माझे चेहरापुस्तकामधले मित्र श्री. भालचंद्र वस्त यांनी कांदळवन सफरीची लिंक शेअर केली होती.ती उघडली असता डोळ्यांना आणि मनाला जी मेजवानी मिळाली तिच्यामुळे वेंगुर्ला येथे जाऊन ही सफारी करायचीच असं ठरवलं होतं.डोळ्याला मेजवनी निसर्गसुंदर आसमंतामुळे होती तर मनाला मेजवानी मिळाली ती, 'स्रियांनी मनात आणलं तर त्या काहीही म्हणजे अगदी काहीही करू शकतात' हे, त्रिकालाबाधित सत्य,सौ.श्वेता हुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवले होते.
दिसायला नाजूकशा मुली, आणि त्या मजबूत वल्ही हातात घेऊन होडी वल्हवताहेत;आजूबाजूच्या पर्यावरणाची,झाडापेडांची, मासे-पक्ष्यांची माहिती ,देशी विदेशी पर्यटकांना मराठीतून आणि इंग्रजीमधून समजावून देताहेत हे पाहून एक स्त्री म्हणूून याकरत स्त्रीत्वाचा अभिमान वाटला होता.कोकणच्या,विशेषतः सिंधुदुर्ग पर्यटनात मोलाची भर टाकणारे हे कार्य जवळून पाहण्याची आस लागली होती.
ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या मुलाबाळांनी चांगल्या पर्यावरणात रहावीत, त्यांनी शुद्ध हवेत श्वास घ्यावा असे वाटते, त्यांनी निसर्ग मानवासाठी कसा काम करतो हे पहाण्यासाठी आणि मुलांना दाखवण्यासाठी ही सफारी केली पाहिजे असे माझे ठाम मत झाले आहे.निसर्ग आपल्याला भरभरून कितीतरी देणग्या देत असतो.त्या मोफत मिळतात म्हणून आपल्याला त्यांची किंमत नसते. आणि म्हणूनच निसर्ग जपण्यासाठी मानवाने निसर्गाला कशी मदत केली पाहिजे, याचे शिक्षण देण्यासाठी स्वतःला आणि मुलाबाळांही ही सफर घडवून आणली पाहिजे यात शंकाच नाही.
कांदळ म्हणजे मॅन्ग्रोव्ह.या मानवासाठी हवा शुद्ध करणाऱ्या झाडांचे महत्व न समजल्याने आजवर याची बेसुमार तोड झालीआहे आणि हे पर्यावरण जपले तरच आपले आपल्यानान्त्रच्या पिढ्यांचे जीवन सुसह्य होईल याची जाणीव ही सफारी करून देते.
वेंगुर्ला इथली "कांदळवन सफारी " ही एक ते सव्वा तासांची असते खरी, पण त्यातून मिळणारा आनंद या दोन सफारींपेक्षा अतिशय आगळावेगळा आणि आपल्या ज्ञानात भर टाकणारा अनुभव असतो,यात शंकाच नाही.
माझे माहेर रत्नागिरी असल्याने, खाडी,चिपी म्हणजे मॅन्ग्रोव्ह,त्यातले निरनिराळे कालवं, चिरफुलं, खेकडे,बोई इ.मासे माझ्या माहितीतले होते,पण या सफारीने माझ्या मनात घोळणाऱ्या एका आदिम प्रश्नाचे उत्तर मिळाले.त्याचं काय आहे? मी पक्की मासेखाऊ आहे ,त्यामुळे समुद्रातले मासे आपण आपल्या अंतापर्यंत खाऊ शकू इतके टिकतील ना?हा प्रश्न मला नेहमी पडतो.कारण आपण माशांची गाभोळी म्हणजे अंडीसुद्धा चवीने खातो.मग माशांचे उत्पादन कसे होणार?(तरी चाटकी {चाटकी- शब्दसौजन्य श्री प्रथमेश जोशी} जीभ ऐकतेे का?)पण आता माझ्या मनातला हा प्रश्न विरून गेला आहे आणि मी नव्या दमाने मासे शिजवायला आणि खायला तयार झाले आहे.या मॅन्ग्रोव्हच्या मुळातल्या दुर्गम जागेत तांबोसा या माशासरखे इतरही मासे अंडी घालतात,त्यामुळं त्यांची पैदास एकदम सुरक्षित असते.कारण तिथे कोणी पोचू शकत नाहीत.
या सफारीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सफारीसाठी लागणारी होडी स्त्रिया वल्हवतात.बचतगटामुळे स्रियांच्या अमाप शक्तीला शासनाच्या मदतीची जोड मिळून, 'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' हे साध्य झाले आहे.किंबहुना एकार्ड्या कोकण्यांना 'विना सहकार नाही उद्धार' हे कळून चुकले आहे.समुद्राच्या भरती-ओहोटीनुसार या सफारीची वेळ ठरते,त्यामुळे वेंगुरल्यात पोचल्यावर श्वेता किंवा सतीश हुले याना फोन करून वेळ ठवून घ्यावी लावते.मांडवीतून निघून पुन्हा मांडावीत असा या सफारीचा मार्ग आहे.
नुसती स्वतःच्या संसारासाठी घरची तसेच बाहेची कामे करून,गजाली करीत दिवस घालवण्यासाठी आपला जन्म नाही हे या बायकांना सौ,श्वेता हुले यांनी जाणवून दिले आणि त्यातून जे जनजागृतीचे कार्य निर्माण झाले आहे,त्याला तोड नाही.*मळलेल्या पाऊलवाटांवर सगळेच चालतात पण नवी पाऊलवाट घडवून आणि ती सुदधा पाण्यातून- त्यावर यश मिळवणे हे सोपे काम नक्कीच नाही.*
सौ.श्वेता सतीश हुले, या पूर्वाश्रमीच्या वस्त. जन्मल्या त्या वेंगुर्ला इथल्या सागरतीर्थ टांक येथील मासेमारी करणाऱ्या,गाबित समाजातल्या कुटुंबात. बालपणापासूनच उद्योजकतेचे धडे गिरवायला लागले.त्यांच्या घरच्या होडीतून मिळालेल्या माशांची विक्री करून आपले शालेय, तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत, त्या बी.कॉम. झाल्या. त्यामुळे त्यांचे अर्थकारण अगदी पक्के आहे.
बाजारात मासे विकणे हा अजूनही प्रमुख व्यवसाय आहे.अचानक त्यांच्या आयुष्याने वळण घेतले आणि महिलांसाठी राखीव झालेल्या मतदारसंघातून एक टर्म नगरसेविका म्हणून निवडून आल्या. यानंतर त्यांचा दृष्टिकोन बदलूनच गेल. कारण लोकांसाठी, कोणकोणत्या योजना,कोणकोणत्या खात्यांमार्फत शासन घेऊन येते, यांची माहिती त्यांना मिळू लागली.या योनानांतर्गतचत्यांना केरळ येथे ट्रेनिंला जाण्याची संधी मिळाली.तिथले प्रकल्प, बॅकवॉटर्स सफारी पाहून, जन्मल्यापासून खाडी आणि समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या श्वेताच्या मनात निराळीच कल्पना स्फुरण पावली,गाबित (मच्छिमार) समाजातल्या प्रत्येक घरातील पुरुष मंडळी समुद्रात मासेमारी करुन मिळालेली मासळी, घरातील महिला,बाजारात विक्री करतात. त्यातून येणाऱ्या कमाईवर घर चालवायचे असे संसाराचे कठीण होत चाललेले गणित सोडवताना, कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, संसाराचा जड झालेल्या चाकांचा गाडा अोढताना हैराण झालेल्या,आपल्या सहकारी मुलींना त्यांनी एक वेगळे स्वप्न दाखवले.केरळम्धल्या आणि केंद्रीय वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी स्वामिनी बचतगट स्थापन केला.UNDP आणि वन विभागाचा कांदळवन विभागाची संकल्पना "कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना" हा प्रकल्प पर्याय म्हणून स्वीकारून मोठ्या जिद्दीने, कष्टाने,समाजातून होणाऱ्या टीकेला आणि चेष्टेला भीक न घालता,सामोरे येणाऱ्या प्रत्येक संकटाला यशस्वीपणे तोंड देऊन ते स्वप्न साकार केले.आणि सर्व सामान्य महिलांसमोर एक नवा आदर्श ठेवला.
त्यासाठी,त्यांचे पती श्री सतीश हुले यांच्या मदतीने त्या मुलींना होडी वल्हवण्याचे प्रशिक्षण दिले ,तसेच मॅन्ग्रोव्ह संबंधित माहिती,तिथे येणारे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी, माशांच्या प्रजोत्पादनासंबंधित माहिती दिली.या दहावी शिकलेल्या मुली मराठी, इंग्रजी आणि हिंदीतून सराईतपणे बोलतात.आठ जातीच्या मॅन्ग्रोव्हची ल्याटिन भाषेतली नावे इतक्या सफाईदारपणे घेतात की चकित व्हायला होतं.एकाच वेळी त्यांचे हात होडी वल्हवत असतात,मध्येच दूरवरचे पक्षी अचूकपणे दर्शवत असतात,सोबत त्याची नावे सांगत असतात.
आएशा हुले ही चणीने नाजूक असलेली मुलगी सुकाणू धरून होती.पण हे सुकाणूही वल्ह्याप्रमाणेच असते.आम्ही हौसेने वल्ही हातात घेऊन, दिशाहीन केलेली होडी योग्य मार्गावर ठेवण्याचे कठीण काम ही मुलगी इतरा प्रशिक्षित मुलींच्या म्हणजे राधिका व गौतमीच्या मदतीने लीलया करीत होती. दस्तुरखुद्द सौ.श्वेताही त्यांच्यासह होडी वल्हवत आळीपाळीने माहिती देत होत्या.
याच शासकीय योजनानंतर्गत पुरुष बचतगटाने चालवलेला काठावरचा Mud Crab प्रकल्प दुरून पहायला मिळतो,जिथे तीन तीन किलो वजनाच्या खेकड्यांची पैदास केली जाते.हे खेकडे मुंबई तसेच गोवा येथील पंचतारांकित हॉटेल्सम्ध्ये जातात.
हे पाहून कोकणात कष्ट करणाऱ्या हाताला भरपूर कामे आहेत,याची प्रचिती येते आणि शेतीसोबत निसर्गाधारित अनेक व्यवसाय करून लोक आपले निर्वाह उत्तम रीतिने पार पाडत असल्याने, उपासमार किंवा कर्जाच्या भारामुळे कोकणात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण शून्य का आहे हेही समजते.
ही सुंदर सफारी केल्यावर या गटाच्या हॉटेल मांडवी मध्ये जेवायलाही विसरू नका.फक्त एक तास आधी सूचना द्यायला विसरू नका.म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे उपलब्ध असलेले मासे खायला मिळतील यात शंकाच नाही.शाकाहारी असलात तरी काही बिघडणार नाही,दारच्या ताज्या भाज्या उत्कृष्ट शाकाकारी जेवणाची लज्जत वाढवतात.
अप्रतिम जेवणाची चव वाढवणारे खुले वातावरण असणारी खाडीच्या किनाऱ्यावरची झाडा-झुडुपांनी वेढलेली जागा,ही या भोजनालयाची खासियत आहे. त्यातच भाज्यांचे वेल, शेवगा,नारळ,भेंडीची झाडे,त्या झाडांमुळे खाडीवरचा,भरदुपारीही झुळझुळणार थंडगार वारा.अहाहा!ते वातावरण म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं?हे सांगत होतं.या सर्व झकास वातावरणाचा परिणाम, नेहमीपेक्षा दोन घास जास्त खाण्यात होतो.
आमच्या पुढ्यात आलेले चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण पाहूनच समाधान होत होते.तेही रास्त किमतीत.अर्थात तेव्हा किमतीचा विचारही डोक्यात आला नाही. कुरकुरीत कोलंबी फ्राय(मोठ्या आकाराच्या सोळा), दबदबीत कोलांबीचे सुके,चटकदार कोळंबीचे कालवण,वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत तळलेल्या हलव्याच्या दोन तुकड्या ,गरमागरम तव्यवरून ताट आलेल्या घडीच्या गरम चपात्या,दारातल्या ताज्या वालीच्या शेंगांची रुचकर भाजी, चमचमीत मटकीची उसळ,कोकणी जेवणाचा अंतरात्मा असलेली गुलाबी सोलकढी आणि ताजा हापूसच्या केशरी आमरस असा भरगच्च बेत होता.खरं म्हणजे भाज्या आमच्या वाहनचालकासाठी शाकाहारी जेवणासाठी केल्या होत्या,पण त्याचा वानवळा आम्हालाही मिळाला कारण आमचे फेसबुक मित्र भालचंद्र वस्त हे श्वेताचे भाऊ असल्याने आम्ही घरचेच झालो होतो. माशाच्या जेवणासोबत दारची वालीची भरपूर ओले खोबरे घातलेली भाजीही बाजी मारून गेली.
विशेष म्हणजे दरही वाजवीपेक्षा कमीच होते.या मन तृप्त करणाऱ्या,अतिथीधर्म पुरेपूर पाळणाऱ्या जेवणाचे, चार माणसांचे भरपेट जेवून आलेले रु.१३५०/- चे बिल अगदी कमीच होते.
वाढण्यातले अगत्यही नावाजण्यासारखेच,घरातली सर्व मंडळी हसतमुखाने यात श्वेता यांचाच्या मदतीला असतात.पती, श्री सतीश हुले,(यांनी या बायकांना होडी वल्हवणे शिकवले.) केमिकल्स इंजिनीअर होऊन upsc च्या परीक्षेचा अभ्यास करणारी मुलगी काजल,हॉटेल मॅनेजमेंट करून Grand Hyatt मध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे प्राथमिक धडे गिरवणारा त्यांचा मुलगा शुभम्(हा भेटू शकला नाही.) हे सगळे आपुलकीने ताटात काय आहे?काय संपले आहे? काय वाढायला आणू?यावर सतत लक्ष ठेवून होते.'अतिथी देवो भव।'हे ब्रीदवाक्य असल्याप्रमाणेच हे सर्वजण आपल्याला विशेष सन्माननीय अतिथीची भावन, देतात.
मग आता वाट कसली पाहताय? निघा वेंगुर्ल्याला.
टीप :-(Eco India ने याची दखल घेत एक छोटीसी documentary प्रदर्शित करून यशाचा एक दाखला दिला.हीच पाहून मी इथे जायचे ठरवले.लिंक जोडत आहे इच्छुकांनी पहावी.
https://youtu.be/ME8YadL4y7M)
YOUTUBE.COM
Eco India: How tourism is aiding fisherwomen to preserve mangroves in the backwaters of Vengurla
Have a similar story to share? Click here to know…
प्रतिक्रिया
22 May 2019 - 6:19 pm | कंजूस
छान मोहिम/ पर्यटन कल्पना !
----
असंच गड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावांतल्या मुलींनी महिला भटक्यांसाठी गाईड व्हावे. इतर टुअर आयोजकांवर अवलंबून न राहता तीनचार मैत्रिणींंना भटकायचा आनंद घेता येईल.
23 May 2019 - 7:08 pm | नूतन सावंत
छान कल्पना,मी सांगेन त्यांना.तिथे आसपास,यशवंतगड,निवती किल्ला,सिंधुदुर्ग असे किल्ले आहेत.
22 May 2019 - 6:57 pm | दुर्गविहारी
उत्तम माहिती देणारा धागा. नक्कीच जाउन पहायला आवडेल. कंजुस काकांची सुचनाही विचारायोग्य.
22 May 2019 - 7:29 pm | टर्मीनेटर
छान अनुभव.
हे जर असं असेल तर, गुजराथी आणि मारवाडी (जैन) लोकांनी सहकुटुंब सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला येण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल. पर्यटनात अग्रेसर असलेले हे समाज (सहकुटुंब) सिंधुदुर्गात येण्याचे टाळतात केवळ भोजन व्यवस्था त्यांच्या (कुटुंबाच्या) सोयीची नसल्याने! पर्यटन हा मोठा व्यवसाय आहे, येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडी निवडीचे पदार्थ खायला मिळाले तर सिंधुदुर्गासारखा विकल्प नाही महाराष्ट्रात! नक्की अनुभवण्यात येईल ही सफारी. धन्यवाद.
22 May 2019 - 8:27 pm | कंजूस
हल्ली गुजराती लोक तारकर्लीकडे जाऊ लागले आहेत.
31 May 2019 - 4:34 pm | उपेक्षित
बरोबर हल्ली गुज्जू आणि राजस्थानी लोक कोकणाकडे वळली आहेत खरी, तसेच खानपान सवयी सुद्धा त्यांच्या नवीन पिढीने थोड्या सैल केल्या आहेत. धंद्यानिमित्त या दोन्ही समाजाशी रोजचा संबंध येत असतो काहीजण मांसाहार सुद्धा करायला लागले आहेत.
22 May 2019 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका अत्यंत प्रशंसनिय उपक्रमाची तितकीच रोचक ओळख !
वाखू साठवली आहे. कोकणसफरीत या सफारी नक्कीच केल्या जातील. आणि हो, कोलंबी आणि हलवा यांच्यावर जीवाभावाचे प्रेम असल्याने त्यांनाही पोटात आश्रय दिला जाईल हेवेसांन ! ;) =))
22 May 2019 - 9:41 pm | जालिम लोशन
चाकोरी बाहेरची माहीती.
23 May 2019 - 7:37 am | उगा काहितरीच
छान ओळख करून दिलीत. स्वावलंबनाचा हा मार्ग आवडला. असं चाकोरीबाहेर जाऊन नवीन मार्ग शोधणे निश्चितच कौतुकास्पद आहे. बाकी ते मॅन्ग्रोव्ह थोडंसं भितीदायक वाटलं. गढूळ (बहुतेक) पाणी , भरगच्च झाडी , व त्यात निश्चितपणे असणारे वेगवेगळे प्राणी. अवघड आहे.
23 May 2019 - 10:55 am | यशोधरा
छान लेख.
23 May 2019 - 12:44 pm | नंदन
उत्तम माहितीपूर्ण लेख. पुढील वेंगुर्लाफेरीत काय करायचं, त्या यादीत भर घातली आहे.
23 May 2019 - 7:51 pm | पद्मावति
उत्तम माहितीपूर्ण लेख. मस्तंच.
24 May 2019 - 10:23 am | एकनाथ जाधव
छान माहीती दिलीत. आत्ताच फोन केला त्यान्ना आणी लेखाबद्दल स्नागीतल. मीत्र जाणार आहे.
24 May 2019 - 11:17 am | सुधीर कांदळकर
वेंगुर्ल्याला खूप वेळा जातो. आता इथे पण जाईन.
धन्यवाद
8 Jun 2019 - 7:03 pm | कापूसकोन्ड्या
तुम्ही तर नावाचे कांदळकर नक्की जा
31 May 2019 - 10:13 am | मुक्त विहारि
मस्त माहिती.
8 Jun 2019 - 2:31 pm | Nitin Palkar
अतिशय छान आणि नवीन माहिती.
8 Jun 2019 - 6:43 pm | यशोधरा
छान धागा. माहितीबद्दल धन्यवाद, नूतन ताई.
काही काही फोटो दिसत नाहीत गं.
5 Jul 2019 - 11:20 pm | नूतन सावंत
आधी सगळे दिसत होते,तुला पहायचे स्टील तर फेसबुकवर हा लेख आहे तिथे दिसतील.
6 Jul 2019 - 9:47 am | यशोधरा
तिथे तर पाहिलेच आहेत. :)