अनवट किल्ले ३३ : मालेगावचा भुईकोट ( Malegaon Fort )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
25 May 2018 - 5:24 pm

मालेगाव हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध तालुक्याचे गाव असून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकच्या ईशान्य दिशेला नाशिक शहरापासुन १०८ कि.मी. अंतरावर ,मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते.धार्मिक दंगलीमुळे काहीसे बदनाम झालेल्या या गावच्या कोरड्या हवामानामुळे ईथे मोठ्या प्रमाणात यंत्रमागाचा व्यवसाय चालतो. दाट लोकवस्तीच्या खानदेशातील या महत्वाच्या प्राचीन शहरात गिरणा (गिरीपर्णा) आणि मोसम (मोक्षिणी) नद्यांच्या संगमावर मालेगावचा (माहुलीग्राम) देखणा भुईकोट किल्ला आहे. १८ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यात आता शाळा भरते त्यामुळे हा किल्ला आजही बर्‍यापैकी तग धरुन आहे. मालेगाव परिसरात गेल्यास खास वाट वाकडी करुन बघावा असा हा किल्ला आहे.
मालेगाव शहर ज्या ठिकाणी वसलेले आहे त्याचे भौगोलिक स्थान खुप महत्वाचे आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रात या शहराला "खानदेशाचे नाक" म्हणत. पेशव्यांची राजधानी पुणे, ईंग्रजांचे मुख्य व्यापारी केंद्र मुंबई यांना खानदेशमार्गे जोडणारा मार्ग मालेगावातून होता. याशिवाय मोगलांचे शहर सुरत येथे जाणारा रस्ताही मालेगावातून जात असे. म्हणून सोळाव्या शतकात मालेगाव शहराला अन्यन्य साधारण महत्व आलेले होते. मालेगावातून जाणार्‍या या वाटांवर नजर ठेवण्यासाठी कंक्राळा, राजदेहेर, गाळणा, चांदवड या किल्ल्यांचा उपयोग होत असे. मात्र खुद्द मालेगावात किल्ला नव्हता. त्यामुळे मालेगाव भुईकोटाची निर्मीती केली गेली. सुमारे १००० वर्षापुर्वी इथे राष्ट्रकुट घराण्याची सत्ता होती. अकराव्या शतकापर्यंत शांत असलेला हा परिसर नंतर मात्र मुस्लिम राजवटीच्या अधिपत्याखाली गेला आणि हा परिसर अशांत बनला.
नाशिक, धुळे, जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद येथून गाडीमार्गाने मालेगावला पोहोचता येते. या सर्व मार्गांवर एस.टी. बसेसची सोय आहे. मालेगावला मुक्काम करुन या परिसरातील कंक्राळा, गाळणा, डेरमाळ, पिसोळ, रतनगड हे किल्ले, तसेच मांगी-तुंगी हे जैन स्थान बघता येते. या ठिकाणी मुक्काम करायचा झाल्यास मालेगाव एस.टी. स्टँडपर्यंत न जाता अलिकडे कँपभागात उतरावे. इथे उत्तम लॉज आणि चांगले जेवण मिळणारी हॉटेल आहेत.
गडकिल्ल्यांचे प्रामुख्याने गिरीदुर्ग, भुईकोट, जलदुर्ग असे तीन प्रकार पडतात. यातले गिरीदुर्ग हे सह्याद्रीच्या कड्याकपारीवर उभारले गेले तर जलदुर्ग भर समुद्रात असल्याने तेथे सहजपणे जाणे अवघड पण यामुळे त्यांचे निदान काही अवशेष तरी पाहायला मिळतात. परंतु भुईकोट मात्र याबाबत तसे दुर्दैवी आहेत. सहजपणे पोहचता येत असल्याने सर्व भुईकोटावर मोठया प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यापैकी एक भुईकोट म्हणजे नाशिकचा मालेगाव भुईकोट.
Malegaon 1
( मालेगाव भुईकोटाचा एरियल व्ह्यु )
ऐतिहासीक व धार्मिक पार्श्वभूमी असलेले माहुलीग्राम म्हणजेच मालेगांव शहर आणि परिसरात इ.स. १००० मध्ये राष्ट्रकुट घराण्याची सत्ता होती. मध्ययुगीन इतिहासाशी नाते सांगणाऱ्या मालेगावात मोसम नदीच्या काठावर मालेगावचा बलदंड भुईकोट वसला आहे. खुद्द मालेगावातच हा किल्ला असल्याने तेथे जाण्यास काहीच अडचण येत नाही. मराठ्यांचा इतिहास लिहणारे ग्रांट डफ यांच्या नोंदीनुसार इ.स.१७४० मध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला तर दुसऱ्या एका १८२० मधील उल्लेखानुसार हा किल्ला साठ वर्षापूर्वी म्हणजेच १७६० मध्ये बांधला असा संदर्भ सापडतो.
एका उल्लेखानुसार १८२० मध्ये मालेगावाचा किल्ला साठ वर्षापूर्वी बांधला असा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार हा किल्ला १७६० मध्ये बांधला असावा, असे दिसते.
इ.स. १७३० मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवडच्या दाणी घराण्यातील नारोशंकर हे सरदार म्हणुन बराच काळ उत्तर भारतात मल्हारराव होळकर यांच्या फौजेत होते. उदोजी पवार यांच्याकडे शिलेदार असणारे नारोशंकर पुढे इंदोरचे सुभेदार झाले. त्यांनी ओरछा जिंकून घेतले. झाशीमध्ये १४ वर्षे त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी मोगल बादशहा आलमगीर गाझी होता. आलमगीर गाझी शिकारीच्या मोहिमेवर असताना नारोशंकर सोबत होते. बादशहाने शिकारीच्या दरम्यान सिंहावर बंदुकीतून गोळी झाडली. ती गोळी हुकली. चवताळलेल्या सिंहाने बादशहावर झेप घेतली. नारोशंकर यांनी झेप घेणाऱ्या सिंहाला तलवारीने मारले, त्यामुळे बादशहा बचावला. बादशहाने नारोशंकर यांची प्रशंसा करून त्यांना ‘राव बहादूर’ हा किताब देऊन मालेगाव परिसरातील निंबायती आणि सात-आठ खेड्यांचा परिसर जहागीर म्हणून दिला.
ब्रिटीशांनी ई.स. १८५१ मध्ये महाराष्ट्रातील अनेक सरदारांना पत्रे पाठवून त्यांना दिलेल्या पदव्यांची माहिती विचारली व पुरावे पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे ३० जुलै १८५१ रोजी मालेगावच्या माधवराव त्रंबक राजे यांना पत्र आले. ते लहान असल्याने , त्यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री अन्नपुर्णाबाई कारभार पहात होत्या. त्यांनी या पत्राचे उत्तर पुढील प्रमाणे पाठविले, " आमचे वडील नारो शंकर नानासाहेब यांना पेशवे सरकारची पत्रे नामजद अशी आहेत. त्यानंतर दिल्लीचा बादशहा आलम गाझी याजवर दुसमनाचा प्रसंग पडल्यामुळे नारो शंकर यांचे कडून दुसमनाचे पारिपत्य जाहल्यामुळे बादशहा संतोष होउन त्यांनी तलवार व जवाहिर व गाव इनामी व राजे बहादर हा किताब दिला".
जसे नारो शंकर राव बहादुर म्हणून ओळखले जातात तसेच ते "मोतीवाला" म्हणून सुध्दा ओळखले जातात. याची दोन कारणे आहेत. एक असे कि त्यांचे जवळ मोत्यांचा मोठा खजिना होता आणि दुसरे असे कि पुण्यात बाजीराव पेशव्यांनी त्याच्या देहावर मोत्यांचा चौकडा बांधला.
पुढे पेशव्यांनी इ.स. १७५७ मधे नारोशंकर यांना महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतले. सुरवातीला नारो शंकर निंबायत येथे रहायचे, तेथे त्यांनी वास्तव्यासाठी मोठा वाडा बांधला आणि संरक्षणासाठी किल्ला बांधावा असे त्यांच्या मनी आले व निंबायत येथे कोट बांधण्याची परवानगी पेशव्यांकडून मिळवली. पण मोसम नदीच्या काठावरची जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी नारोशंकर यांना दिली . मात्र नारोशंकर यांनी वाडा न बांधता किल्लाच बांधून काढला. हे पेशव्यांना आवडले नाही. पेशव्यांना शंका आली कि मोगल बादशाह नारो शंकरांना हाताशी धरुन आपल्या विरुध्द कट करत नाही ना? म्हणून पेशव्यांनी प्रतिनिधी मालेगावी पाठवून नारो शंकरांना किल्ला हवाली करण्याची आज्ञा दिली. पेशव्यांचा प्रतिनिधी ज्या दिवशी मालेगावला पोहचला त्या दिवशी किल्ल्याची वास्तुशांती होती. दुसर्‍या दिवशी नारो शंकर किल्ल्यात रहायला जाणार होते. मात्र पेशव्यांचे पत्र हातात पडताच किल्ला नारो शंकरांनी दुताच्या हवाली केला. त्याच बरोबर दुताकडे एक पत्र पाठवून किल्ल्यात धार्मिक विधी करण्याची परवानगी पेशव्यांकडे मागितली. त्यामुळे पेशव्यांचा राग शांत झाला आणि त्यांनी नारो शंकरांना किल्ल्यात वास्तुशांती करण्याची आणि वास्तव्य करण्याची परवानगी दिली. नारोशंकर यांचे वास्तव्य त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इ.स. १७७५ पर्यंत या किल्ल्यातच होते.
सातार छत्रपंती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे याने त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता होती.
या किल्ल्याची बांधणी इतकी मजबूत आहे की १८१८ मध्ये इंग्रजांना देखील हा किल्ला जिंकण्यासाठी झुंज द्यावी लागली. १६ मे १८१८ मध्ये इंग्रजांच्या वतीने किल्ला घेण्यासाठी १३०० सैनिक व २५० बंदुकधारी घेऊन लेफ्टनंट मॅकडोवेल किल्ल्यावर चालून आला. तेव्हा किल्ल्यात मोजकीच अरब शिबंदी होती. अरब सैनिक लढण्यात मोठे चिवट आणि स्वामिनिष्ठ म्हणून प्रसिध्द होते. तेव्हा त्यांच्याशी संघर्ष कठिण आहे याची जाणिव ब्रिटीशांना होती. सुरवातीला इंग्रजांचा तळ किल्ल्याच्या दक्षीणेला होता. पण १७ तारखेला त्याने तळ उठवून मोसम नदीच्या उजव्या बाजुच्या किनार्‍यावर नेला. उन्हाळा असल्याने मोसम नदीला पाणी नव्हते. लेफ्टनंट मॅकडोव्हेलने ठिकठिकाणी मोर्चे बांधले. किल्ल्याच्या पश्चिम अंगाला नदीच्या पलीकडे झाडी होती. या झाडीच्या आणि तोफेच्या आधाराने ईंग्रजांनी नदीपात्राला संमातर खंदक खोदला. १६ मे रोजी किल्ल्याच्या भिंतीवर तोफेचा मारा सुरु झाला. हे सर्व होत असतना ब्रिटीशांना दिड हजार सैन्याची नवीन कुमक येउन मिळाली. इंग्रजांनी बरेच प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही. २९ मे रोजी केलेल्या हल्ल्यात किल्ल्याची भिंत एके ठिकाणी पडलेली पाहून लेफ्टनंट नॉटिस काही माणसांना बरोबर घेउन चढून गेला . पण त्याच्या लक्षात आले कि आत आणखी एक प्रचंड भिंत आहे. त्याच वेळी अरबी सैनिकांनी वरुन केलेल्या गोळीबारात नॉटीस व त्याचे सहकारी ठार झाले. किल्ल्याची ती आतली भिंत साठ फुट उंच होती व ती ओलांडणे ईंग्रजांना शक्यच नव्हते. या युद्धात इंग्रजांचे ३५ लोक ठार तर १७५ जण जखमी झाले.
पुढे गवताचे भारे टाकून खंदक ओलांडण्याचा ईंग्रजांचा प्रयत्न फसला. पुन्हा १ जुन रोजी ईंग्रजांनी छावणी गावाकडे हलवली. ५ जुनला दोन हॅवित्झर तोफांचा मारा सुरु केला. मात्र किल्ल्याच्या भिंती या तोफांना दाद देत नव्हत्या. म्हणून अहमदनगरवरुन येथे पत्र पाठवून नवीन तोफा मागवण्यात आल्या. १० जुनला अहमदनगरवरुन नवीन तोफा येउन पोहचल्या. त्याचा मात्र परिणाम होउन किल्ल्याची भिंत काही बाजुला पडली. ब्रिटिशांनी किल्ला फंदफितुरीने कसा जिंकला याची एक हकिगत सांगितली जाते. ब्रिटिशांना दारु कोठारे नेमकी कोठे आहेत याची माहिती पाहिजे होती, म्हणून त्यांनी किल्ल्यात जाणार्‍या नाव्ह्याला वश करुन घेतले आणि ज्या ठिकाणी दारु कोठारे आहेत तेथे कापडाचे निशान फडकवण्यास सांगितले. नाव्ह्याने जिथे खुण केली तिथे तोफा डागताच दारुची कोठारे पेटली. दारूगोळ्याच्या कोठाराला आग लागल्यामुळे नाइलाजाने आतील शिबंदीने १३ जून १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिला.
यावेळी किल्ल्यात ३१० अरब लोक होते. ब्रिटीशांनी किल्ल्याला वेढा दिलेला असताना आणि बाहेरुन कोणतीही मदत मिळत नसताना त्यांनी जो लढा दिला तो खरोखरच प्रंशसनीय होता. अरबांनी शरण येण्यापुर्वी अट घातली कि त्यांना सहकुटुंब मायदेशी परत जाण्याची परवानगी मिळावी. हा तह मराठी भाषेत होता व तो द्विअर्थी होता. एका अर्थाप्रमाणे अरब कोठेही जाउ शकतात आणि एका अर्थाप्रमाणे अरब मायदेशी जाउ शकतात. ब्रिटीशांनी त्यांना सुरत येथे नेउन मुकत केले. बरेच अरब मायदेशात तर काही अरब येथेच स्थायिक झाले.मालेगावचा किल्ला घेताना ब्रिटीशांचे ३३ लोक कामी आले, हा दैदिप्यमान ईतिहास आपण ध्यानात ठेवला पाहिजे.
Malegaon 2
मालेगाव शहरातील या किल्ल्याला भेट देण्यासाठी मालेगाव महापालिका हा पत्ता विचारायचा. जाताना किल्ल्याच्या बाह्य्कोटाची तटबंदी दिसते. महापालिकेची जुनी ईमारत आणि रस्त्याच्या पलीकडे मालेगावचा भुईकोट आहे.
नारोशंकर यांच्यावर उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असल्याने हा किल्ला बांधण्यासाठी त्यांनी उत्तर भारतामधून काही कारागीर आणले. चौरस आकाराचा भक्कम दुहेरी तटबंदी ( खरं तर तिहेरी ) असलेला हा किल्ला पाच एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत ९ बुरुज आणि नदीकिनारी सुटावलेला एक बुरुज अशी याची रचना आहे. किल्ल्याच्या बाहेरील तटाची उंची वीस फुट असुन आतील तटबंदी ३५ फुट उंच आहे. किल्ल्याच्या आतील तटापासून साधारण ५० फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे. किल्ल्याच्या रक्षणासाठी तटबंदीच्या बाहेर रुंद आणि खोल असा खंदक असुन मोसम नदीवर भिंत बांधुन ते पाणी अडवून किल्ल्याच्या खंदकात येईल अशी व्यवस्था केली गेली होती.
Malegaon 3
सध्या हा खंदक फक्त दरवाजाच्या बाजुने शिल्लक असुन माती आणि कचऱ्याने भरत आला आहे
Malegaon 4
तर इतर बाजुने खंदक बुजवुन त्यावर झोपड्या बांधल्या आहेत.
Malegaon 5
बाहेरील तटबंदीतील किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा मोडकळीस आला असुन तो खंदकावरील पुलाने किल्ल्याला जोडला आहे.
Malegaon 6
या बाजुचे भिंत पडली असून मध्ये मोठी पोकळी बघायला मिळते. शत्रुने हल्ला करुन किल्ल्याचा तट पाडला तरी केवळ बाहेरची बाजु पडेल व आतली तशीच राहिल अशी व्यवस्था केली आहे.
Malegaon 7
दरवाजातून आत शिरल्यावर समोरच मुख्य किल्ल्याची ढासळलेली तटबंदी असुन तेथे लोखंडी फाटक लावले आहे.
Malegaon 8
येथुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याच्या आतील भिंतीची उंची साठ फुट असून रुंदी ६ फुट आहे.
Malegaon 9
तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. बाहेरील म्हणजे दुसर्‍या तटबंदीत बुरुज नाहीत. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. तटबंदीला फ़ांजी मात्र नाही आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर वायुविजनासाठी अनेक झरोके ठेवले आहेत.
Malegaon 10
मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी प्रथम उजवीकडून अथवा डावीकडुन आतील आणि बाहेरील तटबंदीमधुन फेरी मारून किल्ल्याची भव्यता पहावी.
Malegaon 11
यात घोडयाच्या पागा असल्याचे सांगितले जाते.
Malegaon 12
किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर चढण्यासाठी कोपऱ्यात व दरवाजावर पायऱ्याची वाट आहे.
Malegaon 13
तटबंदीच्या खालच्या भागात ३ फ़ूट उंच, २ फ़ुट रुंद आणि २ फ़ूट खोल अशा छोट्या चौकोनी खोल्या आहेत. त्यांचा उद्देश कळत नाही.
Malegaon 14
बाहेरील तटबंदीत ३ ठिकाणी खंदकात उतरण्यासाठी दरवाजे दिसुन येतात पण ते आता बंद करण्यात आले आहेत.
Malegaon 15
लोखंडी फाटकातून आत आल्यावर समोरच्या भागात काकाणी विद्यालय शाळा भरते त्यामुळे परवानगी घेऊनच किल्ल्यात प्रवेश मिळतो.
Malegaon 16
विद्यालय परिसराची साफसफाई नियमितपणे होत असल्याने या भुईकोटाची देखील साफसफाई होते.
Malegaon 17
त्यामुळे भुईकोटाच्या वास्तू ब-यापैकी आढळतात. शाळेच्या कार्यालयाबाहेरील भिंतीवर नारोशंकरांचे तैलचित्र लावलेले आहे. दोन तटबंदींच्या मधून किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
Malegaon 18

Malegaon 19

Malegaon 20
तोफा ईंग्रजांनी ओतवल्या असून त्यावर त्यांचे चिन्ह दिसून येते.
Malegaon 21
शाळेच्या आवारात १ लहान, २ मध्यम व २ मोठया अशा एकूण पाच तोफा ठेवलेल्या आहेत. सुरुवातीला शाळेबाहेरून किल्ल्याचा तट व इमारत यामधील प्रशस्त वाटेने फेरी मारून घ्यावी. शाळेच्या मागील बाजुस एक खोल विहीर आहे.
Malegaon 22
विहिरीच्या बाजुस असणाऱ्या पायऱ्याने तटावर जाऊन तटबंदी, बुरुज, चर्या, भिंतीतील कोठारे, भिंतीच्या आत बांधलेले दगडी जिने हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारात यावे.
Malegaon 23
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुने पुढे जाताना तटबंदीत एक मोठे कोठार आहे व त्यापुढे डाव्या हातास एक मोठी कमान दिसते.
Malegaon 24
२० फ़ुटी उंच प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. प्रवेशव्दारच्या कमानीच्या बाजूला दगडात कोरलेली कमळे आहेत. प्रवेशव्दारावर आणि बुरुजांच्यावर वीटांनी केलेले १० फ़ुटी बांधकाम आहे. यात प्रवेशव्दारावर तीन आणि बाजूच्या बुरुजांवर प्रत्येकी ३ कमादार खिडक्या कोरलेल्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला दोन मजली दालन होते. त्यातील वरच्या मजल्यावर रंगमहाल होता. आता तळ मजल्यावर शाळेचा वर्ग भरतो आणि दोन मजल्यांनधील स्लॅब नष्ट झाल्याने रंगमहालात जाता येत नाही. पण रंगमहालाच्या भिंतीत कोरलेले कमानदार कोनाडे पाहायला मिळतात.
Malegaon 25
या कमानीतून आत आल्यावर समोरच रंगमहालाचा दिंडी दरवाजा असणारा पहिला लाकडी दरवाजा दिसतो.
Malegaon 26
या रंगमहालात मोठया प्रमाणात नक्षीकाम केलेले पहाता येते.
Malegaon 27

Malegaon 28
येथे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पण हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
Malegaon 29
रंगमहालाच्या दुसऱ्या दरवाजाची केवळ नक्षीदार लाकडी चौकट शिल्लक असुन या दरवाजावर मोठया प्रमाणात कोरीवकाम पहायला मिळते. दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी समोर भिंत बांधलेली आहे. या दरवाजाच्या काटकोनात एक छोटा दरवाजा होता, पण आता तो बुजवून त्याठिकाणी शाळेची मुतारी बांधलेली आहे. दरवाजाच्या वर जाण्यासाठी तटबंदीत जीना आहे. जीन्याने तटबंदीवर जाऊन फ़ांजीवरुन किल्ल्याच्या आतल्या तटबंदीवरुन फ़िरता येते. दरवाजाच्या वरच्या बाजूस किल्ल्याच्या आत आणि बाहेर लक्ष ठेवण्यासाठी खोल्या आणि झरोके बनवलेले आहेत.
Malegaon 30
या दरवाजाच्या दोन्ही बाजुला वरील भागात नक्षीदार सज्जा असुन सर्वात वरच्या बाजुला सुबक बांधणीचे दोन मनोरे आहेत. दरवाजाच्या बाजूच्या बुरुजांवर असलेले मनोरे सुंदर आहेत. ८ दगडी खांबांवर या मनोर्‍यांचे छत तोललेले आहे. घुमटाकार छत वीटांनी बनवलेले असून त्याच्या छतावर आतल्या बाजूने चुन्यात फ़ुल कोरलेले आहे. दोन खांबांच्या मध्ये दगडी कमानी असून कमानीवर दोन बाजूला कमळ कोरलेले आहेत. मनोर्‍याला वाळ्याचे पडदे लावण्यासाठी बसवलेल्या कड्या आजही तेथे आहेत. मनोरे पाहून पुढे गेल्यावर ध्वजस्तंभ असलेला भव्य बुरुज आहे. फ़ांजी वरुन फ़िरतांना एके ठिकाणी तटबंदीत उतरण्यासाठी जीना आहे. तो तटबंदीतच दुसर्‍या बाजूने बाहेर पडतो
Malegaon 31
किल्ल्यावर उत्तर भारतीय बांधकामाची छाप दर्शिवणाऱ्या उत्तम नक्षीकामाच्या या मनोऱ्याचा दगड झिजत चालला आहे. किल्ल्यात प्रवेश करणारा हा मुख्य दरवाजा असुन याच्या समोर दगडाची भिंत घालुन हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
Malegaon 32
या किल्ल्याची उभारणी करताना मोसम नदीच्या किनारी महादेवाचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिरात महादेवाची पिंड, गणपती आणि हनुमान यांच्या मुर्ती आहेत. नारो शंकर आणि त्यांचे वंशज हे शंकराचे भक्त होते. त्यांच्या प्रत्येक तलवारीच्या मुठीवर शिवप्रतिमा किंवा शिवपिंड कोरलेली दिसते. आजही त्या घराण्याकडे पुर्वापार देवाच्या मुर्ती आहेत त्यात शिवप्रतिमा प्रामुख्याने आहेत. मंदिराच्या चारही बाजुला फरसबंदी दिसते.
Malegaon 33
किल्ल्याच्या एका बुरुजावर पीराचे स्थान दिसते. ते अर्थातच नंतरचे असणार.
Malegaon 34
किल्ल्याला तिहेरी तटबंदी होती त्यातील बाहेरची तटबंदी वस्तीत लुप्त झाली आहे. त्यातील नदीच्या बाजूचा एकच बुरुज शाबूत आहे तो किल्ल्यावरुन दिसतो.
इथूनच आपल्याला गिरणा आणि मोसम नद्यांचा संगम दिसतो. यातील गिरणा हि बारमाही तर मोसम हि पावसाळी नदी आहे. पावसाच्या मोसमापुरती वहाते म्हणून मोसम अशी कथाही सांगितली जाते. नद्यांच्या या भौगोलिक गुणधर्माचा किल्ला बांधताना पुरेपुर उपयोग केला आहे. त्यासाठी किल्ल्याच्या बाहेर खंदक खणला आहे. नद्यांच्या संगमाजवळ भिंत बांधून तिथे पाणी अडवले आहे आणि ते खंदकामधे साठून राहिल अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे खंदक बारमाही भरलेला राहिल आणि किल्ल्याचे संरक्षण होईल अशी व्यवसथा आहे.
आता गिरणा नदीवर ज्या ठिकाणी पुल आहे त्या ठिकाणी एक टेकडी वजा डोंगर होता. तो फोडून त्याचा दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला आहे.
Malegaon 35

Malegaon 36

Malegaon 37
आज मात्र या किल्ल्याच्या आवाराचा उपयोग मुलांना खेळण्यासाठी मैदान, गोदामे, टेनीस कोर्ट असा होताना दिसतो.असो. कालाय तस्मै नमः
संपुर्ण किल्ला पहायला दोन तास लागतात पण एक परिपूर्ण किल्ला पाहिल्याचे समाधान मनाला मिळते.
मालेगावची एकेकाळची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख जपणारा हा भुईकोट आज मात्र अज्ञातवासात गेला आहे. किल्ल्याच्या खंदकावर असलेल्या दोन्ही भिंतींना पूर्णपणे अतिक्रमणाचा वेढा पडला असुन या पुरातन वास्तूचे जतन करणे एक आव्हान आहे.

(तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटिअर
२ ) दुर्गभ्रमंती नाशिकची:- अमित बोरोले
३ )उपेक्षित दुर्गांचा ईतिहासः- प्रा.डॉ. जी.बी.शहा
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

अतिशय भरभक्कम किल्ला दिसतोय मात्र अतिक्रमणांच्या वेढ्यात पार बुजून गेलाय. कोट पाहून काहीशी शनिवारवाड्याची आठवण आली.

ह्या अनवट किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल खास आभार.

पैसा's picture

27 May 2018 - 7:06 pm | पैसा

अतिशय दर्जेदार लिखाण

अगोदर फोटो पाहून घेतले. मस्तच. या किल्याविषयी काहीही माहीत नव्हते. छान माहीती दिली. झोपड्यांचे अतिक्रमण जरा अवघडच आहे. किल्ला बराच सुस्थित दिसतोय. सुंदर लेख. आवडला.

मनराव's picture

29 May 2018 - 11:55 am | मनराव

मस्त !!!

अमरेंद्र बाहुबली's picture

31 May 2018 - 1:03 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला. किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 May 2018 - 3:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेख आवडला
आणि किल्ला सुध्दा
पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

1 Jun 2018 - 1:01 pm | दुर्गविहारी

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासून आभार.