अनपेक्षित , अकल्पित अपघात आणि आपण

Primary tabs

शब्दानुज's picture
शब्दानुज in काथ्याकूट
25 May 2019 - 9:00 am
गाभा: 

सुरत येथील घटना मिपाकरांना माहिती असेलच. तक्षशिला या इमरतीस आग लागली होती जिथे शिकवणीसाठी काही विद्यार्थी जमा झालेले होती. आग वाढताना विद्यार्थ्यांनी खिडक्या उघडल्या आणि तिस-या , चौथ्या मजल्यावरून धडाधड उड्या मारल्या. जवळपास वीसजण यात मरण पावले आहेत.

असे अपघात आपल्याला नवीन नाहित. आजची सकाळची घटना आपण संध्याकाळपर्यंत सहज विसरूनही जावू. कोणी दोषी आहे , त्यांच्यावर काय कारवाई होईल अश्या प्रश्नांना आता कितपत अर्थ असेल हाही एक प्रश्नच आहे.

मुख्य मुद्दा हा आहे की अशा परिस्थिती हाताळण्यासाठी आपण मानसिक , शारिरीक द्ष्टयया सक्षम आहोत का हा आहे. ही सर्व मुले जवळपास ११ वीत होती म्हणजेच तेवढी लहान नव्हती तरीही एकाने उडी मारली की एक मॉब मेंट्यालिटी (समूह विचारसरणी) तयार होत जाते आणि सारासार विचार करायची क्षमता हरपते.

मूळात अशावेळी नेमके करायचे काय याचे प्रक्षिक्षणच आपल्याला मिळालेले नाही. आपणही ते मिळवलेले नाही. कुठल्याही गंभीर प्रसंगात जर तेव्हा काय करयाचे याचे ज्ञान शाळेपासून देत आलो असतो तर असे प्रकार नक्कीच कमी होतात.

आग लागल्यावर आगीपेक्षा धुराने श्वास कोंडून मरण अोढवते अशावेळी मिळेल ते कापड घेऊन अोले करणे आणि तोंडावर गूंडाळणे हे योग्य ठरते. जर पाणी नाही मिळाले तर सरळ एखादा कपडा काढून त्यावर लघवी करून ते वापरणे योग्य ठरते. अशावेळी समोर मुलगा आहे वा मुलगी आहे असले विचार डोक्यात येऊ द्यायचे नसतात. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा प्रक्षिक्षण दिलव जाते आणि आपली मानसिकता त्यातून तयार होत जाते.

मध्यंतरी एका शाळेत आभासी मॉक ड्रील संबंधित अधिका-यांनी करण्यात आल्याचे वाचनात आले होते. एका मुलाला विश्वासात घेऊन तो विद्युत तारेला चिकटलेला असल्याचे भासवण्यात आले. अशावेळी अॅम्ब्युलन्स , इतर सेवा किती वेळात येतात हे नोंदवून ठेवण्यात आले.

केवळ आगच नव्हे तर अगदी कुत्रा चावला तर काय करायचे , विद्युत धक्का लागला तर काय करायचे , समोर अपघात झाला तर काय करायचे, हर्ट अटॅक आला तर काय इतपासून ते दहशतवादी हल्ला , बॉम्बस्फोट झाला तर काय करायचे हे सर्व नागरिकांना समजावून सांगणे आता तरी गांभिर्याने घ्यायला हवे.

मिपाकरांना विनंती की त्यांनी अशा प्रसंगानरूप आपापल्या अनुभव , ज्ञान यांना अनुसरून टिप्पण्या कराव्यात

प्रतिक्रिया

कंजूस's picture

25 May 2019 - 9:16 am | कंजूस

एर कंडीशन इन्सुलेशन थर्मोकोलचे करतात. ते पेटते आणि विषारी धूर सोडते. ग्लास वुलचे हवे.
कन्सिल्ड वायरिंग तापतच राहाते,पेटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2019 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

वैयक्तिक/स्थानिक स्तरावरच्या दुर्घटना, अपघात, आग, इत्यादीसंबधीच्या धोकाप्रबंधक/निवारक प्रशिक्षणाची भारतात प्रचंड वानवा (किंबहुना, ते बहुतांश दुर्लक्षित) आहे, याला निसंशय सहमती. यासंबंधात, बहुतांश वेळेला केवळ, "घटना घडल्यावर नी-जर्क प्रतिक्रिया" इतकेच केले जात आहे.

मात्र, राज्य व राष्ट्रस्तरीय नैसर्गिक आपत्तीसंबंधीच्या प्रतिबंधक व निवारक योजनांच्या बाबतीत बरीच सुधारणा होत असल्याची लक्षणे आहे. भारताच्या पूर्व किनार्‍यावर आलेल्या महावादळांत याचे उदाहरण दिसले आहे. गेल्या ५० वर्षांतिल मोठ्या शक्तीशाली वादळांपैकी एक असूनही या वादळातील मनुष्यहानी १०-१५ पर्यंतच सीमीत ठेवण्या यश आले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2019 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

कर्मधर्मसंयोगाने आजच खालचा संदेश व्हॉट्सॅपवर आला...

जालिम लोशन's picture

25 May 2019 - 2:52 pm | जालिम लोशन

पुण्यामधे Saoon Hospital मधे पेडिॅॅट्रिक department मधे रु ६०० भरुन एक दिवसाचा CPR COURCE करता येतो. heart attack वेळी तो उपयोगी पडतो. dummy वर शिकवतात.

palambar's picture

25 May 2019 - 5:05 pm | palambar

अत्यंत वाईट घटना, आग एकाक्षणात
एवढी पसरत नाही, (पेट्रोल अपवाद)
कोणालाही आधी जळाल्याचा वास किंवा
काही शंका आली नाही का?

झेन's picture

26 May 2019 - 8:29 am | झेन

जिन्याच्या बाजूने आग लागल्यामुळे परतीचा मार्ग नसावा. सामान्य परीस्थितीत आपण सर्व बाजूंनी विचार करू शकतो पण मृत्यु समोर दिसत असताना श्वास घेण्यास त्रास होत असताना आगीची धग लागत असेल तेंव्हा सारासार विचार अवघड आहे.

आमच्या शेजारच्या घरात गॅसवर दूध ठेवून विसरून शेजारीण दारंखिडक्या बंद करून गेलेली. खूप वेळानंतर परतल्यावर घरात इतका धूर भरला होता की गॅस बंद करण्यासाठी तीथपर्यंत पोचण अवघड झाल होत. आम्ही चार पाच जण होतो काय कराव सुचत नव्हत शेवटी मी लिटरली रांगत जाउन गॅस बंद करून खिडक्या उघडल्या.

उपेक्षित's picture

26 May 2019 - 5:20 pm | उपेक्षित

सहमत आहे, त्यावेळी काही सुचत नाही बोलण सोपे असते.

काही वर्षांपूर्वी माझा एक नातेवाईक असाच हकनाक गेला, Gas लिकेज होता घरातला आणि ह्याने लिटरली आपल्या म्हातार्या आईला, पोरांना आणि बायकोला वाचवले पण तेवढ्यात स्फोट झाला ८०% भाजला होता त्यातच गेला.
अजूनही काटा येतो आठवले कि अझी काही हिम्मत नाही झाली त्याला पहायची

अतरंगी's picture

27 May 2019 - 11:48 am | अतरंगी

कोणत्या ईमर्जन्सी मधे काय करायचे याचे प्रशिक्षण घरी सर्वांना देणे आवश्यक आहे.

मागच्या वर्षी आमच्या घरातील गॅसचा पाईप लिक असल्याने पेटला. बायकोने आग लागली म्हणून त्यावर पाणी टाकले.....

मला कळल्यावर ईतके आश्चर्य वाटले की गॅसच्या आगीवर पाणी टाकू नये ईतकी साधी गोष्ट पण पदवीधर असलेल्या व्यक्ती ला माहीत असू नये? त्यांचा या सर्व गोष्टींशी कधी संबंधच आलेला नाही. नंतर त्यांना घरातली कोणती आग कशी विझवावी हे सर्व शिकवले. ६ वर्षाच्या मुलाला आगीचे प्रकार हळूहळू अप्रत्यक्षरित्या शिकवायला सुरुवात केली आहे.

घरात एक फायर एक्सटींग्वीशर आज आणू उद्या आणू करत राहीला आहे. या धाग्यामुळे आठवण झाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2019 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

या क्लिपमधील महितीही सर्वांना माहीत असली पाहिजे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2019 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशिक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. शाळेत महाविद्यालयात अशा अनपेक्षित प्रसंगी काय केलं पाहिजे याचं शिक्षण नाही. शाळेत खेळाच्या तासात खेळ शिकविल्या जातात. नवनवे विषय समजून सांगितल्या जातात पण नुकत्याच शाळां संस्क्रुतीतून बाहेर पडणार्‍या मुलांना अनपेक्षित घटनांना सामोरं कसं जायचं हे सांगितल्या जात नाही. आपणही पालक मुलाला रस्त्यावर गाड्या बघून चालत जा, अनोळखी मुलांशी, काकांशी, मावश्यांशी बोलू नका. त्यांनी खायला काही दिलं तर खाऊ नका. या पलिकडे फारसे जात नाही. आग, स्फोट, पाणी-पुर, पाऊस अशा अचानकपणे आलेल्या घटनांबद्दल मुला मुलींशी बोललं पाहिजे. अशा वेळी काय केलं पाहिजे ते सांगितलं पाहिजे.

अगदी महाविद्यालयातील मुलांनाही एन. एस.एस. वगैरेत मुलांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते. जागृकता, सजगता हे विषय मुलांशी बोलले गेलेच पाहिजे असे वाटते. सुरतची घटना वेदनादायी आहे.

-दिलीप बिरुटे