ढगाळ वातावरण आणि वातावरणात भरून राहिलेला आळस.. रविवार आरामात चालला होता..पोटातले कावळे हळू हळू आवाज देत होते ..त्यांना तेवढ्यापुरतं चाऊ माऊ देऊन गप्प केलं .. इतक्यात आईचा कॉल आला.. इकडचं तिकडंच बोलून अंदाज घेत विचारलं ..आज काय केलं होतं जेवायला .. आम्ही काही चहा बिस्किटांवर नाही दिवस काढत .. मसूर केला होता आज .. इति मातोश्री
मसूर ऐकल्यावर पोटातल्या कावळ्यांनी लिटरभर लाळ गाळली .. डोक्यात चक्र फिरली.. आणि परिस्थिती , उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करता आज मसूरची भाजी करणे शक्य आहे असं conclusion निघालं .
रूमीला विचारलं तर तिला १००० प्रश्न पडले .. मसूर काय इथपासून त्याचा इंग्लिश नाव शोधणे ... मी एकटी काय काय करू.. ती खाण्याची मदत करणार असं म्हणाली. मातोश्री मला आळश्यांची राणी म्हणत असतील तर हिची आई हिला नक्की महाराणी म्हणत असणार..
मसूर सापडले , डेसिकेटेड कोकोनट सापडलं (वास येत नव्हता म्हणजे चांगलं होतं) .. बाकीचं सामान पण खाली दिलंय ते सगळं देवाच्या कृपेने नाही तर general store च्या मालकाने होम डिलिव्हरी सुरु केल्यामुळे होतं .
साहित्य वगैरे काही मोजून घेतलं नव्हतं त्यामुळे अंदाज पंचे दाहोदरसे ..
अर्धी वाटी मसूर कुकरला १ ते सव्वा वाटी पाणी आणि चिमूटभर मीठ टाकून उकडून घेतले ( मीठ घातलं कि चव चांगली येते इति आई )
सात आठ पोह्याचे चमचे डेसिकेटेड कोकोनट ,चार पाच पाकळ्या लसूण , थोडंसं आलं (घ्या अंदाजानी ) मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलं
कढईत जरा नेहेमीपेक्षा जास्त तेल घेऊन एक बारीक चिरलेला मोठा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला. त्यात वाटण ( डेसिकेटेड कोकोनट,लसूण,आलं ) परतायला सुरुवात केली .. तोपर्यंत आळश्यांची महाराणी किचनमध्ये डोकावून गेली .
कांदा आणी वाटणाला तेल सुटायला लागल्यावर त्यात मसाल्याचा अर्धा चमचा हळद, २ चमचे लाल तिखट आणि ४ , ५ चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला (हा फार तिखट नव्हता म्हणून जास्त घातला ) घालून एखादा मिनिट परतलं .
तोपर्यंत कुकर थंड झाला होताच . उकडलेले मसूर त्यात असलेल्या पाण्यासकट कढईत ओतले .(पाण्याचा अंदाज घ्या ..उगाच सगळं ओतू नका .. नाहीतर घाल पाणी आणि कर कालच्यावानी .. असं काहीतरी आजी म्हणते तसं होईल )
महाराणी स्वीग्गीला सुट्टी देऊन हातात ताट घेऊन फेऱ्या मारत होत्याच . त्यांना त्याच कुकरमध्ये भात लावायला सांगितलं .(pg मध्ये राहिलं कि minimalism का काय ..आपोआपच follow होतं )
मीठ बेताने घाला .आणि ५, ६ मिनिट रस्सा उकळू द्या . भाजी शिजत असताना कोथिंबीर (असेल तर ) घातली तर छान चव येते . थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर नंतर फोटोसाठी ठेवा
तर्री दिसायला लागली कि गॅस बंद करा . आळशी batchlor लोकांची मसूरची भाजी किंवा आख्खा मसूर तयार..
(उगाच उत्साहाच्या भरात घरच्यांना फोटो दाखवू नका .. "जरा आळस सोडला आणि हात पाय हलवले तर ढमे जेवशील कि रोज घरी बनवून" .. आमच्या मातोश्रींकडे टोमण्यांचा स्टॉक कायम तयार असतो ) )
झणझणीत मसूर आणि भाकरी (बनावट येत असेल तर ) , झणझणीत मसूर आणि वाफाळता भात {[ तांदूळ कुकरला लावताना थोडंसं मीठ आणि २ चमचे तूप ] हे नक्कीच जमू शकतंय } .. ओरपा आणि रविवार सार्थकी घालवा ..
फोटो मीच काढलाय . स्टेप बाय स्टेप फोटो काढायला पोटातल्या कावळ्यांनी allow केलं नाही )
प्रतिक्रिया
10 Aug 2018 - 9:06 am | यशोधरा
मस्त दिसतायत! चव पण जमली होती का? ( ह घे हो! )
:)
10 Aug 2018 - 1:49 pm | मीता
अगं मस्त झाला होता चवीला
10 Aug 2018 - 3:06 pm | यशोधरा
नक्की झाला असेल, फोटो पाहूनच भूक लागली खरं तर! :)
मी आपलं उगीच थट्टा करत होते.
10 Aug 2018 - 9:09 am | अभ्या..
छान लिहिलंय.
10 Aug 2018 - 1:52 pm | मीता
धन्यवाद
10 Aug 2018 - 9:24 am | अजया
मस्त लिहिलं आहेसच फोटो तर कातील आहे!!
10 Aug 2018 - 1:52 pm | मीता
धन्यवाद ताई
10 Aug 2018 - 11:29 am | शब्दबम्बाळ
अक्ख्खा मसूर म्हटलं कि पेठ नाका आणि "एमके" आठवतो!
कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं कि अख्खा मसूर हि लोक घरा बाहेर जाऊन चवीने खातात!
फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं ना!!
कधी खातोय काय माहित आता पुन्हा...
10 Aug 2018 - 12:05 pm | प्रसाद_१९८२
अक्ख्खा मसूर म्हटलं कि पेठ नाका आणि "एमके" आठवतो!
---
पेठ नाक्यावर नक्की कुठे आहे, हॉटेल ?
मी उद्या सांगलीहून पेठ नाक्याला जाणार आहे.
10 Aug 2018 - 11:51 pm | शब्दबम्बाळ
हि लिंक बघा.. गूगल मॅप वर एक दाखवतोय एमके!
निदान रिव्यू चांगले आहेत, चाललाच आहात तर बघू शकता.
10 Aug 2018 - 1:16 pm | दुर्गविहारी
एम.के. ढाबा बंद पडला हो. मी गेलो होतो, तेव्हा दर्जा फार खालावला होता. सध्या अख्खा मसुर खायचा अकेल तर उत्तम पर्याय म्हणजे पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ "म मसुरा" हे हॉटेल किंवा कराड-विपळूण रोडवर "शिवराज ढाबा".
10 Aug 2018 - 11:43 pm | शब्दबम्बाळ
काय सांगताय!
त्यावेळी जागा मिळायची नाही राव! बसायला इतकी गर्दी असायची...
अशीही त्यावेळच्या पदार्थापेक्षा आठवणींची चव आता जास्त रेंगाळत असावी कदाचित... :)
10 Aug 2018 - 11:40 am | सस्नेह
आख्खा मसूर हा प्रकार बिलकुल आवडत नाही !
..पण लेख आवडला गं !!
10 Aug 2018 - 12:34 pm | प्रचेतस
सहमत आहे. मलाही अख्खा मसूर आवडत नै.
10 Aug 2018 - 1:53 pm | मीता
:)
10 Aug 2018 - 11:48 am | मनिमौ
वारी करायला लावणार. मसूर दिसतोय मात्र एकदम लाळगाळू.
या रश्यात भाकरी कुस्करून खायला अजून मजा येते.
बाकी लेखन झक्कास जमलं हेवेसांन
10 Aug 2018 - 1:53 pm | मीता
भाकरी बरोबर मस्त लागतो खरंच.. ..
10 Aug 2018 - 3:06 pm | पियुशा
जब्राट !!!
10 Aug 2018 - 3:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! अख्खा मसूर आमच्याकडे जरा वेगळा बनतो. चपाती असो की भात, खायला एकदम मस्तं पाकृ.
10 Aug 2018 - 11:27 pm | नूतन सावंत
मस्त दिसतोय,करून पाहते उद्याच.बाकी तुझं पाककौशल्य अनुभवलं आहेच.तेव्हा उत्तम होईल यात शंकाच नाही.
11 Aug 2018 - 6:56 pm | ज्योति अळवणी
मस्त लिहिलंय.... आवडलं
12 Aug 2018 - 9:25 pm | अविनाशकुलकर्णी
पुण्यात एस पी बिर्याणी मध्ये ह्या डिश ला ३७५ रु + ट्याक्स इतका रेट आहे
13 Aug 2018 - 12:18 pm | नीळा
पण ही बेचलर मसुर कशी?
स्पींस्टर मसुर म्हणावी लागेल...
काय नाय लेकीचा अभ्यास घेतोना वींग्रजीचा
25 Aug 2018 - 5:04 pm | जीवना
हा सर्व पदार्थ मसूरी ला मोड आणुन करा। चव १०० पट वाढते
25 Aug 2018 - 7:48 pm | Patil 00
मस्त फोटो बगून तोंडाला पाणी सुटले