मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

उम्फ वर्ल्ड

Primary tabs

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in तंत्रजगत
7 May 2019 - 4:37 pm

उम्फ वर्ल्ड

डेविड इंगलमन या शास्त्रज्ञाचा एक टॉक ऐकला. एकदम भारी. डोक्याच्या पलीकडे! म्हटलं तर कल्पना अगदी साधी आणि सरळ. पण ती वाढवणे प्रत्यक्षात आणणे खरंच भन्नाट आहे.

या जगाचा आकार केवढा?
ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा!
आपल्या मेंदूच्या क्षमताच आपलं जग केवढं हे ठरवत असतात. नुसतं केवढं हेच नव्हे तर त्याचा गुणात्मक दर्जा देखील. पाच इंद्रियां मार्फत येणाऱ्या संवेदनांवर हे अवलंबून असणार हे उघड आहे. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्याला अपुऱ्या गंधविश्वावर समाधान मानावं लागतं. पण अनेकजण किती समृद्ध गंधविश्व अनुभवतात हे मी (असूयेने) पहात असतो. बहिरे लोक किती मोठ्या आनंदाला मुकतात हे मी संगीतप्रेमी असल्याने सहज समजू शकतो. पण या अडचणी दूर झाल्या तर किती छान होईल नाही! हे नक्कीच शक्य आहे.. नव्हे प्राथमिक स्वरूपात शक्य झालं देखील आहे. कसं ते विस्कटून सांगायचा प्रयत्न करतो.

हे खरंय की इंद्रिये संवेदना मेंदूकडे पाठवतात. आणि मेंदूत त्या संवेदनांचा अर्थ लावला जातो. म्हणजे एका अर्थी घटना मेंदूच अनुभवत असतो. गार पाण्यात हात घातला तर हाताच्या त्वचेमार्फत संवेदना जाते हे खरं पण ती जाणवते मेंदूतच. पण मेंदूचा पाण्याशी संपर्क आलेला नसतो. हेच सर्व संवेदनांबाबत घडत असते. मेंदू स्वतः काहीच न अनुभवता सर्व काही अनुभवत असतो.

शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की जिभेकडून निघणारे मज्जातंतू त्याचा अर्थ लावणाऱ्या केंद्राकडे न पोचू देता मधेच कानाच्या मज्जातंतूला जोडले आणि जिभेवर लिंबाचा रस टाकला तर कानात आवाज झाल्याची संवेदना होते. कारण मेंदूतील ऐकण्याच्या केंद्राकडून चवीची संवेदना आवाजाची असल्याप्रमाणे समजून घेतली जाते. डोळ्याकडून जाणाऱ्या मज्जातंतूना जोडली तर विशिष्ट रंग दिसतो चवी ऐवजी!

याचा उपयोग करून पुढले प्रयोग केले गेले. आवाजातून कानाला जाणवणारे कम्पन त्वचेला देता येऊ शकेल. आणि ठराविक प्रकारचे कंपन म्हणजे ठराविक आवाज असे मेंदूला शिकवता येऊ शकेल या आधारावर प्रयोग सुरू झाले. एक असे पॅड बनवले जे पाठीवर चिकटवता येईल आणि ते ध्वनीकंपन त्वचेला जाणवेल असे बदलून त्वचेला पोचवेल. मग प्रत्येक उच्चार म्हणजे वेगळे कंपन असा सराव मेंदूला करून दिला की झालं! हे खरंच घडलं आहे. असं कंपन त्वचेकडून ग्रहण करून त्याचा अर्थ लावायला शिकलेले ठार बहिरे लोक पाठीच्या त्वचेच्या सहाय्याने 'ऐकू' लागले आहेत. तसे यशस्वी प्रयोग झाले आहेत. आणि हे लीप-रीडिंग नव्हे. डोळे बांधून देखील हे करता येऊ शकतं सरावाने.

यामुळे बहिरे लोक देखील 'ऐकू' शकतात. इतकंच नव्हे पाठीच्या त्वचेच्या सहाय्याने वेगळे पॅड लावून आंधळे 'पाहू' देखील शकतील! शारीरिक उणिवा दूर होऊ शकतीलच पण त्या पलीकडे सारे विश्व देखील खुले होऊ शकेल आपल्या सगळ्यांसाठी! कसे ते सांगायचा प्रयत्न करतो.

आपल्याला जग जस आहे तस जाणवत नाही. त्या आकलनाला आपल्या इंद्रियांच्या ग्रहण क्षमतेच्या नैसर्गिक मर्यादा आहेत. काही ठराविक रंगतरंग फक्त पाहू शकतो आपण इन्फ्रा रेड आणि अल्ट्रा वायोलेट आपण पाहूच शकत नाही ही आपल्या डोळ्यांची मर्यादा आहे. तेच ऐकण्याबाबत. जे वटवाघूळ ऐकू शकतं असे आवाज आपण ऐकूच शकत नाही. या अशा मर्यादित जगाला 'उम्फ वर्ल्ड' अशी संज्ञा दिली आहे.

तर या नव्या तंत्राच्या सहाय्याने आणि सरावाने आपण आपलं उम्फ वर्ल्ड आपल्या मेंदूच्या क्षमते इतकं वाढवू शकू! एखादा कुशल संगीतकार मानवी कानांच्या मर्यादा ओलांडून स्वर वापरून संगीत देऊ शकेल किंवा एखादा चित्रकार नजरेला न दिसणारे रंग वापरून कलाकृती बनवेल आणि रसिक त्याचा यथायोग्य आस्वाद देखील घेऊ शकतील. या वाढलेल्या विस्तारलेल्या उम्फ वर्ल्डचा आनंद घेता येणे किती भन्नाट असेल नाही!!

- अनुप

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 May 2019 - 5:55 pm | कंजूस

मजाच!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 May 2019 - 7:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण मानवी उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या टप्प्यानंतर आपण कानाने ऐकणे , तोंडाने बोलणे ,डोळ्याने पहाणे. त्वचेने स्पर्श जाणवणे , जिभेने चव बघणे वगैरे "शिकलोय". आता हे सगळे उलटेपालटे करायचे म्हणजे सगळी गडबड होणार की!!
मजा सोडुन देउ. पण दिव्यांग लोकांना हे वरदानच वाटेल.

टर्मीनेटर's picture

7 May 2019 - 9:36 pm | टर्मीनेटर

भन्नाट कल्पना आहे! _/\_

अमेरिकन त्रिशंकू's picture

8 May 2019 - 12:31 am | अमेरिकन त्रिशंकू

काही लोकांना हे नैसर्गिकरीत्या होतं. त्याला सिनस्थेशिया असं म्हणतात.

Synesthesia is a condition in which one sense (for example, hearing) is simultaneously perceived as if by one or more additional senses such as sight. Another form of synesthesia joins objects such as letters, shapes, numbers or people's names with a sensory perception such as smell, color or flavor.

Rajesh188's picture

8 May 2019 - 8:39 am | Rajesh188

पण हे सर्व शक्य आहे का की फक्त कल्पना आहे .

अन्या बुद्धे's picture

8 May 2019 - 1:26 pm | अन्या बुद्धे

शक्य आहेच घडलं देखील आहे..

https://youtu.be/4c1lqFXHvqI

उगा काहितरीच's picture

8 May 2019 - 7:14 pm | उगा काहितरीच

वॉव ! रोचक आहे की .

अनिंद्य's picture

9 May 2019 - 11:46 am | अनिंद्य

रोचक !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2019 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक विषयावरचा लेख.

सद्या मानवी शरीराला "इलेक्ट्रो-मेकॅनिकल-केमिकल डिव्हाईस" समजून (ते एका अर्थाने तसे आहेच म्हणा !) त्याच्यावर प्रयोग करणे चालू आहे. आणि त्यातून अनेक चमत्कृतीपूर्ण माहिती पुढे येत आहे.

लेखाचे शीर्षक "उमवेल्ट किंवा उम्वर्ल्ड" असे हवे कारण तो मूळ जर्मन शब्द "Umwelt (environment or surroundings)" असा आहे.

अन्या बुद्धे's picture

9 May 2019 - 12:20 pm | अन्या बुद्धे

ओहक्के.. सुधारणेसाठी धन्यवाद!