भाग 2...
सूरत शहरातून निघाल्यावर
मित्रांनो आपण भाग १ वाचला आहे. समजा त्यात म्हटले आहे त्या प्रमाणे माल जप्त केला गेला आहे… तर मिलिट्री कमांडरच्या नजरेतून अभ्यास करत असताना पुढे काय करावे लागेल?..
सुरत शहरातील लुट मिळवून महाराज घाईघाईने निघाले असावेत. साधारणपणे जिथे माल हस्तगत केला जातो तिथून शक्य तितक्या पटकन ती जागा सोडून पाठलाग व्हायची भिती कमी असेल तिथे पोहोचून मिळालेल्या मालाची मोजणी, प्रतवारी, किंमत आणि नंतर 4शे किमीपेक्षा जास्त अंतर घेऊन जायला वाहतुकीचे काय मार्ग अवलंबावेत याचा विचार करून सैन्याची विभागणी करायला बारडोली हे गाव सोईचे असावे. कारण उन, कानसाद, अदाडा, अमलसाड , नवसारीही दक्षिणेच्या वाटेवरील खेडगावे समुद्रसपाटीपासून 10 मिटरपेक्षा कमी उंची वर आहेत म्हणून वाटेत दलदली, आणि पुर्णानदीचे पात्र समुद्राला मिळताना भरती ओहोटीचा प्रभावपडून रुंद होत असल्याने त्यातून हजारो जनावरांना घालून इतक्या लांब येऊन हिम्मत करून मिळवलेला माल वाहून न जावा किंवा ओला होऊन खराब व्हायची शक्यता लक्षात घेणे मिलिट्री कमांडरांना म्हणजेच महाराजांच्या लेखी महत्वाचे ठरते.
पहिला तळ बारडोलीला … सूरत (10 समुद्रसपाटीपासून उंची 10 मीटर) हून बारडोली अंतर 40 किमी. सपाट 30 मी. उंची, नदी, ओहोळाचे पात्र ओलांडायला सोपे. ताशी 3 ते 4 किमी 10 तासात कापून रात्री मुक्काम. तिथे रात्रीच्या शांत वेळात लुटीचे तीन किंवा जास्त भाग केले असावेत.
1.एक भाग बोजड सामानाचा - कनातीचे खांब, गालिचे, लहान मोठे तंबू, खुंट्या दोर, विदेशातून आलेले कापड गठ्ठे, तोफांच्या दारूची, हत्यारांची लहान-मोठी लाकडी खोकी, अवजड लोखंडी उपकरणे, जेवणावणी बनवायची उंची भांडी- कुंडी, शोभिवंत अवजड दरवाजे, नक्षिकाम केलेल्या जाळ्या, लाकडी कोरीवकाम, लोखंडी माल, तांबे पितळेची अवजड चीजवस्तू, अन्य समुद्रातून आणताना ओलेचिंब झाले, बुडले, नष्ट झाले तरी चालेल असे सामान .
2. दुसरा भाग अती किमती माल - तयार दाग-दागिने, सोन्या चांदीच्या लडी-विटा, मोहोरा, दाम, वराह, महमूदी, लारी, पौंड, शिलिंग, रियाल अशी विविध देशोदेशींच्या चलनांच्या थैल्या भरलेल्या रोख रक्कमा, विविध आकाराच्या धारदार पात्यांच्या रत्नजडित मुठींची शस्त्रे. किंमत जास्त पण पाठीवरून वाहून न्यायला सोईचा असा कोठल्याही परिस्थितीत न गमवायचा ऐवज.
3. तिसरा भाग -किमती कापड, मसाल्याचे पदार्थ, अफू? चहा? परदेशात विकायला येईल अशी मालाची खोकी, गठ्ठे. हा माल गमावायला लागला तरी चालेल असा ऐवज.
कोणता माल उचलायचा कोणता नाही ते त्यांना आधीच्या १६६४ सालामधील प्रकारातून माहिती असावे.
दिनांक 6 ऑक्टोबर १६७० सकाळी ६ वाजल्यापासून... सर्व जनावरांचे तांडे एकामागोमाग लावून आधी बैलावरील मालवाहक वाटाडे ज्यांना त्या भागातील बोलीतून गाववाल्या लोकांकडून पुढे जाऊन खायची प्यायची सोय करायला पुढाकार घेणारे असावेत. नंतर वेगवेगळ्या जातीच्या गाढवांच्या तांड्यांसोबत पायदळाचे महाराजांच्या माहितीतील सरदार सैनिक. त्यामागे चाकांच्या गाड्यांना ओढत नेणाऱ्या जनावरांचा काफिला असे हळूहळू सकाळी दहा पर्यंत सर्व मालजनावरे सुरतेची वेस ओलांडून पुढे गेल्यानंतर महाराजांच्या बरोबर असलेल्या खास रक्षकांची स्क्वाड्स, संदेशवाहक हलकारे, जासूसी टोळी जायला तयार झाले असावेत. तो पर्यंत दहा हजार सैन्यापैकी सात हजार घोडदळ पुढची फळी (अॅडव्हान्स फोर्स) पुढे गेले असावे. उरलेल्यांना सुरतच्या तापी नदीच्या पलीकडील काठावर, अहमदाबादहून सुभेदार बहादूर खानाचे सैन्य घेऊन आला तर त्याला थोपवला ठेवले असावे. या मध्ये महाराजांच्या आपल्या बरोबरचे १ हजार सैन्य मागच्या आणि पुढच्या फोर्सशी संपर्कात राहून आपल्या कडील सैन्य संचलनाच्या आज्ञा, संदेश मिळवून पुढील कूच करायचे नियोजन करण्यात मदत करत असावेत.
सुरतच्या जनतेतील आर्थिक विषमता इतकी असेल की आपण इथून निघून गेल्यावर प्रचंड गहजब माजून जे काही हाती लागेल ते पळवून नेणारे झुंडीने लुटालूट, जाळपोळ, धार्मिक दंगे, आपापसातील वैर याला उत येऊन मुघलांना त्यांना आवरता आवरता अशक्य होईल आणि ते सर्व जान-मालाचे, विदेशी व्यापाराचे, जहाज वाहतूकीचे अपरिमित नुकसान, करोडोंचे दरवर्षी मिळणारे जकातीचे उत्पन्न पुढील अनेक वर्षाकरिता न भरणाऱ्या जखमेप्रमाणे ठसठसत राहणारा असेल. हे कलंक ‘शिवा’च्या म्हणजे महाराजांच्या नावावर लावले जाणार आहेत! याची पूर्ण जाणीव ठेवून ‘आता नाही तर कधीच नाही’ या इरिशिरीने इथून पार घरपोच होईपर्यंत अगदी जपून व न गमावता नेणे ही प्रचंड कसरत आहे याची जाणीव महाराजांना म्हणजे सध्याच्या मिलिट्री कमांडरच्या आखणीत आहे.
…
सरावाच्या मालवाहक जनावरांना १२ तास पिदडवून मधे मधे थांबत 2 तास, वैरण, दाणापाणी यासाठी विश्रांती, एका गाढवावर (त्याचा आकार, वय पाहून दोन्ही बाजूला लटकलेल्या पडशात एकूण *50 ते 70 किलो भार त्याच्या बरोबरच्या चालकाच्या खांद्याला पाण्याच्या पिशव्या. अशी एकूण गाढवे, बैल, बैलगाडी १ हजार होती असे मानले तर (म्हणजे ५ ते ७ शे टन) म्हणजे सध्याच्या काळात 5 टन मालवाहू टाटा कंपनीचे १०० ते १४० ट्रक . आता १ हजार मालवाहक जनावरे किंवा (सध्याच्या काळातील १४० ट्रक) एका मागे एक जात असताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेऊन ते आपापसात संगनमत करून मधल्यामधे सटकून पसार होऊन जात नाहीत ना? कारण त्यांना माहिती आहे ‘हपापाचा माल गपापा’ केला तर कोण पकडणार नाही!
...
* जगातल्या काही गाढवांच्या जाती 150 किलो पर्यंत वाकडेतिकडे आणि जड माल लीलया नेताना वापरल्या जातात. पण एका वेळी ते किती दूरवर असे वजन नेऊ शकतात हे नक्की माहित नाही. म्हणून 50 ते 70 किलो इतपत वाहून नेतील असे धरले आहे.
तळटीप :-१६६४ च्या नंतर औरंगजेबाने सूरत शहराला संरक्षक भिंत बांधून द्यायचा हुकूम दिला होता. पण गलथानपणा, आपापसातील हेवेदावे, पैशाचा अपहार यामुळे भिंतीचे काम अर्धवट सोडून दिले होते. एप्रिल १६७० पासून शिवा सुरतेवर हल्ला करायला निघाला अशा बातम्या वेळोवेळी येत म्हणून ५ हजार फौज घेऊन गुजरातचा सुभेदार बहादुरखान व्यापार्यांच्या समाधानासाठी काही महिने सुरतेत राहिला होता. पण उत्तरेत अफगाणिस्तान आणि इराण मधे संघर्ष सुरु झाला म्हणून औरंगजेबाने दक्षिण सुभ्यातील अनेक वेचक सरदारांना त्यांच्या सैन्यासह पंजाब, सिंध भागात नेमले. अशाच एका सैन्य पथकातून नेतोजी पालकरांची रवानगी काबूल मोहिमेला झाली होती.
विरजी व्होरा हे सुरतेतील व त्यावेळच्या जगाच्या बाजारपेठेतील अव्वल स्थानावर होते. त्यांनी १६६४ नंतर स्वतः च्यापेढ्यांसाठी सुरक्षाव्यवस्था केली होती. पण ऐनवेळी सुरतच्या किल्ल्यावरून सैनिक सुरक्षा मिळेना म्हणून त्यांना व अन्य गबर श्रीमंत धनिकांना त्यांच्या पेढ्या, घरेदारे, मालाची कोठारे जीव वाचवण्यासाठी उघड करून द्यावी लागली. आपली जरब बसली पाहिजे म्हणून महाराजांनी डच, इंग्रजांना धमकाऊन त्यांनी त्यांच्या वखारीबाहेर येऊन न देण्याची ताकीद दिली होती. मात्र त्या भागात जो सापडेल त्याचा शारीरिक छळ करून, मारून, धाक दाखवत माल मिळवायला गेलेल्या सैनिकांना दौलत विना अडथळा धनसंपत्ती आपणहून देण्याची सोय केली असावी. अशा पैकी एका वेळी अँथनी स्मिथ महाभाग आपल्या अंग चतुराईने मरणाच्या दारातून सुटले होते. तो वृतांत पूर्वीच्या एका धाग्यावर दिलेला होता.
भाग ३ पुढे चालू...
प्रतिक्रिया
29 Jan 2019 - 6:53 pm | आनन्दा
वाचतोय
29 Jan 2019 - 8:03 pm | शशिकांत ओक
बहुतेक टिचकीमारू विचारात पडायला होते आहे म्हणून 'वाचतोय 'असा आनंदाने प्रातिनिधिक शेरा दिला आहे. त्यांच्याशी सहमत आहेत असा गोड गैरसमजाचा निष्कर्ष काढून वाट पहात आहे.
29 Jan 2019 - 7:32 pm | दुर्गविहारी
एका निराळ्या दॄष्टीकोणातून या घटनेचा अभ्यास सुरु आहे. सध्या थोडा घाईत आहे. वेळ मिळाला कि सविस्तर प्रतिसाद देतो.
29 Jan 2019 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक माहिती ! पुढचे भाग पटापट टाका.
2 Feb 2019 - 1:25 pm | शशिकांत ओक
प्रतिसाद अपेक्षित डॉक्टर साहेब...
आपले आणि दुर्गविहारी, दिलीप वाटवे, प्रचेतस आणि अनेक इतिहास व दुर्ग गिरी प्रेमींचे
आपल्या प्रतिसादातून पुढील लिहायला उर्मी येते....