अजून शंभर वर्षानंतर जात, धर्म आणि वंश या गोष्टींची स्थिती काय असेल? भारतीयांच्यापुरता विचार केला तर, यातले जात आणि धर्म आपण घट्ट कवटाळून आहोत.
या तिन्ही प्रकारांच अस्तित्व वेगवेगळ्या पातळीवरती असल तरी ह्या तिन्ही प्रकारांच्या आधारे आखलेल्या सीमारेषा धुसर होताना मात्र एकाच पातळीवरती आणि एकाच वेळेला होत आहेत. धर्माच्या बाबतीत सांगण थोड अवघड आहे कारण नागरिकरणाच्या (civilisation ला दुसरा शब्द सुचला नाही) प्रक्रीयेत बरीच वेगवेगळी स्थित्यंतर सहन करित आणि बय्राच स्थित्यंतरातून जात धर्म आजच्या अवस्थेत पोचले आहेत.
जातीच्या बाबतीत विचार करताना तो फक्त भारतीय द्रूष्टीकोनातून करावा लागतो. पुढे मांडलेले विचार हे फक्त महाराष्ट्रातील ज्या जाती-पोटजाती समोर आल्या त्यांच्याच अनुषंगाने आहेत, त्यामुळे त्याला खूप मर्यादा असणार आहेत.
आजचा आपल्या जीवनात जातीचा येणारा संबंध पहिल्यापेक्षा खूपच कमी झाला आहे. आता आपल्याला जात भेटते ती लग्न ठरवताना, क्वचितप्रसंगी सरकार दरबारी, घराण्याशी संबंधित देवाच्या कार्यक्रमात, अंत्य संस्काराच्या वेळी आणि बहुधा रोज जेवताना आणि हो जातीच्या आधारे स्थापन झालेल्या संघटनेच्या सभा-संमेलनात. यापेक्षा जास्त प्रसंग पटकन डोळ्यासमोर तरी येत नाहीत.
या गोष्टी सोडल्या तर इतर गोष्टी हिंदू धर्मात तरी इथून तिथून सारख्याच आहेत, जातिविशिष्ट नाहीत. आता जात ही काही वस्तू नसल्यामुळे आपण उपरोल्लेखीत प्रसंगी जी क्रूती करतो त्यावरूनच ती ओळखावी लागते, किंबहुना जातीच अस्तित्वच या गोष्टींमधे आहे. हे मोजके प्रसंग सोडले तर जात आपल्या आयुष्यात फार काही करते अशातला भाग नाही.
आजपर्यंतच जातीच अस्तित्व टिकून राहण्यात पुरूषप्रधान संस्क्रूतीचा वाटा मोठा आहे. कारण बळी तो कानपिळी ह्या नियमाप्रमाणे खूप वेळा आंतरजातीय विवाह झाले असतील, परंतू अपत्याने जात, घराणे ह्या गोष्टी बापाच्याच लावायच्या असल्याने जातीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फरक पडला नाही. ह्यानंतर जातीव्यवस्था टिकवण्यात दूसरा मोठा वाटा कुटूंबव्यवस्थेचा आहे. घरातली मोठी माणस परजातीतील मुलगी-मुलगा स्वीकारतील ह्याची शक्यता आजही फार कमी आहे. कुटूंबव्यवस्थेला (फक्त याच संदर्भात) दोषी धरण्यामागचे कारण अस की गद्धे पंचविशीत जातीच्या (कधी कधी धर्माच्या आणि वंशाच्यादेखील) अस्तित्वाचा त्रास वाटला नाही, वाटत नाही, असे लोक मला भेटायचे आहेत. एकत्र कुटूंबव्यवस्था नसती आणि लग्नासारख्या गोष्टींचे निर्णय ज्याचे त्यानी घेतले असते तर ही व्यवस्था किती काळ टिकली असती शंकाच आहे.
आता मात्र परिस्थिती वेगाने बदलत आहे. एकाच वेळेला एकत्रित कुटूंबव्यवस्था आणि पुरूषप्रधान संस्क्रूती यांच्यावरती आघात होताहेत. शिवाय आजपर्यंत, बय्राच मोठ्या प्रमाणावरती आजही, जीवनानंतरच्या (पारमार्थिक) सुखावरती भर देणारी आपली समाजव्यवस्था देखील हळू हळू ह्याच जीवनतल्या (ऐहीक) सुखावरती भर देऊ लागली आहे, ज्यामुळे आयुष्याच्या सगळ्या पैलूंकडे पाहण्याचा द्रूष्टीकोन बदलतो आहे.
जातींनी जेवढं नुकसान आपल्या संस्क्रूतीच केल आणि करत आहे, तेवढं दुसय्रा कुठल्याही गोष्टीनी केलय अस वाटत नाही.
हे घडत असणारं चांगल की वाइट हे ठरवायच्या भानगडीत मी पडलेलो नाही कारण त्यान परिस्थितीत फरक पडणार आहे अशातला भाग नाही.
या विषयावरील कौल मी (हे विचार लिहील्यानंतर) वाचला आहे.