परदेशात असताना नेहमीच चकलीची भाजणी मिळणे शक्य नसते, परवाच ही कृती एका मैत्रिणीकडुन मिळाली आणि चकल्या चांगल्या, झटपट व कुरकुरीत झाल्या.
साहित्य -
२ कप तांदळाचे पीठ, १ कप बेसन, १/२ कप बटर, १ छोटा चमचा तिखट, थोडासा ओवा, तिळ, हळद चवीनुसार मीठ
कृती -
दोन्ही पीठे एकत्र मिसळून घ्यावीत.
बटर थोडेसे वितळून घ्यावे व पिठात घालावे, बाकीचेही सर्व साहीत्य या पिठात घालणे.
एका भांड्यात गरम पाणी करुन ते बेताबेताने वरील पिठात घालुन, पिठ चांगले मळुन घेणे.
तेल कढईत चांगले गरम करावे.
सो-याला आतुन तेल लावुन एका प्लास्टीकच्या कागदावर ४-५ चकल्या पाडुन घ्याव्यात व लगेच एकीकडे तळायलाही घ्याव्यात. साधारण मध्यम आचेवर चकल्या तळून घेणे. एक घाणा तळुन होइस्तोवर नविन चकल्या करुन ठेवाव्यात.
टीपा: विस्तवाची आच खुपच प्रखर असेल तर चकल्या बाहेरुन गडद दिसतात, पण आतुन कच्च्या रहातात. व आच कमी असेल तर चकल्या नीट तळल्या जात नाहीत.
वरील साहीत्याच्या साधारण ३०-३५ चकल्या होतात. आवडत असल्यास वरील पिठात लसुण वाटुन घातला तरी चांगला लागतो.
एका ताटलीत चकल्या व दही घेऊन जालावरील नविन साहीत्याचा आस्वाद घ्यावा!!
प्रतिक्रिया
1 Nov 2008 - 7:33 am | विसोबा खेचर
वा! तांदळाच्या चकल्या तर आवडल्याच, परंतु
एका ताटलीत चकल्या व दही घेऊन जालावरील नविन साहीत्याचा आस्वाद घ्यावा!!
हे वाक्य फार आवडले. किंबहुना मी असे म्हणेन,
एका ताटलीत चकल्या व दही घेऊन जालावरील नविन मारामार्यांचा आस्वाद अवश्य घ्यावा!! ;)
आपला,
(चकलीप्रेमी, जालप्रेमी) तात्या.
1 Nov 2008 - 10:16 am | प्राजु
मुरूक्क्कू असेहि म्हणतात.
ही रेसिपी मी बर्याच साऊथ ईंडियन लोकांच्या ब्लॉग्ज वर पाहिली आहे. आणि बर्याच जणिंना रेकमेंड केली आहे.. कारण त्यांच्याकडे भाजणी नव्हती. (माझ्याकडे होती.. आईकडून घेऊन आले होते येताना इकडे.. फ्रिज मध्ये अगदी जपून ठेवली होती.. :) )
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Nov 2008 - 10:40 am | रामदास
धन्यवाद.
1 Nov 2008 - 6:13 pm | स्वाती दिनेश
सखी,
आता पुढच्या भारतवारीत सोर्या आठवणीने आणेन म्हणजे चकल्या( भाजणी असेपर्यंत),मुरुक्कू करता येतील.फोटू का नाही ग टाकलास?
रेसिपीबद्दल धन्यु ग,
स्वाती
1 Nov 2008 - 6:58 pm | सखी
धन्यवाद प्रतिसादाबद्दल तात्या, प्राजु, रामदास, स्वाती.
तात्या,
'जालावरील मारामार्या' हा बोली भाषेतलाच शब्द झाला हो :)
हो गं प्राजु, हि रेसिपी ब-याचशा प्रमाणात मुरुक्कुच्या जवळ जाते असे मलाही वाटते, पण मी ज्यांच्याकडे मुरुक्कु खाल्ले आहे त्यात बेसनाऐवजी उडदाच्या डाळीचं पीठ घातलं होतं.
स्वाती, अगं काल फोटुचच बघत होते, पण जमलं नाही.