राजमाची-डाऊन द मेमरी लेन

Primary tabs

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
10 Feb 2019 - 11:13 am

साल २००२ - आम्ही ४ मित्र एकाच कंपनीत कामाला होतो. चौघेही सडेफटिंग होतो. त्यात आमच्या दोघांचा कॉलेजनंतरचा पहिलाच जॉब होता. रोज रोज तेच तेच काम करून वैतागलो होतो.एक दिवस टूम निघाली की या रविवारी कुठेतरी ट्रेकला जाऊया. पण सगळ्यांनाच ट्रेकिंगची सवय नव्हती, त्यामुळे ट्रेक असा पाहिजे की रूट माहितीचा हवा. ट्रेकची मजा आली पाहिजे आणि शिवाय फार कठीण नसावा. शनिवारी रात्री निघून रविवारी परत यायचे तर राजमाची बेस्ट पर्याय होईल असे सर्वानुमते ठरले आणि आम्ही कल्याण स्टेशनवर भेटलो. कल्याण ते कर्जत मग पहाटे पायपीट करत वरती उधेवाडी आणि किल्ले बघून गावात जेवून संध्याकाळी कर्जतला खाली उतरलो.अर्थातच तो एक मस्त ट्रेक झाला आणि त्याची आठवण आमच्या मनात कायम राहील.

कट २ -साल २०१९ तेच चार मित्र पण आता वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर स्थावर झालेत. लग्न मुलेबाळे होऊन पोटे वगैरे सुटली आहेत. आणि अचानक एक दिवस कायप्पा ग्रुपवर गप्पा मारत असताना पुन्हा भेटूया का असा विषय निघाला. एकदा कुटुंबरहीत आणि एकदा कुटुंबासहित भेटूया असा सूर निघाला. आणि अर्थातच फार प्लॅनिंग न करत कुटुंबरहीत पहिले भेटायचे ठरले. इतक्या वर्षांनी सर्वांचे ट्रेकिंग जवळ जवळ बंदच पडले असताना पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करण्यासाठी आम्ही परत राजमाचीची निवड केली. लोणावळा ते कर्जतला उतरून जायचे ठरले.

२६ जानेवारीचा मुहूर्त ठरला आणि मी व एकजण पुण्याहून तर राहिलेले दोघे ठाण्याहून येऊन लोणावळ्याला भेटायचे ठरले. लोणावळ्याहून उधेवाडीपर्यंत जीपची सोयही झाली आणि जीपवाल्यानेच उधेवाडीत जेवायचेही सांगून ठेवले. त्यामुळे ट्रेक तसा सुटसुटीत होणार होता. मी ८ ची लोकल पकडणार होतो पण योगायोगाने त्याआधीची सह्याद्री मिळाली त्यामुळे वेळेपेक्षा लवकरच पोचलो. जुजबी सामान घेऊन आणि फार तयारी आणि फोनाफोनी न होता सकाळी ९-९.३० च्या दरम्यान लोणावळ्याला भेटलो.तसा फोनवर संपर्क असतो पण एकमेकांना प्रत्यक्ष भेटल्यावर मधली वर्षे जणू पुसली गेली आणि एकमेकांची सुटलेली पोटे , विरळ झालेले केस आणि मागे लागलेली औषधे यांचा जणू विसर पडला. जीपवाला तेव्हढ्यात आलाच.ख्याली खुशाली विचारता विचारता जीपमध्ये बसून बाहेर पडलो आणि जोश्यांच्या अन्नपूर्णामध्ये दणकून नाश्ता केला. रीतसर चिक्की वगैरे घेतली आणि पुन्हा जीप उधेवाडीकडे धावू लागली. हिंदी चित्रपटात अनेक वर्षांनी पुन्हा गावी परतलेल्या हिरोची जशी अवस्था होते तशीच काहीशी आमची झाली होती. जिथे व र्षात १५ वेळा यायचो तिथे आता १५ वर्षांनी येत होतो.अरे, या डोंगरावर हे काय नवीन झाले? तो ओढा कुठे गेला? इथे एक मोठे झाड होते ते कधी पडले? तिथली जागा कुंपण घालून कोणी बळकावली? असे अनेक प्रश्न विचारून सगळ्यांनी जीपवाल्याला भंडावून सोडले. तोही पक्का गाववाला होता त्यामुळे साद्यन्त माहिती देत होता. तासाभरात जीप गावात पोचली.
a

नाश्ता झाला होताच त्यामुळे फार वेळ न घालवता सॅक जीपवाल्याच्या घरात ठेवून आणि जवळ फक्त पाण्याची बाटली घेऊन तडक किल्ल्याकडे कूच केले.थोडी दगडी पायऱ्यांची वाट वर जाताच संपली आणि भैरवनाथाचे देऊळ सामोरे आले. भैरोबाचे दर्शन घेऊन बाहेर आलो.बाहेर एक दोन वीरगळ आणि समोर दगडी घोडा आणि एक न समजणारे शिल्प ठेवले होते.
a
एका तोफेची नळीपण होती.
a
a

आता मनरंजन डावीकडे तर श्रीवर्धन उजवीकडे दिसत होता. ऊन वाढू लागले होते त्यामुळे वेळ न घालवता श्रीवर्धनाकडे निघालो. एकीकडे परिसराचे निरीक्षण चालू होते तर दुसरीकडे गप्पांमध्ये विविध विषय येत होते.जसेजसे उंची वाढत होती तसतसे आजूबाजूचे दृश्य अधिकच ठळकपणे नजरेत भरत होते. आणखी थोड्या चढाई नंतर श्रीवर्धनच्या दरवाजात येऊन पोचलो. दरवाजा जरी पूर्णपणे ढासळला असला तरी त्याची गायमुखी रचना आणि आसपास पडलेले घडीव दगड त्याच्या वैभवाची कल्पना द्यायला पुरेसे होते.
a

a
भैरोबाचे देऊळ आता छोटे दिसु लागले होते. आणि आसपासचा मोठा परीसर नजरेत येउ लागला होता.
a

पुन्हा चढाईला सुरुवात केली आणि लगेचच एक पाण्याचे जोडटाके समोर आले. एकाखाली एक अशी रचना केल्याने पावसाळ्यात भरलेले पाणी त्याकाळी बरेच महिने पुरत असेल असे वाटून गेले आणि कारभाऱ्यांच्या चातुर्याला दाद दिली.

एक वळसा घालून वर आलो आणि दगडात कोरलेली जोड गुहा दिसली.
a
काही वर्षांपुरवी याच गुहेत रात्री राहिलो होतो आणि लाकडे नीट न पेटवता आल्याने कच्चा भात आणि वरण खाऊन झोपायची वेळ आली होती. पण नशिबाने कर्जतचा एक छोटा ग्रुप आला होता त्यांनी आमची हालत पहिली आणि मोठ्या दिलदार मनाने त्यांच्यातील जेवण आम्हाला खाऊ घातले. बरे नात्याची न गोत्याची, ती पोरे आम्हाला पुन्हा कधी भेटली पण नाहीत.ह्याला म्हणतात ट्रेकिंगचा धर्म. अजूनही तिथे चूल आणि राख होती.
a
समोरच मनरंजन किल्ल्याची तटबंदी दिसत होती.

गुहेच्या दारावरची नक्षी अजूनही टिकली आहे. आत उतरून खोलीतल्या भिंतीवर अजून काही दिसते का याचा शोध घेतला पण कुंभारमाशीच्या घरट्यांशिवाय काहीच दिसले नाही. बाहेर पडलो आणि गडाच्या सर्वोच्च ठिकाणी जिथे भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता तिथे पोचलो.बुरुजावर यो पब्लिकची गर्दी जमली होती. फुल जत्रा, बुरुजावर रेलून, गळ्यात गळे घालून सेल्फ्या बिल्फ्या घेतल्या जात होत्या.
आमचा पलीकडे उतरून लांबवर दिसणाऱ्या छोट्या बुरुजाकडे जायचा विचार होता. पण हाती असणारा वेळ आणि दुसरे ठिकाण बघायचा बेत ह्यामुळे तो रद्द केला आणि पटापट खाली उतरलो. ह्याहीवेळी मनरंजन बघायचा राहून गेला तो आत पुढच्या वेळी बघू असे ठरवत गोधनेश्वर मंदिर आणि उदयसागर तलावाकडे पावले वळवली.
a

वाटेत मारुती रायाला वंदन करून पुढे निघालो.
a

आसपास रेंगाळणाऱ्या गुरांमुळे गोधनेश्वर मंदिर हे नाव अगदी सार्थ ठरत होते.
a

a

a

मंदिराचे घडीव खांब , तुळया आणि दगडी थंड गाभारा तळपत्या उन्हात फारच आकर्षक वाटत होता. खांबावरची कलाकुसर पुसत होत चाललेली.आजूबाजूचे घडीव दगडाचे आवार म्हणजे थकल्या भागल्या ट्रेकर्सना मुक्कामाला एकदम आदर्श जागा.आणि समोरच गोमुखातून पडणाऱ्या पाण्याने भरलेले कुंड तहान भागवायला मस्तच. थोडा वेळ तेथे रेंगाळून जुन्या आठवणीत रमलो.
a

पण लवकरच पोटातल्या कावळ्यांनी भुकेची जाणीव करून दिली आणि आमची पावले पुन्हा गावाकडे वळली.
a
लवकरच भाजी भाकरी आमटी भाताचे ताट समोर आले आणि सगळ्यांनी दुष्काळातून आल्यासारखा आडवा हात मारला.
a

आता खरी कसोटी लागणार होती. कारण ऊन डोक्यावर आले होते आणि भरल्यापोटी चालायचे होते. पण संध्याकाळी घरी पोचायचे वचन दिले असल्याने चालायला तर हवेच होते. जीवावर येऊन उठलो आणि जेवण व जीपचे पैसे चुकते करून निघालो. गाववाल्यानी दाखवलेल्या रस्त्याने मार्गक्रमण करीत करीत पुढे चाललो होतो.ऊन मी म्हणत होते, पण थन्डीचे दिवस असल्याने घाम फार येत नव्हता.चाकोरीच्या रस्त्याने चालत निघालो.
a
अर्धा तास झाला आणि मनरंजन ची मागील बाजू दिसू लागली. मनात शन्केची पाल चुकचुकली पण रस्ता विचारायला कोणी भेटेना. मोबाईलला रेंज नसल्याने गुगलबाबा पण रुसून बसले होते. मागच्या रस्ता चुकण्याचा अनुभवाने ही वाट पुन्हा लोणावळ्याला जाते कि काय अशी धाकधूक वाटू लागली. शेवटी मनाचा हिय्या करून परत फिरलो आणि माणूस भेटेपर्यंत मागे जायचे नाहीतर गावात जाऊन पुन्हा रस्ता विचारायचा असे ठरले.
सुदैवाने अर्ध्या रस्त्यातच एक मामा भेटले. ते डोक्यावर काहीतरी घेऊन वळवणला धरणाकडे निघाले होते. त्यांनी आम्हाला रस्ता समजावला आणि आम्ही मागे येऊन योग्य रस्त्याला लागलो.काही वेळातच एक झोपडी आणि तटाचा तुटलेला भाग दिसला आणि पलीकडे आ वासून असलेल्या दरीने स्वागत केले.

a

दुपारचे ३ वाजले होते.झटझट उतरायला सुरुवात केली. ट्रेनचे हॉर्न ऐकायला येत असल्याने शहरीकरणाची खूण पटत होती. वाटेत जमल्यास कोंढाणे लेणीसुद्धा बघायची होती. त्यामुळे पटापट पाय उचलत होतो. २० मिनिटात पहिला टप्पा लागला.
a
इथे रस्ता उजवीकडे वळत होता,जमीन सपाट होती आणि झाडी एकदम विरळ होती. पाणी पिऊन आणि जरा दम खाऊन पुढे झालो. कुठे कारवीचे जंगल तर कुठे नुसतीच झुडपे आणि गवत तर कुठे प्रचंड वृक्ष दिसत होते. उंची झपाट्याने कमी होत होती आणि खालची उल्हास नदी स्पष्ट दिसत होती. लवकरच दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पाही पार पडले. फारसा रस्ता चुकण्यासारखे काही नव्हतेच.
a
उतारामुळे दमही लागत नव्हता. पण गप्पांच्या नादात आम्ही जरा जास्तच खाली उतरलो आणि कोंढाणे लेणी मागे राहिली.
a

a
आता सूर्यही मावळतीला आला होता त्यामुळे कोंढाणे लेणी बघण्याचा बेत रद्द करून आम्ही सरळ कोंदिवडे गावात आलो.
a
वाटेत गोगट्यांचे अंबेजोगाई आणि व्याडेश्वर मंदिर लागले आणि सहजच जाऊन दर्शन घेऊन यावे म्हणून आवारात शिरलो.तेव्हढ्यात गोगट्यांपैकी एक भाऊ जाळीचे दार लोटून बाहेर आले आणि तुम्हाला दर्शन घेता येणार नाही अशी घोषणा करून मोकळे झाले. मला काही समजेना. मी विचारले का दर्शन घेता येणार नाही? त्यावर "तुम्ही वरतून हिंडून आला आहेत म्हणून" असे उत्तर मिळाले. मला त्याचा अर्थच लागेना. अंबेजोगाई तर माझी कुलदैवताच आहे आणि आम्ही काही दारू पिऊन किंवा मांसाहार करून आलो नव्हतो. पण एकूण प्रसंग बघून आणि आम्ही दमलेले असल्याने तिथे वाद घालत बसायची माझी इच्छा होईना.त्यामुळे देवीला बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. एकूण प्रसंगाने दुधात मिठाचा खडा मात्र पडला.
सहा आसनी रिक्षा करून कर्जत स्टेशनला आलो. पुन्हा जरा भूक लागल्यासारखी वाटत होती त्यामुळे श्रमपरिहारार्थ स्टेशनबाहेरच वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला. तोवर ठाणेकरांची लोकलची आणि पुणेकरांसाठी प्रगती एक्सप्रेसची घोषणा झालीच. त्यामुळे फार वेळ न घालवत पटापट तिकिटे काढली आणि आपापल्या गाड्या पकडून घरी रवाना झालो ते आता वरचेवर भेटत राहू असे आश्वासन देऊनच.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Feb 2019 - 2:38 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय. वाढलेलं ताट भारी! :)
त्यावरचा झाडीचा फोटो सगळ्यात आवडला!
इतर फोयोसुद्धा मस्त.

कंजूस's picture

10 Feb 2019 - 5:20 pm | कंजूस

व्वा!

राजमाचीच्या खूप आठवणी आहेत. कुठल्याही ऋतूंत गेलं तरी राजमाची तितकाच प्रसन्न वाटतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा प्रत्येक मौसमात त्याचे रुपडे नवेच भासते. पांगळोली पुढची कातकरी वस्ती ओलांडून पुढे गेल्यावर त्याचे होणारे प्रथमदर्शन मनाला खूपच आनंद देते. तिथून जसजसं पुढे जाऊ तसतसं तो अधिकाधिक जवळ येत राहतो, एका क्षणी त्याचे दोन्ही बालेकिल्ले आपल्या पाठीमागे राहिलेले असतात मग एक दिर्घ वळण ओलांडून गेल्यावर परत तो थेट आपल्या पुढ्यातच उभा राहतो.

कोकणदरवाजाने उतरणेही तसे सोपे, पण उतार संपता संपत नाही. एकेक टप्पा उतरत गेलो तरी कोकण खोलवरच दिसत असते. वाट चुकण्याचा फारसा संभव नाहीच पण एकदा पदरात घुसल्यावर असंख्य ढोरवाटा फुटतात. काही वेळा त्यात कोंडाण्याला जाणारी वाट अचूक गवसते तर काही वेळा वाट थेट कोंदिवड्यात घेऊन जाते.

छान लिहिलंत तुम्ही. माझ्याही राजमाचीच्या कित्येक आठवणी जागृत झाल्या.

मी दरवर्षी १५ मेच्या आसपास जातो. उन्हाळ्यातला सह्याद्री थंडितल्यापेक्षा अधिक चांगला असतो. करवंदं, जांभळं,भोकरं,आंबे. पक्षी जोरात गातात. तलावातली आंघोळ, टाक्यातलं गार पाणी, झाडांची सावली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2019 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं ट्रेकवर्णन आणि फोटो !

कर्जत जवळील व्याडेश्वर व अंबेजोगाई ही मंदिरे गोगटे यांच्या खाजगी मालकीची असून , केवळ व्यवसायवृद्धी या उद्देशाने बांधलेली आहेत . धर्मादाय नाहीत .त्यामुळे आपल्या मालकीच्या ठिकाणी कुणी प्रवेश करावा , दर्शन कुणी घ्यावे याचा हक्क त्याच्याकडेच .

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Feb 2019 - 5:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणणे बरोबर आहे तुमचे, पण मला त्या वेळी तरी ते अनपेक्षित वाटले म्हणुन लिहिले ईतकेच

दीपा माने's picture

19 Feb 2019 - 12:41 am | दीपा माने

सुंदर ट्रेकचा प्रवास त्यातच कंजुस यांच्या मोजक्याच पण आल्हाददायक निसर्ग प्रवासाची खुणगांठ फारच विलोभनीय वाटली.

दुर्गविहारी's picture

19 Feb 2019 - 6:21 pm | दुर्गविहारी

अतिशय उत्तम ट्रेक वर्णन ! येत्या मे महिन्यात राजमाचीला जाण्याचा विचार करतो आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Feb 2019 - 8:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

तिकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल त्या वेळी असे वाटते. जवळ पाणी जास्त बाळगा असे सुचवेन मी तरी.