रामराम मंडळी, मंडळी. कोणतीही नवीन गोष्ट काही दिवसच चांगली वाटते. सर्वसामान्य माणसांचा स्वभावच चंचल असतो. एका गोष्टीत तो फार काळ रमत नाही. मग ते मोबाईल, गाडी टीव्ही, किंवा काही नवीन उपयोगाची उपकरणे असोत की, लेखन करण्यासाठीची माध्यमं जशी की, फेसबूक, वाट्सअॅप, ब्लॉग की ड्रुपलवर आधारित असलेली मराठी संस्थळे असोत. काळाप्रमाणे त्याचा उपयोग कमी जास्त होत असतो. मराठी संकेतस्थळांना आता पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे, मराठी माणसं लालित्यपूर्ण लेखन करतात कमी आणि भांडतात जास्त असा माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. गेल्या काही वर्षात लेखनाच्या बाबतीत काही बदल झपाट्याने झाले आहेत. जसे अगदी सुरुवातीला ब्लॉग लिहिल्या जायचे, प्रत्येक लिहिता वाचता येणारा ब्लॉग लिहित होता, आता सर्वच ब्लॉग लिहित नसतील पण हे प्रमाण कधीकाळी खूप होतं. नंतर जिमेल चॅटींग जोरात सुरु झालं. बझर वगैरे. नंतर फेसबूकानं जोर धरला. आणि आत्ता वाटसअॅप. वाटसअॅपने काही सुविधा खूप दिल्या आहेत. एखादे दोन उतारे असलेल्या पोष्ट्स, कुठल्या तरी पोष्टला तात्काळ उत्तर, आपली पोष्ट किती लोकांनी वाचली त्याच्या नोंदी, तात्काळ निरोप देवाण-घेवाण. प्रेमाच्या गोष्टी, लफडी आणि तत्सम गोष्टींनी वाट्सअॅप रात्रंदिवस बीझी झालं आहे. मोबाईल काही क्षण जरी इकडे तिकडे झाला की अरे, आत्ता तर मोबाईल इथे होता, कुठे गेला, अशी शोधाशोध सुरु होते. इतकं तंत्रज्ञानांनी माणसं व्यस्त होऊन गेली आहेत. आम्ही तर बॉ वाट्सअॅप पाहात सुद्धा नाही, अशी म्हणनारी माणसं असतीलच यात काही वाद नाही. पण, कधीकाळी ज्या मराठी संस्थळांनी अक्षरक्ष वेड लावलं होतं, ते वेड आता कमी झालंय का असे वाटायला लागले आहे. एखादी दुसरीच सुंदर कविता, त्यावर एकापेक्षा एक दिली जाणारी दाद, काही उत्तम कथा, काही उत्तम लालित्यपूर्ण लेखन, पर्यटन, गड किल्ले, यांची माहिती त्याची मात्र संख्या मंदावली आहे काय, असे वाटायला लागले आहे. काथ्याकूट मात्र जोरात असतो. पण तेवढ्यावर मराठी संस्थळे जगतील असे मला काही वाटत नाही. माणसं येतात आणि जातात. नवी पिढी येते ती आपली काही वैशिष्टे घेऊन. तेव्हा नव्या काळात मराठी संस्थळे कशी असतील. त्यावर येणारे लेखन कसे असेल ? अशा संस्थळावर आपण केलेलं लेखन असतं, किती लोकांनी दाद दिली याची उत्सुकता असते. अनेकदा झालेलं विषयांतर आपलं लिहिण्याचा उत्साह घालवतो. काही आयडी सतत आनंदावर विरजन घालायलाच आलेली असतात, त्यापेक्षा वाट्सअॅप बरं असंही वाटू शकतं, त्यामुळेही लेखन कमी येत आहे, असे होऊ शकते. हे सर्व असूनही मराठी संस्थळे भविष्यात कशी असतील, नवनव्या तंत्र माध्यमात मिपासारख्या चहल-पहल असलेल्या संस्थळाला भविष्यात काय करावे लागेल, आणि अजून आपणास काय वाटते, आपली काय मतं आहेत ते समजून घेण्यासाठीचा हा काथ्याकूट तेव्हा आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय. स्वागत. :)
प्रतिक्रिया
29 Jul 2018 - 4:06 pm | प्रसाद_१९८२
२०१४ आधी मराठी संकेतस्थळांची स्थिती थोडी बरी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यावर त्या पक्षाच्या आयटी सेल चे अनेक ट्रोल विविध मराठी संकेतस्थळावर सक्रिय झाले व भाजपाचा प्रचार करण्याकरता प्रत्येक मराठी संकेतस्थळावर राजकिय धाग्यांचा रतीब घातला त्यांच्या शिवीगाळ युक्त राजकिय धाग्यावर होणार्या हाणामारीला कंटाळून अनेक चांगले लेखक मराठी संकेतस्थळापासून दूर झाले व जे वाचक सदस्य, अश्या साईटवर काहितरी चांगले वाचायला मिळेल या आशेने येत होते ते ही यायचे बंद झाले म्हणूनच मराठी सं.स्थळे सध्या मंदावली आहेत असे दिसते.
---
आता आपण सर्व वाचक अशी प्रार्थना करुया की, २०१९ मध्ये हे भाजपाचे जातीयवादी, भगवे सरकार जाऊन त्याजागी कॉंग्रेसचे लोक कल्याणकारी सरकार आले की मराठी संस्थळाना पन्हा सुगीचे दिवस येवोत.
29 Jul 2018 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२०१४ पूर्वी राजकीय धागे कमी प्रमाणात होते, नव्हतेच इतकं ते प्रमाण कमी होतं. धाग्यावरही एकमेकांच्या मताचा आदर करून लिहिल्या जात होते, योग्य वेळी सर्व थांबतही होते. पुढे आपण म्हणता तसे मराठी संस्थळावर सत्ताधारी समर्थक आणि विरोधक यांच्यात सतत राडा सुरु झाला. भाषा, शिविगाळ यांनी कळस गाठला, लिहिण्याचे स्वातंत्र ही मिपाचं ख़ास वैशिष्ट्ये म्हणून त्याचा फायदा अति घेण्यात आला. काही वाचक नुसते लॉगिन न करता दुर्दैवाने वाचकच राहिले, या मताशी सहमत आहे.
उपाय १) राजकीय काथ्याकूट काही दिवस बंद करावा ?
-दिलीप बिरुटे
29 Jul 2018 - 5:01 pm | माहितगार
सेंसॉरशीप लादणे हा धागा लेखाचा मुख्य उद्देश्य आधीच ठरलेला आहे ? कारण श्री गुरुजी आणि दुसर्या बाजूचे प.ग. नाहीत तेव्हा पासून राजकीय चर्चा झाली तर वातावरण तापल्याचे अशात जाण्वलेले नाही. आणि तरीही सेंसॉरशीप समर्थनार्थ खापरफोड होत नाहीए ना अशी साशंकता वाटते.
29 Jul 2018 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजिबात नाही. धागा लेखनाचा असा कोणताही उद्देश नाही, तशी कोणावरही ही खापरफोड नाही. ''सखे मंद झाल्या तारका'' प्रमाणे उत्तम प्रतिसाद, उत्तम लेख, याचं प्रमाण ''मंद '' झालं आहे, असे वाटते, ते कशामुळे होत असावं, असा एक शोध घेण्याचा प्रयत्न आहे.
मिपाने नेहमीच लेखनस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य खुले ठेवले आहे, मीही त्याचा नेहमीच कट्टर समर्थक राहीलो आहे. त्यामुळे तशी काही काळजी करु नये. खुलासा संपला.
-दिलीप् बिरुटे
29 Jul 2018 - 4:35 pm | माहितगार
धागा लेखातील दाव्यांसाठी विदा ?, संदर्भ ?
29 Jul 2018 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळ मिळाला की काही एक विदा देईन असा विचार करतो आहे.
-दिलीप बिरुटे
29 Jul 2018 - 5:00 pm | प्रसाद_१९८२
शेजारची मायबोली साईट पहा !
--
एक वेळ होती, त्या साईटवर उच्च दर्जाचे ललित लेखन, कविता, गझल, कथा, प्रवासवर्णने वगैरे येत होती. दिवाळी अंक, वेगवेगळ्या ऑनलाईन स्पर्धा, वर्षाविहार, ऑनलाईन गणेशोत्सव व इतर अनेक उपक्रम तिथे होत होते मात्र राजकिय धाग्यांच्या हाणामारीत अनेक चांगले आयडी एकतर उडविले गेले नाहितर वाचनमात्र झाले. आजची त्या साईटची अवस्था पहा. फक्त स्वत:च्या कंपुत गुलुगुल बोलणारे सदस्य, टिव्ही वरिल डेली सोप, रियालटी प्रोग्राम व ऋन्मेऽऽष-कटप्पा छाप बिंडोक धागे व त्या वरचे वायफळ प्रतिसाद इतकेच अस्तित्व त्या साईटला राहिले आहे. इथला फार काही अनुभव नाही तेंव्हा इथली परिस्थिती काय आहे ते माहित नाही.
29 Jul 2018 - 5:13 pm | माहितगार
मला माबोचा प्रत्यक्ष अनुभव नाही पण अलेक्सा रिडींग्स उपलब्ध असलेल्या काळात मराठी संकेतस्थळांबाबत मी बर्यापैकी सांख्यिकीय विश्लेषण मागे केले आहे. सेंसॉरशीप्मुळे मनोगत सारख्या संकेतस्थळाला मागे पडताना बघीतले आहे. त्यामुळे आपल्या दाव्यांबद्दल आणि निष्कर्षांबद्दल साशंकता वाटते.
30 Jul 2018 - 11:29 am | चौथा कोनाडा
माबोच्या सध्याच्या पडझडीच्या पार्श्वभुमीवर मिपाची स्थिती खुपच चांगली आहे.
आता माबोवर जायला नको वाटते. अपले मिपाच बेष्ट !
31 Jul 2018 - 2:16 pm | स्वलेकर
<<<<<टिव्ही वरिल डेली सोप, रियालटी प्रोग्राम व ऋन्मेऽऽष-कटप्पा छाप बिंडोक धागे व त्या वरचे वायफळ प्रतिसाद इतकेच अस्तित्व त्या साईटला राहिले आहे. >>>> मनापासुन पटले!!!
29 Jul 2018 - 4:38 pm | सतिश गावडे
एकाग्रता कालावधी हे एक कारण असू शकेल. एकाग्रता कालावधी म्हणजे एखादी व्यक्ती (किंवा अधिक विचार करता प्राणी) चित्त विचलीत न होता एखाद्या गोष्टीवर जेव्हढा वेळ आपलं लक्ष केंद्रीत करते तो कालावधी. बर्याच अभ्यासकांच्या मते हा कालावधी दिवसेंदिवस कमी होत असून सध्या हा कालावधी ८ सेकंदांवर येऊन पोचला आहे. म्हणजे काय तर कोणतीही व्यक्ती कोणत्याही गोष्टीवर सरासरी ८ सेकंदांपेक्षा अधिक वेळ एकाग्र चित्त करु शकत नाहीत.
संस्थळांवरील ललित लेखन हे दिर्घ लेखन स्वरुपाचे असते, वाचण्यास वेळ लागतो. याऊलट व्हाट्सापवरील ढकलसाहीत्य हे एक तर चित्र स्वरुपात असते किंवा अगदी ४ - ५ वाक्यांच्या स्वरुपातील असते. (यातील बरेचसं ढकलसाहित्य बालिश, अर्वाच्य, बिभत्स, उत्तेजक वगैरे असते तो भाग वेगळा). अपवाद म्हणून कुणी व्हाटसापवर चर्चा केलीच तरी तिथेही कोणी निबंध लिहीत बसत नाही. छोट्या छोट्या वाक्यात लोक आपली मतं मांडतात (ही वाक्येही बरेच वेळा समोरच्याला शाब्दिक हिंसेस प्रवृत्त करणारी असतात)
थोडक्यात सगळा झटपट मामला असतो व्हाटसाप किंवा फेसबुकवर. ललीत वगैरे वाचायला वेळ आहे कुणाकडे. :)
29 Jul 2018 - 10:32 pm | शाम भागवत
सहमत
ज्या संदेशाच्या तळाशी Read more.... असा रिमार्क असतो ते संदेश वाचले जात नाही.
2 Aug 2018 - 8:00 am | सोत्रि
सहमत!
Attention span च्या जोडीला 'इन्स्टंट ग्रटीफिकेशन' हे ही तितकेच कारणीभूत आहे. ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या जमान्यात इन्स्टंट ग्रटीफिकेशन सोपे झाले आहे. ही सर्व माध्यम दृकश्राव्य पद्घतीने माहिती देतात त्यामुळे Attention span कमी होत चालला आहे.
- (इन्स्टंटली एकाग्र होणारा) सोकाजी
29 Jul 2018 - 7:12 pm | नितिन थत्ते
मिपाच्या सदस्यसंख्येचा सर्वाधिक आकडा किती आहे? तो कमी झाला आहे का?
तसेच हजर सदस्यांची संख्या मी जेव्हा मिपावर सक्रिय असायचो तेव्हा जास्तीत जास्त पन्नासच्या आसपास पाहिली आहे. ती वीक डेजना जास्त आणि विकेंडला कमी असे. कारण बहुतांश सदस्य ऑफिसमधून ऑफिसच्या नेटवरून मराठी संस्थळे अॅक्सेस करत असत.
दुसरे म्हणजे फेसबुक व्हॉट्सअॅप वरून जसे वैयक्तिक मित्रमंडळींशी संवाद साधता येतो चर्चा करता येते तशी मराठी संस्थळावरून करता येत नाही.
ड्रूपल बेस्ड मराठी संस्थळे आपले विदागार लहान ठेवतात. त्यासाठी फोटो वगैरे डायरेक्ट अपलोड करण्याची सोय ते देत नाहीत. तेही सोशल मीडिया म्हणून मराठी संस्थळांना काहीसे मारक आहे.
सारांश म्हणजे जेव्हा इतर माध्यमे नव्हती तेव्हा मराठी संस्थळांचा उपयोग होता. "रिक्षा आल्या म्हणून टांगे गेले".
असो. ज्या व्यक्तींशी आयुष्यात कधीही संपर्क येण्याची शक्यता नव्हती अशा विविध क्षेत्रांतील अनेक प्रसिद्ध/अप्रसिद्ध लोकांशी परिचय झाला ही मराठी संस्थळांचीच कृपा. नाहीतर आपला आणि इथल्या अनेकांचा परिचय कसा झाला असता?
29 Jul 2018 - 7:15 pm | नितिन थत्ते
पुरवणी....
२०१४ च्या राजकीय स्थित्यंतराचा याच्याशी संबंध आहे असे मला वाटत नाही. इनफॅक्ट मिपावरील (नॉन राजकीय कंटेंटचे) ट्रॅफिक २०१४ पेक्षा आज जास्तच आहे असे मला वाटते.
29 Jul 2018 - 7:39 pm | माहितगार
मी गूगल ट्रेंड्स आणि अलेक्सा तपासले. गूगल ट्रेंड्सनुसार गेल्या पाच वर्षातील 'मराठी लँग्वेज' चा शोध आलेख बर्या पैकी चढता आहे - मराठी भाषेच्या सर्च क्वेरीज मध्ये व्हॉट्स अॅप स्टेटस क्वेरी दोन तीन पद्धतीने येते आहे म्हणजे बिरुटे सरांच्या मतात अंशतः तथ्य असावे अर्थात मिपा आणि मायबोलीकर तिकडे किती गेले हे सांगणे कठीण असावे, वाढलेल्या मराठी शब्द शोधाचा टिव्ही ९ मराठी फक्त बातम्यांची वाहिनी आहे का माहित नाही त्यांची वेबसाईट अलेक्सात आलेली दिसली नाही पण गूगल ट्रेंडच्या सर्च क्वेरीत येतीए. गूगल ट्रेंडमध्ये दिसत नसले तरी काही मराठी वृत्तपत्रांना त्याचा नक्कीच फायदा होत असावा असा प्राथमिक अंदाज आहे पण त्यासाठी अलेक्सा आकडेवारी अधिक डिटेल मध्ये कुणीतरी अभ्यासावयास हवी.
साधारणतः शाळा कॉलेज अॅडमिशन्सच्या काळात मराठी वेबसाईट्सचा वापर नेहमीच कमी असतो. सप्टेंबर मध्ये आकडेवारी पुन्हा तपासवायास हवी तरीही अजून एक गोष्ट अलेक्सा आकडेवारीत आढळली ती हि कि मनोगत रॅम्कीम मध्ये अद्याप बरेच मागे असले तरी अलेक्सा आकडेवारी चढती दिसते आहे . (मनोगत मालकांनी कदाचित प्रत्यक्ष संपर्क फिल्ड कँपेन राबवले असावे असे आठवते चुभूदेघे) . अलेक्सा आकडेवारीत मायबोली आणि मिपा दोन्ही डाउनवर्ड ट्रेंड दाखवताहेत खरे पण सप्टेंबर पुर्वी नेमकेपणाने सांगणे कठीण असावे. मनोगतने मायबोली आणि मिपाचा ट्रॅफिक खाल्ला असण्याची शक्यता कमी वाटते, बहुतेक फिल्ड कँपेन मधून आलेला नवा वाचक वर्ग असण्याची शक्यता अधिक वाटते.
29 Jul 2018 - 7:42 pm | माहितगार
ऐसि अक्षरे साठी गूगल ट्रेंड आणि अलेक्सा तपासले दोन्ही कडे ऐसिअक्षरे स्थान स्पर्धेत आढळली नाही.
29 Jul 2018 - 10:28 pm | सतिश गावडे
तुम्हाला खरेच वाटते का या अलेक्सा आणि गुगल ट्रेंडच्या मानांकनात काही तथ्य आहे?
या मानांकनात बहुतांशी क्लिकांची संख्या मोजली जाते ज्यातून संस्थळाची नस कळण्याची शक्यता खूप कमी असते.
30 Jul 2018 - 8:43 am | माहितगार
भारतीय स्वतः आकडेवारी बद्दल पद्धतशीर नाहीत म्हणून परकीय माध्यमांवर अवलंबून रहावे लागते ते असो. या आकडेवारी अगदीच काही देत नाहीत असेही नसावे. गूगल ट्रेंड्स आणि अलेक्साच्या आकडेवारी वेगवेगळ्या पद्धतीने अराईव्ह होतात त्यामुळे दोन्ही टॅली केल्या तर ढोबळ अंदाजा येऊ शकावा. बाकी अधिक अचूकतेसाठी संस्थळाची स्वतःकडची आकडेवारी मिपा मालकांना मिळत असावी. त्या सर्व सोबत ठेवल्या तर मिपा मालकांना या बाबत अंदाजा यावा. असे वाटते. अर्थात काही अंशी ऑफलाईन सर्वे घेण्याची व्यवस्था असावी असे वाटते.
खाली नव्या प्रतिसादाने मिपा मालकांसाठी काही सुचवण्या देत आहे.
29 Jul 2018 - 7:13 pm | झेन
तुमचे बरेच मुद्दे पटले. आजकाल लोकांना फास्टफूडच आवडतं, जास्त वेळ एखाद्या विषयावर लक्ष देत नाहीत. पण होतं काय की पूजा करताना माकडाचा विचार करायचा नाही, त्या गोष्टी प्रमाणे होतं, ब-याच जणांना राजकीय विषय आला की कंट्रोल ही नही होता. जावू द्या हो, ज्यांची मजबुरी असेल त्यांनी सोडून इतरांनी राजकीय गोष्टी सोडून पुढे जावे. तुमच्यासारख्या अनुभवी, लिहीण्याचे कौशल्य असलेल्या लोकांनी खरंच लिहायला पाहिजे असं वाटत.
29 Jul 2018 - 7:30 pm | कुमार१
संस्थळ- लेखनात लेखकांना कशाकशाला सामोरे जावे लागते ते मी खालील लेखात विशद केले आहे :
https://www.misalpav.com/node/42862
29 Jul 2018 - 8:10 pm | सोमनाथ खांदवे
एखाद्या अनवट वाटेवर असलेल्या पाणपोई सारखं पुण्यकर्म मिसळपाव व संस्थापक करत आहेत , तहानलेल्या वाटसरूने आपली तहान भागवावी आशीर्वाद नाही देता आले तरी पुढच्या वाटेला लागावं .
पण काही जण विनाकारण पाण्यात पिचकारी मारून पाणी गढूळ करून वातावरण गरम करतात , ते महापाप मी सुद्धा केले आहे .
सेन्सॉरशिप लावणे प्रा .डॉ चा उद्देश नाहीच पण प्रत्येका ने स्वतःवर थोडीशी आचारसंहिता लावली तर ज्ञानवर्धक लेख व लेखकांचा उत्साह नक्कीच अजून वाढेल .
30 Jul 2018 - 8:40 am | mayu4u
तुमचं मराठी हल्ली प्रमाणभाषेच्या बरंच जवळ येऊ लागलंय... शुभेच्छा!
29 Jul 2018 - 8:16 pm | प्रसाद गोडबोले
वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे मंदावली आहेत काय ?
>>>>
मते ह्या प्रश्नाचे उत्तर " होय" असे आहे. असे होण्याची अनेक कारणे आहे पं माझ्या मते सगळ्यात मोठ्ठे कारण म्हणजे तुम्हाला कोणाशी कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे / करायला आवडेल हे निवडाण्याचे स्वातंत्र्य !
आमचा वैयक्तिक व्हॉट्सॅप्प चा अनुभव असा आहे कि सुरुवातीला अनेक लोकं होतं कंपु मध्ये .
जसे जसे मतभेद व्हायला लागले अन टोकाला जायला लागले तसे तसे एकेक करुन लोकं ग्रुप सोडुन गेले. आणि मग उरलेल्या ग्रुपमध्ये इतका कंफर्ट लेव्हल येत गेला कि आता कोणा नवीन माणासाला ग्रुप मध्ये अॅड करण्या आधी विचार केला जातो . आजच्या घडीला ग्रुपमध्ये मोजके १० मिपाकर आहेत ! आणि सगळ्यांची सगळीच मते जुळतात असे नाही. काही कट्टर भाजपा समर्थक आहेत तर काही भाजपापेक्षा राष्ट्रवादी बरी अशा विचाराचे !! चर्चा होतातच पण जिथे अति ताणले जात आहे तिथं थांबवण्याचा सारासार विवेक सगळ्यांकडे आहे ! कितीही मतभेद झाले तरी कोणीही कोणावर " अज्ञानमुलक , असमंजस , पुर्वग्रहदुषित" असले शब्द फेकत नाही. कोणालाही धर्मसुधारणा करायची नाहीये की समाजसुधारणा करायची नाहीये . आहे हे आहे असं इन्जोय करु असा साधा अत्तीतुडे सगळ्यांचाच असल्याने कसं भारी वाटतं !!
देशी गांईचा गोठा, ग्लोबल वार्मिंग आणि ट्रेड वॉर , किल्ल्यांची रचना , पुढील ट्रिप चे प्लॅन , इन्व्हेस्टमेन्ट ऑपॉर्च्युनिटीज , ञ , ङ ह्यांचे उच्चार आणि मराठी चे व्याकरण
सनीताई लिऑने, संक्लिद्य अनावृता , नेट्फ्लिक्स वरील सीरीयल्स , पुण्यातील खाडाडीच्या जागा , अशा आणि अनेक इतर विषयांवरील गप्पा होत असताना एकदम मिसळपाव खाल्ल्यासारखे वाटते तेही व्यक्तिगत अभिनिवेशाचे अन चिखलफेकीचे खडे नसलेली !!
एकुणाच इतका कंफर्ट झोन तयार झाल्याने मिपावर धागा काढत बसण्या पेक्षा ग्रुपवर चर्चा करायला मजा येते !
:)
29 Jul 2018 - 10:47 pm | शाम भागवत
खर आहे.
मी शेअर बाजाराशी संबंधीत ३ ग्रूपमधे आहे. मस्त चर्चा चालू असते. सगळे मिळून ५०० च्यावर सभासद असावेत. सगळे स्वयंशिस्त पाळतात. मराठी माणसे न भांडता एकत्र येऊ शकतात. २.५ वर्षे झाली आहेत.
29 Jul 2018 - 10:51 pm | शाम भागवत
अट फक्त एकच विषय शेअर बाजाराशी संबंधीत असला पाहिजे. याबाबतीत काही अट नसणे हे तुमच्या ग्रुपचे वैशिष्ट्य आवडले.
29 Jul 2018 - 8:39 pm | कंजूस
संस्थळावर कोणती चर्चा, कोणता विषय कसा येतो आणि प्रतिसाद येतात आणि नोंदले जातात यामध्ये आणि वाटसप माध्यमात मूलत: फरक आहे.
सगा म्हणतो त्यात तथ्य आहे.
29 Jul 2018 - 8:52 pm | नितिन थत्ते
तुम्ही सर्च ट्रेंड पाहिले म्हणजे काय पाहिले ते कळत नाही. मिसळपाव ही साईट कोणी सर्च करत असेल असे वाटत नाही. बहुतांश मिपा सदस्य आणि वाचक ब्राउझरमध्ये बुकमार्क करत असतील किंवा अॅप वापरत असतील.
थोडा प्रकाश टाकावा.
29 Jul 2018 - 9:55 pm | गवि
सर्वच मुद्द्यांवर सहमती आहे. विषय चांगल्या रितीने मांडला आहे. सर्वांची मतं वाचायला रोचक वाटेल. चहलपहल खूप कमी झाल्याचं नक्कीच जाणवतं. एकेकाळी सकाळचा धागा संध्याकाळी बोर्डाच्या तळाला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पानावर सरकायचा असंही व्हायचं. आता कधीकधी महिन्याभरापूर्वीचे धागेही पहिल्या पानावरुन खाली सरकलेले दिसत नाहीत.
जोरदार चर्चा फक्त दोन तीन धाग्यांवर चालू असते. तेवढेच वरच्या भागात एक दोन तीन क्रमांकावर फिरत राहतात. ललित तर पार कालबाह्य ठरलं आहे असं दिसतं.
30 Jul 2018 - 12:04 am | सतिश गावडे
आणि ते धागे एका विशिष्ट विषयावरील असतात. :)
30 Jul 2018 - 1:10 pm | पुंबा
+++११११
तेच फेसबुकवर फुल्ल फॉर्मात आहे.
30 Jul 2018 - 8:23 am | कंजूस
वाटसप कितीही मोठ्ठा ग्रुप झाला तरी तो क्लोझ्ट ग्रुपच असतो. त्यातल्या चर्चेशी इतरांचा काही संबंध नसतो अथवा तिकडचा संदर्भ म्हणून वापरता येत नाही.
एखादा गट ठरवून शहरातल्या एका ठिकाणी भेटून रविवारी गप्पांसाठी जमायचा त्याचंच अधिक व्यापक रूप वाटसपने दिलं.
बाकी दोन वर्षांपूर्वी हॅाटेलात आलेलल्या माणसांची संख्या ८०-८५ जात असे ती आता पन्नासवर जात नाही हे खरं आहे.
एखादं संस्थळ / ग्रुप न आवडल्यास दुसरीकडे जाण्याचा मार्ग मोकळा असतोच आणि तो २०-३५ वयोगटातील तरुण स्विकारत आहेत.
30 Jul 2018 - 9:26 am | माहितगार
* कदाचित, पण काही तथ्य उपरोल्लेखीत बर्याच मिपा सदस्यांच्या दृष्टीतून सुटत असावीत आणि या धाग्याची संधी आपल्या विरोधी बाजूवर खापर फोडण्यासाठी वापरली जात असावी असे वाटते. वस्तुतः दोन महत्वाचे बदल लक्षात घेतले जात नसावेत
** आकडेवारी चुकीच्या म्हणजे शाळा कॉलेज चालू होण्याच्या काळातली मोजली जाते आहे जेव्हा दरवर्षीच मराठी संस्थळांवरील सहभाग सर्वसाधारणपणे रोडावलेला असतो.
** पहिला मुखपृष्ठाचा सह्द्याच्या फॉर्मॅट एवजी आता नवे लेखन मध्ये सर्व धागे एकत्र दिसत तो फॉर्मॅट असताना चर्चा सहभाग अधिक असतो असे माझे व्यक्तिगत मिपा ऑब्झर्वेशन आहे.
** याचाच दुसरा मुद्दा असा की अशात प्रेत्येक वेगळ्या ताज्या घडामोडीवरचा वेगळा धागा निघण्याच्या मिपा परंपरे एवजी ताज्या घडामोडीच्या एकाच धाग्यात क्लब होताहेत आणि ह्या मुळे धागा लेखांची संख्या कमी होते. प्रत्येक लेखाचे शिर्षक स्वतंत्र न झाल्यामुळे आपल्या रस असलेल्या विषयावर चर्चा चालू असल्याचे कळण्याचा मार्ग रहात नाही चर्चा सहभाग रोडावतो आणि हॉटेलातील लोकांची संख्या मंदावते. - आणि ऐसिअक्षरे मिपाशी स्पर्धेत येऊ न शकण्याचे ते एक कारण असावे .
** अजुन एक आक्षेप वर प्रसाद आणि इतर पुरोगाम्यांनी नोंदवलेला म्हणजे , परंपरावाद्यांचे मिपावरचे प्राबल्य हे मिपा अधोगतीचे कारण. पण तथाकथित पुरोगाम्यांचे प्राबल्य असल्याने संस्थळाचा जनाश्रय वाढत असता तर आता पावेतो ऐसिअक्षरे मिपाच्या पुढे जावयास हवे होते. त्यामुळे तथाकथित पुरोगामींची मांडणी साशंकीत करणारी वाटते.
** केवळ लेखनाच्या क्वालिटीवर संस्थळाची भरभराट व्हायची असती तर ऐसिअक्षरेने त्या दिशेने विशेष पावले टाकली पण ते अद्यापही स्पर्धेत कुठेच नाही. मनोगताने लेखनावरची बंधने वाढवली लोक बाहेर पडले.
** अलेक्सा रिडींग नुसार कदाचित फिल्ड पब्लिसिटीमुळे मनोगताचे वाचन अल्प वाढले आहे पण त्याचे अद्याप लेखनात कन्व्हर्शन नसावे. लिहिण्यासाठी अटी वाढल्या की लेखन कमी होत असावे.
* आपण एजग्रूपचा विषय काढलात . पण पिढीचाही संदर्भ असावा. २००० च्या आधीच्या मॅट्रीक्यूलेट पिढीचे आवांतर वाचन चांगले होते आणि वाचकांचा लिहिलेले समजण्यासाठी शब्द संग्रह चांगला होता. ती पिढी जशी आंतरजालावरुन रिटायर होत जाईल तसे काव्येतर ललित लेखन कमी होण्याची अंशतः शक्यता असू शकते पण ही अत्यंत संथ गतीने होणारी प्रक्रीया असेल.
30 Jul 2018 - 12:37 pm | पुंबा
सर, तुम्ही व्हॉट्सअॅपपुरता हा विषय मर्यादीत ठेवला असला तरीही मला वाटते, संस्थळांना खरा पर्याय फेसबुकच्या स्वरूपात उपलब्ध झाला आहे असे वाटते. गेल्या पाच वर्षात फेसबुकवर इतक्या उत्तमोत्तम प्रकारचे साहित्य उपलब्ध होत आहे तेवढे दर्जेदार आनी सातत्यपूर्ण लिखाण संस्थळांवर मिळते असे सध्या तरी दिसत नाही. अक्षरशः थोर म्हणावे असे लिखाण करणारे शेकडो मराठी आयडीज फेसबुकवर आहेत. त्यांचे लेखण वाचून प्रकाशन मान्यवर प्रकाशन संस्थांकडून त्यांची पुस्तकेसुद्धा प्रकाशीत झाली आहेत. लेखकांनादेखिल ते माध्यम सोयीचे वाटते, एक तर सेन्सॉरशिपची भिती नाही, ट्रोलांना एका क्लिकवर हाकलून देण्याची सोय, कंपूबाजीसाठीदेखिल सोयिस्कर फॉरमॅट शिवाय हजारो लोकांपर्यंत आपले लिखाण पोचवण्याची सोय यामुळे फेसबुक अधिक लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप बहुशः थिल्लर किंवा दवणीय या दोन प्रकारच्या ढकलपत्रांसाठी उपयुक्त. त्यातले थिल्लर प्रकार आम्ही एंजॉय करतो, दवणीय पत्रांचा हीतशत्रूंवर मारा करतो.
30 Jul 2018 - 7:59 pm | माहितगार
अलेक्सा रॅमंकींगने फेसबूकचा क्रमांक जगातल्या पहिल्या तीन किंवा चार मध्ये अद्यापही असला तरी आपण म्हणता तसे अलेक्सा रँकींग मधील बाकी विदा बद्दल स्थिती कितपत आलबेल आहे या बद्दल साशंकता वाटते . गुगल ट्रेंड्स वर जगभरचा, भारतातला आणि महाराष्ट्रातला फेसबूकचा गेल्या पाच वर्षातील आलेख सॉलीड उतरता दिसतो आहे.
तॉपच्या वेबसाईट मध्ये बाकी जगभर युट्यूब उतरती कळा दाखवते आहे, दुसरी कोणती साईट जागा घेत असल्यास माहित नाही. पण भारतात आणि महाराष्ट्रात युट्यूबचा गूगल ट्रेंड्सवरील आलेख बर्या पैकी चढताना दिसतो आहे.
31 Jul 2018 - 8:00 am | एमी
अक्षरशः थोर म्हणावे असे लिखाण करणारे शेकडो मराठी आयडीज फेसबुकवर आहेत. त्यांचे लेखण वाचून प्रकाशन मान्यवर प्रकाशन संस्थांकडून त्यांची पुस्तकेसुद्धा प्रकाशीत झाली आहेत. --->
> नावांची यादी किंवा फेसबुक प्रोफाईलच्या लिंक देशील का? फॉलो करते.
31 Jul 2018 - 1:55 pm | पुंबा
हो. खवत देतो..
31 Jul 2018 - 3:21 pm | सप्तरंगी
मलाही पाठवाल का? थँक्स:))
31 Jul 2018 - 5:59 pm | पुंबा
मी लिस्ट करतो आहे, आपणासही जरूर पाठवेन.
31 Jul 2018 - 6:06 pm | माहितगार
फेसबुकवर जुने लेख आणि जुन्या पोस्ट शोधण्याच्या सुविधेत अलिकडे काही सुधारणा आहेत का ? जुन्या पोस्ट शोधणे जटील जात होते म्हणून मी फेसबुकवर फारसे लेखन केले नव्हते. आपल्या वर्णनामुळे मलाही जरासे आकर्षण वाटू लागले आहे.
31 Jul 2018 - 6:11 pm | पुंबा
अगदी सोपे आहे. सर्च ऑप्शनमध्ये जे टेक्स्ट शोधायचे आहे ते टाकले आणि फिल्टरमध्ये पोस्ट्स असे निवडले की आपल्या मजकुराशी मॅच करणार्या आपल्या मित्र तसेच फॉलो केलेल्या लोकांच्या पोस्ट्स मिळतात. अर्थात ही सोय अॅपमध्ये आहे.
31 Jul 2018 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
परिश्रमाने बनवलेली यादी, व्यनिऐवजी, इथेच टाकली तर सगळ्या मिपाकरांना तिचा फायदा मिळेल असे वाटते.
31 Jul 2018 - 10:41 pm | शाम भागवत
अगदी मनातले बोललात.
30 Jul 2018 - 12:57 pm | अभ्या..
फक्त संस्थळे मंदावायचा विषय असेल तर प्राडॉसारखी माणसे ह्याला कारणीभूत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
आणी उन्नती व्हावी अशी ईच्छा असेल तर प्राडॉ सारख्याच माणसांची गरज आहे हे त्याहून अधिक स्पष्ट मत आहे.
30 Jul 2018 - 1:16 pm | मालोजीराव
राजकीय धाग्यांचा रतीब मिपा वर पडत राहिल्यानं मी लिखाण बंद केलं ...बाकी कधी कधी चांगले धागे येत असतात ते आवर्जून वाचतो , उदाहरणार्थ समर्पक आणि टर्मिनेटर यांचे भटकंतीचे धागे
30 Jul 2018 - 2:48 pm | शाम भागवत
मला राजकीय घागे फक्त वाचायला आवडतात. फक्त वैयक्तिक टिका वगळून वाचायला शिकता आले पाहिजे. आपल्या मतांच्या विरोधतील मत वाचत असताना सुध्दा शांत रहाणे ही कला शिकायची असेल तर जरूर राजकीय धागे वाचावेत असे वाटते. या नेट प्रॅक्टीसमूळे या कलेचा वैयक्तिक जिवनात खूप उपयोग होऊ शकतो.
पटले नसेल तर,
कृ.ह.घ्या.
30 Jul 2018 - 4:11 pm | खिलजि
सर , कायप्पा हे तात्कालिक आहे तर संकेत स्थळ हे कायमस्वरूपी आहे . त्यामुळे कायप्पामुळे कुठलेही संकेतस्थळ मंदावेल असे वाटत नाही . मला वाटत मिपा तर नाहीच नाही.
कदाचित पुढे मिपामध्ये कालानुरूप बदल होऊ शकतात जसे कि काही स्पृहणीय गोष्टींना दाद देणारे विभाग जेणेकरून एक आशावादि चित्र नेहेमी समोर राहील . पुढे जाऊन निराशा एव्हढी वाढणार आहे कि या संकेतस्थळांचा वापर एका आशावादि विनामूल्य सेवेत रूपांतरित होईल .
राहाताराहीली गोष्ट " एखादी दुसरीच सुंदर कविता " त्यासुध्द्धा येतील सर . काळजी नसावी ... आम्ही होऊ का सुरु ,, आज्ञा असावी ..
सिद्धेश्वर विलास पाटणकर
30 Jul 2018 - 11:47 pm | भन्नाट भास्कर
भारतात कोकाकोला आल्यामुळे चहाच्या टपरय़ा बंद पडल्या असे झाले का?
असे होऊ शकते का? तर नाही, चहाची तलफ कोकच काय तर कॉफी सुद्धा भागवू शकत नाही.
तसेच मराठी संकेतस्थळे आणि व्हॉटसपचे आहे. दोन्ही भिन्न शैली आहेत. दोन्हीकडे रमणारे पब्लिक भिन्न आहे. अर्थात एकच जण दोन्हीकडे रमू शकतोच. पण म्हणून मराठी संस्थळांना व्हॉटसप पर्याय होऊ शकत नाही.
हे सांगायचा हेतू हा की आजाराचे निदान चुकीचे असले तर उपचारांची दिशा चुकू शकते. व्हॉटसपचा ईथे काही संबंध नाही.
पिढी दर पिढी मराठीत शिकणार्यांची आणि व्यक्त होणारय़ांची संख्या रोडावताच हे होणारच आहे.
पण तरी मराठी संस्थळे काळानुसार स्वत:ला बदलतील तर जास्तीत जास्त टिकतील.
जे पंधरा वर्षापूर्वी या संकेतस्थळांवर चालायचे तेच पुढील पंधरा आणि त्यापुढील पंधरा वर्षेही चालावे ही अपेक्षा कश्याला?
जर अश्या संस्थळांवर नवीन पिढी येतेय तर ती आपले विचार आणि आपली स्टाईल घेऊन येणारच, ईथे कोणी कोणाशी कितपत अॅडजस्ट करायचे आहे हे प्रत्येकाने आपापल्या परीने समजून घ्यायला हवे.
31 Jul 2018 - 3:03 pm | सस्नेह
अलेक्सा आणि गूगल ट्रेंड्सचं माहिती नाही. आणि इतर संस्थळांचे पण माहिती नाही.
मालकांनी एकदा म्हटले होते की मिपाचे सदस्य हेच मिपाचे वैभव आहे.
हे सदस्य आताशी का दुरावले आहेत त्याचा विचार व्हावा.
31 Jul 2018 - 3:19 pm | सप्तरंगी
मी मध्ये मध्ये वाचण्यासाठी चक्कर टाकते पण इथे किंवा तत्सम sitesवर आजकाल फारसे काहीही घडत नाही किंवा दर्जेदार लिखाण होत नाही असं वाटत. मला खूपदा माझ्या कविता, लेख, पेंटिंग्स पोस्ट् करावे वाटतातही पण लॉगिन करणे , लिहिणे (जे गुगल मराठी वापरूनच करावं लागतं ) हे जास्तीचे रिकामटेकडे काम होऊन जातं. मी w/अँप वापरत नाही तरीही असेच वाटतं.
सहज उपलब्ध नसणे, trolling , दर्जा खालावणे, निनावी ids, पटकन काहीही लिहिता किंवा अपलोड करता न येणे, पर्सनल touch -संवाद नसणे, इतर fb सारखे सहज शेकडो लोकांपर्यंत पोहचू शकणारे इतर माध्यम वगैरे कारणे असतील.
31 Jul 2018 - 3:30 pm | माहितगार
हे मला पटते, मिपा मालकांनाही आणि इतर सर्वच सदस्यांना खरेच पटेल; पण या वैभवाचे दुसरे रुप कंपुर्गिरी, एकेमेकांची मुस्कटदाबी , दुसर्या गटातील लोकांना घालवण्यासाठी व्यवस्थापनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणणे . आपल्या पेक्षा वेगळ्या विचाराच्या लोकांवर व्यक्तिग्त टिका आणि ट्रोलींग, विरुद्ध विचारसरणीच्या लोकांना एकमेकांचा डुआयडी ठरवून घालवणे, सत्य न पचवता खरे बोलणार्यांच्या मागे लागणे, असे आहे हे कळले तरी मालक मंडळींना वैभवाच्या सगळ्या फिचर्स स्विकारण्यापेक्षा दबाव स्विकारावे लागतात आणि मुग गिळून व्यवसाय सांभाळायला लागतो असे ही असावे पण असोच
31 Jul 2018 - 3:42 pm | सप्तरंगी
अगदीच मान्य. खूप सगळे लोक फक्त चकटफू माध्यम हातात आहे ते हि स्वतःच्या नाव सांगायची गरज नाही म्हणून काहीही लिहीत राहतात, काही एकमेकांची री ओढत राहतात अर्थात त्यासाठी संपादक मंडळ काही करू शकत नाही. ते तरी कुठे कुठे लक्ष देणार, त्यात त्यांचा दोष नसावा. पण खूप कमी ids आहेत जे संयत विचार करतात, दर्जेदार लिहितात. विचारांसाठी - वाचण्यासाठी पोषक / माहितीपूर्ण / मनाला भावणारे तरल असे खूप कमी झाले आहे. एकंदरीत इथे किंवा अश्या कुठल्याही स्थळी ८-१० चक्कर नाही मारली तरी फारसे काहीही घडलेले नसते:))
31 Jul 2018 - 3:43 pm | यशोधरा
आतापर्यंत सगळ्यांच्या ( तुम्हाला वाटणाऱ्या) चुकांवर तुम्ही हिरीरीने बोट ठेवलेय. स्वतःचे काय चुकते आहे हे बघायला वेळ मिळाला आहे का?
31 Jul 2018 - 3:55 pm | माहितगार
होय, व्यक्तिगत नसणार्या टिका आवर्जून लक्षात घेण्यासाठीचा स्वतःचा ओपनमाईंडेडनेस पुरेपूर वापरतो. ट्रोलींगला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर गदा येत असेल तर मात्र दाद मुळीच देत नाही हि माझी मुख्य उणीव आहे. लिहू नका अशी कुणि तंबी दिली तर उसाच्या रसाच्या मशिन मधन रस नसलेली चिपाड आणि बेचव रस बाहेर पडतो असाही आक्षेप मन मोकळे पणाने कबूल करतो पण असे होण्यास मला कुणि अमुक तमुक लिहू नका असे उत्साह संचारत असते.
बोर्डावर माझेच धागे दिसतात हि एक तक्रार दिसते . इतरांनी लिहिले नाही तर माझेच धागे दिसणार ना . इतरांना न लिहिण्या पासून थांबवलेले असते ना काही. इतरांना जे लोक घालवून देतात तेच होलीअर दॅन दाऊ म्हणून आता कुणि नाही राहीले असे सांगत उरलेल्या आपल्या विरुद्ध विचारांचे आयडी कसे बंद करायचे या व्यापात पडलेले असतात. आणि मग कुणितरी अशा धाग्यांसारखे धागे ही काढते . मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार
31 Jul 2018 - 4:24 pm | यशोधरा
तुम्ही स्वतःला सोयीस्कर अशी भूमिका घेतली आहे, हे लक्षात येते आहे. :)
तुम्ही ओपन माईंडेड आहात हे तुम्हीच म्हणून आणि ठरवून कसे चालेल? ते इतरांनी म्हटले, मान्य केले तर त्याला काही अर्थ आहे. हे तुमचे प्रतिपादन म्हणजे वाघोबाची मुलाखत कोल्होंबाने घेतल्यागत झाले!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जोरदार मागणी आणि समर्थन करताना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकास आहे हे विसरून कसे चालेल? ज्या हक्काने आणि इतरांचे मत जराही लक्षात ना घेता धाग्यांच्या गुंडाळ्यातून भाराभर दोर्या निघाव्यात तसे तुमचे धागे अक्षरशः प्रसवत असता, त्याच स्वातंत्र्याचा उपयोग करून मिपाकर ते नाकारीत आहेत. त्यातील भाषाही सहज, सोपी आणि प्रवाही नसल्याने प्रसंगी ते रटाळ होऊन जातात. बरे, कोणी ते वाचत आहे का, त्यावर चांगले प्रतिसाद येत आहेत का, असे होत नसल्यास का होत नाही ह्याचा काही विचार आपण करता का? बरे, विचार केल्यास इतरांना दोष देणे इतकंच करता का?
कोणत्याही विषयाची सहज सुंदर भाषेत आणि अभ्यासू पद्धतीने मांडणी केली असता मिपावर धागे उचलून धरले जातात, जर तसे होत नसेल आणि आता धागे आवरा अशा प्रतिक्रिया मिळाल्या असतील तर थोडे आत्मपरीक्षण करण्याचेही बघावे, अशी विनंती. केवळ स्वतःपुरता विचार ना करता, ह्या संस्थळाचा विचार करावा.
लोकांना तुमच्या इतका मोकळा वेळ नसेल आणि सकाळ संध्याकाळ लिहून धागे काढू शकत नसतील, किंवा त्यांना स्वतःच्या लिखाणाच्या वकुबाची योग्य जाणीवही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरे पाहता आपले लिखाण वाचण्यास कोणीही आसुसलेले नाही ह्याची योग्य आणि humble जाणीव त्यांना असण्याची शक्यताही अधिक असावी, नाही का? हे सुद्धा लोक भसाभसा ना लिहिण्याचे कारण असू शकते.
असो. आपण सुज्ञ नक्कीच असणार. अधिक लिहीत नाही. ह्यात काही वैयक्तिक टीका करायचे मनात नाही अथवा कंपू बाजीही. एक मिपाकर वाचक म्हणून जे सद्ध्या खटकते ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
धन्यवाद.
31 Jul 2018 - 4:34 pm | माहितगार
ठिके ना चांगली गोष्ट आहे. पण समजा मध्यंतरात माझ्यासारख्यांनी सुद्धा नाही लिहिले तर बोर्डावर अजून जुने धागे अजून जास्त काळ दिसतील एवढेच ते काय.
आपणही सुज्ञ असल्यास लेखकाच्या लेखनाची प्रक्रीया कशी होते हे माझ्या कडून नको इतर कुणाकडून समजावून घ्यावे. प्रत्येक लेखकाचा एखादा काळ वेगाने लिहिण्याचा असू शकतो. असे इतर लेखक हेरुन त्यांना विचारावे. (माझ्या अभि व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन आणले जाण्याची शंकाही आल्यात एक धागा जास्त पडेल कमी नाही या बाबतच्या टिके सहीत मी माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी तसे करतो आणि भविष्यातही मी माझ्यातील या अट्टाहासत बदल न करण्याची नि:संदिग्ध ग्वाही देतो - माझे अधिक धागे नको असतील तर फाट्यावर मारावे ट्रोलींग करु नये) बाकी लेखनाच्या क्वालिटीचा भाग आहे तॉ सब्जेक्टीव्ह गोष्ट आहे कुणाला काय आवडते तर कुणाला काय आवडते.
31 Jul 2018 - 4:38 pm | यशोधरा
माझेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे!
असोच असो.
31 Jul 2018 - 5:03 pm | माहितगार
अवश्य वापरावे पण त्या केस मध्ये बोर्डावर धागे अधिक का अशा प्रकारची टिका मन मोकळे करण्यापुरतीच मर्यादीत ठेवावी आणि प्रत्यक्षात अधिक धाग्यांसाठी आणि सॉलीड टिका झेलण्यासाठी तयार रहावे.
31 Jul 2018 - 5:12 pm | यशोधरा
किती अयले, किती गयले.
31 Jul 2018 - 3:58 pm | माहितगार
अजून दोन उणीवा राहील्या कोणत्याही एका कंपुचे सदस्यत्वे न घेणे. आणि सगळ्यांवर टिका केल्या मुळे सगळ्यांच्या ट्रोलींगचे लक्ष्य होणे.
31 Jul 2018 - 4:21 pm | अभ्या..
@माहीतगारजी,
उगी बेजबाबदार आरोप करु नकात. कंपूचे सदस्यत्व न घेण्याचा बाणा तुम्ही दाखवलात, जरा सांगता का कोणत्या कंपूने तुम्हाला आमंत्रण दिलेय? नसेल तर कुठला कंपू तुम्हाला दिसला आहे? कोण आहेत त्याचे मेंबर? आणि ट्रोलिंग ट्रोलिंग कौतुक लावलायत, काय आहे ते ट्रोलिंग? तुम्ही टिका केली तर किंवा नाही केली तरी लोक टीका करणारच. मग टिका करेल तो ट्रोल का?
तुमचे दुवे देण्याचे आणि भरपूर टायपायचे कसब वादातीत आहे, तरीही चार गोष्टी मी बोलू इच्छितो. कदाचित ह्या व्याकरणदृष्ट्या, नियमानुसार परफेक्ट नसतीलही पण एक व्यवहार आणि त्या व्यवहारातून दृढ झालेले नाते ह्या संदर्भात आहेत. ह्या गोष्टीतले आम्ही म्हणजे मी आणि समविचारी काहि लोक असतील, आमचा काही व्हाटसप ग्रुप नाही की ना आम्ही फेसबुकावर ही चर्चा करतो. हे साधारण मिपावरच सादप्रतिसादलेखनातून जाणवलेले आपलेपण. बाकी काही नाही ह्याची कृपया नोंद घ्या. ह्याला कंपू म्हणत असताल तर हो आहे हा मिपाकंपू.
आम्ही साधे सांसारिक(ही पदवी जस्ट मिळालीय बर्का) मध्यमवर्गीय लोक. लहानसहान छंद आणि आवडीनिवडी असणारे. काही वाचनाचा आणि लिखाणाचा नाद असणारे. कुठुनतरी कसेतरी मिपाशी कनेक्ट झालो. साधी अपेक्षा की कुणीतरी काहीतरी लिहितंय, चांगले लिहितंय, मनातले लिहितंय आणि बाकीचे त्याला प्रतिसाद देताहेत. मोनोलॉग नव्हे तर सगळ्याच म्हणजे प्रतिसाद लेखनातले लेखनकौशल्यही एंजॉय केले जातेय. काहिवाचकजणांची उर्मी उसळून येते, कधी आवडता विषय येतो, कधी माहीत असलेली घटना येते आणि एखादा वाचक लेखकही बनतो. काही चर्चा एंजॉय करतात काहीजण त्यातील मुद्दे एंजोय करतात. कदाचित कधी शब्दाला शब्द वाढतो, गैर शब्दाचा वापर होतो, एखाद्याला त्रास देण्यासाठीच सुध्दा लेखन केले जाते, ही साथ पसरु नये ह्यासाठी संपादक असतात, नियम असतात पण हा गावगाडा चालू राहतो.
होतं काय की, नुसतेच कुणीतरी भाराभार लेखन करतंय, आंजामुळे उपलब्ध असलेल्या इतर साईटवरचं लेखन सगळीकडेच प्रतिसाद मिळवायच्या उर्मीने सगळीकडेच प्रकाशित करतंय तर त्याला कसा कुठे काय प्रतिसाद द्यायचा? ह्या मार्यापुढं नवोदीत लेखकांनी हाच कित्ता गिरवायचा ठरवला तर प्रतिसाद द्यायचे कुणी? जो तो आपापल्या लेखनाच्या प्रेमात. बरं नुसतं प्रतिसाद मिळवणं हेच जीवनध्येय असल्यासारखे मोहीमा चालवणं आपण पाहिलेय का कधी? हे पण होते. इथल्या नियमात बसवूनच डुआयडी काढले जातात. त्यांच्याकडून वाहवा करुन घेतली जाते, त्यांना उपप्रतिसाद द्यायच्या नावाखाली परतपरत धागे वर आणले जातात. चर्चेत राहण्यासाठी फुकाचे वादविवाद घडवले जातात, इतर साईटवरची मित्रमंडळी आमंत्रित करुनही अशा मोहीमा पार पाडल्या जातात. कशासाठी हे सारे तर फक्त प्रतिसाद मिळवणे. आता ह्या परिस्थितीत नव्या वाचकांनी आणि लेखकांनी अशाच काही प्रथा अवलंबायचे ठरवले तर नियमात बसून त्यांना अटकाव करता येणार नाही हे सत्य आहे पण शुध्द व्यवहाराने म्हणायचे झाले तर कशासाठी हे सारे? आहे ना प्रतिसादाची आस, आहे ना अफाट प्रतिभा, आहे ना वेळ, तर लिहा ना भरपूर, द्या कधीतरी दुसर्यांना पण प्रतिसाद. दिसताहेत का कधी ते? पूर्वी मिपावरच काहीजण खरोखर सरस्वती प्रसन्न असणारे असायचे, त्यांच्या लेखनाने प्रचंड आनंद दिलाय पण आता काय दिसते? सगळ्यांच नव्या लेखकांना प्रतिसादाची आस आहे पण हे संस्थळ म्हणजे गावगाडा आहे ह्याचे मात्र भान नाही. स्वतःचा लेख प्रकाशित करणे, त्यावर धन्यवाद धन्यवाद करणे ह्याशिवाय काही योगदान असते ह्याची जाणीव कुणी करुन द्यायची? तुम्हासारख्या माहीतगारांनीच ना? नुसते नव्या लेखाला उत्तेजन द्या असे म्हणाले की आम्ही पण देतो हो उत्तेजन पण जरा काही वेगळे बोलले की त्याचे सोयीस्कर अर्थ काढून शत्रुत्व धरायचे पाप कशासाठी?
मी छान छान कर्तो, मग तू पण करायचे बरं का, मी तुझा धागा वर आणतो मग तुही तसेच करायचे असे छोटे छोटे बारीक स्वार्थ सगळीकडे दिसत असतात. आता ह्यातला धागा वर आणणे म्हनजे फार मोठे टास्क आहे किंवा संस्थळाला त्रास होतो अशातला भाग नाही पण एकदा अशा प्रथा पडत गेल्या की नंतर चांगले लेखन येत नाही अशा बोंबा मारण्यात काही अर्थ नाही. शिवाय चर्चा की लेखन हा वाद तर फार जुना आहे, चर्चा तात्कालिक असतात, लक्षात राहते ते ललित लेखन, नवीन वाचकांना आकर्षित करते ते ललित लेखन. त्या दृष्टीने काही उपाययोजना आपल्या डोक्यात आहेत का? अगदी वैयक्तिकच व्हायचे ठरवले तर नवीन वाचकांच्या, लेखकाच्या पिढीला तुम्ही काय देउ शकता? त्याचे मूल्य काय आहे? केवळ नियमबध्द शब्दबंबाळ चर्चा वाचणारी आजची पिढी आहे का? जर आजच्या पिढीच्या भाषेत तुम्ही संवाद साधू शकत नसाल तर तुम्हाला नव्या पिढीचे प्रबोधन करण्याचा कितपत अधिकार आहे? हे गेले म्हनून चर्चा बंद पडल्या असे गळे काढण्यापेक्षा त्या चर्चांच्या मुल्याविषयी तुम्ही कधी चर्चा केलीय का? नुसते व्यक्तीगत व्यक्तीगत होतेय म्हणून रडण्यापेक्षा आपणास लोक व्यक्तीगत का सांगत आहेत त्याचा व्यक्तीगत विचार केला आहे का? तुमच्याच भाषेतला चंद्र तुम्ही स्वतः कधी दाखवणार्याच्या बोटाकडे न पाहता का पाहायचा ह्याचा विचार केला आहे का? किंबहुना चंद्र दाखवणे हेच माझे काम आहे आणि मी दाखवेल तोच चंद्र आहे असा आविर्भाव आजच्या पिढीला कितपत पचनी पडेल ह्याचा कधी विचार केला आहे का?
संस्थळावरील वातावरण छान राहावे असे तुमचे मत असेल तर तुमच्या मताविषयी आदरच आहे पण प्रत्येक संस्थळाला एक मानवी चेहरा असतो आणि त्याच्या प्रत्येक वर्तनाला आपण नियमात तोलू शकत नाही हेही तितकेच सत्य आहे. तस्मात आपणाशी अधिक चर्चा न करता मी पूर्णविराम घेतोय.
(दम लागला राव इतके टायपायला, तुम्हाला ह्या बाबतीत मात्र सॅल्युट आहे ;))
31 Jul 2018 - 4:35 pm | चांदणे संदीप
डांगेअण्णांची आठवण आली.
#मिसिंग डांगेअण्णा
Sandy
31 Jul 2018 - 4:38 pm | अभ्या..
आठ्वण येणारच डांगेआण्णाची,
युनिव्हर्सिटी सेम आमची. ;)
31 Jul 2018 - 4:54 pm | खिलजि
मित्रा, शोल्लीड बॅटिंग केलियस . उग्गीच नाय तुला मी माझा मित्र म्हणत . ह्याला म्हणत्यात टंकलेखन . हे घे , पुन्हा एकदा टिम्ब फ्री .............................................
31 Jul 2018 - 4:56 pm | अभ्या..
धन्यवाद धन्यवाद,
मित्र तर हायच, नुकतेच कळले सोयरे पण आहात. ;)
31 Jul 2018 - 5:07 pm | खिलजि
अर्रे वा , खरंच कि काय .. इश्वास नाय बसत राव ..
31 Jul 2018 - 4:58 pm | माहितगार
चला मी त्यातल्या त्यात छोटा प्रतिसाद देतो, तेवढाच बदल ! कसय हत्ती प्रत्येकाला वेगवेगळा दिसतो. मिपाच्या मुखपृष्ठावर क्वालिटी लेखन अधोरेखीत करण्यासाठी शिफारस नावाचा मोठ्ठा भाग आहे, विशेषांक भागा मध्ये विशेष लेखन असते. बर जे जुने सदस्य आहेत ज्यांना मुखमृष्ठावरील लेख आणि चर्चातून नको असलेले लेखक किंवा प्रतिसादकांचे प्रतिसाद वाचायचे नाहीत त्यांना न वाचण्याची निवड नवे लेखन आणि नवे प्रतिसाद मधून करता येते.
पण तरीही बरोबर आपल्याला विचार न पटणार्या , किंवा लेखन शैली न आवडणार्या लेखकाच्या धाग्यावर जायचे आणि व्यक्तीगत टिका करायची यास तर्कसुसंगत कारण काहीही शिल्लक नसते आणि त्यास ट्रोलींग हेच विशेषण असते. आणि आपल्याला न पटणार्या विचारांच्या एकत्रितपणे मागे लागणे आणि त्यास संस्थळबाह्य बनवण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव आणणे हि कंपूगिरी असावी.
एवढेही करुन तुम्हाला म्हणजे मिपाला काही लेखक बोर्डावर दिसून नको असतील तर नको असलेल्या लेखकांचा वेगळा विभागही मिपाने करण्यास माझी हरकत नाही पण आम्ही म्हणू तीच क्वालिटी आणि आम्हाला नको त्यांनी लिहू नये असे आग्रहातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे पटत नाही.
लेखक जुना असो की नवा असो पहिले किमान पहिले पाच प्रतिसाद धागा लेखातील विषयास विषय नाही पटला शीर्षकास धरुन असावेत . त्या नंतर कोण काय टिका करतो त्या कडे लक्ष्य द्यायचे कि फाट्यावर मारायचे हे लेखक नंतर बघून घेऊ शकतात. पण आपल्या विचारांवर मागच्या वेळी टिका केलेल्या लेखकाचा लेख दिसतोय चला पाडूया हा अॅटीट्यूड स्पृहणीय नसावा. तुर्तास इथे विराम घेतो. मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार.
31 Jul 2018 - 5:07 pm | अभ्या..
इतके गहाळ स्टेटमेंट आपणांकडून अपेक्षित नाही.
एकत्रित मागे लागणे म्हणजे? इथे काय टोळ्या बसल्यात काय? बळंच व्हिक्टीम कार्ड खेळू नका. शिवाय तुम्ही एकटे समर्थ आहात स्वसंरक्षणाला.
व्यवस्थापनावर दबाव आणतो म्हणजे? कैच्याकै. आम्हालाही उडण्याची जितकी भीती आहे जितकी तुम्हाला आहे. त्यात आपपरभाव आम्हीच अपेक्षिला नाही कधी.
त्यापेक्षा गंभीर आरोप आपण व्यवस्थापनावर करीत आहात. का स्वतःचा आयडी उडण्याआधीचा हा डिफेन्सिव्ह स्टॅन्ड आहे?
31 Jul 2018 - 5:29 pm | माहितगार
.
=))
31 Jul 2018 - 5:16 pm | शाम भागवत
हा धागा उजवीकडे कसा काय गेला?
मला वाटले खिलजींची कविता उजवीकडे जाईल.
पण ती अजूनही आपला आब राखून आहे.
तिथे तर खूपच छान चर्चा चालू आहे.
असो.
31 Jul 2018 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयांतर करू नका रे भावांनो. सविस्तर प्रतिसाद लिहिणारच आहे. विविध माध्यमंआणि मराठी संस्थळ गलपटलं आहे का ? कारणे आणि उपाय यावर मुख्य फोकस राहू द्यावा, ही लम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
31 Jul 2018 - 6:48 pm | सोमनाथ खांदवे
प्राडॉ ,
पाहिलंत ? फुल्लटू धिंगाणा असतो शाळे सारखा , शेवटी तुम्हाला शिट्टी वाजवत मैदानावर यावं लागलं ! . हीच खरी गम्मत आहे संस्थळावर . मी आज पर्यंत व्हाट्सएपच्या कुठल्याही ग्रूपवर दोन दिवस चर्चा चाललेली पहिली नाही , कॉपी फॉरवर्ड चा सगळा मामला असतो . त्यामुळे कुठल्याही मराठी संस्थळा वर ' माहितगार ' सारखी संयमी जाणकार आदर्श सभासद असेल तर त्या संस्थळाला बहार येतो
31 Jul 2018 - 10:37 pm | माहितगार
खांदवेजी आम्हा दोघांची ओळख (परिचय) करुन देण्यासाठी अनेक आभार हं :)
31 Jul 2018 - 11:40 pm | सतिश गावडे
तुम्ही चुकीच्या व्हाट्सप ग्रुपांमध्ये आहात. :)
बाय द वे, तुमचं ग्रामीण बाजाच्या भाषेचं सोंग केव्हा गळून पडलं हे तुमचं तुम्हालाही कळलं नसेल ना? ;)
1 Aug 2018 - 4:18 am | सोमनाथ खांदवे
स्तुती सुमने उधळल्या बद्दल धन्यवाद !!!!
प्रतिसाद उजवीकडे न जाण्याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे त्यामुळे इथेच थांबुया .
31 Jul 2018 - 6:37 pm | प्रचेतस
हो.
31 Jul 2018 - 7:14 pm | जेम्स वांड
ह्यावर एक उपाय आहे
संपादक मंडळाने ललीतलेखन संबंधी जास्तीत जास्त उपक्रम राबवणे
कन्टेन्ट क्वालिटी वर ठेवायला हे उपयोगी पडेल, मराठी दिनाच्या बोलीभाषा लेखमालेमुळेच मला मिपाचे सदस्यत्व घावे वाटले हे ही इथे मी आवर्जून नमूद करतो, अर्थात, एक उपक्रम राबवायचा म्हणजे संपादक/मालक/साहित्य संपादक मंडळीला किती मानवी तास घालवावे लागतात ह्याची मला पूर्ण कल्पना आहेच. पण तुमच्या हातात संपादकत्व, मालकीचे हक्क आहेत, एक मेंबर म्हणून उठून मी उपक्रम राबवतो म्हणलं तर जमेल असे नाहीये. त्यामुळे सगळ्या संपादक अन मालकांनाही खास नम्र विनंती की उपक्रम वाढवा, भरपूर वाढवा अर्थात आपलं वैयक्तिक आयुष्य आणि कार्यव्याप सांभाळून(च) . इतकं केलं तरी मी आपला व्यक्तिशः आभारी राहीन.
1 Aug 2018 - 1:01 am | चित्रगुप्त
आश्चर्य म्हणजे आज कायप्पावर सुद्धा याच विषयावर खात्रीशीर माहिती वाचनात आली, येणेप्रमाणे :
नासा आणि युनो यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार वाट्सप मुळे मराठी संस्थळांकडे लोक पूर्वीसारखे आकर्षित होणे कमी झालेले आहे, परंतु यामुळे कुणाच्या पोटापाण्यावर गदा आलेली नाही. नासाच्या मते अमेरिकेच्या आर्थिक समस्यांमधे भर टाकणारी चिंतेची बाब म्हणजे अमेरिकेत यापूर्वी टनावारी बनणार्या रतिचित्रणाच्या धंद्यालाही वाट्सपमुळे उतरती कळा लागलेली असून यापायी अनेक रतितारका उघड्या(वर) पडल्या असून सनीबाईंसारख्या काहींना तर परांगदा होऊन परदेशी शरण घ्यावी लागली आहे. यापुढील संशोधनासाठी नासा लवकरच एक विशेष यान पाठवणार असून ते वातावरणातील वात्सप आणि अन्य संस्थळांच्या लहरींचा तौलनिक अभ्यास करणार आहे.
1 Aug 2018 - 8:17 am | अर्धवटराव
तर पुर्वीचं मिपा राहिलं नाहि. ;)
तसं जाणवतं खरं. अगदी तीव्रतेने. पण ते कायप्पामुळे झालं असेल असं वाटत नाहि. चेपुरावांनी सगळ्यांचीच गोची केली आहे... मिपा तरी त्याला कसं अपवाद असणार. पण मिपाचि चव हाच मिपाचा युएसपी होता. त्याच्या भरोशावर मिपाने चेपुला देखील लोळवलं असतं.
2 Aug 2018 - 4:00 pm | उपयोजक
https://www.google.co.in/amp/www.lokmat.com/manthan/mishalpav-myboli/amp/
2 Aug 2018 - 9:11 pm | धर्मराजमुटके
वाट्सअॅपमुळे मराठी संस्थळे मंदावली आहेत म्हणून आता वाट्सअॅप ने पुढाकार घेऊन फॉरवर्डसच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. जेणेकरुन लोकांचा अनमोल वेळ वाचेल आणी ते परत मराठी संस्थळांकडे वळतील.
:)