लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
ही सुद्धा एका युट्यूब चॅनल वर पाहीलेली आणि घरी नंतर ट्राय केलेली रेसीपी.
थोडे बदल केले आहेत माझ्या सवयीनुसार पण हे ही सुप्पर झालं होतं.
तर साहित्य -
- ओंजळभर मिरच्या (नेहेमीच्या, फोडणीत तिखटपणाला ज्या वापरतो त्यत्या)
- २ ते ३ चमचे बेसन (चण्याच्या डाळीचं पीठ)
- चमचाभर धण्याची पूड
- पाव चमचा हळद
- अर्धा/पाऊण चमचा बडीशेप पूड
- एका मोठ्या लिंबाचा रस (मूळ कृतीत आंबट दही वापरलेलं आहे)
- मीठ
- २-३ टेबलस्पून तेल, मोहोरी, चिमटीभर हिंग
क्रमवार पाककृती:
- मिरच्या धूवून, पुसून कोरड्या करायच्या आणि नंतर भरल्या वांग्यांना + आकारांत चिरा देतो तसं चिरून घ्यायचं; म्हणजे त्यांची फुलं होतील.
- बेसन कोरडंच जरा ५/१० मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं
- आता फोडणी करून मोहोरी चांगली तडतडू द्यायची आणि चिमटीभर हिंग घालून प्रकरण जरासं फसफसलं की मिरच्या घालायच्या.
- सगळ्या मिरच्यांना तेल व्यवस्थित माखलं की यात सगळे कोरडे मसाले आणि मीठ घालून जरा मसाले तेलावरच पोळू द्यायचे.
- आता यात भाजलेलं बेसन घालून सगळं नीट हलवून घ्यायचं आणि लिंबाचा रस घालून गॅस बंद करायचा. कढईत भाजी तशीच जरा ५/७ मिनिटं राहू द्यायची आणि मग कशाही बरोबर तोंडीलावणं म्हणून घ्यायची.
वाढणी/प्रमाण:
तोंडीलावणं म्हणून ठेचा, लोणचं याप्रमाणे आणि हो हिरवी मिरची आहे ती, सो आपल्याला सोसवेल तेव्हढीच...
अधिक टिपा:
- बेसन आधी भाजून घ्या किंवा नंतर मेन कृतीत शिजवून घ्या (मूळ कृतीत आधी भाजून घेतलेलं नाहीय). ते नीट होणं महत्त्वाचं आहे नाहीतर कच्चट चव आणि वास दोन्हीही जाणवेल. बेसन अतीही वापरायचं नाहीय. जस्ट मिरच्या कोट होतील इतपतच.
- बडीशेप पूड अवश्य वापरा, सुरेख चव येते.
- आंबटपणाही जरासा पुढे हवा तरच ती अपेक्षित धणे + तिखट + आंबट आणि बडिशेपेच्या सुरेख सुवासाची चव साधते.
प्रतिक्रिया
20 Jun 2019 - 7:54 am | जेम्स वांड
फोटो टाकला असता तर नेमकं कोटींग अन टेक्सचर कळलं असतं. हरकत नाही, करून पाहणेत येईल. :)
20 Jun 2019 - 8:09 am | कंजूस
हे खाऊन खरड लिहायची.
20 Jun 2019 - 10:51 am | श्वेता२४
करुन पाहण्यात येईल
21 Jun 2019 - 11:58 pm | जालिम लोशन
विल ट्राय.