साग्रसंगीत रगडा पॅटिस

Primary tabs

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in पाककृती
18 Jul 2019 - 8:39 pm

रगडा पॅटिस

रगडा पॅटिस हा काही नवीन पदार्थ नाही. सर्वांना माहित असलेला, चाखलेलाच आहे. पण एकदा जबलपूरला माझं गाणं होतं. तिथं एक राजुरकर म्हणून कुटुंब रहात होतं त्यांच्याकडे मी खाल्लेला रगडा पॅटिस अप्रतिम होता. त्या घरच्या बाईंना मी कृती विचारून घेतली. तेव्हापासून मी तसाच करते. ती कृती तुमच्यासाठी देते.

लागणारे जिन्नस:

सात ते आठ मध्यम बटाटे, एक ईंच आल्याचा तुकडा, मूठ भरून सोललेल्या लसूण पाकळ्या, कोथिंबिरीची मोठी जुडी. एक पुदीन्याची जुडी, एक वाटी भिजलेली चवळी, दीड वाटी भिजलेले पिवळे वाटाणे. सात आठ चांगले पिकलेले टोमॅटो, दहा बारा हिरव्या मिरच्या, तिखट, हळद, धने पुड, जिरे पुड, मीठ, तेल. अर्धी वाटी चिंच, अर्धा पाव सिडलेस खजूर. वाटीभर किसलेला गूळ, मुठभर सुक्या काश्मिरी मिरच्या, बारीक शेव.

या प्रकाराची सगळी चव चटण्यांमध्ये असते. या साठी तीन वेगवेगळ्या चटण्या बनवायच्या आहेत त्याची कृती खालीलप्रमाणॆ

चटणी एक: टोमॅटो + सुक्या लाल काश्मिरी मिरच्या + लसूण

सुक्या लाल मिरच्या पाण्यात चार ते सहा तास भिजत घालाव्या, टोमॅटो कुकरमध्ये उकडून गार झाल्यावर साले काढून टाकावीत. मिरच्या, टोमॅटो आणि लसूण पाकळ्या मिक्सरवर बारीक वाटून त्यात चवीपुरते मीठ घालावे. चटणी केचपपेक्षा थोडी पातळ असावी.

चटणी दोन: चिंच +खजूर + गूळ

चिंच व खजूर भिजत घालावा दोन तास , चिंचेचा कोळ काढावा. भिजवलेल्या खजूराचे तुकडे करून घ्यावे, चिंच, खजूर, गूळ मिक्सरवर एकत्रच बारीक वाटून घावे. त्यात चवीपुरते मीठ व एक चमचा धनेपूड वाटताना घालावी. चटणी फार पातळ करू नये.

चटणी तीन कोथिंबीर + हिरव्या मिरच्या + पुदीना

कोथिंबीर व पुदीना निवडून चिरून घ्यावा, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबिर व पुदीना मिक्सरवर बारीक वाटून घ्यावा. चवीपुरते मीठ घालावे. चटणी वाटताना बेतानेच पाणी घालावे, ती वाटल्यावर पातळ होते.

रगडा: नेहमीसारखाच फक्त त्यात चवळी आणि वाटाणे दोन्ही वेगवेगळे शिजवून घ्यावे, कढईत आधी थोडे तेल त्यावर थोडी हळद व आले ठेचून घालावे. शिजलेले वाटाणे घालून चांगले रगडून मोडून घ्यावे सगळॆ वाटाणे मोडले जाऊन चांगला लगदा झाला पाहिजे. नंतर शिजलेली चवळी घालावी. त्यावर अर्था चमचा जीरे पावडर , चवीपुरते मीठ व एक चमचा धने पावडर घालावी.

पॅटिस: बटाटे उकडून्, सोलून कुस्करून घ्यावे. त्यात थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ घालावे, पॅटिस वळून तव्यावर शॅलोफ्राय करून घ्यावे.

सर्व्ह करताना डिशमध्ये पॅटिस घालून वर गरम रगडा घालावा. त्या वर चिंच खजूराची चटणी घालावी त्या वर हिरवी चटणी घालावी शेवटी लाल चटणी घालून वर शेव घालावी. चटण्यांना नैसर्गिक रंग येतात आणि रंगसंगती सुरेल दिसते.

प्रतिक्रिया

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

18 Jul 2019 - 8:50 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

हा घ्या फोटू

कंजूस's picture

19 Jul 2019 - 4:58 am | कंजूस

छान!
एक वाटी चवळी हे नवीन आहे.
-------------
तुमची इमेज लिंक

या साईटवर
टाकून नवीन शेअरिंग लिंक जेनरेट केली. ती वापरून ~

फोटो - रगडा पॅटिस

-------------
चटण्या टाकण्याअगोदरचा फोटोही पाहिजे.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

20 Jul 2019 - 3:31 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

धन्यवाद . माझी काय चूक होते कळेना.

कंजूस's picture

21 Jul 2019 - 8:48 am | कंजूस

तुमची लिंक गुगल वेबसाईट शेअरिंग म्हणून चालवू देत नाही. त्यासाठी वेगळी लिंक असते.

जेम्स वांड's picture

19 Jul 2019 - 8:13 am | जेम्स वांड

लसूण ? चवळी? ह्याला रगडा पॅटिस म्हणायचं? हरहर.

Ill

विनिता००२'s picture

20 Jul 2019 - 2:48 pm | विनिता००२

चवळी संपवायची असेल म्हणून ह्यात वापरली असावी :)

जेम्स वांड's picture

20 Jul 2019 - 2:55 pm | जेम्स वांड

Crying Laughter

वेगळी चव यावेगळ्या जिनसां मुळे येत असेल. कुणी सांगावे. पण एक सांगु का ? ती लसूण,टोमेटो , आणि सुक्या मिरचीची चटणी करूनच बघ .

जेम्स वांड's picture

20 Jul 2019 - 3:39 pm | जेम्स वांड

पण दीड दोन वर्षे दिल्ली-गुडगाव वगैरे मध्ये राहून चाट ह्या खाद्यप्रकाराबाबत पिंड अंमळ सनातनी झालाय, प्रयोग नकोसे वाटतात

रेमिंग्टन's picture

21 Jul 2019 - 2:18 am | रेमिंग्टन

पाणीपुरी, भेळ, चाट, रगडा हे आयटम घरी केले तरी त्यांना ठेल्यावरल्यासारखी चव कामुन येत नसेल ब्वा?
ठेल्यावरल्या लोक्सचे मुरमुरे, फरसाण, पापड्या, चटण्या काय वेगळे असतात? घरी केलेल्या आयटमने जिव्हा-ज्वाळ होत नाही. तीच गोष्ट वडा-पाव, भज्यांची..
बरं माझा प्रॉब्लेम असा की संध्याकाळी हे पदार्थ खाल्ले की हमखास ऍसिडिटी होते. पॅन डी खाऊनच हे पदार्थ चाखावेत काय?

ठेल्यावरचे लोक मिरची लसुण मिक्सरमध्ये बारीक करत नाहीत. सिल-बट्टे पर पीसते है। पाट्या वरवंट्यावर.
आता हा आदेश सोडलात तर बघा काय होते पुढे.

रेमिंग्टन's picture

22 Jul 2019 - 11:12 am | रेमिंग्टन

:-)))