मक्याच्या दाण्यांची भाजी

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in पाककृती
30 Aug 2019 - 7:51 pm

साहित्य :

सोपी पण चविष्ठ अशी होते ही भाजी. मी आजच केलीये. म्हणून शेअर करते आहे. पटकन आणि छान होणारी.

मक्याचे काढलेले दाणे, नेहमीचे फोडणीचे साहित्य, चणाडाळीचे पीठ, एक मध्यम चिरलेला कांदा, वाटलेले ओले खोबरे, मीठ.

काढलेले मक्याचे दाणे मिक्सरला जर्रा फिरवून घ्यायचे. जास्त फिरवले तर लगदा होतो. नुसतं एकदोनदा फुर्र फुर्र केलं तरी पुरे. एका दाण्याचे चार तुकडे होतील इतपत भरड करायचे. जर जास्त पीठ झाले तर भाजीचा बेत कॅन्सल करून उपमा करावा. फिरवताना पाणी घालायचं नाही. थोडं पाणी वाटताना सुटतं. तेवढं पुरे.

फिरवून घेतलेले दाणे कुकरला लावायचे. मी वरण भातावरोबरच लावते तिसर्‍या पुडात. वाफवून झाले की मोहरी, हिंग, किंचित हळद घालून फोडणी करायची. त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा त्यावर दाण्यांची भरड घालून परतायचे. ओले खोबरे , लाल तिखट. मीठ घालायचे. मग त्यावर चणाडाळीचे पीठ हळूहळू भुरभुरवत परतत रहायचे. भाजी सुकी झाली आणि पीठ शिजले की उतरायची. वरून कोथिंबीर आवडत असेल तर घालावी. भाजी तयार. फार वेळ लागत नाही. लागतेही छान.

गौरीबाई गोवेकर

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Aug 2019 - 8:42 pm | कंजूस

मक्याचा सांजा?

पियुशा's picture

30 Aug 2019 - 9:20 pm | पियुशा

फोटू फोटू फोटू !!!

विनटूविन's picture

1 Sep 2019 - 9:37 am | विनटूविन

आख्खे दाणे घालून केली तरी चालेल ना

तमराज किल्विष's picture

1 Sep 2019 - 11:33 am | तमराज किल्विष

आख्खे दाणे घालून केली तरी चालेल ना
>> नाही. टचक टचक लागतील खाताना.

इरामयी's picture

1 Sep 2019 - 1:25 pm | इरामयी

टचक टचक

शब्दप्रयोग आवडला.

कृती वाचून तोंडाला पाणी सुटलं. भाजीच्या बाजूला हिरव्या मिरचीचा खर्डा छान लागेल असं वाटतं.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

3 Sep 2019 - 12:38 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

नक्कीच छान लागेल. मका गोडसर असतोच मुळचा. म्हणून यात चवीला सुद्धा साखर नाही घालायची. खर्डा मस्तच लागेल.

मदनबाण's picture

2 Sep 2019 - 5:35 pm | मदनबाण

फोटु ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |