हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या कुप्रथा टाळून धर्मचरणाचे पालन करा !

सनातन's picture
सनातन in काथ्याकूट
26 Oct 2008 - 4:00 pm
गाभा: 

हिंदूंनो, दिवाळीच्या सणातील पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा !

सध्या दिवाळीत विद्युत् सजावट, अनाठायी रोषणाई, नको तेवढा फटाक्यांवरील खर्च, आतषबाजी इत्यादी गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या सर्व बाह्य दिखाऊपणाने आता हळूहळू आमच्या धार्मिक कृती व प्रतीके यांवरही हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय आता हळूहळू पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागले आहेत; परंतु भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक विचार, परंपरा व तिची प्रतीके यांमागे एक शास्त्रसंमत अशी बैठक आहे, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. पुढच्या पिढीला तर हे माहीतही होणार नाही, अशी स्थिती आहे. हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या खालील कुप्रथा टाळण्याचा प्रयत्‍न करा व धर्माचरणाचे पालन करून ईश्‍वरी चैतन्याचा लाभ घ्या !

दिवाळीच्या दिवशी करावयाचे अभ्यंगस्नान : यासारख्या प्रथा आता मागे पडत चालल्या आहेत. याउलट आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत दूरदर्शन बघणे व मग सुटीचा दिवस म्हणून उशिरा उठणे, असे चित्र दिसते.
अत्तर : अत्तराऐवजी पाश्चिमात्त्य पद्धतीचा परफ्यूम, स्प्रेचा वापर केला जातो.
फराळ : घरी तयार केलेल्या दिवाळीच्या फराळाऐवजी बाजारातील मिठाईवर अधिक भर असतो.
आकाशकंदिल : डोळयांना त्रासदायक होणारे, विविध रंगी प्रकाश देणारे आकाशकंदिल वापरले जातात. त्यातही तेलाच्या दिव्याऐवजी विजेच्या दिव्याचा उपयोग केला जातो.
कपडे : आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीच्या तोकड्या कपड्यांची बेसुमार खरेदी होते.
दीपप्रज्वलन : मातीच्या सात्त्विक पणत्यांऐवजी चिनीमातीच्या असात्त्विक पणत्या, मेणाचे दिवे, मेणबत्त्या इत्यादींचा वापर केला जातो. तेलाच्या दिव्याच्या सात्त्विक ज्योतीचा प्रकाश; जो वातावरणातील सात्त्विक लहरी खेचून आणून सात्त्विकता निर्माण करतो, त्याचा कुठे मागमूसही नसतो. हे सारे पाहिले की, `केवळ सुटीचा आनंद लुटण्याकरताच असे वागत असतांना आमच्या जीवनातून आनंदालाच तर सुटी नाही ना मिळणार ?' या विचारासरशी जीवाचा थरकाप होतो. हे सारे आपणच थांबवले पाहिजे, अन्यथा आपल्या अध:पतनाला आपणच सर्वस्वी जबाबदार असू.
सुगंधी उटणे लावून स्नान करणे : हल्ली सुगंधी उटण्याऐवजी बाजारातून सुगंधी साबण आणला जातो.

हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या कुप्रथा टाळून धर्मचरणाचे पालन करा !

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 4:14 pm | सखाराम_गटणे™

आमच्या घरी तरी दिवाळी बर्‍यापैकी जुन्या पदधतीने साजरी केली जाते.
पण आम्हाला उगाच जुन्या पदधतीचे स्तोम माजवायची गरज नाही.

एके काळी ह्याच धर्मात
१. समुद्र्पर्यटन निषिदध होते.
२. दुसर्‍या धर्मातील माणसाला हिंदु होणे अशक्य, (आठवा मस्तानी प्रकरण). त्या मस्तानीला हिंदु न करणार्‍या लोकांची मला चिड येते.
३. पाव टाकुन धर्मांतरण

असल्या गोष्टीनी आता पर्यंत पुरेसे नुकसान केले आहे. धर्मे हा काळानुसार बदलला पाहीजे. ४ शतकातील नियम आता चालणार नाहीत.

आम्हाला आमच्या देवावर पुरेसा विश्वास आहे.

---
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

अभिज्ञ's picture

26 Oct 2008 - 4:22 pm | अभिज्ञ

हे काय चाललय???
चिनीमातीच्या असात्त्विक पणत्या ...,विजेचे दिवे... ,सुगंधी साबण.... ,...जीवनातून आनंदालाच तर सुटी नाही ना मिळणार ?,
दिवाळीच्या फराळाऐवजी बाजारातील मिठाईवर अधिक भर ....,अत्तराऐवजी पाश्चिमात्त्य पद्धतीचा परफ्यूम, स्प्रेचा वापर काय......,श्या........
हि बालिश विधाने डोक्यात गेलि.
श्या...,दिवाळि आहे का शिमगा आहे????
सनातनशेठ,
काय दिवाळिच्या पहिल्या दिवशीच "टाकुन" बसलात कि काय?

अन हे "धर्मशिक्षणाच्या अभावामुळे" काय प्रकार आहे?
हिंदुंमधे हे मुल्ला मौलवी कधिपासून आले??

कृपया मिसळपाव ह्या स्थळाचे सनातन प्रभात करू नका.

अभिज्ञ.

सखाराम_गटणे™'s picture

26 Oct 2008 - 4:32 pm | सखाराम_गटणे™

धर्माच्या नावावर आधुनिकेला आंधळा विरोध करणार्‍यांचा कडक शब्दांत तीव्र निषेध करतो.

आतापर्यत एकाही हिंदु धर्मगुरुने धर्माच्या नावावर दलितांवर केलेल्या अत्याचारीची माफी मागितली नाही.

अवांतरः मी दलित नाही.

--
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

विकि's picture

28 Oct 2008 - 11:50 am | विकि

तू दलित नाही हे लिहायचे कारण नव्हते . मला वाटते मिपावर तुझ्या या प्रतिसादाविषयी तुझ्या तथाकथित जातीविषयी गैरसमज होऊ नये म्हणून तू असे लिहीलेले दिसतेस,
अवांतर- तू माणूस म्हणून जन्माला आलास हेच महत्वाचे आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2008 - 2:38 pm | llपुण्याचे पेशवेll

आतापर्यत एकाही हिंदु धर्मगुरुने धर्माच्या नावावर दलितांवर केलेल्या अत्याचारीची माफी मागितली नाही.
हा अन्याय फक्त धर्मगुरुंनी केला का?
राजे-रजवाडे, गावाचे कुलकर्णी, जोशी, पाटील, सावकार हे काय धर्मगुरु होते का? मग धर्मगुरुंनी माफी मागायचा संबंध कुठे येतो. ज्यानी ते केले त्यानी माफी मागावी.
(दाढी करणारा न्हावी त्याच्या घरी वाजंत्री वाजवणारे न्हावी आणि टेंभे धरणारे न्हावी यांची लेक सून म्हणून येऊ देणार नाही म्हणतो यात धर्मगुरुंचा दोष तो कसा?)
पुण्याचे पेशवे

विकास's picture

26 Oct 2008 - 6:07 pm | विकास

खर्‍या हिंदूंनी विद्यूत रोषणाई टाळतानाच वीजेचा अनाठायी वापर टाळण्यासाठी, मिसळपाव वगैरे संकेसस्थळावर अशा काळात येणे थांबवून संगणकपण बंद ठेवावा आणि बाकी कुणाशी संवाद न साधता आपल्या परीवाराबरोबर चार दिवस घालवावेत. अर्थात परीवाराची त्याला हरकत नसेल तर... :-)

तसेच दिवाळीच्या शुभेच्छापण इमेल, व्यनि, खरडवही, एसएमएस अशा असात्विक पद्धतीने देऊ नयेत एकतर पुराणापासून चालू असलेल्या निरोप्याला (ज्याला अधुनिक काळात पोस्टमन अथवा कुरीयर म्हणतात) त्याचा वापर करावा अथवा मनोमन नुसती सदीच्छा करावी... नुसती सदिच्छा करण्यात अजून एक फायदा असतो - चुकून सुद्धा चीनमधे तयार झालेली कार्डे वापरली जाणार नाहीत आणि कागदाचा अपव्ययपण टळेल. ;)

वेताळ's picture

26 Oct 2008 - 6:23 pm | वेताळ

दिवाळी सणच पाश्चात्य अंधाकुरण आहे असे म्हणाला असता तर ते योग्य ठरले असते.बाकी टंकलेखनकरण्याचा त्रास वाचला असता.

वेताळ

छोटा डॉन's picture

26 Oct 2008 - 9:33 pm | छोटा डॉन

सनातन भाऊ, आजकाल सर्वच लोक आपल्या संस्कॄतीला विसरुन सरसकट पाश्चात्य रुढींचे व परंपरांचे पालन करतात व त्यामुळे आपल्या वैदीक हिंदुधर्मावर महान अरिष्ट आले आहे हा जावईशोध कधी लागला. का उगाच आपल्या काहीही गोष्टी काढुन उठसुठ पाश्चात्य सम्स्कॄती व सो कॉल्ड बुडत चाललेल्या धार्मीक परंपरांच्या नावाने कंठशोष करण्याची नवी फॅशन आली आहे ?
आपल्या काही प्रश्नांना उत्तरे ....

दिवाळीच्या दिवशी करावयाचे अभ्यंगस्नान : यासारख्या प्रथा आता मागे पडत चालल्या आहेत. याउलट आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत दूरदर्शन बघणे व मग सुटीचा दिवस म्हणून उशिरा उठणे, असे चित्र दिसते.

कोण म्हणतो असे ?
आमच्या आयुष्याच्या उण्यापुर्‍या २४ वर्षात एकदाही आम्हाला दिवाळीच्या दिवशी पहाटे ४ नंतर झोपल्याचे आठवत नाही. उलट आम्हीच काय पण माझ्या परिचयातील बरीच शिकलेली,सवरलेली व आपल्या भाषेतली मॉडर्न मंडळी आपले सर्व सोपस्कार आटपुन व शुचीर्भुत होऊन सकाळी ६ च्या सुमारास "विठ्ठलाच्या मंदिरात" हजर असतात.
तिथे सर्व आप्तांना भेटुन व वडीलधार्‍या माणसांचे आशीर्वाद घेऊन आमची दिवाळी सुरु होते ....

अत्तर : अत्तराऐवजी पाश्चिमात्त्य पद्धतीचा परफ्यूम, स्प्रेचा वापर केला जातो.

अत्तर काय किंवा परफ्युम्स काय, ह्या सर्व गोष्ती सुगंधाने मन प्रसन्न करणार्‍या ह्या सदरात मोडतात. जे जे उत्तम आणि उदात्त ते ए घ्यावे अशी आमच्या पुर्वजांची शिकवण आहे, आता ह्या भारतीय व पाश्चात्य असे त्रांगड कोठुन आले हे आपल्यालाच माहित ....
असो. कितीही नवे सेन्ट्स आले तरी दिवाळीला मान हा "अत्तराचाच" असतो हे आम्ही नमुद करु इच्छितो ....
अजुन एक सांगायची गोष्ट म्हणजे हे "अस्सल खानदानी अत्तर" आम्हाला आमच्या कुटुंबाचा स्नेही असलेल्या "मुसलमान व्यक्तीकडुन" दर वर्षी न मागता प्रेमाने दिवाळीची भेट म्हणुन मिळते, आता ह्यात जर आमचा धर्मबुडवेपणा असेल तर त्या माणसाच्या प्रेमापोटी आम्ही हा आरोप मान्य करतो ...

फराळ : घरी तयार केलेल्या दिवाळीच्या फराळाऐवजी बाजारातील मिठाईवर अधिक भर असतो.

हम्म्. अशी गॄहीतके कशी निघतात ह्यावर एक संशेधन व्हायला हवे खरे ...
आम्ही नोकरीसाठी घरापासुन दुर रहात असल्या कारणाने हौस म्हणुन कधीकधी "बाजरातील मिठाई" घरी न्हेली आहे. पण ज्यावेळी पहिल्या फराळाचे ताट समोर येते त्यावेळी मान हा घरघुती लाडु, करंज्या, अनारसे ह्यांचाच असतो. मुळात बाकीचे खाण्यास विरोध का असावा ?
काही माणसे पोटासाठी हा पदार्थ बनवायचा धंदा करतात, जर आमच्या खरेदीमुळे त्यांना ४ पैसे मिळुन त्यांचीही दिवाळी जर गोड झाली तर ह्यात धर्म कसा बुडाला ?
उलट आम्हाला अशा वेळी कसलाच पश्चाताप होत नाही. काय चुकले हो ह्यात ?

आकाशकंदिल : डोळयांना त्रासदायक होणारे, विविध रंगी प्रकाश देणारे आकाशकंदिल वापरले जातात. त्यातही तेलाच्या दिव्याऐवजी विजेच्या दिव्याचा उपयोग केला जातो.

काही अंशी सहमत. विजेच्या दिव्यांचा वापर अनावश्यक वाढला आहे हे खरे आहे आणि हे थांबवायला हवे ...
खरे पाहिले तर मला "विजेचे आणि तेलाचे असे दोन्ही दिवे लावणे" नामंजुर आहे, असो निम्मा महाराष्ट्र अंधाराखाली असताना विजेच्या दिव्याची कसली रोषणायी करता ?
इथल्या गरिब जनतेला पोटासाठीसुद्धा "खायचे तेल" विकत घेणे अवघड झाले असता ते दिव्यांसाठी वापरुन घर उजळवुन कसला आनंद साजरा करता ?
ह्यात कसली आली मनाची प्रसन्नता ?
सांगायला आनंद होतो की गेल्या ३-४ वर्षापासुन आमच्या आग्रहामुळे आमच्या घरात "तेलाच्या दिव्यांचा अनावश्यक व अतोनात वापर" कमी झाला आहे, आजकाल फक्त देवापाशी तेलाचा/ तुपाचा दिवा लावतात , ही बात सुद्धा आईवडीलांच्या श्रद्धांशी निगडीत असल्याने मी जास्त वाद घालत नाही ....
आता ह्याने सुद्धा आम्ही जर "धर्मबुडवे" ठरत असु तर आम्हाला मान्य आहे ते. धन्यवाद !

कपडे : आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीच्या तोकड्या कपड्यांची बेसुमार खरेदी होते.

पुन्हा तेच, कोण म्हणतो असे ?
मी तर दिवाळीला कुणाला शॉर्ट्स, लो कट्स घालुन फिरताना पाहिलेले नाही, जी रेलचेल असते ती साड्यांची, पारंपारिक सलवार कुर्त्यांचीच ....
आम्हाला पण नोकरीसाठी "ट्राऊसर्स, टाय , शर्ट" घालावे लागतात म्हणुन आम्ही दिवाळीलापण अशा वेशात कडक पॉलीशचे बुट घालुन मंदिरात जात नाही.
असे जनरलाईस्ड स्टेटमेंट करणे व नेहमीप्रमाणे पाश्चात्य गोष्टींवर तोंडसुख घेणे ह्यामागचा हेतु नाही समजला ....
अशा फालतु व तकलादु गोष्तीने धर्म नसतो हो बुडत साहेब ....

दीपप्रज्वलन : मातीच्या सात्त्विक पणत्यांऐवजी चिनीमातीच्या असात्त्विक पणत्या, मेणाचे दिवे, मेणबत्त्या इत्यादींचा वापर केला जातो. तेलाच्या दिव्याच्या सात्त्विक ज्योतीचा प्रकाश; जो वातावरणातील सात्त्विक लहरी खेचून आणून सात्त्विकता निर्माण करतो, त्याचा कुठे मागमूसही नसतो.

वर उत्तर दिले आहे सबब अजुन वेगळे स्पष्तीकरण देत नाही ...

सुगंधी उटणे लावून स्नान करणे : हल्ली सुगंधी उटण्याऐवजी बाजारातून सुगंधी साबण आणला जातो.

असं होयं, बरं बरं ....
पुर्वी ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, आता आहेत म्हणुन त्याचा वापर. माझ्या माहितीप्रमाणे बहुसंख्य मराठी कुटुंबात अजुन सुद्धा "उटण्याचा" वापर होतो व साबण जरी वापरले तरी ते "म्हैसुर सँडल सोप किंवा मोती चंदन सोप" असते. ज्याने प्रसन्न वाटते ते करावे असे आमचे साधे सोपे तत्वज्ञान आहे. अशा गोष्टीत कुठेही धर्म वगैरे येत नाही.
समजा जरी येत असला तरी धर्माचा विरोध दिवाळीपुरता मर्यादित का , सरसकट वर्षभर का पालन नको ह्या गोष्टीचे ?

असो. साम्गण्याचा मुद्दा हा की "धर्माचा पाया ह्या व अश्याच तकलादु गोष्टींवर अवलंबुन नसतो. धर्म ही फार मोठ्ठी उदात्त परंपरा आहे, अशा किरकोळ गोष्टींनी धर्म बुडेल असा कंठशोष करणे हे मनाला पटत नाही" .....
त्यापेक्षा ज्या सामान्य जनतेला दिवाळी साजरी करणे सोडा पण रोजचे २ वेळचे पोटभर जेवण मिळत नाही त्यांच्या मुखी ह्या निमीत्ताने का होईना ४ गोडाचे घास पडतील का हे पहावे. हीच खरी दिवाळी, नाही का ?

बाकी आपनास दिवाळीच्या शुभेच्छा, कसल्याही फालतु गोष्टींचे अवडंबर न माजवता मनोसोक्त सात्विक दिवाळी साजरी करा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

टारझन's picture

27 Oct 2008 - 1:32 am | टारझन

बाकी आपनास दिवाळीच्या शुभेच्छा, कसल्याही फालतु गोष्टींचे अवडंबर न माजवता मनोसोक्त सात्विक दिवाळी साजरी करा ...
लाख मोलाचं आणि नेमकं बोललाय डोन्या ...

पण चोच्या ... एक तक्रार आहे .. एवढ्या फालतु धाग्याला एवढा मोठा प्रतिसाद द्यायला आपला वेळ का वाया घालवला ? (लाईट गेली जाऊंदे , हिटलरच्याच बापाची गेली .. आपल्याला काय ?) बाकी "सनातन" हे मला पाकव्याप्त काश्मिरात जे 'जिहाद'चे ट्रेनिंग देतात, त्याच दर्जाचं हिंदू धर्माचं ट्रेनिंग घेउन आलेले दिसत आहेत ..

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

इनोबा म्हणे's picture

27 Oct 2008 - 1:49 am | इनोबा म्हणे

टार्‍या, ***च्या एवढी वटवट करण्यापेक्षा हा सनातनचा कापुर लावून बस. मन शांत होईल.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

27 Oct 2008 - 5:46 am | विसोबा खेचर

कापराला आमच्या गुरुजींचं नांव वाचून गंमत वाटली! :)

विकि's picture

26 Oct 2008 - 11:27 pm | विकि

या सनातनने त्यांचा स्वतःहाचा एक प्रतिसाद पाश्चात्य भाषेत लिहीलेला आहे त्याच काय?
शेवटी संस्कृती वैगेरे गोष्टी मानवाने उभ्या केल्या आहेत त्यात कोण शिरतय वैगेरे गोष्टी गौण आहेत.

विसोबा खेचर's picture

26 Oct 2008 - 11:35 pm | विसोबा खेचर

हे पाहा सनातनराव, जो तो आपापल्या इच्छेनुसार अन् हौसेनुसार दिवाळी साजरी करत असतो. त्याला हेच करा आणि हे करू नका हे सांगण्यात मला तरी काही मतलब वाटत नाही. माझ्या मते दिवाळी साजरी करणे महत्वाचे! आणि त्या निमित्ताने आपापसात प्रेम, आपुलकी, मैत्री निर्माण होणे, जोपासणे, आणि ती कायम टिकवणे महत्वाचे! माझ्या मते हेच दिवाळी किंवा कोणत्याही सणाचे साध्य असावे, साधने ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात...

आणि एक,

मिपाला सर्वांबद्दलच आदर आहे, परंतु वर अभिज्ञने म्हटल्याप्रमाणे,

कृपया मिसळपाव ह्या स्थळाचे सनातन प्रभात करू नका.

असेच मीही म्हणेन..

धन्यवाद,

-- श्रीसंत तात्याबा महाराज सिंगलमाल्टवाले!

शैलेन्द्र's picture

27 Oct 2008 - 9:10 am | शैलेन्द्र

समुद्रासारख्या मोकळ्या हिंदु धर्माला, १/२ ईंची पाइपमधुन वहायला सांगणे हा वायफळ्पणा आहे.

सुक्या's picture

27 Oct 2008 - 10:14 am | सुक्या

मातीच्या सात्त्विक पणत्यांऐवजी चिनीमातीच्या असात्त्विक पणत्या, मेणाचे दिवे, मेणबत्त्या इत्यादींचा वापर केला जातो. तेलाच्या दिव्याच्या सात्त्विक ज्योतीचा प्रकाश; जो वातावरणातील सात्त्विक लहरी खेचून आणून सात्त्विकता निर्माण करतो, त्याचा कुठे मागमूसही नसतो.

खुप वेळ डोकं खाजवुनही मला हे कोडं सुटलं नाही. मातीची पणती सात्त्विक चिनी मातीची पणती असात्त्विक हे कसे? तेलाचा दिवा सात्त्विक लहरी खेचुन आनतो .. ही काय नवी भानगड? लहरींचा हा कोणता प्रकार आहे? बाकी बर्‍याच गोष्टींची खिचडी असलेला हा लेख वाचुन अंमळ मजा आली.

(धर्मचरणाचे बाबतीत अडाणी) सुक्या
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

आंबोळी's picture

27 Oct 2008 - 10:46 am | आंबोळी

खुप वेळ डोकं खाजवुनही मला हे कोडं सुटलं नाही. मातीची पणती सात्त्विक चिनी मातीची पणती असात्त्विक हे कसे? तेलाचा दिवा सात्त्विक लहरी खेचुन आनतो .. ही काय नवी भानगड? लहरींचा हा कोणता प्रकार आहे?
अहो सुकटराव येवढ्यात डोके नका खाजवू.... हे फारच प्रायमरी आहे. आजुन काळ्या शक्ती.... दैवी शक्ती.... त्यांच्यातील युध्ये.... काळ्या शक्तींचा साधकांवर हल्ला ... मग साधकांचा पलटवार..... काळ्या शक्तींनी साधकांच्या कुठल्यातरी कार्यक्रमाचा कापडी फलक पळवून नेणे.....वगैरे खूपच डोके गरागरा फिरवणार्‍या गोष्टी अजुन यायच्यात.
मी फारच आतूरतेने त्याची वाट पाहतोय...

वाचकांच्या माहितीसाठी: ह्या काळ्या शक्ती म्हंजे जिहादी/ अतिरेकींची भूते.... या काळ्या शक्ती आणि साधकांच्यात एक मोठे युध्ध आमच्या कराडमधे झाले होते. आणि त्याचा वृतांत आमच्यासारख्या सनातनी ध्रुतराष्ट्राला सनातन्-प्रभात रुपी संजयामुळे कळाला.

आंबोळी

छोटा डॉन's picture

27 Oct 2008 - 5:48 pm | छोटा डॉन

आजुन काळ्या शक्ती.... दैवी शक्ती.... त्यांच्यातील युध्ये.... काळ्या शक्तींचा साधकांवर हल्ला ... मग साधकांचा पलटवार..... काळ्या शक्तींनी साधकांच्या कुठल्यातरी कार्यक्रमाचा कापडी फलक पळवून नेणे.....वगैरे खूपच डोके गरागरा फिरवणार्‍या गोष्टी अजुन यायच्यात.

खत्तरनाक , बेक्कार, ज ह ब ह र्‍या !!!
आयला बघायला पाहिजे एकदा, आम्ही बी आता वाट पाहु ...

बाय द वे, ऐन दिवाळीत कामाचा डोंगर उपसुन आमच्या मानगुटीवर बसणार्‍या " मॅनेजर नामक अमानवी काळ्या ( पण रंगाने गोर्‍या ) परकीय शक्तींचा मुकाबला" कसा करता येईल ह्याबद्दल कुणाला माहित आहे का ?
आम्ही पलटवार नाय करु शकत एवढ्या त्वरीत ...
नायतर ह्या शक्ती आमचे "पगाराचे खाते" खाते ताब्यात घेऊन आमच्या तोंडाला फेस आणतील ...

ज्ञानी जनांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत ...

अवांतर : आंबोळीशेठ, कुठे होता राव, आम्ही तुमची लै आठवण काढली मधी ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अवलिया's picture

27 Oct 2008 - 4:30 pm | अवलिया

हिंदूंनो, दिवाळीच्या सणातील पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा !
आमच्या माहितीनुसार इतर धर्मीयच दिवाळी सण साजरे करु लागले आहेत.

सध्या दिवाळीत विद्युत् सजावट, अनाठायी रोषणाई, नको तेवढा फटाक्यांवरील खर्च, आतषबाजी इत्यादी गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जात आहे.

दिवाळीच का? सगळ्याच क्षेत्रात हे होत आहे. आणि आपण वरती उद‍्धृत केलेच अनेक मुद्दे जो करत नाही त्याला हा हिंदु नाही सण साजरे कसे करायचे हे माहित नाही असे म्हटले जाते. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच त्यामुळे येवढे मनावर घेवु नका.

या सर्व बाह्य दिखाऊपणाने आता हळूहळू आमच्या धार्मिक कृती व प्रतीके यांवरही हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे.

अहो धार्मिक कृती किंवा प्रतिक हेच बाह्य दिखावुपणाचा भाग असते. मनात भाव नाही अन तुम्ही तासभर पाण्यात नाक धरुन उभे राहिले किंवा जातायेता देवुळ दिसले की दोन तोंडात मारुन पुटपुटले म्हणजे फार धार्मिक होता असे नाही. देवळात जायचे अन लक्ष चपलांवर किंवा आजुबाजुच्या बायकांवर असेल तर काय उपयोग सांगा बरे....

भारतीय आता हळूहळू पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागले आहेत; परंतु भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक विचार, परंपरा व तिची प्रतीके यांमागे एक शास्त्रसंमत अशी बैठक आहे, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. पुढच्या पिढीला तर हे माहीतही होणार नाही, अशी स्थिती आहे. हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या खालील कुप्रथा टाळण्याचा प्रयत्‍न करा व धर्माचरणाचे पालन करून ईश्‍वरी चैतन्याचा लाभ घ्या !

बघतो वाचुन...

दिवाळीच्या दिवशी करावयाचे अभ्यंगस्नान : यासारख्या प्रथा आता मागे पडत चालल्या आहेत. याउलट आदल्या दिवशी रात्री
उशिरापर्यंत दूरदर्शन बघणे व मग सुटीचा दिवस म्हणून उशिरा उठणे, असे चित्र दिसते.

कोण म्हणतो... अहो तुमच्या घरात किंवा आजुबाजुला असे झाले म्हणजे सगळीकडेच असे असते असे नाही. अहो दिवाळीच काय आम्ही रोज पहाटे उठुन स्नान करतो. आता बोला?

अत्तर : अत्तराऐवजी पाश्चिमात्त्य पद्धतीचा परफ्यूम, स्प्रेचा वापर केला जातो.
कोण म्हणतो स्प्रे पाश्चिमात्य आहे? गुलाबदाणीतुन अत्तरपाणी कधी उडवले नाही वाटते तुमच्या अंगावर कोणी? कमीत कमी १००० तरी वर्षांच्या पुर्वीची पद्धत आहे ती... आणि त्याचेच विकसित रुप म्हणजे स्प्रे जो दुस-या कुणी आपल्यावर उडवायची गरज न पडता आपल्या आपणच उडवुन घेवु शकतो तर ते वापरायचे नाही का?

फराळ : घरी तयार केलेल्या दिवाळीच्या फराळाऐवजी बाजारातील मिठाईवर अधिक भर असतो.
अहो आजकाल कुटुंबसदस्य संख्या मर्यादीत झाली आहे. घरातील बायामाणसांना हे सगळे घरी करण्याइतका वेळ मिळत नाही. आणि मुख्य म्हणजे बाजारात वस्तु मिळत असल्याने आणणे सोईस्कर पडते. आता जर बाजारात मिळालेच नाही किंवा तेवढा वेळ मिळाला तर करतीलच ना... त्याचा येवढा बाउ कशासाठी करायचा? बाजारातुन आणून सण साजरे करतात ना... मग कशाला घरीच केले पाहीजे अन बाजारातले नको.
अहो, बाजार कसा चालणार मग?

आकाशकंदिल : डोळयांना त्रासदायक होणारे, विविध रंगी प्रकाश देणारे आकाशकंदिल वापरले जातात. त्यातही तेलाच्या
दिव्याऐवजी विजेच्या दिव्याचा उपयोग केला जातो.
का हो ? तुमचा संगणक तेलावर चालतो का?

कपडे : आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीच्या तोकड्या कपड्यांची बेसुमार खरेदी होते.

अहो तुमचा आक्षेप कशावर आहे तोकडे कपडे घालण्यावर का? अहो हे नशीब समजा अजुन कपडे घातले जात आहेत. तुम्ही ज्या परंपरांचा उल्लेख करतात ना त्या पुरातन काळात काय कपडे घालत असत आणि काय रितीरिवाज होते ते जर तुम्हाला कळले तर झीट येवुन पडाल.

(अवांतर - जर कपडे कसे असायचे हे पाह्यचे असेल तर हभप संतश्रेष्ठ तात्याबा महाराजांच्या खरडवहीत जावुन बघा. हभप म्हणजे हळुच भलतीकडे पहाणारे)

दीपप्रज्वलन : मातीच्या सात्त्विक पणत्यांऐवजी चिनीमातीच्या असात्त्विक पणत्या, मेणाचे दिवे, मेणबत्त्या इत्यादींचा वापर केला
जातो. तेलाच्या दिव्याच्या सात्त्विक ज्योतीचा प्रकाश; जो वातावरणातील सात्त्विक लहरी खेचून आणून सात्त्विकता निर्माण करतो, त्याचा कुठे मागमूसही नसतो.

तुम्ही चहा मातीच्या सात्विक कपबशीतुन पिता की असात्विक चिनी मातीच्या कपबशीतुन येवढे सांगा... मग पुढे बोलु.

हे सारे पाहिले की, `केवळ सुटीचा आनंद लुटण्याकरताच असे वागत असतांना आमच्या जीवनातून आनंदालाच तर सुटी नाही ना मिळणार ?' या विचारासरशी जीवाचा थरकाप होतो.

अहो तुमचे सगळे मुद्दे असुनही माझ्या तरी जीवनातुन आनंदाला सुटी कधीच नाही मिळाली. उलटदिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

हे सारे आपणच थांबवले पाहिजे, अन्यथा आपल्या अध:पतनाला आपणच सर्वस्वी जबाबदार असू.

अधःपतन म्हणजे काय?

सुगंधी उटणे लावून स्नान करणे : हल्ली सुगंधी उटण्याऐवजी बाजारातून सुगंधी साबण आणला जातो.

तुम्ही इतर वेळेस राखुंडी वापरता की वीटकरीचा तुकडा?

हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या कुप्रथा टाळून धर्मचरणाचे पालन करा !

संस्कृती लवचिक नसेल तर ती संपलेलीच बरी नाही का? असो.

असे काही होणार नाही. भारत काही मरत नाही अन भारतीय संस्कृती तर अजिबात नाही, फार भयानक आक्रमणे पचवली आहेत आज पर्यंत बाहेरची अन आतली सुद्धा...... तुम्ही तर फारच क्षुल्लक आहात !!!

विनायक प्रभू's picture

27 Oct 2008 - 4:38 pm | विनायक प्रभू

नाना चांगला समाचार घेतलात.
अवांतरः अधःपतन= अर्ध्यावरच पतन
अति अवांतर= तुमची ख.व. वाचुन त्रास होत आहे.

सखाराम_गटणे™'s picture

27 Oct 2008 - 4:43 pm | सखाराम_गटणे™

>>संस्कृती लवचिक नसेल तर ती संपलेलीच बरी नाही का? असो.
सहमत, जे बदलेल तेच टिकेल,
>>हल्ली सुगंधी उटण्याऐवजी बाजारातून सुगंधी साबण आणला जा
आम्ही दोन्ही वापरतो, चण्याचे पिठ सुदधा वापरतो.

>>देवळात जायचे अन लक्ष चपलांवर किंवा आजुबाजुच्या बायकांवर असेल तर काय उपयोग सांगा बरे....
देवळात गेले म्हणजे धार्मिक होत नसते.

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.

शैलेन्द्र's picture

28 Oct 2008 - 10:48 am | शैलेन्द्र

"आकाशकंदिल : डोळयांना त्रासदायक होणारे, विविध रंगी प्रकाश देणारे आकाशकंदिल वापरले जातात. त्यातही तेलाच्या
दिव्याऐवजी विजेच्या दिव्याचा उपयोग केला जातो.
का हो ? तुमचा संगणक तेलावर चालतो का?"

लाय भारी............

अभिज्ञ's picture

27 Oct 2008 - 5:14 pm | अभिज्ञ

नाना
जबरि हाणलात.
तुमचा संगणक तेलावर चालतो का?

हे तर लै भारि.
=)) =)) =)) =))

अभिज्ञ.

सनातन's picture

28 Oct 2008 - 10:20 am | सनातन

वाचकाचे व प्रतिक्रिया देनाराचे धन्यवाद...!!!

विजुभाऊ's picture

28 Oct 2008 - 12:55 pm | विजुभाऊ

सनातन प्रभात भौ
अधुनिकता म्हणजे वाईट आणि जुन्या प्रथा त्या सर्वोत्तम हे म्हणजे देशी तालिबान यांचे नव्या अवतारात आगमन
तालीबान खरोखरच एज म्हणायचे तेच आचरणात आणायचे. निदान ते त्या बाबतीत तरी वचनाला जागणारे होते.
तुमची तयारी आहे का सगळे देशी जपण्याची?
स्त्री देहाचे प्रदर्शन नको म्हणायचे आणि तमाशा प्रथेचे पुनरूज्जीवन करायचे...हा असला दुट्टपी पणा सोडा भौ.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सखाराम_गटणे™'s picture

29 Oct 2008 - 2:49 pm | सखाराम_गटणे™

>>स्त्री देहाचे प्रदर्शन नको म्हणायचे आणि तमाशा प्रथेचे पुनरूज्जीवन करायचे...हा असला दुट्टपी पणा सोडा भौ.
भाउ, माफ करा,
तमाशात स्त्री देहाचे प्रदर्शन नसते.
उगाच बदनाम करु नका

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.