. इथल्या समुद्रकिनाऱ्यावरचं तापमान बऱ्यापैकी उबदार आहे बाकीच्या बऱ्याचशा युरोपच्या मानाने ,त्यामुळे युरोपातले पर्यटकांची इथे बरीच गर्दी असतेच. समुद्रस्नानासाठी त्यांची पांढरीच. त्यांचा गोरा रंग त्याना आवडत नाही आणि आपल्याला आपली काळी त्वचा गोरी करायची असते. म्हणजे काय तर जे नाही तेच हवं असण्याचा सार्वत्रिक मानवी स्वभाव, असो. त्यामुळे इथे युरोपियन लोक तर येतातच. पण रशियाचे जास्त येतात, कारण एक तर त्यांच्याकडे आठ महिने मरणाची थंडी असते. जेमतेम तीन-चार महिने समर असतो. त्यांच्यासाठी तर क्रोएशिया हा स्वर्गच. तसेच पूर्वीच्या साम्यवादी राजवटीमुळे पण त्यांच्यात जवळीक असावी बहुधा.
इथे युरोपभर काही गोष्टी सार्वत्रिक आढळतात. त्या म्हणजे कुत्री फिरवणारी,पाळणारी माणसं. सिगरेट आणि बिअर वा कॉफी पिणारी लोक. सांस्कृतिक दृष्ट यांच्यात बरेच साम्य असते
.
दीड-दोन तासाने निघालो. अंडी,ब्रेड घ्यायचं होतं. त्यामुळे घरासमोरच्या बेकरीत गेलो. तिकडे फक्त ब्रेड आणि बेकरी आयटम्स होते. मग तिकडे ब्रेड आणि स्टरुकली (stuakli )घेतला. हा पदार्थ मैद्यापासून बनवतात त्यात अंडी, पनीर इ घालून स्टफीन्ग घालून रोल करून बेक करतात. हे साधारण आपल्या कडच्या पॅटिस सारखा प्रकार. भरपूर कॅलोरी असलेला हा पदार्थ खाताना जपूनच खावा असं वाटतं !!!आणि बाजूच्या फळ व भाजीबाजारात गेलो. तसा संपायला आलेला बाजार. बाजारात विविध भाज्या फळे टेबलवर लावून भाजीवाल्या आणि वाले बसलेले. अंडी मात्र एकाच म्हातारीकडे होती. तिला मी काय बोलतोय ते कळेना. मग एक तरुण भाजीवाली आमच्या मदतीला आली. तीने मग किती अंडी हवीत ती दिली. सहा अंड्याचे चांगले दहा कुना घेतले म्हातारीने. म्हणजे चक्क शंभर रुपये. तरी कुरकुरत होती कमी पैसे मिळाले म्हणून!! म्हाताऱ्याही सगळीकडे सारख्याच. एकूण काय मुनुष्य स्वभाव सगळीकडे सारखाच.
घरी आलो नाष्टा करून कपडे धुतले. चांगले कडकडीत ऊन पडलेल. त्यामुळे बाहेर स्टँडवर कपडे वाळत घातले. कारण उद्या आम्हाला पुन्हा झाग्रेबला जायचं होतं. तिथून परवा व्हिएना त्यामुळे आजच कपडे धुऊन वाळवून घेणं गरजेचं होत. इथे एकच सँडबीच आहे तोच पाहायला जाणार होतो कारण बाकी सगळीकडे दगड-गोटे आहेत. आम्ही टॅक्सी करूनच आलो. बीचवर जत्रा फुललेली. खूप लोक समुद्रात मुलाबाळांसह पोहण्याचा, पाण्यात खेळण्याचा आनंद घेत होते. अगदी छोट्या कपड्यातल्या क्रोएशियन, युरोपियन सुंदऱ्या आजूबाजूला फिरत होत्या. मी जिथे बसले होते तिकडे एक टीनेजर जोडपं पुस्तक वाचत पडलेलं. दोघेही स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये होते. टॉवेल टाकून त्यावर लोळत पडलेले. थोड्यावेळाने सामान तिथेच सोडून पाण्यात जाऊन आले. पुन्हा येऊन टॉवेलवर पडले.चोरी लुटमारीचा प्रकार इथं होत नसावा. कारण आमच्या इतक्या दिवसाच्या वास्तव्यात आम्हाला कुठेही पोलीस दिसलाच नाही.
दोन तरुणी त्यांच्या छोट्या मुलांना वाळूत खेळायला घेऊन आलेल्या. एवढ्या दोन-तीन मुलांच्या आया पण कशा चवळीच्या शेंगेसारख्या, पोट सपाट. बार्बी डॉलच जणू. अतिशय सुन्दर होत्या. तेच कपडे घालून आरामात इकडे तिकडे फिरत होत्या. लोक फोटो काढत होते पण त्या लोकांना त्याचं काही वाटत नाही. संस्कृती किती वेगळी आणि मोकळीढाकळी आहे. नाहीतर आपल्याकडे जरा वेगळे कपडे घातले तरी घाण नजरेने पाहतात. इथे लोक येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहतात, पण नॉर्मल. भारतीय मात्र कधी बाई न पाहिल्या सारखं पाहत असतात. ते खूप लाजिरवाणे वाटतं. असं वागून आपल्या महान देशाची इज्जत आपण घालवतो याचं भानही त्यांना नसतं. त्यामुळेच थायलँडसारख्या देशात भारतीय फारच बदनाम आहेत. बायका अशा तोकडे कपडे घातलेल्या पहिल्या की यांना वाटतं सगळ्या बॅड कॅरेक्टरच्या आहेत असो. आम्ही तिथून निघालो. समोर एका बसमधून काही शाळकरी मुलं रांगा लावून उतरले. बहुदा त्यांची ट्रिप होती त्यांची.
आम्ही आता पुन्हा टॅक्सी मागवली. टॅक्सीवाला म्हणाला," मीच तुम्हाला काल पण रात्री ड्रॉप केलेले."
"अरे घरी नाही गेलास का?"
" नाही बॅक टू बॅक ड्युटी घेतली,आता जाईन घरी." म्हणाला.
त्यानेच कोणत्या तरी मॉलमध्ये सोडलं आम्हाला. आता जेवणाची वेळ झाली. म्हणून तिकडेच पिझ्झा खाल्ला. आणि मॉलमध्ये फिरत बसलो. तसा छोटेखानीच होता मॉल. थोडीफार खरेदी केली, करन्सी एक्सचेंज करून घेतली. आता टपावरच्या काचेवर पावसाचा आवाज येत होता. चांगला अर्धापाऊण तास पाऊस पडला असावा. आम्ही खालच्या मजल्यावर आलो तिकडे इटालियन चीजचा मोठा स्टॉल लागलेला. नाना तऱ्हेची, चवीची असंख्य चीझ चे प्रकार तिथे विकायला होते. ते लोक आम्हाला आग्रह करत होते. पण काय खरेदी करणार? एक तर क्वान्टिटी मोठी असते त्यांची. आणि दुसरं म्हणजे ते कसं खायचं हेही माहीत असायला हव. वाइन सारखंच आहे ते. त्यामुळे आम्ही आपले निघालो. तिकडं बाहेर आलो तर सगळे रस्ते ओले झालेले. पुन्हा टॅक्सी बोलावली. तिची वाट पहात उभे होतो ,तर इथेही दोन-तीन बस मधून १२-१३ वर्षाची मुलं-मुली त्यांचे टीचर असे उतरले. रांगा लाऊन मॉलमध्ये गेले. हे बहुदा पिक्चरला आले असावेत.
आमची टॅक्सी आली, मर्सिडीज! इथे बहुतेक सगळ्या लक्झरी कारच्या टॅक्सी असल्यामुळे मस्त सगळ्या भारी भारी कारच्या टॅक्सी राईड झाल्या आमच्या. घरी आल्यावर पाहतो तो काय सगळे कपडे चिंब भिजलेले. अरे देवा! उद्या निघायचं म्हणून छान उन्हात वाळत घातलेले. आता काय करायचं? पावसानं आम्हाला पुन्हा चकवा दिला होता. आता पुन्हा ते कपडे ड्रायरला लावले आणि वाळत घातले. पंखा नसल्यामुळे कसे वाळणार याची चिंता होतीच.
थोड्या वेळाने आमची ओनर आली आम्हाला भेटायला. चांगली सहा फूट उंच, सोनेरी केसांची शिडशिडीत अतिशय सुंदर, करीना,कतरीना तिच्यासमोर किस झाड कि पत्ती असं वाटलं. आत्ताच इतकी छान दिसते, तर तयार झाल्यावर किती सुंदर दिसत असेल. असा विचार साहजिकच मनात आला. कुठल्यातरी बँकेत मार्केटिंगचा जॉब होता तिचा. त्यामुळे बऱ्याचदा फिरतीवर असते म्हणाली.
"कधी सुरू केलं एअर बी न बी?"
" कॉलेजात असताना माझ्याबरोबर युनिव्हर्सिटी मध्ये दुसऱ्या गावच्या मुली शिकायला होत्या. त्यांना राहायला घर हवं होतं म्हणून मग मी आधी त्या मुलींना घर भाड्याने द्यायला सुरुवात केली. पण मग मे महिन्यामध्ये परीक्षा झाल्यावर त्या घरी जायच्या आणि सप्टेंबर पर्यंत घर रिकामं राहायचं मग मी एअर बी न बी ला घर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे जून ते सप्टेंबर पर्यंत टुरिस्ट ला देते आणि नंतर पुन्हा युनिव्हर्सिटी स्टुडंट्स." असा तिचा सर्व बिजनेस आहे. या वर्षी तिने घर नूतनीकरण करून घेतलेल्या नंतर आम्हीच पहिले गिराईक.
"तुझं घर खूप सुंदर आहे आणि तू खूप छान सजवला आहेस."असं आम्ही तिला सांगितलं.
खूप वेळ ती बोलत होती.,"झाग्रेबला करिअर अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत कारण ते राजधानीचे शहर आहे आणि बिझनेस हब ही आहे. स्प्लिटला बेसिकली टुरिझमच जास्त आहे."
"येथेच वरच्या मजल्यावर त्याच्या काकांची फॅमिली आहे आणि मग खालच्या मजल्यावर मागच्या अपार्टमेंटमध्ये आजोबा राहतात. ते 83 वर्षांचे आहेत, पण चांगले आहेत फिट आहेत. दोन-तीन वर्षापूर्वीपर्यंत शेती करत होते. पण एकदा ते पडले आणि पायाला फ्रॅक्चर झाल. तेव्हापासून त्यांना इथं आणून ठेवलेय." ती म्हणाली,
" कामानिमित्त आणि नोकरी निमित्त सगळे घराबाहेर बाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक केअरटेकर बाई ठेवली आहे."
तिचा भाऊ आणि तो कुत्रा खेळत होते अंगणात, आम्ही म्हणालो," की तुझा कुत्रा खुपच देखणा आहे. तिने त्या दोघांना बोलावलं. त्याचं एरॉन आणि तिच्या भावाचं नाव स्टिपा. तिचा चुलत भाऊ पण त्या कुत्र्याशी थोडावेळ खेळून गेला. तो ही कुठेतरी नोकरी करतो म्हणाली.
आम्ही तिला म्हणालो कि आम्ही मी पुण्याहून आलोय."
तीने विचारलं,"मुंबई कुठे आहे?" आम्ही म्हटलं," कि आमच्या पासून जवळच आहे."
"कधीतरी ये इंडियाला." तशी ती हसायला लागली. "एवढ्यात प्लॅन नाहीये."
बोलता-बोलता तिला म्हटलं की "तुझ्या देशात जेवढे लोक राहतात, त्याच्यापेक्षा जास्त आमच्या शहरात राहतात. "त्यावर तिला खूपच आश्चर्य वाटलं. इतके लोक कसे राहात असतील एका शहरात? "
आम्ही म्हणालो,"तीच तर मजा आहे आमच्या देशाची. ये कधीतरी, लग्नानंतर ये हवंतर!" मग जोर जोरात हसायला लागली. "माझे आजोबा खूप खुश होतील, त्यांना माझ्या लग्नाची खूप घाई लागलीये." म्हणाली.
तेवढ्यात ते आलेच," मी तेच म्हणतो लवकर लग्न कर आणि सेटल हो."
"आमच्याकडे पण असंच आहे. आमचा पण मुलगा तुझ्याएवढाच आहे. त्याच्याही मागे त्याचे आजी आजोबा असेच लग्न कर म्हणून मागे लागतात." मग तर अजून हसायला लागली.
"लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहता का स्वतंत्र?"
"दोन्हीही, जसं आवडेल, जमेल तसं."
" म्हणजे हे आमच्या सारखच आहे तर."
त्यांची ही कुटुंब पद्धती ढोबळमानाने आपल्यासारखीच वाटली कुटुंबवत्सल. तसं ते चित्र सगळीकडे दिसत होतच.आणि ते प्रकर्षाने जाणवायला कारण म्हणजे युके मध्ये आम्हाला लहान मुले क्वचितच दिसली. ती ही शाळेत जाणारी अथवा बागेत. इतरत्र फारच कमी. मुलं आणि आई-बाबा असं दृश्य पण दिसल्याचं आठवतही नाही. त्यामुळे हा फरक चटकन जाणारा वाटला. असो हे अर्थातच माझं निरीक्षण.
बराच वेळ गप्पा मारत होती.
"इथे पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे जर काही घडलं आणि पर्यटन कमी झालं तर इथली सगळी अर्थव्यवस्थाच ढासळेल." ही भिती इथे साऱ्यांनाच असलेली दिसली. साहजिकच आहे ते ज्या धंद्यांवर तुमचं पोट अवलंबून आहे त्यावर काही आच न येवो असं वाटतंच सगळ्यांना. तिच्या वडिलांचा जाहिरात बोर्ड्स आणि पाट्या बनवण्याचा धंदा आहे. तो भाऊ हि त्यांच्याच बरोबर काम करतो. आणि आई कुठेतरी नोकरी करते.
इंग्लिशही मुद्दाम शाळेपासून शिकवायला सुरवात केलीये. कारण पर्यटकांसाठी ती आलीच पाहिजे असं इथल्या सरकारचं मत. ते अर्थातच बरोबरच. काळाबरोबर चाललं तरच तुम्ही टिकू शकता.
बाकी बराच वेळ ती बोलत बसली.
नंतर आम्ही त्यांच्या सोबत फोटोही काढले. आणि मुख्य म्हणजे त्या कुत्र्यासोबत फोटो काढले. खरतर तसं कुत्र्यांचे आणि आमचं दोघांचेही फार संख्य नाही. पण ते कुत्रंच एवढं देखणं होतं, की त्याच्यासोबत फोटो काढायचा मोह आम्हाला आवरला नाही. पण त्याच्या फक्त शेजारी बसून फोटो काढता आले, कारण त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला कि ते माझ्याकडच पाहायचं, मग भीतीच वाटायची.ते सायबेरियन हुस्क जातीचं कुत्रं होत. थंड प्रदेशांत लहान मुलांना खास त्याच्या उबेत झोपवतात म्हणे, इतकं ते उब तर देतच पण मुलांची काळजी पण घेत. खरच तसा कुत्र्यासारखा माणसाला जीव लावणारा आणि त्याची सोबत करणारा, त्याची काळजी घेणारा दुसरा जीव नसेल.
अशा इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा मरून ती गेली. उद्या सकाळी आम्ही जाऊ त्यावेळी येईन म्हणाली. आम्हाला सकाळी आठची बस होती. त्यामुळे आम्हाला सकाळी सातलाच निघायचं होतं.
प्रतिक्रिया
10 Oct 2019 - 11:37 am | यशोधरा
मस्त लिहिलं आहे.
10 Oct 2019 - 11:56 am | जॉनविक्क
हां दोष बायकांचा आहे, त्यांना इथे मोकळे ढाकळे कपडे घालून फिरायला काय होते ? अजूनही तुम्हाला देश महान वाटतो म्हटल्यावर विषयच संपला.
11 Oct 2019 - 6:51 pm | जॉनविक्क
भारतीय बाई कधीही तिच्याकडे पुरुष वाईट नजरेने बघतील म्हणून मोकळं ढाकळे राहणे टाळत नाही, तर ती मोकळं ढाकळे राहणे टाळते कारण तीला इतर स्त्रिया मोकळ्या ढाकल्या राहताना दिसत नाहीत त्यामुळे लोका सांगे ब्रम्हज्ञान अशीच स्थिती बहुतांश भारतीय स्त्रियांच्या मानसीकतेची असते.
यांना स्वतःमधे काही पोजिटिव्ह सापडत नाही म्हणून इतरांच्या निगेटिव्हीटीचा डँका वाजवायला आवडतो
10 Oct 2019 - 1:47 pm | जालिम लोशन
छान फिरवुन आणता आहात.
10 Oct 2019 - 8:47 pm | स्मिता दत्ता
धन्यवाद!!!
10 Oct 2019 - 9:57 pm | दुर्गविहारी
खूपच सुंदर वर्णन ! अनोख्या देशाची माहिती आहे, त्यामुळं फोटो थोडे जादा हवेत. पु. ले. शु.
11 Oct 2019 - 9:32 am | स्मिता दत्ता
आधिक फोटो व बाकीच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही माझ्या ब्लाॅगला भेट देऊ https://travelsmita.com/
10 Oct 2019 - 9:57 pm | जॉनविक्क
अन स्वभावाने लोण्याच्या गोळ्यासारखे माऊ असते, अत्यन्त प्रेमळ प्रजाती. अतिशय आवडतात. पण दुर्देवाने अल्सशियन प्रमाणे ही कुत्री भारताच्या अतिथंड नसलेल्या भागात राहू शकत नाहीत त्यामुळे फार क्वचितच दिसतात इकडे:(
13 Oct 2019 - 4:01 pm | सुधीर कांदळकर
तिथले आयुष्य छान सुशेगात दिसते आहे.
हा सत्य असला तरी कल्चरल शॉक असावा. भारतीय लोक फार काळ परदेशी राहिल्यास तसे होत नसावे. आपल्या साडी नेसलेल्या बाईच्या पोटाकडे गोरे लोक तसेच पाहातात कारण बिकीनी घातलेल्या स्त्रिया पाहायची सवय असली तरी असे बाकी शरीर व्यवस्थित झाकल्यावर फक्त पोट उघडे पाहायची सवय नसते असे एका बाईने मला सांगितले होते. मी कधी परदेशी गोर्या लोकात फिरलो नाही त्यामुळे ठाऊक नाही.
घाण न करणार्या शांत, शिस्तबद्ध कुत्र्यांबद्दल वाचून नवल वाटले. मी गावातल्या एका घरी सहा सात महिने राहात होतो. तिथे दरवाजातले पायपुसणे माझ्या डोळ्यांना खुपले की धुवून वाळत टाकून दुसरे स्वच्छ ठेवीत असे. काही मिनिटातच त्यांचे कुत्रे त्यावर चिखलाचे पाय आणून बसे.
असो. छान लेख. आवडला. धन्यवाद.
13 Oct 2019 - 4:30 pm | जॉनविक्क
हे मेले काळे, गोरे, आणी इतर पुरुष इथून तिथून सगळे सारखेच, कधीच कुठली बाई बघायला न मिळाल्यासारखे.
आता द्या बरे प्रत्युत्तर ?
15 Oct 2019 - 8:34 pm | जुइ
क्रोएशियातील सामान्य जीवना बद्दल अजूनही वाचायला आवडेल. हस्की डॉगजला केंद्रस्थानी ठेवून निर्माण केलेला हा Eight Below हा सिनेमा खूप चांगला आहे.