युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १
युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग
युरोपच्या डोंगरवाटा ३: नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास
युरोपच्या डोंगरवाटा ४: ग्रीसच्या क्रिटी बेटावरील समारिया घळ (Samaria Gorge, Crete)
गेल्या भागात लिहिल्याप्रमाणे समारियाचा ट्रेक करणं शक्य झालं नव्हतं. परंतु वर्षभर खुली असणारी इम्ब्रोसची घळ बघता येणार होती. हिवाळ्यात तर समारिया बंद असतेच, शिवाय इतर वेळीही पाऊस पडल्यास किंवा उष्मा वाढल्यास समारिया बंद ठेवतात. अश्या वेळी टूर कंपन्या समारियाऐवजी इम्ब्रोसला घेऊन जातात. इम्ब्रोसचा ट्रेक समारियापेक्षा छोटा व सोपा आहे. घळीत पाणी क्वचितच असतं. इम्ब्रोसला जाण्यासाठी रस्ता आहे, फेरीची गरज नाही. अश्या अनेक कारणांमुळे क्रिटी बेटावर समारियाखालोखाल लोक इम्ब्रोसचा ट्रेक करतात.
पण याचा अर्थ असा नाही की दुधाची तहान ताकाने भागवायची म्हणून इम्ब्रोसला जायचं! इम्ब्रोसची घळही अतीव सुंदर आहे. त्यात वसंत ऋतूत तर रानफुलांचाही साज बघायला मिळतो.
फ्रांगोकास्टेल्लोहून स्फाकियाला जाताना थोडं अलीकडे कोमिताडेस (Komitades) गावापाशी इम्ब्रोसचं पार्किंग (नकाशातील IMBROS Tawerna) आहे. आदल्या दिवशी स्फाकियाहून परत येताना ही जागा बघून ठेवली होती. तिथून जवळच घळीचं खालचं दक्षिण टोक आहे आणि रस्त्याने गेल्यास १३ किलोमीटर अंतरावर उत्तर टोक आहे. दोन्ही दिशांनी ट्रेक करायचा नसेल तर या १३ किलोमीटरच्या रस्त्यावर खाजगी टॅक्सी आहेत. खरंतर हे पिकअप ट्रक असतात. पुढे बसायला मिळालं तर ठिक, नाही तर मागे मोकळ्या जागेत हवा भरलेल्या गादीवर बसावं लागतं. अर्थात खूप जणांना असा प्रवास आवडतही असेल!
१८ एप्रिलला सकाळी आरामात खाऊनपिऊन नवरा आणि मी निघालो. फेरीच्या वेळेचं वगैरे बंधन नव्हतं. इम्ब्रोसच्या पार्किंगमध्ये गाडी लावली. तिथून टॅक्सीने वर जायचं आणि घळ उतरून परत यायचं असं आम्ही ठरवलं होतं. टावेर्नापाशी टॅक्सीचा बोर्ड होता, आत जाऊन चौकशी केली. आणखी दोन मुलं तिथे कॉफी पित होती. त्यांचं आवरलं की एकत्र जाता येणार होतं. एकूण चारच जण असल्यामुळे सगळ्यांना बसायला जागा मिळाली. पंधरावीस मिनिटांत निघालो. ड्रायवर म्हणजे एक नमुनेदार व्यक्तिमत्त्व होतं! साठच्या आसपास वय असेल. त्या घाटरस्त्याचं हरेक वळण अंगात भिनलेलं असणार. एक हात खिडकीवर आणि दुसरा हात स्टिअरिंगवर ठेवून रस्त्याच्या मधोमध घाटात सुसाट गाडी चालवली. जोडीला मोठ्याने, पण सुरात कोणतंतरी ग्रीक लोकगीत म्हणणं चाललं होतं. समोरून घाट उतरणार्या गाड्या येत नसत्या तर गाण्याचा आनंद घेता आला असता!
हवा स्वच्छ असती तर वळणावळणाचा रस्ता आणि घाटाच्या तळाशी समुद्र असं मस्त दृश्य दिसलं असतं. एकदाचा चढ संपला. घळीच्या उत्तर टोकापाशी उतरलो. इथे थोडं पुढे इम्ब्रोस गाव आहे. याच नावाचं एक गाव तुर्कस्तानात आहे म्हणे. कोणे एकेकाळी दोन भावांना तिथून हाकलून दिल्यावर ते इथे डोंगरात येऊन राहिले आणि पुढे त्या जागेला आणि घळीला इम्ब्रोस नाव पडलं.
टॅक्सीला निरोप दिला. बरोबर आलेली मुलं तिथेच सावलीत बसली. आम्ही उजवीकडच्या पाऊलवाटेने चालायला सुरूवात केली.
लगेचच तिकिटखिडकी लागली. उन्हाळ्यात अडिच युरोचं तिकिट आहे. पण आम्ही गेलो तेव्हा खिडकी बंद होती. तिथे ग्रीक, इंग्रजी आणि चक्क जर्मन भाषेत बोर्ड लावला होता. बोर्डावर लिहिल्याप्रमाणे एकूण ८ किमी चालायचं होतं. त्यात चढ जवळजवळ नव्हताच, एकूण ६०० मीटर उतरण होती. दगडधोड्यांमधून वाट काढलेली असली तरी हा ट्रेक कठिण नाही. कुठे झाडांची सावली तर कुठे कडेकपारींनी अडवलेलं ऊन यामुळे भरदुपारीही उन्हाचा त्रास होत नाही. बरोबर पुरेसं पाणी आणि खाऊ मात्र हवा.
सुरुवातीला अंतर राखून असलेले डोंगर जवळ येऊ लागले तशी वाट अरुंद होऊ लागली. उंच कड्यांच्या मधून गेलेल्या अश्या चिंचोळ्या वाटेसाठी इम्ब्रोस प्रसिद्ध आहे. अचानक कुठे मोकळी जागा आणि उतारावर scree लागत होती.
वाटेत हे झाड आडवं आलं. ते प्रेमाचा भार सहन न होऊन उन्मळून पडलं की प्रेमवीरांनी त्याला आधार दिला, कुणास ठाऊक!
आता घळीचा सगळ्यात अरुंद भाग लागला. इथे कड्यांमधलं अंतर दिड ते दोन मीटर आहे. इथे उनसावल्यांचा खेळ बघत थांबावसं वाटत होतं. पण इतरांची वाट अडवणं योग्य नव्हतं.
अर्धा ट्रेक झाला असावा. इथे घळ बरीच रुंद होती. डोंगराच्या बाजूला दगडात एक झोपडी बांधलेली होती. तिथे बहुतेक तिकिट तपासनीस असतो. समोर मोकळ्या जागेत हिरवेगार गालिचे पसरलेले होते. इथे थोडा वेळ विश्रांती घेतली.
आम्ही स्वान्तसुखाय हा ट्रेक करत होतो. पण एकेकाळी दळणवळणाचा हाच मार्ग होता. आम्ही कोमिताडेसहून ज्या रस्त्याने आलो तो रस्ता बांधून होण्यापूर्वी उत्तरेच्या हानिया (Chania) वगैरे ठिकाणांहून स्फाकियाला येण्याजाण्यासाठी इम्ब्रोस घळ पार करावी लागे. त्यामुळे या घळीला ऐतिहासिक महत्त्वही आहे.
दुसर्या महायुद्धात जर्मनीने क्रिटी बेटावर केलेला हल्ला परतवण्यात दोस्त राष्ट्रांना अपयश आले. माघार घेतलेल्या दोस्तांच्या हजारो सैनिकांना बोटींनी इजिप्तला हलविण्यात आले. उत्तरेला अडकलेल्या सुमारे वीस हजार सैनिकांना चालत स्फाकियाच्या बंदरापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. त्यासाठी एकमेव मार्ग होता इम्ब्रोसचा. मागावर जर्मन सेना होतीच. अनेक सैनिक मृत्युमुखी पडले, कोणी पकडले गेले, तर कोणी डोंगरदर्यांचा आश्रय घेतला. त्या सैनिकांचा विचार मनात आला की खिन्नता येते. वीस हजारातील सुमारे तेरा हजार सैनिक स्फाकियाला पोहोचले आणि तिथून इजिप्तला जाऊ शकले. यातले बरेच ANZAC म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे सैनिक होते. क्रिटी बेटाला भेट देणार्या अनेक लोकांसाठी इम्ब्रोसला येण्यामागे ही ऐतिहासिक पार्श्वभूमीही असते.
याच बेटावरील साध्यासुध्या लोकांनी पुढच्या काळात केलेला जर्मन सेनेचा प्रतिकारही अतुलनीय होता.
आता आजूबाजूचे डोंगर पुन्हा दिसू लागले होते. काही ठिकाणी डोंगरांमध्ये नैसर्गिक amphitheater असावं तशी मोकळी जागा होती. दगडांचे प्रकार, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे झालेली झीज दिसत होती. एक बोकड कुटुंबही भेटलं वाटेत.
वरच्या फोटोतलं झाड बघितलं कसं गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या करतंय. कुठे खडकात मूळं रोवून उभी झाडं, कुठे अंगावर येणारा उतार आणि कधीही कोसळतील असे पत्थर! घळीचं सुरुवातीचं रूप आणि हे रूप यांत किती फरक होता!
ही दगडातली कमान आली म्हणजे बराचसा ट्रेक झाला होता. कमानीच्या डावीकडून वाट जाते. चार पावलं पुढे गेल्यावर वळून पाहिलं तर टेकडीच्या विशिष्ट कोनामुळे कमान दिसेनाशी झाली होती.
आजूबाजूच्या कड्यांची उंची कमी होऊ लागली होती. आणखी थोडंसं चालल्यावर अचानक घळ संपून बाजूने झीज झालेला डोंगरउतार आणि समोर दगडधोंड्यांचं मोकळं मैदान उरलं होतं.
ट्रेकनंतर परतीचा प्रवास नेहमीच जीवावर येतो. गाडीचं पार्किंग गाठलं पण निघायची इच्छा होत नव्हती. तिथल्या कॅफेत थोडा वेळ बसलो. चविष्ट स्फाकियन पाय (स्थानिक चीज भरलेली पोळी, खाताना वरून मध घालतात) खाल्ला आणि फ्रांगोकास्टेल्लोला परतलो.
क्रिटी बेटावर भटकून बरेच दिवस झाले. पण तिथल्या डोंगरदर्या मात्र आजही साद घालत असतात...
प्रतिक्रिया
12 Sep 2018 - 8:32 am | प्रचेतस
सुरेख ट्रेल आहे हा.
बाकी झाडं वगैरे असली तरी एकूण परिसरात तसा रखरखाटच दिसतोय.
12 Sep 2018 - 8:48 am | यशोधरा
छान ट्रेक झाला की. येताना पुन्हा कार ने आलात का?
12 Sep 2018 - 1:30 pm | टवाळ कार्टा
मग कार सोडून यायची???
15 Sep 2018 - 10:32 pm | निशाचर
धन्यवाद, यशोधरा! हो, ट्रेकनंतर कारने फ्रांगोकास्टेल्लोला परत गेलो.
12 Sep 2018 - 9:36 am | टर्मीनेटर
छान फोटो + वर्णन.
12 Sep 2018 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फेरफटकावर्णन आणि फोटो !
15 Sep 2018 - 10:35 pm | निशाचर
प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे आभार.
15 Sep 2018 - 11:41 pm | चित्रगुप्त
खूपच छान. तुम्ही हे सर्व प्रवास मुद्दाम भारतातून जाऊन केलेत की तुम्ही युरोपातच रहाता ? कुठे ?
16 Sep 2018 - 3:26 am | निशाचर
लेख आवडल्याचं कळवल्याबद्दल धन्यवाद!
युरोपात राहत असल्यामुळे प्रवास करणं सोपं होतं.
18 Sep 2018 - 1:24 pm | अनिंद्य
Aristoúchos !
पु भा प्र,
अनिंद्य
20 Sep 2018 - 1:19 am | निशाचर
Efharisto!
18 Sep 2018 - 1:49 pm | महासंग्राम
लेख मस्त झालाय इकडच्या प्लस वॅली च्या ट्रेक आठवण झाली
बाकी त्या चविष्ट स्फाकियन पाय (स्थानिक चीज भरलेली पोळी, खाताना वरून मध घालतात) ची रेसिपी देता येते का बघा
चीज आणि मध म्हणजे सुख असणार
20 Sep 2018 - 1:48 am | निशाचर
धन्यवाद!
प्लस वॅलीबद्दल कधी ऐकलं नव्हतं. गुगल कृपेने ताम्हिणी घाटात आहे, हे कळलं.
अर्थातच, सुख असतं. स्फाकियन पायचा प्रयोग करून पाहावा लागेल. तिकडे चक्क्यासारखं घट्ट असणारं ग्रीक दही आणि मध खातात. ही जोडी पण मस्त लागते, विशेषत: श्रीखंड आवडत असेल तर. कुणास ठाऊक, श्रीखंड आणि दही+मध यांचं मूळ एक असेल!