ही बाजू घेणं किंवा ती बाजू घेणं असा बायनरी चॉईस बहुतांश वेळा नसतोच कुणाला.
पण कोणतीतरी एक बाजू घेणं, आणि कोणतीच बाजू न घेणं हे दोन चॉईस मात्र बहुतांश केसेसमध्ये असतात.
न्यूट्रल, डिप्लोमॅटिक, अनबायस्ड आणि मग आपापल्या बाजूनुसार सेक्युलर, फेक्युलर, सिक्युलर, कुंपणावरचे, शेपूटघालू असे बरेवाईट शब्द या उदासीन असणाऱ्या लोकांना लाभतात.
याखेरीज मग सिलेक्टिव्ह निषेध, सिलेक्टिव्ह निषेध पण बाजू मात्र कोणतीही एक न धरणे, सिलेक्टिव्ह सपोर्ट, एकच बाजू एकनिष्ठपणे धरणे, व्हॉटअबाउटरी (तेव्हा कुठे होतात?) हे अनेक प्रकार अगदी रोजच्या वातावरणात मिसळलेत. ऑनलाइन पेपर्समधल्या बहुतेक सगळ्याच कॉमेंट्स इतक्या विषारी रागाने भरलेल्या दिसतात की अनामिक राहण्याचा पहिला फायदा म्हणजे शिवराळ आणि शाब्दिक हल्लेखोरी असं आहे की काय अशी शंका यावी.
यात कॉमन पॉईंट असा की बाजू कोणतीही असो, समोरच्याचा चावा घेणे, लचका तोडणे यासाठी एक बाजू पक्की घेतलेली असणं गरजेचं असतं. न्यूट्रल राहू इच्छिणारं किंवा सामोपचार, मध्यममार्ग असं काही लिहिणारं कोणी व्यक्त झालं की त्यालाही दोन्ही इतर बाजूनी एकत्र येऊन फटके पडतात.
-कोणतीतरी एक बाजू घेणं हे कोणतीच बाजू न घेऊन त्रयस्थ राहण्यापेक्षा बरं असतं का?
-की कोणतीतरी एक बाजू घेणं हे अपरिहार्यपणे एकांगी अतएव पूर्वग्रहदूषितच असलं पाहिजे अशी समजूत दिसते?
-न्यूट्रल राहणं ही एक इतर बाजूंइतकीच वजन (weightage) असलेली बाजू असते का? असावी का?
-न्यूट्रल असणं (एक बाजू न घेणं) म्हणजे आसपासची स्वतःला अमान्य पण सत्य परिस्थिती केवळ डोळे बंद करुन नाकारणं आणि डिनायल मोडमध्ये जाणं आहे का?
-"आपण नेहमी कोणतीतरी एक बाजू घेतली पाहिजे (we must take sides) कारण तटस्थता ही नेहमी अन्याय करणाऱ्याला मदत करते, अन्यायग्रस्ताला नाही." असं प्रसिद्ध वचन आहे. ते पटतं का?
-जी बाजू मला जिवंत ठेवते ती माझी बाजू असं म्हणणारे लोक काही चुकीचं करतात का?
-फार झाली तटस्थता, साली आता चुकीची का ठरेना, पण बाजू घेण्याची वेळ आली आहे, असं कधी वाटतं का?
-तटस्थ भूमिका असं काही खरंच असतं का? की एका बाजूला पाठींबा असतो पण तशी जाहीर भूमिका घेणं टाळण्यासाठी तटस्थता ही जाहीर भूमिका घेऊन त्या बाजूला झुकणारं निवेदन केलं जातं?
-तुम्ही कधी ठामपणे एक बाजू घेता का?
प्रश्न उलटसुलट आहेत, पण ते आहेत.
प्रतिक्रिया
30 Jul 2019 - 12:46 pm | प्रलयनाथ गेंडास...
व्वा मस्त लेख !
भेट झाल्यास... धागालेखकाला एक बेडेकर मिसळ फ्री फ्री फ्री ...
30 Jul 2019 - 12:53 pm | गामा पैलवान
गवि,
तुम्ही गहन प्रश्नाला हात घातलाय. याबाबत एक निरीक्षण असंय की तटस्थतेचा पाया साधारणत: परदु:खशीतल या न्यायावर आधारित असतो. जे लोकं संबंधित बऱ्यावाईट अनुभवातनं गेलेले असतात ते सहसा बाजू घेण्यास उत्सुक असतात.
आ.न.,
-गा.पै.
30 Jul 2019 - 1:00 pm | कुमार१
काही प्रसंगी असावी.
30 Jul 2019 - 1:08 pm | मुक्त विहारि
त्यामुळे, आजकाल मी तरी, फार जास्त विचार न करता, माझे कुदळ, फावडे आणि घमेले घेतो आणि जमतील तितकी रोपे लावत सुटतो. निसर्गाची हानी नाही करता, साधं सोपं आयुष्य जगायचा प्रयत्न करतो. योग्य प्रमाणात खतपाणी दिले की रोपं वाढतातच. व्यक्ती पुजे पेक्षा निसर्गपुजा, माझ्या साठी उत्तम.
वरील वाक्ये साधी आहेत. त्यामुळे खूप विचार करत बसू नये, ही नम्र विनंती.
30 Jul 2019 - 1:14 pm | गवि
बऱ्याच बाजू असतात हे समजणं हा एक भाग झाला. पण ते समजल्यावर त्यातील कोणतीही एक बाजू न घेणे म्हणजे "फार विचार न करणे" असं ध्वनित होऊ नये ना?
30 Jul 2019 - 1:29 pm | जॉनविक्क
बऱ्याच बाजू असतात हे समजणंच हा एक मोठा भाग असतो, अन्यथा...
30 Jul 2019 - 1:41 pm | जॉनविक्क
वरील सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे"परिस्थितीवर अवलंबून".
30 Jul 2019 - 1:41 pm | टर्मीनेटर
+१
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या म्हणी प्रमाणे परस्परांशी नाते/संबंध कुठलेही आणि कितीही चांगले असोत पण दोन व्यक्तींचे एकमेकांशी अगदी १००% विचार जुळणे हि कर्मकठीण गोष्ट आहे.
राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिकच नव्हे तर कला, क्रीडा, साहित्य आणि मनोरंजनाबाबतच्या विचारांवर देखील मतभेद दिसून येतात.
मला वाटतं आपल्या विचारांशी बऱ्यापैकी जुळणारे विचार असलेल्या व्यक्ती/ समूहांच्या बाजूला कलणे हा मनुष्य स्वभाव आहे. काहीजण उघडपणे एखादी बाजू उचलून धरतात तर काहीजण उगाच वाईटपणा कशाला घ्या म्हणून तटस्थ राहतात. दुसऱ्या बाजूला ज्यांची स्वतंत्र विचारांची पक्की बैठक असल्याने त्यांना कुठल्याच बाजूची कुठलीच मते पटत नसणारी मंडळीहि आहेत, ते एकतर सगळ्यांचाच विरोध तरी करतात किंवा गप्प बसणे पसंत करतात.
आणखीन एक प्रकार म्हणजे दलबदलू मंडळी. त्यांचे म्हणणे आज एक तर उद्या दुसरे आणि परवा काहीतरी तिसरेच असते :-)
30 Jul 2019 - 5:39 pm | श्वेता२४
"आपण नेहमी कोणतीतरी एक बाजू घेतली पाहिजे (we must take sides) कारण तटस्थता ही नेहमी अन्याय करणाऱ्याला मदत करते, अन्यायग्रस्ताला नाही." असं प्रसिद्ध वचन आहे. ते पटतं का?
हे 100 टक्के पटतं. त्याचबरोबर कोणताही निर्णय न घेणे यापेक्षा चुकीचा का असेना पण निर्णय घेणे गरजेचे असते असेही म्हणले जाते. त्यामुळे नेहमी कोणतीतरी एक ठाम बाजू किंवा निर्णय घेते.
30 Jul 2019 - 6:19 pm | धर्मराजमुटके
फारच वैयक्तीक प्रश्न सार्वजनिक संस्थळावर विचारणं चुकीचं होईल म्हणून खरडवहीत प्रश्न पाठवला आहे.
30 Jul 2019 - 6:33 pm | प्रकाश घाटपांडे
कठीण प्रसंगी अस्तित्व राखण्याची बाजू घेण ही निसर्गात; घडत
30 Jul 2019 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणत्या गोष्टीची बूज राखणे आवश्यक आहे/नाही, यावर बाजू घेणे/न घेणे, अवलंबून असते/नसते... याच मुद्द्यात लेखातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. :)
30 Jul 2019 - 7:48 pm | मारवा
कुठलीतरी निश्चीत बाजू घ्यावीशी वाटणे नव्हे ती तशी असणे असे वाटणे ही एक सर्वसाधारण मानवी मनाची कन्सीस्टन्सीची गरजच असावी. म्हणजे व्याख्ये सारखं अनेकांना प्रत्येक बाबतीत एका निश्चीत व्याख्येची गरज भासते. व्याख्या जितक्या प्रमाणात अस्पष्ट संदिघ्द असेल तितक्या प्रमाणात अस्वस्थता स्ट्रेस वाढत जातो. उदा. सध्याचा राष्ट्रवाद हा मुद्दा यावरुन मग कुठली बाजु उचलुन धरायची हा निवडीचा तणाव निर्माण होतो.
सत्य वा व्यक्ती वा तथ्य हे स्थितीशील नसुन गतीशील असल्याने व सतत परीवर्तनशील असल्याने त्याला असं निश्चीत पॅटर्न मध्ये पकडणं शक्य नसतं हे एकीकडे व बाजु घेण्याचा दबाव दुसरीकडे या पेचात बरेचदा अडकायला होतं
मॉब लिंचींग मध्ये किंवा रॅगींग मध्ये जर आपण पिडिताची बाजु घेतली तर आपल्यावरही तोच प्रसंग गुदरेल या भितीने मॉब ची बाजु जरी चुकीचा असेल तरी घेतली जाते. इथे संस्थळावरील चर्चेतही जर आपण वेगळी बाजु मांडली तर टीका होइल असा दबाव असु शकतो +१ ही प्रतिसाद शैली बहुतांश या दबावप्रेरणेतुन येत असावी. हो हो मी ही तुमच्या बरोबरच आहे.
मोदी हा एक रोचक फॅक्टर इथे आर्वजुन नमुद करावासा वाटतो म्हणजे मोदी च्या बाबतीत मिक्स्ड फीलींग्ज असु शकतात पण त्यांच्या समर्थक वा विरोधक दोघांना दोन्ही कडे प्रसंगानुरुप बाजु घेणे मंजुर नसते या तो तुम हमारे साथ हो..................... असा बालिश आग्रह असतो.
आता यात संधीसाधुपणा हा ही एक भाग आहे म्हणजे सोयीस्कर कुठलीच बाजु न घेणे पॉलिटीकली करेक्ट असणे पणं आता हा फरक की अमुक एक पॉलिटीकली करेक्ट वागतोय की जेन्युइनली त्याला एकाच वेळेस अनेक बाबी पटतातही व नाहीही थोडक्यात जेन्युइनली मिक्स्ड इमोशन्स वा कन्फ्युज्ड आहे.
जे फंडामेंटलीस्ट आहेत मग कुठल्याही बाबतीत धर्म च नव्हे विचारसरणी त्यांच्यात कमालीचा ठामपणा आढळतो आकर्षक उद्दाम सोपा पण अंतिमत: घातक ठामपणा
काळे वाइटच..... अॅलोपॅथी वाइटच.......... पैसा हवाच..... आत्मा आहेच..........................इ.इ.
त्याउलट जितका विचारी संवेदनशील माणुस तितका बिचारा कनफ्युज्ड आढळतो कुठला झेंडा घेऊ मी हाती ?
काही फॅक्ट्स च मोठ्या घोळदार असतात उदा भारतीय अध्यात्मातील ब्रह्म ते असे आहे ते तसे आहे ते इथे आहे ते तिथे आहे ते आहे ते नाही ते अमुक ते तमुक थोड्या वेळाने आपण फक्त गोल च फिरतोय असा भास होतो चक्कर येउ लागते.
असो
31 Jul 2019 - 8:35 am | प्रकाश घाटपांडे
+१ प्रचंड सहमत
बर हे समजून घेण्याची क्षमता नसणार्यांना तशी क्षमता नाही तुमच्याक्डे नाही ही सांगण्याची पण सोय नसते.
30 Jul 2019 - 8:07 pm | ढब्ब्या
बाजू घेणे आणि निर्णय घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे वाटते. ('taking a decision' verses 'taking a side').
आणी बाजू घेण्यापेक्षा निर्णय घेणे जास्ती महत्वाचे आहे. अगदी तटस्थ (कोणतीच बाजू न घेण्याचा) राहण्याचा निर्णय पण महत्वाचा आहे. आणी एखादी बाजू पटली नाही तरी त्या बाजूने निर्णय घेऊ शकतो (उदा: 'दिल' विरूद्ध 'दिमाग' लढाई).
वरती मोदींचे उदाहरण आले आहे तरः मी मोदिंना (पर्यायाने भाजप) मत देण्याचा निर्णय घेतला पण म्हणून नेहमी त्यांची बाजू घेईनच असे नाही.
मुळ मुद्दा - बाजू घेण्याच्या बाबतीत, साधारणपणे जेव्हा माझे मत विचारत घेतले जाईल असे वाटते तेव्हाच मी कोणाचीतरी बाजू घेतो, ईतर वेळेस तटस्थ रहाणे बरे वाटते. जो जिंकेल (किंवा बरोबर असेल) तो आपला ;)
31 Jul 2019 - 8:38 am | प्रकाश घाटपांडे
म्हणजे बरोबर नसेल पण जिंकेल तोही आपलाच. अस ना! :)
31 Jul 2019 - 7:12 pm | ढब्ब्या
हो, कारण "winners write history".
आणी एकदा survive होण्याचा निर्णय घेतला की बाजू कोणाची घेतली ह्याने कही फरक पडत नाही.
31 Jul 2019 - 3:40 pm | इरामयी
बाप रे!
प्रतिसादांची शंभरी नक्की.
भडका उडू शकेल असेही प्रतिसाद येतील हेही नक्की.
31 Jul 2019 - 4:44 pm | जॉनविक्क
योग्य, अयोग्य आणि आपली बाजू :)
31 Jul 2019 - 10:11 pm | सर टोबी
कुठे तरी स्वतःशी चांगल्या वाईटाचा विचार करणे आणि त्याची व्यवहाराशी सांगड घालणे असा साधारण पापभिरू लोकांचा दृष्टिकोन असावा. त्यामुळे उच्च पदस्थांबरोबर सामोपचाराने वागणे, फार प्रवाहाविरुद्ध भूमिका न घेणं असं सर्वसाधारण लोकांची वागण्याची पद्धत असते.
कुठली तरी बाजू घेणं याचा तत्वानिष्ठेशी संबंध असेल तर अशी तत्वनिष्ठता सहसा उच्च पदस्थ मंडळी अजिबात बाळगत नाही असा अनुभव येतो. हातून कुणाला तरी इजा झाली किंवा नुकसान झाले म्हणून मनोरुग्ण होणारे किंवा आत्महत्या करणारे सहसा सामाजिक उतरंडीवर तळाशी असतात. त्या उलट उच्च पदस्थ अशा घटना तर बिरुदावली असल्यासारखे मिरवतात.
1 Aug 2019 - 5:48 am | विजुभाऊ
भाराताच्या नॉन अलाइन्ड मुव्हमेंट ( नाम) ला हे सगळे निकष लावून पाहिले तर?