.

भोपळ्याच्या फुलांची भजी

Primary tabs

जागु's picture
जागु in पाककृती
3 Dec 2018 - 2:49 pm

इतक्या दिवसांनी रेसिपी टाकतेय आणि मासे सोडून हिला फुलेच मिळाली का अस तुम्ही मनातल्यामनात नक्की म्हणत असाल ना. येतील येतील माशांच्याही अजून रेसिपी येतील लवकरच. पण बरेच दिवसांचा गॅप आधी पाना फुलांनी भरून काढुयात.

मी भोपळ्याच्या वेली लावल्या आहेत त्यावर रोज सुंदर पिवळी फुले फुलत असतात. अजून भोपळे लागले नाहीत व जी फुले येतात त्यांना भोपळे येणार नाहीत कारण येणार्‍या भोपळ्यावरच कळी येते. त्या एक दोन आहेत सध्या. तर अशी फुले सोडून रोज नुसती फुले खुप फुलतात. एक दिवस माझी मैत्रिण साधनाने ग्रुपवर एक सुंदर चायनिज व्हिडिओ टाकला. एक मुलगी परडी घेऊन शेतात जाते ताजी ताजी भोपळ्याची फुले काढुन परडीत टाकते. ती घरी आणते आणि धुवुन त्याची भजी बनवते. तो व्हिडिओ पाहिल्यापासून मला ती मुलगी व्हावेसे वाटू लागले आणि भोपळ्याची फुले मला रोज खुणावू लागली. एका शनीवारी सुट्टीत शेवटी मी ती मुलगी बनण्याचे ठरविले आणि तिच्यासारखी सुंदर परडी तर नव्हती माझ्याकडे पण घरातली एक प्लास्टीकची टोपली घेतली आणि निघाले फुले काढायला. मनात व्हिडिओतली म्युझिक वाजत होती व जणू त्या तालावर मी नाजूकपणे ती फुले खुडली. रेसिपी लिहायचीच होती व त्या फुलांना सोशल मिडीयावर सुप्रसिद्ध करण्याच्या हेतूने फोटो काढले.

१)

घरी जाऊन फुले परडीतच धुतली. फुलाच्या देढाचा भाग पुढे टाकलेल्या फोटोप्रमाणे कापले.

२)

त्यांना दुमडून घेतली.

३)

४)

एका वाडग्यात थोडे बेसनचे पीठ, चिमुटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पूड, अर्धा चमचा धणा पावडर व चवीनुसार मिठ घेऊन पाणी घालून ते जाडसर एकत्र कालवून भिजवून घेतल .
५)

६)

आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम केले व पिठाच्या मिश्रणात फुले बुडवून ती उकळत्या तेलात सोडली.
७)

८)

मध्यम आचेवर पाच मिनीटांनी पलटून परत पाच मिनिटे शिजू दिली आणि तयार झाली भोपळ्याची कुरकुरीत भजी.
९)

१०)

भजी झाली आणि माझी ती चायनिज व्हिडिओतली भुमिका संपून मी जमिनीवर परतले आणि भजीचा आस्वाद घेतला.

अधिक टिपा :
भोपळ्याची फुले मला कधी बाजारात दिसली नाहीत त्यामुळे भोपळ्याचे बी लावण्या पासून तयारी करा. Lol
भोपळा लागलेले फुल काढू नका भोपळ्याला इजा होण्याची शक्यता आहे.
पिठामध्ये धणेपूड नाही टाकली तरी चालेल.

प्रतिक्रिया

भोपळ्याच्या फुलांची भजी, याला 'हदग्याची' भाजी असे सुद्धा म्हणतात नं ? चूभूदेघे

नाही हदगा वेगळा. त्याची भाजी मी इथे एकदा टाकली होती.

प्राची अश्विनी's picture

3 Dec 2018 - 3:57 pm | प्राची अश्विनी

या फुलांची भाजी पण छान लागते. ठाण्याला जांभळी नाक्यावर मिळतात कधीतरी.

आता भोपळा लावायला कुठे जागा शोधू?

अनुप ढेरे's picture

5 Dec 2018 - 12:03 pm | अनुप ढेरे

भजी मस्तं दिसतायत!

नूतन सावंत's picture

10 Dec 2018 - 10:31 pm | नूतन सावंत

ही फुले मुंबईत मिळतात,पण कळी स्वरूपात असतात.नुसते,हळद,तिखट,मीठ लावून तांदुळाचे पीठ किंवा रवा लावून,देठासह शॅलो फ्राय करायची.मस्त लागतात.

महेश जोगलेकर's picture

17 Jun 2019 - 9:56 am | महेश जोगलेकर

यातील मसाल्यामुळे मूळ फुलांची चव लागली का? कि मारली गेली?
इटालियन पद्धतीत, झुकिनी च्या फुलांची पण अशीच भजी करतात (अर्थात त्यात एवढा मसाला नसतो)
https://www.maggiebeer.com.au/recipes/zucchini-flowers-with-ricotta-and-...