क्ष-वर्षे मिपा चॅलेंज

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
20 Jan 2019 - 1:16 am
गाभा: 

टेन यिअर चॅलेंजचे फॅड

सध्या सोशल मीडिया वर 10 year challenge ची जोरदार हवा आहे. सुपरिचित (सेलेब्रिटी) व्यक्तींच्या बरोबरीने नंदा, मंदा, गण्या, पम्या, अंता, बंता असे तुमच्या आमच्या सारखे जन सामान्य देखील या फॅड मध्ये सहभागी होत आहेत. सोमी वरील सक्रिय असणारी बरीच मंडळी मोठया उत्साहाने आपले दहा वर्षांपूर्वीचे आणि सध्याचे फोटो एकत्रित असे अपलोड करीत आहेत. सोमी वर येनकेन प्रकारेण आपले फोटोज्, सेल्फीज्, स्टेट्स टाकणाऱ्या आणि ट्रॅव्हलिंग टू, एटिंग विथ, एन्जॉयिंग ऍट वगैरेचा भडिमार करणाऱ्या मंडळींना मी "खुदपे फिदा" म्हणतो. जर फोटोजेनिक आणि बघणेबल असा चेहरा असेल तर हे एक वेळ सुसह्य अन्यथा ही एक प्रकारची नेत्रीक्षाच ! अशा "मला पहा फुले वहा" वृत्तीच्या खुफि मंडळींना हे नवीन, दहा वर्षांचे फॅड म्हणजे तर पर्वणीच. जणू स्वतःचे फोटो टाकायला अधिकृत कारणच. काहींनी तर दहा वर्षांवर न थांबता वीस किंवा त्या आधीचे देखील फोटो सोमी वर अपलोड केले आहेत. बघा मी अजूनही कशी/सा तरुण आणि सुंदर दिसते/तो किंवा दहा वर्षांपूर्वी मी लहान होते/तो, आता तारुण्यात प्रवेश केल्यावर बघा कशी/सा दिसते/तो (या निमित्ताने आपली भाषा लिंग निरपेक्ष कधी होणार हा विचार मनात येतो परंतु तो विषय सध्या बाजूला ठेवुयात) हे दाखवण्याचा उद्देश असावा की काय न कळे. कदाचित या मुळे अल्पकाळ आणि मर्यादित वर्तुळात का होईना परंतु सुपरिचित (सेलेब्रिटी) झाल्याचे समाधान मिळत असावे. सध्याच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि सोशल मीडिया या चतुःसूत्री वर आधारित जीवन पद्धतीत पहिल्या तीन गरजा भागल्या नंतर शेवटची, चौथी गरज या निमित्ताने पूर्ण होत असावी असे वाटते.

या चॅलेंजचा नक्की उद्देश माहित नसला तरी सोमी वर कुठलीही गोष्ट अपलोड करताना विचारपूर्वक करावी हेच खरे. कदाचित हा सगळा डेटा चेहरा ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरच्या अल्गोरिदम साठी तर वापरला जात नाही ना? वय वाढल्याने चेहऱ्यात काय फरक पडतो हे पाहून पुढे फोटो वरून वय ओळखण्याचा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा (फोटो वरून वय गाठण्याचा) उद्देश असू शकतो. किंवा जाहिरातींसाठी माहिती गोळा करण्यासाठी देखील हा सगळा डेटा वापरला जाऊ शकतो. केवळ गंमत म्हणून सुरु झालेला हा प्रकार तुमच्या ओळख-चोरी साठी वापरला जाईल का? "तुमचा चेहरा हीच तुमची ओळख" हि कळ-किल्ली (पासवर्ड) काही आता फार दूर नाही. त्यामुळे हे चॅलेंज लवण-चिमटीने घेतलेलेच बरे !

दहा वर्षांच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते किंवा आधुनिक काळाशी सुसंगत असे म्हणायचे झाले तर सोशल मीडियावर बरेच फोटो, स्टेट्स, कॉमेंट्स येऊन जातात त्यामुळे चेहऱ्याची ठेवण, शरीरयष्टी, वजन ही शरीरांतर्गत लक्षणे आणि सुरकुत्या पडणे, केस पांढरे होणे, टक्कल पडणे, चष्मा लागणे, हिअरिंग एड, गळपट्टा लागणे (प्लास्टिक किंवा ऑर्थोडॉण्टिस्ट सर्जरीचा विचार बाजूला ठेवू यात) अशी बाह्य लक्षणे दिसू शकतात. या दृष्टिगोचर गोष्टींमधला फरक जरी सहज लक्षात येत असला तरी स्वभाव, वृत्ती, कल, आवडी निवडी, विचार, पसंत/नापसंत गोष्टी, अभिव्यक्ती मध्ये सुद्धा फरक पडतो जो फोटो मध्ये भले दिसत नसेलही.

आपण जे मिपावर किंवा आंजा वर लिहिता किंवा वाचता त्यामध्ये तुमच्या स्वतःच्या किंवा इतरांच्या लिखाणात वयानुसार आणि कालानुसार पडणारा हा जो अमूर्त (इनटॅंजिबल) फरक आहे तो तुम्हाला जाणवतो का? अग्गोबै/अर्रेच्या मी तेव्हा असे लिहले होते? असे तुम्हाला वाटते का? आयुष्याच्या विविध भल्या बुऱ्या अनुभवातून जाताना, टक्के टोणपे खाल्याने तुम्ही प्रगल्भ झाला पाहत का? तुमची मते, जाणिवा अधिक टोकदार झाल्या आहेत का? तुमच्या विचारसरणीत काही फरक पडला आहे का? आपण पूर्वी केलेले लिखाण या दृष्टिकोनातून तपासले तर हा फरक कळू शकेल.

असे सिंहावलोकन करण्यासाठी आपण "क्ष-वर्षे मिपा चॅलेंज" स्पर्धा खेळुयात. मिपाकरांचे मिपा-वय हे वेगवेगळे असल्याने प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून क्ष वर्षे असे म्हटले आहे. क्ष हि संख्या तुम्ही दोन किंवा अधिक वर्षे अशी धरू शकता. यामध्ये मुख्यतः दोन प्रकार असतील.

१) तुम्ही तुमचे स्वतःचे साधारणतः दोन किंवा जास्त वर्षांपूर्वीचे लिखाण वाचायचे आणि नुकतेच केलेले एखादे लिखाण वाचायचे.
या दोन्ही लिखाणाच्या लिंक्स येथे देऊन तुमच्या मते तुमच्या स्वतःमध्ये स्वभाव, विचार इत्यादी काही फरक पडला आहे का याचे या दोन्ही लिखाणा संदर्भात सोदाहरण विवेचन करायचे. तुम्हाला व्यक्तिशः किंवा लिखाणाद्वारे ओळखणारे मिपाकर देखील यावर मत प्रदर्शन करू शकतील.

(बघा बघा, स्वतःच्या लिखाणाची झैरात करायला सुसंधी आहे ना?).

२) तुम्हाला आवडणाऱ्या मिपा-लेखकाच्या जुन्या आणि नव्या लिखाणाची समीक्षा तुम्ही करू शकता. दोन्ही लिखाणाच्या लिंक्स येथे देऊन तुम्ही तुमचे मत मांडा. त्यामुळे खुद्द त्या लेखकाला त्याच्या मधील बदलते कल (ट्रेट्स) कळतील जे कदाचित त्याच्या स्वतःच्या देखील लक्षात आले नसतील आणि त्यावर चर्चा करता येईल. .

(बघा बघा, तुम्हाला स्वतःला समीक्षक झाल्यासारखे तर वाटेलच परंतु मुख्य म्हणजे आपल्या कंपूतील इतरांचे धागे मिपात्खनन करून वर काढता येतील).

तळटीपा:
अ } समीक्षा करताना व्यक्तिगत टीका टाळाव्यात परंतु एखादया विषयावर मत बदल दिसून आला, एखाद्या मुद्द्यावर घुमजाव केलेलं दिसले तर जरूर निदर्शनास आणावे जेणे करून या बदला मागची कारण मीमांसा जाणून घेता येईल.
ब } नव्याने केलेल्या लिखाणातील विचारात समतोलपणा आणि प्रगल्भता दिसली तर ते स्पष्ट करावे.
क } जिकडे सरशी तिकडे XXX अशी कालसुसंगत संधीसाधू वृत्ती दिसली तर जाणीव करून द्यावी.
ड } जुन्या लिंक्स देताना https (with " s ") अशा द्याव्यात.
इ } केवळ गम्मत म्हणून हे चॅलेंज घ्यावे. उखाळ्या पाखाळ्या काढण्यासाठी किंवा स्कोअर सेटलिंग साठी वापरू नये हि कळकळीची नर्म इनंती.

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

20 Jan 2019 - 10:07 am | कुमार१

विचारांना चालना मिळाली आहे हे कबूल.
बघतो प्रयत्न करून.

तरी क्रुपा करुन diging कसे करावे ते सांगावे.

या चॅलेंज मध्ये आमचा समावेश होऊ शकत नाही. असे अवघड निकष लावल्याबद्दल निषेध :D;)

बदल घडण्यासाठी पुरेसा कालावधी असावा म्हणून किमान दोन वर्षांची मर्यादा ठेवली आहे.
तुम्हाला दहा वर्षांपूर्वी आणि आत्ता तुमच्यात काय बदल घडला आहे असा विचार करता येईल.

Blackcat's picture

20 Jan 2019 - 11:51 am | Blackcat (not verified)

छान

नाखु's picture

20 Jan 2019 - 1:14 pm | नाखु

दहा वर्षांत मिपावर फारसा बदल झालेला दिसतोय का? हुकमी विषयावर हुकमी कब्बडी ,खो-खो खेळ तसेच राहिलेले आहेत फक्त खेळाडू बदलले.
रूचिपालट म्हणून अधेमधे पुणेरी-अपुणेरी,आस्तिक नास्तिक,असला हूतूतू चालतो पण कधीतरीच,कारण काही खेळाडू आखाड्यात मुक्कामी आहेत.
कथा,समीक्षा याला उपेक्षेने मारल्यावर त्याचाही दुष्काळ आहे.
चांगले उपक्रम राबवूनही डोळस लिखाण आणि प्रतिसादी हात यांची म्हणावी तशी प्रगती झाली नाही.

राजकीय धुराळ्याने तर मी मिपावर फिरकत नाही हे सुद्धा स्टेटस सिम्बॉल गणले जाते.

१२ वर्षांपूर्वी मिपावर दाखल झालेला चिल्लर वाचकांची पत्रेवाला नाखु

यशोधरा's picture

20 Jan 2019 - 1:17 pm | यशोधरा

+१

आनन्दा's picture

20 Jan 2019 - 2:45 pm | आनन्दा

चामुंडाराया

तुमची पण "ही" सक्रिय झाली की काय?

नाखु's picture

20 Jan 2019 - 3:50 pm | नाखु

नको देवराया च्या पद्धतीने संबोधले आहे!खुलाश्यातील खलाशी नाखु वाचकांची पत्रेवाला नाखु

जयंत कुलकर्णी's picture

20 Jan 2019 - 7:24 pm | जयंत कुलकर्णी

+१
//कथा,समीक्षा याला उपेक्षेने मारल्यावर त्याचाही दुष्काळ आहे.
चांगले उपक्रम राबवूनही डोळस लिखाण आणि प्रतिसादी हात यांची म्हणावी तशी प्रगती झाली नाह////
सहमत.
चढ उतार असतात हे मान्य केल्यास, हा उतार फारच तीव्र आहे असे वाटंतंय खरं. उताराच्या शेवटी रसतळ नसावा म्हणजे मिळवली.

:-)

होय, राजकीय विषयांवर मोठा धुराळा उडतो असे दिसते आहे.
विशेषतः मोदी-रागा चे भजन-गायन सुरु झाले कि दोन्हीही बाजूचे टाळकरी (कि ट्रोलकरी?) पेटून उठतात असे निरीक्षण आहे.

Blackcat's picture

20 Jan 2019 - 2:47 pm | Blackcat (not verified)

माझा हा आयडी दहा वर्षे राहो , त्यांनतर चॅलेंज स्वीकारले जाईल

हा हा ... मी लिहिताना हा विचारच केला नव्हता डॉक्टर साहेब !

तेव्हा फक्त कालावधीचाच विचार न करता जुना आयडी बॅन झाल्यानंतर नवीन आयडी घेतल्यावर काय बदल झाला असा विचार करता येईल.
किंवा एकाच वेळी दोन आयडी चालू असतील तर आपलाच आयडी क्रमांक १ आणि क्रमांक २ असा तौलनिक अभ्यास करता येईल.

हा नवीन भाग धाग्यात ऍडवता येईल का? इथे बहुधा स्वसंपादनाचा पर्याय नाहीये.

रच्च्याकने तुमचा हा सद्यकालीन आयडी यावच्डेटा मिपाकरौ चालू राहो हि सदिच्छा.

आनन्दा's picture

21 Jan 2019 - 11:16 am | आनन्दा

बाकी डु आयडी मान्य करायला गट्स लागतात बर्का
त्याबद्दल काळ्या मांजराचे अभिनंदन!!

सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 11:39 am | सुबोध खरे

तुम्ही नुसत्या दुसऱ्या लेखकांच्या लेखांवर काड्या टाकण्याच्या ऐवजी काही तरी स्वतः सकस लेखन करा.

म्हणजे मग असे सारखे आय डी बदलायची गरज पडणार नाही.

बाकी १० वर्षांपुर्वीचा मी आणि आत्ताचा मी यामध्ये विचर करायचा झाला तर
माझी अनेक बाबतीतील तीव्र मते सौम्य झाली आहेत - जसे की महात्मा गांधी/ शिवजी महाराज/ संभाजी महाराज वगैरे - ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा त्यांच्या करिश्म्यापलिकडे जाऊन माणुस आणि त्याहीपुढे जाऊन आपल्या काळाचे अपत्य म्हणून विचार करायला मला मिपानेच शिकवले असे मी म्हणेन.. त्यापुर्वी मी असा विचार करत नव्हतो असे नाही, पण त्या विचाराला खोली मिपा ने दिली.

माझे देखील इंटर पर्सनल रिलेशनशिप बद्दलची मते सौम्य झाली आहेत. मतभेद किंवा वेगळा दृष्टिकोन समजावून घ्यायला शिकलो आहे मात्र त्याच बरोबरीने प्रादेशिक, राजकीय, धार्मिक मते हि जास्त टोकदार आणि कित्येकदा कटू देखील झाली आहेत. हे कशामुळे न कळे .

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jan 2019 - 10:37 am | प्रकाश घाटपांडे

अरे वा! छान! मन भूतकाळात गेलं. काही लेखांमागे जालीय इतिहास असतो. काहींचा माग काढता येतो तर काहींचा इतिहास कालकुपीत असतो. त्या मागील वास्तव हे सर्वांनाच माहीत असत अस नाही. मग जे काही गवसत त्यावरुन आडाखे बांधले जातात. ते वास्तवाला धरुन असतातच असेही नाही. काही लेख हे त्या त्या काळाची अपत्ये असतात. आपण लेखन व प्रतिक्रियांवरुन त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाविषयी काही अंदाज बांधत असतो. तसेच काही अपेक्षाही ठेवत असतो. त्या पुर्ण होतातच असे नाही. हे वाचता वाचता एक जुना लेख आठवला.
आमचं बी क्वाश्चुम डिजाईन
तत्कालीन मौज मजा म्हणूनच पहावा. इतिहासात अडकू नये. नॉस्टल्जिया म्हणून ठीक आहे. इथे उत्खनन सम्राट आहेतच आम्ही बी व्हतो. :)

घाटपांडे काका तुमचे क्वाश्चुम डिजाईन भारीये.

गेल्या दहा वर्षात मिपात काय बदल झाले बघायचे झाले तर एक तुमचे आणि प्रा.डॉ. सरांचे अशी एक दोन नावे सोडली तर एकाही प्रतिसाद लिहिणाऱ्याचे नाव ओळखीचे वाटले नाही.

हि सगळी मंडळी का मिपा सोडून गेली? का फक्त वाचनमात्र उरलेत?
बऱ्याच जणांनी शेवटचे लिखाण सात ते आठ वर्षांपूर्वी केलेले दिसते आहे तर काहींना ऍक्सेस डीनाईड येतो आहे.

नथिंग इज पर्मनंट बट द चेंज हेच खरे.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Feb 2019 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे

नथिंग इज पर्मनंट बट द चेंज हेच खरे.

अगदी मनातल.

विजुभाऊ's picture

30 Jan 2019 - 10:25 am | विजुभाऊ

धम्या डॉन्या आंद्या , वगैरे सगळीजण आहेत इथे.
पिडांकाका बहुतेक वाचनमात्र असावेत,
रामदास , प्रभू मास्तर , साक्षी , हे क्वचीत दिसतात.
प्राजू चे पु वर दिसते.
केसु , बेसनलाडू , भडकमकर मास्तर हे कुठेच दिसत नाहीत.
३.१४अदिती ने ऐसी अक्षरे वर नवा पट माम्डल्यावर तिचे इथले लिखाण थाम्बलेच.
टार्‍या , गटणे हे परतलेच नाहीत,
आंबोळी , वपाडाव , शँपेन , पिरा, प रा , निदे , मक, इनोबा, डॉ दाढे हे दिसतच नाहीत.
पेठकर काका , गणपा , स्वाती राजेश, हे शेफ मम्डळी अभावानेच दिसतात.
जागु ताई मात्र नियमीत दिसतात.

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2019 - 2:58 am | पिवळा डांबिस

पिडांकाका बहुतेक वाचनमात्र असावेत,

खरंय, मिपावर आठवड्यातून दोन-तीन वेळा येऊन वाचत असतो. क्वचित प्रतिसादही लिहितो.
पण नवीन काही लिखाण गेला बराच काळ प्रसिद्ध केलेलं नाही हे मात्र खरं.
विशेष कारण असं काही नाही, हल्लीच्या राजकीय-सामाजिक विषयांबद्दलची माझी अजाणता, वाढलेले इतर व्याप आणि वाढतं वय ही कारणं असू शकतील.
पूर्वी न पटलेल्या मतांचा हिरिरीने प्रतिवाद करत असे, पण आता "मरो तिच्यायला, जे ते आपापल्या कर्माने मरतंय; आपण कशाला उगाच कळफलक बडवा!" असा विचार मनात येऊन स्वस्थ बसतो.
:)
तरीही कुणाला जर माझं जुनं लिखाण पहायचं असेल तर सभासद क्रमांक ४०१ शोधला तर मिळू शकेल...

विजुभाऊ's picture

30 Jan 2019 - 10:40 am | विजुभाऊ

क्ष वर्षे साठी हे आमचे काही पांढर्‍यावर काळे केलेले
https://www.misalpav.com/node/25166
आणि सगळ्यानी हजेरी लावलेले हे धमुचे लग्न
https://www.misalpav.com/node/1545
https://www.misalpav.com/node/1624