महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर पसरलेली जी डोंगररांग आहे तिला आजकाल Western Ghat असं म्हणतात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागापासून सुरु झालेली हि डोंगररांग महाराष्ट्राच्या पलीकडे गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. पृथ्वीवरच्या सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी हि एक जागा आहे. त्यामुळे हे आहे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. काहींसाठी त्यांच्या घरापासून काही तासांच्या अंतरावर असलेला एक अमूल्य ठेवा. काहींसाठी वीकएंड पिकनिक स्पॉट. काहींसाठी महाराष्ट्राचा आणि त्यामुळे देशाचा जाज्वल्य इतिहास. हे सगळं तर आहेच. पण कोणी सांगितलंय का हो तुम्हाला, महाराष्ट्राच्या ह्या डोंगर दऱ्यात अनेक विविध हिरे माणके लपलेली आहेत. काय सांगता? कुठे?
कुठल्या खाणीत गेलात तर हिरे माणके सहजासहजी हाताला लागतात का हो? एक तर तुमच्याकडे जय्यत तयारी पाहिजे. हार न मानता चिकाटीने प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे. त्यात परत नशिबाचा भागही आलाच.
जमेल तितका जमेल तसा सह्याद्री ढुंढाळत होतो जिकडे तिकडे. एका दिवशी साल्हेर च्या पायथ्याला आम्हाला शिवम भेटला. आम्ही तिघं साल्हेर चढाईला सुरुवात करतोय तोच हा आम्हाला येऊन मिळाला. आदल्या दिवशी परिसरातले दोन किल्ले सर करून आला होता. दोन दिवस सुट्टी मिळाल्यावर एकट्याने फिरून तीन नवे किल्ले बघायाला निघालेला, स्वतःच्या प्रदेशाच्या इतिहासाविषयी कुतूहल असलेला, डोंगरातल्या अवघड जागा सहज पार करणारा. मग पुढच्या साल्हेर स्वारीत ह्याला बरोबर घेणं आलंच.
सह्याद्रीतल्या एकूण एक घाटवाटा पाठ असलेली, कुठल्याही गावातल्या सगळ्यात माहितगार माणसाला त्याच्याच प्रदेशाची अनेकविविध माहिती देऊन गार करणारी, स्वतःचं घर नोकरी सांभाळून मिळेल त्या एक किंवा दोन दिवसाच्या सुट्टीत मैलोन मैल रानोमाळ भटकून दुसऱ्या दिवशी वेळेत कामावर हजर राहणारी, दिवसा रात्री कधीही कसाही न घाबरता एकट्याने प्रवास करणारी शिल्पा. कुठून मिळते गं इतकी ऊर्जा.
सह्याद्रीतल्या कुठल्याही ठिकाणी उभा केलात तरी आजूबाजूला दिसणारे सगळे डोंगर किल्ले ओळखणारा, सह्याद्रीचा इतिहास भूगोल झोपेतून उठवलत तरी अचूक सांगणारा, माणसाने जगावे का आणि कसे हे न बोलता दिवसभरात सहजपणे दाखवून देणारा स्वप्नील.
कुठल्याही अवघड प्रसंगात सतत हसतमुख, सर्वांना नेहमी बरोबर घेऊन राहणारा, लहान वयात leadership शिकलेला विशाल.
पन्नाशीत पोहोचल्यावर जिथे इतर बायका टीव्ही वरच्या सास बहू सिरीयल बघण्यात वेळ घालवतात त्याऐवजी तरुण मुलामुलींबरोबर त्याच उत्साहाने सह्याद्रीत फिरणाऱ्या सविता मॅडम.
शांत संयमी स्वभावाचा, पण कुठल्याही डोंगरदऱ्यात कितीही वेळ न थकता स्वछंद विहारण्याची ताकद लाभलेला अमोल.
रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, पोहणे अशा सर्व प्रकारात विशीतल्या मुलांना सहज मागे टाकण्याची ताकद बाळगणारे यंग सिटीझन गोखले सर.
उन्हाळ्यातल्या मध्यावरच्या एका उन्हाने भाजून काढलेल्या दिवसभराच्या डोंगर भटकंतीनंतर संध्याकाळी एका जागी सरळ समोर नाकावर पडल्यानंतर घाबरणं तर सोडाच, उरलेला ट्रेक लीड करणाऱ्या श्रुती मॅम. कुठून येते हि जिद्द.
हरिश्चन्द्रगडावर जाणाऱ्या अवघड अश्या नळीच्या वाटेने पंधरा जणांना वेळेत आणि सुखरूप घेऊन जाणारा, योग्य तिथे दंगा करू देणारा, योग्य तिथे योग्य शब्दात समज देणारा, पूर्ण ट्रेक लीड करूनही उत्साही राहुल.
सह्याद्रीतल्या ह्या दऱ्या खोऱ्यात अशी अनेक हिरे माणकं लपलीयेत. सहजासहजी नाही सापडत. पाहणाऱ्याला दिसतात. जशी दृष्टी तशी सृष्टी. होय आणि फार लांब कशाला बघायला पाहिजे. आमची बायडी पण काय कमी नाय. छोटे छोटे सह्याद्रीतले ट्रेक करता करता मॅडम त्यांच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना गोळा करून हिमालयात ट्रेक करून आल्या. _/\_
प्रतिक्रिया
30 Sep 2019 - 6:00 pm | जालिम लोशन
बरेच सभासद मिळतील.
1 Oct 2019 - 11:22 am | Yogesh Sawant
सभासद मिळवण्यासाठी इतर सोपे उपाय आहेत. त्यासाठी मिपा वर यायची गरज नाही.
आणि मेंढरं गोळा करून दिवसभर फिरवणे आम्हाला आवडत नाही.
1 Oct 2019 - 11:40 am | यशोधरा
मिपावर जग, हिमालय, सह्याद्री, भारत असे विविध प्रकारचे पर्यंटन करणारी, त्यातही, सोलो, कुटुंबीयांसह, ग्रूपसह अशी बऱ्याच पद्धतीने पर्यटन करणारी बरीच मेंढरं आहेत. आजवर त्यांना कोणत्याही सिंहाची गरज पडली नाही, यापुढेही लागेल असे वाटत नाही.
मेंढरांना वाचायला लेख कशाला टाकलेत म्हणे?
1 Oct 2019 - 11:42 am | यशोधरा
सायकलपटू आणि रायडर्स राहिलेच ऍड करायचे.
1 Oct 2019 - 10:43 pm | धनावडे
अशी रत्ने आमच्याकडे पण खूप आहेत..