सकाळी नेहमी प्रमाणे लवकरच पहाटे जाग आली, पाच वाजलेले. ऊठून आवरायचं होतंच.नाश्ता पण करून बरोबर घ्यायचा होता. कारण बोटीवरती काय खायला मिळते माहित नाही, त्यामुळे मग फ्रेंच टोस्ट करून घेतले. सोबत नेहमीप्रमाणे छत्री, पाणी असा जामानिमा होताच. सकाळी साडेसहाची टॅक्सी बोलावली. लवकरच पोर्टवर पोहोचायचं ठरवलेलं इकडे तिकडे थोडं फिरता येईल म्हणून. तिथे बोट लागलेली होती पण दरवाजे बंद होते. दोन-चार लोक बॅगा घेऊन उभे होते.
आम्ही तिकडेच थोडं फिरत बसलो. एका वेगळ्या अँगलनं सगळं स्प्लिट असं समोर दिसत होतं. हिरव्यागार मारियाना टेकडीच्या या पार्श्वभूमीवर लाल छपरांची पिवळट दगडी घरं , समोरचा सुंदर प्रोमेनाड, पामची झाडं आणि पाण्यात तरंगणाऱ्या छोट्या पांढऱ्या बोटी असं सुन्दर दृश्य... जसं एखाद्या चित्रकारानं कल्पकतेने चित्र रंगवावं तसं. नजरेसमोर 180 डिग्री मध्ये सगळं शहर दिसत होतं. एक दोन माणसं तिथंच माश्याला गळ लावून बसलेली. बाजूच्या बादलीत काही मासे मिळालेले दिसत होते त्यांना. छान सकाळी सकाळी मासेमारीचा कार्यक्रम चालू होता. तसं सारं जीवनच सुशेगात आहे म्हणा इथलं. कारण चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, सुरळीत वाहतूक, उत्कृष्ट शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक अशा मूलभूत गरजांसाठी रोजचा झगडा नाही. सरकार त्या साऱ्या गोष्टींची काळजी घेत. त्यामुळे लोकांचे जीवन सुसह्य आहे. आपल्यासारखं बारीकसारीक गोष्टींचा झगडा नाही. मला प्रश्न पडला मग यांचे पुढारी निवडणुकीत यांना काय आश्वासने देत असतील? बिजली,सडक,पानी तर मिळालाय. खरतर या साध्या मूलभूत सुविधा देणं हे कुठल्याही शासनाचं आद्यकर्तव्य पण विकसनशील देशात यासाठी किती झगडा असतो, भ्रष्टाचार असतो. त्यामुळे जीवन खडतर होतं. असो.बोटीत प्रवेश सुरू झाला. आता बरेच लोक आले होते. सगळ्यांनी रांग लावली. मोठ-मोठ्या बॅगा घेऊन लोक येत होते. दुब्रॉवनिक हे ऐतिहासिक शहर आणि लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे त्यामुळं हि गर्दी.!!!
सीट नम्बर नसल्यामुळं कुठेही बसता येत होत. आम्ही खिडकी जवळची सीट पकडून बसलो. आमच्या शेजारी काही टीनेजर मुल बसली, चांगली सहा - साडे सहा फूट उंचीची 13 -14 वर्षांची मुलं बहुदा कुठेतरी मॅच खेळायला चाललेली दिसत होती. बोट साधारण अडीचशे तीनशे सीट्सची असावी. बघता बघता भरली. दरवाज्याच्या समोरच्या जागेतली लगेजची जागा पूर्ण भरली.दरवाज्यातील रिकाम्या जागेत,सीट आणि मागच्या जागेत सगळीकडे बॅगा ठेवलेल्या. एकदाची बोट सुटली.
समोर हिरवागार डोंगर, मध्ये निळेशार समुद्र आणि मधूनच एखादी छोटीशी पांढरी याट इकडून तिकडे सुळकन जाते, असं दृश्य समोर दिसायला लागल. थोड्याच वेळात दूरवर कुठलंतरी बेट दिसल. लाल छपरांची पिवळसर पांढरी घरं अधून-मधून झाडीत दिसत होती. त्या बेटाच्या धक्याजवळ बोट आली अनाउंसमेंट होत होती की आपण ब्रांच बेटाच्या बोल बंदरावर आलो आहोत.बोट धक्क्याला लागली. सुंदर रेखीव पामच्या झाडांनी सजलेला तसाच प्रोमोनाड, तिथे लोक मस्त कॉफी वा बियर पीत बसलेले होते. आमच्या बोटीतील काही लोक उतरले आणि काही चढले. सुंदर निळाशार समुद्र ,अतिशय स्वच्छ पाणी फार सुंदर दिसत होतं . आता पुन्हा निघालो. चुनखडीच्या दगडांमुळे पाण्याला सुंदर असा मोरपंखी रंग आलेला. बोटीच्या फेसाळणाऱ्या पाण्याने त्याच्यावर फिकट रंगाची नक्षी बनवली. ते दृश्य डोळ्यात पूर्ण भरून घेतलं. अर्थात असा अनुभव प्रत्येक वेळी बोट बंदराला लागून निघाली की येत होता.
चिंचोळ्या जागेतून बोट जात होती. दोन्ही बाजूला गर्द हिरवे डोंगर आणि त्यावर अधेमध्ये असणारी कौलारू घरांची गावं. पुढे बऱ्याच बेटांवर बोट थांबली. त्यांची फेरीबोट असल्यामुळे प्रत्येक बेटावर पॅसेंजर चढ उतार करत होते. पुढे मेन आयलँडवरचं मकारस्का, व्हार बेटावरच्या व्हार, कोरचुला बेट, मिलजेट बेटावरचं सोब्रा, अशी वेगवेगळी बेटं लागली. दगडांची गर्द झाडीनं नटलेली बंदर. कोरचुलाला किल्ला दिसत होता. मिलजेत ला त्यांचं नॅशनल पार्क आहे आणि व्हारला लोकं स्नॉर्कलिंग साठी जातात, पाण्याखालचं विश्व पाहायला. अर्थात ते सारंच करणं शक्य नसतं हेही तितकच खरं. आमच्याबरोबरची मुलेही मध्ये कुठल्यातरी बेटावर उतरली. होती.
माझं लक्ष आता घड्याळाकडे लागलेलं. कधी पोहोचते असे झालेलं . सिटा भरण्याच्या करण्याच्या नादात अंमळ उशीरच झालेला. बाराला पोचणारी बोट एक वाजता पोहोचली. आम्ही पटापट उतरलो व समोरच्याच रेस्टॉरंटमध्ये चिकन रोल आणि पास्ता असं काही बाही खाल्लं. आणि टॅक्सी बुक केली. तिथे आम्हाला त्यांची वॉल आणि ओल्ड टाउन पाहायचा होता. टॅक्सी घेऊन आमची टॅक्सीवाली आली. ती पण खूप सुंदर होती. ती म्हणाली," वॉलच्या आतच ओल्ड टाउन आहे." चला म्हणजे दोन ठिकाणी जायचं नव्हतं तर! तसा थोडाच होता आमच्याकडे चार वाजता बोट पुन्हा निघणार होती. त्यामुळे साडे तीन पर्यंत परत जायचं होतं." ती गप्पामारत होती. "फक्त सिझन मध्येच मी इथे असते. बाकीचे सहा महिने झाग्रेबला राहते. तिकडेही मी हीच टॅक्सी चालवते." आम्ही तिला म्हणालो की,"तुला भारत माहिती आहे का?" तर हो म्हणाली. " मग कधी बघायचा नाही का तुला?" " नाही त्याला खूप पैसे लागतात." असं हसत हसत हाताने पैशाची खूण करत म्हणाली. दहा मिनिटात वर टेकडीवर येऊन पोहोचलो. आम्हाला तिकडे सोडून ती निघून गेली.
. इथे फुल जत्रा भरली. हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ, जागतिक वारसाहक्क सन्मान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेम ऑफ थ्रोन्सचं बरचसं शूटिंग इथे झाले आहे. त्यामुळे ते पाहायला येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अर्थातच भारतातही त्यामुळेच ते प्रसिद्ध आहे. त्यामुळेच भारतीयही बऱ्यापैकी दिसत होते.
दुब्रॉवनिक हे एड्रियाटिक समुद्रातलं सर्वात सुंदर आणि अतिशय रोमँटिक शहर आहे. 1990 च्या युद्धात पूर्णपणे बेचिराख झालेल्या या शहराचं पुनर्निर्माण करून अतिशय सुंदर रीतीने जतन केले आहे. इथलं सर्वात मोठ आकर्षण ते हेच ओल्ड टाऊन जिथे आम्ही आता होतो. त्याच्या भोवतालची तटबंदी म्हणजेच थोडक्यात किल्लाच. आम्ही पश्चिमेच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. हे प्रवेशद्वार १५३७ साली बांधलेला आहे. आत प्रवेश केल्यावर लगेचच समोर पोलीगोनस ओनोफ्रीओ फाउंटन लागत. हे भव्य कारंजं 1938 आली पाणीपुरवठ्यासाठी बांधलं. इथून जवळजवळ बारा किलोमीटर लांब असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जाई. अतिशय सुंदर असं बहुकोनी कारंज आहे. याच्या भिंतीवर सुंदर शिल्प कोरलेली आहेत.हा स्ट्रटून स्ट्रीट आहे. म्हणजे मुख्य रस्ता. पाईल आणि क्लोसे या दोन मुख्य दरवाजांना जोडणारा, साधारण 292 मीटर लांब असलेला हा रस्ता करमणूक ,व्यावसायिक आणि धार्मिक अशा सर्व घडामोडींचा मुख्य केंद्र आहे. दोन्ही बाजूंना तीन चार मजली चुनखडीच्या दगडाच्या इमारती असलेल्या, त्यांच्या हिरव्या खिडक्या आणि चिंचोळ्या गल्ल्या. त्याच्या दोन्ही बाजूला इमारतीमध्ये लोक राहतात. दोन्ही बाजूला मधोमध लटकणाऱ्या कपड्याच्या दोऱ्या आणि त्यावर घातलेले कपडे. गॅलरी अथवा खाली पायऱ्यांवर, दरवाज्याशी फुलझाडांच्या कुंड्या असं सारे शहर नांदतं असल्याच्या खुणा दिसतात.
पुढे डाव्या बाजूला असलेला रेक्टर्स पॅलेस पंधराव्या शतकात इथंल्या गव्हर्नर साठी बांधलेला आहे. या पॅलेसमध्ये त्याच ऑफिस, न्यायालय आणि इतर प्रशासकीय खोल्याही होत्या.समोरच क्लॉक टॉवर आहे त्यालाच बेल टॉवरही म्हणतात. पंधराव्या शतकात बांधलेला हा टॉवर शहराचा लँडमार्क आहे. त्यात पूर्वी दोन लाकडाचे पुतळे घंटी वाजवायला असायचे ते नंतर ब्रॉन्झचे केले गेले. त्यांना इथल्या लोकांनी मारू आणि बारो अशी नावे दिली आहेत.
इथे असलेल्या सुंदर सेंट पॅलेस चर्च. व्हेनेशिअन मास्टर मरिनो ग्रोपोलीने सतराशे सहा मध्ये बांधलय आणि दुसरं कॅथीड्रल ऑफ अझमशन १६६७ च्या भूकंपानंतर बांधल आहे. कॅथीड्रलमध्ये खूप सारी उंची पेंटिंग्ज आणि खजिना पण आहे. टॉवरच्या बाजूला असलेला स्पोन्झा पॅलेस गॉथिक आणि रेनेसाँ स्टाइलचा आहे, जो सोळाव्या शतकात बांधलाय. पूर्वेला प्लॉसी गेट आहे जे चौदाव्या शतकाच्या शेवटी बांधलं आहे. हे गेट दोन भागात आहे आणि मध्ये छानसा दगडी पूल आहे. दक्षिणेला सेंट इग्नेशियस चर्च आहे. जे इग्नाझीनो पोझो ने १६९९-१७२५ च्या दरम्यान बांधले आहे. कारंज्याच्या मागेच चौथ्या शतकातील क्लाईस्टर फार्मसी आहे.सारं काही भराभर पाहत होतो. सगळ्या गल्ल्याबोळात रेस्टॉरन्ट आणि बारची नुसती रेलचेल होती. काही सुवेनर्सची दुकानं आणि मुख्य म्हणजे कॅंडीजची दुकाने. मोठ्या लाकडी ड्रम मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या, चवीच्या कॅंडीज भरून ठेवलेल्या. क्रोएशिअन कॅंडीज प्रसिद्ध असतात म्हणे.
आम्हाला अजून एक मराठी कुटुंब इथं भेटलं. नवरा-बायको आणि त्यांची मुलगी. पॅरिस स्विझर्लंड वैगेरे करून इथे आलेले. या सुंदर अशा अनोख्या शहराचं सर्वांनाच आकर्षण आहे. का नसणार कारण या शहराभोवतीची दगडी तटबंदी त्याच्या बाजूचा लांब पसरलेला वॉकवे, किल्ल्याचे दरवाजे, तोफा किल्ल्याच्या बाहेरचा निळाशार समुद्र मागची हिरवीगार टेकडी आणि किल्ल्याच्या आत असलेले सुंदर शहर. खाली दगडी फरशी आजूबाजूला गल्ल्या, त्यात टुमदार दोन तीन मजली इमारती.रस्त्याच्या टोकाला उभारल की दोन्ही बाजूला घरं त्याच्या सलग छोट्या खिडक्या सारं दृश्य पण मनात आणि कॅमेर्यात साठवत राहतो. तर असं हे ऐतिहासिक किल्ल्यात अद्ययावत शहर बसलेले असणं हेच मुळी खूप रुमानी आहे, परीकथेतल्यासारखं!! त्यामुळेच तर डुब्रोनिकने अद्रियाटिक समुद्रावरचं सर्वात सुंदर आणि रोमँटिक हा किताब पटकावला आहे.
आम्ही समुद्राकडून गेटमधून बाहेर येउन पाहीले. तिथेही सगळीकडे लोकांचे खा खा चालूच!! समुद्रात छोट्या-छोट्या पांढऱ्या बोटी इकडे तिकडे फिरत करत होत्या. लहानपणी दिवा लावून बोटी फिरवायचो त्याची आठवण झाली. किल्ल्याची भिंत दोन किलोमीटर लांब आहे म्हणे. फिरायला चांगलं 150 कुना म्हणजे प्रत्येकी पंधराशे रुपये तिकीट होतं. तिथे जायलाच हवं होतं पण आमच्याकडे एवढा वेळ नव्हता. तास-दीड तास वॉक करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे परतण्याचा निर्णय घेतला. साडेतीन वाजले होते. आम्हाला पोर्ट वर चारच्या आधीच पोचायचं होत. खरंतर अशी घाईघाई ची ट्रिप ठरवून या शहरावर आम्ही अन्यायच केला होता आणि त्याची किंमत म्हणजे ते पूर्ण निवांत बघणं झालं नाही. अर्थात जे बघितलं तेही खूप सुंदर आणि आनंद देणारं होतं. अतिशय सुंदर असं पुर्ननिर्माण त्यांनी केल्यामुळे जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षण ठरलेल आणि गेम ऑफ थ्रोन्स या जगद्विख्यात मालिकेचं बरचसं शूटिंग झालेलं गाव पाहण्याचं समाधान नक्कीच होतं.
आम्ही पुन्हा टॅक्सी बोलावली. ती येईपर्यंत आईस्क्रीम खाऊन घेतल. टॅक्सी घेऊन वीस-बावीस वर्षांचा तरुण मुलगा आला. तो कॉलेजात शिकत होता. आता सुट्टी असल्यामुळे टॅक्सी चालवत होता. तो गिटारिस्ट ही असल्यानं संध्याकाळी त्यांचा ग्रुप कुठल्याशा हॉटेलात वगैरे प्रोग्रॅम करतात म्हणाला. इथे कोणतेही काम करायला कमीपणा वाटत नाही त्यांना, त्याला कारण एका विशिष्ट लेव्हलवर मिनिमम वेजेस असल्याने चांगली कमाई होतेच. त्यामुळं मुलं सर्रास अशी छोटी मोठी कामं करून स्वतःची पॉकेट मनी मिळवतात.
"कोणतं संगीत वाजवतोस?"
"इंग्लिश पॉप "
"जस्टिन बीबर आवडतो का तुला?"
"जस्टिन बीबर नाही आवडत त्याची स्टाईल फार बेकार आहे." आम्हाला गंमत वाटली.
"दुब्रॉवनिकची लोकसंख्या 40000 आहे आणि इथं वर्षाला साधारण दहा लाख पर्यटक येतात." तो म्हणाला,"
जर चुकून काही झालं आणि मंदी आली तर इथलं अर्थकारण पूर्ण कोसळणार." तो सांगत होता. त्याला अर्थकारणाचं गणित बरोबर माहीत असणारच कारण तो अर्थशास्त्रच शिकत होता. इथे मुलं सहसा इकॉनामिक्स किंवा लॉ च शिकतात. आपल्याकडे मेडिकल इंजिनीरिंग करतात तसेच आहे. बहुदा त्यात चांगले पैसे मिळत असावेत. पाच मिनिटात आम्ही पोर्टवर आलो. तसा अवकाश होता अजून. त्यामुळे थोडा इकडे तिकडे फिरुन मग आम्ही रांगेत उभे राहिलो. सकाळचे काही चेहरे पुन्हा परतीला दिसत होते, आमच्या सारखेच. प्रवेश सुरु झाला आम्ही रांगेत बरेच पुढे होतो, त्यामुळे आम्हाला आताही सकाळच्याच सीट मिळाल्या. त्यामुळे आता उलट्या बाजूचा प्रदेश दिसणार होता. बोट निघाली समोर डोंगरावर नागमोडी रस्ता दिसत होता. त्याच्यावर जाणाऱ्या छोट्या छोट्या ट्रक, गाड्या आमच्या बरोबरीने जात आहेत असा भास होत होता. दुब्रॉवनिक हे क्रोएशियाच्या अगदी दक्षिण टोकाला आहे आणि संपूर्ण सागरी किनारा याच्या अखत्यारित येतो.
पण मध्ये थोड्या भागावर बॉस्निया आणि ह्रझगोवेनिया या देशाचा भाग येतो. तसेच जमीनीवरून जाताना त्या देशाच्या सीमेत प्रवेश करून मग दुब्रॉवनिकला जावं लागतं. हे टाळण्यासाठी आणि अर्थातच जमिनीवरून वेळही जास्त लागतो म्हणून आम्ही बोटीचा प्रवास निवडला. हे एक कारण होतंच पण बोटीच्या प्रवासाचीही अशी गंमत आहे. क्रोएशिया हा 1000 बेटांचा देश आहे. पण साधारण शंभर बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. त्यामुळे इतक्या सुंदर समुद्रवर पर्यटन हा मुख्य उद्देश आहेत. त्यामुळे ती सारी गावं खूप सुंदर रीतीने बांधली आहेत आणि जतन केली आहेत, दुरून पाहताना ही फार सुंदर दिसतात. त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घरांना सहसा दुसरा रंग दिसला नाही. दगडाची लाल कौलारू घरे आणि तशाच त्या चौकोनी छोट्या, सारख्या दिसणाऱ्या खिडक्या, त्यामुळे सार्या गावांना एक सुंदरसं टुमदार रुपडं मिळतं. तशाच त्या दगडी फरशीच्या चिंचोळ्या गल्ल्या, पायऱ्या आणि किनार्यावरचा पामच्या झाडांनी सजलेला प्रोमेनाड! कोकणामध्ये कौलारू घरांची माडांची गाव पाहतो, तसंच काहीसं. त्यामुळे बोटीने प्रवास करताना आम्हाला ही सारी सुंदर बेटं आणि समुद्रहि पाहता आला.
डोंगरावर उतरती शेती दिसत होती. शेतीचा उतार मात्र अचंबित करणारा होता. इतक्या तिरक्या जमिनीवर कसे काय शेती करत असतील? असा प्रश्न साहजिकच पडला. येताना परत सकाळच्या बंदरांवर प्यासिंजर चढ उताराचं काम चालू होतं. सकाळी उतरलेले बरेच चेहरे आता पुन्हा परतीच्या प्रवासात चढताना दिसत होते. सकाळची ती मुलं आता पुन्हा बोटीत चढली. थकलेली दिसत होती त्यामुळे सकाळचा चिवचिवाट आता नव्हता. निमूटपणे बरीचशी झोपी गेली. सूर्य आता अस्ताला गेला होता. दूरवर बेटांवरचे दिवे आता लुक लुकू लागले. मोठठं मोहक होतं ते दृश्य. थोड्याच वेळात साधारण साडेनऊच्या सुमारास स्प्लिट आलं. बराच उशीर झाला होता. आम्ही पार थकून गेलो होतो. आता बाहेर येऊन आम्ही टॅक्सी बुक केली. ती माझ्या नवऱ्याने त्याच्या इंडियाच्या फोनवरून केली. त्यामुळे दहा मिनिटातच तो बरोबर आमच्या पाशी येऊन आला आणि म्हणाला मी तुझा फोटो पाहिला व्हाट्सअप वर त्यामुळे पटकन ओळखलं तुला, ही माध्यमक्रांती! आम्ही घरी येऊन थोडं जेवण केलं आणि झोपून गेलो. उद्या स्प्लिटमध्येच फिरणार होतो त्यामुळं घाई नव्हती.
क्रमशः
प्रतिक्रिया
29 Sep 2019 - 5:13 pm | मुक्त विहारि
छान लिहिलंय
29 Sep 2019 - 5:15 pm | पद्मावति
मस्तंच.
29 Sep 2019 - 5:57 pm | जॉनविक्क
29 Sep 2019 - 9:03 pm | जालिम लोशन
वाचनिय.
30 Sep 2019 - 10:30 am | अनिंद्य
सुंदर !
फोटोतून शहराची बदलेली 'स्कायलाईन' दिसते आहे. गेम ऑफ थ्रोन पेक्षा वेगळी.
30 Sep 2019 - 10:58 am | सुधीर कांदळकर
चित्रदर्शी वर्णन, प्रचि दोन्ही सुंदर. पुलेशु. धन्यवाद.
30 Sep 2019 - 1:02 pm | स्मिता दत्ता
धन्यवाद
3 Oct 2019 - 9:03 am | दुर्गविहारी
खुपच छान लिहिले आहे. प्रत्यक्षात कधी बघायला मिळेल कि नाही, माहिती नाही. पण तुमच्या धाग्यामुळे मस्त सैर झाली.
पु. भा. प्र.