खानदेशाच्या भटकंतीनंतर या भागापासून आपल्याला मराठवाड्याची सफर करायची आहे. अपवाद सोडला तर माझे मराठवाड्यातील बहुतेक भुईकोट पाहून झालेले आहेत, त्यामुळे पुढचे काही महिने तरी या संतांच्या भुमीचीच ओळख करुन घ्यायची आहे. कमी पावसाचा भाग असल्याने आणि कडाक्याच्या उन्हामुळे सरत्या पावसाळ्यात आणि मुख्यतः थंडीमधे इथली भ्रमंती सुसह्य ठरते. औरंगाबाद ( संभाजीनगर ) जिल्ह्यातील लेणी, तीन ज्योर्तिलिंगा, दोन शक्तिपीठांसहित बरीच मंदिरे आणि देवगिरी, माहुरसारखे तुरळक डोंगरी किल्ले सोड्ले तर उत्तमोत्तम भुईकोट असलेल्या मराठवाड्याची भटकंती खुप काही नवीन देउन जाते. मात्र वर्षानुवर्षे माथी आलेला दुष्काळामुळे धार्मिक पर्यटन सोडले तर इथे आवर्जुन कोणी येत नाही. पण पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादसहित मराठवाड्यात पहाण्यासारखे बरेच काही आहे हे नक्की. गरज आहे ती थोडा त्रास सहन करुन अनवट काही पहाण्याची मनाची तयारीची. पश्चिम महाराष्ट्रासारख्या सोयीसुविधा इथे नाहीत किंवा जंगलांनी समृध्द असा विदर्भासारखा परिसर नाही, काहीसा उघडाबोडका असलेला हा भाग केवळ नवीन काही पहायचे याची तयारी असेल तर अनेक उत्तम स्थळांची सहल घडवतो.
या मराठवाड्याच्या सफरीत आपण सुरवात करणार आहोत ती एका प्राचीन मंदिराच्या दर्शनाने आणि कोरीव लेण्याच्या फेरफटक्याने.
हजार वर्षांपूर्वीची मंदिरे आजही मराठवाड्याच्या सुदूर भागात दिसतात किंबहुना ती पर्यटकांचे आकर्षण बनली आहेत. इसवी सनाच्या दुसर्या शतकापासून महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शिल्पकला बहरली, अजिंठा, वेरूळसारखी कलाकृती साकारली, ती पुढच्या १४ व्या शतकापर्यंत छन्नी-हातोड्याच्या घावातून अप्रतिम शिल्पे साकारली गेली. हजार-बाराशे वर्षे ही कला येथे बहरली. या हजार-बाराशे वर्षांच्या मंदिरांच्या इतिहासात ११ आणि १२ वे शतक उल्लेखनीय म्हणता येईल. चालुक्य आणि यादव ही दोन राजघराणी या काळात मराठवाड्यात होऊन गेली. त्यांच्याच काळात ही मंदिरे अस्तित्वात आली. धार्मिकदृष्ट्या विचार करता सातवाहनांच्या पूर्वीपासून या प्रदेशावर बौद्ध धर्माचा पगडा होता, तो वाकाटकांपर्यंत. पुढे चालुक्यांनी शैव पंथाची कास धरली आणि पुढे यादवही शिवभक्तच होते. त्यामुळे या दोन राजवटींमध्ये शिवमंदिरांची निर्मिती झाली आणि मंदिरांवरील शिल्पकला बहरली, ती आजही दीड हजार वर्षांनंतर आपण अनुभवतो. पुढे यादवांच्या काळात मुस्लिमांच्या आक्रमणानंतर तिचा -हास झाला. त्या काळातील ही मंदिरे आजही श्रद्धेची ठिकाणी आहेत आणि पर्यटन केंद्रे बनली. हा काळानुरूप झालेला बदल आहे. अशी जवळपास सव्वासे मंदिरे आजही चांगल्या-वाईट अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य शिवमंदिरे आहेत. शिवमंदिरांचा विचार केला, तर औंढा नागनाथ, होट्टल, निलंगा, बीड, अन्वा, अंबाजोगाई ही देवस्थाने आणि शिल्पे या दोन्ही अर्थाने प्रसिद्ध; परंतु याशिवाय मराठवाड्यातील खेडोपाडी अशी अनेक दुर्लक्षित मंदिरे आहेत. त्यांचे महत्त्व पंचक्रोशीपुरते मर्यादित राहिले. अशा मंदिरांमध्ये अंभई, रहिमाबाद (जि. औरंगाबाद), पाली (बीड), तेर (उस्मानाबाद), भोकरदन (जालना), केसापुरी (बीड) अशा अनेक मंदिरांचा उल्लेख करता येईल.
शिल्पकलेचा अजोड नमुना असलेली अशी मंदिरे औरंगाबाद परिसरात मोठया प्रमाणात आहेत. आडमार्गांवरील गावांमध्ये आजही काही शिवमंदिरे आहेत.सिल्लोड-सोयगाव परिसरात आडमार्गांवर नागेश्वर, वडेश्वर, मुर्डेश्वर हि महादेवाची प्राचीन शिवमंदिरे असुन त्यांचे महत्त्व पंचक्रोशीपुरता मर्यादित राहिले आहे.
या मंदिरांतील सिल्लोड तालुक्यात असणारे अंभईचे वडेश्वर मंदिर प्राचीन वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे.
मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवरील कोरीव कामाप्रमाणेच प्रवेशद्वारही कोरीव आहे. बाह्य भागावर काही मिथुन शिल्पे आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भगृहे असणारे मंदिर आज कळस वगळता चांगल्या स्थितीत आहेत. हा कळस नव्याने बांधल्याचे आढळते. १२ व्या शतकात अजिंठ्याच्या डोंगररांगांत अंभईशिवाय हट्टी आणि मुर्डेश्वर या दोन ठिकाणी शिवमंदिरे आहेत.
नागरिकांची अनास्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिराचा बराचसा भाग कोसळला असुन मंदिरांला रंगरंगोटी करुन विद्रूप केले गेले आहे. मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने नुकतेच पाऊल उचलले आहे. औरंगाबाद – अंभई हे अंतर ९० कि.मी. असुन औरंगाबादहून अंभई येथे जाण्यासाठी सिल्लोड गाठावे. सिल्लोडच्या पुढे मंगरूळ फाट्याने साधारण २२ कि.मी.अंतर पार करून अंभई गावात जाता येते. अंभई हे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा डोगररांगांमध्ये वसलेले छोटेसे गाव. या गावात १२व्या शतकातील तीन गर्भगृहे असणारे शिवमंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे.
मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवरील कोरीव कामाप्रमाणेच याचे प्रवेशद्वारही कोरीवकामाने सजलेले असुन बाह्य भागावर काही मैथुन शिल्पे आहेत.
प्रथमदर्शनी गर्भगृहाच्या शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा नजरेस खटकतो. या देखण्या शिल्पमंदिराची रचना समोर एक व दोन्ही बाजुला दोन गर्भगृह, सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाची आहे.
याचा मुखमंडप व सभामंडप पुर्णपणे कोसळलेला असुन त्या जागी नवा सिमेंटचा सभामंडप बांधण्यात आला आहे.
कोसळलेल्या मुखमंडप व सभामंडपावरील मुर्ती व कोरीव दगड मंदीर परीसरात मोठया प्रमाणावर विखुरलेले आहेत. मंदिराचा दगडी चौथरा काही प्रमाणात मातीत गाडला गेला आहे. या मोठया दगडी चौथऱ्यावर मंदिराची उभारणी करण्यात आलेली असुन मंदिराच्या समोरच पायऱ्यांची प्राचीन बारव आहे.
येथे मंदिराचे कोरीव खांब व अनेक मुर्ती झाडाखाली ठेवलेल्या आहेत.
गर्भागृहासामोरील मंडपात विशाल नंदी असुन त्याच्या घाटदार शरीरावर सुंदर अलंकार कोरलेले आहेत. डाव्या व उजव्या हाताला छोटे दालन असुन त्यात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत.
मुख्य गाभाऱ्याच्या व शेजारच्या लहान गाभाऱ्याच्या तोरणभिंतीवर अष्टमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या अष्टमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह,मनुष्य यावर बसलेल्या आहेत.
गाभाऱ्याच्या मुख्य दाराजवळ वरच्या भागात शंख व चिपळया वाजविताना व नृत्य करीत असलेले स्त्री-पुरुषांचे शिल्प तसेच वेगवेगळया पध्दतीचे नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपातून गर्भगृहात जाताना चार-पाच पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या आत मधोमध उत्तराभिमुख शिवलिंग आहे. गर्भगृह चौरसाकृती असुन गाभाऱ्याच्या भिंतीवर नव्याने फरशी लावल्याने गाभाऱ्यातील कोरीवकाम झाकले गेले आहे.
मंदिराला अष्टकोनी चौथरा असुन विविध प्रकारची छोटीमोठी शिल्पे मंदिराच्या बाहेरील अंगाने कोरलेली आहेत.
या शिल्पमंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्य़ांगावर खजुराहो सारखी कामक्रीडा करत असलेली शृंगारशिल्पे कोरलेली आहेत.
छोटय़ा आकारातील ही शिल्पे काही ठिकाणी लांब शिलांवर पत्रिकेच्या स्वरूपात कोरून नंतर मंदिरावर जडवण्यात आली आहेत. येथील कळस पुर्वी कसा असावा याविषयी अनेक तर्क आहेत. मंदिर डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला हवा. अजिंठ्याच्या या डोंगररांगांत अंभई शिवाय हट्टी आणि मुर्डेश्वर या दोन ठिकाणी प्राचीन शिवमंदिरे आहेत.
घटोत्कच लेणी
घटोत्कच लेण्या ह्या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जंजाळा गावी वसलेल्या बौद्ध लेण्या आहेत. अजिंठा लेण्यांकडे जाताना गोळेगावापासून डावीकडे पंधरा कि.मी.वर असलेल्या अंभई गावापासून पुढे बोरगावजवळ घटोत्कच लेणी आहेत. प्राचीन काळी येथे असणाऱ्या घटोत्कच गावामुळे या लेण्याला घटोत्कच हे नाव पडले असावे.
जंजाळा गाव हे पठारावर वसलेले असुन गावाच्या उजव्या बाजूला घटत्कोच लेणी तर डाव्या बाजूच्या पठारावर जंजाळा किल्ला आहे. स्थानिक लोक या लेण्याना घटुजाईची लेणी किंवा घटुरधस म्हणतात.
गडाच्या पूर्वेकडील दरीत ह्या लेण्या कोरलेल्या असुन लेणीत जाण्यासाठी पुरात्तत्व खात्याने पायऱ्या बांधल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून २८ किमी अंतरावर असूनही घटोत्कच लेणी दुर्लक्षित वाटतात पण सिमेंटच्या पायऱ्या आणि विहारांना लाकडी कवाड बांधली असल्यामुळे पुरातत्त्व खात्यानुसार लेणी अगदीच दुर्लक्षित नाही. मधोमध एक भव्य आणि प्रशस्त असं विहार, विहारात मोठमोठे खांब आणि त्याच्या दोन्ही बाजुला छोट्या छोट्या खोल्या असा घटोत्कच लेण्यांचा थाट आहे.
पायऱ्या उतरल्यावर सर्वप्रथम उजव्या बाजुला सात नागफणा धारण केलेली एक मुर्ती पहायला मिळते. या मुर्तीच्या पुढे अजुन एक शिल्प आहे पण प्रचंड झिज झाल्याने ते ओळखू येत नाही.
येथुन पुढे आपला प्रवेश लेण्याच्या दरवाजासमोर होतो.
वास्तविक वटवाघळांचा त्रास नको म्हणून लेण्यांच्या दरवाज्याला जाळ्या बसविल्या आहेत तरी आत वटवाघळांचा त्रास जाणवतो.
हे चैत्यगृह असुन त्याला आत जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत.
चैत्यगृहाच्या बाहेर उजव्या व डाव्या बाजुस दालने कोरलेली असुन उजव्या दालनाबाहेर अनेक बुद्धमुर्ती कोरल्या आहेत तर डाव्या दालनाबाहेर भिंतीवर वराहदेवचा शिलालेख कोरला आहे.
पुरातत्व खात्याने थोड्याफार माहितीचा एक फलक येथे लावला आहे.
लेण्यातील चैत्यागृहाचे दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० अष्टकोनी स्तंभ आहेत. मधल्या दोन व कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे.
दालनाच्या डाव्या बाजूला अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ये धर्मा हेतुप्रभवः असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत तीन गर्भगृह असुन मधील मोठया गाभाऱ्यात सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून आसनाखाली हरणे व मधे धर्मचक्र आहे. उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही. उरलेले दोन लहान गाभारे रिकामे आहेत.
या दालनात डाव्या बाजुस ७ तर उजव्या बाजुस ५ असे एकुण बारा लहान विहार खोदण्यात आले आहेत. दोन्ही बाजुच्या मधल्या विहारच्या दरवाजासमोर स्तंभ कोरलेले आहेत. उजव्या हाताला एक वैशिष्ट्यपुर्ण स्तुप असून त्याची उंची चार मीटर असावी. स्तंभाकार स्तुपावर बुध्दमुर्ती कोरलेली आहे. स्तुपाच्या तळाशी एका केस सोडलेल्या युवतीची मुद्रा कोरलेली आहे, कदाचित शिष्या असावी. स्तुपाच्या मागच्या भिंतीवर एक बुध्द मुर्ती कोरलेली आहे.
चैत्यगृहातुन बाहेर आल्यावर पुढे डाव्या बाजुस तीन अर्धवट कोरलेले विहार आहेत तर उजव्या बाजुला खालच्या अंगास खडकात अर्धवट कोरलेले पाण्याचे टाके आहे
पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सन २०१३-१४ साली या टाक्यातील गाळ काढताना आतील बाजूस एक शिल्प उजेडात आले.
या शिल्पात चार हरिणे असुन या चारही हरिणांच्या धडास एकच डोके दाखवले आहे. या लेण्याच्या समोरील बाजुस दरीच्या दुसऱ्या अंगास अर्धवट कोरलेल्या दुमजली गुहा दिसुन येतात. घटोत्कच लेणी अजंठा लेण्यांच्या तुलनेत लहान असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील महायानपंथीय लेण्यातील पहिली व अत्यंत महत्वाची लेणी आहेत. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला वाकाटक राजा हरिषेणाचा मंत्री वराहदेव याचा बाविस ओळींचा ब्राम्ही लिपीतील एक खंडित शिलालेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवाती पासूनची वंशावळ दिली आहे. या शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकाटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने इ.स. ५ व्या शतकात हे विहार लेणे कोरण्यासाठी दान दिल्याचे समजते. अजिंठ्याच्या १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफा बांधल्या जात असताना वराहदेवाने अजिंठ्यापासून अकरा मैल अंतरावर घटोत्कच येथे देणगी देउन आणखी एका विहार उभारणीला सुरूवात केली. ही विहार-गुंफा जरी अपुरी राहिली असली तरी वाकाटक काळातील अजिंठा गुंफांचा अचूक कालक्रम ठरवण्यासाठी आणि दण्डीचा वृतान्त पडताळून पाहण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वाकाटक राजा हरिषेण याच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या त्याच्या वारसदाराला मांडलीक राजांनी सिंहासनावरून पदच्युत केले. वाकाटक इतिहासातील या घटनेमुळे घटोत्कच येथील लेण्यांचे काम अर्धवट राहिले. या लेणीविषयी सर्वप्रथम कॅप्टन रोज यांनी लक्ष वेधले व श्री डब्ल्यू गुच ब्रॅडली यांनी या लेणीचे वर्णन केले. घटोत्कच लेणी पुरातत्व खात्याने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली असून सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, औरंगाबाद यांच्या अखत्यारित आहे.-
( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) सहली एकदिवसाच्या परिसरात औरंगाबादच्या- पांडुरंग पाटणकर
४ ) www.durgbharari.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
27 Jul 2018 - 7:57 pm | कंजूस
अरे वा! इकडच्या डोंगरांची ओळख होणार! मुद्दामहून जात नाही एवढ्या दूर पण या लेखांतून पाहता येणार.
देवळावरचे गुलाबी रंगाचे बांधकाम जुन्या दगडी रचनेशी मेळ खात नाही.
3 Aug 2018 - 11:32 am | चौकटराजा
मूळ दगडी बांधकामाला तैलरंग लावून भडकपणा आणायचा उद्योग अनेक जागी चालू आहे. यात्रेकरूना ते आवडते पर्यटकांना आवडत नाही !!
27 Jul 2018 - 8:01 pm | टर्मीनेटर
माहितीपूर्ण लेख. हिरव्यागार डोंगरातला लेण्यांचा फोटो खूपच छान आहे.
28 Jul 2018 - 9:00 am | प्रचेतस
३ गर्भगृहे असलेल्या प्रकाराला त्रिदल गाभारा अशी खास संज्ञा आहे. अशाच प्रकारचा त्रिदल गाभारा किकलीच्या भैरवनाथ मंदिरात पाहावयास मिळतो. अंभईच्या मंदिरावरील शिल्पकला जबरदस्त आहे.
पुरातत्त्व खात्याने घटोत्कच लेणीची व्यवस्था नेटकी ठेवल्याचे दिसते. मराठवाड्याचा जवळपास बहुतांश भाग प्राचीन लेणी, किल्ले, मंदिरांनी संपन्न झालेला आहे. तुमच्या लेखांद्वारे त्याची उत्तम माहिती होत आहे.
28 Jul 2018 - 4:41 pm | तुषार काळभोर
अतिशय सुंदर स्थापत्याची तितकीच सुंदर ओळख!
31 Jul 2018 - 11:08 am | शिवोऽहम्
नावाने अंभईकर असूनही हे गाव कुठे आहे हे मला आजवर ठाऊक नव्हते. माहुरजवळ किनवट तालुक्यात आहे असे कोणी म्हणे तर कोणी तेलंगणात आहे असे सांगे! आज पहिल्यांदा गावाच्या परिसरातले फोटो पाहिले, मंदिर, लेणी वगैरे.. खूप छान वाटले!
31 Jul 2018 - 1:04 pm | शाली
वा वा! सुरेख लेख! आवडले!
31 Jul 2018 - 6:13 pm | चौथा कोनाडा
वाह, किती सुंदर लेखन आणि अप्रतिम फोटो !
लेण्यांचा फोटो क्र. २४ ज्यात चैत्यगृहाचे दालन आणि २० अष्टकोनी स्तंभ आहेत तो फोटो फारच आकर्षक आलाय, खांबावरचा हिरवट शेवाळी रंग, कातळी रंग अन प्रकाशाच्या छटांमुळे !
या बाजूला जाण्याचे आता पर्यंत कधी योग आले नाहीत, पण गेलो कधी तर नक्की पाहिन ! हा धागा पाहून जायची इच्छाच झालीय !
दुर्गविहारी बोले तो बॉस हैं बॉस्स ! _/\_
31 Jul 2018 - 7:33 pm | पुंबा
सुरेख लेख.
काय अप्रतिम स्थापत्य आहे या मंदिरांचे. नितांत घाणेरड्या अश्या त्या रंगाने माती केली मात्र. आपल्या पुर्वजांची सौंदर्यदृष्टी आणि आपली विद्रुपीकरण करण्याची आणि त्या सौंदर्यदृष्टीचा अपमान करण्याची अमर्याद क्षमता यांचे एकाच फोटोत घडणारे दर्शन विदीर्ण करून जाते.
31 Jul 2018 - 9:30 pm | चौथा कोनाडा
अगदी खरेय ! वाईट वाटते !
किती सुंदर प्रकारे हे पुरातन वैभव जतन केलं जाऊ शकतं. पण ........ सर्व संबंधित यंत्रणा आणि आपण स्वःत सर्व यांचा हलगर्जीपणा अन स्वार्थ साधूवृती !
1 Aug 2018 - 1:38 pm | अनिंद्य
@ पुंबा, दुर्दैवाने सहमत !
आपल्याकडे स्थापत्त्याची श्रीमंती भरपूर आहे. त्यामुळेच कदाचित त्याची आपल्याला फारशी किंमत नाही.
देशभर-राज्यभर विखुरलेल्या ह्या वैभवाच्या जतनाला, नेटके करायला गती कधी येईल कोण जाणे.
@ चौथा कोनाडा, अगदी असेच म्हणतो.
ह्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर आगाखान फाउंडेशन सारख्या जागतिक संस्थांचे काम उठून दिसते - उदा. दिल्लीतील 'हुमाँयू का मकबरा' संकुलाचे शास्त्रशुद्ध पुनरुज्जीवन. असे संवर्धनाचे काम आपल्याकडे महाराष्ट्रातही व्हावे अशी तीव्र इच्छा आहे. त्यासाठी थोरामोठ्यांशी जमेल तेंव्हा संवादही साधत असतो. पण दुर्दैवाने हे असले विषय कोणाच्याच अजेंड्यावर नसतात :-(
@ दुर्गविहारी, तुमच्यामुळे जागोजागच्या किल्ले-मंदिरे-पुरातन वास्तूंचे हे दस्तावेजीकरण होत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्या भटकंती आणि लेखनाला अनेक शुभेच्छा.
1 Aug 2018 - 6:05 pm | खिलजि
हि शिल्पकला पांडव कालीन वाटतेय . मी बरोबर आहे कि चूक ? एकंदरीत हा लेख मस्त वाटला नेहेमीप्रमाणे ...
2 Aug 2018 - 5:13 pm | दुर्गविहारी
सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांना धन्यवाद आणि धागा शिफारसमधे ठेवल्याबध्दल संपादक मंडळाचा देखील आभारी आहे.
वल्ली उर्फ प्रचेतस यांनी हि माहिती दिल्याबध्दल धन्यवाद. यापुढेही आपले मार्गदर्शन मिळत रहावे.
माझा लिखाणाचा कोणाला तरी असा फायदा झाला हे वाचुन मजा वाटली. शिवोऽहम् साहेब, शक्य झाल्यास हा परिसर पाहून या अशी विनंती.
चौथा कोनाडा साहेब, काही प्रकाशचित्रे माझी नाहीत, आपल्याला नेमके कोणते प्रकाशचित्र आवडले याची कल्पना नाही, तरी ते माझे नसेल तर त्याचे श्रेय योग्य व्यक्तिला मिळावे असे वाटते.
:-))))))) मनापासून धन्यवाद. जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांना सांगणे हाच या लेखमालेचा हेतु आहे.
आंतरजालावर हि माहिती सर्व मराठी जणांना व्हावी हाच या लेखमालेचा हेतु आहे.
यातील शिल्पे पांडवकालीन नाहीत, त्यांचा सविस्तर ईतिहास धाग्यत लिहीलेलाच अहे.
2 Aug 2018 - 6:21 pm | चौथा कोनाडा
दिलदार प्रतिसाद !
दुर्गविहारीजी आप्ल्याला पुढील लेखनासाठी हा शु !
3 Aug 2018 - 3:10 pm | खिलजि
धन्यवाद दुविसाहेब , मिळाले उत्तर ..
8 Aug 2018 - 9:17 am | विवेकपटाईत
लेख आवडला. मध्य प्रदेशात हि अशोक नगर चंदेरी भागात हि गावोगावी जुने अवशेष विखरलेले आहेत. अनेक ठिकाणी जुन्या मंदिरांचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आढळले.
3 Sep 2018 - 2:37 pm | यशोधरा
तुमच्या सर्व लेखांची एक लेख मालिका बनवा व अनुक्रमणिका येऊ द्यात. मिपावरील एक उत्तम लेखमालिका बनेल. संपादक मंडळी, सां सं कोणीतरी घ्या मनावर.
5 Sep 2018 - 8:05 pm | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद यशोधरा ताई. अनुक्रमणिका बरीच मोठी होईल, पण साहित्य संपादक यांच्याकडे यासाठी काही मार्ग असेल तर कृपया त्यांनी मदत करावी.