हंपीला गवसणी भाग 2

Primary tabs

kool.amol's picture
kool.amol in भटकंती
27 Jan 2019 - 7:40 pm

मी हंपीला गवसणी घालणार हे आता नक्की झालं होतं. पण त्यापूर्वी आपण जिथे जाणार आहोत त्या जागेच वैशिष्ट्य काय, महत्व काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसा मी एक अभ्यासू आहे असा एक (गैर)समज खूप आधीपासून प्रचलित आहे. मी पण ही झाकली मूठ उघडण्याच्या फंदात कधीच पडलो नाही. असो. तर हंपी इथे नक्की काय आहे हे आंतरजालावर बरचसं वाचायला मिळेल. पण मला ते विस्कळीत स्वरूपात वाटलं. त्यामुळं UPSC करणाऱ्या एका मित्राकडून मी काही नोट्स मागवल्या. तिथून मात्र इतिहास समजला. तो खूपच रोमांचकारी आहे.

त्यापूर्वी हंपीच्या भागाचा उल्लेख अगदी पुराणात देखील आहे. पार्वतीचा एक अवतार म्हणजे पंपा. ह्या अवतारात पार्वतीने महादेव पती म्हणून मिळावा यासाठी तपश्चर्या केली पण महादेव देखील तपश्चर्येत होते. त्यांची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून पार्वतीने इंद्राची मदत मागितली. इंद्राने ह्या कामासाठी कामदेवाला पाठवले पण झाले उलटेच. महादेवाला भयंकर राग आला आणि त्यांनी स्वतःचे तिसरे नेत्र उघडून कामदेवाला भस्म करून टाकले. थोडक्यात हा प्रयत्न फसला. त्यामुळे आता महादेवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने त्यांच्यासारखेच विरक्त आयुष्य जगायला सुरू केले आणि इथूनच जवळ असणाऱ्या हेमकुंटा पर्वतावर तपश्चर्या सुरू केली. अनेक वर्षांनंतर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला. पंपा हे संस्कृत नाव कन्नडा मध्ये येताना हंपा झालं आणि ज्या जागी महादेवाने पार्वतीचा स्वीकार केला ती जागा म्हणजे हंपी! ह्या महादेवाला विरुपाक्ष असे म्हणतात. म्हणूनच इथे महादेव विरुपाक्ष ह्या रूपात आहेत आणि त्यांचं मंदिर हे आजही मोठ्या दिमाखात उभं आहे. साधारणतः 7 व्या शतकापासून या मंदिराचे दाखले मिळतात. याच्या नावातच सर्व काही आहे. विरुप अक्ष किंवा विरुप आख्य ह्या अर्थाने महादेवाला संबोधलं जातं. बाकी माहिती नंतर ओघाने येईलच.

हे झाले पौराणिक दाखले! पण ऐतिहासिक महत्वही खूपच मोठं आहे. हंपीची ओळख ही विजयनगर साम्राज्य म्हणून होत असली तरी आधीच्या चालुक्य आणि होयसळ साम्राज्यपासून इथे वस्ती आहे आणि विरुपाक्ष मंदिर तर विजयनगर साम्राज्य स्थापन होण्याच्या साधारण 700 वर्षे आधीपासून तिथे होतं.

आजच्या घडीला हंपीची ओळख म्हणजे भारतातील काही निवडक जागतिक वारसा स्थळांपैकी एक अशी करून देता येईल. जवळपास 1600 वेगवेगळी स्थानं इथं आहेत. 26 किलोमीटर इतक्या विस्तीर्ण जागेत हे वारसा स्थळ पसरलेलं आहे विशेष म्हणजे अजूनही इथे उत्खनन सुरूच असतं. इतकी भव्यता ह्या ठिकाणची आहे. जवळपास 200 वर्षे हंपीमध्ये वेगवेगळी बांधकाम विजयनगर साम्राज्याच्या काळात सुरू होती. हंपीचा पाडाव झाल्यानंतर 6 महिने शिस्तबद्ध पद्धतीने ह्या शहराचा विनाश करण्यात आला. दक्षिणेतील 5 शाह्या जेव्हा एकत्र आल्या तेव्हाच हा पाडाव शक्य झाला. इतकं करूनही हे शहर पूर्णपणे नष्ट नाही झालं आणि आजची त्याची स्थिती बघता समृद्धीच्या शिखरावर ते कसं असेल ह्याची कल्पना करताना आपली बुद्धी काम करेनाशी होते.

हजारोनी स्थान असली तरी काही मोजकीच स्थान बघून आपण प्रसन्न पावतो त्याचबरोबर आपली दमछाक देखील होते. गेल्या काही वर्षात हंपीने परत एकदा पर्यटकांना, भटक्यांना, चित्रपटकर्त्यांना, विविध अभ्यासक, माहितीपट निर्माते, इतिहास संशोधक यांना भुरळ घालायला सुरुवात केली आहे. ही जागा आहे देखील तशीच विलक्षण! मागच्या वर्षी हंपी नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला. एका चॅनलने हंपी डायरीज हा हंपीवर विशेष कार्यक्रम देखील केला. ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे हंपीची वाढलेली लोकप्रियता. प्रसिद्धी तशी हंपीला काही नवीन नाही. एके काळी हंपी हे जगातील सांस्कृतिक, व्यापारी, शैक्षणिक, कला, स्थापत्य, धार्मिक, राजकीय ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर होतं. बीजिंगनंतर हंपीच नाव घेतलं जायचं. भारतात तर त्याच्या तोडीच कुठलंही शहर नव्हतं. अनेक प्रवासी खूप कष्ट घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यातुन फक्त हे शहर बघायला यायचे. यातच सर्व काही आलं. डच, पोर्तुगीज, चिनी, इराणी इथून आलेल्या प्रवाशांनी ह्या शहराविषयी खूप काही भरभरून लिहिलं आहे. त्यामुळे हंपी बघणं ही इच्छा ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होती. 14व्या किंवा 15व्या शतकातल्या अनेक परदेशी प्रवाशांसोबत मी स्वतःची विनाकारण तुलना केली आणि त्यांनी ज्याप्रमाणे हंपीवर लिहिलं तसंच मी देखील लिहायचं ठरवलं आणि म्हणूनच हा पोस्टप्रपंच! पण एक गोष्ट मात्र नक्की हंपी बघण्याची एक विलक्षण ओढ मला होती त्याच कारण काही केल्या समजत नाही. अशी ओढ इतर स्थळांबाबत नसते म्हणजे उत्सुकता असते मात्र जायला मिळालं नाही तर फार दुःख होत नाही. हंपीच्या बाबतीत मात्र असं नाही. मी बरेचदा हंपीविषयी मिळेल ते वाचत असतो. तिथे गेल्यावर मी खूप फोटो काढले. मला तिथे विठ्ठल मंदिरात एक ब्रिटिश भेटला. तो देखील एकटाच आला होता. आमच्या गप्पा रंगल्या. कामानिमित्त अनेक वर्षे तो आफ्रिकेत होता. निवृत्तीनंतर तो सपत्नीक भारत फिरायला आला होता. त्याने आफ्रिकेत असताना कोणाकडून तरी हंपीविषयी ऐकलं आणि ती बघण्याच्या ओढीने तो इथे आला होता. हे दाम्पत्य गोव्यात आलं तिथे काही दिवस राहिलं आणि ह्या आजोबांची आजीला भुणभुण सुरू झाली की हंपीला जाऊ पण आजी म्हणे नाही मी इथे निवांत बिअर पीत राहणार आहे (हे आजोबांनीच मला सांगितलं). आजी ऐकत नाही हे बघून ते करारी आजोबा एकटेच हंपीला आले होते आणि मला भेटले तो त्यांचा दुसरा दिवस होता. फक्त ताजमहाल बघून ते परत जाणार होते. हंपी अशी आहे, ओढ लावणारी. त्यामुळेच असेल कदाचित पण सहजासहजी तिला गवसणी घालता येत नाही.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

27 Jan 2019 - 8:51 pm | यशोधरा

वा, मस्त लिहिलंय!

तर आता एक दोन फोटो बघायला आम्हाला हेमकुटावर तपश्चर्या करावी लागेल का?

kool.amol's picture

27 Jan 2019 - 10:40 pm | kool.amol

अहो मी खूप प्रयत्न केला पण फोटो टाकताच येत नाहीयेत. मिपाला अजून सरावलो नाहीय त्यामुळे. कोणी मदत केली तर फार बरं होईल. माझ्या ब्लॉगवर मी नेहमीच टाकतो, मला फोटोशिवाय लिखाण नाही आवडत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2019 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर चित्रे टाकण्याची कृती या लेखातल्या माहितीचा उपयोग होऊ शकेल.

ब्लॅागवरच्या फोटोवर क्लिक केल्यावर जी लिंक मिळते तीच
या

फोटो ( १ ) शीर्षक
<img src="लिंकइथेटाका" width ="480"/>

टेम्प्लेटात टाका आणि ते इथे पेस्ट करा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2019 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान चालली आहे लेखमाला..

14व्या किंवा 15व्या शतकातल्या अनेक परदेशी प्रवाशांसोबत मी स्वतःची विनाकारण तुलना केली आणि त्यांनी ज्याप्रमाणे हंपीवर लिहिलं तसंच मी देखील लिहायचं ठरवलं आणि म्हणूनच हा पोस्टप्रपंच!

"३५व्या शतकात झालेल्या उत्खननात मिपाचा डेटा साठवलेला सर्वर मिळो आणि तुमचेही त्या प्रवाशांसारखेच नाव होवो" ही शुभेच्छा ! ;) :)

kool.amol's picture

27 Jan 2019 - 10:58 pm | kool.amol

शुभेच्छा देताना सुद्धा किती छान कल्पकता आहे. 35व्या शतकात उत्खनन झालं आहे आणि मिपाच्या सर्व्हर मधून माहिती मिळते आहे, 21व्या शतकात भारतातील एक प्रवासी अमोल कुलकर्णी अनेकदा हंपीला येऊन गेला आणि त्याच्या लेखांतून खूप माहिती मिळाली...वा कल्पनाच किती मस्त आहे!

भुमन्यु's picture

29 Jan 2019 - 2:33 pm | भुमन्यु

पण एक गोष्ट मात्र नक्की हंपी बघण्याची एक विलक्षण ओढ मला होती त्याच कारण काही केल्या समजत नाही.

हेच माझंही झालंय, ३ वेळा जाउन आलोय, अजुनही परत जावस वाटतंय.

सुरेख लिहिताय. फोटो टाकण्याचा प्रयत्न करा प्लीज म्हणजे लेखाला अजुन शोभा येइल. पु.भा.प्र.

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2019 - 10:16 pm | चौथा कोनाडा

वाह, खुपच सुंदर लिहीलंय.
लेखनशैली भारी च आहे, त्यामुळं लेख खुप रोचक झालाय ! तपशील क्लास लिहिलेत. फोटो देखील असेच हटके असतील असं वाटतंय !

कुलमोल, लै भारी,
पु भा प्र.