व्हेज तंदूर

Primary tabs

sandeepa's picture
sandeepa in पाककृती
3 Sep 2018 - 5:09 pm

श्रावण महिना सुरु असल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी व्हेज तंदूरचा प्रयोग करून बघावा असे ठरवले. त्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर तडक वखार गाठली आणि एक किलो कोळसा घेतला. सौ.ना विचारून घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांचा अंदाज घेतला आणि पाव किलो मश्रुम आणि शंभर ग्राम पनीर घेतला. मश्रुम शक्यतो डेअरी मधून घेतल्यास ताजे आणि मॉल पेक्षा कमी किमतीत मिळतात.
तर मग असा प्रायोगिक तत्वावरचा प्रयोग सुरु केला......
साहित्य:
मश्रुम २५० ग्राम
पनीर १०० ग्राम
बटाटे २ (सोलून)
कांदा १
टोमॅटो १
सिमला मिरची २
आले २ इंच
लसूण १५ ते २० पाकळ्या
दही १०० ग्राम
मसाले : मिरची पावडर २ चमचे , धना पावडर २ चमचे , हळद १ चमचा , मिरपूड १ चमचा.
तेल २ चमचे
मीठ चवीपुरते
बटर
कोथिंबीर बारीक चिरून
.

कृती:
१. पनीर, बटाटे, टोमॅटो, सिमला मिरची यांचे मोठे तुकडे करून घेतले. कांद्याच्या मोठ्या पाकळ्या काढल्या व मश्रुम आख्खेच घेतले . त्यामध्ये आले लसूण पेस्ट, दही, वरील सर्व मसाले, तेल, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून व मॅरिनेशन साठी ठेवले (अर्धातास)
.

२.मॅरिनेशन होईपर्यंत कोळसा पेटवून घेतला. त्यासाठी एक कोळशाचा खडा गॅसवर पेटवला. साधारण १० ते १५ मिनिटे लागतात. नंतर तो कोळसा इतर कोळश्यामध्ये ठेवला. कोळसा लवकर फुलण्यासाठी मी टेबल फॅन चा वापर केला त्यामुळे संपूर्ण कोळसा १५ मिनिटात फुलला.
.

३.तंदूर शेगडी असेल तर अति उत्तम. पण माझ्याकडे नसल्याने मी मोठ्या पातेल्यात कोळसा फुलवला. मॅरिनेशन झालेल्या भाज्या शिगांमध्ये खोचून पातेल्यात ठेवल्या आणि त्यावर झाकण ठेवले. साधारण १० मिनिटांनी शिगांमध्ये खोचलेल्या भाज्या बटर ने ब्रश कराव्यात व त्यानंतर १० मिनिटांनी आपले व्हेज तंदूर तयार...
.

.

कोळशाची कटकट नको असेल तर आपण गॅसवर मॅरिनेटेड भाज्या खरपूस भाजून देखील व्हेज तंदूर करू शकतो.....पण कोळश्याच्या तंदूरचीच टेस्ट अप्रतिम असते.

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

3 Sep 2018 - 8:31 pm | उगा काहितरीच

कोळसा वगैरे म्हणजे भरपूर उपद्व्याप ! चव अप्रतिम असणार यात शंकाच नाही.
असे पदार्थ आयते वायते मिळाले तर त्याची चव खूपच चांगली असते पण ;-)

(रच्याकने , हिंजवडीच्या जवळ असणारे absolute barbecue इथले तंदुर स्टार्टर्स केवळ अप्रतिम ! वरचे पदार्थ पाहून आठवण झाली त्याची)

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2018 - 9:01 pm | पिलीयन रायडर

फॉईल किंवा पानात गुंडाळून कोळशावर ठेवलं तर? नीट धग लागेल ना?

मला स्वतःला बार्बेक्यू हा प्रकार प्रचंड आवडतो, त्यामुळे रेसेपी आवडलीच.

पण कोळश्याचा स्मोकी फील येईल का नाही...शंका आहे

तेजस आठवले's picture

3 Sep 2018 - 10:03 pm | तेजस आठवले

तुम्हाला शक्यतो माहिती असेलच पण जर आदल्या दिवशी संध्याकाळी मॅरीनेट करून दुसऱ्या दिवशी सकाळी/दुपारी तंदूर केलेत तर अजून चांगले.

नॉनव्हेज बाबतीत तर निश्चितच..

फोटू कुठे हायीत? फोटू पाहूनच लाळ गाळायला मजा येते..

दिपक.कुवेत's picture

5 Sep 2018 - 7:25 pm | दिपक.कुवेत

पण साध्या दह्या पेक्षा नेहमी चक्का वापरावा. हल्ली चक्काही सहज उपलब्ध असतो. साध्या दह्यात पाण्याचं प्रमाण असतं त्यामूळे एक तर बाईंडिंग / भाज्यांवर कोटींग नीट बसत नाहि आणि तंदूर करताना सर्व पाणी पर्यायाने मॅरीनेशन गळून जातं. चक्का + १-१.५ चमचा भाजून घेतलेलं बेसन ह्याने मॅरिनेशन पक्क होतं त्यामूळे भाज्या खाताना बेचव लागत नाहित. सर्व करण्याआधी त्यावर हलके लिंबू पीळून आणि चाट मसाला भुरभुरुन द्यावा.......तंदूर अधीक फ्लेवरफुल लागेल.

माफ करा पण वरील फोटो पाहून असं दिसतय कि भाज्यांना नुसताच स्मोकि फ्लेवर आला असेल पण मॅरिनेशन काहिच दिसत नाहिये. बाकी पाकॄ मस्तच.

राघवेंद्र's picture

6 Sep 2018 - 6:09 pm | राघवेंद्र

दिपक भाऊ तुम्ही असा प्रतिसाद लिहिण्यापेक्षा साग्रसंगीत पनीर सकट नवीन पाककृती टाकावी. म्हणजे ते कुक-बुक राहील आमच्यासाठी

दिपक.कुवेत's picture

6 Sep 2018 - 7:22 pm | दिपक.कुवेत

नक्किच पोस्ट करीन

प्रसाद_१९८२'s picture

6 Sep 2018 - 7:02 pm | प्रसाद_१९८२

चक्का म्हणजे श्रीखंड करायला वापरतात तोच ना ?

दिपक.कुवेत's picture

6 Sep 2018 - 7:21 pm | दिपक.कुवेत

मराठित सांगीतलेलं कळलं नाय का? ईंग्लीश मधे सांगू.....चक्का म्हणजे "hung curd". तोच श्रीखंड करायला वापरतात.....Hung curd is nothing but yogurt drained of all its water. It can be made very easily at home. Tie some curd in a muslin cloth and leave it hanging for at least 3-4 hours or till all the water drains out.

रमेश आठवले's picture

6 Sep 2018 - 8:44 pm | रमेश आठवले

चक्का जाम यांच्या पासूनच करत असावेत .

नक्कीच प्रयत्न करून पाहीन....धन्यवाद