कौतुक? चुकून कधीतरी !

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
18 Jul 2019 - 11:14 am
गाभा: 

मानवी मन हा फार गूढ प्रकार आहे. कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा थांगपत्ता लागणे कठीणच. त्याचे अनेक पैलू आपल्याला समाजव्यवहारात दिसून येतात. अनेकांबरोबरच्या संवादातून आपल्याला अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिसतात तसेच स्वतःच्या वैशिष्टयांची देखील जाणीव होते. अशा एका वैशिष्ट्याकडे या लेखात लक्ष वेधत आहे. शीर्षकात लिहिल्याप्रमाणे ते आहे -
‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’ किंवा अगदी केलेच तर ते हात राखून करणे.प्रथम हे लक्षात घेऊ की ही अगदी मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ती आपल्या सर्वांत अस्तित्वात आहे. फक्त तिचे दृश्य परिणाम मात्र कमीअधिक स्वरूपात व्यक्त होतात.

आता या गुणधर्माची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याचा एक अनुभव सांगतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले होते. या घटनेवर त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि ते यश प्राप्त न करू शकलेल्या एका मुलाची प्रतिक्रिया होती, ’’मराठीतून काय सोपं असतं रे’’. अभिनंदनाच्या चार शब्दांऐवजी त्याने दिलेल्या या कडवट प्रतिक्रियेतून कौतुक न करण्याची रोगट मनोवृत्ती किती स्पष्ट दिसते. मग जसे आपले वय वाढते तशी ही वृत्ती आपल्यात घट्ट मुरत जाते.

अशा या कौतुक न करण्याच्या गुणधर्माने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास! यादी तशी संपणारच नाही. एखाद्याने त्याच्या क्षेत्रात छोटे-मोठे यश संपादले असल्यास त्याबद्दल चार कौतुकाचे शब्द मनापासून बोलायला आपल्याला किती जड जाते!

मनापासून कौतुक न करण्याची कला दोन प्रकारे प्रकट होते. पहिल्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीत किंचित कौतुकाचा औपचारिकपणा उरकला जातो पण, त्या व्यक्तीच्या पाठीमागे मात्र तिच्याबद्दल चांगले बोलणे हे जाणीवपूर्वक टाळले जाते. तर, दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्यातील कौतुकपात्र गुणांची नाईलाजाने कबुली दिली जाते पण, तिच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र कौतुकाचा विषय टाळून निव्वळ हवापाण्यावर बोलले जाते. अर्थातच खोटे कौतुक करावे असे बिलकूल नाही. विधायक टीकाही योग्यच. पण, एखाद्याच्या छोट्यामोठ्या यशाला निदान 'अरे वा' अशी सहज दाद द्यायला हरकत नसावी.

परीक्षा व स्पर्धांतील यश, कलाकौशल्य, नोकरीतील बढती, व्यवसायातील थक्क करणारी प्रगती, सार्वजनिक जीवनातील सन्मान अशा कितीतरी प्रसंगी यशस्वीतांवर कौतुकाचा वर्षाव ( निदान दखल घेणे) संबंधितांकडून अपेक्षित असते. त्यासाठी प्रत्यक्ष भेट, फोन वा संदेशवहनाची आधुनिक साधने अशी माध्यमे उपलब्ध असतात. प्रश्न असतो तो आपल्या अंतरंगातून दिलखुलास दाद देण्याचा. पण, तिथेच तर गाडे अडते.

आता हा एक अनुभव सामाजिक पातळीवरील.
भारताच्या एका पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेत बसलेले एक माजी पंतप्रधान ( बाकी सारे टाळ्या वाजवत असताना) हाताची घडी घालून व मख्ख चेहरा करून बसल्याचे दृश्य आपण दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी पाहिले. एवढ्या उच्च पातळीवर देखील कौतुकाचा कंजूषपणा आणि शिष्टाचाराचा अभाव प्रदर्शित व्हावा याचे सखेद आश्चर्य वाटते.

दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही. उलट, त्या कृतीतून आपण निरोगी मनोवृत्ती दाखवतो आणि कौतुकाच्या परतफेडीची संधीही निर्माण करून ठेवतो. कौतुक केल्याने आपल्याच मनाचा मोठेपणा सिद्ध होत असतो. तरीसुद्धा आपल्या अंतरंगातून प्रशंसेचे उद्गार पटकन बाहेर येत नाहीत खरे. याउलट एखाद्याची छोटीशी चूक सुद्धा आपण किती तत्परतेने दाखवून देतो!

वर म्हटल्याप्रमाणे आपणा सर्वांच्याच अंगी असलेला हा गुणधर्म आहे. जरा प्रयत्नपूर्वक त्याच्यावर मात करूयात का? हळूहळू जमायला हरकत नसावी.

रच्याकने.............
आपल्या या संस्थळावर मात्र आपण एकमेकाचे बरेच कौतुक करतो बुवा !! ☺️

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

18 Jul 2019 - 12:11 pm | सुबोध खरे

कौतुक न करण्याचे मूळ कारण म्हणजे हेवा किंवा मत्सर.

जी गोष्ट आपल्याला जमली नाही ती दुसऱ्याला सहज कशी जमते हे सहज स्वीकृत न होणारे सत्य आहे.

मुले दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक करणार नाहीत.

एक स्त्री दुसरीच्या रूपाचे कधीही कौतुक करणार नाही.

आणि

पुरुष दुसऱ्याच्या आर्थिक स्थितीचे सहजासहजी कौतुक करणार नाहीत.

नशीब किंवा भाग्य या गोष्टीवर लोकांचा इतका विश्वास का?

अन्यथा आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीच्या यशाचे समर्थन कसे करता येईल.

स्नेहांकिता's picture

20 Jul 2019 - 7:30 am | स्नेहांकिता

एक स्त्री दुसरीच्या रूपाचे कधीही कौतुक करणार नाही

असहमत.
सरसकटीकरण नको, प्लीज.
माझ्या कार्यालयातील कितीतरी महिलांना कार्यालयातल्याच इतर काही महिलांच्या सौंदर्याचे कौतुक आहे. मतभेद असले तरीही !
शिवाय सर्वच महिलांना सिनेतारकांच्या सौंदर्याचे कौतुक च नव्हे तर आकर्षणही असते.

आनन्दा's picture

20 Jul 2019 - 3:57 pm | आनन्दा

ज्या भावनेने पुरुष दुसऱयांच्या कार किंवा बाईक चे कौतुक करतो त्याच भावनेने स्त्रिया इतरांच्या सौंदर्याचे कौतुक करतात

सुबोध खरे's picture

20 Jul 2019 - 6:47 pm | सुबोध खरे

Boys abuse each other, they dont mean it.

Girls praise each other, neither do they mean it.

))=((

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 7:20 pm | जॉनविक्क

टोटल गुगली

स्नेहांकिता's picture

21 Jul 2019 - 12:33 pm | स्नेहांकिता

एलढ्यातच क्लीन बोल्ड झालात ?
... पिक्चर तो अभी बाकी है !

उठसुठ डीआरएस ची मदत अथवा थर्ड हंपायरची सेटिंग मदत वापरणे स्वभाव नाही हो आपला.

सुबोध खरे's picture

20 Jul 2019 - 6:48 pm | सुबोध खरे

सरसकटीकरण नको हे मान्य.

पण मूळ भावना समजून घ्या

स्नेहांकिता's picture

21 Jul 2019 - 12:38 pm | स्नेहांकिता

येस डॉक. जनरली तुमचे स्टेटमेंट बरोबर आहे.
यापेक्षा बोल्ड सत्य म्हणजे, स्त्रिया एकवेळ भरभरून एकमेकींचे कौतुक करतील !
पण एक पुणेकर दुसऱ्या पुणेकरांचे कधी तोंडभरून कौतुक करेल हे त्रिवार अशक्य आहे ( टाकली काडी पळा आता =)) )

कुमार१'s picture

21 Jul 2019 - 12:51 pm | कुमार१

जगातल्या कुठल्याही गावातले रहिवासी एकमेकांचे कवतिक हात राखूनच करतात, हे त्रिवार सत्य !

पण……

उभ्या जगात कलाकारांचे कौतुक पुण्याएवढे अन्य कुठे होत नाय, हे ध्यानात असूं द्यावं होय !

उभ्या जगात कलाकारांचे कौतुक पुण्याएवढे अन्य कुठे होत नाय, हे ध्यानात असूं द्यावं होय !
हे विधान फक्त सुधीर गाडगीळंनी करण्याच्या लायकीचे आहे.
पुणेकर नवीन कलाकारांच्या बाबतीत खास करून जर ते पुण्याबाहेरील असतील तर फारच हात राखून वागतात.
एखाद्या गाडगीळ , बर्वे , वगैरेंचे यांचे जितके कौतूक करतील त्या तुलनेत कार्तीकी गायकवाड , किंवा तत्सम कलाकारांचे कौतूक कमीच करतात

नाखु's picture

23 Jul 2019 - 9:12 am | नाखु

विजुभाऊ तुम्ही सुद्धा, अजूनही पुणे द्वेषातून बाहेर आलाच नाहीत!!!

पिंपरी-चिंचवड रहिवासी पण पुणे मुंबई सर्व शहराबद्दल आदर आत्मियता असलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

मराठी_माणूस's picture

23 Jul 2019 - 1:26 pm | मराठी_माणूस

हे विधान फक्त सुधीर गाडगीळंनी करण्याच्या लायकीचे आहे.

सही.:)

यशोधरा's picture

25 Jul 2019 - 1:45 pm | यशोधरा

टाकली की स्नेहा ताईने वरती हीच काडी! तुम्ही काय काडीला टोक काढताय की काय? =))

उभ्या जगात कलाकारांचे कौतुक पुण्याएवढे अन्य कुठे होत नाय, हे ध्यानात असूं द्यावं होय !

अगदी खरे..
फक्त त्या कलाकारांचे शब्दाआधी पुण्यातल्या हा शब्द घालायचा राहिला.
तसेही पुणेकरांनी केलेलं कौतुक कळायला पुणेकरच असावे लागते म्हणे. ;)
.
.
लेटेस्टध्ये कुणाचे चालुय म्हणे कौतुक?

जोन's picture

25 Jul 2019 - 12:49 pm | जोन

वरिंजनल पुणेकर नक्की करेल!!! बाकी सुज्ञास .......:D

विजुभाऊ's picture

23 Jul 2019 - 8:25 am | विजुभाऊ

कालच एक वाक्य वाचले.
जेथे सर्वच गाढवे असतात… तेथे कोणीच गाढव नसतो.
जेथे सर्वच विद्वान असतात …. तेथे कोणीच विद्वान नसतो.

स्नेहांकिता's picture

23 Jul 2019 - 3:16 pm | स्नेहांकिता

सहीच

जॉनविक्क's picture

24 Jul 2019 - 10:58 pm | जॉनविक्क

:D:D:D:D:D

Rajesh188's picture

18 Jul 2019 - 1:04 pm | Rajesh188

ज्या प्रसंगाने आपल्या जीवनावर directly किंवा indirectly परिणाम होतो त्या प्रसंगाचे कौतुक केले जात नाही .
आपल्या जीवनावर किंवा अस्तित्व वर ज्या घटनेचा बिलकुल परिणाम होत नाही त्याचे तोंड भरून कौतुक केले जाते .
कौतुक न करणे आणि अस्तित्व टिकवणे ( जी प्राणी मात्रचा गुण आहे)
ह्याचा जवळचा संबंध आहे

कुमार१'s picture

18 Jul 2019 - 3:12 pm | कुमार१

सुबोध व राजेश,
सहमत आहे.

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 11:37 am | कुमार१

अजून एकः

कुठल्याही बाबतीतले समानधर्मी लोक एकमेकांचे कौतुक करणे टाळतात. समजा, मी एक दुकानदार असेन तर मी एखाद्या खेळाडू वा कलाकाराचे कौतुक अगदी सहज करेन. पण्,माझ्यापेक्षा तिप्पट व्यवसाय असणार्‍या दुकानदाराचे नाही करणार.

कलाकारांच्या कौतुकाबद्दल असे दिसते की सामान्य माणूस ते अगदी सहज करेल पण, समीक्षक ही जमात ते सहजासहजी नाही करणार !

दुसर्‍याला चांगले म्हणायला मन मोठे लागते!

खोटे ठरो हिच इच्छा

लई भारी's picture

18 Jul 2019 - 4:54 pm | लई भारी

वेगळ्या विषयावर चांगलं लिहिलं आहे! अनुभव येतातच आणि आपण सुद्धा थोड्याफार प्रमाणात वागतो असं.
निर्भेळ कौतुक गरजेचं आहे.

दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही. उलट, त्या कृतीतून आपण निरोगी मनोवृत्ती दाखवतो

हेच लक्षात ठेवायला पाहिजे :-)

पाटीलबाबा's picture

18 Jul 2019 - 5:07 pm | पाटीलबाबा

कौतुक केल्याने माणूस शेफारतो,अस काही लोक म्हणतात.
आपल मत काय?


कौतुक केल्याने माणूस शेफारतो,अस काही लोक म्हणतात.>>

लेखात म्हटल्याप्रमाणे खोटे कौतुक नक्कीच नको.
पण, वाजवी कौतुक प्रसंगानुसार जरूर असावे.

चर्चेत सर्व सहभागींचे आभार आणि स्वागत !

शेखरमोघे's picture

18 Jul 2019 - 6:43 pm | शेखरमोघे

छान लिहलंय!!
"दुसऱ्याचे कौतुक न करणे’ किंवा अगदी केलेच तर ते हात राखून करणे".याचे मूळ कदाचित "मी चांगला कां तर इतर वाईट (किंवा नगण्य किंवा माझ्या इतकं कठीण काम न करणारे इ. इ.) आहेत म्हणून" अशा "मी" पण (अहं) दाखवण्याच्या प्रकारात असावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2019 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहंकार (ego) आणि स्वार्थ या दोन गोष्टी सर्व प्राण्यांच्या (आणि म्हणून मानवाच्याही) मूलभूत प्रवृत्ती आहेत.

मानवाच्या आस्तिवाच्या काही दशलक्ष वर्षांपैकी, बहुतांश कालावधीत याच प्रवृत्तींचा प्रभाव मानवावर होता. या प्रवृत्ती वैयक्तिक स्तरावर (आजच्या घडीला) जरी वाईत समजल्या जात असल्या तरी याच प्रवृत्ती कालाच्या ओघात मानवी जीवन तगून राहण्यासाठी उपयोगी/आवश्यक होत्या यात वाद नाही.

गेल्या मोजक्या काही हजार वर्षांमध्येच; स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, इत्यादी मनमोकळेपणे स्विकारणार्‍या उच्च विचारसरणीच्या संकल्पना निर्माण झाल्या आहेत आणि सभ्य समजल्या जाणार्‍या मानवी समाजात त्यांना जास्त जास्त मान्यता मिळत गेली आहे. मात्र, त्या मूळ मानवी स्वभावाचा भाग नसून, त्याचा चांगल्या दिशेने जडणघडण/वाटचाल (पक्शी : विकास) व्हावी यासाठी माणसांतील काही महामानवांनी निर्माण केलेल्या संकल्पना आहेत.

आपल्या अहंकार (ego) आणि स्वार्थावर विजय मिळवून दुसर्‍याच्या भल्याचे कौतुक करणे, किंबहुना दोन पावले पुढे जाऊन आप्तजन नसलेल्या दुसर्‍यालाही त्याच्या प्रगतीसाठी मदत करणे, या कृतींना आधुनिक समाजात वलय प्राप्त झाले आहे... जे समाजाच्या भल्यासाठी नक्कीच योग्य व चांगले आहे.

तेव्हा, त्या संकल्पनाना उघड उघड विरोध करणे सोईचे ठरत नाही. "आपल्या मनातील विचार लपविणे" ही विचारशक्तीची खास ताकद फक्त मानव या एकाच प्राण्यात विकसित झालेली आहे. मग, ती ताकद जमेस धरून मानवाच्या खालील कृती आस्तित्वात येतात :

१. दुसर्‍याचे मनापासून खरे कौतूक करणे.

२. मनात नाराजी बाळगत, पण लोकलज्जेस्तव उघडपणे 'मोठ्या मनाचा उत्तम अभिनय' करत कौतूक करणे.

३. मनात नाराजी बाळगून, पण लोकलज्जेस्तव उघडपणे केवळ एक औपचारिकता म्हणून कौतूक करणे.

४. लोकांची फिकीर न करता, मनातली नाराजी दिसेल असे उघडपणे कौतूक करणे.

५. लोकांची फिकीर न करता कौतूक करण्याचे टाळणे.

६. फारच किचकट मनाची माणसे अजूनही काही प्रकार शोधून काढू शकतात. (उदा : वरच्या एका प्रतिसादात आलेले, 'कौतूक केल्याने माणूस बिघडतो', हे कौतूक न करण्यासाठीचे चलाख कारण शोधून काढणे !) :)

या कृतींमध्ये दर वेळेस सुसुत्रता असेलच असे नाही. प्रत्येक घटनेमध्ये असलेल्या व्यक्ती (स्वतः आणि त्यावेळच्या इतर व्यक्ती), वेळ आणि जागा यावर अवलंबून वेगवेगळी कृती होऊ शकते... होते. वरच्या पैकी कोणती कृती केली जाईल, हे खालील गोष्टींवर अवलंबून आहे:

१. अहंकार (ego), स्वार्थ आणि वर लिहिलेल्या उच्च संकल्पनांसंबंधात असलेली/विकसित झालेली; कृती करणार्‍या व्यक्तीची मनोवस्था.

२. व्यक्त होणार्‍या वरच्या प्रत्येक प्रकारांने होणारे फायदे-तोटे आणि ते सहन करण्यासंबंधीची धोकाप्रतिबंधक/धोका स्विकारण्याची; कृती करणार्‍या व्यक्तीची तयारी.

उदा :

१. मुलाच्या लहानसहान यशाचे फारसे कौतून न करणारी (किंबहुना नाराजीच व्यक्त करणारी) व्यक्ती, ऑफिसात बॉसच्या लहानसहान यशाची तोंडभरून (किंवा कमीत कमी तोंडदेखली/फॉर्मल) स्तुती करेल.

२. घरातील वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्याबद्दल स्वतःच्या मुलांवर राग राग करणारी व्यक्ती, ऑफिसात बॉसवर आगपाखड सोडाच पण नुसता नाराजीचा सूरही लावण्याचे धाडस करणार नाही .

इथं कितीतरी फुटखळ धागे धागा लेखकाच्या नावामुळे प्रतिसादांनी सजले आहेत आणि दर्जेदार लेखनाकडे कोणी फिरकलेलंही नाही कारण अजून ते लेखक ओळखीचा चेहरा बनले न्हवते. लोकांना कौतुक कशाचं असावं हे सांगायचा कोणाला अधिकार नाही म्हणूनच फक्त हि गोष्ट मनाला खटकत नाही :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jul 2019 - 1:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

मलाही हा फरक जाणवला आहे.

हेच बघा ना, मी इथे मिपावर एवढ्या उत्कृष्ठ, दर्जेदार आणि उच्च वाड्मयीन मुल्ये असलेल्या कविता (विडंबने) पाडल्या आहेत, पण माझ्या नशीबी सगळे मिळून जेवढे प्रतिसाद आले आहेत तेवढे काही सो कॉल्ड नामवंत लोक एकाच फालतु धाग्यावर मिळवतात तेव्हा मनाला अत्यंत क्लेश होतात.

मी कणखर आहे म्हणूनच या सगळ्या कडे दुर्लक्ष करत आपली प्रतिभा जोपासतो आहे, एखाद्या कमकुवत कोमल हृदयाच्या कवीने केव्हाच लेखन संन्यास घेतला असता.

पैजारबुवा,

यशोधरा's picture

19 Jul 2019 - 1:25 pm | यशोधरा

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2019 - 1:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

नैतर काय ! आपल्या (म्हणजे तुमच्या आणि माझ्या) सोशिकतेचे कोणालाच कायपण सोयर सुतक नाही. :(
पूर्वी हे जग असे नव्हते (नाही का?) :)

(सो कॉल्ड धागापाडू लेखकूंमुळे झालेला) बेजारबुवा

(हघ्याहेवेसांन)

जॉनविक्क's picture

19 Jul 2019 - 3:32 pm | जॉनविक्क

पण आपल्यासारख्या लोकांवर घडलेल्या अन्यायाला वाचा फोडायची माझी इच्छा न्हवती. पण आपण आलेलं भरत आवरते घेऊ नका एक सेपरेट धागा टँका योग्य असेल नक्कीच समर्थन देऊ

कुमार१'s picture

18 Jul 2019 - 8:17 pm | कुमार१

नेहमीप्रमाणेच छान विश्लेषण !
धन्यवाद

फेरफटका's picture

18 Jul 2019 - 8:30 pm | फेरफटका

कौतुक करणं आणी स्विकारणं ह्या दोन्ही बाबी विशेषत्वानं शिकाव्या लागतात. त्यातून आपल्याकडे कौतुक करायची पद्धतच नसल्यामुळे ('कधीही कुणाच्या तोंडावर कौतुक करू नये', 'उगाच कौतुक करून शेफारून ठेवू नये', 'ह्यात कौतुक करण्यासारखं काय आहे, ते तर कर्तव्यच होतं त्याचं', 'नस्ती कौतुकं नाही आपल्याला जमत' ई. ई.), ते
ग्रेसफुली स्विकारावं कसं हे सुद्धा माहीत नसतं. त्यामुळे जर कधी असा प्रसंग आलाच, तर प्रचंड awkward परिस्थिती निर्माण होते. उदा. 'अरे त्यात काय एव्हढं', 'हे सगळ्यांचं टीम-वर्क आहे', 'इश्वराची / आई-वडिलांची कृपा' ई. ई. खरं तर अशा वेळी फक्त 'थँक यू' म्हणावं, पण तसं घडत नाही.

सुबोध खरे's picture

18 Jul 2019 - 8:40 pm | सुबोध खरे

If you want to destroy a person praise him no end.
लष्करात म्हण आहे कि एखाद्या माणसाला खड्ड्यात घालायचे असेल तर त्याची बेसुमार तारीफ करा.( ज्यामुळे त्याचा अहंगंड -ego इतका वाढतो कि त्याचा ऱ्हास सुरु होतो)

वीणा३'s picture

18 Jul 2019 - 9:19 pm | वीणा३

बरेचदा माणसं सुपीरियर इन्फिरियर (अहंभाव न्यूनगंड?) भावाने जगत असतात. एकतर कोणापेक्षा श्रेष्ठ आहोत -
१. आमच्या सारखी पुरणपोळी (चिकन किंवा कुठलाही पदार्थ )जगात कुठे खाल्ली नसशील
२. आम्ही महिन्याला क्ष रुपये फळांवर (हॉटेल वर , फिरण्या वर ) खर्च करतोच
३. माझ्या मुलाला क्ष पगार मिळतो , क्ष कंपनीत क्ष पोस्ट वर आहे, २-४ फ्लॅट आहेत इ इ

कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त चांगल काही करत असेल तर न्यूनगंड
१. त्यांची पुरणपोळी बरी असते, बदामाची पावडर घालतात. वाईट कशाला होईल.
२. ते सारखे भटकतंच असतात, आम्ही बाबा वर्षातून एक-दोन वेळच जातो, सारखं सारखं काय भटकायचं .
३. हो त्यांचा मुलगा कुठल्यातरी पोस्ट ला आहे कुठल्यातरी कंपनी मध्ये पण खूप सिगरेट पितो म्हणे, आणि खूप उशिरा पण थांबायला लागत, माझा मुलगा लवकर घरी येतो

या दोन्ही उदाहरणात तुम्ही साधं बोलू शकता -
आमच्या घरची पुरणपोळी चॅन होते, मला आवडते, तू पण नक्की खाऊन बघ. किंवा हो आम्ही आम्हाला जेव्हा जस जमेल - आवडेल तसं फिरायला जातो किंवा फळं आणतो. ते त्यांना जमेल आवडेल ते करतात.

लोकांना समभावाने जगता आलं तर दुसऱ्याच कौतुक करणं सहज शक्य होईल. तरच स्वतःच्या झोपडीत श्रीमंत माणूस आला किंवा स्वतःच्या महालात भिकारी आला तरी त्यांच्याबरोबर साधं माणुसकीने वागणं शक्य होईल कदाचित. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे स्वतःच आयुष्य तुलना न केल्याने कायमच छान वाटेल.

बाकी ते जास्त कौतुक केल्याने शेफारतात हे मुलांच्या बाबतीत असा ऐकलंय "आई वडिलांनी स्वतःच्या मुलांचं जास्त कौतुक करू नये ती शेफारतात "

नाखु's picture

18 Jul 2019 - 9:20 pm | नाखु

कौतुक केले तर आपण त्याच्या पेक्षा ( ज्याचं कौतुक केले आहे) कम अस्सल, आहे उणीव असलेले आहोत हा भयगंड निर्माण होणं आणि असूया ( यालाच कसे हे यश मिळाले) असं ज्या घरातील ज्येष्ठ सदस्य अंगिकार करतात त्या बालकांना स्वकौतुकाची आणि इतरांना सतत अदखलपात्र करण्याची शिकवण आपसूकच मिळते,बाकी इतर बाबी ते आपसूकच जोपासतात

चांगल्या ला चांगल म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला वाचकांचीच पत्रेवाला नाखु

वचने किं दरिद्रता

बिंधास्त कौतुक करायचे. ..

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 8:02 am | कुमार१

वरील सर्व सदस्यांनी विविध मुद्दे मांडून समतोल चर्चा केल्याबद्दल मनापासून आभार !

सुधीर कांदळकर's picture

19 Jul 2019 - 9:09 am | सुधीर कांदळकर

४८ गुण मिळाले तरी ५०/५० का नाही म्हणून गुरकावत.

वर म्हटल्याप्रमाणे आपणा सर्वांच्याच अंगी असलेला हा गुणधर्म आहे.

आपन नायबा आणि अख्खा बोकड खायबा

म्हणजे खरे असले तरी मी त्यातला नाही. (ह. घ्या.)

भारताच्या एका पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेत बसलेले एक माजी पंतप्रधान ( बाकी सारे टाळ्या वाजवत असताना) हाताची घडी घालून व मख्ख चेहरा करून बसल्याचे दृश्य आपण दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी पाहिले

हे मख्खोजीराव कोण?

तरीही ते जर कर्तृत्त्ववान असतील तर भारताचा प्रदेश गमावणार्‍या कोणत्याही बावळट पंतप्रधानापेक्षा तेच बरे.

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 9:22 am | कुमार१
हे मख्खोजीराव कोण?

तुम्हीच ओळखा ! सध्याचे व त्यामागचे नाहीत एवढेच सांगतो.
व्यक्ती जाऊद्या, वृत्ती दिसून आली.
☺️

चौकटराजा's picture

19 Jul 2019 - 9:34 am | चौकटराजा

मी एक कौतुक करण्याची जन्मसिद्ध देणगी लाभलेला प्राणी आहे . प्रथम सहाजिकच माझया या विशेषांचे मला कवतिक आहे . याची दुसरी बाजू म्हणजे उणे कवतिक वृत्ती ही देखील माझ्यात तितकीच तीव्र आहे. अर्थात मला त्याबद्दलही स्वतः: चे कवतिक वाटते .वर ज्यांनी ज्यांनी यात आपली भर टाकली ,त्यांचे प्रथम मी कौतुक करतो . अगदी कौतुक केल्याने माणूस शेफारतो या उक्तीसकट . ( आचरेकरांनी कौतुक केले नाही असे सचिन व कांबळी दोघेही म्हणून गेलेत त्याचे कारण असेच असावे का ? ) मी नेहमी माझ्या मुलीशी प्रेम या विषयावर चर्चा करीत असताना प्रेमाचा सर्वोत्तम अविष्कार म्हणजे कौतूक असे म्हणतो . काळजी हा प्रेम विशेषांपेक्षा मला कौतुक महत्वाचे वाटते . काळजीत काहीसा नातेसंबंधाचा भाग येतो पण कौतुक हे कुणाबद्दल व कशाबद्दल ही असू शकते .वरील एक उल्लेख मला महत्वाचा वाटतो तो असा की आपल्या जीवनावर विशेष परिमाण न करणाऱ्या गोष्टी बद्दल आपल्याला कौतूक कमी असते हे अगदी खरे आहे .नॉन प्रॉक्झीमीटी इफेक्ट . दुसरे असे की ज्या गोष्टीत आपल्याला रस नसतो , ज्ञान नसते त्याबद्दल ही आपल्याला कौतुक नसते . तसे ज्ञान व रस नसेल तर उणे कौतुक ही कमी असते . उदा मला स्वरातील लगावाचे ज्ञान व रस नसेल तर मी वाह ! असे म्हणणार नाही तसा " काय बेसूर गातोय ! " असेही म्हणणार नाही .

आता काही लोकांच्यात उणे कौतुकाची प्रवृत्ती असते . माझा एक नातेवाईक आहे . त्याला आपण म्हणले ना की मी अमुक फ्रीझ घेतला आहे की त्याचे पहिले वाक्य असे असते " तमुक कंपंनी बेक्कार आहे " भीमसेन जोशी यांच्या गायनाचे कौतुक न करता त्यांनी दोन बायका केल्या व ते दारुडे होते असे उणे कौतुक करणारे ही मी पाहिलेत .

तात्पर्य -- कौतूक करणे ही एक श्रीमंती आहे जी अशी सहजासहजी प्राप्त होत नाही . " जिन को मुहब्बत मिल जाती है , वह किस्मतवाले होते है , लेकिन जो मुहब्बत करते है वह उससे भी ज्यादा किस्मतवाले होते है !

जेम्स वांड's picture

19 Jul 2019 - 10:04 am | जेम्स वांड

पण मी आत्ताच दोन रेसिपी धाग्यांवर जे चूक वाटलं ते तसं नमूद करून आलोय , फीलिंग लैच गिल्टी!.

अभ्या..'s picture

19 Jul 2019 - 12:16 pm | अभ्या..

ह्या, गिल्टी बिल्टी काय नाय वाटून घ्यायचं. वाटतं ते बिनधास्त बोलायचं. कौतुकच करु वाटलं तरी दिलखुलास करायचं, मापंही दिलखुलास काढायची. एकूणच वाटतं त्याला प्रामाणिक राहायचं. कृत्रिम काय नाय करायचं. सुपर आणि स्वीट असल्या कौतुकाची उधळण कॅन्डीक्रश पण करतं. मिनटामिनटाला करतं.
मी आधी जिथं नोकरी करायचो तिथं एक क्लायंट यायचा. बोलणं राहणं सगळं कसं डिसेन्ट. जॉब त्याच्यासमोर आम्ही करत बसलेलो असायचो. एकतर कुठल्याही डिझायनरला मागे कुणी उभं असलं की अस्वस्थ होतं. त्यात हा गडी मागे बसून आम्ही नुसता फॉन्ट बदलला की "सुपर". कलर बदलला की "परफेक्ट", साईज जरा बदलली की "ग्रेट" अशा कौतुकाची उधळण करत बसायचा. ते ऑकवर्ड व्हायचं आमाला. बरं सगळा रेडी जॉब झाला की नमनालाच अर्धा तास कौतुक. आणि मग हळूच हा कलर नको, असा फोन्ट नको अशा तक्रारी सुरु व्हायच्या. एकदा त्याला तोंडावर म्हणले "हा फॉन्ट बदलला त्या वेळी तर तुम्ही "परफेक्ट सिलेक्शन" अशी दाद दिलेली. मग नंतर त्याचे प्रमाण कमी झाले पण असली तोंडदेखली कौतुक करणारी आणि आपण फार सिस्टिमॅटिकली मोटिव्हेट करत आहोत असला आव आणणारी पब्लिक परत कधीच भेटू नये असे वाटते हेही खरे.

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 11:04 am | कुमार१

चौरा, छान प्रतिसाद !

तुमच्या त्या मोहब्बतच्या वाक्यावरून रत्नाकर मतकरींचे वाक्य आठवले,

" आपण (दुसऱ्याच्या) पाठीवर ठेवलेला हात आणि आपल्या पाठीवर ठेवलेला हात या दोन्हींत महदंतर असते".

जेम्स,
समतोल असण्याबद्दल सहमत.

चौकटराजा's picture

19 Jul 2019 - 1:46 pm | चौकटराजा

आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपले पुरेसे कौतुक होत नाही अशी भावना आपल्याला होते व नैराश्य येते . अशासाठी मी अशी एक विचारधारा मांडत असतो ...ती सर्वानाच उपयुक्त ठरावी ..

समजा मी इंद्रधनू आहे व समोरचा माणूस मला पाहूनही मख्ख आहे ..
शक्यता १ -- तो आंधळा आहे .
शक्यता २ -- तो आंधळा नाही पण रंगांधळा आहे .
शक्यता ३ - तो आंधळा नाही , रंगांधळा नाही त्याला मी इंद्रधनू आहे हे कळतेय पण वा किती सुंदर हे म्हणायाचे मोठेपणा त्याच्यात नाही.
शक्यता ४- मी इंद्रधनू आहे हे माझे ज्ञान च चुकीचे आहे.

योग्य वेळी कौतुक करणे जमलं पाहिजे ती स्किल आहे पण ह्यात भावनेला थारा नाही .
"योग्य वेळी "ह्या शब्दाचा अर्थ चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेल.
प्राणी सुद्धा आपल्याला हवे तसे वागतात जेव्हा आपण त्यांचं आपल्या
ला अपेक्षित काम केलं की कौतुक केल्यावर .
तर माणूस काय चीज आहे एकदम आडमुठे माणसाला सुध्दा आपण आपल्या ला हवे तसे वागवू शकतो कौतुक करून .

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jul 2019 - 11:50 am | प्रकाश घाटपांडे

तोंडदेखल कौतुक करण्यापेक्षा न केलेल बर अस मला वाटत. कारण त्या तोंडदेखल कौतुकात कृत्रिमपणा आहे. जेव्हा दिलखुलास दाद द्यावीशी वाटते त्यावेळी ती जरुर द्यावी. पुर्वी मला कुणी कौतुक केल की शंका वाटायची. यात उपहास तर दडला नाही ना? हल्ली मात्र जरा कौतुक केल की बर वाटत व मी हि इतरांच कौतुक करतो
'न गुणी गुणीनं वेत्ति, गुणी गुणीषु मत्सरी।
गुणीच गुणिरागीच, सरलो विरलो जनः॥

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jul 2019 - 11:54 am | प्रकाश घाटपांडे

पुलंचे प्रा.येरकुंठवार आठवले.

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 12:15 pm | कुमार१

प्रकाश,
सुभाषित छान !

** पुलंचे प्रा.येरकुंठवार>>>

याबद्दल आठवत नाही. थोडं सांगता का ?

प्रकाश घाटपांडे's picture

19 Jul 2019 - 12:56 pm | प्रकाश घाटपांडे

तुम्हाला कोण व्हायचय? पुणेकर मुंबईकर कि नागपुरकर या पुलंच्य कार्यक्रमात पहा 10.46 पासून
https://youtu.be/FVWdAx1a0y0

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 1:25 pm | कुमार१

धन्यवाद,

सवडीने पाहतो आता.
त्यातले या ३ शहरांबद्दलचे हे वाक्य आठवतंय :

" महाराष्ट्रात शहरे जरी अनेक असली तरी ज्यांच्यापुढे कर जोडावेत अशी मात्र ही तीनच…"

दुसऱ्यांचे चांगल्या कामांचे कौतुक न करण्यामागे फक्त एकच कारण असतें ते म्हणजे एखाद्याने केलेली अचिव्हमेंट खुल्या मनाने ना स्वीकारणे. त्याने किंवा तिने ती गोष्ट मिळवलीच कशी हा प्रश्न त्यांना आतून खात असतो. पण बहुतांश वेळेला ती अचिव्हमेंट स्वतः मिळवण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते घेण्याची तयारी पण त्यांच्याकडे नसते.

स्वतःच कौतुक स्वतः कधीच दुसऱ्या समोर करू नये कोणही तुमच्या वर विश्वास ठेवत नाही .
आणि त्याचा खूप तोटा होता .
पण दुसऱ्याचे कौतुक वेळ पाहून करावे फायदाच फायदा होतो .
स्तुती चा जो परिणाम होतो तसाच रागाचं पण होतो स्तुती ऐकून आणि द्वेशात माणूस विचार शक्ती हरवून बसतो आणि आपल्याला हवी तीच चूक करतो

चंद्र.शेखर's picture

19 Jul 2019 - 3:19 pm | चंद्र.शेखर

वेगळ्या विषयावरचा छान लेख आणि प्रतिसाद सुद्धा.
कधी कधी जवळच्या/आवडणाऱ्या व्यक्तीच्या काही बाबींंवर कौतुक करण्याचं हेतुपुरस्कर टाळलं जातं, हिशेब चुकता करायचा हेतू सुद्धा असतो बरेच वेळा. 'कौतुक न करणं' हे हत्यार जाणीवपूर्वक वापरलं जातय. आता आठवण करून दिलीत तर बघू काही बदल करता येतोय का

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 3:35 pm | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

हे मुद्दे विशेष भावले :

* वाटतं ते बिनधास्त बोलायचं. कौतुकच करु वाटलं तरी दिलखुलास करायचं.

* कौतुक न करण्यामागे फक्त एकच कारण असतें ते म्हणजे एखाद्याने केलेली अचिव्हमेंट खुल्या मनाने ना स्वीकारणे

* कौतुक करण्याचं हेतुपुरस्कर टाळलं जातं, हिशेब चुकता करायचा हेतू सुद्धा असतो बरेच वेळा. 'कौतुक न करणं' हे हत्यार जाणीवपूर्वक वापरलं जातय.

वकील साहेब's picture

20 Jul 2019 - 8:19 am | वकील साहेब

मानवी मन, त्याचा स्वभाव आणि त्याची कौतुक या विषयाप्रसंगी येणारी स्वाभाविक प्रतिक्रिया यावरील लेख आणि प्रतिक्रिया फारच सुरेख आहेत. यावरूनच एक आठवण
महाराष्ट्राचे दिवंगत नेते आर. आर. पाटील हे या मानवी स्वभाव वैशिष्ठ्यांचा राजकारणासाठी फार सुरेख वापर करत.
म्हणजे असे की, त्यांना अ ची खरी खबरबात काढायची आहे. तर ते त्या बाबत सरळ अ ला नाही विचारणार. ब हा जो अ चा प्रतिस्पर्धी आहे त्याच्या पुढे अ ची मुद्दामहून स्तुती करणार. जसे की, "अ ला झेडपी च्या इलेक्शन मध्ये चांगलं यश मिळालं ना?" तर ब म्हणणार "कसलं काय साहेब, त्या इलेक्शन मधी तर.........."
अशा प्रकारे पाटील साहेबांना हवी ती माहिती आपसूक मिळून जायची.

कुमार१'s picture

20 Jul 2019 - 9:09 am | कुमार१

वकीलसाहेब,

धन्यवाद ! वरील प्रतिसादाच्या निमित्ताने तुम्ही एका दिलखुलास व्यक्तीची आठवण करून दिलीत. त्यांची राजकीय वाटचाल कौतुकास्पद होती.

@कुमार, लेख - चर्चा दोन्ही कौतुकास्पद :-)

योग्य कौतुक करणे आणि दुसऱ्यांनी केलेल्या कौतुकाचा ग्रेसफुली स्वीकार करणे दोन्ही गोष्टी 'शिकाव्या' लागतात असे माझे मत. प्रयत्नांनी जमते.

कौतुक खरे की खोटे, मनापासून की तोंडदेखले, कौतुकच की चापलुसी हे समजायलाही फार वेळ लागत नाही, ते उघड कळून येते. problem is we see and hear what we want to !

स्वतःपुरते एक करतो - खोटी स्तुती करत नाही आणि सरसकट वाहवा टाळतो. म्हणजे 'तू आहेचस हुश्शार' असे न म्हणता 'ह्या कामात छानच हुशारी दाखवलीस, वा !' अशा कौतुकाचा मी पुरस्कर्ता आहे. कौतुक करण्यात स्वतः थोडा कृपण असल्याची भावना आहे. माझे सहकारी, मित्र, घरची मंडळी माझ्या कौतुकाच्या बावन्नकशीपणाबद्दल आश्वस्त असतात (आडून आडून स्वतःचे कौतुक कसे करावे हे समजले ना :-)))

ह्याच्या विपरीत -

चांगले म्हणण्यासारखे - कौतुक करण्यासारखे काही नसेल तर गप्प बसावे, निंदा करू नये असा अलिखित नियम घरात लहानपणापासून बघितला आहे, तो आपसूकच पाळल्या जातो.

अनिंद्य

कुमार१'s picture

20 Jul 2019 - 11:24 am | कुमार१

अनिंद्य,
धन्यवाद व सहमती.

कौतुक करण्यासारखे काही नसेल तर गप्प बसावे, निंदा करू नये असा अलिखित नियम घरात लहानपणापासून बघितला आहे, तो आपसूकच पाळल्या जातो.
>>>>

याला शंभर टक्के सहमती, छान !

अभ्या..'s picture

20 Jul 2019 - 11:34 am | अभ्या..

कौतुकाचे नियम संसारात वेगळे असतात एवढे बोलून मी माझे पाच शब्द संपवतो. जयहिंद जयमहाराष्ट्र.
.
सुखी संसारी अभ्या..

खिलजि's picture

20 Jul 2019 - 3:56 pm | खिलजि

मी काही सांगू इच्छितो .. मला वाटत , याची बीजे आपल्या घरातच रोवली जातात कदाचित येनकेनप्रकारे .. जरी मुले त्यांच्या आईबापाला सामान असली तरी त्यातील जो कुणी उजवा असतो त्याचेच गोडवे गायले जातात .. अर्थात त्यामागे कदाचित हेतू दुसर्र्या मुलाला दुखावण्याचा नसतो तर जो नाव काढतोय त्याला कौतुक सोहळा प्रदान करण्याचा असतो .. पण नकळत त्याच्या कौतुकाचे दुसऱ्यावर वाईट परिणाम होत असतात .. तो सतत स्वतःला कमी लेखत जातो आणि नकळतपणे दुसर्याबद्दल द्वेष वाढीला लागतो . हा द्वेष जर आईबापच कमी करू शकले तर ते शक्य आहे .. माझ्या घरात घडलेले मी उदाहरण समोर ठेवतो .. मला दोन मुले आहेत , सोहम ( वय ११ ) आणि अंशुमान ( वय ५ ) .. सोहम थोडासा वेंधळा आणि धसमुसळा आहे .. अभ्यासात ठीक प्रगती आहे .. माझ्या कधीच जास्त अपेक्षा नव्हत्या आणि पुढेही नसतील . इनफॅक्ट मी ते दोघांनाही तसे सांगतो .. अभ्यासाचे टेन्शन बिलकुल घ्यायचे नाही .. बोर्डात नाही आलात तरी चालेल , चांगले मार्क्स नाही पडले तरी चालतील पण कधी नापास होऊ नका ..पोटापुरते मार्क्स मिळवा. बायको एकदम विरुध्ध .. तिला तिच्या दोन्ही मुलांनी अभ्यासात चांगलं असावं असं मनोमन वाटत .. तिच्या बर्याचश्या पॆक्षा अंशुमान पूर्ण करतो .. नेहेमी सतार घेऊन येणे , काहीतरी चांगले रिमार्क असे सतत काहिनाखाई चालू असते .. या सर्व घडामोडीमध्ये आम्ही सोहमला बऱ्याच क्षेत्रात मदत करून बघितली .. उदा , पहिले गिटार क्लासेस , नंतर क्षत्रिय गायनाचे क्लासेस , आणि आता सध्या साहेब गायन आणि फ़ुटबाँलमध्ये स्थिरावले आहेत असे वाटतेय .. पण अंशुमान हा मात्र हिरा आहे .. त्याला अजूनपर्यंत कुठेही आम्ही शिकायला घातलेले नाही तरी पठ्ठ्या शाळेत गाणी , नाच आणि अभ्यास यामध्ये चमकतोय .. बायको आता वैतागून सोहमला सतत त्याचे उदाहरण देत असते .. सध्या तो त्याचा भरपूर राग करतो .. यामध्ये माझी मात्र कुचंबणा होतेय . कारण सोहमला , मी त्याचे लाड केलेलं बिलकुल आवडत नाहीत .. मी सध्या त्याला त्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय पण कितपत यश येईल ते माहित नाही .. अंशुमान आपल्या हातावर मिळालेले सतार मी लॅबमधून येईपर्यंत असेच हातावर ठेऊन देतो , का तर मला दाखवायचे आहेत म्हणून .. मी ते बघतो पण सोहम असेलत तर थोडेसे गुणगान करून त्याला दादालाही दाखवायला सांगतो .. सध्या तरी सोहम यातून थोडा बाहेर पडतोय .. त्याला मी सांगतो ते समजते पण अजून अमलात आणायचे बाकी आहे . पूर्णपणे जेव्हा अमलात आणेल तेव्हाच तो या षड्रिपूवर मात करू शकेल ...

तुमचा स्वतःचा दृष्टीकोण जास्त मोकळा आहे असं जाणवतंय. तुमच्या मुलाला तुमचा एकट्याचा सहवास जास्तीत जास्त लाभेल असं पहा. त्याची मानसिक ओढाताण आपोआप कमी होत जाईल.

" सतार" स्टार वाचा "काहिनाखाई " काहीनाकाही "क्षत्रिय" शास्त्रीय

कुमार१'s picture

20 Jul 2019 - 4:25 pm | कुमार१

खिलजी, धन्यवाद
तुम्ही मोकळेपणाने कौटुंबिक वस्तुस्थिती लिहिलीत हे विशेष.

त्यातील जो कुणी उजवा असतो त्याचेच गोडवे गायले जातात

.
.>>>>

अगदी अगदी. बऱ्याच कुटुंबांत हे पाहिले आहे.

बाकी ते 'सतारी' चे स्पष्टीकरण आवश्यकच होते.
☺️

Chandu's picture

20 Jul 2019 - 5:51 pm | Chandu

कौतुक आणि स्तुती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत .कौतुक हे व्यक्तीचे केले जाते. त्यावेळेस त्या व्यक्तीने काहीतरी अचीवमेंट केलेली असते स्तुती ही थोडी वेगळी गोष्ट
आहे .स्तुती करणारा आणि करून घेणारा यांच्या परस्पर संबंधावर स्तुती चे प्रमाण अवलंबून असते .कौतुक ही भावना आहे तर स्तुती ही कृती आहे .आई-वडिलांना मुलाचे, पती-पत्नीला एकमेकांचे कौतुक असते ,परंतु ते वारंवार एकमेकांची समोर किंवा पश्चात स्तुती करत नाहीत .
मला वाटते धागा लेखका ला कौतुक म्हणजेappreciation म्हणावयाचे असावे .हे त्याच क्षणी तोंडावर केले म्हणजे केले आहे त्यालाachievment ची पोचपावती मिळाल्यासारखे वाटते .अशी पोच किंवा दाद देणे हे चांगल्या रिवा जा चे लक्षण होय .असे न करणे योग्य संस्काराचा अभाव ,असे मला वाटते. शेवटी कौतुक करणे हा अभिव्यक्तीचा भाग आहे. बऱ्याच जणांना अभिव्यक्ती व्यवस्थित करता येत नाही, याचा अर्थ त्यांना कौतुक नसते असा नाही

कुमार१'s picture

20 Jul 2019 - 6:03 pm | कुमार१

*

कौतुक आणि स्तुती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत
* मला वाटते धागा लेखका ला कौतुक म्हणजेappreciation म्हणावयाचे असावे .

>>>>
अगदी बरोबर.

कौतुकाची पहिली पायरी म्हणजे 'दखल घेणे'. निदान एवढे केले तरी ती चांगली कृती ठरते.

समर्पक प्रतिसाद, आवडला.

नाखु's picture

20 Jul 2019 - 9:28 pm | नाखु

आमच्या सारख्या विडंबकांच्या अदखलपात्र कविता आठवल्या,पै बुवांच्या दुःखात सहभागी असलेला सहप्रवासी वाचकांची पत्रेवाला नाखु.

अगदी अगदी नाखु काका

एव्हढ्या विडम्बविता केल्या परंतु एखादा कौतुकाटाक्ष मिळायची देखील मारामार !

डॉ. साहेब, तुमच्या ह्या लेखावरून प्रेर्ना घेऊन मी घरी अर्धबरीचे कौतुक केले तर कळतात बरं मला टोमणे असा अभिप्राय मिळाला.

आता काय करावे?

आनन्दा's picture

21 Jul 2019 - 12:15 pm | आनन्दा

दर्दभरी कहाणी

सार्वजनिक व्यासपीठ,ठिकाण,ह्या ठिकाणी एकध्या व्यक्तीच्या कार्याविषयी चांगले बोलणे हे कौतुक असे मला वाटत आणि अशा ठिकाणी मर्यादित शब्दांचा रीत म्हणून वापर केला जातो .
अती कौतुक झाले तर बाकी मंडळी दुरवण्याची भीती असते .
खासगी मध्ये जे समोरच्या व्यक्ती समोर बोलले जाते ह्याला स्तुती म्हणता येईल आणि इथे अमर्याद चांगले शब्द वापरले जातात

कुमार१'s picture

21 Jul 2019 - 6:37 am | कुमार१

चामुंडराय,

अर्धबरी >>> हे ' अर्धांगिनी' असे हवे ना ?
या नात्यातील संवाद हा एक वेगळाच प्रांत आहे राव ! ☺️

राजेश, + १

जेम्स वांड's picture

21 Jul 2019 - 9:14 am | जेम्स वांड

अर्धबरी = बेटर हाफ

Crying with Laughter

कुमार१'s picture

21 Jul 2019 - 9:18 am | कुमार१

मग एकदम चिकनं भाषांतर, कौतुक स्वीकारावे ! ☺️

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2019 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा (कौतुकभरा) टोमणा त्यांना समजला (असावा). =)) =))

नाखु's picture

21 Jul 2019 - 6:22 pm | नाखु

परिस्थिती"बरी" नसताना हा कौतुक सोहळा केला असेल
तर अर्धा काय पूर्ण च संशयास्पद वर्तन !!!

तस्मात् हा एक उपाय परिस्थिती आणि व्यक्तिसापेक्ष आहे

खुलाशातील खलाशी पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

सुधीर कांदळकर's picture

21 Jul 2019 - 8:04 am | सुधीर कांदळकर

१. आमच्या काळातल्या स्त्रिया मुली यात सौ. पण आली - अभिनेत्र्या हेलनचा आणि रेखाचा भरपूर द्वेष करीत. त्याच स्त्रियांना आता या दोघींचेही कौतुक वाटते.

२. मुंबईत मालाड पश्चिम, ठाण्याला स्टेशनजवळ असे काही मजूर बाजार आहेत. तिथे इमारत बांधकामावरील गवंडी, बिगारी, प्लॅस्टरकार, सुतार, इ. विविध प्रकारचे मजूर सकाळपासून उभे असतात. लोक येतात आणि हवे ते मजूर घेऊन जातात. काहींना काम मिळते काहींना नाही. बेकारांपैकी काही गुत्त्यावर जातात तर काही सिनेमा थिएटरमध्ये. एकदा असाच एका गचाळ बकाल विभागात कश्मीर की कली पाहायला गेलो होतो. गाणे सुरू झाले की लोक कौतुकाने नाणी फेकत. सिनेमा संपल्यावर डोअरकीपर्स ते )कौतुकाने?) उचलून घेत. हे नाणी फेकणारे लोक बेकार मजूर होते. तेव्हा पाचसात रुपयांचे तिकीट घेऊन आलेले हे लोक आठ आणे रुपया फेकीत.

कुमार१'s picture

21 Jul 2019 - 9:29 am | कुमार१

सुधीर,

तुमच्या पहिल्या निरीक्षणातून मला असे वाटते:

१. जसे आपले वय वाढते तशा आपल्या मनातील 'कौतुकमूर्ती' देखील बदलत असाव्यात.

२. तरुणपणी काही प्रकारच्या माणसांचे जास्त करून (आपल्या मते) दोषच आपण बघत असतो. मध्यम वयानंतर याची तीव्रता कमी होते आणि आपण त्यांच्याकडे तटस्थपणे पाहू लागतो. किंवा,

एखाद्यात काहीतरी चांगले गुण असल्याशिवाय तो यशस्वी होत नाही, हे आपल्याला पटते.

वकील साहेब's picture

21 Jul 2019 - 5:42 pm | वकील साहेब

एकाच कॅनव्हासवर अनेक रंगांच्या अनेक रेषा असतात. त्यापैकी कोणत्याही एका रंगाची एखादी रेष तशाच रंगाच्या अन्य रेषेशी मनातल्या मनात स्पर्धा करत असते. मात्र त्याच कॅनव्हासवरील अन्य रंगांच्या रेषेशी तिची स्पर्धा अजिबात नसते. मग होत काय की, अन्य रंगांच्या रेषेची लांबी वाढली तरी या रेषेला त्याने काहीही फरक पडत नाही. पण तिच्याच रंगाच्या दुसऱ्या रेषेशी लांबी वाढली की, आपोआपच या रेषेशी लांबी कमी भासते. ते या रेषेला रुचत नाही. पण म्हणून त्यासाठी दुसऱ्या रेषेची लांबी कमी करावी हेही मनाला पटत नाही. शक्य झालंच तर आपली लांबी वाढवावी ही मनाची उदारता तिच्या अंगी असते. पण म्हणून प्रतिस्पर्धी रेषेचे कौतुक आपणच करावे हे ही काही तिच्या मनाला पटत नाही. म्हणून ती प्रतिस्पर्धी रेषेचं कौतुक करायचं आवर्जून टाळते.
तेच दुसऱ्या रंगाच्या रेषेची लांबी वाढली जरी तरी त्याने या रेषेची लांबी काही कमी भासणार नसते. म्हणून ती त्या रेषेचं मात्र मुक्त हस्ते कौतुक करते.

कुमार१'s picture

22 Jul 2019 - 8:37 am | कुमार१

सर्व सहभागींचे निकोप, समतोल चर्चेबद्दल आभार !

चर्चेत विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श झाला. एखाद्याच्या चांगल्या कृतीस दाद द्यावी यावर एकमत झाले. असे करताना दखल, अभिप्राय, वाहवा, कौतुक आणि स्तुती अशा चढत्या श्रेणीचे मार्ग आहेत. त्यापैकी अवाजवी कौतुक आणि स्तुती हे नकोच.

जमेल तेव्हा दिलखुलास दाद नक्की देत राहू !

माझ्य्मी लहान असताना काही उत्तम काम केले की सान्गत स्तुती करावी परमेश्वराची करु नये व्यर्थ कधी जनाची. या म्हणीमुळे कधीहि चान्गले शब्द ऐकलेच नव्हते. असो. हे ६५-७० वर्षापूर्वीचे आहे. काही वाईट झलेले नाही.

त्यामुळे त्याकाळातील नियम आता लागू होणे अशक्य नसले तरी कठीण नक्कीच वाटते

तेजस आठवले's picture

22 Jul 2019 - 9:52 pm | तेजस आठवले

विषय चांगला निवडलाय पण तुमच्या लेखाचे कौतुक मी मुळीच करणार नाहीये. केले तर ती धागाविषयाशी प्रतारणा ठरेल.

कुमार१'s picture

23 Jul 2019 - 5:56 am | कुमार१

धागाविषयाशी इमान राखल्याबद्दल आभार !

सर्व नवीन प्रतिसादकांचेही आभार .

टर्मीनेटर's picture

24 Jul 2019 - 11:06 am | टर्मीनेटर

अशा या कौतुक न करण्याच्या गुणधर्माने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास!

कौतुक न करण्याच्या गुणधर्माने मलादेखील पछाडलेले आहे असे आमच्या सौभाग्यवतींचे ठाम मत आहे :-)
पण तिचे कौतुक मी तिच्या तोंडावर न करता तिच्या अपरोक्ष इतरांकडे कडे करतो याची खात्री तिला पटवून देण्यात यशस्वी झाल्याने आता टोमणे ऐकावे लागत नाहीत :-)

वेगळ्या विषयावरचा हा लेख आणि त्यावरचे झकास प्रतिसाद, दोन्ही आवडले!

अप्रूप नैसर्गिक असू शकते तिचे कौतुक बनवावे लागते आणि बनवताना जी मिळावट करावी लागते त्यात तिची नैसर्गिकता कधीच विरली गेलेली असते म्हणून निखळ कौतुक हा प्रकार फारच कठीण...