देवगिरी किल्ला

Primary tabs

अभिजित भिडे's picture
अभिजित भिडे in भटकंती
6 Jan 2019 - 1:37 pm

देवगिरी किल्ला

औरंगाबादपासून जवळच असलेला देवगिरी उर्फ दौलताबादचा किल्ला म्हणजे
महाराष्ट्राच्या शिवपूर्वकालीन दैदीप्यमान इतिहासाचा चालता बोलता साक्षीदारच. हा किल्ला स्थापत्य शास्त्राची एक अजोड अशी कलाकृती म्हणूनही ओळखला जातो. शिवछत्रपतींनी सतराव्या शतकात स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सुमारे पाचशे वर्ष आधी ( बाराव्या शतकाच्या अखेर ते चौदाव्या शतकाच्या आरंभी दशकापर्यन्त) देवगिरीच्या यादवांचे स्वकीय हिंदू साम्राज्य होते. हा देवगिरी साम्राज्याचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक सोनेरी पान म्हंटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या वैभवाचा जणू उत्कर्षबिंदूच.

असा हा देवगिरीकिल्ला पाहणे अनेक वर्षे माझ्या Wishlist वर होते, पण योग आला नव्हता. परंतु ह्या नाताळच्या सुट्टीत मनाने उचल खाल्ली आणि धावती का होईना पण जेवढी म्हणून सुट्टी मिळाली तेवढी, म्हणजे 3 दिवसांची औरंगाबादची वारी ठरवली. पण औरंगाबाद म्हणजे वेरूळ, अजंठा, लोणार अशा मानव व निसर्गनिर्मित जागतिक आश्चर्यांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे देवगिरीकिल्ल्या बाबत साशंकताच होती. तसेच हे कमी की काय म्हणून घृष्णेश्वर आणि पैठण अशी धार्मिक स्थळेही खुणावत होती. दख्खनचा ताजमहालही भर औरंगाबाद शहरात आहे म्हणजे तो तर बघणे आलेच.
शेवटी पहिल्या दिवशी लोणार व बीबी-का -मकबरा, दुसऱ्या दिवशी अजंठा व पैठण आणि तिसऱ्या दिवशी मुंबई (मार्गे देवगिरी- वेरूळ- घृष्णेश्वर) असा प्रतिदिन सुमारे ३००-३५० कि .मी .प्रवासाचा महत्वाकांक्षी बेत आखला.( दुसरा पर्यायच नव्हता)
हॉटेलमधून न्याहारी- checkout असे सोपस्कार करेस्तोवर चित्र फारसे आशादायी उरले नव्हते. जेमतेम एक-दिड तासच आमच्या आणि देवगिरीच्या वाटेस आला होता. अंदाज अपना अपना मधील गोगो प्रमाणे "आया हूं कुछ तो लेके जाऊंगा" असे म्हणत पळत पळत देवगिरी पाहायचे ठरविले.

देवगिरीकिल्ला औरंगाबादपासून अंदाजे 20 किमी वर मुंबईच्याच दिशेने वेरूळ लेणी मार्गावर आहे. सुमारे अर्ध्या तासात आम्ही किल्ल्याशी पोहोचलो. तेथे कार पार्किंगची सोय आहे. तसेच किल्ल्याची माहितीपुस्तिका व guide ही उपलब्ध आहेत. मला वेळ मर्यादित असल्याने मी माहीतीपुस्तिका घेतली( तसेही in general, guide च्या ज्ञानाच्या सखोलते विषयी I have my own doubts.)

भुईकोट आणि डोंगरी अशा दोन्ही प्रकारात मोडू शकेल असा बहुदा हा एकमेव किल्ला असावा. भुईकोट भागास दुहेरी आणि बालेकिल्ल्यास एकेरी तटबंदी आहे. भुईकोट तटबंदीच्या मुख्यद्वारातून आत शिरल्यावर अनेक तोफा मांडून ठेवलेल्या दिसतात. तोफांसंबंधी माहिती देणारा फलकही तेथे आहे. तेथून पुढे मुख्य वाटेमार्गे बालेकिल्ल्यावर जाताना मोठा हौद, भारतमाता मंदिर , चांदमीनार असे भुईकोट किल्ल्याचे भाग लागतात . डोंगरी किल्ला सदरात मोडू शकेल अशा बालेकिल्ल्या भोवती खोल खंदक आहे . खंदक ओलांडण्यासाठी
एकच वाट आहे आणि त्यावर सध्या लोखंडी पूल बांधला आहे. लोखंडी पुलाखाली पूर्वीचा मूळ पूल आहे. बालेकिल्ल्यावर येण्यासाठी एकच वाट असून ती अतिशय अरुंद, अंधारी व चकवणारी आहे. अंधारी व भुलभुलैया अशी रीतसर नावे ह्या वाटेला असावीत असे वाटते .बालेकिल्ल्याच्या मुख्य इमारतीच्या पायथ्याशी एक गणेश मंदिर आहे. मुख्य इमारत चढून गेल्यावर किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी दोन तोफा ठेवल्या आहेत. बालेकिल्ल्यावरुन बराच दूरवरचा टापू नजरेच्या टप्प्यात येतो.
‌स्थापत्यकलेचा अभिनव वापर करून तिहेरी तटबंदी, खंदक, बुरुजातील दारांची परस्पर वक्राकार रचना, बालेकिल्ल्याला जोडणारा एकमेव अंधारी मार्ग अशा अनेक प्रकारे हा किल्ला अजिंक्य व अभेद्य होता की जो फक्त फंदफितुरीनेच जिंकता यावा.

‌महाराष्ट्राच्या दुर्दैवाने म्हणा किंवा अजून कशामुळे, परंतु हा देवगिरीदुर्ग व यादव साम्राज्य परकीय यवनी धर्मांध राजवटी पुढे टिकू शकले नाही आणि खिलजीं ने ह्यास जिंकून घेतले. पुढे यवनी सुलतानांनी मूळ किल्ल्यात अनेक बदल व विस्तार केला. महंमद तुघलकाने तर काही काळासाठी देवगिरीला आपली दिल्लीची राजधानीच स्थलांतरित केली व देवगिरी हे नाव बदलून दौलताबाद असे नाव ठेवले. आजही दौलताबाद हे नाव जास्त प्रचलित आहे.
‌आपल्या महाराष्ट्राभूमीत यवनी अंमल येण्यापूर्वी जवळ जवळ दिडशे वर्षे देवगिरीच्या यादवांनी राज्य केले. महाराष्ट्राच्या सर्वार्थाने समृद्धीचा हा काळ होता.
‌आपण इतिहास बदलू शकत नाही. त्यामुळे गतवैभवाचा काळ नुसता उगाळण्यात किंवा गत पराभव किंवा चुकांवर चडफडत बसण्यापेक्षा ह्यातून योग्य तो बोध घेऊन अशा ऐतिहासिक वारसांची जपणूक व सार्थ अभिमान बाळगणे हेच ईष्ट.
आपल्या पूर्वजांनी त्यांच्या पराक्रमाने साकारलेल्या ह्या समृद्ध वारशाची ओळख आपल्या पुढील पिढ्यांना करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मराठी साम्राज्याच्या ह्या पहिल्या राजधानीला एकदा तरी भेट देणं नक्कीच आवश्यक आहे.
- अभिजित

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

6 Jan 2019 - 6:16 pm | दुर्गविहारी

चांगला प्रयत्न केला आहे. फोटो टाकले असते तर आणखी बरे झाले असते. असो..पु.ले.शु.

दुर्गम दुर्ग देवगिरी, अभेद्य असा मिश्रदुर्ग. अफाट किल्ला आहे हा.
छायाचित्रांसोबत अजून तपशीलवार वर्णनही येऊ द्यात.

अजिंठा, वेरुळवर पण लिहा भो, हळवा कोपरा आहेत त्या लेणी म्हणजे.