" चिकणा आणि कुंभेनळी घाट "

Primary tabs

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
18 Apr 2018 - 10:50 pm


'चिकणा आणि कुंभेनळी घाट'

गेल्या सहा महिन्यात आमच्या आजोबा परिसरात असलेल्या बहुतेक सर्व घाटवाटा धुंडाळुन झाल्या होत्या. यात 'चिकणदरा' आणि 'कळमंजाचा दरा' या दोन शोधमोहिमांचा देखील समावेश होता. हे इथे मुद्दाम नमूद करण्याचं कारण असं की, एकंदरीत घाटवाटा हे प्रकरण ट्रेकींग क्षेत्रात अतिशय अवघड मानलं जातं. सोबत ट्रेकींग करत असलेल्या बहुतेक जणांना वरचेवर घाटवाटांचे ट्रेक्स केल्यामुळं आपोआपच अशा अनवट, अवघड आणि नवीन घाटवाटा धुंडाळण्याची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे आमच्या एकूण गणसंख्येत हळूहळू वाढच होत गेली.
आम्ही फिरलेल्या आजोबा परिसरातील बहुतेक सर्व वाटा नाळेतुनच होत्या. उदाहरणच सांगायचं झालं गुयरीदार, कळमंजाचा दरा, चिकणदरा, बाणची नाळ, सांधणदरी आणि करवली या घाटवाटांचं सांगता येईल. याला अपवाद मात्र पाथऱ्याचा. पाथरा खरं म्हणजे मिश्र स्वरूपाचा घाट होता म्हणजे सुरवातीची आणि शेवटची चढाई दांडावरून किंवा धारेवरून, तर या दरम्यानची चढाई नाळेतुन होती.
हळूहळू थंडी संपून उन्हाळा सुरु झाला होता. उन्हाळ्यात घाटवाटा करणं थोडंसं त्रासदायक असतं तर पावसाळ्यात बहूतेक घाटवाटाच बंद होतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर काहींच्या मते ट्रेकींगचा मोसम संपल्यातच जमा होता. पण घाटवाटांचं व्यसन लागलेल्या आम्हा सर्वांना शांत बसवतंय थोडंच? थोडे दिवस गेले नाहीत तर सर्वांची चुळबुळ चालु झाली. सर्वानुमते त्यातल्यात्यात कमी अंतराच्या घाटवाटा करु म्हणुन 'चिकणा आणि चोरकणा'या दोन घाटांवर शिक्कामोर्तब झालं होतं. नावावरूनच एकंदरीत हे प्रकरण साधंसुधं नाही हे आमच्या सर्वांच्याच लक्षात आलं होतं.
थंडीच्या मोसमात घाटवाटांच्या ट्रेकची सुरूवात थंड वातावरणामुळे कुठूनही केली तरी चालु शकतं पण उन्हाळ्यात तरी ती कोकणातुन केली तर बरं पडतं. याचं कारण असं की, बहुतेक सर्व घाटवाटा पश्चिमवाहीनी आहेत. त्यामुळे अगदी झाडोरा नसलेल्या धारेवरूनही चढाई करायची असेल तरी सुद्धा सकाळच्या वेळेत चारएक तास तरी उन्हाचा त्रास होत नाही. पण आम्ही ठरवलेला हा ट्रेक या नियमाच्या नेमका विरूद्ध करणार होतो त्यामुळं त्यातल्यात्यात काही वेगळं करता येईल काय? यावर शिरगावच्या संतोष सणस यांच्याशी बोलण सुरू होतं. त्यांनी एक चांगला पर्याय दिला तो म्हणजे चिकणा सोबत कुंभेनळी करण्याचा. याचं कारण असं होतं की सकाळी उन्हं चढायच्या आत आम्ही धारेवरच्या चिकण्याने उतरून जाणार होतो आणि दुपारनंतर झाडीभरल्या कुंभनळीच्या नाळेने चढून येणार होतो. सर्वच दृष्टीने हा एक उत्तम पर्याय होता त्यामुळे सगळ्यांनीच तो उचलुन धरला आणि आमचं चिकणा आणि कुंभनळी या दोन घाटवाटा करण्याचं नक्की झालं.
खरंतर उन्हाळ्यात घाटवाटांचे ट्रेक्स करण्याचे काही फायदे नक्कीच आहेत. या दिवसात वाटेवरचं गवत वाळून, वणवा लागुन किंवा लावून (या विषयी बरंच सांगता येईल, पुन्हा कधीतरी) बर्‍यापैकी जळून गेलेलं असतं. त्यामुळे दुरपर्यंतच्या वाटा अगदी स्पष्ट दिसतात आणि वाटा चुकण्याचा संभव नसतो. दुसरं असं की उन्हाळ्यात दिवस मोठा असतो त्यामुळे एका दिवसांत दोन घाटवाटांचा 'लुप' पुर्ण करायला बराच अवधी मिळतो. या दिवसात आंबे, करवंद, जांभळं, आंबोळ्या, तोरणं हा रानमेवा पण भरपूर मिळतो. हो, पाणी सोबत जास्तीचं बाळगावं लागतं, नाही असं नाही. पण हा एकच तोटा सोडला तर उन्हाळ्यात घाटवाटा करण्याचे फायदेच जास्त आहेत. ज्यांना घाटवाटांचं ट्रेक प्लॅनिंग करायचं आहे त्यांनी हे मर्म जाणून घ्यायलाच हवं. अवघड अशा घाटवाटांच्या ट्रेकचं 'ट्रेक प्लॅनिंग' करणं तेवढंच अवघड असतं. नवीन लोकांना ते शिकता यावं म्हणून यावेळी ट्रेक प्लॅनिंग करण्याची संधी यावेळी आम्ही एका नवीन खांद्यावर देणार होतो. उद्देश हाच की प्रत्येक ट्रेकर हा 'लिडर' व्हावा. प्रत्येकाला ट्रेक लिडरची जबाबदारी समजावी आणि ट्रेक लिडरला कोणकोणत्या सर्वकष बाबींचा विचार करावा लागतो तेही शिकता यावं.
खरंतर मुक्कामी ट्रेक पोर्णिमेच्या जवळपास करावेत पण हल्ली प्रत्येकाला असणार्‍या 'बिझी शेड्युल'मुळं प्रत्येकवेळी ते जमतंच असं नाही. पण सर्वांच्या सोईचा त्यातल्यात्यात जवळचा दिवस ठरवला होता मार्च महिन्याच्या अखेरच्या रविवारचा. तारीख होती पंचवीस आणि त्या दिवशी शुद्ध पक्षातली नवमी म्हणजे रामनवमी होती त्यामुळे चंद्रही बर्‍यापैकी मोठा असणार होता.

भोरहुन महाडला जाताना जो वरंध घाट लागतो त्याच्या दक्षिणेस आम्ही जाणार असलेल्या या दोन अवघड घाटवाटा होत्या. घाटवाटा या एकतर नाळेतुन असतात किंवा दांडांवरून. यात आम्ही जाणार असलेल्या या दोन घाटवाटांपैकी एक तर अगदी साठ अंशाच्या दांडांवरून होती. आतापर्यंत आमच्यातल्या नवीन लोकांनी बहुतेक नाळ असले करणार होतो. दांडांवरून उतरणाऱ्या घाटवाटा थोड्या अवघड प्रकारच्या असतात याचं कारण म्हणजे दृष्टीभय, झाडांची सावली नाही, पाण्याची शक्यताच नाही आणि वरती अतिशय निसरडी वाट.
वरंध घाटाच्या माथ्यावर असलेल्या धारमंडपाच्या थोडं अलिकडं शिरगाव नावाचं एक छोटेसं गाव आहे. या शिरगाव जवळच नीरा नदीचा उगम होतो. तिथे एक कुंड आणि गोमुख सुध्दा आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही जाणार असलेला चिकणा घाट या शिरगावातुन सुरू होऊन कोकणातील किये गावात उतरतो. त्याने किव्यात उतरल्यावर पदरातच असलेलं उत्तरेकडील कुंभेनळी गाव गाठायचं आणि कुंभनळीने चढून धारमंडपातुन परत शिरगावात येताना उगम पहायचा आणि ट्रेक संपवायचा असा सर्वसाधारण प्लॅन ठरला होता.

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शनिवारच्या रात्री जेवणं उरकून निघालो. सर्वांना घेऊन पुण्याच्या बाहेर पडायला रात्रीचे अकरा वाजले. वाटेत भोरला आम्हाला अजून तिघेजण येऊन मिळणार होते. शिरगावला पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून बाहेर पडल्या पडल्या फोनाफोनी करून ते वेळेत येत असल्याची खातरजमा केली. सगळे हाडाचे ट्रेकर्स असल्यामुळे तसं काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांना घेऊन शिरगावाबाहेरच्या जननीच्या मंदिरात मुक्कामाला पोहोचलो. उन्हाळा असूनही तिथे भयानक थंडी वाजत होती.

सकाळची आन्हीकं उरकून संतोष सणस यांच्या घरी दाखल झालो. रामराम शामशाम झाल्यावर त्यांनी आम्हाला वाट दाखविण्यासाठी 'गोविंद पोळ' याच्याशी बोलून ठेवलं होतं. आम्ही आल्यावर त्यांनी मुलाला गोविंदच्या घरी त्याला बोलावून आणण्यासाठी पिटाळलं. गोविंद त्याच्या भावाच्या हॉटेलात त्याला मदतीसाठी जातो, त्यामुळे तो काही घरी नव्हता. मग पुढे त्याच्याच हॉटेलात जाऊन चहा बिस्कीटांचा अल्पोपहार उरकला.

.

.

गोविंदची शोधाशोध करुन निघायला जवळजवळ तासभर वाया गेला खरा पण तो सोबत असल्यामुळे पुढे वाटा शोधायला वेळ वाया जाणार नव्हता. तसेही आपण ज्यावेळी कुणावर अवलंबुन असतो त्यावेळी अशा शक्यता गृहीत धराव्याच लागतात. शिरगावातुन खाली नदीपात्रात उतरलो आणि जननीचा दुर्ग डाव्या बाजूला ठेवत धनगरवाडा गाठला. आता धनगरवाड्यापर्यंत कच्चा गाडीरस्ता झाला आहे. या रस्त्यापासूनच एक रस्ता बाजूच्या सोंडेवरुन अर्ध्या दुर्गापर्यंत नेलेला दिसला. धनगरवाड्यानंतर वाट नदीकाठाने असल्याने दाट झाडीतुनच जात होती. उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळं काटेसावर छान फुलली होती.

.

नदीकाठ संपून वाट जसजशी चढु लागली तशी झाडी घनदाट झाली आणि घाटमाथा जवळ आलेला जाणवू लागला.

.

झाडी संपली आणि एकदम कोकणाच्या दरीपाशीच आलो. समोरच चोरकणा दिसत होता. आपण आयत्यावेळी चोरकण्याऐवजी कुंभनळी घाटाने परतण्याचं ठरवलेल्या निर्णयाचं समाधान वाटलं. खरंच अशा उन्हाळ्यात भर दुपारी चोरकण्याने चढणं खुपच अवघड गेलं असतं.

.

पुढच्या पंधरा मिनिटातच चिकण्याच्या सोंडेच्या माथ्यावर पोहोचलो. घाटमाथ्यावरच्या टोकावर असल्यानं बराच लांबपर्यंतचा प्रदेश दिसत होता. महाबळेश्वरचा मढीमहाल म्हणजेच ऑर्थरसीट पॉईंट, प्रतापगड, महादेवमुर्‍ह्याची सोंड, मंगळगड ऊर्फ कांगोरी, बिरवाडी एम.आय.डी.सी,किये गावाच्या पार्श्वभुमीवर दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि उजव्या बाजूला अगदी लगत असलेली खिरणीची सोंड. वाराही असा भन्नाट होता त्यामुळे कितीतरी वेळ तिथे बसून होतो. कुणी उठायचे नावच घेईना. पण शिरगावला वेळेत पोहोचण्यासाठी निघणं भागच होतं. चिकण्याची अतिशय उताराची सोंड खालच्या 'पताची कोंड' या कियेच्या वाडीपर्यंत उतरलेली स्पष्ट दिसत होती.

.

.

उतरताना दोन्ही बाजूला खोल दर्‍या लिंगाण्याचीच आठवण करुन देत होत्या.

.

बरं वाट एवढी निसरडी की बर्‍याच ठिकाणी बुड टेकवल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.

.

वारा एवढा सोसाट्याचा वाहत होता की उभ्याउभ्या पडायला होत होतं. एवढ्या सगळ्यात वाट तरी चांगली असेल तर छे!! कशाचं काय, तीन ठिकाणी एवढ्या अवघड जागा होत्या की दोर बांधण्याशिवाय पर्यायच नव्हता.

.

.

अवघड टप्प्यावरुन सगळेजण उतरुन येईपर्यंत आम्ही बाकी सर्व थांबत असु.

.

त्यातच काही ठिकाणी वाट तर दरीच्या एका टोकावर जाऊन वळत असे.

.

बर्‍यापैकी खाली उतरुन आल्यावर आधारासाठी थोडी झाडी लागली.

.

.

आम्ही जवळजवळ खाली उतरुन आल्याचं जाणवत होतं. झाडी दाट झाली होती आणि कोकणातला उष्माही जाणवू लागला होता.

.

वसंत ऋतु सुरु झाल्याने झाडांना नवीन पालवी फुटू लागली होती.

.

.

घाट संपल्यावरच पोटातल्या कावळ्यांकडं लक्ष गेलं. ते नाष्ट्याची वेळ झाल्याचं सांगत होते. मग काय एका डवरलेल्या आंब्याखाली बसुन पोटपुजा केली. तोंडी लावायला कैर्‍या होत्याच.

.

.

सुर्यनारायण आता बर्‍यापैकी डोक्यावर आले होते. कोकण भाग असल्यामुळे उष्माही चांगलाच जाणवू लागला होता. पताच्या कोंडातुन पायवाटेने किये गावाकडे जाणार्‍या डांबरी सडकेवर उतरलो.

.

.

पुर्वी भोर-महाड मार्गावरील 'भावे' गावातुन कियेला तर 'ढालकाठी' तुन पिंपळवाडीला गाडीमार्ग जोडलेला होता. पण हल्लीच किये आणि पिंपळवाडी दरम्यानचा रस्ता झाल्याने भावेतुन किये, पिंपळवाडी करत ढालकाठीत वर्तुळाकार मार्गाने उतरता येते. याच मार्गावरील पताच्या कोंडापासून किये फारफार तर दोनएक किलोमीटरच असेल पण ही डांबरी सडकेवरची चाल काही संपता संपेना. वाटेत सोसाट्याच्या वार्‍यामुळे झाडाखाली आंब्यांचा खच पडलेला दिसला.

.

शेवटी मजल-दरमजल करत मुख्य रांगेला समांतर जात एकदाचे किव्यात पोहोचलो. या किव्यात घाटमाथ्यावरुन चिकणा घाटाला समांतर 'खिरणीची सोंड' उतरते. पुर्वी या वाटेने उतरता येत असे पण वापराअभावी सध्या ही वाट पुर्णपणे मोडली आहे.

.

किव्याच्या मारुती मंदीराजवळ एसटीचा थांबा आहे. इथून डांबरी सडक सोडून आम्ही कुंभेनळीच्या बाजुला वळलो. थोडे अंतर पार केल्यावर एक सुंदर आणि अतिशय स्वच्छ पाण्याचा काटेरी कुंपण घातलेला तलाव दिसला. हा खाजगी असल्याने रखवालदाराने आत काही सोडलं नाही.

.

दोन झाडांमधून डावी-उजवी मारत मधला ओढा पार केला. कुंभेनळी गाव अजुनही बर्‍यापैकी लांब होतं.

.

.

.

किव्यातुन तळीयेत जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे पण कुंभेनळी थोडीशी आतमधे वसलेली असल्याने ढोरवाटांनी, काटेरी झुडूपातुन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. उन्हामुळे खुपच थकायला होत होतं म्हणून एका मोकळवनातल्या आंब्याच्या झाडाच्या थंडगार सावलीत थोडी विश्रांती घेतली. थंडाव्यामुळे एकाला तर बसल्याबसल्या डुलका लागला.

.

फार वेळ घालवुन चालणार नव्हतं. त्यातच समोरची कुंभेनळीची नाळ खुणावत होती म्हणून पटापटा फोटो काढले आणि लगेचच निघुन कुंभेनळी गावात दाखल झालो.

.

.

गावात थोडी विश्रांती घेतली. स्थानिक गावकर्‍यांकडे कुंभनळी व्यतिरिक्त घाटमाथ्यावर जाणार्‍या वाटांबद्दल चौकशी केली. गावाच्या मागच्या बाजुलाच वारदरा ऊर्फ वाव्हळाची वाट आहे जी घाटमाथ्यावरच्या उंबर्डीवाडीत जाते. उंबर्डीतुन तळीयेत उतरणार्‍या 'वाघजाई' घाटाबद्दल विचारल्यावर एक नवीनच माहिती कळली. या परिसरातल्या बहूतेक घाटवाटांच्या माथ्यावर वाघजाईची मंदीरे आहेत त्यामुळे गावकरी त्या सगळ्याच घाटवाटांना वाघजाई घाट म्हणतात. तळीये, किये, पताचा कोंड, पिंपळवाडी ही गावं तळकोकण आणि घाटमाथा या दरम्यान असणार्‍या पदरात आहेत. घाटमाथ्यावरील गावं जवळ असल्यामुळं या गावातल्या गावकर्‍यांनी सगेसोयर्‍यांकडे जाण्यासाठी त्यांच्या सोईच्या असंख्य नवीन वाटा तयार केल्या आहेत. एकदा मुद्दाम वेळ काढुन या भागातल्या घाटवाटांची शोधमोहिम राबवायला हवी. पाहूया केव्हा जमतंय ते.
घाटमाथ्यावरच्या उंबर्डी किंवा धारमंडपाशिवाय आम्हांला पाणी मिळणार नव्हतं. नाही म्हणायला घाटमाथ्यावर पाण्याचं एक टाकं होतं पण या दिवसांत त्यात पाणी असल्याची शाश्वती नव्हती म्हणून पाणपिशव्या काठोकाठ भरुन घेतल्या. गावातून आडवे जात कुंभेनळी नाळेच्या खाली आलो आणि डावीकडे वळून नाळ चढू लागलो. नाळेत दाट झाडी माजलेली होती. बर्‍याच दिवसांत ही वाट कुणी वापरलेली दिसत नव्हती. झाडे उन्मळून वाटा बंद झाल्या होत्या त्यामुळे नीट लक्ष देऊन वाट शोधतच चढावं लागत होतं. अर्धा घाट चढल्यावर एका मोकळ्या पठारावरुन समोरचा खिरणीचा दांड आणि त्याखाली असणारं किये दिसत होतं. थोडं उजव्या बाजूला पिंपळवाडीच्या पार्श्वभुमीवर कांगोरी खुणावत होता.

.

जसा घाटमाथा जवळ येऊ लागला तसा दुर्ग आणि त्यावरचं जननीचं मंदीर दिसू लागलं.

.

आता बाकी चढ खुपच तिव्र झाला. दर दहा पावलांनंतर थांबावं लागत होतं. उठतबसत एकदाचं वाघजाईचं ठाणं गाठलं. सगळे आल्यावर थोडीशी पोटपुजा केली.

.

.

थोडी पोटपुजा आणि विश्रांती घेतल्यावर पुढच्या दहा मिनीटातच घाटमाथ्यावरच्या खिंडीत पोहोचलो.

.

.

नेमकी इथे उंबर्डीवाडीतुन तळीयात जाणारी वाघजाई घाटाची वाट मिळाली. थोडक्यात सांगायचं झालं तर उंबर्डीवाडीतुन कुंभनळी आणि वाघजाई घाटांच्या वाटा या खिंडीपर्यंत एकत्र येतात. डावीकडे खिंडीतुन कुंभनळी गावात उतरणारी वाट म्हणजे कुंभेनळी घाट तर खिंडीपल्याड असलेल्या डोंगराला उजव्या बाजूने वळसा घालून तळीयात उतरणारी वाट म्हणजे वाघजाई घाट.
आम्हाला धारमंडप गाठायचं असल्यानं आम्ही खिंडीतुन उजवी मारली. वाटेतलं पाण्याचं कोरडं टाकं पाहिलं.

.

उंबर्डीवाडीतले लोक इथंपर्यंत सरपण न्यायला येत असल्यानं वाटा कमालीच्या झाडीभरल्या आणि मळलेल्या होत्या. सपाटीवरच्या वाटेनं तासाभरात उंबर्डीवाडीच्या मागच्या पठारावर पोहोचलो.

.

.

.

सर्वात उंच ठिकाणावर असल्यामुळं बराच लांबपर्यंतचा प्रदेश दिसत होता. वरंध घाटातलं 'भजी पॉईंट' जवळचं नवीन वाघजाईचं मंदीर, नेमकं त्याच्या वरच्या बाजूला असणारं मुळचं गुहेतलं मंदीर, पायवाटेचा वरंध घाट, बाजूच्या सपाटीवरच्या पाण्याच्या खोदीव टाक्यांची जागा, कावळ्या किल्ला आणि त्याला जोडून असलेला न्हावीण सुळका, सुनेभाऊ-पारमाची गावं, रामदास पठार, आंबेनळी-गोप्या घाटांच्या नाळा, तोरणा, राजगड, खुटा घाटाचं टोक वगैरे सोबत्यांना नीट समजावून सांगितलं.

.

पुढच्या अर्ध्या तासात धारमंडप गाठलं. तिथल्या टपरीवजा हॉटेलात एक फक्कडसा चहा मारला. चहाला 'अमृततुल्य' का म्हणतात हे एवढं चालून आल्यावर नेमकं तिथं कळलं.

.

.

.

खरंतर ट्रेक संपल्यातच जमा होता. केवळ गाडीपाशी पोहचून औपचारिकताच पुर्ण करण्याची बाकी राहिली होती. 'नदीचं मुळ आणि ॠशींचं कुळ शोधु नये' असं म्हणतात पण जाताजाता भीमेच्या खोर्‍यातील एका महत्वाच्या नदीचं म्हणजे नीरेचं उगमस्थान पहायचं बाकी होतं. धारमंडपातुन पंधरा मिनीटाच उगमस्थानाजवळ पोहोचलो. बांधीव कुंड, त्याच्या लगतचं गोमुख, समोर असणारी शिवपिंडी पाहीली आणि शिरगावात दाखल झालो. फार वेळ न तिथे काढता परतीचा प्रवासाला सुरुवात केली ती गोविंदकडून वारदरा आणि वाघजाई या दोन घाटवाटा दाखवण्याची कबुली घेऊनच.

.

.

.

.

प्रतिक्रिया

भन्नाट! रच्याकने, फोटोंची साईझ जर कमी करता आली तर फोटो लवकर लोड होतील असे सुचवतो. साधारणपणे वेबसाठी 500-600 KB साईझ पुरेशी होते.

पुढील घाटवाटांच्या प्रतीक्षेत.

दिलीप वाटवे's picture

19 Apr 2018 - 7:56 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद मित्रा,
तसं मी खुपच कमी लेख मिपावर टाकलेत. इथे पोस्ट करणं शिकतोय हळूहळू. तुमच्या सारख्यांच्या सुचनांनी लवकरच शिकेन. अजून काही सुचना/सुधारणा असतील तर स्वागतच आहे.

जयंत कुलकर्णी's picture

19 Apr 2018 - 6:40 am | जयंत कुलकर्णी

मस्तच....

दिलीप वाटवे's picture

19 Apr 2018 - 7:56 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद

पैसा's picture

19 Apr 2018 - 9:22 am | पैसा

घाटावरून कोकणात उतरायला अशा पायवाटा ठिकठिकाणी आहेत. आपल्याला माहीत नसतात पण स्थानिक लोक वापरत असतात.

सरपण आणि पाणी यासाठी या लोकांना, विशेषत: बायकांना फार पायपीट करावी लागते. ते थांबले तर त्यांचे खूप कष्ट कमी होतील आणि वेळही वाचेल.

दिलीप वाटवे's picture

19 Apr 2018 - 8:38 pm | दिलीप वाटवे

गुरुवर्य आनंद पाळंदेंच्या पुस्तकात त्यांनी २२० घाटवाटांची यादी दिलेली आहे. यातल्या बर्‍याचशा वाटा वापराअभावी, कडे कोसळल्याने, वाहतुक व्यवस्था सक्षम झाल्याने बंद झाल्या आहेत तर काही घाटमाथ्यावरच्या आणि कोकणातल्या ग्रामस्थांनी त्यांच्या सोईने नवीन तयार केल्या आहेत. त्यातल्या काहींना घाटवाटा म्हणता येईल तर काही नुसत्याच पाणी जाण्याच्या नाळा आहेत. त्यांना घाटवाटा म्हणता येणार नाही. नवीन अशा १५-२० 'घाटवाटा' तरी मी धुंडाळल्या आहेत. त्यातल्या एका नवीन घाटवाटेचा लेख मिपावर आहे.

'घाटवाटा' हा विषय एवढा मोठा आहे की घाटवाटा नेमकं कशाला म्हणता येईल? त्यांचं प्रयोजन काय? त्यांची दुरुस्ती, संरक्षण व्यवस्था, त्यावर असणारे प्रशासकीय अधिकारी, त्यांची नावं, भरावी लागणारी जकात वगैरे यावर एक लेख मिपावरही लिहिता येईल. याबद्दल मी लिहिलेला एक लेख २०१७ सालच्या "दुर्गांच्या देशातुन" या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.

दुर्गविहारी's picture

19 Apr 2018 - 11:55 am | दुर्गविहारी

अप्रतिम !!! बर्‍याच दिवसांनी घाटवाटांविषयी वाचायला मिळाले. फक्त एक विनंती शक्य झाल्यास स्थानिक लोकांचे मोबाईल क्रमांक दया. नंतर जाणार्‍यांना बराच उपयोगी पडेल. कांगोरी उर्फ मंगळगड आणि वरंधा घाटातील कावळ्या किल्ल्याचे फोटो वेगळ्या अँगलने बघायला मिळाले.
बाकी पैसाताईंशी सहमत.

दिलीप वाटवे's picture

19 Apr 2018 - 9:11 pm | दिलीप वाटवे

स्थानिक लोकांचे मोबाईल क्रमांक खरंतर द्यायला हरकत नाही पण आपल्यासारखे "Mountain Manners" पाळणारे खुपच कमी आहेत. असे नंबर चुकीच्या हातात पडले तर त्याचे बाजारीकरण व्हायला वेळ लागणार नाही. 'भैरवनाथ दार' या अतिशय अवघड घाटवाटेवर शंभर-शंभर लोकांना घेऊन जाणारे माझ्या माहितीत आहेत. पावसाळ्यात देवकुंड, अंधारबन घाटात काय होते हे सुद्धा वर्तमानपत्रातुन वाचायला मिळते. स्थानिकांचे मोबाईल क्रमांक अगदी आपल्यापैकी कुणाला हवे असल्यास वैयक्तिक मी देऊ शकेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2018 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट घाटवाटा सहल ! अप्रतिम फोटो !

रीडर's picture

20 Apr 2018 - 12:29 am | रीडर

'घाटवाटा या एकतर नाळेतुन असतात किंवा दांडांवरून '
यातील नाळेतून आणि दांडांवरून म्हणजे काय?
एक खिंडी सारख्या भागातून आणि एक कड्यावरून असे का?

रीडर's picture

20 Apr 2018 - 12:29 am | रीडर

'घाटवाटा या एकतर नाळेतुन असतात किंवा दांडांवरून '
यातील नाळेतून आणि दांडांवरून म्हणजे काय?
एक खिंडी सारख्या भागातून आणि एक कड्यावरून असे का?

प्रचेतस's picture

20 Apr 2018 - 8:59 am | प्रचेतस

नाळ म्हणजे ओढ्याची वाट.
सह्याद्रीच्या डोंगरकड्यातले पाणी वाहून वाहून खिंडीसारखा भाग तयार होतो. दोन्ही बाजूंस उंच कडे व मधोमध पाणी वाहून दगडधोंड्यांचा खच पडून तयार झालेली वाट. ह्या नाळा अरुंद आणि सुरुवातीचा टप्पा तीव्र उताराच्या असलेल्या असतात. नाळ उतरताना फारसे दृष्टीभय नसते मात्र तरीही अतीतीव्र उतारांमुळे ह्या वाटा उतरण्यास काहीश्या अवघड असतात काही ठिकाणी उंच प्रस्तरांमुळे आधारासाठी दोर लावावा लागतो. उदा. नाणेघाट, कोंडनाळ, सादडे घाट, नळीची वाट

दांड म्हणजे डोंगराची एक सोंड उतरत उतरत पायथ्यापर्यंत गेलेली असणे. ह्या वाटा सौम्य आणि तीव्र ह्या दोन्ही प्रकाराच्या उताराच्या असतात. ह्या वाटांवर दृष्टीभय असते किंवा नसते मात्र घसारा असतो. उदा. पाथरा घाट, राजमाची कोकणदरवाजा घाट

प्रचेतस's picture

20 Apr 2018 - 9:01 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
घाटवाटांवरही एक स्वतंत्र लेख अवश्य येऊ द्यात.

दिलीप वाटवे's picture

21 Apr 2018 - 9:19 pm | दिलीप वाटवे

लवकरच...