भुलेश्वर

Primary tabs

शाली's picture
शाली in भटकंती
17 May 2018 - 2:31 pm

मला महिन्याच्या शेवटच्या सोमवारी-मंगळवारी घरी बसने जमत नाही. मी नकाशावर माझ्या घराचा केंद्रबिंदू धरुन १०० किलोमिटर त्रिज्येचे एक वर्तुळ आखून घेतले आहे. रविवारी रात्री झोपताना तासभर या वर्तुळात डोके घालून बसले की काही न काही सापडतेच. गेले दहा वर्षे मी हेच करतो आहे पण अजुन काही पुर्ण वर्तुळ भटकुन पुर्ण झाले नाही. पण कधी कधी अगोदर पाहीलेलेच परत परत पहावे वाटते. अशा वेळी माझी पावले (चाके म्हणूयात) हमखास वळतात अशी काही ठिकाणे म्हणजे पुण्याजवळ असलेले रामदरा, यवत जवळ असलेले भुलेश्वर सिन्नर जवळचे गोंदेश्वर किंवा निघोजचे रांजण-खळगे. दिवस हमखास मस्त जाणार याची खात्री.

यावेळेस भुलेश्वरला जायचे ठरवले. भुलेश्वरला जाताना रमाबाईंचे वृंदावन, थेऊर हे बोनस असतात. भुलेश्वरला जाताना सोमवार शक्यतो टाळतो. त्यामुळे मंगळवारी निघालो. नियमाप्रमाणे डाएट खुंटीला टांगुन ठेवले आणि तिखट पुऱ्या, पिठलं-भात, दही, बाकरवडी, पक्ष्यांसाठी दोन-तिन किलो वेगवेगळे धान्य, पाण्याच्या बाटल्यांचा क्रेट, कॅमेरे गाडीत टाकले आणि निघालो. प्रवास साधारण दिड तासाचा. तरीही शक्यतो मी सहा-साडे सहाला निघतो. तुम्ही जर खादाडीत रस असणारे असाल तर डबा वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. सोलापुर हायवेला छान जेवण देणारे धाबे आहेतच. कामतांच्या विठ्ठलचे हॉटेलही आहेच. पण दर्जा मात्र पुर्वीचा राहीला नाही. पण स्वच्छ टॉयलेट, हवेशीर बैठकव्यवस्था असल्याने श्रमपरीहारासाठी १५-२० मिनिटे थांबायला जागा ऊत्तम. कामतपासून पुढे काही किलोमिटर गेले की ऊजव्या हाताला भुलेश्वरसाठी रस्ता वळतो. पुणे-सोलापुर हायवेपासून आत साधारण ११ किमी तर पुण्यापासून भुलेश्वर साधारण ४५ किलोमिटर आहे.

हे मंदिर छोट्या टेकडीवर असुन गाडी अगदी वरपर्यंत जाते. तुम्ही जर पहिल्यांदाच हे मंदिर पहात असाल तर प्रथमदर्शनीच जाणवते की मंदिराचे बांधकाम बरेचसे इस्लामीक पद्धतीचे आहे. दुरुन एखाद्या मश्जीदप्रमाणे दिसते. कारण नेहमीचेच. मुस्लीम आक्रमकांपासून बचाव. मंदिर म्हटले की कळस हवाच, पण या मंदिराचे कळस हे ‘कळस’ कमी आणि ‘गुंबद’ जास्त वाटतात. या गुंबदांच्या आजुबाजूला मिनारही आहेत. मंदिराचे बांधकाम तेराव्या शतकातले आहे. काही कथांनुसार हे मंदिर पांडवांनी बांधले आहे. कृष्णदेवराय या यादव राजाने याचा जिर्णोद्धार केला होता. आजुबाजूला चुना दगड असला तरी मंदिराचे बांधकाम हे काळ्या बेसॉल्ट दगडाचे आहे. खरं तर हा एक किल्ला आहे. १६३० च्या आसपास मुरार जगदेव यांनी पुण्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला. याला मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला असही म्हटले जाते. हिंदु मंदिरांप्रमाणे याही मंदिराच्या अनेक पौराणीक कथा आहेत. भगवान शंकराबरोबर लग्न करण्यासाठी पार्वतीने शंकरासाठी येथेच नृत्य केले होते. ईथे तुम्हाला स्रीरुपातील गणपतीही दिसेल. या गणपतीला ‘लंबोदरी’ किंवा ‘गणेश्वरी’ देखील म्हणतात. तुम्ही जर गर्भागृहात गेलात आणि तिथे असलेल्या एका छोट्या पोकळीत पेढ्याचा प्रसाद ठेवला तर काही वेळाने तो नाहीसा होतो म्हणतात. मी काही कधी अनुभव घेतला नाही. या मंदिराला ऐतिहासीक महत्व असुनही येथे एकही गाईड मात्र नाही. मंदिरात तुम्हाला हॅंडीकॅम न्यायला परवानगी नाही पण कॅमेरा मात्र नेऊ शकता. (हॅंडीकॅम पेक्षा कॅमेऱ्याने ऊत्तम व्हिडिओ घेता येतात हा माझा अनुभव.)

मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र मन एकदम शांत होतं. बेसॉल्ट दगडांमुळे असेल पण ईथली हवा ईतकी अल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारी आहे की क्षणभरात तुमचा थकवा कुठल्या कुठे पळून जातोच पण मनावर आलेला रोजच्या जगण्याचा ताण निमिषात दुर होतो. तुम्ही प्रवेशद्वारातुन आत गेल्यापासुन गर्भागृहात जाईपर्यंत मन एका वेगळ्याच शांततेने भरुन गेलेले असते. सोमवार किंवा ईतर महत्वाचे दिवस टाळून जर तुम्ही गेला तर ईथली निरव शांतता आणि त्यामुळे मनाला मिळालेली ऊर्जा ही नंतर कितीतरी दिवस तुम्हाला तरतरीत ठेवते. दर्शन घेतल्यानंतर जेंव्हा तुम्ही गर्भागृहाला प्रदिक्षणा घालता तेंव्हा मात्र तुम्ही चकीत होवून जाता. मी एकदा काय कैकदा हे मंदिर क्षपाहीले आहे. आणि प्रत्येक वेळा भान विसरुन गेलो आहे. इथल्या भिंतींवरील कोरीव काम, मुर्त्या, शिल्पे पहाताना अचंबित व्हायला होते. या सगळ्याबरोबर माझा पुलंचा “आणि तो मुसलमान *** ** ***” म्हणनारे ‘हरितात्या’ देखील होतोच होतो. दरवेळी होतो. ईतक्या सुंदर शिल्पांवर हातोडा ऊचलताना काहीच कसे वाटले नसेल? ही भंगलेली शिल्पे सुद्धा जर ईतकी सुंदर असतील, आनंद देणारी असतील तर मुळ स्वरुपात असताना त्यांचे सौंदर्य कसे असेल? हात, पाय, शिर फोडताना आपण काहीतरी लाजीरवाने करतोय असं वाटलं नसेल? असो.
मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या थोड्याफार जंगलात मी पक्ष्यांसाठी आणलेले धान्य विखरतो. भुक लागायला सुरवात झालेली असते. त्यामुळे सर्व शिल्पांना ‘परत येईन’ सांगुन गाडी ‘रामदऱ्याकडे’ वळवतो. माझ्याबरोबर रामालाही तिकडे भुक लागलेली असते. त्यामुळे राघवाला नैवेद्य दाखवून जेवायची घाई होते आणि गाडीची गतिही वाढते आपसुक.

तुम्ही जर पुर्ण दिवस भटकंतीसाठी काढणार असाल आणि व्यवस्थित वेळेचे नियोजन केले तर तुम्हाला भुलेश्वर, रामदरा, थेऊर अगदी आरामात करता येईल. पक्षीप्रेमी असाल तर तुमच्यासाठी येथे पर्वणीच आहे. ईथे अनेक पक्षी स्थलांतरासाठी येतात. ऊत्तम फोटो मिळण्याची खात्रीच असते. फक्त तुमची यायची वेळ योग्य हवी. सोबत फोटो दिले आहेतच अंदाज येण्यासाठी. पण ते या अगोदरच्या ट्रिपमध्ये कधीतरी काढलेले आहेत. (माझा स्थापत्य किंवा पुरातत्वचा काहीच अभ्यास नसल्याने मुर्त्यांविषयी किंवा मंदिराविषयी मला फारसे माहीत नाही.)

कामथ

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

भुलेश्वर

प्रतिक्रिया

भुलेश्वर नाव वाचताच हृदयात एक जोरात कळ आली. आता वाचायाला घेतो.

प्रचेतस's picture

17 May 2018 - 3:31 pm | प्रचेतस

बाकी तुमच्याही लेखात 'तिचा' फोटो पाहून कळ अधिकच वाढली.

धाग्यात मीही 'तिलाच' शोधत होतो. (तुमच्यासाठीच. काळजी नसावी!) ;-)

रच्याकने, गेल्या वेळेस भुलेश्वरला गेलो होतो तेव्हा 'तिचे' बरेच फोटो काढले. पण नुसताच कॅमेरा नेला होता. तिथे किमान सहा फूट उंचीवर कॅमेरा सेट करता येईल असा ट्रायपॉड आणि दोनेक रिफ्लेक्टर्स न्यायला हवेत सोबत. बघू. नेक्ष्ट टैम.

टवाळ कार्टा's picture

18 May 2018 - 8:00 pm | टवाळ कार्टा

जाताना तिच्या ह्यांनासुद्धा घेउन जा...फोटो आणखी चांगले येतील =))

गुड आयडिया. दोघांचेही फोटो काढतो. =))

प्रचेतस's picture

19 May 2018 - 5:50 am | प्रचेतस

=))

दुर्गविहारी's picture

19 May 2018 - 6:32 pm | दुर्गविहारी

LOL ! :-)))))))))

कपिलमुनी's picture

17 May 2018 - 2:48 pm | कपिलमुनी

लेख आणि फोटो छान !
वल्लीच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत :)

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 3:15 pm | जेम्स वांड

काय सुंदर फोटो काढता हो! अप्रतिम!

प्रचेतस's picture

17 May 2018 - 3:30 pm | प्रचेतस

कारण नेहमीचेच. मुस्लीम आक्रमकांपासून बचाव.

मंदिराचा बाह्यभाग जो आज इस्लामी पद्धतीचा वाटतो तो वास्तविक अलीकडचा आहे म्हणजे १८ व्या शतकातला. पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी ह्यांनी ह्या इस्लामी वावटळीत भग्न झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ह्या जीर्णोद्धारात काही अल्पशा त्रुटी राहिल्या आहेत त्या तेथील काही शिल्पपटांच्या विखुरलेल्या अवषेषांपासून दिसून येतात. मूळचं बाराव्या/तेराव्या शतकातल्या ह्या आज भग्न झालेल्या मंदिराची शैली मूळचा कळस अस्तित्वात नसल्याने नक्की ओळखता येत नाही. कदाचित हे भूमिज मंदिर असावे.

कृष्णदेवराय या यादव राजाने याचा जिर्णोद्धार केला होता

कृष्ण यादव म्हणजे सिंघण दुसरा ह्याचा मुलगा आणि रामचंद्रदेवाचा पिता. हा सिंघणानंतर देवगिरीच्या सिंहासनावर आला. त्याने भरपूर मंदिरे बांधली मात्र इकडील भुलेश्वर मंदिर त्याने बांधले किंवा त्याचा जीर्णोद्धार केला ह्याचा कसलाच लिखित पुरावा नाही. काही अभ्यासकांच्या मते मंदिर यादवकालाहूनही प्राचीन आहे मात्र ते मत मला फारसे पटत नाही. मंदिर बहुधा यादवकालीनच आहे. भुलेश्वरच्या आजूबाजूच्या प्रदेशात म्हणजे माळशिरस, नायगाव, कोथळे आदी लहान लहान गावात कित्येक यादवकालीन अवशेष आहेत. जुनी मंदिरे, सतीशिळा, वीरगळ. बघायला मजा येते फार.

या गणपतीला ‘लंबोदरी’ किंवा ‘गणेश्वरी’ देखील म्हणतात

त्या शिल्पाना गणेशिनी किंवा वैनायकी असे नाव आहे. गाणपत्य शाक्त पंथातील ही एक देवता. ह्याच्याच जोडीला इथे भिंतींवर ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, चामुंडा, इंद्राणी आदी मातृका देखील आहेत.

बाकी त्या कामतला न गेलेलंच उत्तम. कांचनमध्ये उत्तम जेवण मिळतं.

बाकी मी ह्या मंदिरावरील शिल्पपटांविषयी अल्पसे येथे लिहिले आहे. भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट

शाली's picture

17 May 2018 - 4:15 pm | शाली

@प्रचेतस
वा वा! फारच सुरेख, रोचक व माहितीपुर्ण लेख. मस्तच.
मी आजवर खुपदा भुलेश्वर पाहीले आहे. पण चित्रकलेचा विद्यार्थी असल्याने रेखाटनाच्या दृष्टीनेच पहात असे. आता मात्र नक्कीच वेगळे भुलेश्वर दिसेल तुमच्या लेखामुळे. वाचन खुण साठवली आहे. लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!

सूड's picture

25 May 2018 - 12:25 pm | सूड

वरचा लेख वाचून याच प्रतिसादाची अपेक्षा होती.

तिथली मोकळी कोरडी हवा फार आवडतो.
वाहन स्वत:चे नसल्याने सकाळी सहाला पंढरपुर रेल्वेने भिगवणला उतरून#१ स्टेशनजवळचे पक्षी पाहिले. मग बसने यवत. दुसय्रा बसने (दहाची) भुलेश्वर नाका. परतायला बस नव्हती. टेंपोने मेन रोडवर. परत बसने उरुळी कांचन. आतमध्ये फेरफटका मारून स्टेशनला इंद्रायणी एक्सप्रेस मिळाली ( इथे सिंधी समाजाचे संक्रातीच्या काळात शिबिर पंधरा दिवस असते. ते लोक विशेष थांबा रेल्वेकडून मागून घेतात. ) त्याने साडेनऊला घरी आलो.
पुन्हा हाच प्लान करायचा विचार आहे.
भुलेश्वर फारच भारी आहे.

#१ अगोदरच्या मद्रासकडच्रा गाडीने गेल्यास तलावाच्या पक्षीतीर्थावर जाणारी यश्टी मिळते असे कळले. तरी स्टेशन ते इंदापुर नाका या तीन किमि रसत्याकडे येणाय्रा पाण्यात रग्गड बदके होती. " हेच पक्षी तिकडे असतात." - गावकरी.

शाली's picture

17 May 2018 - 6:20 pm | शाली

@कंजूस
यावेळेस येताना मला कळवा म्हणजे ईतकी यातायात होणार नाही तुमची. भुलेश्वरला जायला मी केव्हाही तयार असतो.

कंजूस's picture

17 May 2018 - 7:27 pm | कंजूस

नक्कीच,धन्यवाद.

मुंबई /ठाणेकडून येणाय्रांस ट्रेनशिवाय पर्याय नसतो.
----
त्या मुर्ती तोडल्या गेल्यावर देवळाचे रूप मशिदीसारखे करण्यात आले असावे. त्या उंच भिंतींमुळेच आत खूप अंधार असतो.

मुळात अतिशय सुंदर असलेल्या मुर्ती भग्न अवस्थेत पाहुन नेहमीच वाईट वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |

सिरुसेरि's picture

17 May 2018 - 5:50 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेखन .

दुर्गविहारी's picture

19 May 2018 - 6:31 pm | दुर्गविहारी

खुपच उत्तम धागा . भुलेश्वरच्या रस्त्यावर थोडी तटबंदी आहे. पायर्‍यांनी खाली उतरलात तर गडाचा मुळ दरवाजा आणि एक खांब टाके पहायला मिळते. शिवाय परिसरात एक मुस्लिम शैलीचे स्थापत्य आहे. ते काय हे मला कळाले नाही. माझ्या भेटीमधे मी कुटुंबियासोबत गेल्यामुळे तितके निवांत पाहु शकलो नाही. ;-)
पुन्हा एकदा भेट द्यायला नक्कीच आवडेल. बघुया मि.पा.करांबरोबरच जमवावे असा विचार करतोय. तुमच्या भटकंतीवरचेआणखी धागे येउ देत. पु.ले.शु.

शाली's picture

19 May 2018 - 7:17 pm | शाली

दुर्गविहारी,
या लेखाला तुमचा प्रतिसाद म्हणजे अतिच झाले. तुमच्या लेखांचा मी पंखा आहे. ‘अनवट किल्ले’ ही लेखमाला मी कितीदा तरी वाचली आहे. निव्वळ अप्रतिम!
चित्रकलेचा थोडा छंद असल्याने माझे समोरच्या शिल्प किंवा वास्तूतल्या ईतिहासापेक्षा सौंदर्याकडेच जास्त लक्ष असते. त्यामुळे माझ्या भटकंतीचा कुणाला तसा फारसा ऊपयोग नाही. असो.
प्रतिसादाबद्दल आभार!

छान आहे लेख, आता भेट द्यायला हवी

पद्मावति's picture

24 May 2018 - 1:24 pm | पद्मावति

लेख आणि फोटो दोन्ही मस्तच.