८४ वा पक्षी ..!!

Primary tabs

लोकेश तमगीरे's picture
लोकेश तमगीरे in मिपा कलादालन
5 Aug 2019 - 10:33 am

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे मी सामुदायिक आरोग्य विभागात प्रकल्प समन्वयक म्हणून दोन वर्ष काम केले. या दोन वर्षाच्या काळात मी बऱ्याच नवीन गोष्टी शिकलो. व्यावसायिक विकासासोबतच माझातील काही सुप्त कलागुणांना खुलण्यास व बहरण्यास इथे वाव मिळाला किंबहुना ते मला इथे ज्ञात झाले. आदरणीय प्रकाश काका आणि मंदा काकू यांच्या प्रेरणेने माझा काम करण्याचा उत्साह खूप वाढायचा. कामाच्या व्यतिरिक्त व्यक्तीचित्रण, लेख, माडिया आदिवासी संस्कृतीचे छायाचित्रण, माडिया चालीरीतींचे व्हिडिओज तयार करणे, पक्षी निरीक्षण आणि त्यांचे व्हिडिओ डॉक्युमेंटेशन इ. अनेक छंद मी जोपासले. माझ्या सामुदायिक आरोग्याच्या कामासोबतच प्रकाश काका या माझ्या छंदांची पण स्तुती करायचे. त्यामुळे ह्या गुणांचा अधिकाधिक विकास होत गेला. या सोबतच आणखी एक चांगलं व्यसन मला इथे लागलं आणि ते म्हणजे सायकलिंग चं. सायकलिंग सोबतच पक्षी–निरीक्षणाचं वेढ पण खूप वाढत गेलं. रोज सकाळ-संध्याकाळ सायकलिंग करत असतांना मी माझा डी.एस.एल.आर कॅमेरा सोबत घेऊन जायचो. भामरागड तालुका हा पूर्ण घनदाट जंगलाचा भाग असल्यामुळे इथे नानाविध प्रकारचे पक्षी दिसायचे. जंगलातून येणारे पक्ष्यांचे कुतूहल निर्माण करणारे वेगवेगळे आवाज मला जणू काही जंगलाच्या आत यायला प्रेरित करायचे. आणि म्हणून सुरुवातीला फक्त डांबरी रस्त्यावरून सुरु झालेला माझा सायकल प्रवास हळू-हळू पुढे जंगल वाटांकडे वळला. त्यामुळे मला आणखीन नवीन जातीचे पक्षी दिसण्यास मदत झाली. काही काळानंतर सततच्या अभ्यासाने मला आवाजांवरून सुद्धा काही पक्षी ओळखायला यायला लागले.

असचं एकदा मुख्य भामरागड रस्त्याहून बेजुर फाटा लागताच सायकल घेऊन आत वळलो. काही अंतर जंगलवाट पार केली की एक मोठं शेत लागतं. या शेताला लागूनच एक मोठा नाला आहे. नेहमीप्रमाणेच सायकल उभी करून माझं पक्षी बघणं सुरु होतं. नाल्याच्या पलीकडील शेतामध्ये दोन मुलं ताडाच्या झाडावर चढली होती. नित्य-नियमाप्रमाणे ती आधल्या संध्याकाळी लावलेला जमा झालेल्या ताडीचा माठ उतरवत होती. माझी नजर त्यांच्याकडे जाताच मी नाला ओलांडून ताडीच्या झाडाच्या दिशेने जायला लागलो. ताडी कशी काढतात हे मला कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करायचं होतं. अचानक मला एक वेगळा, कधी न ऐकलेला, कर्कश असा आवाज आला. 'हा कुठला तरी नवीन पक्ष्याचा आवाज आहे' असे मला ज्ञानात येताच मी थोडा सावध झालो आणि त्यांच क्षणी तिथेच कुठलीही हालचाल न करता शांत उभा राहिलो. पक्ष्यांची नजर खूप तीक्ष्ण असते शिवाय यांना मनुष्यासारखी बाह्याकृती दिसली की लागलीच ते सावध होतात किंबहुना उडून जातात. परंतु त्या पक्ष्याला बहुदा मी असल्याच्या अंदाज आला होता. लगेच त्याच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज आला आणि तो उडायला लागला. माझे डोळे आणि कॅमेरा त्याला पाहण्यास आतुर झाले होते. कॅमेरा पण ऑटो-फोकस कंटीन्यूअस मोड मधे रेडी करून ठेवला होता. माझी तर्जनी कॅमेराच्या प्रेस शटर रिलीज बटन वर सज्ज होती. दुसऱ्याच क्षणी एक मोठ्या काळ्या रंगाचा, पिवळी चोच असलेला आणि मुख्य म्हणजे त्या पिवळ्या चोचीच्या वर पिवळ्या-काळ्या रंगाचं शिंग असलेला पक्षी दिसला. मी एकदम आनंदाने मनातल्या-मनात ओरडलो, ....अरे...अरे...हॉर्नबिल...मालाबार हॉर्नबिल..!!!

मालाबार हॉर्नबिलची
मालाबार हॉर्नबिल

रिफ्लेक्स ऍक्शन ने माझ्या तर्जनीने जोरदार प्रेस शटर रिलीज बटन दाबली. खट...खट...खट...खट...खट...खट...खट असा सहा-सात वेळा आवाज करत माझ्या कॅमेऱ्यात त्या मालाबार धनेश चे ६-७ फोटो कैद झाले. स्वच्छंद भरारी मारत तो हॉर्नबिल निघून गेला. निळ्या आकाशात दिसेनासा होत पर्यंत मी त्याच्याकडे एकटक बघत राहिलो. मी त्याला मनात "थँक-यु हॉर्नबिल" म्हटले आणि आतोबांचे (श्री विलास मनोहर - लोक बिरादरीचे जुने कार्यकर्ते. लोक बिरादरीत त्यांना सर्वजण प्रेमाने "आतोबा" म्हणतात.) सुद्धा आभार मानले. त्यांनीच मला या भागात मालाबार हॉर्नबिल दिसतो म्हणून सांगितले होते आणि त्यामुळे मी या भागात हॉर्नबिलच्या शोधात हिंडायचो. नंतर कॅमेरामध्ये क्लिअर फोटोज आलेत की नाही हे तपासलं. फोटोज एकदम मस्त आले होते. एक वर्षांपासून पाहण्यासाठी आतुर असलेल्या मला मालाबार हॉर्नबिलचे दर्शन होताच मी खूप धन्य झालो. कॅमेरा आत ठेवला, आपली सायकल घेतली आणि हेमलकसाला सर्वांसोबत हा अविस्मरणीय अनुभव वाटायला सुखात परतलो. माझ्या भामरागड मधील पक्ष्यांच्या यादीत मालाबार हॉर्नबिलची ८४वा पक्षी म्हणून भर झाली.

शब्दांकन:
डॉ लोकेश तमगीरे

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

5 Aug 2019 - 6:47 pm | प्रमोद देर्देकर

ओहो मस्तच !
या मे महिन्यातच मी हे पक्षी जोडीने कोकणांत मालवणला पाहिले.
आणि तुमची आवड खूप छान आहे.
तेव्हा आगोदर काढलेले 83 फोटो सुध्दा आमच्या माहितीसाठी इथं वेगळे धागे काढून लिहा बरं पटपट.

लोकेश तमगीरे's picture

7 Aug 2019 - 10:37 am | लोकेश तमगीरे

धन्यवाद ...!
भामरागड ला पक्षी - निरीक्षणाचा छंद लागला.
वाह छानच .... कोकणांत हॉर्नबिल बरेच आहेत.
अगोदरच्या पक्ष्यांबद्दल माहिती लिहिण्याचा प्रयत्न करतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Aug 2019 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

तेव्हा आगोदर काढलेले 83 फोटो सुध्दा आमच्या माहितीसाठी इथं वेगळे धागे काढून लिहा बरं पटपट. +१

त्यात मध्ये मध्ये मिपावरील इतरही लिखाण वाचून तिथेही वाचक म्हणून काही प्रतिसाद लिहा, अशी विनंती.

लोकेश ह्यांना विनंती आहे.

जॉनविक्क's picture

5 Aug 2019 - 8:22 pm | जॉनविक्क

लोकेश तमगीरे's picture

7 Aug 2019 - 10:53 am | लोकेश तमगीरे

नक्कीच नक्कीच ..!

लोकेश तमगीरे's picture

7 Aug 2019 - 10:52 am | लोकेश तमगीरे

धन्यवाद ...!

कोकणात श्रीवर्धनपासून खाली दक्षिणेकडे जावं तसतसे या पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते. पण तिकडचे माहीत नाही. फोटो छानच आला आहे. कुडाळकडे सहा बारा असे एकत्र दिसतात. कलकलाट करत फांद्यांवर बसतात. तिकडे गरुड म्हणतात कारण साप खातातच पण सापासारखे दिसणारे पडवळही खातात.

लोकेश तमगीरे's picture

8 Aug 2019 - 3:19 pm | लोकेश तमगीरे

वाह ..! छान अनुभव. कोकणात यांची संख्या जास्त आहे. कधी योग आला तर नक्कीच भेट द्यायची इच्छा आहे.
धन्यवाद !

श्वेता२४'s picture

5 Aug 2019 - 10:15 pm | श्वेता२४

.

लोकेश तमगीरे's picture

8 Aug 2019 - 3:20 pm | लोकेश तमगीरे

धन्यवाद . . !

टर्मीनेटर's picture

8 Aug 2019 - 4:06 pm | टर्मीनेटर

छान लिहिलंय.
फोटो खूप आवडला, वर प्रतिसादात कंजूस काकांनी दिलेली माहितीही रोचक आहे!

लोकेश तमगीरे's picture

9 Aug 2019 - 10:19 am | लोकेश तमगीरे

फोटो फार दुरून घेतल्याने खूप प्रोफेशनल तर आला नाही. पण पक्ष्याची ओळख होईल तेवढा क्लिअर आला आहे. आपल्याला आवडला त्याबद्दल धन्यवाद ...!
हं .... वर काकांनी दिलेली माहिती छान आहे. तिथे नक्कीच जायला आवडेल.

दुर्गविहारी's picture

10 Aug 2019 - 5:16 pm | दुर्गविहारी

छान ! मला हेच मलबार हॉर्नबील रांगणा या सह्याद्रीच्या एन कण्यावरच्या गडावर दिसले होते. त्यावर मी लिहीले होते. मला हॉर्नबीलचे त्रिकुट दिसले होते. उडताना यांच्या पंखांचा वाफेच्या ईंजिनासारखा आवाज होतो. ह्यांना पहाणे हाच एक अनुभव असतो.
तुमचे लेखन आवडले. आणखी लिहा. पु.ले.शु.

लोकेश तमगीरे's picture

10 Aug 2019 - 10:37 pm | लोकेश तमगीरे

वाह छानच ... तुम्ही पण हॉर्नबिल बद्दल लिहिलेला अनुभव नक्की शेयर करा.
अनुभव वाचायला आवडेल.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.