सोडे कोलंबीपासून बनवतात. सोललेल्या कोलंब्या म्हणजे सोडे.
मोठ्या कोलंब्या सोलून त्या सरळ ठेऊन उन्हात कडकडीत वाळवून साठवणीसाठी तयार करतात.
साहित्यः
वाटीभर सोडे
पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचून
हिंग थोडसं
हळद १ चमचा
लाल मसाला २ चमचे
चवीनुसार मिठ
तांदळाचे पीठ १ चमचा
लिंबाएवढी चिंच
फोडणीसाठी तेल
फोडणीसाठी तेल
२ मध्यम चिरलेले कांदे
कोथिंबीर चिरलेली थोडी
२ हिरव्या मिरच्या मोडून
भरीसाठी भाज्या हव्या असतील तर
१ वांग फोडी करून
बटाटा फोडी करून
शेवग्याच्या शेंगा तुकडे करुन
पाककृती
सोडे कोमट पाण्यात १० मिनीटे भिजत घालावेत.
गॅसवर भांडे गरम करुन तेल टाकून लसूण फोडणीला द्यायचा व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवायचा. आता त्यावर हिंग, हळद मसाला घालायचा.
ते एकजीव झाले की कोलंबीचे सोडे, शेंगा, बटाटे व वांगी घालायची.
आता त्यात गरजेनुसार पाणी घालायचे व भाज्या शिजू द्यायच्या.
भाज्या व सोडे शिजले की त्यात चिंचेचा कोळ करून त्यातच तांदळाचे पीठ कालवून तो कोळ रश्यात घालावा. पुन्हा कालवणाला एक उकळी येऊ द्यावी व मिठ घालावे. नंतर गॅस बंद करण्यापूर्वी मोडलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी म्हणजे कोथिंबीर व मिरच्यांचा सुगंध टिकून राहतो.
आता घरभर मस्त सोड्यांच्या कालवणाचा घमघमाट सुटलेला असतो व आपोआप भूक लागते.
प्रतिक्रिया
2 May 2018 - 3:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोड्यांचा कोणताही प्रकार शिजत असला की त्याचा घरभर घमघामाट सुटतो... आणि अर्थातच भूक खवळते ! गरम गरम भात, सोड्याचे कालवण आणि तांदळाचे पापड/फेण्या किंवा उडदाचा लसूण पापड म्हंजे स्लsssर्प बेत ! वांगे, बटाटा व शेवग्याच्या शेंगा केवळ भर नसून कालवण घट्ट बनवून त्याची चवसुद्धा वाढवतात असे मत आहे. :)
कमी पाणी घालून केलेले घट्टसर कालवण आणि तांदळाची भाकरी/भात आणि जोडीला पापड/फेण्या हा अत्यंत आवडता बेत आहे... वेळ-काळ-विरहित !
2 May 2018 - 4:44 pm | कपिलमुनी
जागू ताइची पाकृ आणि एक्का काकांच्या वर्णनाने ४ वाजता भूक लागली
3 May 2018 - 3:16 am | निशाचर
घमघमाटाला +१. आणि असं एखादं कालवण उरलंच तर दुसर्या दिवशी न्याहारीला गरम मऊभाताबरोबर खायला मिळण्यासारखं सुख नाही.
2 May 2018 - 4:51 pm | प्रसाद_१९८२
जागू ताइची पाकृ आणि एक्का काकांच्या वर्णनाने ४.५५ वाजता भूक लागली
2 May 2018 - 4:51 pm | कपिलमुनी
पाकॄ आणि फोटो मस्तच ! पावसाळ्यात सोड्याचे कालवण आणि गरम भात खायला मज्जा येते.
** सोडे घालून पुलाव / खिचडी असे भाताचे प्रकार करतात , त्याचि पाकृ मिळेल का ?
3 May 2018 - 4:02 am | निशाचर
माझ्या माहितीप्रमाणे थोडक्यात कृती अशी आहे: तांदूळ धुवून निथळून ठेवणे. तेलात तमालपत्र, लवंगा, काळे मिरे फोडणीस टाकून त्यात कांदा कोमवणे. मग हिरवं वाटण (कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची, भरपूर लसूण - हे खलबत्यात कुटलं तरी मस्त) घालून छान परतल्यावर त्यात सोडे (भिजवलेले सोडे थोडे पिळून घ्यायचे) किंचीत परतणे. मग तांदूळ, हळद, घरगुती मसाला (किंवा मिरचीपूड, थोडी धणेजिरेपूड, अगदी थोडा गरम मसाला) घालून तांदूळ एकदोन मिनिटं परतणे. त्यात नारळाचं दूध / गरम पाणी / दोन्ही घालून उकळी आल्यावर मीठ घालून (सोड्यातही मीठ असतं) झाकण ठेऊन मंद आचेवर भात शिजवणे. नारळाच्या दुधाने भात सुरमट होतो, त्याप्रमाणे मसाला हवा किंवा दूध+पाणी घ्यावं.
शाकाहार्यांसाठी साधारण अशीच वालाची (मोड आल्यावर सोललेल्या) खिचडी मस्त होते. खाताना वरून थोडं तूप, ओला नारळ.
4 Jun 2018 - 4:43 am | दीपा माने
आणखीही अशा पाकृ देणे.
2 May 2018 - 6:43 pm | शाली
वा!
2 May 2018 - 11:21 pm | एस
जागुताईंचा धागा म्हणजे मेजवानी. सोड्यांचे कालवण हा अत्यंत आवडता प्रकार. मला यातला कारळे वाटून घातलेले कालवण जास्त आवडते.
3 May 2018 - 3:32 am | निशाचर
पाककृती मस्तच! आमच्याकडे चिंचेऐवजी आमसुलं (किंवा या दिवसांत कैरी) असते आणि तांदळाची पिठीही लावत नाहीत, वाटल्यास थोडं ओल्या खोबर्याचं वाटण.
एवढे मोठे सोडे मात्र जास्त बघितलेले नाहीत.
3 May 2018 - 12:47 pm | जागु
कपिलमुनी, प्रसाद, शाली, एस, धन्यवाद.
निशाचर अगदी बरोबर. कोणतेही नॉनव्हेज जेवण शिळे झाले की मुरते आणि जास्त टेस्टी लागते. आणि कैरी ह्या कालवणांत अप्रतिमच लागते. पिठ आम्ही रश्याला दाटपणा येण्यासाठी वापरतो. बाकी ओल्या माश्यांना नारळाच वाटण वापरतो.
4 May 2018 - 11:59 am | केडी
वाह, सुरेख, आमच्याकडे बहुतेक वेळा सोडे सुक्के, कांदा टोमॅटो तेलात परतून करतात, पण का प्रकार नक्कीच करून बघेन...
5 May 2018 - 8:36 am | जेम्स वांड
आता सोडे ऑनलाइन कुठं मिळतील ते सांगा
9 May 2018 - 8:32 pm | जेम्स वांड
ऑनलाइन मिळण्याचा काही मार्ग आहे का?
10 May 2018 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुकी मासळी ऑनलाईन मिळते की नाही माहीत नाही. पण, चवीने खायला सुकी मासळी उत्तम प्रतीचीच असायला हवी. उत्तम प्रतिची म्हणजे... मुळात उत्तम प्रतिची असलेली मासळी ताजी असतानाच सुकायला टाकलेली असायला हवी... न विकली गेल्यामुळे उरलेली मासळी काही तासांनंतर (उर्फ 'उतरलेली') सुकवली तर तिची चव तितकिशी चांगली नसते. त्यामुळे, सुकी मासळी ओळखण्यात तरबेज नसलेल्याने सुकी मासळी फार विश्वासू असलेल्या दुकानदाराकडूनच आणि तिही नीट पारखूनच घ्यावी.
वर्षभर आवडीने सुकी मासळी खाण्याची आवड असलेल्या खवय्यांसाठी वर्षभराची खात्रीशीर सुकी मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणजे... साजगाव येथे कार्तिक शुद्ध एकादशीला सुरू होणारी प्रसिद्ध बोंबल्या विठोबाची यात्रा. साजगाव खोपोली पेण मार्गावर, खोपोलीपासून साधारण १.५-२ किमीवर आहे. कोकणातले उत्पादक आणि घाटावरचे विक्रेते यांच्यात येथे १५ दिवसांत कोटीभर रुपयांचे सुक्या मासळीचे घाऊक व्यवहार होतात.
23 May 2018 - 12:43 am | डॉ सुहास म्हात्रे
चांगल्या प्रतीची सुकी मासळी ओळखण्यासाठी मदत म्हणून काही फोटो देत आहे...
उत्तम प्रतिची सुकट अशी, पूर्ण आकाराची (तुकडे न झालेली) आणि चकचकीत असते. डावीकडे जवळा (लहान आकाराची) सुकट व उजवीकडे करंदी/अंबाडी (पूर्ण वाढलेल्या कोलंबीपासून बनवलेली) सुकट आहे.
चांगल्या प्रतिचे सोडे असे पूर्ण आकाराच्या कोलंबीपासून बनलेले आणि म्हणून वक्राकार असतात. त्यांचा रंग तपकिरी असतो... काळसर रंगाच्या सोड्यांची प्रत व चव कमी प्रतिची असते. कोलंबीचा आकार जेवढा मोठा, तेवढा सोडा मोठा बनतो. "एकदम सरळ आकाराचे सोडे" प्रत्यक्षात सोडे नसून माशांचे (बटाट्याच्या चिप्ससारखे) कापून वाळवलेले तुकडे असतात... तेव्हा सावधान !
दर्दी खवय्या विकत घेण्यापूर्वी एखादी कच्ची सुकट किंवा एखादा सोडा खाऊन चवीची खात्री करतो. :)
10 May 2018 - 2:58 pm | केडी
ऑनलाईन भारतात का भारताबाहेर?
भारतात amazon.in , bigbasket आणि हि एक नवीन सापडली
http://dryfishonline.in/
भारत बाहेर अर्थात कुठल्याही एशियन स्टोर मध्ये मिळतील ...... आणि ऑनलाईन पण बरेच पर्याय उपलब्ध आहेत ...
10 May 2018 - 3:05 pm | जेम्स वांड
केडी भो. :)
म्हात्रे काकांचा प्रतिसाद वाचून तर निराशाच झाली होती, म्हणलं काका म्हणतात त्यातही पॉईंट हाय, आता आणि किलोभर सोडे आणायला यात्रेत जायला लागतंय का काय!
11 May 2018 - 10:47 am | डॉ सुहास म्हात्रे
किलोभर सोडे शेजारीच कुठेतरी शोधा. ती यात्रा
वर्षभर आवडीने सुकी मासळी खाण्याची आवड असलेल्या खवय्यांसाठी वर्षभराची खात्रीशीर सुकी मासळी मिळण्याचे ठिकाण
आहे असेच वर सांगितले आहे :)मासळीच्या चवीत जराशीही खोड निघणे जिभेला अजिबात मान्य नसल्यामुळे, आम्ही बोंबल्या यात्रेत जाणे जमले नाही (बर्याचदा नाहीच जमत) तर पेणला फेरी मारून सुक्या मासळीचा साठा करून ठेवतो. :) चवीच्या उच्च प्रतिला पर्याय नाही !
11 May 2018 - 11:43 am | जागु
पेणला कुठे मिळते सुकी मच्छी? मेन मार्केट मध्ये का? माझ सासरच गाव पेण आहे. पण मला तिथल भाजी मार्केटच माहीत आहे.
11 May 2018 - 11:43 am | जागु
पेणला कुठे मिळते सुकी मच्छी? मेन मार्केट मध्ये का? माझ सासरच गाव पेण आहे. पण मला तिथल भाजी मार्केटच माहीत आहे.
11 May 2018 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
खात्रीशीर चांगली सुकी मासळी वर्षभर मिळण्यासाठी घरातल्या या खरेदीच्या "डिपार्टमेंटच्या इन्चार्ज ( ;) )" कडून मिळालेली अपडेटेड माहिती अशी :
१. पोयनाडचा सोमवारचा आठवडी बाजार
२. वडखळचा शुक्रवारचा आठवडी बाजार
वरच्या दोन्ही गावांत कायमस्वरूपी दुकानेही आहेत, पण बाजाराच्या दिवसात मोठ्या प्रमाणात सुकी मासळी विक्रिला आलेली असते आणि त्यामुळे जास्त चांगली प्रत व भाव मिळतो.
10 May 2018 - 11:02 am | जागु
केडी धन्यवाद.
जेम्स काही कल्पना नाही ऑनलाईन मिळतात का त्याची. पण फेसबुकवर एकदा अॅड पाहीली होती.
10 May 2018 - 3:30 pm | जागु
बोंबल्या विठोबाच्या यात्रेत मिळतात हे मी पण ऐकल होत.
11 May 2018 - 12:28 pm | इरसाल
त्यापेक्षा पोयनाडाच्या बाजारात जावा की, सोमवारी असतो बघा, हवे ते मिळेल.
11 May 2018 - 12:33 pm | जेम्स वांड
केडी भाव तुम्ही पण, खालील माश्यांच्या इंग्रजी नावांना मराठीत काय म्हणतात?
बॉम्बे डक
ट्युना
सीयर
सारडाईन
रिबन फिश
सिल्वर बेली
शार्क
11 May 2018 - 12:57 pm | जागु
बॉम्बे डक म्हणजे बोंबील.
ट्युना - कुपा
11 May 2018 - 12:59 pm | जागु
शार्क - मुशी
सारडाईन - तरली
11 May 2018 - 1:41 pm | इरसाल
मंकरेल- बांगडा
रिबन फिश- वाकटी
11 May 2018 - 1:50 pm | जेम्स वांड
सगळीच सुकी मच्छि बिग बास्केट वर सापडली, आभार केडी भो, मस्त १००-१०० ग्रामची पॅकिंग आहेत. एकावेळी एकच मागवायचे अन खाऊन फस्त करून टाकायचे!
11 May 2018 - 2:29 pm | केडी
लगे राहो... :-))
फोटो अन पाकृ टाका .....
11 May 2018 - 3:21 pm | जागु
अरे वा छानच झाल जेम्स. जास्त घेऊन कधी कधी तशीच पडून राहून खराब होते.
11 May 2018 - 5:43 pm | जेम्स वांड
वांगी, बटाटा, शेवगा टाकणे कंपल्सरी असते का? नाहीतर पूर्ण १०० ग्रामचा रसाच ओरपला असता. नाहीतर जाऊ दे खिचडीच बनवतो
13 May 2018 - 5:24 pm | भीमराव
मावशी, जेवायला बोलवा राव एकदा,
आमच्याकडे जे सोडे मिळतात ते या फोटुपेक्षा वेगळे दिसतात, जाडजूड टपोरी लसूण पाकळ्या सारखे. बाकी पावसाळ्याची तजवीज म्हणून कोकणात सुकी मासळी कणींग भरुन ठेवतात ते खरं आहे का हो?