युट्यूब वर रेस्प्या पाहाणं एक टैमपासे माझा. त्यात ही एक रेस्पी दिसली. चांगली वाटली म्हणून आधी जशीच्या तशी केली पण नंतर जरा व्हेरीएशन केले तर जास्त चांगले लागले चवीला. म्हणून इथे ही रेसीपी देतो आहे. नक्की करून पाहा. सुरेख चव येते. घरामध्ये भाजी वगैरे काही नसतांना अतिशय चविष्ट असा प्रकार जमतो. भात, पोळी, फुलका, भाकरी कशाही बरोबर सुरेख लागतो.
तर साहित्य -
- एक वाटी विनासालाची मुगाची डाळ
- अर्धी वाटी हिरवे मटारदाणे (फ्रोजन/ताजे कुठलेही चालतील)
- एक मोठा टोमॅटो
- एक मध्यम कांदा
- दोन हिरव्या मिरच्या
- एखादा आल्याचा तुकडा
- ६/७ लसूण पाकळ्या
- जरासा खडा मसाला - एखादा दालचिनीचा तुकडा, ४/५ काळीमीरी चे दाणे, एखाददुसरी हिरवी वेलची, लहानसं तमालपत्र इ.
- लाल तिखट
- हळद
- हिंग
- मीठ
- तेल (आवडत असेल तर साजुक तूप)
- वरून घालायला कोथिंबीर
- मुगाची डाळ जरा भाजून मग पुरेश्या पाण्यात भिजत घालावी. मी मायक्रोव्हेव मध्ये १ मिनिट + १ मिनिट अशी भाजली.
- लसूण सोलून ओबडधोबड चिरून घ्यावा. कांदा, टोमॅटो आणि मिरची मध्य आकारांत चिरून घ्यावी. मटारदाणे फ्रोजन असतील तर थॉ करून घ्यावेत. आल्याचा तुकडा किसून घ्यावा. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. दोन वाट्या पाणीही गरम करावे.
- गरम कढईमध्ये पुरेसं तेल (आवडत असेल तर तूप) तापवून मोहोरी आणि खड्या मसाल्याची फोडणी करावी आणि त्यात लसूण, आलं हिरवी मिरची जरा सोनसळू द्यावी. मग कांदा घालून कडा लालतांबूस झाल्या की टोमॅटो; हा पूर्ण गळला की धूवून ठेवलेली डाळ निथळून मग यात घालावी. मंद आचेवर डाळ बर्यापैकी कोरडी होईस्तोवर तेलाच्या मसाल्यात परतावी. आता यात मटार, मीठ, हळद, तिखट घालून पुन्हा एकदा सगळं नीट मिसळून घ्यावं आणि मग कढत पाणी बेताबेतानं घालून डाळ झाकण घालून जरा कोरडीशीच शिजवून घ्यावी.
- पूर्ण शिजली की वरून कोथिंबीर घालून सजवावी आणि गरमगरमच खायला घ्यावी.
- डाळ आधी थोडी भाजणे आणि नंतर फोडणी-मसाल्यातही भाजणे यांमुळे बरीच हलकी होते आणि पुढे एक ५/७ मिनिटांतच शिजते तस्मात कढत पाणी घालतांना जरा बेताबेतानच घालणं महत्त्वाचं
- साखर/गूळ अजिबात वापरायचा नाहीय (मी वापरून पाहिलाय पण चव हवी तशी नाही जमत नंतर)
- खड्या मसाल्यात उन्नीस-बीस चलताय
- यिल्ड मोकळ्या भातापेक्षा जरासं मिळून आलेलं तरीही डाळीचे दाणे जाणवतील असं अपेक्षित
- हिरवे मटार दाणे आणि पिवळी डाळ असं दिसायलाही सुरेख दिसतं
प्रतिक्रिया
19 Oct 2018 - 9:57 pm | मुक्त विहारि
पण...
पण....
पण....
फोटो कुठे आहेत?
20 Oct 2018 - 9:28 am | श्वेता२४
नक्की करून बघेन नवीन प्रकार वाटतोय
थॉ करून घ्यावेत.
म्हणजे काय?
सोनसळू द्यावीत
टोमॅटो गळला
म्हणजे नेमके काय ते कृपया स्पष्ट करावे
22 Oct 2018 - 2:52 pm | यशोधरा
थॉ ह्याचा शब्दशः अर्थ वितळवणें असा घेता येईल, पण आता मटार दाणे वितळवणार कसे ना? तेव्हा फ्रीजरामधले गोठवले गेलेले दाणे रूम टेंपरेचराला आणा, असं सांगतायत लेखक महाशय शुद्ध मराठीत.
सोनसळू द्यावीत - सोनेरी, करडासा रंग येईपर्यंत हो!
टोमॅटो गळला - टोमॅटो परतायला लागलं की थोड्या वेळाने मऊ पडू लागतो आणि मस्त मिसळायला लागतो इतर जिन्नसांसोबत.
23 Oct 2018 - 11:02 am | श्वेता२४
शब्दकोशात नवीन भर पडली. नाहीतरी लेखक महाशय धागा काढून गायब झालेत. आपल्यामुळे शंकानिरसन झाले.
20 Oct 2018 - 9:43 pm | Ram ram
थॉ काय की बॉ?
25 Oct 2018 - 9:58 pm | योगेश कुळकर्णी
महाशय इथेच आहेत; जरा अग्नीशमनार्थ औट होतो बास... ;)
फोटो टाकणे शक्य होत नाहीय कारण मी गुगल फोटोज वापरत नाही आणि मजकडे फ्लिकर अकाउंट नाही :(
कायतरी करतो; दमा जरा...
26 Oct 2018 - 2:09 pm | श्वेता२४
हे संकेतस्थळ मोबाईलवरुन फोटो अपलोड करण्यास अत्यंत उपयुक्त व सोपे आहे. याला स्वताचे अकाउंट लागत नाही. जरुर प्रयत्न करुन पहा
26 Oct 2018 - 11:33 pm | योगेश कुळकर्णी
आता फोनवरून कसे अपलोड करायचे फोटो? आणि ते लेखांत कसे द्यायचे?
27 Oct 2018 - 7:35 am | कंजूस
फोटो १
फोटो २
27 Oct 2018 - 5:45 pm | श्वेता२४
भाकरी बरोबरचा फोटो बघून तर आता करूनच बघणार