body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
धोंडो केशव
“शिट यार, आजोबा, मी नुसते म्हणाले जरी असते की, मला आणखी फक्त दोन मिनिटे द्या चित्र पूर्ण करायला, तर मला नक्की वेळा मिळाला असता आणि माझा पहिला नंबर आला असता आजच्या स्पर्धेत. सगळे चित्र रंगवून झाले होते, फक्त थोडेसे फिनिश करायचे होते. ज्याला पहिला नंबर मिळाला, त्याचे चित्र अजिबातच भारी नव्हते.” कर्वे रोडवरच्या कर्वे पुतळ्याजवळ मी आणि नुकतीच कॉलेजला जाऊ लागलेली माझी नात बसची वाट बघत उभे होतो, तेव्हा ती मला सांगत होती.
“बोलता न आल्यामुळे माझे नेहमीच नुकसान होते. पण मी नाही बोलू शकत, या न बोलण्याच्या सवयीमुळे शाळेतही बाकीच्या चोंबड्या मुली भाव खाऊन जायच्या आणि मी मात्र उगाच मागे राहायचे. मी कधी सुधारणार आहे कोण जाणे?” माझ्या नातीला राग व्यक्त करण्याचे माझ्याशिवाय जास्त हक्काचे ठिकाण कोणतेच नव्हते.
“अगं, असे काही नसते. तुला माहीत आहे का? तुझ्याचसारख्या एका मुखदुर्बळ माणसाला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. तो असा माणूस होता, ज्याला स्वत:च्या मुखदुर्बळपणामुळे मॅट्रिकच्या परीक्षेला बसता आले नव्हते व त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले होते. हा माणूस एकदा गणितात नापास झाला होता आणि तरीसुद्धा तो गणिताचा प्रोफेसर होता.”
“आजोबा, गणिताच्या प्रोफेसरला भारतरत्न? हाऊ बोरिंग. गणिताच्या तासाला मला गणित येण्याऐवजी फक्त झोप येते. मला तरी माझे गणिताचे कोणतेच शिक्षक कधीच आवडले नाहीत. त्यांना कोणी भारतरत्न दिले तर मी पहिले जाऊन ते काढून घेईन.”
“या माणसाचे थोडे वेगळे होते. याचे एका ध्येय होते आणि आयुष्यभर तो आपल्या लक्ष्यापासून तसूभरही विचलित झाला नाही. तुमचे जरा ध्येय निश्चित असेल आणि ते गाठण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची तुमची तयारी असेल, तर ते ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.”
“आजोबा, हा तर शाहरुख खानाचा डायलॉग झाला - अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है" दोन्ही हात जरासे लांब करत गुडघ्यात थोडेसे वाकत तिने तो जगप्रसिद्ध डायलॉग मला ऐकवला.
“अगदी तसेच या मनुष्याच्या आयुष्यात घडले होते. पण हा काही तुमच्या सिनेमाचा हिरो नव्हता शंभर शंभर लोकांशी एका वेळी लढणारा! तो होता एका सामान्य माणूस, ज्याच्याकडे प्रवाहाविरुद्ध पोहतानासुद्धा शक्य तेवढे प्रवाहाशी जमवून घेऊन आणि प्रवाहात जर काही डोह व भोवरे असतील तर ते शक्यतो टाळून आपली समाजसुधारणेची नौका नेटाने पैलतीराला नेण्याचे कसब होते. त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती, दुर्दम्य आकांक्षा, कमालीची सहनशीलता, कोणत्याही गोष्टीने विचलित न होता निरंतर कार्यरत राहण्याची चिकाटी आणि कमालीची स्थिर बुद्धी यांचा त्यांना नेहमीचा उपयोग झाला. आक्रमक नसूनही सक्रिय व सफल समाजसुधारक म्हणून त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
आज तू जीन्स आणि टीशर्ट घालून, इथे रस्त्यावर उभे राहून, माझ्या खांद्यावर हात ठेवून मला 'शिट यार आजोबा' असे मोकळेपणे म्हणू शकतेस, याचे बरेचसे श्रेय त्यांनाही जाते, बरे का!”
माझ्या नातीची उत्सुकता चाळवली गेली आणि मग मला आत्ताच त्या माणसाची गोष्ट ऐकायची आहे असा तिने हट्ट धरला. मग तिथेच बस स्टॉपवर बसून मी तिला गोष्ट सांगायला लागलो.
या माणसाचा जन्म अठराव्या शतकात झाला. तो काळ असा होता, जेव्हा विधवांचे जीवन अतिशय खडतर होते. विधवा होणे हा जणू काही भयंकर मोठा गुन्हा आहे, अशी वागणूक त्या बिचार्या बाईला मिळायची. जी विधवा पतीबरोबर सती जायची नाही, तिच्यापुढे एकच पर्याय असायचा - लाचारीचे हालअपेष्टांचे व भयंकर हलाखीचे जीवन जगणे. विधवांचे जीवन म्हणजे दुसरा नरकाच जणू. हे असे जीवन जगण्यापेक्षा पतीबरोबर सती का गेलो नाही? असा प्रत्येक विधवा स्त्रीला पश्चात्ताप व्हावा असे भीषण आयुष्य पतिनिधानानंतर त्यांच्या वाट्याला येत असे. भरजरी वस्त्रे नेसून सौभाग्यलंकाराने नटलेली स्त्री पतिनिधानानंतर अपशकुनी होता असे. आपले डोके भादरून, लाल किंवा पांढर्या रंगाचे आल्वण नेसून अर्धपोटी राहत तिला तिचे बाकीचे आयुष्य व्यतीत करावे लागत असे. रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षाही तिची किंमत कमी होऊन जात असे.
विधवांची होणारी ही परवड लहानपणापासून बघत आलेल्या अण्णांच्या - धोंडो केशव कर्वे यांच्या - मनात त्यांच्या उत्थानासाठी काही तरी करावे अशी तीव्र इच्छा होती. विष्णुशास्त्री पंडित यांचे पुनर्विवाहासंबंधी लेख त्यांनी बालपणीच मुरुड येथे वाचले होते. मुरुडनंतर काही वर्षे अण्णा मुंबईत राहिले. येथे त्यांना अनेक चांगले मित्र मिळाले, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला एका दिशा मिळाली. त्यानंतर ते नोकरीनिमित्त पुण्यात आले. जिथे त्यांना गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले इत्यादी दिग्गजांचे कार्य जवळून पाहता आले.
मोठ्या सामाजिक परिवर्तनाचा तो काळ होता. कै. सीतारामपंत देवधर यांनी रचलेले एका पद केसरीत प्रसिद्ध झाले होते. अण्णांचे ते पद मुखोद्गत होते. पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनाचे कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. अनाथ बालिकाश्रम व विधवा विवाहोत्तेजक मंडळ सुरू करायचे, असे त्यांच्या मनात होते. एकीकडे फर्ग्युसन कॉलेजची नोकरी व सुट्टीच्या काळात संस्थेचा प्रचार करण्यासाठी दौरे असा अण्णांचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान अण्णांची प्रथम पत्नी निवर्तली आणि पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच, असा अण्णांनी निश्चय केला.
आपल्या निरनिराळ्या भाषणात अण्णा एका मुद्दा तळमळीने मांडत - “गृहस्थाश्रमी जीवन स्त्रीसाठी तसेच पुरुषांसाठी सर्वोत्तम व इष्ट असते. म्हणून दुर्दैवाने विधवा झालेल्या आणि गृहिणीचे जीवन पुन्हा लाभावे अशी स्वाभाविक इच्छा बाळगणार्या कोणत्याही मुलीवर व स्त्रीवर कायमचे वैधव्य लादले जाऊ नये.”
कर्वे उत्तम वक्ते नव्हते, पण त्यांच्या भाषणात तळमळ इतकी होती की या विचाराने लोक भारावून जात. पण भाषणातून नुसता उपदेश देणे सोपे आहे, हेदेखील अण्णांना माहीत होते. विधवेशी पुनर्विवाह करण्याचा विचार त्यांनी मित्रांमध्ये बोलून दाखवला होता.
अण्णांचे मित्र नरहरपंत जोशी यांची बहीण गोदुबाई ही अकाली विधवा झाली होती. रमाबाईंच्या शारदा सदनाची ती पहिली विद्यार्थिनी. त्यांच्या मनातही पुनर्विवाह करण्याची इच्छा होती. ११ मार्च १८९३ रोजी अण्णांनी गोदुबाईंशी विवाह केला. येथपासून त्या आंनदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
एका विधवेशी विवाह करण्याचे धाडस दाखवून कर्वे यांनी समाजाला मोठा धक्का दिला होता. त्याबद्दल त्यांना बरेच काही सहन करावे लागले. सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले. त्यांची आई आणि थोरले बंधू यांचा जरी या विवाहाला पाठिंबा असला, तरी समाजाच्या रोषामुळे अण्णा त्यांच्या प्रेमाला पारखे झाले. पण अण्णांनी या रोषाचादेखीला शांतपणे स्वीकार केला.
यानंतर अण्णा झपाट्याने कामाला लागले व पुढच्या पाच वर्षांत त्यांनी सुमारे पाच विवाह जुळवून आणले. पण नुसत्या विधवा विवाहाने प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवले पाहिजे, हे जाणून अण्णांनी अनाथ बालिकाश्रामाची स्थापना केली. या कार्यासाठी त्यांनी स्वत:च्या बचतीतून १००० रुपये दिले. सुरुवातीला मुलींच्या वसतिगृहात विधवांची सोय केली. पण आश्रमाची वेगळी जागा असावी असे अण्णांना वाटत असे. त्यांचे स्नेही श्री. गोखले यांनी त्यांची हिंगणे येथील ६ एकर जमीन या कार्यासाठी अण्णांना दिली आणि या जागेत ५०० रुपये खर्च करून एक पर्णकुटी बांधली. त्या वेळी तिथे एकूण आठ विधवा राहत होत्या. त्यांची व्यवस्था बघण्याची जबाबदारी अण्णांच्या प्रथम पत्नीची बहीण नर्मदाबाईंनी घेतली. हा अनाथ बालिकाश्रम म्हणजेच 'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' म्हणजेच आजची 'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था.'
फर्ग्युसन कॉलेजमध्ये दिवसभर काम करून रात्री आणि पहाटे आश्रमातल्या मुलींना शिकवणे असा खडतर दिनक्रम त्या वेळी अण्णांनी अनेक वर्षे आनंदाने केला. पुणे ते हिंगणे हे अंतर ६ किलोमीटरचे, पण आजच्यासारखे रस्ते तेव्हा नव्हते. वाटेतले नदी-नाले आणि पावसाळ्यात तर चिखल तुडवीत जावे लागे. ज्या वस्तू हिंगण्यात उपलब्ध नसत, त्यांचे पाठीवर ओझे घेऊन अण्णा अनेक वर्षे या वाटेवरून चालले.
१९०५ सालापासून संस्थेला बरे दिवस येऊ लागले. दूरदूरहून लोक येत व संस्था पाहून समाधान व्यक्त करत. यात सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या पदावरील अधिकार्यांचा व धनिक लोकांचाही समावेश असे. पण अण्णांच्या घरचे मात्र कोणी हा आश्रम पाहायला आले नव्हते. अण्णा विशेषत: त्यांचे वडील बंधू व आई यांची वाट पाहात होते.
एकदा पंढरपूर यात्रेच्या वेळी अण्णांनी भावाला पत्र लिहिले की 'पुण्यात येत आहात तर आश्रम पाहून जा. माझ्या घरी मुक्काम करा असा आग्रह नाही.' अतिशय मनापासून लिहिलेले ते पत्र वाचून भावाचे मन गलबलले आणि त्यांनी पुणे मुक्कामी आईसह अण्णांची भेट घेतली, आश्रम पाहिला व समाधान व्यक्त केले. अण्णा भरून पावले.
मुरुडकरांनी त्यांच्यावर सुरुवातीला बहिष्कार घातला, पण हळूहळू त्यांचा स्वीकार केला. त्यांच्या कार्याला एका निश्चित आकार येत गेला आणि समाजमान्यताही मिळू लागली. पण याकरिता त्यांना अनेक वर्षे स्थितप्रज्ञापणे एकट्याने वाटचाल करावी लागली.
आश्रमाचा व्याप वाढता होता. अण्णांची ओढाताण होत होती, म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नोकरी सोडायची असा विचार त्यांच्या मनात होता. पण तशात एक घटना घडली. रत्नागिरीच्या एका गृहस्थाने आपल्या १४, १२ व १० वर्षांच्या तीन मुलींना बालिकाश्रामात प्रवेश हवा म्हणून अर्ज केला. त्यांची मोठी मुलगी विधवा होती, पण तिच्यासह बाकीच्यांनाही शिकवण्याची त्यांची इच्छा होती. यातूनच मग अण्णांच्या मनात महिला विद्यालयाची कल्पना आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने लाकडी पुलाजवळ असलेल्या वाड्यात महिला विद्यालय सुरू करण्यासाठी त्यांना सहकार्य केले आणि महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातीला महिलांच्या प्रगत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९०७ साली सहा विद्यार्थीनींसह हे महिला विद्यालय सुरू झाले व परत एकदा अण्णा त्याकरिता फंड जमवण्याच्या कामात व्यग्र झाले.
१९११ साली हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रामाच्या शेजारीच निवासाची सोय असलेली महिला विद्यालयाची नवी इमारत बांधण्यात आली. आश्रामातीला विद्यार्थिनींनी शिकून केवळ आपला चरितार्थ न चालवता आपल्या देशभगिनींसाठीही उपयोगी पडले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. आपल्या सामाजिक कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान मिळाले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. त्यासाठी निष्काम कर्म मठाची स्थापना करण्यात आली.
जपानमधील महिला विद्यापीठाचे एक परिपत्रक अण्णांच्या वाचनात आले आणि भारतातही असे विद्यापीठ असावे अशी त्यांच्या मनात योजना सुरू झाली. स्वतंत्र महिला विद्यापीठाची गरज नाही असे अनेक विचारवंतांचे तसेच अण्णांच्या अनेक सहकार्यांचे मत होते. पण अण्णांचे या बाबतीत विचार वेगळे होते. अनेक जणांना भेटून सभा घेऊन, विचारविनिमय करून ३ जून १९१६ रोजी भारतातील पहिले महिला विद्यापीठ आकारास आले आणि भारतात महिलांच्या उच्चशिक्षणाचे क्रांतिपर्व सुरू झाले.
सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी या विद्यापीठाला वार्षिक ५२,००० रुपये निरंतर देण्याचे मान्य केले. 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' असे या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले. या मदतीच्या जोरावर अनेक नव्या शाळा व हायस्कुले, तसेच वसतिगृहे स्थापन करण्यात आली. देशभर आता विद्यापीठाचे नाव झाले होते. विद्यापीठाच्या कुलसचिवांनी आपल्या एका अहवालात मोठ्या आत्मविश्वासाने लिहिले होते - 'महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असणे इष्ट की नाही हा प्रश्न विचारण्याची गरजच आता उरली नाही. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आता कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.'
आपल्या आत्मावृत्तात अण्णा लिहितात, 'मी केलेले प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत. उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांकडून मिळालेल्या देणगीच्या जोरावर जगात स्थापन झालेले हे अशा प्रकारचे एकमेव विद्यापीठ आहे, याचा मला अभिमान वाटतो.'
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. त्यांचे जेष्ठ पुत्र रघुनाथ कर्वे यांची ओळख तर 'भारताले संततिनियमनाचे आद्य प्रवर्तक' अशीआहे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. कुटुंबनियोजन, संततिनियमन हे शब्दही ज्या काळी निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे कार्य केले.
पुणे महानगरपालिकेने अण्णांच्या कार्याची दाखल घेतली. ज्या रस्त्याने अण्णांनी झोळी घेऊन चार चार आणे वर्गणी गोळा करण्यासाठी डेक्कन ते हिंगणे अशी अगणित वेळा पायपीट केली, त्या रस्त्याला अण्णांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त 'महर्षी कर्वे पथ' असे नाव देण्यात आले. तसेच हिंगण्याचे नामकरण 'कर्वे नगर' असे करण्यात आले. अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा कर्वे रस्ता म्हणजे महिला शिक्षणाची मूळ पायवाट आहे.
अण्णांच्या आयुष्यात लहानपणापासूनच कसोटीचे अनेक क्षण आले. त्यांचा काळात मॅट्रिकची परीक्षा फक्त शहराच्याच ठिकाणी होत असे व त्यासाठी वयाची १६ वर्षे पूर्ण असावी ही अट असे. अण्णांनी या परीक्षेची ज्या वर्षी तयारी केली, त्या वर्षी कोकणात मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईला जाण्याचे सगळे रस्ते बंद झाले होते. म्हणून अण्णा आणि त्यांचे काही मित्र सातार्याला पायी निघाले. वाटेत अनेक अडचणींचा सामना करत तीन दिवसांच्या प्रवासानंतर अण्णा परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले. पण परीक्षाधिकाऱ्याने त्यांच्या लहानखुऱ्या अंगकाठीकडे बघून ते १६ वर्षांचे असूच शकत नाहीत असे अनुमान काढले व त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. वास्तविक अण्णांकडे त्या वेळी वयाचा दाखलाही होता. पण "तो पाहून मला परीक्षेला बसू द्या" असे काही त्यांच्या तोंडून निघाले नाही. पुढील वर्षी त्यांनी परत प्रयत्न केला व परीक्षा पास झाले.
असे कसोटीचे क्षण त्यांच्या आयुष्यात वारंवार येत राहिले. पुढे अनाथ बालिकाश्रामाच्या स्थापनेला झालेला विरोध, बाया कर्वे यांच्याशी विवाह केला म्हणून घातला गेलेला सामाजिक बहिष्कार, हिंगणे ते डेक्कन ते पेरूगेट अशी रोजची पायपीट. पण अण्णा मोठ्या धीराने या सगळ्याला सामोरे गेले.
पण सर्वात कठीण प्रसंग म्हणता येईल तो म्हणजे सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या निधनानंतर त्यांच्या ट्रस्टींशी झालेल्या गैरसमजुती, ज्यामुळे विद्यापीठाला मिळणारी सालाना ५२ हजाराची देणगी रोखली गेली. पण याही प्रसंगाला अण्णा तेवढ्याच शांतपणे सामोरे गेले आणि सामोपचाराने, व थोडेसे पडते घेऊन त्यांनी तो वाद मिटवला.
१९३७ सालापासून त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार खेड्यापाड्यात करायला सुरुवात केली. अनेक शाळांना वेळेवेळी अनुदाने देऊन शाळांचे एका जाळे निर्माण करायच्या कामाला ते आता लागले होते. स्वातंत्र्यानंतर सरकारने अनुदाने सुरू करेपर्यंत त्याच्या संस्थेतर्फे ही अनुदाने दिली गेली.
सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी समता संघाची स्थापना केली, ज्याचे कार्य दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू होते.
त्यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त फलटणच्या राजे निंबाळकर यांनी त्यांच्या भव्य सत्कार केला व त्यांना दरमहा ६०० रुपये वेतन देण्याचे ठरवले. स्वतंत्र्यानंतर संस्थान बरखास्त झाले, तरी हे वेतन मात्र सुरूच राहिले.
भारत सरकारनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली. १९५५ साली त्यांना पद्मविभूषण हा किताब प्रदान करण्यात आला, तर त्यांच्या शतक महोत्सवाच्या वर्षीच - म्हणजे १९५८ साली त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च किताबाने गौरवण्यात आले. त्यांना १०४ वर्षांचे भरघोस आयुष्य लाभले, ज्याच्या प्रत्येक क्षण त्यांनी आपल्या जीवन कार्यासाठी वाहिला.
आपल्या आत्मचरित्राच्या अखेरच्या भागात अण्णा लिहितात, 'पुनर्जन्माच्या कल्पनेत जर सत्य असेल व अंतकाळीच्या वासनेवर जर तो पुनर्जन्म अवलंबून असेल, तर जगपालकाने माझे या कार्यावरील प्रेम अधिकाधिक वाढवावे व जन्मोजन्मी मला या कार्यासाठी तन मन धन अर्पण करण्याची बुद्धी द्यावी, अशी मी त्याजवळ याचना करतो.'
“आजोबा, तुम्ही मघाशी गोष्ट सांगताना केसरीत आलेल्या एका कवितेचा उल्लेख केला होता. तुम्हाला ती कविता माहीत आहे का?” माझ्या नातीने मला विचारले.
“हो, माहीत आहे ना! दिनांक १२ जून १९८३ रोजी केसरीच्या अंकात सीतारामपंत देवधर यांची ही कविता प्रसिद्ध झाली होती.. ऐक....
विचार सोडून अविचाराते निशिदिनी जन हो का वरिता?
मानवधर्मा अनुचित ऐसे गतानुगतिकचि का होता?
डोळे जाउनी दंतहि पडुनी केशा आली पंडुरता,
साठी उलटुनि काठी झाली, स्थायिक जरी उठताबसता?
तरुण समजुनी तरिही त्यासी द्वितीय विवाहा मत देता,
पंचमवर्षा विधवा बाला असुनी तियेते नाडविता!
ओढविले हे पूर्वजन्मीचे पाप म्हणुनि तिस समजाविता
पुरुषांना परि धर्मतत्त्व हे लागू कधीही नच करिता!
स्वेच्छेने संन्यासी होती कैक तया मधि तुम्ही पहातां
सोडुनि भजना हरिच्या निशिदीनिं विषयसमुद्रामधिं रमतां
प्रभाव ऐसा मदनाचा पूर्ण तुम्ही जाणत असता
षोडशवर्षा तरुणी सांगा दिन कशी कंठील पती नसता?
सुशील पतिरत असुनी भार्या वारविसासिनिरत होता,
नवल कशाचे तरि मग विधवा गर्भवती दॄष्टीस पडता?
विषयवासना तारुण्यामधिं नैसर्गिक केवल असता,
नष्ट कराया ब्रह्म उपाधी व्यर्थ करुनिया का शिणता?
माता श्रमली प्रतिदीनिं ज्यांते न्हाउनि माखुनि वाढवितां,
जीवप्राण जे असती युवतीते हर्ष बहु ज्या शोभवितां,
कांत अवडिने वेणि फुलांची झाला ज्यांवरी निशिं रचिता
त्या केशांते कां हो चरचर नापितहस्ते कापवितां
करणी करुनी क्रूर अशीही धर्मात्मे हे पद घेता
निष्ठुर निर्दय दुष्ट घातकी कसब केवळ मज गमतां!
हालअपेष्टा दुसऱ्या अगणित बाला भोगिति पती मरतां
सवयहृदय जन कनवा न गाली अश्रू त्यांते आठविता?
फार काय वदू वाटे छलना विधवांची ही मनि आणितां
हृदयद्रावक सहगमनाचा मार्गही बरवा या परता!
शोभत नाही तुम्हा खचित हे दोषांचे का धनी होता?
दु:खसमुद्री ढकलीतसां कां अपराधाचा लव नसता?
पुरे गांजणूक, कीव येउ द्या अनाथ भगीनिंची आतां !
पुनर्विवाहा संमति द्या हो सांडुनि मनींची निर्दयता
श्रेयनिर्देश: प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.
प्रतिक्रिया
26 Oct 2019 - 7:53 pm | जुइ
गोष्ट रुपी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची करून दिलेली ओळख आवडली.
26 Oct 2019 - 7:58 pm | यशोधरा
उत्तम लेख. महाराष्ट्रातील लेकी, बाळीं, स्त्रियांवर कर्वें आणि त्यांच्यासारख्या देवमाणसांचे खूप उपकार आहेत. उत्तम लिहिलेत पैजारबुवा.
26 Oct 2019 - 8:05 pm | जॉनविक्क
स्त्रियांबद्दलच्या कहाण्या आता बोर होतात, अगदी जरा कुतूहल भावना चाळवावी म्हणून जरी वाचायला घेतलं की पूर्वी असं फलाना फलाना व्हायचं तरीही लवकरच बोर करतात. पण जिद्द आणी संघर्षाच्या गोष्टी यापूर्वीही प्रेरक होत्या आहेत आणी राहतील. लिखाण आवडले. शुभ दीपावली 2019.
31 Oct 2019 - 4:34 pm | सुधीर कांदळकर
फार थोडी चांगली माणसे शतायुषी होतात. त्यांपैकी हे एक. परंतु त्यांच्या विचाराला राजा राम मोहन रॉय आणि ज्योतीबा-सावित्रीबाई फुले दांपत्य यांच्या विचाराची पार्श्वभूमी होती.
र.धॉ. चा उल्लेख आवडला. त्यांचे कार्य तर अभिनव आणि काळाच्या पुढे नेणारे म्हणूनच अपूर्व होते.
सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.
31 Oct 2019 - 4:34 pm | सुधीर कांदळकर
फार थोडी चांगली माणसे शतायुषी होतात. त्यांपैकी हे एक. परंतु त्यांच्या विचाराला राजा राम मोहन रॉय आणि ज्योतीबा-सावित्रीबाई फुले दांपत्य यांच्या विचाराची पार्श्वभूमी होती.
र.धॉ. चा उल्लेख आवडला. त्यांचे कार्य तर अभिनव आणि काळाच्या पुढे नेणारे म्हणूनच अपूर्व होते.
सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.
31 Oct 2019 - 4:48 pm | पद्मावति
उत्तम लेख
31 Oct 2019 - 10:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेख.
बर्याच माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या.
31 Oct 2019 - 10:58 pm | नाखु
संकलन आणि तपशीलवार कार्य परिचय.
लेख आवडला
1 Nov 2019 - 2:03 am | चित्रगुप्त
लेख उत्तम, माहितीपूर्ण तर आहेच, शिवाय धोंडो केशवांबद्दलची माहिती अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगितलेली असल्याने खूपच वाचनीय झालेला आहे.
1 Nov 2019 - 8:11 pm | मित्रहो
शाळेत असताना त्यांच्या विषयी वाचले होते. ते शतायुषी होते याची कल्पना नव्हती. गोष्ट सांगायची पद्धत आवडली.
4 Nov 2019 - 1:48 pm | टर्मीनेटर
लेख विभागातील क्रमवारीतला हा 'लास्ट अँड बेस्ट' लेख अतिशय आवडला.
खूप छान लिहिलंय पैजारबुवा...धन्यवाद.
4 Nov 2019 - 2:48 pm | श्वेता२४
माझी आत्याआजी व मावशी दोघी त्यांच्याच संस्थेत शिक्षण घेऊन शिक्षिका झाल्या. माझे आजोबा त्यांच्याबद्दल भरभरुन बोलत. कर्वेंच्याबद्दल एक आठवण वाचनात आली आहे ती म्हणजे ते कोणत्याही लग्नसमारंभात भोजनाचे आमंत्रण आले तर न चुकता जात असत. त्यावेळी जेवणाऱ्या लोकांच्या ताटासमोर यजमान दक्षिणा ठेवत असे. अण्णा सर्वांसमोरील ती दक्षिणा गोळा करत व आपल्या झोळीत टाकत. त्यांच्या कार्याबद्दल सर्वांनाच माहिती असल्यामुळे यावर कोणी आक्षेप घेत नसे. अशी पै पै जमवून त्यांनी हा समाजसेवेचा वटवृक्ष उभारला. या सुंदर व माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.
4 Nov 2019 - 2:54 pm | गणेशा
निव्वळ अप्रतिम
4 Nov 2019 - 4:09 pm | नरेश माने
छान माहितीपुर्ण लेख!
विशेषतः श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या स्थापनेत महर्षी कर्व्यांचे बहुमोल योगदान आहे हे आजपर्यंत माहित नव्हते ते आज तुमच्या लेखामुळे समजले. महर्षी कर्व्यांच्या कार्याबद्दल थोडीफार माहिती होती पण त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची माहिती या लेखाद्वारे कळाली.
4 Nov 2019 - 6:47 pm | गामा पैलवान
ज्ञापै,
लेख चांगला आहे. महर्षी कर्व्यांबद्दल बरीच माहिती दिली आहे. त्यांचं अल्बर्ट आईनस्टाईन सोबत एक प्रकाशचित्र काढलं गेलय. स्थळकाळ माहीत नाही. ते शोधंत होतो. तेव्हा हे सापडलं : https://maharshikarvefamily.blogspot.com/2012/01/
इथे दुर्गाबाई भागवतांनी कर्व्यांवर स्त्रीशोषणाचे आरोप केल्याचं म्हंटलंय. खरंखोटं देव जाणे. पण दुर्गाबाई भागवत हे वजनदार व्यक्तिमत्व आहे. १९७५ साली आणीबाणीच्या काळात त्यांनी यशवंतराव चव्हाणांना भर सभेत व्यासपीठावरून खाली उतरायला लावलं होतं. दुर्गाबाईंनी आणीबाणीस जाहीर विरोध केला होता. त्या व पु.ल.देशपांडे वगळता बाकी सर्व लेखक त्या काळी मूग गिळून गप्प बसले होते. वाचकांनी आपापला निष्कर्ष काढावा.
आ.न.,
-गा.पै.
19 Nov 2019 - 6:33 pm | श्वेता२४
तुम्ही दिलेल्या दुव्यातील लेख वाचला. अण्णासाहेब कर्वे टोकाचे तत्वनिष्ठ होते. त्यांनी निर्माण केलेला वटवृक्ष सांभाळायला त्यांना कार्यकर्त्यांची गरज होती.आणि त्यांच्यायेथील स्त्रीयांनी बहुतांशी त्या संस्था पुढे सांभाळल्या व चालवल्या. स्वताचे आयुष्य पणाला लावणाऱ्या व्यक्तिमत्वाने अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. याला स्त्रीशोषण कसे म्हणता येईल?अर्थात याला काही कागदोपत्री पुरावा नाहीच. बाकी तुमच्या दुव्यात दिलेली माहिती इथे पेस्टवतेय . वाचकांनी आपापला अर्थ काढावा.
Annasaheb Karve often exhibited eccentricities which were not uncommon among men of his generation, was a man of extreme principles, and could be logical to excess. He used to pay for food whenever he had his meals at his son's place. He never accepted a gift from anybody for himself. A son tried to buy him warm clothes but had to accept money in return; he suggested the son donate money to his social work. On the flip side, Durga Bhagwat has written a devastating indictment of Karve, alleging that he preyed on young women who were facing hard times, and tried to put them under debt of gratitude so that they would be drawn into his coterie for life, looking heartlessly upon them as possible recruits in his social mission.
19 Nov 2019 - 7:35 pm | यशोधरा
दुर्गाबाईंबद्दल खूप आदर आहे, पण त्याला एक बारीक चीर पडली, जेव्हा त्यांचे 'आठवले तसे' हे पुस्तक वाचले तेव्हा. त्यांच्याकडून असे काही लिहिले जाईल, हेच मला कितीतरी दिवस पचनी पडत नव्हते. अतिशय कुत्सित पद्धतीची टीका, नावे ठेवणारे असे लिखाण बाईंच्या हातून का झाले असेल, असे वाटत राहिले. पुढे इरावतीबाईंवर त्यांनी केलेली टीका वगैरे सुद्धा वाचण्यात आले आणि चीर अजून मोठी झाली.
बाई, त्यांचा व्यासंग, ज्ञान, प्रतिभा सारेच अलौकिक आहे हे तर खरेच, पण त्यालाही ग्रहण लागलेले आहे, इतकेच त्यामुळे केवळ दुर्गाबाई म्हणाल्या म्हणून, ही कसोटी लावणे म्हणजे काही खरे नव्हे, असे वाटते.
20 Nov 2019 - 9:32 pm | गामा पैलवान
श्वेता२४,
मला खरंखोटं माहीत नाही. दुर्गाबाई भारदस्त व्यक्तिमत्व आहेत इतकंच ठाऊक आहे. मूळ आरोप त्यांनी केलेले आहेत, मी नाही. जे काही आरोप आहेत ते स्वच्छ व स्पष्ट शब्दांत केले असावेत असं दिसतंय. यामुळे जर तुमची दिशाभूल झाली असेल तर तिचे कारण दुर्गाबाई आहेत. कृपया मला यातून मोकळं करावं ही विनंती. :-)
आ.न.,
-गा.पै.
19 Nov 2019 - 5:57 pm | मुक्त विहारि
धन्यवाद. ..
19 Nov 2019 - 7:57 pm | सुबोध खरे
कोणतीही कितीही थोर व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसतेच.
परंतु त्यांचे गुण त्यांच्या दोषापेक्षा आभाळाएवढे मोठे असतात.
त्यामुळे त्यांच्यात असणारे दोष आपण बाजूला ठेवून त्यांच्यातील चांगल्या गोष्टीच घ्याव्यात.
अण्णा हेकेखोर होते असेहि काही लोकांनी लिहिलेले वाचल्याचे आठवते परंतु हाच हेकेखोरपणा सर्व विरोधाला न जुमानता त्यांचे कार्य पुढे नेण्यास कारणीभूत झाला असेही वाचल्याचे आठवते.
एखाद्या व्यक्तीचे असे मत सार्वजनिक ठिकाणी लिहून आपण काय नक्की मिळवतो हा मला पडलेला प्रश्न आहे.
यथातथ्य लिहिणे किंवा सत्य समोर आणणे हा हेतू असला तरी ते निर्विवाद असावे अशी अपेक्षा आहे.
20 Dec 2019 - 7:17 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
प्रतिसादास उशीर झाल्याबद्दल खेद आहे.
एखाद्या व्यक्तीचे असे मत सार्वजनिक ठिकाणी लिहून आपण काय नक्की मिळवतो हा तुम्हांला पडलेला प्रश्न आहे. प्रश्न अगदी रास्त आहे. त्याचं उत्तर असं की सदर व्यक्ती केवळ एखादी नसून भारतरत्न म्हणजेच मान्यताप्राप्त व प्रतिष्ठित आहे. तिच्या कार्याचा/संस्थेचा समाजावर जाणवण्याजोगा प्रभाव पडला आहे व भविष्यातही पडेल. तर, कर्व्यांची संस्था 'दुसऱ्या बाजू'पासून मोकळी असावी इतकाच हेतू आहे.
थोरांचे दोष चघळू नयेत हे खरंय. मात्र त्या दोषांचा समाजावर परिणाम होणार नाही इतकी काळजी घ्यावी, असं माझं मत आहे.
आ.न.,
-गा.पै.
19 Nov 2019 - 8:40 pm | गड्डा झब्बू
श्वेता२४, यशोधरा, सुबोध खरे: १०१% सहमत. गांधीजींच्या बद्दलही अनेक वाद-प्रतिवाद आहेत. त्यांच्या चाहत्यांपेक्षाही त्यांचा द्वेष कार्नारार्यांची संख्या कदाचित जास्तच असेल. एक राजकारणी म्हणून ते मलाही बिलकुल आवडत नसले तरी एकंदरीत त्यांच्या अनेक समाजोपयोगी कार्यांसाठी व विचारांसाठी एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी ते नक्कीच वंदनीय आहेत. गांधीजींच्या विचारांच्या पूर्णपणे विरुध्द विचारसरणी असलेले (मानवतेला काळिमा फासणारी त्याची एक गोष्ट सोडली तर) हिटलर, सावरकर, सुभाषचंद्र बोस, आणि (ज्यांच्या काही विचारांशी पूर्णपणे असहमत असूनही) भगत सिंग ह्या व्यक्तीही मला प्रिय आहेत.
सदर आयडीने यापूर्वीही अशी अनेक अस्थानी/अप्रस्तुत मते व्यक्त केलेली वाचनात आली आहेत. शेवटी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान म्हणून त्यांचे प्रतिसाद गांभीर्याने घेणे सोडून दिले आहे :-)
20 Dec 2019 - 7:18 pm | गामा पैलवान
गड्डा झब्बू,
तुमच्याकडून (खरंतर मतभेद असलेल्या सर्वांकडूनही) हेच अपेक्षित आहे. माझ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बूज राखल्याबद्दल धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
20 Dec 2019 - 1:54 am | दीपा माने
जरी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची वरील लेखनातील माहिती होती तरीही त्यांच्याविषयीच्या नितांत आदराविषयी हा लेख परत वाचला.
पुर्वी वाचनात आलेली महर्षी अण्णांची एक आठवण गंमतीच्या सुरात एका लेखकाने लिहीली होती ती अशी की जेव्हा त्यांचे सर्वात मोठे सुपुत्र, रधुनाथराव निधन पावले होते त्या प्रसंगी भेटावयास आलेल्यांना ते म्हणत की ‘त्याचे तसे जाण्याचे वयच झाले होते‘ आणि त्यावेळी महर्षींची शतकाकडे वाट चालली होती.
20 Dec 2019 - 2:26 am | दीपा माने
जरी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची वरील लेखनातील माहिती होती तरीही त्यांच्याविषयीच्या नितांत आदराविषयी हा लेख परत वाचला.
पुर्वी वाचनात आलेली महर्षी अण्णांची एक आठवण गंमतीच्या सुरात एका लेखकाने लिहीली होती ती अशी की जेव्हा त्यांचे सर्वात मोठे सुपुत्र, रधुनाथराव निधन पावले होते त्या प्रसंगी भेटावयास आलेल्यांना ते म्हणत की ‘त्याचे तसे जाण्याचे वयच झाले होते‘ आणि त्यावेळी महर्षींची शतकाकडे वाट चालली होती.