अजि म्या वाघ (male tiger) पाहीला!

रुस्तुम's picture
रुस्तुम in भटकंती
25 Jun 2018 - 12:14 am

A tiger is a large-hearted gentleman with boundless courage and that when he is exterminated - as exterminated he will be unless public opinion rallies to his support - India will be the poorer by having lost the finest of her fauna. - Jim Corbett

कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे तर निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती बघण्याचा छंदच लागलाय सध्या. (माझे छंद ही चंचल आहेत, आधी ट्रेकिंगचा छंद होता, मग लॉन्ग ड्राईव्हचा आणि खादाडीचा मग पक्षी निरीक्षणाचा असे बरेच). व्याघ्र दर्शनाला जायचे म्हटलं की आनंद पोटात माझ्या माईना असं होतं. ह्या डोळ्यांची भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांची भटकंती सुरु असते. आतापर्यंत कान्हा, बांधवगड असे महाराष्ट्राच्या बाहेरचे व्याघ्र प्रकल्प फिरून झाले होते अन वाघांचे मनसोक्त असे नाही म्हणता येणार पण समाधानकारक दर्शन झाले होते (मन कधी भरेल व्याघ्र दर्शनाने असे वाटतच नाही. दर वेळी भरून झाले तरी अजून असे वाटत राहते). ह्या सगळ्यात उणीव एका गोष्टीची होती. मेल टायगरची.

एवढ्या सगळ्या सफारी करून अजून नर वाघ (male tiger) काही दिसला नव्हता किंवा कुठे त्याचा मागमूस ही नव्हता. नाही म्हणायला रणथंबोरला सकाळी प्रवेश करता करता एका नराच्या पावलाचे ठसे आढळलेले. ते ताजे असले तरी तो दिसायची शक्यता नव्हती. मेल टायगर न दिसण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची टेरिटरी किंवा हद्द. साधारण ६० तो १०० चौ. किमी. ची हद्द एका मेल टायगरची असते आणि त्या पूर्ण territory चे रक्षण त्याला करावयाचे असते त्या उलट मादी. तिची territory फक्त २० चौ. किमी एवढीच असते आणि त्यात जर ती लेकुरवाळी असेल तर तिच्या परिसरातल्या पाणवठ्यावर जास्ती वावर असतो तिचा. त्यामागचे कारण ही सहजसुलभ म्हणजे पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांपैकी एखाद्याला भक्ष्य करायचे म्हणजे फारसे प्रयास पडत नाहीत आणि दुसरे म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी त्यांना पाण्याची फारच गरज असते. त्यामुळे एखाद्या झोन मध्ये प्रवेश केल्यास आणि त्या परिसरात वाघीण आणि तिचे बछडे असल्यास निवांत पाणवठ्यावर बसून राहायचे. पाणवठ्यावर ते हमखास येणारच. पण नराचे तसे काही सांगता येत नाही एकतर तो एकटाच राहणे पसंत करतो आणि पूर्ण हद्द नियंत्रित करायला फिरत राहतो. फिरता फिरता मधेच कुठेही दाट झुडपे आणि थंडगार जागा आढळली की बसतो फतकल मारून किंवा लोळत पडत राहतो. आणि एकदा पडला की किती काळ पडून राहील, काही सांगता येत नाही. आणि वाघ झोपला असल्यास किंवा नुसता बसून राहिला असल्यास वानरं किंवा चितळं काही अलार्म कॉल्स देत नाहीत. त्यामुळे अगदी दृष्टीपथात असला तरी नजरेस पडत नाही!!!

तर ह्या उन्हाळ्यात our very own अशा महाराष्ट्रातल्या ताडोबात जायचा बेत आखलेला. ताडोबा कधीच निराश नाही करत म्हणतात (पण असे सगळेच व्याघ्र प्रकल्पातले गाईड आणि ड्रायव्हर्स म्हणतात). ह्या वेळी मात्र लेडी लक आमच्यावर अक्षरशः फिदा होते. ३ सफारी आणि तिन्ही वेळा वाघ दिसला होता आणि नुसतेच ओझरते दर्शन नाही तर त्याचे मनसोक्त निरीक्षण करता आले होते. पहिल्या वेळी शर्मिलीचा बच्चा जंगलात शिरत नाही तोच पाणवठ्यावर दिसला. अगदी समोर होता. आधी झुडपात बसून नुसतंच समोर लागलेल्या गाड्यांचं निरीक्षण चालू होतं. मग तहान लागली तसा पाण्यात आला. मग बाहेर गेला, पुन्हा पाण्यात डुंबायला आला आणि तिथून सगळ्या गाड्यांवर कटाक्ष फिरवत होता. एक गवा जरा लांबून दिसला तसा उठून पुन्हा आत झुडपांमध्ये गेला. बाहेर पडत पडत बिबळ्याचेही ओझरते दर्शन झाले (बिबळ्या जंगलात सहसा दृष्टीस पडत नाही. फारच बुजरा प्राणी आहे तो पण त्याचेही ओझरते का होईना दर्शन झाले ते आमच्या ड्रायव्हरच्या कौशल्यामुळे. जंगलात वाघ दिसावयाचा असल्यास तुमच्या नशिबाबरोबरच तुमचा ड्राइवर किंवा गाईड तेवढाच निष्णात आणि अनुभवी असावयास लागतो, त्यावर पुन्हा कधीतरी). दुसऱ्या सफरीत लारा जस्ट मिस झाली पण माधुरीचा बछडा दिसला होता आणि तिसऱ्या सफरीत तर लारा अगदी हेड ऑन दिसली व माझ्या जिप्सीच्या बाजूने गेली. अगदी म्हणतात तसे टचिंग डिस्टन्स वर होती. मनात आणले असते तर ती माझी तिच्या रात्रीच्या जेवणासाठी सहज निवड करू शकली असती पण पोट भरलेले असावे बहुदा :). (पुन्हा इथे ही वाघीण आणि बच्चेच, मेल टायगर नाहीच. माणसाने असमाधानी म्हणजे किती असावे ?? )

चौथी सफारी आमची कोअर झोन मध्ये होती. कोअर झोन शुष्क पानझडी वनाचा आहे आणि आम्ही कडक उन्हाळ्यात गेलेलो असल्याने सकाळी ७-७.१५ लाच उन्हाची तीव्रता जाणवू लागलेली आणि बफर प्रमाणे दाट वृक्षराजी नसल्याने रखरखाट जाणवू लागलेला. शिरस्त्याप्रमाणे जामनी, पंढरपौनी, एनबॉडी, ताडोबा लेक असे पाणवठे घेत चाललेलो. पण पंढरपौनी लेक १ आणि लेक २ इथे मायाच्या पावलांचे ठसे वगळता फार कुठे खाणाखुणा दिसल्या नाहीत. पुढे पंचधारा म्हणून जागा आहे, रखरखीत प्रदेशात घनदाट वृक्षराजी आणि एक ओहोळ वाहत असलेली शांत आणि थंड जागा. भर दुपारी ही तिथे थंड आणि खूप शांत वाटतं.
त्या जागी चक्कर मारून येत असताना एकाला काही हालचाल जाणवली. आम्हाला वाटलं बिबट्या असावा कारण बिबट्यासाठी आदर्श अशी जागा होती असा अंदाज. ड्रायव्हरला गाडी थोडी पाठी घ्यायला सांगितली आणि गाईडने मित्राने दिशेला न्याहाळत 'मटकासूर' एवढेच म्हणाला मात्र आणि गाडीतले सगळे 'attention' पोझिशन मध्ये पंचधारा डोळ्यात प्राण आणून स्कॅन करायला लागले. आणि एकदाचा तो दिसला आणि ते राजबिंडे रूप आणि ती ऐटदार चाल बघत असताना 'अजि म्या ब्रह्म पाहिले' अशी अवस्था झाली. आजूबाजूच्या सगळ्या जगाचा विसर पडला. फक्त एकच गोष्ट डोक्यात होती, ती म्हणजे मटकासूर डोळ्यात आणि जमेल तितका कॅमेऱ्यामध्ये साठवून घ्यावा. अगदी धम्मक अशी नसली तरी पिवळी कांती, काळे पट्टे आणि रुबाबदार चाल असे हे सुंदर रूप पाहत असता नजरेस आणिक काही येत नव्हतं. फार धष्ट पुष्ट नसावा, साधारण मध्यम साईझ म्हणता येईल असा. पण त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राट असल्याच्या खाणाखुणा त्याच्या एकंदर हालचालीत जाणवत होत्या. अचानक शांत असलेल्या पंचधारा परिसराला जाग आली आणि घिसाडघाई जाणवायला लागली. आजूबाजूला एवढे सगळे होत असताना मटकासुर मात्र स्वतःच्या तंद्रीत आजूबाजूच्या जगाची तमा न बाळगता काहीतरी मिशनवर असल्यासारखा पुढे पुढे येत होता. एवढ्या वेळ पंचधारेत वावरत असलेल्या चितळांना ही मटकासूरची जाणीव झाली आणि शेपूट घालून पळून सुरक्षित अंतरावर जाऊन बघत बसले. एका पाण्याच्या ओहोळावर मटकाने थोडे पाणी प्यायले आणि तो तिथेच रेंगाळत बसेल असे वाटत असताना त्याला त्याच्या मिशनची आठवण झाले असावी आणि तो परत आजूबाजूच्या मर्त्य प्राण्यांकडे न पाहता पुढे निघाला. पंचधारेच्या पलीकडचा रस्ता पार करून तो आत झाडीत जाईल अशी जाणीव ड्राइवरला जाळी आणि त्याने गाडी पटकन पंचधारेच्या पलीकडे नेली. त्याचा अंदाज बरोबर निघाला. मटका रस्त्यावर आला. बाजूच्या २-३ गाड्यांकडे थोडे कुतूहलपूर्वक पाहिले आणि परत मिशनवर निघाला आणि काही क्षणातच जसा आला तास अंतर्धान पावला. एवढे सगळे फार तर ५-७ मिनिटात घडले असेल, पण हा प्रसंग मात्र आयुष्यभर लक्षात राहील असा. आमचा ड्राइवर आणि गाईडही म्हणाले ४-५ दिवस झाले मटकासूर दिसला नव्हता आणि आज दिसेल अशी अपेक्षा ही नव्हती हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलंच आणि एवढे रोज वाघांना बघणारे ते ही मटकासूर पाहून हरखून गेले. (मेलचा aura काही औरच असतो). आपण तर कधीतरी जाणारे, आपला आनंद काय वर्णावा? तो तर पोटात मावणारच नाही.


पंचधारेत प्रकट झालेला मटकासुर


हे कोण आगंतुक?

आजही इतक्या दिवसानंतर ताडोबातील हायलाईट म्हणून मटकासुराचे धावते दर्शनच आठवते. रणथंबोरची मछली किंवा ताडोबाची माधुरी ह्या सुपर मॉम म्हणून प्रसिद्ध आहेत. गूगलरावांना त्यांच्या विषयी विचारल्यास मोस्ट फोटोग्राफ्ड टायग्रेस म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत असे जाणवते. सहज एक विचार आला, तसे ही स्त्री वर्गालाच फोटो काढून घ्याची हौस जास्ती असते आणि त्यातून मेल टायगर दिसायचेच नाव घेत नाहीत तर फोटो काढणे लांबच राहिले आणि मोस्ट फोटोग्राफ्ड असे बिरुद मिरवणे म्हणजे तर अशक्यप्रायच!!

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

25 Jun 2018 - 4:42 am | चामुंडराय

छान, परंतु फोटो दिसत नाही.

दुर्गविहारी's picture

25 Jun 2018 - 7:30 am | दुर्गविहारी

वा ! अगदी चित्रदर्शी लिहीलंय. फोटो दिसत नाहीत. पु.ले. शु.

रुस्तुम's picture

25 Jun 2018 - 9:59 am | रुस्तुम

धन्यवाद चामुंडराय आणि दुर्गविहारी. लेख update केलाय मदत धाग्यावरील सुंचनप्रमाणे. अजूनही दिसत नसल्यास खालील लिंक पहा.

https://photos.google.com/share/AF1QipNkruEhUg36T431G248ORIckRNrNuQkdGW_...

लोनली प्लॅनेट's picture

25 Jun 2018 - 11:23 am | लोनली प्लॅनेट

मस्त वर्णन
Tiger sisters of Telia पहिल्या म्हणा कि तुम्ही..
रणथंभोर ला कधी गेला होतात.. तेंव्हा मछली जिवंत होती का

रुस्तुम's picture

25 Jun 2018 - 11:20 pm | रुस्तुम

हो हो अल्मोस्ट. गीता आणि सोनम नाही दिसल्या :( . रणथंबोरला मछली गेल्यावरच आला,... तिला बरंच follow करत होतो पण फोटो आणि social sites वर फक्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2018 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

वाघोबाचे फोटो अप्रतिम आहेत !

तुम्ही "थंबनेल्सचे" दुवे टाकल्यामुळे फोटो दिसत नव्हते. मिपामध्ये फोटो टाकताना, "मूळ साठवणीच्या ठिकाणी फोटो पूर्ण आकारात उघडून" घेतलेल्या दुव्यांचा उपयोग केल्यास समस्या येणार नाही.

रुस्तुम's picture

25 Jun 2018 - 11:22 pm | रुस्तुम

धन्यवाद.

पैलवानजींनी तुमचा धागा पाठवला फोटो अपलोड करण्याविषयी आणि मग झाले. तुमच्या सूचनेबर केलं आणि झाले अपलोड.

प्रमोद देर्देकर's picture

25 Jun 2018 - 6:46 pm | प्रमोद देर्देकर

या मे महिन्यात आमची जीम कॉर्बेटची सफर झाली पण मोर, माकडे या शिवाय काहीच दिसलं नाही.
तुम्ही खूप नशीबवान आहात .
ताडोबाला कधी भेट द्यायची तिकिटे कधी , कुठे कशी (Online) मिळतात तेव्हढं व्यनि कराल काय ?

वाघ दिसायला नशीब लागतं हे मात्र खरं. व्यनि दिला आहे.

अनिंद्य's picture

26 Jun 2018 - 12:51 pm | अनिंद्य

रुस्तुम, तुमचा हेवा वाटला, नेहेमी वाघ दिसतोच म्हणजे काय !

'मटकासुर' नाव जबरदस्त :-) वाघांचा सुपरमॉडेल शोभतोय.

रुस्तुम's picture

27 Jun 2018 - 12:01 am | रुस्तुम

नाही हो .... पहिले ७-८ प्रयास वायाच गेलेत.आत्ताच्या ताडोबाला मात्र ५/५ यशस्वी होत्या मात्र. लेखात म्हटल्याप्रमाणे लेडी लक शब्दशः फिदा होते.

चौकटराजा's picture

26 Jun 2018 - 6:47 pm | चौकटराजा

नन्दनकानन इथे आमच्या मोटरबाहेर रस्त्याने चाललेले पन्चवीसेक सिंह पाहिले आहेत पण तिथेही मुक्त्त पणे फिरणारा वाघ दिसला नाही. अर्थात पिन्जर्‍याच्या बाहेर॑ चा पण मुक्त नसलेला वाघ हैदराबादच्या झू मध्ये पाहायला मिळतो . मी एका झू मध्ये पांढरा वाघ ही पाहिला आहे .

रुस्तुम's picture

27 Jun 2018 - 12:06 am | रुस्तुम

पांढरे वाघ साधारण सुंदरबनला आहेत. पूर्णतः सहमत की मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांचा ऑरा काही वेगळाच असतो.

टर्मीनेटर's picture

26 Jun 2018 - 7:36 pm | टर्मीनेटर

खरंच नशीबवान आहात रुस्तुमजी. २०१७ च्या डिसेंबर मध्ये ताडोबाला गेलो होतो, एकही वाघ नाही दिसला आम्हाला.

सुबोध खरे's picture

26 Jun 2018 - 7:54 pm | सुबोध खरे

नर वाघ आणि सिंह हे प्राणी खरंच राजेशाही असतात. जंगलात फिरतात तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक शक्तीचा आणि बेफिकीरीचा रुबाब दिसून येतो. ते जेंव्हा फिरतात तेंव्हा त्यांच्या आजूबाजूला एक भीतीचे वलय त्यांच्या बरोबर फिरत असते आणि जंगलातील प्रत्येक प्राणी त्याबद्दल अतिशय सावध असतो. त्याबद्दल सर्व प्राण्यांना भीतीयुक्त आदर असतो. ही गोष्ट प्रत्यक्ष पाहण्यात जी मजा आहे ती फिल्म मध्ये किंवा फोटोत येणार नाही. अर्थात झलक दिसू शकतेच.
मी बांदीपूर येथे वाघ (१९९०) आणि गीर येथे सिंह (१९८९) पाहिला तेंव्हा या गोष्टींची जाणीव झाली. गीर मध्ये सिंहाचे दर्शन होण्यासाठी ४ दिवस सकाळ संध्यकाळ फेऱ्या मारल्यावर चौथ्या दिवशी सिंहाने दर्शन दिले. त्या अगोदरच्या सात फेऱ्यात सिंहाचे पायाचे ठसे, विष्ठा, खाऊन टाकलेले कलेवर, प्राणायनी केलेला कलकलाट इ पाहून फार त्रास झाला. पण शेवटी सिंहाचे राजन्य दर्शन पाहून डोळ्याचे पारणे फिटले.
आपले फोटो फारच सुंदर आहेत.

रुस्तुम's picture

27 Jun 2018 - 12:16 am | रुस्तुम

गीर मध्ये जाणे अजून झाले नाही, जावे लागेल एकदा. वाघ किंवा सिंहांचे दर्शन होण्यासाठी नशीब बलवत्तर असावे लागते आणि खूप संयम बाळगावा लागतो हे मात्र नक्की. माझ्या १५-१६ प्रयासानंतर मला ह्या वेळी खूप समाधानकारक म्हणता येईल असे दर्शन झाले.आणि एवढ्या प्रयासानंतर मनाजोगते दर्शन मिळाले की होणारा आनंद अवर्णनीयच. अजून किल पाहायला मिळाले नाही. पुढच्या वेळी मिळेल ही आशा.

बांदीपूरचे मोड्युल फार पर्यटक फ्रेंडली नाही म्हणतात सफारीचे. आपला अनुभव कसा आहे?